गर्द हिरवाईतील श्री केशवराज

योगेश२४'s picture
योगेश२४ in कलादालन
11 Apr 2010 - 11:21 am

"घर सोडा घर आणि जरा बाहेर निघा, जग किती सुंदर आहे थोडं तरी बघा
परदेश राहिला दूर तरी देश आपला छान, किती रंग! कसे रूप! पाहुनी हरते भान."

लहानपणी वाचलेल्या शांता शेळके यांच्या कवितेचा अर्थ आता पूर्णपणे समजु लागला आहे. भटकंतीची आवड ज्यांना लागली आहे त्यांना "घर सोडा" असे सांगावे लागत नाही. त्यांची पाऊले आपोआपच बाहेर वळतात. डिसेंबर महिन्यात आलेल्या सलग सुट्टींचा फायदा उचलत आम्ही दापोली भटकंतीचा कार्यक्रम आखला. तालुक्याचे ठिकाण असलेले हे शहर थंड आणि आल्हाददायक वातावरणामुळे "कोकणचे महाबळेश्वर" म्हणून ओळखले जाते. सुप्रसिद्ध कोकण कृषी विद्यापीठ असलेल्या ह्या शहरास विलोभनीय समुद्रकिनारे, किल्ले, प्राचीन लेणी यांची साथ लाभली आहे. कोणीही ह्या निसर्गसौंदर्याच्या प्रेमात पडावे असा हा परिसर. कोकणचा कॅलीफोर्निया जेव्हा होईल तेव्हा होईल पण कॅलीफोर्नियाला "टफ" द्यावे असे निसर्गसौंदर्य कोकणचे नक्कीच आहे. अशा या दापोली शहरास भेट दिली आणि कायम स्मरणात राहिले ते आसुद येथील "श्री केशवराज मंदिर आणि तेथील परिसर".

दापोलीपासून अंदाजे ६/७ किमी अंतरावर आसुद बाग हे गाव आहे. श्री. ना. पेंडसे यांच्या "गारंबीचा बापु" या कादंबरीत जसे वर्णन केले आहे तसेच हे सुंदर आसुद गाव. या गावतुनच सुरूवात होते ती श्री केशवराज मंदिराकडे जाणाऱ्या पायवाटेची. मुख्य रस्त्याला गाडी ठेवून आपण दाबकेवाडीतून श्री केशवराजच्या वाटेकडे निघतो. केशवराजच्या मार्गावर ठिकठिकाणी मार्गफलक असल्याने वाट चुकण्याचा जराही संभव नाही. मंदिराकडे जाणारी हि वाट खुप सुंदर आणि प्रफुल्लित करणारी आहे. सकाळची मन प्रसन्न करणारी वेळ, दोन्ही बाजुंना आकाशाशी स्पर्धा करणाऱ्या नारळी-पोफळीच्या बागा, आंबा-फणसाची गर्द झाडी आणि त्यातून चुकारपणे धरतीवर येणारी सूर्यकिरणे, कौलारू घरे, लाल मातीची पायवाट आणि त्याचबरोबर आपली सोबत करणारे पाटाचे खळाळते पाणी हे सर्व म्हणजे निसर्गदेवतेने काढलेले एक सुंदर निसर्गचित्रच. अगदी "मंझिल से बेहतर लगने लगे है ये रास्ते" असे म्हणण्याइतका हा परिसर मस्त आहे. कधी कधी असे होते कि मूळ ठिकाणापेक्षा त्याचा प्रवास हा सुंदर वाटतो (अर्थात आपली "मंझिल" हि त्या "सफर" इतकीच अप्रतिम आहे हे त्या केशवराजच्या मंदिरात गेल्यावरच कळते).

वाटेतला निसर्ग बघत आणि चढ उतार पार करत आपण पोहचतो ते आसव नदिच्या पुलाजवळ. पूर्वी या नदीवर एक लाकडी पूल होता. सध्या देवधर कुलबंधुंनी तसेच श्री केशवराज कुलदैवत असलेल्या कुलातील काही भक्तमंडळींनी दिलेल्या देणगीतून व स्थानिक ग्रामपंचायतीच्या मदतीने येथे मजबुत पूल बांधण्यात आला आहे. जुन्या लाकडी पुलाचे अवशेष आजही येथे पाहवयास मिळते. नदी ओलांडून पाऊलवाटेने टेकडी चढून आपण पोहचतो ते श्री केशवराजच्या मुख्य मंदिरात. चारही बाजुला गर्द झाडीत वसलेल्या पुरातन अशा या मंदिराला काढलेल्या रंगामुळे त्याच्या मूळ सौंदर्याला कुठेही बाधा येत नव्हती उलट गर्द हिरव्या वनराईत ते अधिक उठून दिसत होते. श्री केशवराज हे विष्णुचे एक रूप. मंदिराच्या पुजाऱ्यांनी सांगितल्याप्रमाणे हे मंदिर हे पांडवकालीन असून पांडवांनी ते एका रात्रीत बांधल्याची आख्यायिका आहे. असेच एक पांडवांनी बांधलेले शंकराचे मंदिर बुरोंडी या गावी आहे. केशवराजच्या शेजारी लक्ष्मीची सोन्याची एक मूर्ती होती ती चोरीला गेल्याने सध्या गाभाऱ्यात फक्त श्री केशवराजचीच मूर्ती बघावयास मिळ्ते. काळ्या पाषाणातील श्री केशवराजची मूर्ती अतिशय सुबक आहे. मूर्ती चतुर्भुज असून शंख, चक्र, गदा व पद्म अशी आयुधे धारण केलेली आहे. श्वेत वस्त्र परिधान केलेली काळ्या पाषाणातील श्री केशवराजची मूर्ती पाहून आपण नकळतच हात जोडून नतमस्तक होतो.

मंदिराचे बांधकाम हे पुरातन असून आवारात एक दगडी गोमुख आहे. त्यातून बाराही महिने थंड व नितळ पाणी वाहत असते. पुजाऱ्यांच्या म्हणण्याप्रमाणे कोकणात कितीही पाण्याचे दुर्भिक्ष असले तरी हे पाणी कधीही आटत नाही. वरच्या डोंगरातून पाटाद्वारे दगडी पन्हाळीतून हे पाणी खाली आणले जाते. पाटाची हि दगडी पन्हाळी सुमारे १०० ते १५० वर्षे जुनी आहे व पाण्याचा स्त्रोत हा एका पुरातन आम्रवृक्षाच्या बुंध्यातून येत असून तेथे जायची वाट थोडीशी निसरडी आहे. असे म्हणतात कि, "ऋषीचे कुळ आणि नदिचे मूळ" शोधू नये, आम्ही विचार केला कि नदीचे नाही पण निदान या पाटाचे तरी मूळ पाहुया. डोंगराच्या वरच्या बाजुला दाट झाडीत एक वाट जाते त्याच वाटेने थोडे पुढे गेलात कि आपल्याला दिसतो तो पुरातन आम्रवृक्ष आणि त्याच्या बुंध्यातून येणारा पाण्याचा प्रवाह. तेथून तो पोफळीच्या पाटाने आणून तो दगडी पन्हाळीत सोडला आहे. घनदाट झाडी असल्याने आम्ही फार पुढे गेलो नाहि. हा संपूर्ण परिसर पाहवयाचा असेल तर दिड दोन तास अवश्य राखून ठेवावेत.

अनेक कोकणस्थांचे कुलदैवत असलेल्या या श्री केशवराज मंदिरात कार्तिक एकादशीपासून पाच दिवसांचा उत्सव मोठ्या थाटात साजरा केला जातो. अस्सल कोकणी वातावरण, मन प्रसन्न करणारा निसर्ग, श्री केशवराजची मूर्ती यामुळे आपल्याला देवस्थान आणि पर्यटन दोन्ही एकदम केल्याचे समाधान मिळते व आपण परतीच्या वाटेकडे वळतो. मंदिराचे चढ उतार पार करून आपण थकला असाल तर आसुद बाग येथे काही घरात आपल्या अल्पोपहाराची सोय होऊ शकते. थंडगार कोकम, आवळा व करवंद सरबत आपल्या स्वागताला सज्ज असतात. अगोदर सुचना दिल्यास घरगुती जेवणाचीही सोय होऊ शकते. अस्सल कोकणी मेवा जसे, आंबा-फणसपोळी, नाचणी-पोह्याचे पापड, मँगो जॅम व पल्प, कोकम, आवळा व करवंद सरबत, घरगुती चटण्या, कैरी-करवंदाची वेगवेगळ्या प्रकारची लोणची येथे विक्रिस ठेवली आहेत. खरेदी नाही केली तरी चालेल पण ह्या कोकणी मेव्याची चव घ्या असे सांगणारे प्रेमळ विक्रेते येथे आहेत.

मन प्रफुल्लित करणारी श्री केशवराजची हि भटकंती खरोखर कायम स्मरणात राहणारी आहे. मनात विचार केला कि डिसेंबर महिन्याच्या अखेरीस येथे एवढे निसर्गसौंदर्य बघायला मिळते तर पावसाळ्यात याचे सौंदर्य कसे असेल! परत यायला काहितरी निमित्त लागतेच ना तेव्हा पुढच्या वेळेस पावसाळ्यात येण्याचे मनोमन ठरविले आणि श्री केशवराजचा निरोप घेतला.

प्रवास

प्रतिक्रिया

अविनाशकुलकर्णी's picture

11 Apr 2010 - 11:30 am | अविनाशकुलकर्णी

अप्रतिम धागा

विष्णुसूत's picture

12 Apr 2010 - 9:22 am | विष्णुसूत

योगेश२४
लेखन आवडलं. मनापासुन लिहिले आहे हे प्रत्येक वाक्यात जाणवतं. अभिनंदन ! अशीच भटकंती करा व प्रवास वर्णन लिहित रहा हि विनंती.

विंजिनेर's picture

11 Apr 2010 - 1:47 pm | विंजिनेर

श्री. ना. पेंडसे यांच्या "गारंबीचा बापु" या कादंबरीत जसे वर्णन केले आहे तसेच हे सुंदर आसुद गाव.

अगदी... अगदी...
सुंदर फटु!
जाता जाता:

पावसाळ्यात याचे सौंदर्य कसे असेल!

पावसाळ्यात ८-८ दिवस बाहेर पडता येत नाही महाराजा!

मदनबाण's picture

11 Apr 2010 - 1:57 pm | मदनबाण

वा...सुंदर लेख... :)

(हे गोमुख बर्‍याच मंदिरातुन दिसुन येत्...पण गोमुखाचाच आकार का देतात ? :? )
मदनबाण.....

There is no need for temples, no need for complicated philosophies. My brain and my heart are my temples; my philosophy is kindness.
Dalai Lama

शुचि's picture

12 Apr 2010 - 5:30 am | शुचि

अप्रतिम लेख. खूप सुंदर छायाचित्रे.
गाभार्‍यात श्रीविष्णूंची मूर्ती एकटी आहे ऐकून वाईट वाटले.
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
I have always known that at last I would take this road, but yesterday I did not know that it would be today. - Narihara

चित्रा's picture

12 Apr 2010 - 5:38 pm | चित्रा

चांगलेच आले आहेत, पण प्रत्यक्ष पाहण्याला आणि अनुभवण्याला पर्याय नाही! धन्यवाद चांगल्या लेखाबद्दल.

लेखातील देवळाच्या कळसाच्या फोटोवरून देवळाचे बैठे रूप लक्षात येत नाही आहे. खरे तर देऊळ अतिशय स्वच्छ आणि सुरेख आहे, बाहेर बसायला मंडप घातला आहे. परिसरही अतिशय सुंदर आहे.

बबलु's picture

13 Apr 2010 - 2:01 am | बबलु

मस्त फोटो आणि ए-वन वर्णन.

....बबलु

गणपा's picture

13 Apr 2010 - 2:14 am | गणपा

वाह काय मस्त ठिकाणाची ओळख करुन दिलिस योगेश.
तुझी हि भटकंती त्याच वर्णन आणि त्यातुनच मिळणारी माहिती क्लास आहे...

प्राजु's picture

13 Apr 2010 - 4:33 am | प्राजु

अतिशय मन प्रसन्न करणारे वर्णन आणि फोटोज..
खूप आवडले.
- (सर्वव्यापी)प्राजक्ता
http://www.praaju.net/

चिन्मना's picture

13 Apr 2010 - 5:44 am | चिन्मना

छान फोटो आणि लेख.

दिवाळीत भारतात गेलो होतो तेव्हा दापोलीजवळ कर्दे बीचवर गेलो होतो. तेव्हा या आसुद बाग गावाबद्दल आणि श्री. केशवराजाच्या मंदिराबद्दल माहित असते तर नक्की गेलो असतो. आता पुन्हा गेल्यावर जायला पाहिजे.

पावसाळ्याबद्दल विंजिनेर यांच्या मताशी सहमत. ८-८ दिवस अक्षरशः काहीही करता येत नाही. तुम्ही डिसेंबर म्हणजे चांगल्या मोसमात गेलात.

_______________________________
जुनी वाईन, जुनी मैत्री, आणि जुन्या आठवणींचे मूल्य करता येत नाही

योगेश२४'s picture

14 Apr 2010 - 9:54 am | योगेश२४

प्रतिक्रियेबद्दल मनापासुन आभार!!!
चांगलेच आले आहेत, पण प्रत्यक्ष पाहण्याला आणि अनुभवण्याला पर्याय नाही!>>>> चित्रा अगदी खरंय.

पांथस्थ's picture

14 Apr 2010 - 9:11 pm | पांथस्थ

मी ३/४ वर्षापुर्वी मुरुड ला गेलो होतो, त्यावेळी श्री केशवराज मंदिराला भेट दिली होती. नदिवरचा पुल पार करुन आम्ही चुकिचा रस्ता धरला आणी २०/३० मिनीट भटकत बसलो...असो.

हा परिसर मस्तच आहे. जवळच हर्णेचा मासळी बाजार, श्री व्याघ्रेश्वर मंदिर, कड्यावरचा गणपती अशी इतर ठिकाणेहि आहेत.

- पांथस्थ
माझी अनुदिनी: रानातला प्रकाश...
माझी छायाचित्रे - फ्लिकर