मराठी आणि भाषांतर

मेघना भुस्कुटे's picture
मेघना भुस्कुटे in काथ्याकूट
26 Mar 2010 - 11:01 pm
गाभा: 

माझ्या आरंभशूर स्वभावाला अनुसरून हा उपक्रमही मी किती काळ चालवीन ते माहीत नाही, याची कबुली सुरुवातीलाच देऊन टाकते. (हुश्श!)

----

मध्यंतरी मी काही भाषांतरं केली. इंग्रजीतून मराठीत. लालित्यपूर्ण वा साहित्यिक नव्हेत. रोख-ठोक-चोख. पण ती करताना पुष्कळ शब्दांची / संकल्पनांची भाषांतरं करताना अडायला झालं. एक तर हाताशी फक्त सोहोनींचा इंग्रजी-इंग्रजी-मराठी कोश होता. इतर कोणतेही पारिभाषिक कोश नव्हते. सोहोनींच्या कोशात बरेचदा क्रियापदाचा अर्थ सापडतो. त्याच क्रियापदापासून तयार झालेलं नाम, विशेषण, क्रियाविशेषण इत्यादींच्या शब्दजातीचा उल्लेख असतो, पण अर्थ दिलेला नसतो. शिवाय (निदान सोहोनींच्या कोशात तरी) एका इंग्रजी शब्दाला एक प्रतिशब्द सापडण्यापेक्षा अनेक शब्दांच्या समूहानं अर्थ स्पष्ट केलेला बरेचदा दिसतो. अर्थातच याला अपवाद आहेत. पण असे प्रतिशब्द नेमक्या कुठल्या संदर्भात वापरले तर योग्य ठरतील, त्याची माहिती उपलब्ध नाही.

उदाहरणार्थ: अ‍ॅक्सेसिबल या शब्दाला सुसाध्य आणि सुगम असे दोन प्रतिशब्द आहेत, आणि खेरीज अर्थही आहे. पण सुगम हा प्रतिशब्द अर्थातच सगळ्या ठिकाणी वापरून चालणार नाही. ’अ‍ॅक्सेसिबल ट्यूमर’ या संकल्पनेचं भाषांतर करताना एकच एक प्रतिशब्द हवा, असा हट्ट धरून किंवा सुगम हाच एक प्रतिशब्द वापरून चालणारच नाही. ’ज्याच्यापर्यंत पोहोचणे शक्य असेल अशी ट्यूमरची गाठ’ असं भलं मोठं भाषांतर करणं भाग आहे.

हाताशी पारिभाषिक कोशांची फौज असली, तरी अशा अडचणी येतच राहतील, असं वाटतं. कारण अजून तरी मराठीत प्रतिशब्दांबद्दल तितकासा नेमकेपणा, एकवाक्यता, अर्थनिर्णयन झालेलं दिसत नाही. शिवाय पुष्कळसे पारिभाषिक प्रतिशब्द निव्वळ कोशातच राहिलेले दिसतात. ज्यांच्यासाठी भाषांतर होत असतं, त्यांनी इंग्रजी शब्दावर मराठीचे संस्कार करून त्याच्याशी जुळवूनही घेतलेलं असतं. पण त्याचा काहीही विचार न करता, कुणीही कुठेही काहीही शब्द वापरत सुटलेलं असतं. वृत्तपत्रं आणि खरं तर सगळीच माध्यमं या एकवाक्यतेत महत्त्वाची भूमिका बजावू शकतात - बजावत असतात. पण मटामधल्या बातम्या वाचल्यावर हे या ताकदीकडे किती अक्षम्य दुर्लक्ष झालेलं आहे, हे लक्षात येतं.

तर मी एखाद्या उतार्‍याचं (बातमी / लेख / विश्लेषण) मराठीत केलेलं भाषांतर आणि मूळ उतार्‍याचा दुवा इथे देणार आहे. [मूळ उतारा कुठून घेतला त्याचा उल्लेख असणार आहे. तरीही हे संस्थळाच्या धोरणात बसत नसेल, तर धागा जरूर उडवावा. ] त्यात शक्यतोवर साहित्यिक असं काही नसावं, असा माझा प्रयत्न / सध्या तरी बेत आहे. योग्य ते बदल / सुचवण्या / योग्यायोग्याची चर्चा / पर्याय सुचवावेत अशी अपेक्षा आहे. पाहू काय निघतं ते.

----

१९९७पासून जवळ जवळ २ लाख शेतकर्‍यांच्या आत्महत्या

या ’आत्महत्या पट्ट्या’मधला महाराष्ट्र, आंध्र प्रदेश, कर्नाटक, मध्य प्रदेश आणि छत्तीसगढ या राज्यांचा लक्षणीय [हे विशेषण फक्त स्पृहणीय गोष्टींसाठीच वापरतात काय? की ते इथेही चालू शकेल?] वाटा आहे; देशातील शेतकर्‍यांच्या एकूण आत्महत्यांपैकी दोन तृतीयांश आत्महत्या या राज्यांतील आहेत. - पी. साईनाथ.

२५ जानेवारी २०१० - २००८ साली भारतात निदान (’अ‍ॅट लीस्ट’चं भाषांतर काय होईल इथे?) १६, १९६ शेतकर्‍यांच्या आत्महत्यांची नोंद झाली; ज्यासह (या उभयान्वयी अव्ययाचा वापर अमराठी छाया दर्शवतो काय?) १९९७ सालापासून झालेल्या एकूण आत्महत्यांचा आकडा १९९,१३२ वर पोहोचला असल्याचे ’राष्ट्रीय गुन्हे नोंदणी विभागा’कडून (National Crime Records Bureau (NCRB)) कळते.

-----
मूळ बातमीचा / लेखाचा दुवा: http://indiatogether.org/2010/jan/psa-suicides.htm

प्रतिक्रिया

चिंतातुर जंतू's picture

26 Mar 2010 - 11:32 pm | चिंतातुर जंतू

जवळ जवळ - येथे 'सुमारे' हा शब्दही चालावा. 'खानेसुमारी' आणि आत्महत्या केलेल्या शेतकर्‍यांची (अंदाजे) मोजणी यातील दुवा जाणवल्याने हा शब्द सुचविला. आपला शब्दही योग्यच आहे.

या ’आत्महत्या पट्ट्या’मधला ... या राज्यांचा लक्षणीय वाटा

मूळ वाक्यानुसार ... या राज्यांचा बनलेला असा तो आत्महत्या पट्टा आहे, असे वाटले. थोडक्यात, ... या राज्यांचा वाटा लक्षणीय नसून पट्ट्याचा वाटा लक्षणीय आहे. पट्टा कशाने बनलेला आहे? तर ... या राज्यांचा, असे दोन '-' '-' चिन्हांद्वारे दर्शविले असावे. म्हणूनः

'आत्महत्या पट्ट्याचा' (म्हणजे ... ही राज्ये) यातील वाटा अजूनही लक्षणीय आहे. (कारण मूळ remains सातत्य दर्शविते).

'निदान' पेक्षा 'किमान' हा पर्याय कसा वाटतो?

'ज्यासह'चा येथील वापर अमराठी छटेचा आहे, हा आपला अंदाज बरोबर आहे. येथे सुयोग्य मराठीकरणासाठी वाक्यरचनेत किंचित बदल करणे अयोग्य मानायचे कारण नाही. उदा:

१९९७ सालापासून झालेल्या एकूण आत्महत्यांचा आकडा यामुळे (किंवा अशा रीतीने) आता १९९,१३२ वर पोहोचला असल्याचे...

- चिंतातुर जंतू :S
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" || ५ ||

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

26 Mar 2010 - 11:52 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

मेघना, बर्‍याच महिन्यांनी तुझं नाव 'हजर सभासदां'मधे पाहून आनंद झाला.

तुझा उपक्रम चांगलाच आहे. शक्य तितकी मदत करण्याचाही प्रयत्न करेन. चिंतातूरजंतूंचा प्रतिसाद मान्य आहे.

अदिती

मेघना भुस्कुटे's picture

27 Mar 2010 - 2:54 pm | मेघना भुस्कुटे

हॅहॅहॅ! आभारी आहे, आभारी आहे!
बघू किती दिवस टिकतो माझा उत्साह. :)

सातारकर's picture

27 Mar 2010 - 10:07 am | सातारकर

उपक्रम निश्चितच चागला आहे.

यामधे मराठीतीलच गचाळ भाषेतले (हिंदी - इंग्रजी शब्द असलेले) उतारे देखील शुद्ध मराठीत द्यायला हरकत नसावी. (म.टा. चा उल्लेख केला म्हणून म्हणतोय)

याच्यात सहभागी व्हायचा नक्की प्रयत्न करू.
-----------------------------------------------------------------------------------------
I have seen GOD. He bats at no. 4 for India
Matthew Hayden

इन्द्र्राज पवार's picture

27 Mar 2010 - 10:17 am | इन्द्र्राज पवार

नमस्ते. या सुंदर व्यासपीठावरील ही माझी प्रथम भेट आणि योगायोगाने सुरुवातच माझ्या आवडीच्या विषय दर्शनाने झाली हा जर एक आनंदाचा भाग होऊ शकत असेल तर मला निश्चितच खूप आनंद होत आहे. श्री. पु.ल.देशपांडे आणि श्री.जी.ए.कुलकर्णी भाषांतराऐवजी रुपांतर हा शब्दप्रयोग वापरत असत आणि खरेच काही वेळा शब्दशः भाषांतरणे लिखाणाची भट्टी बिघडून हि जाते. उदा. पुलंनी जाणीवपूर्वक ओल्ड मँन अँड सी चे शीर्षक मराठी मध्ये "एका कोळीयाने" असे केले होते. असो.

राग येणार नसेल तर काही सुचना :
१. मराठीमध्ये "जवळजवळ" ची द्विरुक्ती सहसा पचत नाही, त्याऐवजी "जवळपास" बाबत विचार करावा.
२. "आत्महत्या पट्ट्या" असा उपयोग ही बाब दर्शवितो की अशा प्रकारची घटना (पक्षी : आत्महत्या) कायमस्वरूपी बाब आहे. जसे वालुकामय प्रदेशात होणारी वादळे ! चेरापुंजी भागात सातत्याने होणारा पाउस. इ. त्याऐवजी "आत्महत्या घटनेत" ठीक वाटेल.
३. अँट लिस्ट साठी `किमान` हा पर्याय उत्तम आहे. `निदान` ही एक विनंतीवजा अपेक्षा आहे. उदा. "निदान नकारामागील माझी भूमिका तरी समजून घे !" तसेच "किमान" अंकगणिताची सूत्रे सांगतो. उदा. "त्या व्यवहारामध्ये मला किमान अमुक इतका फायदा अपेक्षित आहे".
धन्यवाद !
इंद्र

तिमा's picture

28 Mar 2010 - 10:39 am | तिमा

मराठीमध्ये "जवळजवळ" ची द्विरुक्ती सहसा पचत नाही, त्याऐवजी "जवळपास" बाबत विचार करावा

हे पटले नाही. दादु इंदुरीकराचा 'गाढवाचे लग्न' हा वग बघितला होता का ? त्यात ते दर दोन मिनिटांनी," चला , जवळजवळ, झ्वॉपायची येळ झाली ", असं म्हणत असत.

हर शख्सको अपना बनाके देख लिया
मिलेंगे ना किसीसे ये दिलमें ठानी है|

इन्द्र्राज पवार's picture

28 Mar 2010 - 11:16 am | इन्द्र्राज पवार

वग तर पाहीलेला नाही, परन्तु त्याने "विच्छा" च्या बरोबरीने जनमानसावर केलेली किमया याचा इतिहास वाचला आहे. सबब, तुमच्या "जवळजवळ" च्या मात्रेवर आपला सलाम !!!!

प्रकाश घाटपांडे's picture

27 Mar 2010 - 10:22 am | प्रकाश घाटपांडे

इंद्र-जंतुंशी सहमत आहे
प्रकाश घाटपांडे
आमच्या जालनिशीत जरुर डोकवा.

श्रावण मोडक's picture

27 Mar 2010 - 10:33 am | श्रावण मोडक

तुम्ही केलेलं भाषांतर वाचलं. त्यात काही करण्याचा प्रयत्न करत बसलो नाही. त्याऐवजी मी काय केलं असतं हे देतो -
१९९७ पासून सुमारे २ लाख शेतकर्‍यांच्या आत्महत्या
(देशभरातील शेतकर्‍यांच्या आत्महत्यांमध्ये) महाराष्ट्र, आंध्र प्रदेश, कर्नाटक, मध्य प्रदेश आणि छत्तीसगड या "आत्महत्या पट्ट्या"चा वाटा मोठा आहे; या राज्यांतील आत्महत्यांची संख्या देशातील एकूण संख्येच्या दोन-तृतियांश आहे. - पी. साईनाथ.
२५ जानेवारी २०१० - देशात (भारतात) २००८ साली किमान १६,१९६ शेतकर्‍यांनी आत्महत्या केल्याचे राष्ट्रीय गुन्हे नोंदणी संस्थेचे म्हणणे आहे. या आत्महत्यांमुळे १९९७ पासून देशभरात आत्महत्या केलेल्या शेतकर्‍यांची संख्या आता १,९९,१३२ वर पोहोचली आहे.

हे असं का केलं - अनुवाद करताना अर्थच्छटा कायम ठेवत वेगवेगळ्या व्यक्तींकडून होणारी भाषक रचना वेगळी असू शकते म्हणून.

प्रकाश घाटपांडे's picture

27 Mar 2010 - 11:21 am | प्रकाश घाटपांडे

रुपांतर आवडले. सर्वसामान्य वाचकाला ते सुलभ वाटते/ "आत्महत्या पट्टा" हे अवतरण विशेष उपहासात्मक अर्थ देते हे लक्षात येते.
प्रकाश घाटपांडे
आमच्या जालनिशीत जरुर डोकवा.

भोचक's picture

28 Mar 2010 - 11:16 am | भोचक

श्रामोंच्या भाषांतराशी सहमत. आम्हाला शिकवणी काळात भाषांतराबाबत ठळक नियम घालून दिलेले असत, त्यात एकच शब्द वारंवार वापरू नये, जेव्हा तेव्हा, जर तर अशी वाक्यरचना टाळायला लावली जायची. मेघना तू केलेले भाषांतर योग्य आहे, परंतु, वाचन सुलभतेचा विचार केल्यास श्रामोंचे भाषांतर जास्त योग्य वाटते. ललित साहित्यात मूळ कल्पनेशी इमान राखून पण त्याच्याशी साधर्म्य साधणार्‍या शब्दांचा आधार घेता येतो. अर्थात, व्यक्तिगणिक भाषांतराची शैली वेगळी असू शकते हे मान्य.

माझ्या मते, अनेकदा अशा ललितबाह्य विशेषतः वृत्त आणि वृत्तलेख भाषांतरात 'माहिती' महत्त्वाची असते, त्यामुळे ती योग्य व्यक्तीच्या श्रेयासह योग्य म्हणजे सोप्या शब्दांत वाचकांपर्यंत पोहोचणे महत्त्वाचे. प्रत्येक शब्दाचा अर्थ भाषांतरात आलाच पाहिजे असा नाही. उदा. लालूप्रसाद यादव हिंदीत काही तरी बोलतो आणि पीटीआय इंग्रजीत ते वृत्तपत्रांना पाठवते. त्यात त्यांनी लालूंच्या हिंदीचे इंग्रजीत भाषांतर केलेले असते, ते पुन्हा ( म्हणजे देशी भाषेत) मराठीत आणताना काही गोष्टी अध्याह्रत असतात. हिंदीचा लहेजा माहिती असतो, त्यामुळे त्याचे मराठीकरण करताना लालूंच्या शैलीचा अंदाज घेऊन नेमकेपणाने भाषांतर करावे लागते. इंग्रजीच्या धाटणीने केल्यास नीरस असा भाषेचा सांगाडा तेवढा उभा रहातो. लालूंचे तेच विधान वृत्तवाहिन्यांवर पाहून मराठीत आणण्याचा प्रयत्न केल्यास ते जास्त सोपे वाटते. कारण त्याचे नेमके शब्द कळतात. शिवाय त्याचे इंग्रजी करताना किती 'वळसा' घातला गेलाय याचीही कल्पना येते.

अवांतर- सध्या इंदिरा गोस्वामींच्या आत्मचरित्राचा 'अर्धीमुर्धी कहाणी' हा अनुवाद वाचतोय. अर्चना मिरजकरांनी तो केलाय. पंरतु, त्यात गडबड झाल्याचे जाणवतेय. त्यांनी इंग्रजी भाषांतरावरून ते पुस्तक मराठीत आणलेय. इंदिराबाईंची शैली खुली असल्याचे वाटतेय, परंतु, मराठीत त्याचे भाषांतर अनेकदा काहीच्या काही होतेय. इंग्रजीतल्या उपमा, अलंकार मराठीत जसेच्या तसे कसे लागू पडतील? उदा ही वाक्ये पहा.

''ते सूर्यकिरण मला जमिनीवर फेकलेल्या सोनेरी केसांच्या राजकन्यांच्या बारीक सांगाड्यांसारखे वाटले.''

'' पिवळ्या काळ्या संध्याकाळला त्यांच्यामुळे एक प्रकारची शांती आणि रूबाबदारपणा आला होता.''

अशी अनेक वाक्ये मला भाषांतरातली गडबड अशी वाटली.
(भोचक)
हा आहे आमचा स्वभाव

ऋषिकेश's picture

27 Mar 2010 - 1:22 pm | ऋषिकेश

चांगला उपक्रम..
निदान ऐवजी किमान, कमीतकमी
ज्यासह ऐवजी ज्यामुळे इथे चपखल बसतो, अन्यथा तेव्हा, यासकट वगैरे शब्द वाक्य बघुन वापरता येतील
बाक चिं.जं.शी शहमत

ऋषिकेश
------------------
इथे दुसर्‍यांच्या ब्लॉगची जाहिरात करून मिळेल. योग्य बोलीसह संपर्क साधावा.

धनंजय's picture

27 Mar 2010 - 9:26 pm | धनंजय

अशा तांत्रिक ऊहापोहामध्ये मुळातल्या पाठ्याचा शब्दशः उल्लेख प्रत-अधिकाराच्या तत्त्वांमध्ये योग्य आहे.

श्री मोडक यांच्या भाषांतराशी मी बहुतेक सहमत आहे. त्यात काही बदल सुचवत आहे.

Nearly 2 lakh farm suicides since 1997
The share of the 'suicide belt' - Maharashtra, Andhra Pradesh, Karnataka, Madhya Pradesh, and Chhattisgarh - remains very high; these states account for two-thirds of the total farm suicides in the country. P Sainath reports.
25 January 2010 - There were at least 16,196 farmers' suicides in India in 2008, bringing the total since 1997 to 199,132, according to the National Crime Records Bureau (NCRB).

१९९७ पासून शेतकर्‍यांच्या आत्महत्यांची संख्या जवळजवळ २ लाख [१] (पर्याय २ लाखांच्या घरात)

या संख्येमधे [२] महाराष्ट्र, आंध्र प्रदेश, कर्नाटक, मध्य प्रदेश आणि छत्तीसगड या "आत्महत्या पट्ट्या"चा वाटा अजूनही फार [३] मोठा आहे; या राज्यांतील आत्महत्यांची संख्या देशातील एकूण संख्येच्या दोन-तृतियांश आहे. - पी. साईनाथ येथे वृत्त देतात - [४]
२५ जानेवारी २०१० - राष्ट्रीय गुन्हे नोंदणी संस्थेनुसार देशात (भारतात) २००८ साली किमान १६,१९६ शेतकर्‍यांनी आत्महत्या केल्यामुळे १९९७ पासून देशभरात आत्महत्या केलेल्या शेतकर्‍यांची संख्या आता १,९९,१३२ वर पोहोचली आहे. [५]
- - -

[१] nearly म्हणजे त्या संख्येपेक्षा कमी. "जवळपास, सुमारे, अंदाजे" म्हणजे संख्येपेक्षा थोडीबहुत कमी किंवा अधिक. शिवाय nearly मध्ये जी भावनिक छटा आहे ती "जवळपास, सुमारे, अंदाजे"मध्ये नाही. "अरे, अरे, या भल्या मोठ्या लाजिरवाण्या आकड्यापाशी पोचत आहोत, काही करूया" ही भावना शीर्षकात यावी म्हणून "जवळजवळ" किंवा अलंकारिक "च्या घरात" असा प्रयोग केला पाहिजे.

[२] श्रामो यांनी केलेली सुरुवात योग्य आहे. "आत्महत्या" शब्द वाक्यात अनेकदा येतो, त्यातील एक कमी करायचा हा माझा प्रयत्न आहे.

[३] remains म्हणजे पूर्वीही वाटा मोठा होता आणि अजूनही आहे. हा तथ्यात्मक तपशील हरवायला नको. very शब्द महत्त्वाचा वाटतो, तो सुटायला नको.

[४] P. Sainath "reports" : येथील "येथे वृत्त देतात" हे शब्द प्रत्येक वाक्याचा लेखक कोण हे स्पष्ट करतात. शीर्षकाखालील गोषवार्‍याचे पहिले वाक्य पी. साईनाथ यांनी लिहिलेले नसून संपादकाने लिहिलेले आहे. मात्र खालील लेख पी. साईनाथ यांनी लिहिलेला आहे. "

[५] येथे वाक्य लांब होत असले तरी संदर्भ देण्याच्या दृष्टीने ते महत्त्वाचे आहे. येथे " राष्ट्रीय गुन्हे नोंदणी संस्थे"च्या आकडेवारीचा संदर्भ दिलेला आहे. संदर्भाची व्याप्ती नि:संदिग्धपणे वाक्यसमाप्तीपर्यंत असते. वाक्य तोडले तर पुढच्या वाक्यातले आकडे कुठून मिळाले? याबाबत संदिग्धपणा निर्माण होऊ शकतो. पी. साईनाथ यांच्या स्वतःच्या मोजणीमधून तो आकडा आला आहे काय? - कारण लेखातली बहुतेक वाक्ये " राष्ट्रीय गुन्हे नोंदणी संस्थे"ची नसून पी. साईनाथ यांची आहेत.

आकडेवारीचे वाक्य तोडायचेच असेल तर "तसेच", असा कुठला जोडणीचा शब्द वापरावा. किंवा "असेही त्याच संस्थेकडून कळते" असे काही जोडावे.

- - -
मेघना भुस्कुटे यांचे प्रश्न :
"लक्षणीय" - या शब्दाचा मूळपाठ्यातला संदर्भ काय आहे?
"वाटा पूर्वीसारखाच फार मोठा आहे" यात जे तथ्य आहे, त्यापेक्षा "वाटा लक्ष देण्यासारखा आहे" हे कमी पडते.
"फार" शब्दातच "लक्ष द्या" हा भावनिक निर्देश मिळतो.

"अ‍ॅट लीस्ट" = किमान

"ज्यासह (या उभयान्वयी अव्ययाचा वापर अमराठी छाया दर्शवतो काय?)"
होय, पण अमराठी म्हणजे कुठल्या भाषेची छाया, ते कळत नाही. इंग्रजीचा प्रभाव तर नाहीच (along with which??? असे इंग्रजीत तरी कुठे वापरतात?). "ज्यासह" मध्ये अर्थच चुकलेला आहे, असे वाटते.

या संख्येच्या सह पूर्वीची संख्या घेतली तर बेरीज..."
"ज्यासह" शब्दाचा असा काही अन्वय आहे काय?

नंदन's picture

29 Mar 2010 - 3:17 am | नंदन

चांगला उपक्रम आणि चर्चा. 'माझं चीज कोणी हलवलं'सारख्या शीर्षकांची भाषांतरित पुस्तकं पाहून ह्या क्षेत्रात किती ढिसाळपणे काम होतं याची कल्पना यावी.

अशीच एक पेरूच्या बीप्रमाणे अडकून बसलेली शंका इथे विचारतो - इंग्रजीतल्या Think आणि Contemplate या क्रियांपदांतला फरक नेमका कसा अनुवादित करावा? विचार आणि चिंतन (अनुक्रमे) हे तितकंसं बरोबर वाटत नाही. संदर्भादाखल हे उदाहरण पहा -
It depicts a forest in winter, and in the forest, standing all by himself on the road, in deepest solitude, a stray little peasant in a ragged caftan and bast shoes; he stands as if he were lost in thought, but he is not thinking, he is "contemplating" something. If you nudged him, he would give a start and look at you as if he had just woken up, but without understanding anything. It's true that he would come to himself at once, and yet, if he were asked what he had been thinking about while standing there, he would most likely not remember, but would most likely keep hidden away in himself the impression he had been under while contemplating.

नंदनमराठी साहित्यविषयक अनुदिनी

"कॉन्टेम्प्लेट" शब्दाच्या संदर्भानुसार वेगवेगळ्या छटा आहेत.

हा शब्द सकर्मक वापरला जाऊ शकतो आणि अकर्मकसुद्धा.

"कॉन्टेम्लेशन" साठी कधीकधी "मनन" हा प्रतिशब्द चालेल असे वाटते. कधीतरी "ध्यानमग्न" असा प्रतिशब्द चालेल. विशिष्ट संदर्भांत "चिंतन"सुद्धा चालेलच.

वरील उद्धृत परिच्छेदात "ध्यानमग्न" बरा, अस मला वाटते.

"काँन्टेम्प्लेट" सोडा, "पेझंट" शब्दच मराठीत भाषांतरित करायला कठिण आहे. या संदर्भात प्रचलित शब्द "शेतकरी" पुरेल की "रयत" हा अप्रचलित पण नेमका प्रतिशब्द ठीक आहे? "गरीब शेतकरी" असे मुळात नसलेले विशेषण घालावे लागेल?

मेघना भुस्कुटे's picture

29 Mar 2010 - 7:07 pm | मेघना भुस्कुटे

'मग्न' हा शब्द अगदी बरोबर. पण मी तरी या एकाच प्रतिशब्दाऐवजी 'विचारांत हरवून गेलेला' असं लांबलचक भाषांतर करीन. अर्थ तेच असले, तरी काही शब्द घासून गुळगुळीत झाल्यामुळे कानांवरून / डोळ्यांखालून सहज वाहून जातात (असं आपलं मला वाटतं), पण तेच असे उलगडून आले, की वाचकापर्यंत नीट पोहोचतात (अ.आ.म.वा.!!!).
शिवाय नंदननं दिलेला उतारा साहित्यिक (जशी काही ही एक शिवी आहे!) आहे. तिथे अर्थाचा परीघ कितीतरी मोठा असतो. संपूर्ण कलाकृतीचं भावविश्व, तिच्यातला काळ, स्थळ, वेग, तिची प्रकृती... यांतल्या बारीकशा फरकानंही अर्थ कितीतरी बदलू शकतात. त्यामुळे तिथलं काम अधिक जोखमीचं आणि तालेवार, यांत प्रश्नच नाही.

धनंजय's picture

29 Mar 2010 - 10:43 pm | धनंजय

आधी मी सुद्धा विचार केला, की "विचारात गडलेला" असे भाषांतर चालेल. पण नाही चालणार.
> he stands as if he were lost in thought,
> but he is not thinking,
> he is "contemplating" something.

इथे शैली राखण्यासाठी "क्ष वाटते, पण क्ष नाही, तर य आहे" असे भाषांतर अपेक्षित आहे.
> तो जणूकाही विचारांत हरवल्यासारखा उभा आहे,
> पण तो विचार करत नाही,
> तो विचारांत मग्न आहे...

(शेवटी "विचारांत हरवला आहे" असे मुळीच चालणार नाही, कारण वाक्याच्या सुरुवातीलाच विचारांत हरवणे म्हणजे केवळ भास आहे, म्हणून "तसे नाही" असे लेखक म्हणत आहे. तरी विचांत हरवलेला नाही, पण विचारांत मग्न आहे - यात जो अंतर्गत विरोध जाणवतो, तो मूळ पाठ्यात जाणवत नाही. त्यापेक्षा बरे असे : )

> तो जणूकाही विचारांत हरवल्यासारखा उभा आहे,
> पण तो विचार करत नाही,
> तो ध्यामग्न आहे...

प्रमोद देव's picture

30 Mar 2010 - 9:24 am | प्रमोद देव

तंद्रीत आहे...कसे वाटते?

चांगला उपक्रम, धन्यवाद!
’अ‍ॅक्सेसिबल ट्यूमर’ या संकल्पनेचं भाषांतर करताना ...........’ज्याच्यापर्यंत पोहोचणे शक्य असेल अशी ट्यूमरची गाठ’ असं भलं मोठं भाषांतर करणं भाग आहे असं वाटत नाही, कदाचित 'सहजप्राप्य ट्यूमरची गाठ’ हेही चालू शकेल असं वाटतं.

मेघना भुस्कुटे's picture

29 Mar 2010 - 7:02 pm | मेघना भुस्कुटे

ट्यूमरची गाठ 'प्राप्त' करून घ्यावी असं कुणाला वाटणार? 'प्राप्य'मध्ये थोडी सकारात्मक छटा आहे, असं वाटलं म्हणून, नाही वापरला मी तो.

प्रकाश घाटपांडे's picture

29 Mar 2010 - 8:46 pm | प्रकाश घाटपांडे

सहज आढळणारी/ सापडणारी ट्युमरची गाठ असे म्हटले तर काय ?
प्रकाश घाटपांडे
आमच्या जालनिशीत जरुर डोकवा.

आनंद घारे's picture

29 Mar 2010 - 8:59 am | आनंद घारे

हा उपक्रम स्तुत्य आहे आणि त्याला उत्तम प्रतिसाद मिळालेले आहेत, पण ....
जगातील कोणत्याही दोन भाषांमध्ये एकमेकांना अगदी चपखल बसणारे प्रतिशब्द नसतात असा माझा अनुभव आहे. कदाचित त्यामुळेच आपल्याला रोजच्या व्यवहारात धेडगुजरी भाषेचा उपयोग करावाच लागतो. इंग्रजी भाषेतसुद्धा अशा रीतीने रोज नवनवे शब्द मिसळले जातातच.
त्यामुळे कितीही प्रयत्न केला तरी एका भाषेतील वाक्यात असलेल्या प्रत्येक शब्दात दडलेला पूर्ण अर्थ त्यांच्या सर्व छटांसह दुसर्‍या भाषेत येईलच किंवा फक्त तेवढाच येईल अशी अपेक्षा करता येत नाही.
माझ्या मते शब्दशः भाषांतरा ऐवजी रूपांतर करणे जास्त चांगले.
There were at least 16,196 farmers' suicides in India in 2008, bringing the total since 1997 to 199,132, according to the National Crime Records Bureau (NCRB).
हे मूळ वाक्यच भारतीयीकरण केलेल्या इंग्रजीतले आहे. इंग्लंडमधले लोक या वाक्याची सुरुवात 'अ‍ॅकॉर्डिंग' पासून करतील आणि तसे भाषांतर केले तर ती वाक्यरचना आपल्याला खटकेल.
आनंद घारे
मी या जागी चार ओळी खरडल्या आहेत, जमल्यास वाचून पहाव्यात.
http://anandghan.blogspot.com/

सुनील's picture

29 Mar 2010 - 9:14 am | सुनील

वाचनीय काथ्याकूट.

Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.

मेघना भुस्कुटे's picture

29 Mar 2010 - 7:00 pm | मेघना भुस्कुटे

तुमच्या सगळ्यांच्या उत्साहवर्धक प्रतिसादांबद्दल आणि सुचवण्यांबद्दल धन्यवाद. दोनच ओळींचं भाषांतर, पण ते खरंच वाईट होतं, हे मला प्रतिसादांमधली निरनिराळी भाषांतरं पाहून नीटच कळलं (आकळलं)! पण माझं भाषांतर सुधारेल तेव्हा सुधारेल. तूर्तास भाषांतर करताना पडणार्‍या अनेकानेक मूलभूत प्रश्नांना तुम्ही सगळे कसे सामोरे जाता, अर्थछटांच्या गोंधळातून आपला वाचक कोण आणि त्याची सोय कशात आहे हे कसं नक्की करता, ते करताना भाषांच्या शुद्धाशुद्धतेशी / प्रमाण-अप्रमाणाशी कसं इमान राखता, प्राधान्यक्रम कसे ठरवता, नक्की कोणत्या शब्दकोशांची / सूत्रांची (आहे?! 'सोर्सेस्‌' या इंग्रजी शब्दाचं साडेसातच्या मराठी बातम्यांनी रुजवलेलं हे धेडगुजरी रूपांतर!) मदत घेता... या सगळ्यात मला प्रचंडच रस आहे.
तेव्हा तुमच्या सगळ्यांच्या सुचवण्या मान्यच आहेत. तसंच एकाच टेक्स्टसाठी (मराठी शब्द? पाठासाठी?) अनेक योग्य भाषांतर असू शकतात, हेही मान्यच आहे.

श्रावण मोडक's picture

29 Mar 2010 - 9:09 pm | श्रावण मोडक

'सोर्स' या शब्दासाठी तुम्ही दिलेल्या वाक्यात (साधन)स्रोत हा शब्द कसा वाटतो? (आता इथे कोणत्या स्रोतांची मदत घेता यापेक्षा कोणत्या स्रोतांतून मदत घेता असे करणे अधिक बरोबर असेल का?)
बातम्यांमधील 'सोर्स'साठी 'सूत्र' हा शब्द वापरला जातो. त्यासाठीही पूर्वी 'सकाळ'मध्ये कटाक्षाने 'गोट' हाच शब्द वापरायचा अशी अट (स्टाईलबुकनुसार - आता या स्टाईलबुकला शैलीपुस्तिका म्हणायचे की काय?) होती. तेथे Official sources यासाठी "अधिकृत गोटांतून" असा अनुवाद केला जात असे. इतर प्रत्येक सोर्ससाठीही तसेच केले जात असे. इन्फॉर्म्ड सोर्सेससाठी "माहितगार गोटांतून" असे केले जायचे. वगैरे.

आनंद घारे's picture

30 Mar 2010 - 9:08 am | आनंद घारे

'श्रोत' हा नैसर्गिक असतो, जसा पाण्याचा श्रोत, तर 'गोट' हा माणसांचा समूह असतो. 'सोर्स' या शब्दात दोन्हींचा समावेश होतो. मी यापूर्वी लिहिल्याप्रमाणे दोन भाषांमध्ये नेमके प्रतिशब्द सापडत नाहीत.
'सोर्स'च्या जागी 'सूत्र' हा शब्द वापरणे मला तरी योग्य वाटत नाही. ज्या बातम्यांचा 'धागा' लांबवर चालत जातो त्यांच्यासाठी कदाचित 'सूत्र' हा शब्द ठीक असेल.
आनंद घारे
मी या जागी चार ओळी खरडल्या आहेत, जमल्यास वाचून पहाव्यात.
http://anandghan.blogspot.com/

सुधीर काळे's picture

30 Mar 2010 - 3:51 pm | सुधीर काळे

उगम?
सुधीर काळे, जकार्ता
------------------------
हा दुवा उघडा: http://72.78.249.107/esakal/20100309/5306183452989196847.htm

मेघना भुस्कुटे's picture

30 Mar 2010 - 7:36 pm | मेघना भुस्कुटे

दूरदर्शनवरच्या मराठी बातम्यांमध्ये याचं भाषांतर 'विश्वसनीय सूत्रांकडून कळते....' असे करण्यात येत असे. आता इतक्यात काही बदल झाला असेल तर माहीत नाही.
पण 'अधिकृत गोट' आणि 'साधने' हेही पर्याय उत्तमच आहेत. [(अधिकृत गोटातल्या बातमीनुसार(!))आकाशवाणीने 'सरहद्द' आणि 'सीमा' या एकाच अर्थाच्या पण निरनिराळ्या भाषांतून आलेल्या शब्दांना आपल्या वापरातून जाणीवपूर्वक दोन निरनिराळ्या छटा बहाल केल्या. देशाची असते ती सरहद्द व देशांतर्गत प्रदेशांची असते ती सीमा. उदा. सरहद्दीवर लढताना दोन सैनिक गतप्राण. महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्नी मुख्यमंत्र्यांचे घूमजाव. - याच धर्तीवर] व्यक्तीकडून मिळालेली माहिती असेल, तर 'अधिकृत गोट / विश्वसनीय सूत्रे' आणि निर्जीव साधनांतून मिळवलेली माहिती असेल (उदा. पुस्तके, आंतरजाल, संस्थात्मक नोंदी इ.) तर 'साधने' असा वापर योग्य ठरेल का?

श्रावण मोडक's picture

30 Mar 2010 - 8:07 pm | श्रावण मोडक

बदल झालाय. आता 'सकाळ'मध्येही सूत्र हा शब्द वापरात आला आहे. दूरदर्शन अर्थातच बदललेलं नाही. तिथं अजूनही 'सूत्रे'च हलतात.
व्यक्ती आणि वस्तू यासंदर्भात गोट/सूत्र आणि साधने हा वापर मला उचित वाटला. बहुदा तो तसाच होतो.
बातमीपुरते अवांतर - 'अधिकृत गोटातून मिळालेल्या बातमीनुसार' असं करत नाहीत. 'अधिकृत गोटातून मिळालेल्या माहितीनुसार' बातमी तयार होते.
घारे काकांनी सांगितलेला गोट आणि स्रोत/श्रोत हा फरक ज्ञानात भर टाकणारा आहे.
उगम यासंबंधात 'माहितीचा उगमस्रोत' असाही प्रयोग झाल्याचे वाचले आहे.

श्रावण मोडक's picture

30 Mar 2010 - 8:07 pm | श्रावण मोडक

बदल झालाय. आता सर्रास सर्वत्र सूत्र हा शब्द वापरात आला आहे. गोट हा शब्द दिसणे दुरापास्त झाले आहे. दूरदर्शन अर्थातच बदललेलं नाही. तिथं अजूनही 'सूत्रे'च हलतात.
व्यक्ती आणि वस्तू यासंदर्भात गोट/सूत्र आणि साधने हा वापर मला उचित वाटला. बहुदा तो तसाच होतो.
बातमीपुरते अवांतर - 'अधिकृत गोटातून मिळालेल्या बातमीनुसार' असं करत नाहीत. 'अधिकृत गोटातून मिळालेल्या माहितीनुसार' बातमी तयार होते.
घारे काकांनी सांगितलेला गोट आणि स्रोत/श्रोत हा फरक ज्ञानात भर टाकणारा आहे.
उगम यासंबंधात 'माहितीचा उगमस्रोत' असाही प्रयोग झाल्याचे वाचले आहे.

'Suicide belt' ला 'आत्महत्याक्षेत्र' हा शब्द चपखल वाटतो. आवडला तर जरूर वापरा.
माझ्या अनुभवानुसार इंग्रजीमध्ये clauses खूप वापरली जातात आणि ती तशीच मराठी भाषांतरात वापरली तर 'हे भाषांतर आहे' असे कळते. त्या ऐवजी सुटी वाक्ये केल्यास भाषांतर छान होते. मीही ही चूक प्रथम केली व माझे भाषांतर जेंव्हा मीच वाचले तेंव्हा ती चूक माझ्या लक्षात आली. या क्षेत्रात तसा मीही कच्चाच आहे, पण तरी अनाहूत सल्ला देण्याचे धाडस करतोय्. क्षमा असावी.
सुधीर काळे, जकार्ता
------------------------
हा दुवा उघडा: http://72.78.249.107/esakal/20100309/5306183452989196847.htm

मेघना भुस्कुटे's picture

30 Mar 2010 - 7:30 pm | मेघना भुस्कुटे

ह्यॅ:! अनाहूत सल्ला कसला?! असल्या सल्ल्यांसाठी तर धागा उघडला.