काही दिवसांपूर्वी मी २२ जून १८९७ हा सिनेमा "राजश्रीमराठी.कॉम" वर पहिला. चाफेवर बंधूंवर बनवलेला खरं म्हणजे बराच जुना सिनेमा आहे पण मी आधी कधीही ह्याचं नाव कधी ऐकलं नव्हतं. चाफेकर बंधूविषयी मला माझ्या दुर्दैवाने फार माहिती नव्हती.
ह्या सिनेमात तत्कालीन सामाजिक परिस्थिती मात्र छान रंगवलेय. विशेषत: ब्राह्मण समाजाविषयी गैर ब्राह्मण लोकांचा दृष्टीकोन कसा होता हे सुध्धा चांगल्या पद्धतीने सांगितलेय. सिनामात विखुरलेली गाणी पण खूप चांगली आहेत. (खरं म्हणजे त्या ओव्या आणि तत्सम घरगुती गाणी आहेत. पार्श्व संगीत असं नाहीच आहे.)
पण माझं प्रामाणिक मत सांगायचं तर मला हा सिनेमा पाहून थोडा विरसच झाला. चित्रपटाच्या शेवटी अपेक्षित परिणाम साधला गेला नाही असं मला वाटतं. त्यावेळचे "क्रांतिकारक" आणि आजकालचे "अतिरेकी" ह्यात उगाचच साम्य वाटत होतं. कदाचित त्यामुळेच आपल्या मनातील चाफेकर बंधूंची आणि लो. टिळकांची प्रतिमा आणि सिनेमात दाखवलेली प्रतिमा ह्यांचं समीकरण फारसं जुळलं नाही.
तुमच्या पैकी कोणी हा चित्रपट पाहिलंय का? तुमची मतं ऐकायला आवडतील.
प्रतिक्रिया
9 Mar 2010 - 8:46 pm | शुचि
खूप लहानपणी (५ वीत) दूरदर्शनवर हा चांगला चित्रपट पाहीला होता. तेव्हा आवडला होता. "गोंद्या आला रे आला" .... रँड चा खून इ. नाट्यमय आहे. तेव्हाचा ब्राह्मण समाज, प्रथा सुरेख रंगवल्या आहेत.
परत डोळसपणे पहायला आवडेल.
***********************************
“The war between the sexes is the only one in which both sides regularly sleep with the enemy”
9 Mar 2010 - 8:57 pm | विकास
त्यावेळचे "क्रांतिकारक" आणि आजकालचे "अतिरेकी" ह्यात उगाचच साम्य वाटत होतं.
हे कसे काय? चाफेकर बंधूंनी कार्यक्रमात जाऊन अंधाधूंद गोळीबार केला का ज्यात निष्पाप पुरूष-बायका-मुले मेली? "गोंद्या आला रे" हा गुप्तसंदेश एकदा चुकला आणि त्यात एक चुकीचा बळी गेला हे खरे. पण असा संदेश करून जेंव्हा एकाच माणसासाठी वापरण्याचा प्रयत्न असतो, तेंव्हा त्यात आजकालच्या "अतिरेक्यांचे" त्यात माओवादी पण आले, यांचे दर्शन होते असे कसे वाटले?
त्यांनी कुठेही जाऊन बाँब उडवले का? (अगदी भगतसिंग आणि बटूकेश्वर दत्त यांनी देखील जो बाँब तत्त्कालीन पार्लमेंटमधे टाकला, त्यावेळेस गॅलरीतून अशा ठिकाणी टाकला जिथे खाली मोकळे दिसले आणि मनुष्यहानी झाली नाही)
आता आजकालच्या अतिरेक्यांची आणि दहशतवादाची तुलनाच करायची असेल तर जालीयनवाला बागेत सामान्यांना बाहेर जायची दारे बंद करून गोळीबार करण्याची आणि जीवे मारण्याच्या आज्ञेस, निर्णयास आणि त्याच्या आमलात आणणार्या वृत्तीची करता येईल.
--------------------------------
मी या आणि इतर संकेतस्थळावर केवळ "विकास" याच नावाने वावरतो. त्याच्या मागेपुढे उभ्या (||) आडव्या (=), तिरप्या (\\ //) आदी कुठल्याच प्रकाराच्या रेषा नसतात. त्या अर्थाने माझी कुठेही शाखा नाही. :-)
9 Mar 2010 - 10:53 pm | नितिन थत्ते
त्यावेळचे "क्रांतिकारक" आणि आजकालचे "अतिरेकी" ह्यात उगाचच साम्य वाटत होतं
:). तो अतिरेकी आहे की क्रांतिकारक हे आपण कुंपणाच्या कोणत्याबाजूस उभे आहोत त्यावर ठरते. दोन्हीतली सीमारेषा फार धूसर असते. (हा प्रतिसाद मूळ लेखाला).
>>हे कसे काय? चाफेकर बंधूंनी कार्यक्रमात जाऊन अंधाधूंद गोळीबार केला का ज्यात निष्पाप पुरूष-बायका-मुले मेली?
या न्यायाने सतवंतसिंग हा अतिरेकी न ठरता क्रांतिकारक ठरावा का?
किंवा जनरल वैद्यांचे मारेकरी पण अतिरेकी नाहीत असे होते का?
आजचे माओवादीपण पोलीस/ अधिकारी वगैरेंना लक्ष्य करून अचूक मारतात. सहसा निष्पाप बायका मुलांना मारत नाहीत. म्हणुन ते अतिरेकी ठरत नाहीत असे नव्हे.
नितिन थत्ते
10 Mar 2010 - 3:43 am | विकास
तो अतिरेकी आहे की क्रांतिकारक हे आपण कुंपणाच्या कोणत्याबाजूस उभे आहोत त्यावर ठरते. दोन्हीतली सीमारेषा फार धूसर असते.
असहमत.
या न्यायाने सतवंतसिंग हा अतिरेकी न ठरता क्रांतिकारक ठरावा का? किंवा जनरल वैद्यांचे मारेकरी पण अतिरेकी नाहीत असे होते का?
दिशाभूल करणारा प्रश्न आहे. सतवंतसिंग, बिएंतसिंग आणि तसेच जनरल वैद्यांचे मारेकरी यांचे काम एकट्याचे नव्हते तर खलीस्तानी चळवळीचे काम होते. या चळवळीने अनेक निष्पापांना संपुर्ण भारतभर मारले आहे. त्यांनी जसे ललीत माखन, या काँग्रेसच्या खासदाराला, ज्याचा त्यांच्या लेखी काँगेसजनांनी केलेल्या दिल्लीतील शिख हत्याकांडात संबंध होता त्याला मारले तसेच काही कारण नसताना त्याची बायको, गीता माखनलाही मारले.
भारतीय क्रांतीकारकांनी वैयक्तिक आणि संघटनात्मक पद्धतीने असे केलेले नाही. अजून एक उदाहरण म्हणजे मदनलाल धिंग्राने पण केवळ कर्झन वायलीला मारले ते इतरांना बाजूस करून. गोळ्यांचा वाटेल तसा भडीमार करून नाही. तेच नेताजी सुभाषचंद्र बोसांबद्द्ल, अगदी जे हिटलरला जाऊन भेटले, जपानला गेले आणि मदत मागितली त्यांच्या बाबतीतही. किमान माहीतीप्रमाणे आझाद हिंद सेनेने कुठेही तसेच धोरण म्हणून त्यांच्या नेतृत्वाखाली आणि पश्चात गोर्या सामान्यांवर (सामान्य ब्रिटीशांवर) हल्ले केले नाहीत.
या उलट जसे जलीयनवाला बागेत झाले तसेच बंगाल मधे कृत्रीम दुष्काळ तयार करून गरीबांना जीवे मारण्याचा पण अतिरेक झाला होता.
माओवादी हे केवळ पोलीसांनाच बाजूस करून मारत नाही आहेत तर समांतर करव्यवस्था त्या त्या भागातील जनतेवर लादून तसेच बळजबरीने पाठींबा देयला लावून दहशत तयार केली नाहीतर काय केले आहे? २००६ च्या एशियन सेंटर फॉर ह्युमन राईट्सच्या आकड्यानुसार, २८५ नागरीक तर १३५ सुरक्षा कर्मचारी (पोलीस, निमलष्करी दल आदी) गेले आहेत. थोडक्यात नागरी हानी जास्तच झालेली आहे.
साधे संपादकाने एखादा प्रतिसाद उडवला तर आपण स्वातंत्र्याच्या गप्पा करत बोंबाबोंब करू लागतो. येथे तर सगळेच पणाला लागले होते. असो.
एकवेळ स्वतःला अहिंसावादी म्हणत क्रांतीकारकांची देखील हिंसा पटत नाही असे म्हणले तर समजू शकेल, पण उगाच वाट्टेल तसा तर्क दाखवत बुद्धिभेदी दिशाभूल करत, आपल्या क्रांतिकारकांना दहशतवादाच्या रांगेत उभे करून वैचारीक हिंसाच करायची असेल तर ती अहिंसेच्या तत्वज्ञानात बसते का? का, हिंसात्मक पद्धती का असेना देशासाठी आणि आपण उपभोगत असलेले स्वातंत्र्य मिळवण्यासाठी प्राण अर्पिले असे वाटण्याच्या कृतज्ञेत बसते?
--------------------------------
मी या आणि इतर संकेतस्थळावर केवळ "विकास" याच नावाने वावरतो. त्याच्या मागेपुढे उभ्या (||) आडव्या (=), तिरप्या (\\ //) आदी कुठल्याच प्रकाराच्या रेषा नसतात. त्या अर्थाने माझी कुठेही शाखा नाही. :-)
10 Mar 2010 - 5:46 am | मदनबाण
ज्यांना हिंदुस्थानातले क्रांतिकारक आणि अतिरेकी यांच्यात साम्य दिसते त्यांनी त्यांचे डोळे आणि डोके मात्र नक्कीच तपासुन घ्यायला हवेत !!!
फुकटचे स्वातंत्र्य मिळाल्यावर त्याची किंमत या लोकांना काय कळणार ?
कुंपणाच्या गोष्टी करणार्यांना जर कोलु पिसायला लागला असताना, तर मग सगळ्या सीमारेषा बरोबर स्पष्ट दिसायला लागल्या असत्या...
खरे तर मी या धाग्यावर प्रतिसादच देणार नव्हतो,पण आता राहवल नाही...
मदनबाण.....
मोती बनून शिंपल्यात राहण्यापेक्षा दवबिंदू होऊन चातकाची तहान भागविणे जास्त श्रेष्ठ.
www.mazeyoutube.blogspot.com
10 Mar 2010 - 9:25 am | नितिन थत्ते
>>फुकटचे स्वातंत्र्य मिळाल्यावर त्याची किंमत या लोकांना काय कळणार ?
कुंपणाच्या गोष्टी करणार्यांना जर कोलु पिसायला लागला असताना, तर मग सगळ्या सीमारेषा बरोबर स्पष्ट दिसायला लागल्या असत्या...
स्वातंत्र्य मला फुकट मिळाले आहे त्यामुळे मला त्याची किंमत नाही आणि तुम्हाला (मदनबाण यांना) कष्टाने मिळाले आहे म्हणुन मदनबाण यांना मात्र त्याची किंमत कळते असे तुम्हाला म्हणायचे नसावे असे समजतो. कारण तसे म्हणणे वस्तुस्थितीला कुठल्याच प्रकारे धरून नाही.
विकास यांनी भारताच्या स्वातंत्र्यलढ्याच्या बाबत ब्रिटिशांचे अन्याय वगैरे जे मुद्दे मांडले आहेत ते सगळे खलिस्तानवाद्यांना त्यावेळी त्यांच्याबाबतीत 'खरे'च वाटत होते.
आज ती चळवळ/हिंसाचार थंडावली आहे म्हणजे 'अन्याय होतच नव्हता/तितका काही घोर अन्याय नव्हता' अशा मताप्रत शीख लोक आले आहेत की 'स्वातंत्र्य मिळणे शक्य गोष्ट दिसत नाही' हे रिअलायझेशन आहे हे आपण कसे ठरवणार.
पारतंत्र्याच्या काळातही ब्रिटिशांचे राज्य चांगले असे वाटणारे लोक होतेच.
महाराष्ट्रात सं म आंदोलनाच्या काळापासून 'दिल्लीकरांचा महाराष्ट्रावर अन्याय' ही भावना आहेच. उद्या त्यातून महाराष्ट्र स्वतंत्र करण्याचे सशस्त्र आंदोलन उभे राहिले तर त्या आंदोलकांना गुजरातेतील, कर्नाटकातील आणि महाराष्ट्रातीलही काही लोक अतिरेकी म्हणतील आणि गुजरातेतील काही, कर्नाटकातील काही आणि महाराष्ट्रातील उरलेले लोक स्वातंत्र्यसैनिक म्हणतील. (क्रांतिकारक हा शब्द फार मोठा आहे तो वापरत नाही).
म्हणूनच सीमारेषा धूसर.
नितिन थत्ते
10 Mar 2010 - 9:37 am | विकास
मी ब्रिटीशांचे अन्याय म्हणले नाही तर ब्रिटीशांच्या, उदाहरण दिलेल्या, विशिष्ठ कारवायांमधे दहशतवाद दिसतो असे म्हणले. तसेच क्रांतिकारकांनी खलीस्तानवाद्यांसारखे संघटनात्मकरित्या अथवा एकेरी निर्णयाने निष्पापांना मारलेले नाही असे म्हणलेले आहे.
तीच गोष्ट संयुक्त महाराष्ट्रासंदर्भात देखील. स्वतंत्र भारतातील स्वकीयांच्या एका निर्णयाविरुद्धची चळवळ असल्याने त्यात शस्त्रास्त्रे ही केवळ राज्यकर्त्यांच्या विरोधात शब्दांचीच होती. त्यात सामान्यांच्या विरुद्ध दहशतवाद नव्हता का (खलीस्तानवाद्यांसारखे) रेल्वे स्टेशनवर रेडीओ बाँब लावून निष्पापांना मारले गेले नव्हते. (नाही म्हणायला आमचे पवार साहेबांनी नंतरच्या काळात, बेळगाव महाराष्ट्राला मिळाला नाही तर महाराष्ट्राचा धगधगता पंजाब होईल वगैरेसारखी विधाने केली होती. पण ती केवळ विधानेच होती.)
थोडक्यात परत एकदा दिशाभूल करणारे समानत्व दोन पूर्ण भिन्न उदाहरणामधे दाखवायचा प्रयत्न केला गेला आहे.
मात्र असे दिसते आहे की तुम्हाला काय वाट्टेल ते करून आजचा दहशतवादी हा भारतीय स्वातंत्र्यातील क्रांतिकारकांसारखाच दाखवायचा आहे. ठिक आहे, तसे अवश्य म्हणा, पण म्हणून दिशाभूल करणारी उदाहरणे कशाला?
--------------------------------
मी या आणि इतर संकेतस्थळावर केवळ "विकास" याच नावाने वावरतो. त्याच्या मागेपुढे उभ्या (||) आडव्या (=), तिरप्या (\\ //) आदी कुठल्याच प्रकाराच्या रेषा नसतात. त्या अर्थाने माझी कुठेही शाखा नाही. :-)
10 Mar 2010 - 10:46 am | नितिन थत्ते
सं म चळवळ त्याकाळी शब्दांचीच होती यात काहीच संशय नाही. मी पुढे कधी अशी चळवळ उभी राहिली तर...... अशा अर्थाने म्हटले आहे.
मला अतिरेकी आणि क्रांतिकारक एकच दाखवायचे नाही. फक्त सीमा धूसर आहे असे म्हणायचे आहे.
गांधींना भगतसिंग प्रभृतींचा मार्ग मान्य नव्हता तरीही त्यांनी अतिरेकी न म्हणता 'वाट चुकलेले देशभक्त' म्हटले कारन गांधीही कुंपणाच्या त्याच बाजूस उभे होते.
>>तसेच क्रांतिकारकांनी खलीस्तानवाद्यांसारखे संघटनात्मकरित्या अथवा एकेरी निर्णयाने निष्पापांना मारलेले नाही असे म्हणलेले आहे.
याचा अर्थ समजला नाही.
नितिन थत्ते
10 Mar 2010 - 6:23 pm | क्लिंटन
मी वाचलेल्या इंदिराजींच्या चरित्राप्रमाणे (लेखक: इंदर मल्होत्रा, पुपुल जयकर आणि कॅथरीन फ्रॅन्क) तरी बियंत सिंह आणि सतवंत सिंह या इंदिराजींची हत्या करणाऱ्यांचा पंजाबातील खलिस्तानी चळवळीशी थेट संबंध होता असे मी तरी वाचले नाही. कटात सतवंत सिंहचा काका केहार सिंह पण सामील होता. बियंत सिंह १९८० पासून इंदिराजींचा अंगरक्षक होता आणि ऑपरेशन ब्लू स्टारपासून तो अस्वस्थ होता. त्याने आणि इतर सूत्रधारांनी जुलै १९८४ मध्ये दिल्लीतील गुरूद्वारा रकबगंज येथे इंदिराजींची हत्या करायची प्रतिज्ञा केली आणि ३१ ऑक्टोबर रोजी त्याची अंमलबजावणी केली. इंदिराजींची हत्या करायचा विडा बब्बर खालसा आणि तत्सम संघटनांनी उचललेला होता पण प्रत्यक्ष हत्या झाली त्यात पंजाबातील दहशतवादी संघटनांचा थेट हात नव्हता. याचाच अर्थ बियंत-सतवंत-केहार यांचा खलिस्तान चळवळीशी संबंध नव्हता आणि त्यांनी इंदिराजींची हत्या स्वयंप्रेरणेने केली. तसे असेल तर आपल्या व्याख्येप्रमाणे ते ’क्रांतिकारक’ ठरतात का? ही माहिती चुकीची असल्यास सुधारावी ही विनंती.
त्याचप्रमाणे नथुराम गोडसेने गांधींची हत्या हाताच्या बोटावर मोजता येईल इतक्या साथिदारांबरोबर योजना करून पार पाडली.त्यात इतर कोणत्याही संघटनेचा (रा.स्व.संघ वगैरे) हे सिध्द होऊ शकलेले नाही. तसेच नथुरामने गांधींवर गोळ्या झाडल्या पण तिकडे हजर असलेल्या इतर कोणालाही कसलीही दुखापत केली नाही. मग नथुराम पण क्रांतिकारक ठरतो का?
खलिस्तान चळवळ काय किंवा लष्कर-ए-तोयबा काय अशा संघटना सरकारी कार्यालयांप्रमाणे कोणताही कागदोपत्री रेकॉर्ड सहसा ठेवत नाहीत.त्यामुळे एखादा मनुष्य अशा संघटनेचा सदस्य आहे हे सिध्द करणे खूपच कठिण असते.तेव्हा जरी बियंत-सतवंत-केहार कुणा खलिस्तानी संघटनेचे सदस्य असले तरी कायद्याच्या दृष्टीने ते सिध्द कसे करणार? आणि जरी एखादा मनुष्य अशा संघटनेचा सदस्य असला तरी त्याने केलेल्या कृत्याबद्दल सबंध संघटनेला कसे जबाबदार ठरवणार? १९९५ मध्ये पंजाबचे मुख्यमंत्री बियंत सिंह (त्यांचे नाव पण योगायोगाने बियंत सिंहच निघाले) यांची हत्या झाली आणि त्याबद्दल काही लोकांना न्यायालयाने शिक्षापण सुनावली आहे. समजा त्यापैकी एखादा कुठल्यातरी प्रतिष्टित कंपनीत नोकरीला असेल तर याचा अर्थ बियंत सिंह हत्येमागे त्या कंपनीचा हात होता असा होतो का? असो.
आज बियंत-सतवंत-केहार यांना हुतात्मा समजणारी मंडळी आहेत. त्यांना काही गुरूद्वारांनी मरणोत्तर संतत्वपण बहाल केले आहे. पण आपल्यासारखे अनेक लोक त्यांना दहशतवादी समजतात. त्याचप्रमाणे नथुराम गोडसेला पण ’महात्मा’ समजणारे लोक आहेतच. तेव्हा कोण दहशतवादी आणि कोण महात्मा किंवा क्रांतिकारक हे आपण कोणत्या बाजूला आहोत यावर अवलंबून असते. त्या अर्थी ती सीमारेषा ’धूसर’ आहे असे म्हणायचा थत्ते साहेबांचा उद्देश आहे असे वाटते.
अवांतर:
१) राजकिय कारणांसाठी निरपराधांची हत्या करणारा तो दहशतवादी अशी व्याख्या केली जाते. यातही ’निरपराध’ कोण यावर एकमत कसे होणार? पॅलेस्टाईनमधील संघटनांना आपण दहशतवादी म्हणतो पण इस्त्राएलच्या वरवंट्याखाली भरडले गेलेले लोक क्रांतिकारक म्हणतात.असे दहशतवादी/क्रांतिकारक अनेकदा मानवी बॉम्ब बनून इस्त्राएलींची हत्या घडवून आणतात.आता असे मारले गेलेले इस्त्राएली हे निरपराध का? आपण त्यांना जरूर निरपराध म्हणू. पण पॅलेस्टाईनमधील लोकांच्या दृष्टीने ते त्यांची हक्काची जमीन हडप करून त्यांना देशोधडीला लावणारे कर्दनकाळ असतात.इस्त्राएलची स्थापना का झाली, त्यामागे जबाबदार कोण हे वादाचे मुद्दे नक्कीच आहेत.इंग्लंड-अमेरिकेने पॅलेस्टिनींची जमिन परस्परपणे ज्यूंच्या घशात घातली असे पॅलेस्टिनी लोक मानतात. पण सद्यकालात पॅलेस्टिनियन्सच्या जमीनीवर कोण राहत आहे?सामान्य इस्त्राएलीच ना?असे लोक पॅलेस्टिनियन्सच्या नजरेतून ’निरपराध’ असतील का किंबहुना का असावेत? एक समकक्ष उदाहरण द्यायचे झाले तर एखाद्या गुंडाने माझ्या घराची खोली माझ्या इच्छेविरूध्द घशात घातली आणि तिथे तिसऱ्या माणसाला राहायला आणले तर तो तिसरा माणूस ’निरपराध’ असणार की नाही?इतरांच्या मते तो निरपराध असला तरी तो माझ्या घराच्या खोलीत बेकायदा राहत असल्यामुळे माझ्या दृष्टीने तो अजिबात निरपराध असणार नाही.
तेव्हा पॅलेस्टाईनमधील चळवळीला क्रांतिकारक चळवळ म्हणावे की दहशतवादी चळवळ? हे धूसर रेषेचे आणखी एक उदाहरण नाही का?
स्प्ष्टीकरण: भिंद्रनवाले कंपनीने पंजाबात वाहिलेले रक्ताचे पाट आणि काश्मीरातील हत्याकांड ही निरपराधांची हत्या आहे असेच माझे मत आहे.कारण या दोन्ही ठिकाणी अनेक शतके एकत्र राहत असलेल्या दुसऱ्या समाजघटकातील लोकांना पध्दतशीरपणे लक्ष्य बनविले गेले आहे. इस्त्राएलप्रमाणे बाहेरून कोणी आलेच असले तर पाकिस्तानातून येणारे मारेकरी आहेत.
२) फिडेल कॅस्ट्रो १९५९ मध्ये बॅटिस्टाची सत्ता उलथवून लावून क्युबाचे अध्यक्ष झाले.ती चळवळ अहिंसक होती असे कोण म्हणेल? त्यात बॅटिस्टाशी काहीही घेणेदेणे नसलेल्या एकाही क्युबन नागरीकाचा बळी पडला नाही असे छातीठोकपणे कोणी म्हणू शकेल का? मग फिडेल कॅस्ट्रो पण दहशतवादी झाले का? अमेरिका त्यांना जरूर दहशतवादी म्हणते पण त्यांचे अनुयायी त्यांना महान क्रांतिकारक आणि द्रष्टे पुरूष मानतात. ही पण धूसर रेषा नाही का?
३) रमाबाई आंबेडकर नगरमध्ये गोळीबार करणारा कॉन्स्टेबल मनोहर कदम हा अतिरेकी का? तो म्हणतो की जमावाने टॅंकरला आग लावू नये म्हणून गोळीबार करणे भाग होते. ती आग लागली असती तर मोठाच अनर्थ घडला असता. तर काही संघटना ही ’टॅंकर थिअरी’ पूर्णपणे नाकारतात आणि त्यांच्या मते कदमने सकाळी कामावर निघालेल्यांना मुद्दामून गोळ्या घालून ठार मारले. समजा कदमने गोळीबार स्वत:च्या अधिकारात नव्हे तर कोणा वरीष्ठाच्या आदेशाची अंमलबजावणी करायला केला असेल तरीही तो दहशतवादी का? की केवळ वरीष्ठ दहशतवादी ठरणार? या प्रश्नांची उत्तरे पण आपण कोणत्या बाजूला आहोत यावर अवलंबून असतात.
11 Mar 2010 - 11:30 am | विकास
....याचाच अर्थ बियंत-सतवंत-केहार यांचा खलिस्तान चळवळीशी संबंध नव्हता आणि त्यांनी इंदिराजींची हत्या स्वयंप्रेरणेने केली. ...
खलीस्तान चळवळीशी संबंध नव्हता, हे वास्तवास धरून असू शकेल किंबहूना आहे असे आपल्या वाचनावर विश्वास ठेवून मी नक्की मान्य करेन. मात्र स्वयंप्रेरणेने केले का हा जरा वादग्रस्त मुद्दा होऊ शकतो. कारण माझ्या माहीती प्रमाणे व्हि.पी.सिंग सरकारने (१९८९) मधे अधिकृतरीत्या "कट-कारस्थान" असल्याचा भाग खटल्यातून काढून टाकला. हे अर्थातच काँग्रेसचा पराभव झाल्यानंतरचे आहे. व्हि.पी.सिंग यांचे एकंदरीत त्यावेळचे राजकारण पहाता (अगदी ज्या पद्धतीने ते पंतप्रधान झाले ते लक्षात घेता) त्यांनी काही हा सरळ मनाने निर्णय घेतला असेल असे वाटत नाही. तरी देखील इंदिरा गांधी हत्या सोडल्यास जे काही खलीस्तानवाद्यांनी केले, त्याचा विचार करता ते भारतीय क्रांतिकारकांच्या हिंसेच्या जवळचे वाटत नाही.
बाकी राहीला आपल्या उदाहरणांच्या संदर्भातील मुद्दा. भारतीय स्वातंत्र्याच्या क्रांतिकारकांनी जी शस्त्रे हातात धरली, ती निरपराध्यांवर रोखली नाहीत अथवा अगदी ब्रिटीशांवर देखील सर्वत्र आणि कशीही वापरली नाहीत. ज्यांनी स्वतःच्या बळाचा वापर केला त्यांच्या विरुद्ध वापरली. पण म्हणजे याचा कॉन्व्हर्स (उलट) पण बरोबर आहे असे काही ठरत नाही. अर्थात जे एखाद्याच व्यक्तीला ठरवून मारतात आणि इतरांना इजा पोचवत नाहीत ते प्रत्येक वेळेस क्रांतिकारक ठरतातच असे नाही. अशातच म. गांधी, इंदिरा गांधी, आणि इझॅक रॅबिनचे खुनी बसतात असे वाटते. त्यात (खुन्यांत)कोणी महात्मा नाहीत. जरी कुणाला त्यांच्यामधे महात्मा वाटले असले तरी अशा वाटणार्यांनी देखील त्यांच्याकडून प्रेरणा घेऊन कत्तलबाजी केलेली नाही.
असे दहशतवादी/क्रांतिकारक अनेकदा मानवी बॉम्ब बनून इस्त्राएलींची हत्या घडवून आणतात.आता असे मारले गेलेले इस्त्राएली हे निरपराध का?
सामान्य माणूस, ज्याच्या हातात निर्णय घेण्याची सत्ताच नसते, तो भले कुठच्याही बाजूचा असला तरी निरपराधच असतो असे वाटते. येथे हत्या ही सामान्य नागरीकांची होत आहे. याच कारणाने, भारतात देखील दंगलीत जेंव्हा विशिष्ठ जात, पंथ, धर्म यांना वेठीस धरून मारले जाते ते अयोग्यच आहे.
पॅलेस्टाईन चळवळ ही बर्याच काळापुरती क्रांतीकारी चळवळ होती असे म्हणता येईलही. कारण त्यांच्यावर अन्याय नक्कीच झाला आहे. मात्र ४८ सालानंतर त्या अन्यायाला, अंधळ्या आत्मविश्वासात इस्त्रायलवर अरब राष्ट्रांच्या मदतीने हल्ला करून, त्यांनीच निमंत्रण दिले, त्यामुळे तेंव्हा त्यांना क्रांतिकारक म्हणता येणार नाही. पण विचार करा जर ही क्रांतिकारी चळवळ असेल तर त्यात सामान्य किती मारले गेलेत आणि सत्ताधिश (अगदी पोलीसांपासून ते वरपर्यंत) किती मारले गेलेत? तसे भारतीय क्रांतिकारकांच्या हातून घडले आहे का? यावर सीमारेषा कशाला म्हणायचे हे ठरेल, मग धुसर आहे का नाही ते.
फिडेल कॅस्ट्रोला अमेरिकाच दहशतवादी म्हणते. ते देखील, मला माहीत नाही, कदाचीत बुशबाबाने सुरवात केली आहे का? त्याला काही अर्थ नाही. जग म्हणते असे वाटत नाही, अगदी ज्यांना कम्युनिझम पटत नाही ते देखील. तो हुकूमशहा नक्कीच आहे पण व्याख्येप्रमाणे दहशतवादी नाही असेच वाटते.
-----
या चर्चेपुरतेच नाही, तर इतरत्र देखील पाहीले आहे, की बर्याचदा भारतातील फुटीर चळवळीचे आणि त्यातील हिंसेचे समर्थन करताना, क्रांतिकारकांशी तुलना केली जाते. वास्तवीक आजचे फुटीरतावादी (त्यात खलीस्तानीपण आले, ज्यांचे फेसबुकवर पान आहे) हे केवळ अतिरेकी नसून दहशतवादी आहेत हे वास्तव आहे. किंबहूना, काश्मीरच्या बाबतीत तर नव्वदच्या दशकात माध्यमांना त्यांनी दम देऊन अतिरेकी (extremist) हा शब्द वापरायला लावला आणि दहशतवाद बाद करायला लावला. ९/११ झाले नसते तर दहशतवाद शब्द परत आला नसता.
तर अशा दहशतवाद्यांना आधी अतिरेकी म्हणायचे आणि मग त्यांची क्रांतिकार्याशी तुलना करत इतरांच्या नकळत त्यांचे उदात्तीकरण चालू करायचे, प्रकार अनेक पाहीले. त्यामुळे हा वाद चालू झाला. त्यात जे अजून घडलेच नाही ते घडू शकेल असे म्हणत संयुक्त महाराष्ट्रचळवळीला पण यात "जर-तर" चा वापर करून, पुढे असे होऊ शकते म्हणत गोवण्यात आले. हे मला कुठल्याही तत्वाने पटणारे वाटले नाही. हा देखील वैचारीक अतिरेकच वाटला.
जर आता नितीन, "मला अतिरेकी आणि क्रांतिकारक एकच दाखवायचे नाही." असे म्हणत असले तर मला काही म्हणायचे नाही.
असो.
--------------------------------
मी या आणि इतर संकेतस्थळावर केवळ "विकास" याच नावाने वावरतो. त्याच्या मागेपुढे उभ्या (||) आडव्या (=), तिरप्या (\\ //) आदी कुठल्याच प्रकाराच्या रेषा नसतात. त्या अर्थाने माझी कुठेही शाखा नाही. :-)
11 Mar 2010 - 3:16 pm | क्लिंटन
याविषयी काही दुमत नाही.पंजाबातील दहशतवाद्यांनी (हो ते दहशतवादीच होते) १९९१ च्या लोकसभा निवडणुकांसाठीचे मतदान व्हायच्या आधी लुधियानाजवळ दोन रेल्वेगाड्या थांबवून बेछूट गोळीबार केला होता आणि शंभरेक लोकांना यमसदनी धाडले.बियंत सिंह मुख्यमंत्री झाल्यानंतर त्यांनी के.पी.एस.गिल यांना खऱ्या किंवा खोट्या चकमकीत दहशतवाद्यांना संपवायचे स्वातंत्र्य दिले. त्या काळात मी दूरदर्शनवर बघितलेली एक बातमी माझ्या पक्की लक्षात आहे. पंजाब पोलिसांनी एका सुमारे ६०० लोकांच्या हत्येत सहभाग असलेल्या एका दहशतवाद्याचा ’एन्काऊंटर’ केला होता. अशा कर्दनकाळांची आणि भगतसिंह प्रभृतींची तुलना कशी होऊ शकेल? ते भारतीय क्रांतिकारकांच्या हिंसेच्या जवळचे तर सोडाच पूर्णपणे विरोधातले वाटते.
माझा मुद्दा केवळ बियंत-सतवंत-केहार यांच्याविषयीचा आहे.सुवर्णमंदिरात दहशतवादी घुसले होते हे सत्यच आहे पण ऑपरेशन ब्लू स्टारमध्ये सुवर्णमंदिराची आणि अकाल तख्तची अपरिमित हानी झाली आणि त्यामुळे सामान्य शीखाला त्याचे दु:ख झाले हे पण तितकेच सत्य आहे. तत्कालीन परिस्थिती लक्षात घेता इंदिराजींपुढे वेगळा काही मार्ग होता असेही वाटत नाही. १९८७ मध्ये सुवर्णमंदिरात परत दहशतवादी घुसल्यावर राजीव गांधींनी परिस्थिती वेगळ्या पध्दतीने हाताळली. तसे इंदिराजींना करणे शक्य झाले असते की नाही हा ’जर-तर’ चा भाग झाला.पण सुवर्णमंदिराला झालेल्या हानीमुळे इंदिराजी शीख समुदायातील अनेकांना खलनायिका वाटू लागल्या तर त्यात आश्चर्य वाटू नये. सोमनाथ मंदिराची लूटमार करणाऱ्या गझनीच्या महंमदाला कोणी ठार मारले असते तर त्याला मी दहशतवादी नक्कीच म्हटले नसते उलट त्याला मी मोठा योध्दा आणि वीरपुरूषच मानले असते. त्याच न्यायाने जर शीख समुदायातील काहींना इंदिराजींचे मारेकरी (भिंद्रनवाले नव्हे) संत वाटत असतील तर मला ते समजू शकते. अर्थात मी त्यांना संत नक्कीच म्हणत नाही. माझ्या दृष्टीने ते दहशतवादीच आहेत.कारण त्यांनी भारताच्या पंतप्रधानांची हत्या केली. पण काहींच्या मते ते संत आहेत कारण त्यांनी सुवर्णमंदिराच्या पावित्र्याची पायमल्ली करणाऱ्या व्यक्तीला संपवले.’धूसर रेषेमागचा’ मूळ मुद्दा हाच आहे. आपण कोणत्या बाजूला आहोत यावर आपले मत अवलंबून असते. यावरून मी चापेकर बंधूंसारख्या क्रांतिकारकांची दहशतवाद्यांबरोबर तुलना करत आहे असा अर्थ कसा काय निघतो?मी नक्की कोणत्या बाजूला आहे हे मला पक्के ठाऊक आहे आणि त्याबद्दल कोणताही संभ्रम माझ्या मनात नाही. (असा संभ्रम स्वयंघोषित मानवाधिकारांच्या पुरस्कर्त्यांना पडला आहे असे त्यांच्या वर्तणुकीवरून वाटते). त्यामुळे माझ्यासाठी चाफेकर बंधू क्रांतिकारकच आहेत.पण त्यामुळे धूसर रेषेचा मुद्दा बाद होत नाही.
परत तोच मुद्दा निघत आहे.मदनलाल धिंग्राने एकट्या कर्झन वायलीला उडवले पण इतर कोणाच्या केसालाही धक्का लावला नाही. तसेच मदनलालने किंवा इतर क्रांतिकारकांनी दिसला इंग्रज की घाल गोळी असेही केलेले नव्हते. तरीही मुद्दामून कर्झन वायलीला संपवले म्हणजे कर्झन वायलीने भारताचा अपमान/नुकसान केले असले पाहिजे. त्याने नक्की काय केले हे माझ्या या क्षणी लक्षात नाही कारण ते वाचन करून बरीच वर्षे झाली आहेत.पण आपण मदनलाल धिंग्राचे समर्थन करताना म्हणतो की त्याने भारताचा शत्रू कर्झन वायलीलाच उडवले इतर कोणाच्याही केसालाही धक्का लावला नाही. त्यापुढे जाऊन आपण असे म्हणतो की मदनलालला त्याने केलेल्या कृत्याचा अजिबात पश्चात्ताप झाला नव्हता आणि तो स्वत:हून पोलिसांच्या स्वाधीन झाला. पुढे मदनलाल हसत हसत फासावर गेला.
दृष्य क्रमांक १: नथुराम गोडसेने ५५ कोटींची पाकिस्तानला दक्षिणा देऊन भारताचा शत्रू-- पाकिस्तानला मदत करणाऱ्या, मुस्लीम लीगचा प्रत्यक्ष कृतीदिन चालू होता त्यावेळी शांतपणे बसलेल्या पण हिंदू प्रतिकाराला उभे राहिल्यावर उपोषणाला बसून हिंदूंना शस्त्र म्यान करायला लावणाऱ्या आणि म्हणूनच हिंदूंचे शत्रू असलेल्या महात्मा गांधींची हत्या केली. नथुरामने केवळ गांधींनाच मारले. इतर कोणाच्या केसालाही धक्का लावला नाही. गांधींना मारल्यानंतर नथुरामने बंदूक टाकून दिली आणि तो स्वत:हून पोलिसांच्या स्वाधीन झाला. पुढे तो हातात भगवद्गीता घेऊन हसत हसत फासावर गेला.
दृष्य क्रमांक २: बियंत सिंहने आमच्या सुवर्णमंदिरावर हल्ला करून त्याच्या पावित्र्याची पायमल्ली करणाऱ्या, आमच्या अकाल तख्ताचा, आमच्या धर्मग्रंथाचा अपमान करणाऱ्या इंदिरा गांधींवर रिव्हॉल्व्हरमधून ५ गोळ्या झाडल्या. इंदिराजींबरोबर त्यावेळी आर.के.धवन आणि इतर काही लोक होते. त्यापैकी कोणाच्या केसालाही त्याने धक्का लावला नाही.इंदिराजी जमिनीवर पडल्यावर सतवंत सिंहने ’आमच्या धर्माचा शत्रू’ वाचायची थोडीही शक्यता बाकी राहू नये म्हणून त्यांच्यावर स्टेनगन मधून अजून २५ गोळ्या झाडल्या. गोळ्या झाडल्यानंतर बियंत सिंहने ’आम्हाला काय करायचे ते आम्ही केले आता तुम्हाला काय करायचे ते तुम्ही करा’ असे म्हणत हातातील बंदूक खाली टाकली. दरम्यान गोळीबाराचा आवाज ऐकून तिथे आलेल्या (दिल्ली पोलिसांच्या की लष्कराच्या?) जवानांच्या गोळीबारात बियंत सिंह ठार झाला तर सतवंत सिंह जखमी झाला. पुढे सतवंत सिंह आणि केहार सिंह (हसत हसत का ते माहित नाही) फासावर गेले.
दृष्य क्रमांक ३: देवाने ज्यूंना दिलेल्या भूमीत पूर्ण ज्यूंचे राज्य स्थापन केलेले असतानाही पॅलेस्टिनी लोकांबरोबर काही कारण नसताना शांततेच्या वाटाघाटी करून ऍब्रॅहॅम आणि मसीहा आणि तत्सम संतपुरूषांच्या ओल्ड टेस्टॅमेन्टमधील विधान खोटे पाडणाऱ्या पाखंडी यित्झॅक राबीनना आमच्या यिगाल आमीरने ठार मारले.त्याने इतर कोणाच्या केसालाही धक्का लावला नाही.आज तो न्यायालयाने दिलेली जन्मठेपेची शिक्षा विनातक्रार भोगत आहे.
माझा प्रश्न: आपण मदनलाल धिंग्राचे ज्या आधारावर समर्थन करतो तो आधार आणि वरील तीन दृष्यांमध्ये नथुराम, बियंत-सतवंत-केहार आणि यिगाल आमीरचे समर्थक ज्या आधारावर समर्थन करतात तो आधार यात नक्की फरक काय?
आपल्याला असे वाटते याचे कारण आपल्या घरादारावरून इस्त्राएलचे बुलडोझर फिरलेले नाहीत. आपल्या जमिनीवरून आपल्यालाच हुसकावून लावून कोणी राहत नाही.दूरून उभे राहून मजा बघायला काही त्रास पडत नाही. पण ज्याला भोगायला लागते त्यालाच त्याच्या यातना कळतात. एखादा पॅलेस्टिनी मनुष्य-- ज्याचे घरदार इस्त्राएलने उध्वस्त केले त्याला कसले महत्व अधिक असणार? स्वत:चे घर परत मिळवायला, त्याच्या बायकामुलांना ठार मारलेल्यांवर सूड उगवायला आणि त्याच्या जमिनीवर जो कोण राहात आहे त्याला हुसकावून लावायला की आपण सगळेच करतो तसे भरल्या पोटाचे विचार करायला? असा माणूस मानवी बॉम्ब बनला तर त्यात आश्चर्य ते काय?
+१
मग त्यांनी दुसरे काय करायला हवे होते? आंदोलने, सत्याग्रह आणि उपोषणे करून त्यांना त्यांची घरेदारे परत मिळणार होती का?
मागील प्रतिसादात म्हटल्याप्रमाणे ’हे सामान्यच माझ्या घरावर कब्जा करून राहात आहेत आणि इतर कोणासाठीही ते निरपराध असले तरी माझ्यासाठी ते कर्दनकाळच आहेत’ असे पॅलेस्टाईनमधील सामान्य युवकास वाटले तर त्यात काय चुकले? ’त्यांचे ’सामान्य’ नागरिक (जे माझ्या लेखी अजिबात निरपराध नाहीत), पोलिस आणि इतर लोक मरू नयेत म्हणून मी देशोधडीला का लागावे? माझ्या पुढच्या पिढ्यांना घराच्या उबदार छत्रापासून का वंचित ठेवायचे?मोठा अजब न्याय झाला. ज्यांनी माझी जमिन हडपली, घरदार उध्वस्त केले ते लोक सामोपचाराची भाषा ऐकत नसतील, त्यांच्या लष्करी सामर्थ्यापुढे माझा अजिबात टिकाव लागणार नसेल तर माझ्यापुढे मानवी बॉम्ब बनण्याशिवाय दुसरा पर्याय नाही’ असे ही त्या सामान्य युवकास वाटले तर त्यात त्याची चूक काय?
अवांतर: पूर्णपणे आलिप्त विचार केला तर इस्त्राएल देशाची स्थापनाच मुळात एक sacrilege आहे असे मला वाटते. तरीही आंतरराष्ट्रीय राजकारणात असा आदर्शवाद चालत नाही आणि त्यातील गुंतागुंतीचा विचार करता मला पॅलेस्टाईनपेक्षा इस्त्राएलच अधिक जवळचे वाटते आणि म्हणून एक भारतीय नागरिक म्हणून माझा पाठिंबा इस्त्राएललाच. (माझ्या पाठिंब्याला कोण विचारत नाही ही गोष्ट अलहिदा).
कदाचित दहशतवादी हा शब्दप्रयोग चुकीचा आहे. पण अमेरिकेच्या सी.आय.ए ने फिडेल कॅस्ट्रोंना मारायचे एकूण < a href="http://en.wikipedia.org/wiki/Fidel_Castro#Assassination_attempts"> ६३८ वेळा प्रयत्न केले. दहशतवादी नाही तरी अमेरिका कॅस्ट्रोंना ’एक संपविण्यायोग्य कटकट’ नक्कीच मानते.
11 Mar 2010 - 5:52 pm | विकास
धन्यवाद क्लिंटन साहेब.
तुमच्या वरील प्रतिसादातील सर्वच विषयांवर वेगळ्य चर्चा घडू शकतील/आवडतील. त्यात अतिरेकी-क्रांतिकारक सारखे वाद नसतील, तर केवळ माहीतीपूर्ण असतील असे वाटते. त्यामुळे येथे या विषयावर अधिक लिहीण्याचा मोह टाळतो. काही प्रतिसाद केवळ संवादासाठी खरडीद्वारे देण्याचा प्रयत्न करेन.
शाद्बीक च्छलच करायचा असेल तर, "अतिरेकी" म्हणजे जो स्वतःच्या विचारांचा पण अतिरेक करतो. उ.दा. गुमान बसण्याऐवजी, प्रतिसादामागे प्रतिसाद देत रहाणारा मी देखील, कळफलकाव्यतिरीक्त, हातात बंदूक/तलवारच काय साधी टाचणीपण न घेता, आत्ता अतिरेकीच आहे. :-) . रानडे-टिळक-आगरकर-फुले सर्वच अतिरेकी, (आंबेडकरांचा याही बाबतीत सन्मान्य अपवाद करावासा वाटतो, ज्यांनी स्वतःच्या आग्रहाला गांधीजींच्यापुढे नमते घेतले), गांधीजी पण अहींसेच्या बाबतीत अतिरेकी होते आणि सावरकर हिंदूत्व हेच राष्ट्रीयत्व म्हणण्याच्या बाबतीत असे म्हणता येईल. नेहरूंनी तर काय युद्ध सुरू न करता, ओढवून घेतले म्हणून पण अतिरेकीच. तेंव्हा तात्पर्य काय, तर, हा वाद इतक्या शाब्दीक व्याखेपुरता मर्यादीत नाही आहे.
माझ्या आधीच्या प्रतिसादात म्हणल्याप्रमाणे माझा मुद्दा केवळ, "तर अशा दहशतवाद्यांना आधी अतिरेकी म्हणायचे आणि मग त्यांची क्रांतिकार्याशी तुलना करत इतरांच्या नकळत त्यांचे उदात्तीकरण चालू करायचे, प्रकार अनेक पाहीले. त्यामुळे हा वाद चालू झाला." या वाक्याशी आहे.
जर काश्मीर, आसाम मधे विशिष्ठ प्रश्न तसेच गेल्या काही वर्षात वाढलेल्या हल्ल्यांना, ज्यात जाणीवपूर्वक मनुष्यहानी आणि वित्तहानी झाली आहे, संसदेपर्यंत उध्वस्त करण्याचे प्रयत्न झाले आहेत ते हल्ले आणि हल्लेखोर हे जरी अतिरेकी असले तरी त्यांना "क्रांतिकारी" म्हणाल का "दहशतवादी"? हा प्रश्न तुम्हाला नाही आहे, कारण तुमच्या उत्तराची मला कल्पना आहे. का हे काम "दहशतवादा"चे वाटत नसून, त्यांना केवळ "अतिरेकी" म्हणत, भारतीय स्वातंत्र्यातील "क्रांतिकारक" आणि अशा "अतिरेक्यां"मधील सीमारेषा धुसर करणे योग्य आहे?
--------------------------------
मी या आणि इतर संकेतस्थळावर केवळ "विकास" याच नावाने वावरतो. त्याच्या मागेपुढे उभ्या (||) आडव्या (=), तिरप्या (\\ //) आदी कुठल्याच प्रकाराच्या रेषा नसतात. त्या अर्थाने माझी कुठेही शाखा नाही. :-)
11 Mar 2010 - 6:54 pm | विकास
धन्यवाद क्लिंटन साहेब.
तुमच्या वरील प्रतिसादातील सर्वच विषयांवर वेगळ्य चर्चा घडू शकतील/आवडतील. त्यात अतिरेकी-क्रांतिकारक सारखे वाद नसतील, तर केवळ माहीतीपूर्ण असतील असे वाटते. त्यामुळे येथे या विषयावर अधिक लिहीण्याचा मोह टाळतो. काही प्रतिसाद केवळ संवादासाठी खरडीद्वारे देण्याचा प्रयत्न करेन.
शाद्बीक च्छलच करायचा असेल तर, "अतिरेकी" म्हणजे जो स्वतःच्या विचारांचा पण अतिरेक करतो. उ.दा. गुमान बसण्याऐवजी, प्रतिसादामागे प्रतिसाद देत रहाणारा मी देखील, कळफलकाव्यतिरीक्त, हातात बंदूक/तलवारच काय साधी टाचणीपण न घेता, आत्ता अतिरेकीच आहे. :-) . रानडे-टिळक-आगरकर-फुले सर्वच अतिरेकी, (आंबेडकरांचा याही बाबतीत सन्मान्य अपवाद करावासा वाटतो, ज्यांनी स्वतःच्या आग्रहाला गांधीजींच्यापुढे नमते घेतले), गांधीजी पण अहींसेच्या बाबतीत अतिरेकी होते आणि सावरकर हिंदूत्व हेच राष्ट्रीयत्व म्हणण्याच्या बाबतीत असे म्हणता येईल. नेहरूंनी तर काय युद्ध सुरू न करता, ओढवून घेतले म्हणून पण अतिरेकीच. तेंव्हा तात्पर्य काय, तर, हा वाद इतक्या शाब्दीक व्याखेपुरता मर्यादीत नाही आहे.
माझ्या आधीच्या प्रतिसादात म्हणल्याप्रमाणे माझा मुद्दा केवळ, "तर अशा दहशतवाद्यांना आधी अतिरेकी म्हणायचे आणि मग त्यांची क्रांतिकार्याशी तुलना करत इतरांच्या नकळत त्यांचे उदात्तीकरण चालू करायचे, प्रकार अनेक पाहीले. त्यामुळे हा वाद चालू झाला." या वाक्याशी आहे.
जर काश्मीर, आसाम मधे विशिष्ठ प्रश्न तसेच गेल्या काही वर्षात वाढलेल्या हल्ल्यांना, ज्यात जाणीवपूर्वक मनुष्यहानी आणि वित्तहानी झाली आहे, संसदेपर्यंत उध्वस्त करण्याचे प्रयत्न झाले आहेत ते हल्ले आणि हल्लेखोर हे जरी अतिरेकी असले तरी त्यांना "क्रांतिकारी" म्हणाल का "दहशतवादी"? हा प्रश्न तुम्हाला नाही आहे, कारण तुमच्या उत्तराची मला कल्पना आहे. का हे काम "दहशतवादा"चे वाटत नसून, त्यांना केवळ "अतिरेकी" म्हणत, भारतीय स्वातंत्र्यातील "क्रांतिकारक" आणि अशा "अतिरेक्यां"मधील सीमारेषा धुसर करणे योग्य आहे?
--------------------------------
मी या आणि इतर संकेतस्थळावर केवळ "विकास" याच नावाने वावरतो. त्याच्या मागेपुढे उभ्या (||) आडव्या (=), तिरप्या (\\ //) आदी कुठल्याच प्रकाराच्या रेषा नसतात. त्या अर्थाने माझी कुठेही शाखा नाही. :-)
11 Mar 2010 - 8:13 pm | नितिन थत्ते
अतिरेकी आणि दहशतवादी असा सब्दच्छल होईल अशी कल्पना नव्हती. (विकास लिहित आहेत हे पाहून संशय यायला हवा होता :( ) नाहीतर 'क्रांतिकारक आणि दहशतवादी/*****/#####/ @@@@@/$$$$ यांच्यातली सीमारेषा धूसर असते' असे म्हटले असते.
पंजाब चळवळीच्या काळात या लोकांना फुटीरतावादी (अलगाववादी) असेही म्हतले जात असे.
मला त्याशब्दच्छलात पदायचे नाही. माझ्या दृष्टीने आपल्या उद्दिष्टांसाठी हिंसेचा वापर करणारे सर्व अतिरेकी किंवा दहशतवादी किंवा जे काही म्हणाल ते. (हिंसेच्या वापरात लक्ष्यवेधी/अचूक हिंसा, वाईडस्प्रेड हिंसा या सर्व येतात).
अजून एक वेगळ्या मुद्द्याकडे लक्ष वेधू इच्छितो. चापेकर बंधू, कान्हेरे, भगतसिंग, सावरकर या सगळ्यांना आपण बहुतेक वेळा समान समजत असतो.
त्यापैकी भगतसिंग, सावरकर, सुभाष बाबू आणि इतर सगळे हिंसावादी यांपैकी किती जणांची ब्रिटिशांपासून स्वातंत्र्य ही व्हिजन होती आणि कितीजण विशिष्ट घटनांना निमित्त असणार्या गोर्या अधिकार्यांना मारत होते याचाही विचार व्ह्यायला हवा. उदाहरनार्थ समजा रँडचे शिपाई चपला चालून देवघरात/स्वयंपाकघरात शिरले नसते तर चापेकरांना इंग्रज चालण्यातले होते का? याविषयी मला काही माहिती सापडलेली नाही.
नितिन थत्ते
11 Mar 2010 - 10:47 pm | विकास
अतिरेकी आणि दहशतवादी असा सब्दच्छल होईल अशी कल्पना नव्हती.
आता खुलासा झाला ना? मग तुम्ही आजच्या फुटीरतावाद्यांना (ज्यातील एक वेगळे राष्ट्र मागणारे असू शकतात तर दुसरे, राष्ट्रच उध्वस्त करू इच्छितात असे दिसते), जे निष्पापांना मारत आहेत, अतिरेकी समजता का दहशतवादी?
माझ्या दृष्टीने आपल्या उद्दिष्टांसाठी हिंसेचा वापर करणारे सर्व अतिरेकी किंवा दहशतवादी किंवा जे काही म्हणाल ते.
हे अजिबातच मान्य नाही. कारण हे दोन्ही शब्द वेगळे अर्थ सांगतात. नुसताच शब्द्च्छल नाही...
अतिरेकी म्हणजे extremist याचा Oxford Dictionary मधील अर्थ आहे: noun a person who holds extreme political or religious views. म्हणूनच मी आधीच्या प्रतिसादात गांधीजी पण अतिरेकी होते असे म्हणले.
दहशतवादी म्हणजे terrorist याचा Oxford Dictionary मधील अर्थ आहे: a person who uses violence and intimidation in the pursuit of political aims. (अधोरेखीत मी केले आहे).
त्यापैकी भगतसिंग, सावरकर, सुभाष बाबू आणि इतर सगळे हिंसावादी यांपैकी किती जणांची ब्रिटिशांपासून स्वातंत्र्य ही व्हिजन होती आणि कितीजण विशिष्ट घटनांना निमित्त असणार्या गोर्या अधिकार्यांना मारत होते याचाही विचार व्ह्यायला हवा.
सर्वप्रथम, यातील "हिंसावादी" या शब्दावर माझा आक्षेप आहे. आपण नावे घेतलेल्या प्रत्येकाने भारतीय स्वातंत्र्याचीच आस धरलेली होती. त्यासाठी, म्हणजेच देशाच्या स्वातंत्र्यासाठी, सशस्त्र क्रांतीचा लढा हे पण हत्यार आहे असे त्यांनी धरले कारण ते नुसती चळवळ न समजता, स्वांतत्र्ययुद्धच समजत होते आणि युद्धाला लागणार्या सर्व खेळी करायची त्यांची तयारी होती.
दुर्दैवाने भगतसिंग आणि सुभाषबाबूंनी स्वातंत्र्य पाहीले नाही. "मी जरी मरणार असलो तरी, तुझा दुसरा मुलगा, तुमची काळजी घेईल", असे ज्याच्या बद्दल भगतसिंग फाशीच्या १-२ दिवस आधी त्याच्या आई-वडलांशी बोलला, ते बटूकेश्वर दत्त, (ज्यांनी संसदेत बाँब टाकल्याने जन्मठेप भोगत होते), नंतर बाहेर आल्यावर भारतछोडो आंदोलनामुळे परत एकदा तुरूंगात खितपत पडले होते आणि स्वातंत्र्यानंतर सुटले. उत्तर भारतात एका शिक्षिकेशी लग्न करून, स्वातंत्र्य सैनिकाचे पेन्शनही न मागता (आम्ही काही उपकार केले का?), रहात होते. तुरूंगातील हाल अपेष्टा आणि स्वातंत्र्यानंतरच्या दारीद्र्यातील जीवनामुळे मरण गाठीशी आलेले असताना पैसे नाहीत म्हणून उपचार होत नव्हते. त्याच सुमारास भगतसिंगाची आई हयात असल्याचे कळले आणि जीवाची ओढाताण करून भेटायचा यशस्वी प्रयत्न केला. आई आणि मानलेला मुलगा हे आनंद आणि दु:ख या दोन्हीच्या अश्रूंमधे न्हाऊन निघाले. आईला मुलाच्या तब्येतीची काळजी वाटली आणि आपल्या लाडक्या मुलांच्या गाथा रस्त्यावर सांगत पैसे गोळा करू लागली. कसेबसे उपचाराला दिल्लीला नेण्यात आले. पण तेथे त्यांचे निधन झाले. मग त्यांच्या अंतिम इच्छेनुसार जिथे भगतसिंग त्रयींवर अंतिम संस्कार करण्यात आले त्या रावी नदी काठी रेल्वेतून नेण्यात आले. त्यावेळेस राज्यकर्ते आणि जनता यांनी त्यांचे दर्शनही घेतले आणि त्यांच्या मृतदेहावर हाराबरोबर पैसेही टाकले... स्वतःच्या अस्तित्वाच्या लढ्यासाठी, स्वतंत्र भारतात, कुठली हिंसा त्यांनी केली बरे?
तीच कथा सुभाषबाबूंबरोबरच्या आझाद हिंद फौजेची आणि त्यांच्या समर्थकांची. कुठली हिंसा त्यांनी स्वतंत्र भारतात केली?
सावरकरांनी पण, स्वतंत्र देशात अभिनव भारत या सशस्त्रक्रांतिकारकांच्या संघटनेचे साग्रसंगीत विसर्जन केले. का? कारण आता भारत स्वतंत्र झाला आहे, आता शस्त्र वापरायची नाहीत तर केवळ कायदाच वापरायचा म्हणून. - यात कुठली हिंसा दिसते?
थोडक्यात "हिंसेसाठी हिंसा" अशी वृत्ती नसल्याने त्याला "हिंसावादी" म्हणणे नुसते अयोग्यच नाही तर अन्यायी वाटते.
आता राहता राहीला प्रश्न व्हिजनचा. वरच्यांना होती हे नक्कीच. अजून कुठली नावे टाका, आपण बोलत राहू...
आता अहिंसावाद्यांबद्दलः (जर कोणी म्हणले की दुसर्या वर्गाचे तिकीट असताना तिसर्या वर्गात टाकल्यामुळे ती आली तर त्याला काय उत्तर देयचे ते मला माहीत नाही, पण) गांधीजींना स्वातंत्र्याची व्हिजन होती हे माझ्या लेखी निर्विवाद आहे. मात्र, तुम्हाला काय म्हणायचे आहे की इतर सगळ्या गांधीवाद्यांना स्वातंत्र्याची व्हिजन होती की काय? कधी कधी वाटते की त्यातील मोठ्यांना (नेहरू, पटेल आदी काँग्रेसजनांना) गांधीजींशिवाय पर्याय नव्हता पण व्हिजन नक्कीच होती. पण त्यातीअ समाजधुरीणांना चरखा, बकरीचे दुध याची व्हिजन नाही तर नशा होती असे वाटते.... इतर तथाकथीत अहींसावादी राज्यकर्त्यांनी तर काय नुसते गांधीनामाचा जपच काय तो जनतेसमोर ठेवत भुलवले आणि गरज पडेल तेंव्हा स्वतः जात, पंथ, धर्माच्या हिंसेत उतरले आणि जिथे उतरले नाहीत, तिथे त्या हिंसेला खतपाणी घातले. त्यात व्हिजन कसले आले? तसे व्हिजन जर दिसले असते तर आजही आपण भारतासंदर्भात अनेक मुलभूत प्रश्नांसंदर्भात चर्विचरण करत राहीलो नसतो, कारण हेच अहींसावादी नंतर राज्यकर्ते झाले हे ही वास्तव आहे.
--------------------------------
मी या आणि इतर संकेतस्थळावर केवळ "विकास" याच नावाने वावरतो. त्याच्या मागेपुढे उभ्या (||) आडव्या (=), तिरप्या (\\ //) आदी कुठल्याच प्रकाराच्या रेषा नसतात. त्या अर्थाने माझी कुठेही शाखा नाही. :-)
12 Mar 2010 - 1:46 am | क्लिंटन
कोणाही क्रांतिकारकाने स्वतंत्र भारतात हिंसा केली असती किंवा हिंसेसाठी हिंसा असा त्यांचा दृष्टीकोन होता असे मिपावरील कोणी म्हणेल असे वाटत नाही. निदान थत्ते साहेबांनी मिपावर आजपर्यंत जे लिखाण केले आहे त्यावरून तरी त्यांना तसे म्हणायचे आहे असे वाटत नाही. स्वातंत्र मिळवायला अहिंसात्मक मार्गाचाच वापर करावा असा आग्रह धरणारे गांधीजींना आपण अहिंसावादी म्हणू शकतो त्याच धर्तीवर स्वातंत्र्य मिळवायला वेळ पडल्यास हिंसात्मक मार्गाचा अवलंब करणारे हिंसावादी असा अर्थ थत्तेसाहेबांना अभिप्रेत असणार असे मला वाटते. त्यांचा प्रतिसाद वाचताना मला तरी असेच वाटले आणि क्रांतीकारकांना स्वतंत्र भारतात पण हिंसाचार करायचा होता असे त्या प्रतिसादातून ध्वनित होते असे मला तरी वाटले नव्हते आणि आताही वाटत नाही. असो.
दुसरे म्हणजे थत्ते साहेबांच्या प्रतिसादातील मुद्द्यावर मागेही मी विचार केला होता. चापेकर बंधूंच्या त्यागाचे महत्व नाकारायचा करंटेपणा कोणीही करणार नाही/करू नये. पण रॅंडला मारायच्या मागे नक्की कारण काय होते? त्याचे सैनिक देवघरात बूट घालून जात नसते तर चापेकर बंधूंचे पित्त तितक्याच प्रमाणात खवळले असते का? समजा पुण्यात प्लेग आलाच नसता तरीही चापेकरांनी रॅंडला मारले असते का? कोणास ठाऊक. या जर-तरच्या गोष्टी झाल्या तेव्हा नक्की काहीच सांगता येणार नाही.तरीही मग चापेकरांचे महत्व का आणि कोणते? त्यांनी एक मार्ग दाखवून दिला त्यावर पुढील क्रांतिकार्याची दिशा ठरली. चापेकरांना फाशी दिली त्या रात्री एका पंधरा वर्षाच्या मुलाने तळमळत देवीच्या प्रतिमेपुढे ’देशाच्या स्वातंत्र्यासाठी मारिता मारिता झुंजेन’ अशी प्रतिज्ञा केली. त्या मुलाचे नाव होते विनायक दामोदर सावरकर! आणि नंतरच्या काळात सावरकरांचे क्रांतिकार्याला योगदान सर्वांना माहितच आहे.
आजच आय.आय.एम मध्ये गुगलवर केस स्टडीवर चर्चा झाली. १९९८-९९ मध्ये लॅरी पेजने गुगलची सुरवात केली आणि वर्षभरात काही धोरणात्मक निर्णय घेतले. गुगल आज अनेक बिलियन डॉलरची उलाढाल असलेली कंपनी आहे.पेजने १९९८-९९ मध्ये जे धोरणात्मक निर्णय घेतले तेव्हा त्याला आपली कंपनी अनेक बिलियन डॉलरची उलाढाल करेल असे वाटले असेल का? तसे असायची शक्यता फारच कमी आहे. त्यामुळेच आपली कंपनी एवढी मोठी व्हावी यासाठी १९९८-९९ मध्ये पेजने असे धोरणात्मक निर्णय घेतले असे म्हणणे ही अतिशयोक्ती झाली.पण त्यामुळे त्या धोरणात्मक निर्णयांचे महत्व कमी होते का? तसे नक्कीच नाही कारण ते निर्णय त्याने तेव्हा घेतले नसते तर आज गुगल एवढी मोठी होऊच शकली नसती.
आता हे इथे सांगायचा उद्देश काय?लॅरी पेजला जसे १९९८-९९ मध्ये धोरणात्मक निर्णय घेताना गुगलला २०१० मधील स्वरूप द्यायची आपण सुरवात करत आहोत असे वाटले असायची शक्यता कमी आहे त्याचप्रमाणे चापेकरांना रॅंडला मारायच्या वेळी आपण भारताच्या इतिहासातील महत्वाच्या टप्प्याची सुरवात करत आहोत असे वाटले असायची शक्यता जरा कमीच वाटते. त्यामुळे लॅरी पेजच्या १९९८-९९ मधील निर्णयांचे आणि चापेकरांच्या १८९७ मध्ये रॅंडला मारायच्या कृतीचे महत्व अजिबात कमी होत नाही.
पण आपल्याकडे प्रॉब्लेम असा असतो की असे म्हटले की अनेकदा लोक भावनेच्या भरात जाऊन क्रांतिकारकांचा अपमान वगैरे वगैरे शब्दात हेटाळणा करतात. दिपक पवार म्हणून एक सर (मराठी भाषा संस्थेचे दिपक पवार तेच का हे मला माहित नाही) आम्हाला १०वीत एन.टी.एस ला इतिहास शिकवायला होते. त्यांनी आम्हाला इतिहासातील एक महत्वाचा धडा दिला. तो म्हणजे वस्तुनिष्ठ अभ्यास करताना कधीही भावनेच्या भरात जाऊ नये.तटस्थपणे विचार करून अभ्यास करून आपली मते बनवता आली पाहिजेत. म्हणजे काय? कोणाही ऐतिहासिक व्यक्तीचा अभ्यास करताना ती व्यक्ती महान किंवा दुष्ट असा पूर्वग्रह बाजूला ठेवता आला पाहिजे. ही प्रक्रिया खूपच कठिण असते.पवार सरांचे ऐकूनही मी पण अनेकदा असे भावनेच्या भरात गेलेलो आहे.क्रांतिकारक, सावरकर वगैरे नावे ऐकली की झाले! माझ्या मनात त्यांच्या विषयीचा जो आदर आहे आणि जे स्थान मी त्यांना दिले आहे त्यापेक्षा कणभरही खालची गोष्ट मी ऐकून घ्यायला मी तयार नसे.आणि तसे कोणी विधान केले तर मी पण संतापून जाऊन अशाच प्रतिक्रिया देत असे.असो.
तेव्हा माझे चापेकरांविषयीचे मत थत्ते साहेबांच्या मताप्रमाणेच असेल तर कृपया ’क्रांतिकारकांचा अपमान’, ’फुकटचे स्वातंत्र्य मिळाले म्हणून चढलेला माज’ वगैरे म्हणू नये ही विनंती. बाकी या विषयावर मला या किंवा इतर कोणत्याही शक्य असलेल्या व्यासपीठावर वेळ मिळेल तशी चर्चा करायला आवडेलच.
12 Mar 2010 - 2:47 am | विकास
तेव्हा माझे चापेकरांविषयीचे मत थत्ते साहेबांच्या मताप्रमाणेच असेल तर कृपया ’क्रांतिकारकांचा अपमान’, ’फुकटचे स्वातंत्र्य मिळाले म्हणून चढलेला माज’ वगैरे म्हणू नये ही विनंती.
असला गैरसमज झोपेत देखील नाही. :-) जशी मला तुमच्या विषयी खात्री आहे, तशीच माझ्याविषयीही विश्वास बाळगा, की मी हा वाद घालताना, कुठेही भावनाविवश होऊन घालत नाही आहे.
नितीन यांच्या बाबतीत पण माझा गैरसमज नाही. मात्र त्यांच्या काही विधानांमुळे मला त्यांचे मत नीट समजलेले नाही असे नक्की म्हणू शकेन. त्यात त्यांना हिंसावादी म्हणजे काय हे देखील (त्यांच्या नजरेतून) समजले तर बरे होईल. तसेच काश्मीर-आसामच्या अलगतावादी चळवळींपासून ते मुंबई-दिल्ली आदी शहरात झालेल्या दहशतवादी हल्यांमधे आणि भारतीय क्रांतिकारकांच्या कृत्यात त्यांना साम्य वाटते असे म्हणायचे आहे का हे समजले तरी बरे होईल...
वस्तुनिष्ठ अभ्यास करताना कधीही भावनेच्या भरात जाऊ नये.तटस्थपणे विचार करून अभ्यास करून आपली मते बनवता आली पाहिजेत.
पूर्ण सहमत. म्हणूनच माझे याच विषयावरील येथले मत पाहू शकता.
त्याचे सैनिक देवघरात बूट घालून जात नसते तर चापेकर बंधूंचे पित्त तितक्याच प्रमाणात खवळले असते का?
सर्वप्रथम या विधानातून असे गृहीत धरले गेले आहे की केवळ देवघरात बूट घालून सैनिक गेल्याने चापेकर बंधू खवळले आणि त्यांनी रँडला मारले. वास्तवीक भिषण दुष्काळाच्या पाठोपाठ भिषण प्लेग आला. त्यात ज्यांना संसर्ग झाला असे आणि झाला असे वाटलेले अशा सगळ्यांनाच काही दयामाया न वागवता हाकलले जात होते. मराठ्यात अशा अर्थाचे एक विधान होते की, "प्लेग हा मानवी सत्ताधार्यांच्या जुलमापेक्षा दयाळू वाटत आहे".
अर्थात, तरी देखील आपला आणि नितीनचा मूळ प्रश्न उरतोच की जर प्लेग झालाच नसता तर चापेकरांनी रँडला मारले असते का? माझ्या अल्पमतीप्रमाणे उत्तर आहे, नसते मारले. म्हणूनच हिंसावादी शब्द खटकतो. पण तरी देखील ते स्वातंत्र्ययुद्धात सामील झालेच असते. फक्त कदाचीत वेगळे काही केले असते. आणि हाच त्यांच्यातला आणि सध्याच्या दहशतवाद्यांमधला फरक आहे असे म्हणायचे आहे, जो धूसर नसून ठळक आहे.
तसेच, चापेकर फासावर चढले नसते, अगदी हॅपिली एव्हरआफ्टर राहीले असते, तरी देखील सावरकर निर्माण झाले असतेच. तुम्ही म्हणता, तसे थोडेफार मदनलाल धिंग्रांच्या बाबतीत म्हणता येईल की जर ते सावरकरांना भेटलेच नसते तर? मात्र, रानडे, गोखले, टिळक, आगरकर, आंबेडकर, कर्वे, फुले, सावरकर, बोस, घोष, (वेगळ्या अर्थी) विवेकानंद, आदी अनेक विभुती या कुठल्याही कारणाने (cause) तयार झालेले परीणाम (effect) नाहीत, तर ते स्वयंभू कारणे (cause) आहेत ज्याचा परीणाम (effect) हा त्यांच्या त्यांच्या संदर्भात तयार झालेल्या लोकचळवळीतून दिसून आला आहे असे वाटते.
--------------------------------
मी या आणि इतर संकेतस्थळावर केवळ "विकास" याच नावाने वावरतो. त्याच्या मागेपुढे उभ्या (||) आडव्या (=), तिरप्या (\\ //) आदी कुठल्याच प्रकाराच्या रेषा नसतात. त्या अर्थाने माझी कुठेही शाखा नाही. :-)
11 Mar 2010 - 3:23 pm | क्लिंटन
याविषयी काही दुमत नाही.पंजाबातील दहशतवाद्यांनी (हो ते दहशतवादीच होते) १९९१ च्या लोकसभा निवडणुकांसाठीचे मतदान व्हायच्या आधी लुधियानाजवळ दोन रेल्वेगाड्या थांबवून बेछूट गोळीबार केला होता आणि शंभरेक लोकांना यमसदनी धाडले.बियंत सिंह मुख्यमंत्री झाल्यानंतर त्यांनी के.पी.एस.गिल यांना खऱ्या किंवा खोट्या चकमकीत दहशतवाद्यांना संपवायचे स्वातंत्र्य दिले. त्या काळात मी दूरदर्शनवर बघितलेली एक बातमी माझ्या पक्की लक्षात आहे. पंजाब पोलिसांनी एका सुमारे ६०० लोकांच्या हत्येत सहभाग असलेल्या एका दहशतवाद्याचा ’एन्काऊंटर’ केला होता. अशा कर्दनकाळांची आणि भगतसिंह प्रभृतींची तुलना कशी होऊ शकेल? ते भारतीय क्रांतिकारकांच्या हिंसेच्या जवळचे तर सोडाच पूर्णपणे विरोधातले वाटते.
माझा मुद्दा केवळ बियंत-सतवंत-केहार यांच्याविषयीचा आहे.सुवर्णमंदिरात दहशतवादी घुसले होते हे सत्यच आहे पण ऑपरेशन ब्लू स्टारमध्ये सुवर्णमंदिराची आणि अकाल तख्तची अपरिमित हानी झाली आणि त्यामुळे सामान्य शीखाला त्याचे दु:ख झाले हे पण तितकेच सत्य आहे. तत्कालीन परिस्थिती लक्षात घेता इंदिराजींपुढे वेगळा काही मार्ग होता असेही वाटत नाही. १९८७ मध्ये सुवर्णमंदिरात परत दहशतवादी घुसल्यावर राजीव गांधींनी परिस्थिती वेगळ्या पध्दतीने हाताळली. तसे इंदिराजींना करणे शक्य झाले असते की नाही हा ’जर-तर’ चा भाग झाला.पण सुवर्णमंदिराला झालेल्या हानीमुळे इंदिराजी शीख समुदायातील अनेकांना खलनायिका वाटू लागल्या तर त्यात आश्चर्य वाटू नये. सोमनाथ मंदिराची लूटमार करणाऱ्या गझनीच्या महंमदाला सोमनथचा सूड म्हणून कोणी ठार मारले असते तर त्याला मी दहशतवादी नक्कीच म्हटले नसते उलट त्याला मी मोठा योध्दा आणि वीरपुरूषच मानले असते. त्याच न्यायाने जर शीख समुदायातील काहींना इंदिराजींचे मारेकरी (भिंद्रनवाले नव्हे) संत वाटत असतील तर मला ते समजू शकते. अर्थात मी त्यांना संत नक्कीच म्हणत नाही. माझ्या दृष्टीने ते दहशतवादीच आहेत.कारण त्यांनी भारताच्या पंतप्रधानांची हत्या केली. पण काहींच्या मते ते संत आहेत कारण त्यांनी सुवर्णमंदिराच्या पावित्र्याची पायमल्ली करणाऱ्या व्यक्तीला संपवले.’धूसर रेषेमागचा’ मूळ मुद्दा हाच आहे. आपण कोणत्या बाजूला आहोत यावर आपले मत अवलंबून असते. यावरून मी चापेकर बंधूंसारख्या क्रांतिकारकांची दहशतवाद्यांबरोबर तुलना करत आहे असा अर्थ कसा काय निघतो?मी नक्की कोणत्या बाजूला आहे हे मला पक्के ठाऊक आहे आणि त्याबद्दल कोणताही संभ्रम माझ्या मनात नाही. (असा संभ्रम स्वयंघोषित मानवाधिकारांच्या पुरस्कर्त्यांना पडला आहे असे त्यांच्या वर्तणुकीवरून वाटते). त्यामुळे माझ्यासाठी चाफेकर बंधू क्रांतिकारकच आहेत.पण त्यामुळे धूसर रेषेचा मुद्दा बाद होत नाही.
परत तोच मुद्दा निघत आहे.मदनलाल धिंग्राने एकट्या कर्झन वायलीला उडवले पण इतर कोणाच्या केसालाही धक्का लावला नाही. तसेच मदनलालने किंवा इतर क्रांतिकारकांनी दिसला इंग्रज की घाल गोळी असेही केलेले नव्हते. तरीही मुद्दामून कर्झन वायलीला संपवले म्हणजे कर्झन वायलीने भारताचा अपमान/नुकसान केले असले पाहिजे. त्याने नक्की काय केले हे माझ्या या क्षणी लक्षात नाही कारण ते वाचन करून बरीच वर्षे झाली आहेत.पण आपण मदनलाल धिंग्राचे समर्थन करताना म्हणतो की त्याने भारताचा शत्रू कर्झन वायलीलाच उडवले इतर कोणाच्याही केसालाही धक्का लावला नाही. त्यापुढे जाऊन आपण असे म्हणतो की मदनलालला त्याने केलेल्या कृत्याचा अजिबात पश्चात्ताप झाला नव्हता आणि तो स्वत:हून पोलिसांच्या स्वाधीन झाला. पुढे मदनलाल हसत हसत फासावर गेला.
दृष्य क्रमांक १: नथुराम गोडसेने ५५ कोटींची पाकिस्तानला दक्षिणा देऊन भारताचा शत्रू-- पाकिस्तानला मदत करणाऱ्या, मुस्लीम लीगचा प्रत्यक्ष कृतीदिन चालू होता त्यावेळी शांतपणे बसलेल्या पण हिंदू प्रतिकाराला उभे राहिल्यावर उपोषणाला बसून हिंदूंना शस्त्र म्यान करायला लावणाऱ्या आणि म्हणूनच हिंदूंचे शत्रू असलेल्या महात्मा गांधींची हत्या केली. नथुरामने केवळ गांधींनाच मारले. इतर कोणाच्या केसालाही धक्का लावला नाही. गांधींना मारल्यानंतर नथुरामने बंदूक टाकून दिली आणि तो स्वत:हून पोलिसांच्या स्वाधीन झाला. पुढे तो हातात भगवद्गीता घेऊन हसत हसत फासावर गेला.
दृष्य क्रमांक २: बियंत सिंहने आमच्या सुवर्णमंदिरावर हल्ला करून त्याच्या पावित्र्याची पायमल्ली करणाऱ्या, आमच्या अकाल तख्ताचा, आमच्या धर्मग्रंथाचा अपमान करणाऱ्या इंदिरा गांधींवर रिव्हॉल्व्हरमधून ५ गोळ्या झाडल्या. इंदिराजींबरोबर त्यावेळी आर.के.धवन आणि इतर काही लोक होते. त्यापैकी कोणाच्या केसालाही त्याने धक्का लावला नाही.इंदिराजी जमिनीवर पडल्यावर सतवंत सिंहने ’आमच्या धर्माचा शत्रू’ वाचायची थोडीही शक्यता बाकी राहू नये म्हणून त्यांच्यावर स्टेनगन मधून अजून २५ गोळ्या झाडल्या. गोळ्या झाडल्यानंतर बियंत सिंहने ’आम्हाला काय करायचे ते आम्ही केले आता तुम्हाला काय करायचे ते तुम्ही करा’ असे म्हणत हातातील बंदूक खाली टाकली. दरम्यान गोळीबाराचा आवाज ऐकून तिथे आलेल्या (दिल्ली पोलिसांच्या की लष्कराच्या?) जवानांच्या गोळीबारात बियंत सिंह ठार झाला तर सतवंत सिंह जखमी झाला. पुढे सतवंत सिंह आणि केहार सिंह (हसत हसत का ते माहित नाही) फासावर गेले.
दृष्य क्रमांक ३: देवाने ज्यूंना दिलेल्या भूमीत पूर्ण ज्यूंचे राज्य स्थापन केलेले असतानाही पॅलेस्टिनी लोकांबरोबर काही कारण नसताना शांततेच्या वाटाघाटी करून ऍब्रॅहॅम आणि मसीहा आणि तत्सम संतपुरूषांच्या ओल्ड टेस्टॅमेन्टमधील विधान खोटे पाडणाऱ्या पाखंडी यित्झॅक राबीनना आमच्या यिगाल आमीरने ठार मारले.त्याने इतर कोणाच्या केसालाही धक्का लावला नाही.आज तो न्यायालयाने दिलेली जन्मठेपेची शिक्षा विनातक्रार भोगत आहे.
माझा प्रश्न: आपण मदनलाल धिंग्राचे ज्या आधारावर समर्थन करतो तो आधार आणि वरील तीन दृष्यांमध्ये नथुराम, बियंत-सतवंत-केहार आणि यिगाल आमीरचे समर्थक ज्या आधारावर समर्थन करतात तो आधार यात नक्की फरक काय?
आपल्याला असे वाटते याचे कारण आपल्या घरादारावरून इस्त्राएलचे बुलडोझर फिरलेले नाहीत. आपल्या जमिनीवरून आपल्यालाच हुसकावून लावून कोणी राहत नाही.दूरून उभे राहून मजा बघायला काही त्रास पडत नाही. पण ज्याला भोगायला लागते त्यालाच त्याच्या यातना कळतात. एखादा पॅलेस्टिनी मनुष्य-- ज्याचे घरदार इस्त्राएलने उध्वस्त केले त्याला कसले महत्व अधिक असणार? स्वत:चे घर परत मिळवायला, त्याच्या बायकामुलांना ठार मारलेल्यांवर सूड उगवायला आणि त्याच्या जमिनीवर जो कोण राहात आहे त्याला हुसकावून लावायला की आपण सगळेच करतो तसे भरल्या पोटाचे विचार करायला? असा माणूस मानवी बॉम्ब बनला तर त्यात आश्चर्य ते काय?
+१
मग त्यांनी दुसरे काय करायला हवे होते? आंदोलने, सत्याग्रह आणि उपोषणे करून त्यांना त्यांची घरेदारे परत मिळणार होती का?
मागील प्रतिसादात म्हटल्याप्रमाणे ’हे सामान्यच माझ्या घरावर कब्जा करून राहात आहेत आणि इतर कोणासाठीही ते निरपराध असले तरी माझ्यासाठी ते कर्दनकाळच आहेत’ असे पॅलेस्टाईनमधील सामान्य युवकास वाटले तर त्यात काय चुकले? ’त्यांचे ’सामान्य’ नागरिक (जे माझ्या लेखी अजिबात निरपराध नाहीत), पोलिस आणि इतर लोक मरू नयेत म्हणून मी देशोधडीला का लागावे? माझ्या पुढच्या पिढ्यांना घराच्या उबदार छत्रापासून का वंचित ठेवायचे?मोठा अजब न्याय झाला. ज्यांनी माझी जमिन हडपली, घरदार उध्वस्त केले ते लोक सामोपचाराची भाषा ऐकत नसतील, त्यांच्या लष्करी सामर्थ्यापुढे माझा अजिबात टिकाव लागणार नसेल तर माझ्यापुढे मानवी बॉम्ब बनण्याशिवाय दुसरा पर्याय नाही’ असे ही त्या सामान्य युवकास वाटले तर त्यात त्याची चूक काय?
अवांतर: पूर्णपणे आलिप्त विचार केला तर इस्त्राएल देशाची स्थापनाच मुळात एक sacrilege आहे असे मला वाटते. तरीही आंतरराष्ट्रीय राजकारणात असा आदर्शवाद चालत नाही आणि त्यातील गुंतागुंतीचा विचार करता मला पॅलेस्टाईनपेक्षा इस्त्राएलच अधिक जवळचे वाटते आणि म्हणून एक भारतीय नागरिक म्हणून माझा पाठिंबा इस्त्राएललाच. (माझ्या पाठिंब्याला कोण विचारत नाही ही गोष्ट अलहिदा).
कदाचित दहशतवादी हा शब्दप्रयोग चुकीचा आहे. पण अमेरिकेच्या सी.आय.ए ने फिडेल कॅस्ट्रोंना मारायचे एकूण < a href="http://en.wikipedia.org/wiki/Fidel_Castro#Assassination_attempts"> ६३८ वेळा प्रयत्न केले. दहशतवादी नाही तरी अमेरिका कॅस्ट्रोंना ’एक संपविण्यायोग्य कटकट’ नक्कीच मानते.
10 Mar 2010 - 11:30 pm | पक्या
>>दोन्हीतली सीमारेषा फार धूसर असते.
आपल्या म्हणण्यात तथ्य असले तरी नियमाला अपवाद ह्या न्यायाने
स्वा. सावरकर , भगतसिंग, राजगुरू, सुखदेव, वासुदेव फडके, चापेकर बंधू, ........... अशांच्या बाबतीत हे वाक्य अजिबात लागू पडत नाही.
जय महाराष्ट्र , जय मराठी !
11 Mar 2010 - 2:33 am | क्लिंटन
That's the point. असे आपल्याला वाटते याचे कारण तुम्हाला स्वा.सावरकर, भगतसिंग, राजगुरू, सुखदेव, वासुदेव फडके,चापेकर बंधू, ............ हे आपले वाटतात (आणि मलाही ते आपलेच वाटतात याविषयी कोणालाही शंका नको).
त्याच धर्तीवर खलिस्तानवाद्यांना बियंत-सतवंत-केहार, पॅलेस्टिनींना हमास आणि कट्टर इस्त्राएलींना यित्झॅक राबीनची हत्या करणारा यिगाल आमीर आपले वाटतात. यिगाल आमीरनेही केवळ राबीनचीच हत्या केली पण इतरांना काही दुखापत केली नव्हती. तरीही तो राबीन समर्थकांसाठी क्रांतिकारक बनत नाही.आपल्यासाठीही (इंदिराजींच्या कारभारावर काहीही मतेमतांतरे असली तरी) बियंत-सतवंत-केहार हे दहशतवादी असतात पण त्यांनाच संतत्व बहाल करणारे लोकही आहेतच. माझ्या म्हणायचा (थत्तेसाहेबांच्या मुद्द्याच्या समर्थनार्थ) अर्थ इतकाच की कोणाला दहशतवादी म्हणावे आणि कोणाला क्रांतिकारक हे आपल्याला कोण जवळचे वाटतात यावर अवलंबून असते त्याअर्थी सीमारेषा धूसर असते. आणि आपल्या प्रतिसादात ते तुम्ही सावरकर प्रभृतींना ’आपले’ म्हणून एका अर्थी मान्य केले आहे.
याचा अर्थ आपणही अरूंधती रॉयप्रमाणे काश्मीरात चालू असलेल्या प्रकाराला दहशतवाद म्हणणे टाळून त्यांना स्वतंत्र देशाची खिरापत वाटावी का? तर तसे अजिबात नाही. अशा प्रवृतींचा मनस्वी तिटकारा मला आहे. सांगायचा उद्देश इतकाच की क्रांतिकारक आणि दहशतवादी याची ’युनिव्हर्सल’ व्याख्या होऊ शकणार नाही.कोणाला क्रांतिकारक म्हणावे आणि कोणाला दहशतवादी म्हणावे हे ज्याच्या त्याच्या वर अवलंबून असते.
11 Mar 2010 - 3:13 am | पक्या
अहो पण स्वातंत्र्याची अवाजवी मागणी आणि स्वातंत्र्याची न्याय्य मागणी ह्यातही फरक आहेच ना.
स्वातत्र्याच्या न्याय्य मागणी साठी लढणारे हे क्रांतीकारकच होत. कोणाचा दृष्टीकोन कसाही असला तरी जे सत्य आहे ते कसे बदलेल?
जय महाराष्ट्र , जय मराठी !
11 Mar 2010 - 8:57 am | नितिन थत्ते
अवाजवी आणि न्याय्य मागणी हे ही सापेक्षच असते.
भारतीयांची स्वातंत्र्याची मागणी ब्रिटिशांना अवाजवीच वाटणार यात काय संशय?
(काही ब्रिटिशांना ती त्यावेळीही न्याय्य वाटत असेल. अशा ब्रिटिशांना इतर ब्रिटिश विचारजंत म्हणत असावेत का? :? )
नितिन थत्ते
11 Mar 2010 - 3:16 am | पक्या
प्रतिसाद चुकून ३ दा पडल्याने संपादित
-जय महाराष्ट्र , जय मराठी !
19 Apr 2012 - 10:05 am | नगरीनिरंजन
एकदा कुंपण (पक्षी देश, सरकार, समाज, कायदा वगैरे इ.इ.) आहे हे मान्य केले म्हणजे सीमारेषा धूसर कशी होईल? कुंपण हीच दोहोंतली ठसठशीत सीमारेषा नाही काय?
पण अखिल मानवतेच्या पातळीवरचा दृष्टीकोण घेतला तर दुसर्या माणसावर कोणत्याही प्रकारचा जुलूम वा बळजबरी करणारा कोणिही अतिरेकीच होय. तेव्हा कुंपण नसल्याने सीमारेषा नसतेच, धूसर वगैरे असायचा प्रश्नच नाही.
9 Mar 2010 - 9:00 pm | मराठे
हा चित्रपट आपलीमराठी वर नसून राजश्रीमराठी वर आहे. (चूक दुरुस्त केली आहे.) दुवा देतोय.
http://www.rajshrimarathi.com/Movie/22-June-1897#
9 Mar 2010 - 11:13 pm | पक्या
मिपावर या घटनेविषयी आधी चर्चा झालेली आहे.
हे पहा - http://misalpav.com/node/2225
जय महाराष्ट्र , जय मराठी !
9 Mar 2010 - 11:26 pm | अमेरिकन त्रिशंकू
त्यावेळचे "क्रांतिकारक" आणि आजकालचे "अतिरेकी" ह्यात उगाचच साम्य वाटत होतं.
आपला तो क्रांतिकारक आणि दुसर्याचा तो अतिरेकी..
दृष्टीसापेक्ष गोष्टी आहेत.
10 Mar 2010 - 9:50 am | Dipankar
राजकारण हे कधीच पट्टी व पेन्सील घेऊन मारलेल्या मारलेल्या रेषे सारखे सरळ नसते, हि गोष्ट क्रांतिकारी हि गोष्ट अतिरेकी असे एका रेषेत दुभागता येत नाही. आपली बाजू कोणती हे पहिले नक्की करावे. कदाचित जनरल डायर ला इंग्लिश लोक कर्तव्य तत्पर मानत हि असतील पण आपण त्याला क्रूरकर्मा म्हणाले पाहिजे.
चाफेकरांनी ज्या लोकांसाठी(भारतीयांसाठी) हि गोष्ट केली त्यात देश बांधवाचे हित हाच उद्देश होता. आणि मी भारतीय म्हणवत असल्याने चाफेकर हे माझ्या साठी तरी क्रांतिकारकाच होत. आपण भारतीय म्हणवत असू आणि क्रांतीकारकांना अतिरेकी म्हणत असू तर तो पराधाजीरणे पणा आहे
उद्या उठून कोणी असेही म्हणेल गांधीजी हे मानवतावादी नव्हते कारण त्यांनी भारतातील अनेक इंग्लिश लोकांचा रोजगार भारत स्वतंत्र झाल्याने नाहीसा केला, इंग्लीश लोकांना मिळणाऱ्या पैश्याचा मार्ग बंद केला.
10 Mar 2010 - 12:39 pm | वाहीदा
हा चित्रपट आमच्या गावी वाईत चित्रीत केला होता असे ऐकण्यात आहोत
असो वाईच्या आठवणी ताज्या झाल्या !! धन्यवाद !!
दुष्काळ व प्लेगच्या साथीत जुलमाचा कहर करणा-या कॅप्टन रँड व लेफ्टनंट आयर्स्टना यमसदनी धाडणा-या दामोदरपंत चापेकरांना १८ एप्रिल १८९८ रोजी फाशी देण्यात आले. त्यांच्या बलिदानाची आठवण करुन देणारी ही चापेकर बंधूंच्या पराक्रमाची कहाणी...
मुंबई इलाख्यात दुष्काळ व प्लेगने थैमाल घातले असताना व्हाइसरॉय लॉर्ड एल्जिनसकट सारे वरिष्ठ सरकारी अधिकारी मेजवान्या झोडीत. शिकारीचा आनंद लुटीत दौरे काढीत होतेच. व्हाइसरॉयसाहेब एखाद्या ठिकाणी गेले की तेथे त्यांच्या स्वागत समारंभानिमित्त रोषणाई केली जात असे , दारुकाम होत असे , नाचाचे कार्यक्रम आयोजित केले जात असत.
२१ व २२ जून १८९७ ला महाराणी व्हिटोरिया राज्यावर आपल्याला साठ वर्षे झाली म्हणून हीरक महोत्सव साजरा करण्याचा निर्णय घेण्यात आला ; त्यामुळे केसरीने महाराणी सरकारचा जयजयकार ’ या शीर्षकाचे संपादकीय लेख लिहून , ही वेळ भारतात तरी ज्युबिली करण्याची नव्हे ’ असे बजावले.
२२ जून १८९७ ला केसरीकर्त्यांनी हा इशारा दिला , त्याच दिवशी दामोदरपंत चापेकर व त्यांच्या बंधूंनी मध्यरात्री गणेशखिंडीतील गव्हर्नर साहेबांकडची मेजवानी आटोपून घोडागाडीतून शहरात परतणा-या कॅप्टन रँड व लेफ्टनंट आयर्स्टवर गोळ्या झाडल्या. व चापेकर बंधू निसटले. आयर्स्ट ताबडतोब मृत्यूमुखी पडले तर रँडसाहेब काही दिवसांनी मरण पावले.
या प्रकरणात टिळक व सरदार नातू बंधू या तिघांना पुण्याबाहेर काढले तर खुनाच्या गुन्ह्याबाबत महत्त्वाची माहिती मिळण्याची शक्यता आहे. ’ असे मुंबईचे गव्हर्नर लॉर्ड सँडहर्स्ट आणि त्यांचे सहकारी जे. न्यूजंट व इ. सी. के ऑलीव्हंट यांनी २९ जुलै , १८९७ रोजी भारतमंत्री जॉर्ज हॅमिल्टन यांनी लिहिलेल्या पत्रात म्हटले होते. त्या आधी २७ जुलैस टिळकांना राजद्रोहाच्या आरोपावरून मुंबईस अटक करण्यात आली आणि २८ जुलैस नातू बंधूंना पकडण्यात आले.
दामोदरपंत चापेकर टिळक सुटण्याआधीच फाशी गेले होते , तर दीड वर्ष अज्ञातवासात काढल्यानंतर १७ डिसेंबर १८९८ रोजी बाळकृष्णपंत चापेकर पोलिसांच्या हाती लागले. टिळक पुण्यास परतल्यानंतर दोनच दिवसांनी ८ फेब्रुवारीस रोत्री वासुदेवराव चापेकर व महादेव विनायक रानडे यांनी गणेश शंकर द्रवीड व रामचंद्र शंकर द्रवीड या चुगलखोर बंधूंना गोळ्या घालून ठार केले.
वीस हजार रुपये बक्षिसाच्या आशेने द्रवीड बंधू फितूर झाले होते. द्रवीड बंधूंना या अपराधाबद्दल आपण देहांत प्रायश्चित देणार असल्याची कल्पना वासुदेवरावांनी खंडेराव साठे यांच्यामार्फत वासुकाका जोशींना दिलेली होती. याचा अर्थ हा बेत टिळकांनाही आधीच कळला असावा.
~ वाहीदा
11 Mar 2010 - 9:01 pm | II विकास II
हा चित्रपट आमच्या गावी वाईत चित्रीत केला होता असे ऐकण्यात आहोत
असो वाईच्या आठवणी ताज्या झाल्या !! धन्यवाद !!
== माहीतीबद्दल धन्यवाद
13 Mar 2010 - 2:51 pm | विसोबा खेचर
वाहिदा, चांगली माहिती..
तात्या.
18 Apr 2012 - 4:24 pm | कलादालन
(जुनाच धागा वर काढीत आहे)
क्रांतीकारक दामोदर चाफेकर यांचा आज बलीदानदिन ......
भारतमातेला परदास्यातून मुक्त करण्यासाठी अत्याचारी इंग्रजांवर गोळ्या झाडणारे चापेकर बंधू !
त्यांच्या या असीम त्यागास आणि शौर्यास अभिवादन .
वहीदा, धन्यवाद या माहीतीसाठी .
10 Mar 2010 - 9:11 pm | मराठे
फार छान चर्चा झाली. चित्रपटाच्या अन चापेकर बन्धुंच्या माहितीबद्धल धन्यवाद. क्रान्तिकारक आणि अतिरेकी ह्यांची तुलना होउ नये हे एकदम मान्य. (पण चित्रपट बघताना होत होती... कदाचीत फॅक्ट्स अगदिच जसेच्या तसे समोर ठेवल्यामुळे आणि आपण कोणत्या परिस्थितीत ते बघतो त्यामुळे असेल... असो..)
अजुन एक भाग त्यात आहे ज्यामुळे ब्राह्मण समाजाबद्धल इतर महाराष्ट्रिय लोकांची काय मतं होती ते समजतं.
प्रसंगः चापेकरांना शिपायाची मारहाण. त्यात शिपायाच्या तोन्डी एक संवाद आहे "पेशवाइ बुडवली तेव्हडं पुरे नाही का झालं" ... ह्या अर्थी.
हा प्रसंग सुद्धा समाजमनाचा वेगळाच चेहरा दाखवतो. ह्या शिपायाला (प्रातिनिधिक) एकुणच ब्राह्मणांविषयी कमालीचा संताप आहे... "इन्ग्रजांविषयी नाही". इथे पुन्हा इन्ग्रजांच्या "फोडा आणि राज्य करा" पॉलिसी चा प्रत्यय येतो.
10 Mar 2010 - 11:04 pm | पक्या
>> क्रान्तिकारक आणि अतिरेकी ह्यांची तुलना होउ नये हे एकदम मान्य. (पण चित्रपट बघताना होत होती... कदाचीत फॅक्ट्स अगदिच जसेच्या तसे समोर ठेवल्यामुळे आणि आपण कोणत्या परिस्थितीत ते बघतो त्यामुळे असेल... असो..)
कमाल आहे तुमची. तुम्हीच मान्य करीत आहात की सिनेमात फॅक्ट्स अगदी जसेच्या तसे समोर ठेवले गेले. तर मग चापेकरांच्या बाबतीत क्रान्तिकारक की अतिरेकी हा प्रश्न का पडावा बरे? रॅड हा एक दया माया नसणारा क्रूर अधिकारी होता. पुण्यात प्लेग ची साथ आलेली असताना त्याने ज्या पध्दतीने परिस्थिती हाताळली ती चीड आणणारीच होती. आणि ते सिनेमात पण दाखवले आहेच.
चापेकर बंधूंच्या साहसाला आणि त्यागाला आमचा सलाम.
जय महाराष्ट्र , जय मराठी !
11 Mar 2010 - 1:56 pm | चिंतातुर जंतू
यात इंग्रजांच्या नीतीपेक्षा पेशवाईविषयीची ब्राह्मणेतरांची बाजू मांडली आहे, असे वाटते. शिवशाहीतील सर्वसमावेशकता पेशवाईत नव्हती, त्यामुळे ब्राह्मणेतरांना पेशवाई प्रिय नव्हती. त्याऐवजी त्यांना ज्यात अधिक संधी मिळत होती, असे ब्रिटिश राज्य त्यांना पसंत होते. यातून मार्ग काढल्याशिवाय स्वातंत्र्यलढ्याला सर्वसामान्यांचा पाठिंबा मिळणार नाही, असे येथे (चित्रपटात) सुचवायचे असावे. याचा परामर्ष (उदाहरणार्थ) राजारामशास्त्री भागवतांनी घेतला होता आणि हे जुने वाद मिटवून सकलजनवादी महाराष्ट्रधर्म मांडला होता. अधिक माहितीसाठी सदानंद मोरे यांचे राजारामशास्त्री भागवतांविषयीचे लिखाण वाचावे.
- चिंतातुर जंतू :S
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" || ५ ||
11 Mar 2010 - 12:11 pm | Pain
@ विकास आणि मदन बाण
छान केलत =D>
12 Mar 2010 - 5:33 am | हुप्प्या
अतिरेकी आणि क्रांतिकारक यांच्यातली सीमारेषा धूसर असल्याचे वर म्हटले आहे. जर पूर्ण तटस्थपणे विचार केला तर ती सीमारेषा धूसर असू शकेल. जसे नायजेरियात मुस्लिम आणि ख्रिश्चन लोकांमधे जोरदार हिंसाचार चालतो. त्यांच्यात कोण बरोबर आणि कोण चूक हे मला ठरवणे अवघड जाईल कारण मी तिर्हाईत आहे. परंतु चाफेकरांच्या बाबतीत मी इतका त्रयस्थ होऊ शकत नाही. ज्यांच्यावरील अत्याचारामुळे चाफेकर खवळून उठले त्यात कदाचित माझे नातलगही असतील. उलट ते अत्याचार करणारे इंग्रज हे माझ्यालेखी अगदी परके. त्यामुळे मी चाफेकरांना अतिरेकी मानणार नाही. क्रांतिकारकच मानणार आणि त्यांच्यातला आणि अतिरेक्यांतला फरक हा धूसरबिसर काही नसून चांगला ठसठशीत आहे.
आता बिन लादेनचे उदाहरण घेऊ. त्याच्या मते त्याने काफिरांविरुद्ध युद्ध घोषित केले आहे. घरची अफाट श्रीमंती असताना ती सोडून तो अफगाणिस्तानच्या डोंगरात रानोमाळ भटकतो आहे. तमाम काफीर आणि त्यांना मदत करणारे हे तो शत्रु मानतो. मग त्यात मुलेबाळे बायका हे सगळे येतात. त्यांना ठार करणे, त्यांचे नुकसान करणे आणि शुद्ध इस्लामवर आधारित राज्य आणणे हे त्याचे स्वप्न. त्याकरता तो सगळे जीवन पणाला लावतो आहे. हा इसम अगदी साधा राहतो. श्रीमंत अरब लोक करतात तसा थाटमाट हा आजिबात करत नाही. कदाचित कुण्या धार्मिक तालिबान्याला हा महात्मा वाटत असेल. क्रांतिकारक वाटत असेल. पण माझ्या लेखी हा अतिरेकीच कारण मी शेवटी एक काफीर. मला मुस्लिम व्हायची आजिबात इच्छा नाही. मला माझ्याभोवतीचे तमाम जग कडवे मुस्लिम व्हावे असे आजिबात वाटत नाही. त्यामुळे बिन लादेन हा माझ्या लेखी अतिरेकीच. क्रांतिकारक नाही. त्याच्यात आणि क्रांतिकारकात माझ्या मते अगदी ठळक फरक आहे. कारण क्रांतिकारक माझ्याकरता आणि माझ्या देशबांधवांकरता लढले. बिन लादेनच्या मते मी एक तद्दन काफीर आहे. मी मेलो तर त्याला आनंदच आहे.
13 Mar 2010 - 11:57 am | नितिन थत्ते
बरोबर आहे. म्हणजेच बिन लादेन हा अतिरेकी कि क्रांतिकारक हे तुम्ही किंवा कोणीही आपण काफिर आहोत की नाही या आधारेच ठरवणार आहे.
जसा तुमच्यासाठी लादेन हा अतिरेकी आहे तसेच चापेकर बंधू सौ. रॅण्डच्या दृष्टीने काय असणार आहेत. त्यातून सौ रॅण्डना ते क्रांतिकारक वाटले तर सौ रॅण्डना बहुतेक बाकीचे ब्रिटिश विचारजंत म्हणतील.
(खालचा भाग स्पेसिफिक तुमच्यासाठी नसून जनरल लोकांसाठी)
एकूण चापेकर/किंवा तशांना क्रांतिकारक म्हणण्याच्या आणि सतवंतसिंग आदींना दहशतवादी म्हणण्यामागे "चापेकरांची बाजू न्याय्य असू शकेल असे सौ रॅण्डना वाटताच कामा नये" असा काहीसा सूर दिसतो. तसे काही रॅण्डनी म्हटले तर तो बुद्धिभेद आहे असा आग्रह दिसतो.
(डिस्क्लेमरः येथे रॅण्डच्या पत्नी म्हणून सौ रॅण्ड असे म्हटले आहे. सौ शब्द अयोग्य आहे वगैरे फाटे फोडू नयेत.)
नितिन थत्ते
12 Mar 2010 - 9:21 am | अर्धवटराव
---त्यावेळचे "क्रांतिकारक" आणि आजकालचे "अतिरेकी" ह्यात उगाचच साम्य वाटत होतं
बुद्धीवाद्यांचा हाच बुद्धीभंश भारताला नेहमी नडला. याला भावनीक गल्लत पण म्हणता येत नाही, कारण अशी विधाने जे लोक करतात ते बरेचदा नेत्रुत्व करत असतात.
कसा सूर्य अंधाराच्या वाहतो पखाली | आयुष्याच्या मशाली तर पेटतच राहतील हो... पण त्यात उगाच आमच्या सारखा सामन्य माणूस भाजून निघतो. हे टाळणे शक्य नाहि का ??
(बुद्धीप्रामाण्यवादी) अर्धवटराव
-रेडि टु थिंक
13 Mar 2010 - 6:51 pm | प्रियाली
मस्त चर्चा!
आपला तो बाब्या दुसर्यांचे ते कार्टे अशी म्हण उगीच प्रसिद्ध नाही. ;)
18 Apr 2012 - 7:15 pm | चौकटराजा
हा चित्रपट आपलीमराठी वर नसून राजश्रीमराठी वर आहे. (चूक दुरुस्त केली आहे.) दुवा देतोय.
तुमची मतं ऐकायला आवडतील.
वरील दोन्ही ओळींसाठी आपल्या दिलदारीला सलाम ! चूक मानणे व दुरूस्त करणे हे मोठ्या मनाचे लक्षण आहे.
दुसर्याची मते वेगळीही असणारच म्हणून ती ऐकणार नाही हा हेका धरणारी हेकटप्रजा मिपावर आहे याचे दु:ख होते.पण आपल्यासारखे समानधर्मा मिळाले की आनंद होतो. काही दिवस निराश न होता मिपावर तग धरा हळूह्ळू आपल्या सारखे मित्र येथे भेटतील हा निशिकांत
यांचा सल्ला अनमोल वाटतो तो त्यासाठी. असो . या चित्रपटाचे चित्रीकरण मी रात्री बारा वाजता देखील पाहिले आहे वाई येथे असताना.त्यावेळी
आजचा आदरणीय नट रविंद्र मंकणी एकदम तरूण होता. नट होण्याचे स्वप्न बाळगून होता.माझा एकेकाळचा मित्र खरे हा ही त्या चित्रपटात होता.
आपल्या धाग्याने वाईतील रम्य दिवसांची आठवण आली. धन्यवाद !
19 Apr 2012 - 12:10 am | बॅटमॅन
पूर्ण चाफेकर-रँड &आयर्स्ट-द्रविड बंधू प्रकरणाबद्दल अतिशय डीटेल्ड पुस्तक म्हणजे वि श्री जोशी यांचे "कंठस्नान आणि बलिदान" हे होय. नावावर जाऊ नका, खरंच चांगलं पुस्तक आहे.
अवांतरः
मी माझ्या काही मित्रांसोबत (महादेव विनायक रानडे यांनी वासुदेव चाफेकरांसोबत मिळून ठार मारलेल्या)गणेश द्रविड यांची नात डॉ.मंदाकिनी द्रविड यांना भेटलेलो आहे- बाई ग्रेट आहेत एकदम, हॅट्स ऑफ. त्यांचे वय ८१ होते साधारण २००८-०९ च्या सुमारास. आणि सत्तरीच्या पुढे त्यांनी जिद्दीने पी एच डी चा अभ्यास केला आणि प्रबंध लिहिला नर्सिंग संबंधी. त्या नर्स होत्या काही वर्षे ससून मध्ये.त्यांनी त्यांच्या लहानपणच्या आठवणी सांगितल्या, त्यात बरेच लोक देशद्रोही म्हणून जवळ करीत नसत, आणि त्यामुळे बराच त्रास झाला, असे सांगितल्याचे आठवते. बाकी काही असो, बाईंची चिकाटी आणि ऋजुता लक्षात राहिली. या पूर्ण प्रकरणाबद्दल खरे तर एक वेगळा लेख होऊ शकतो, मिपावरती आधी कोणी लिहिल्यास माहिती नाही. असो. पाहू कधी योग येतो.
19 Apr 2012 - 8:55 am | प्रचेतस
त्या लेखाची वाट पाहातो आहे.
लवकर येऊ द्यात.
19 Apr 2012 - 10:16 am | प्रास
हेच म्हणतो बॅटमॅन...!
19 Apr 2012 - 12:24 pm | वाहीदा
मंदाकिनी द्रविड काही काळ येरवडा मानसिक रुग्णांच्या हॉस्पिटल मध्ये काम करित होत्या.
त्यांनी मानसिक विकलांग , अविवाहीत माता, अपंग, drug addiction and disaster management,
abandoned babies, adoption, marital discord, alcoholism यासाठी पण खुप कामे केली आहेत
त्यांचे एक अनाथ मुलांचे आश्रम पण आहे जे दत्तकयोजना राबविते - 'श्रीवत्स्य' असे काहीसे नाव आहे
वयाच्या ८१ व्या वर्षी पिएचडी मिळवणर्या त्या एकट्याच असतील बहुतेक . ते मिळविणे पण एक संग्रामच होता असे त्यांच्या मुलाखतीत ऐकले होते. कारण पुणे विद्।यापिठातील महान क्लार्क्स !
it was an endless wait for the declaration of result from the University,
त्या गणेश द्रविडांची नात आहे हे माहीत नव्हते. मला वाटते पानशेत धरणात पूरामुळे अफेक्टेड झालेल्यांसाठी पण त्यांनी काम केले होते.
19 Apr 2012 - 1:03 pm | बॅटमॅन
माहितीबद्दल धन्यवाद वाहिदा. मी त्यांना भेटलो ते गणेश द्रविड यांचा एखादा फोटो त्यांच्याकडे असेल म्हणून, पण नव्हता. मग थोड्या त्यांच्या लहानपणीच्या आठवणी विचारल्या, तेव्हा गप्पांच्या ओघात त्यांच्या पीएचडीचा विषय निघाला. बाकी आम्हाला त्यांच्याबद्दल "त्या गणेश द्रविड यांची नात आहेत" हे सोडून काहीच माहिती नव्हते, त्यामुळे तेव्हा आणि नंतरही आम्ही कुठे सर्च नाही केला त्यांच्या कार्याबद्दल. आपल्याला त्यांच्या कार्याबद्दल बरीच माहिती आहे असे दिसते, तरी आपणच त्यांच्यावर एखादा परिचयपर लेख लिहावा ही विनंती.
24 Aug 2012 - 3:52 pm | पुण्याचे वटवाघूळ
काही चांगल्या जुन्या चर्चा परत वर आणत आहे. एखादे वेळेस कोणा नव्या सदस्याला अशा दर्जाचे लेखन मिसळपाववर झाले आहे याची कल्पना नसेल. मी गेल्या २-३ वर्षातील सगळ्या चर्चा वाचल्या आहेत आणि वेळ मिळेल त्याप्रमाणे सर्वांनाच या चर्चांचा परत आस्वाद घेता यावा म्हणून त्यातल्या चांगल्या चर्चा वर आणायचा प्रयत्न करणार आहे.
24 Aug 2012 - 7:22 pm | नीलकांत
नमस्कार,
येत्या काही काळात मिसळपावच्या रचनेत काही बदल करण्यात येतील तेव्हा अश्या प्रकारे चर्चा वर आणायचे काम पडणार नाही. त्यामुळे यापुढे असे करू नये. लवकरच ही सोय सुरू करतो. त्यामूळे तुमचा हेतू जरी चांगला असला तरी ते नवीन लेखांना मागे पाठवतंय त्यामुळे हे टाळा.
2 Nov 2015 - 12:12 pm | अनुप ढेरे
छान चर्चा!