अंतर
शब्दांच्या सुंदर जाळ्यात मला अडकवू नकोस
वचनांच्या खोल बंधनात उगा बांधू नकोस
बोटात बोटे गुंफून दोघे हवे तेवढे फिरू
मनगटाभोवती मात्र कधी नकोस हात धरू
सहज सुटण्याइतकी दोघांतली सैल गाठ नको
पण श्वास कोंडेल असा घट्ट गळफासही नको
रागावू नको, माझी प्रेमाची कल्पना जरा निराळी आहे
फक्त भावनांचा रस नाही अनुभवाचं सारही आहे
शेवटी काही असले तरी तू 'तू' आहेस, मी 'मी' आहे
दोघेमिळून 'आपण' असलो तरी…. त्यात 'पण' आहे
म्हणून म्हणते एकमेकांना थोडेसे स्वातंत्र्य राहू दे
तुझ्या माझ्यात, जरासे का होईना, अंतर राहू दे
(सुरेश नायर - १/२०१०)
http://sites.google.com/site/surmalhar/
प्रतिक्रिया
5 Mar 2010 - 7:47 pm | शुचि
कविता आवडली पण ..... माझाही पण आहे....
आजकाल हा पाश्चात्य"कमीटमेंट फोबीआ" फार बोकाळू लागलाय आहे बॉ.
भावनांचं रस नाही .... मग काय अनुभव रस घेत फिरायचं या फुलावरून त्या फुलावर????
**********************************
या जगात दुर्लभ असे काही असेल तर ती सद्वासना आहे - वाचनात आलेला सद्विचार (ज्ञनेश्वरीतील ओवीवर आधरीत)
5 Mar 2010 - 9:10 pm | sur_nair
तुम्ही जरा याचा वेगळा अर्थ घेताय. इथे मुळ मुद्धा कुठल्याही नात्यात एकाने दुसऱ्यावर वर्चस्व दाखवणे अथवा स्वातंत्त्र्याची कुरघोडी करणे हा आहे. प्रियकर -प्रेयसी असो वा पती-पत्नी असो, प्रत्यक नात्यात स्वताची space हवीच. Commitment शी त्याचा संबंध नाही. राहता राहिला अनुभवाचा प्रश्न तो स्वताचा असू शकतो, पालकांच्या संसाराचा असू शकतो किवा मित्र-मैत्रिणींचा असू शकतो.
5 Mar 2010 - 9:23 pm | शुचि
प्रतिक्रिया दिल्यानंतर तशी शंका मनाला चाटून गेली होती.
**********************************
या जगात दुर्लभ असे काही असेल तर ती सद्वासना आहे - वाचनात आलेला सद्विचार (ज्ञनेश्वरीतील ओवीवर आधरीत)
6 Mar 2010 - 3:21 am | अश्विनीका
कविता आवडली.
नात्यामध्ये एकमेकांना स्पेस ही हवीच. ..कितीही हक्काचे नाते असले तरी.
- अश्विनी
20 Mar 2010 - 6:19 am | सखी
खुप छान आहे कविता