गेला महिनाभर नीलिमा हळूहळू परंतु पद्धतशीर चाललेला प्रयत्न पाहत होती. पहिले काही दिवस तिला काहीतरी वेगळे आहे असे जाणवले असले तरी, छे! उगाच शंका घेते आहेस. असे स्वतःलाच ती सांगत होती. कालच्या घटनेने तर स्पष्ट दिसलेच. तातडीने यावर बोलायला हवेय हे कळतही होते पण कसे हे समजत नव्हते. नेहाशी आज मनमोकळे बोलून पाहावे, कदाचित ती मार्ग सुचवील म्हणून ती तिच्याकडे निघाली होती.
" अग, किती उशीर? मला वाटले आता येतच नाहीस. " नेहाने नेहमीप्रमाणे गोंधळ सुरू केला. " काय बाईसाहेब, फारच गंभीर दिसता आहात. कोणी प्रपोज केलेय का? घरी सगळे ठीक आहे ना? तू आजारी तर दिसत नाहीस. चेहरा का कोमेजला आहे? मन आजारी पडलेले दिसतेय..... as usual. " नेहाची सरबत्ती चालूच होती. निलीमाने एकदा तिच्याकडे पाहिले आणि क्षणात सांगून टाकले, " नेहा, मधू माझ्या प्रेमात पडलाय. म्हणजे तसे त्याने मला सांगितले नाहीये. पण स्पष्ट दिसतेय. अग दिवसातून किमान दोनदा तरी माझ्या केबिन मध्ये येऊन अर्धा अर्धा तास बसतो. बोलत नाही फारसे, नुसता बघत राहतो. बरं.... एकदम offensive काही करत नाही गं. मी हल्ली त्याला टाळतेय हेही कळतंय त्याला. पण तो येणे काही थांबवत नाहीये. उगाच चर्चा होत राहते अशाने. दररोज सकाळी ऑफिसला जायचेय ह्या विचारानेच डोके दुखायला लागतेय. काय करू काही समजत नाही. तुला काही मार्ग दिसतो का?"
नेहाही मधूला ओळखत होती. चांगला मुलगा आहे. निलीमावर त्याचा जीव आहे हे आताशा बऱ्याच जणांना कळले होते. निलीमाने कधीही नेहाला किंवा इतर कोणालाही सांगितले नसले तरी तिला शशांक आवडतो हेही नेहा जाणून होती. नेहमी भावनांना संयत ठेवणारी नीलिमा शशांक आजूबाजूला आहे हे पाहताच वेगळीच होऊन जाई. चेहऱ्यावर असोशी स्पष्ट दिसे. डोळे त्याचा पाठलाग करत राहत. शशांकला हे कळत होते असे नेहाचे मत झालेले. पण तो निलीमाकडे पाहणेही टाळत असे. बोलणे तर दूरच राहिले. मात्र मुद्दामहून तिच्या समोर इतर मुलींबरोबर हसत खिदळत राही. नेहाला वाटे, हा निलीमाला खेळवतोय. लुच्चा आहे.
निलीमाच्या प्रश्नाला नेहाकडे उत्तर नव्हतेच. बरे हे सगळे शशांकचे वागणे तिला सांगून पटणार नव्हतेच. त्यामुळे उघडपणे नेहा म्हणाली, " नीलिमे, मधू तुझ्या प्रेमात पडलाय, मान्य. जोवर तुला तो विचारत नाही तोवर तूही जरा शांत राहा. कदाचित चांगली मैत्रीण म्हणूनच तो तुझ्याकडे पाहत असेल. दुसरे कधी कधी जे आपल्याला आवडते असे वाटते ते फक्त वरवरचे आकर्षण असू शकते. तेव्हा तू स्वतःलाही थोडा वेळ दे. आता विसर सारे. चल, पापडी चाट केलेय मी आज. भूक लागलीये कधीची. मस्त पुदिना चटणी..... चल गं, आधी भरपेट खाऊ अन मग भरल्यापोटी विचार करू. काय? " खो खो हसत नेहाने ताण हलका करायचा प्रयत्न केला आणि नीलिमाही छान हसली.
असाच आठवडा गेला. मधू येतच होता. शशांक फारसे लक्ष देत नव्हता. ऑफिसमध्ये काही नवीन अपाँइटमेंटस झाल्या त्यात नीलिमा गुंतली होती. शनी-रवीच्या सुटीला लागून सोमवारीही कुठलासा बँक हॉलीडे आल्याने गुरवारपासूनच चर्चा सुरू होती. ट्रेक्स, ट्रिप्स..... कोणी गावी जाणार होते. सगळे उत्साहात होते. निलीमालाही वाटत होते, शनीवारी शशांकला भेटावे. बोलावे, मनीचे गूज सांगावे. पण कसे? तेवढ्यात मधू आला. बसला. " मग, काय प्लॅन्स आहेत तीन दिवसाचे? जाणार आहेस का कुठे? नसशील तर आपण धमाल करायची का? " कधीही मोकळेपणाने न बोलणाऱ्या मधूने आल्या आल्या सुरवात केली. निलीमाचे डोळे लकाकले. मधूलाच हाताशी धरून......
" हो चालेल की. मी नेहालाही सांगते तू शशांकला बोलाव. आपण चौघे मिळून दोन दिवस मस्त मजा करूयात." नीलिमा अगदी बारकाईने मधूकडे पाहत हे बोलत होती. मधूच्या चेहऱ्यावर क्षणभर वेदना तरळल्याचा भास तिला झाला. पण तिने त्याकडे काणाडोळा केला. आता एकच लक्ष्य....., मधूचे बोट धरून शशांक पर्यंत पोचायचे. मधूने निलीमाचा उत्साह पाहून होकार दिला. शशांकला घेऊन यायची जबाबदारी घेतली आणि शनीवारी सकाळी नऊ वाजता भेटूयात. ठरले तर. नीलिमा खूश झाली. संध्याकाळी तिला क्रॉफड मार्केटला जायचे होते शिवाय मधूलाही थोडे खूश करावे ह्या विचाराने तिने त्याला कंपनी देतोस का असे विचारताच मधू हो म्हणाला.
संध्याकाळी मधू-नीलिमा बससाठी उभे असताना अचानक शशांक समोरून आला. " हाय नीलिमा! कशी आहेस? शनीवारी नऊ वाजता भेटतोच मी. तुझा सिल्कचा गुलाबी पंजाबी.... चल रे, बाय मधू. " गेलाही. म्हणजे ह्याचे माझ्याकडे लक्ष असते तर. नीलिमा थरथरली. हृदय इतके जोरात धडधडत होते की मधूलाही ऐकू जाईल की काय. तेवढ्यात बस आली. खूप गर्दी होती. ती चढली तेव्हा तिला जाणवले की मधूने दोन्ही हात तिच्या बाजूने तिला स्पर्श न करता असे काही वेढले होते की इतर कोणाचाही धक्का तिला लागू नये. म्हटले तर साधीच गोष्ट होती. पण भावना पोचली तिच्यापर्यंत. नंतर खरेदी झाली, मधूने तिला घरापर्यंत सोबत केली व तो गेला.
रात्री फक्त सूप घेऊन नीलिमा अंथरुणावर पडली. मन शशांक भोवती घुटमळत होते. दिवास्वप्न पाहत... शशांक आपल्याला जवळ घेईल, चुंबन घेईल...... तिला झोप लागून गेली. मध्यरात्री नंतर तिला स्वप्न पडले, आई दिसत होती. नीलिमा व आई गप्पा मारत होत्या अन आई अचानक म्हणाली, " नीलिमे, अग आपणही त्याच धारेला लागायची चूक करू नये. नेहमी मन आपल्याला जे हवेय त्याच्या मागे धावते अन त्या धुंदीत समोर असलेले सुख दिसतच नाही. जो तुझ्यावर प्रेम करतो त्याला डावलण्याची चूक करू नकोस हो. डोळे उघड, स्वतःचे मन आधी शोध. उगाच भ्रमात जगू नकोस." झोपेतही निलीमाला अस्वस्थपणा आला. सकाळी उठल्यावरही आईचे हे शब्द तसेच तिच्या कानात घुमत होते. आजच का हे आईने सांगावे? काही नाही माझ्या मनाचे खेळ आहेत सारे. असे म्हणत ती तयारीला लागली.
ठरल्याप्रमाणे चौघेही भेटले. शशांकने म्हटल्याप्रमाणे गुलाबी सिल्कचा पंजाबी, हलकासा मेक अप करून नीलिमा आली होती. शशांकने तिच्याकडे पाहिले परंतु कुठलीही प्रतिक्रिया दिली नाही. जणू काही तो हे बोललाच नव्हता. नेहा आणि मधूला निलीमाचा पडलेला चेहरा पाहून वाईट वाटले पण ते दोघे काहीच बोलले नाहीत. शशांकने सगळी सूत्रे स्वतःच्या ताब्यात घेतली. " चला लोणावळ्याला जाऊयात. माझ्या मित्राचा बंगला आहे. सगळी सोयही आहे." सगळे निघाले.
शशांक मुद्दामहून निलीमाच्या जवळ बसला. आजवर कधीही चार वाक्येही न बोललेला शशांक निलीमाला अगदी खेटून बसला होता. मध्येच तिच्या खांद्यावर हात टाकत, कधी तिच्या अगदी कानाशी लागत उगाच काहीतरी जोक्स मारत हसत होता. निलीमाला सुरवातीला छान वाटले असले तरी नंतर त्याची ही सलगी खटकू लागली. पण मनात ओढ होती त्यामुळे तिने त्याला प्रतिसाद दिला. मधू व नेहा गप्पा करत होते. त्यावेळीही शशांक तिच्या अंगचटीला जातच होता. एकदाचा प्रवास संपला. लोणावळ्यात वातावरण छान होते. लॉनवर सकाळचे दव अजूनही जाणवत होते. सगळे लोळले. जेवणाचे काय करावे ही चर्चा सुरू झाली तसे शशांकने शिताफीने मधू व नेहाला चांगले ठिकाण शोधायला पिटाळले. ते दोघे निघाले तशी निलीमाला कापरे भरले.
ती पटकन रूममध्ये गेली. तिच्या मागोमाग शशांकही गेला. फ्रेश व्हावे असा विचार करत तिने बॅग उघडली तोच मागून शंशाकने तिला मिठीत घेतले. इतके अनपेक्षित हे घडल्याने नीलिमा सावरायच्या आतच शशांकने तिची चुंबने घ्यायला सुरवात केली. निलीमाने हे स्वप्न अनेक वेळा पाहिले होते ते सत्यात उतरतेय की भास ह्या गोंधळात तिनेही त्याला आसुसून साथ दिली. अन तिला जाणवले , शशांकचे हात सगळीकडे फिरत आहेत. धसमुसळेपणे. ओरबाडल्यासारखे. तिच्या स्वप्नातला शशांक तर असा नव्हता. ती घाबरली. तोवर शशांकने तिच्या कपड्यांना हात घालत म्हटले, " कधीपासून वाट पाहत होतो. कसली सुंदर आहेस तू. तुला असे तडपताना पाहून मजा आला मला. आता आज सोडणार नाही. "
नीलिमा उमजली. आईचे बोल किती खरे होते. शशांकची झटापट वाढतच होती. मधू कसा रे गेलास मला टाकून ह्या हलकटाच्या तावडीत. निलीमाने जिवाच्या आकांताने शशांकला ढकलले. बेसावध शशांक तोल जाऊन पडताच कसेबसे कपडे सावरत नीलिमा बंगल्याबाहेर पळाली. तेवढ्यात तिने पाहिले मधू व नेहा परत येत होते. नीलिमा सावरली. ते जवळ येताच म्हणाली, " आलातही एवढ्यात? बरं झालं. मी खूप कंटाळले होते. " " अग मधूचे पाकीट राहिले टेबलवर म्हणून ते घ्याय..... शशांक, असा काय अवतार झालाय तुझा? कुठे पडलास की कोणी पाडले तुला? खोक कशी पडली? " निलीमाने ढकलले तेव्हा नाईटस्टँडचा कोपरा लागला होता कपाळाला. वरकरणी हसत म्हणाला, " अग काही नाही. मांजरीला पकडत होतो. पळाली. तिला वाटतेय मी सोडीन तिला. आत्ता नाही तर नंतर सही, ओरबाडीनच. ती ओळखत नाही मला. काय नीलिमा? "
त्याची नजर व हसण्यातले विखारीपण निलीमाला जाणवून ती शहारलीच. त्याच्याकडे दुर्लक्ष करीत ती मधू व नेहाला म्हणाली, " मधू, अरे माझे डोके फारच दुखायला लागलेय. नेहा, मी गोळ्याही आणल्या नाहीत. मला वाटते आपण जेवून निघूयात. नाहीतर असे करूयात मी निघते. तुमची ट्रीप नको खराब व्ह्यायला." तिला मनोमन माहीत होते नेहा व मधू एक मिनिटही थांबणार नाहीत. तसेच झाले. परत येताना ती मधूबरोबर बसली. नेहा व शशांक वेगवेगळ्या खिडक्यांत बसलेले. मधूला जाणवले होते, आपल्या पश्व्यात काहीतरी विपरीत घडण्याच्या बेतात होते.
निलीमाला मधूच्या सहवासात नेहमीसारखेच आश्वासक वाटत होते. शी! किती मूर्ख आहे मी. आई, नेहा म्हणत होत्या तेच खरे होते. मला भुरळ पडली होती शशांकची. त्याचे इतर मुलींशी चाललेले चाळे दिसत असूनही मी पाहू शकत नव्हते. आज केवळ नशिबाने वाचलेय नाहीतर त्याने...... निलीमाला हुंदकाच आला. मधूने त्या आवाजाने तिच्याकडे पाहिले. काठोकाठ भरलेले डोळे पाहून हळूच निलीमाच्या हातावर थोपटले व रुमाल दिला. तशी नीलिमा हात धरत पटकन त्याच्या कुशीत शिरली. छातीवर डोके ठेवीत विसावली. शांत शांत झाली. मधूने तिच्या केसावरून हात फिरवत विचारले, " नीलिमा, लग्न करशील माझ्याशी? " तशी अस्फुट हूकांरत नीलिमा अजूनच बिलगली.
हे सारे पाहून नेहाने सुस्कारा सोडला. निलीमाला वेळीच कुठला मार्ग आपला आहे हे उमगले होते. आता लग्नाच्या तयारीला लागा असे काकूंना सांगायला हवे. मधूला डोळा मारत तिने थम्स अप ची खूण केली. शशांकचा मात्र अगदी तिळपापड झाला होता. पण तोंड दाबून बुक्क्याचा मार......, मांजर तावडीतून निसटली होती.
ह्या कथेचे दोन शेवट मनात घोळत होते. दुसरा असा....
मधूने तिच्या केसावरून हात फिरवत विचारले, " नीलिमा, लग्न करशील माझ्याशी? " तशी अस्फुट हूकांरत नीलिमा अजूनच बिलगली.
नीलिमाचा होकार ऐकताच मधूने शशांककडे पाहिले. काम फत्ते असे खुणावत शशांकला डोळा मारला, मग दोघेही खुनशी हसत राहिले. त्या दोघांचा हा बनाव होता हे नेहाच्या लक्षात आले अन तिच्या हृदयाचा ठोका चुकला. आता तिने कितीही जीव तोडून नीलिमाला सांगितले असते तरी उपयोग नव्हता. नीलिमा सहजपणे आपल्या प्रेमाला प्रतिसाद देणार नाही हे जाणवून शशांकच्या मदतीने मधूने त्याला हवे ते साधले होते.
प्रतिक्रिया
15 Dec 2009 - 11:40 pm | लवंगीमिरची
चल, पापडी चाट केलेय मी आज!
कित्ती कीत्ती छान मैत्रीण आहे...
गोष्ट पण छान आहे...
16 Dec 2009 - 12:25 am | रेवती
बापरे!
दुसरा शेवट तर कापरं भरवून गेला.
पहिलाच ठिक आहे.
निलिमानं शशांकचे असले चाळे लपवण्यात अर्थ नव्हता.....निदान नेहा व मधू दिसल्यावर तरी त्याला बदडायला हवा होता.
शेवट दुसरा झाला असता तरी नंतर तक्रार करायला निलिमाला जागा नव्हती. जर ती मधूला हाताशी धरून शशांकपर्यंत पोहोचायचा विचार करू शकते तर तसच मधूही करू शकतो. नंतरच्या परिणामांना तोंड द्यायची तयारी पाहिजे पण!
रेवती
16 Dec 2009 - 2:08 am | स्वाती२
कन्फ्युज्ड तरीही स्वार्थी निलिमा चांगली रंगवलेय.
16 Dec 2009 - 8:20 am | विकास
कन्फ्युज्ड तरीही स्वार्थी निलिमा चांगली रंगवलेय.
सहमत. लेखाचे शिर्षक हे जसे शशांकला लागू होऊ शकते तसेच वरकरणी साध्या वाटणार्या निलिमालापण लागू होते असे वाटले...
16 Dec 2009 - 8:23 am | प्राजु
असेच म्हणते.
- प्राजक्ता
http://www.praaju.com/
16 Dec 2009 - 8:33 am | अक्षय पुर्णपात्रे
निलिमाच्या वर्तमानाचे आकलन आपल्या (भानसतैंच्या) चित्रणामूळे होऊ शकले. व्यक्तिमत्त्व (जे स्थल/कालापलिकडे (कक्षातीत) असावे) ते मात्र स्पष्ट झाले नाही. (स्त्रीच्या शारिरीक इन्स्टि़न्क्ट्सकडे समकालीन समाजाने दुर्लक्ष करावे असे नसतांना)
16 Dec 2009 - 7:21 am | मदनबाण
जे जाणवतं ते नेहमीच सत्य नसतं........
अगदी योग्य शिर्षक...
कथा आवडली व त्यातील पहिला शेवटच आवडला,अर्थात दुसरा देखील घडु शकतो याची शक्यता आहेच.
मदनबाण.....
Love is life. And if you miss love, you miss life.
Leo Buscaglia
16 Dec 2009 - 7:36 am | सहज
पहीला शेवट साफ चुकीचा वाटला. शशांकच्या तश्या वागण्यापूर्वी एकतर मधुला होकार द्यायला अजिबात तयार नव्हती [कारण तिच्या अपेक्षेत न बसणारा होता.] आता शशांककडून भ्रमनिरास झाल्यामुळे इतका चटकन इतका मोठा निर्णय? काही क्षणापूर्वीपर्यंत असलेला नकार तो होकार? म्हणजे असा प्रसंग घडू नये म्हणून करा तडजोड? हे म्हणजे मुलगी वयात येउ लागली रे लागली की लावून टाका लग्न विचारसरणीच झाली.
दुसरा शेवट डेंजर असला तरी एक लेख म्हणून पटण्यासारखा. तसेच एक चुकीचा निर्णय का ते वरच्या स्पष्टीकरणाचे समर्थन करणारा.
वाचकांना कुठला शेवट पचेल असा विचार करण्यापेक्षा लेखक म्हणुन तुम्हाला काय वाटते हे तुम्ही ठरवायचे.
आणी हो, तुमच्या कथेचे शीर्षक वाचून एका जेष्ठ मिपाकर सदस्याची आठवण झाली. प्रो. देसाई की जय हो!
16 Dec 2009 - 8:18 am | अक्षय पुर्णपात्रे
भानसतै, कथा वाचनीय आहे. मधुविषयीच्या आपुलकीची कल्पना त्याच्या "...मधूने दोन्ही हात तिच्या बाजूने तिला स्पर्श न करता असे काही वेढले होते की इतर कोणाचाही धक्का तिला लागू नये" या वाक्यावरून आली होती पण निलिमाचे (निलिमा ही पौगंडावस्थेत इन्फॅच्युएशनने पछाडलेली अपरिपक्व षोडशा नसून स्वतःच्या पायावर उभी असलेली स्वतंत्र स्त्री आहे.) शशांकविषयीचे आकर्षण इतके उथळ कसे असू शकेल? हा प्रश्न वारंवार जाणवला.
असेच. लेखक/ लेखिका म्हणून तुमचे स्वातंत्र्य वाचकांच्या हवाली करू नये. अभिव्यक्तिचा अधिकार (मालमत्तेच्या अधिकाराप्रमाणे किंवा त्यापेक्षा (नैतिकदृष्ट्या) सरस) सर्वस्वी आपला आणि आपलाच आहे.
हेच अगदी हेच. शीर्षक असेच. जग कोळून पिऊन सर्व ज्ञानाचा साक्षात्कार झाल्यासारखे इकडचे एक ज्येष्ठ आणि (लिहिण्यात) जननशील (वराहापेक्षा अधिक) सदस्य (जे सध्या (क्लोनिंगमुळे (सव्यंग :))) लिहित नाहीत) लिहित असत त्यांची आठवण झाली.
श्री टारझन, श्री राजकुमार (किंवा श्री हातजग) यांना भेटा. पौगंडावस्थेचा त्यांचा अनुभव जास्त ताजा आहे.
16 Dec 2009 - 11:50 am | टारझन
झकास कथा आहे :) आणखीन काय बोलू ?
बाकी श्री. अक्षय पुर्णपात्रे सारख्यांना त्यांच्या पौगंडावस्थेचा काळाच्या ओघात विसरंच पडला असेल , त्यांच्यासाठी ही कथा संजिवणी ठरावी.
मात्र दुसर्या प्रकारचा शेवट भारी आहे. पहिला अंमळ प्रेडिक्टेबल वाटतो. असो.
- श्री. भक्षय क्लिटोपात्रे
16 Dec 2009 - 8:03 am | कालिन्दि मुधोळ्कर
>> त्या दोघांचा हा बनाव होता हे नेहाच्या लक्षात आले अन तिच्या हृदयाचा >>ठोका चुकला. आता तिने कितीही जीव तोडून नीलिमाला सांगितले असते तरी >>उपयोग नव्हता.
म्हणजे नेहा चं निलीमावर प्रेम होतं ना?
ह्या कथेतल्या नीलिमा सारख्या भाबड्या कालिका नक्की कोणत्या काळातल्या आहेत?
16 Dec 2009 - 8:22 am | अक्षय पुर्णपात्रे
नव्वदीच्या दशकातल्या असाव्यात. (हा केवळ अंदाज आहे. अभिव्यक्तिस्वातंत्र्यात अध्यारूत असलेल्या -'अनुभवकाला/स्थलाच्या सार्वभौमत्वाचे अतिक्रमण करू नये' या प्रोटोकॉलकडे दुर्लक्ष- असे कृपया समजू नये.)
16 Dec 2009 - 10:21 am | हर्षद आनंदी
पण दोन्ही शेवट नाही पटत!! जुन्या मराठी चित्रपटाच्या सहनशील, स्वप्नाळु नायिका आठवल्या.
असा असु शकेल....
व्यवस्थित प्लॅन करुन, निलिमाचा लोणावळ्यातील बंगल्यावर गैरफायदा घेउन खुन करण्यात आला
किंवा
गैरफायदा घेऊन चित्रफित काढुन पब्लिश करण्याची धमकी देण्यात आली, त्यावरून ब्लॅकमेलिंग, नंतर निलिमाने घेतलेला बदला..
किंवा
मधुचे निलिमावरील प्रेम जाणुन, त्याला मदत करण्यासाठी शशांक, लोणावळ्याला तीच्या समोर नेहाला खोटे खोटे प्रपोझ करतो.. ह्या सगळया प्लॅनची हेड नेहा असु शकेल. नेहाचे मधुवर प्रेम असते, पण मधु निलिमावर प्रेम करत असल्याने ती निलिमासाठी प्रयत्न करते.
सगळ्यात महत्वाचे म्हणजे.. लेखन स्वातंत्र्य!!
आम्ही हिंदूत्ववादी !! आमची शाखा कुठेही नाही..
16 Dec 2009 - 11:18 am | निखिल देशपांडे
कथेचा पहिला शेवट पटला नाही...
वर सहज जसे म्हणतात तसे एका क्षणात निर्णय बदलणे मनाला पटले नाही. किंवा कथेत नाइयेकेचे मधु कडे असलेले आकर्षण थोडे कमी दाखवण्यात आले का काय असे वाटले. शंशाकच्या प्रेमाने आंधळ्या झालेल्या नायिकेला मधु बाबत कुठे तरी सॉफ्ट कॉर्नर दाखवला असता तर पहिला शेवट पटला असता.
पण तुमची कथा फुलवण्याची पद्धत छानच आहे.
निखिल
================================
करा चर्चा दुज्यांच्या पातकांची, स्वतःला तेवढे गाळून बोला!!!!
17 Dec 2009 - 10:05 pm | भानस
प्रतिक्रियांबद्दल आभार. :)
18 Dec 2009 - 1:36 am | वात्रट
कथा तुमची आहे. मग शेवट पण तुम्हाला जो आवडला आहे तोच ठेवा...