कवी म्हणजे कवी म्हणजे कवी असतो
दही घुसळून लोणी काढणारी रवी असतो
कवीला माहीत घुसळणे फक्त
स्निग्धता लोण्यात मिसळणे फक्त
स्वत: मात्र फिरुन फिरुन बुडत असतो
कवी म्हणजे कवी म्हणजे कवी असतो
स्निग्धतेच्या अंशासाठी जग सारं धावतंय
रवीचं चाक गरागरा फिरतंय
तरंगणा-या गोळ्यापासून अलिप्त जो असतो
कवी म्हणजे कवी म्हणजे कवी असतो
प्रतिक्रिया
30 Mar 2008 - 10:42 am | दिनेश५७
दही घुसळून काढलेलं लोणी
रवीला दिसत नाही...
ते कवीला दिसतं...
म्हणूनच, जे न देखे रवी, ते देखे कवी, असं म्हणतात?
... त्याला फक्त घुसळणं माहीत असतं...
वा: !!!
30 Mar 2008 - 11:09 am | मदनबाण
अगदी घुसळून काढलत बुवा तुम्ही.....
(हिंग आणि कोथिंबीर घातलेला मठठा पिणारा)
मदनबाण
30 Mar 2008 - 1:03 pm | विसोबा खेचर
तरंगणा-या गोळ्यापासून अलिप्त जो असतो
कवी म्हणजे कवी म्हणजे कवी असतो
वा, कविता अगदी झकास आहे! आवडली आपल्याला...
आपला,
(लोणी आणि ताक प्रेमी) तात्या.
30 Mar 2008 - 3:33 pm | सचिन
अजयजी,
१दम खास !!
कवीला माहीत घुसळणे फक्त
स्निग्धता लोण्यात मिसळणे फक्त
स्वत: मात्र फिरुन फिरुन बुडत असतो
कवी म्हणजे कवी म्हणजे कवी असतो
-- हे सुरेख !!
30 Mar 2008 - 7:27 pm | ठणठणपाळ
कवितेचा विशय मस्त आहे.
बोलीभाशेत लिहिलेल्या या कवितेत 'स्निग्धता' हा शब्द खटकतो.
>तरंगणा-या गोळ्यापासून अलिप्त जो असतो
कवी म्हणजे कवी म्हणजे कवी असतो
वास्तवात असं होत नाही. कवींचे पायसुद्धा अनेकदा मातीचेच असतात. (क्षमस्व.)
31 Mar 2008 - 11:43 pm | अजय जोशी
वास्तवात असं होत नाही. कवींचे पायसुद्धा अनेकदा मातीचेच असतात.
माझ्या मते तरंगणा-या गोळ्यासाठी कवी कधीच कविता करीत नसतो. आपली प्रतिभा लोकांपर्यंत पोहोचावी असा तो प्रयत्न करतो. मंथनातून निघालेले नवनीत(रस) इतरांना मिळावे यासाठी कविता लिहीली जाते असे मला वाटते. तरंगणा-या गोळ्यासाठी म्हणजे मान-सन्मान-कीर्ति-पैसा असा अर्थ लावू नये असे मला वाटते. कारण हे सर्व ओघाने येतेच. या गोष्टींसाठी निरपेक्ष रहावे असे माझे म्हणणे नाही.
31 Mar 2008 - 11:55 pm | विजुभाऊ
बोलीभाशेत लिहिलेल्या या कवितेत 'स्निग्धता' हा शब्द खटकतो.
..............बालीश भाशेत असे म्हणायचे आहे का तुम्हाला ठणठणपाळ?
बाकी टिळकांच्या भाषेतच सांगायचे झाले तर " दीडकीची भांग घेतली की वाटेल तेवढ्या कल्पना सुचतात"
कोणत्याही मीटर जाउंदे..भावना सुद्धा नसलेल्या या असल्या कवितेला वाहवा देणारे च मला ग्रेट वाटतात.