रेवदंडा... माझं गाव

विमुक्त's picture
विमुक्त in कलादालन
28 Nov 2009 - 11:54 am

मित्राच्या लग्नाला जायला नाही जमलं... तर निदान त्यानंतरच्या सत्यनारायणाच्या पुजेला तरी जायला पाहिजे असा विचार आला आणि रेवदंड्याला जायचं ठरलं...

लहानपणी रेवदंड्यात असताना किल्ल्यात, बंदरावर, सुरुच्या वनात, दत्ताच्या डोंगरावर खूप उनाडक्या केल्यात... करवंद, जांभळं, बोरं, आवळे, ताडगोळे, जाम आणि चिंचा खात दत्ताच्या डोंगरावर पडीक असायचो... रोजच बंदरावर क्रिकेट खेळायचो... मनात येईल तेव्हा समुद्रात पोहायचो; सकाळ, दुपार, संध्याकाळ असं काही वेळेच भान नव्हतच... एक नंबरचा उनाड होतो...

मी आणि रव्या दुचाकीवर सकाळी लवकर निघालो... सुमारे १०.३० वाजता चौलच्या मुखरी गणपतीच्या देवळात पोहचलो... चौलचा मुखरी गणपती आणि रेवदंड्यातला पारनाक्यावरचा मारुती हे माझे आवडते देव...

(मुखरी गणपती)

दर्शन झाल्यावर पोखरणीच्या पायऱ्यांवर थोडावेळ बसलो... फार निवांत वाटलं...
११.३० ला मित्राच्या घरी पोहचलो तर पुजा अजून चालूच होती; बराच वेळ लागणार होता... तोपर्यंत दत्ताचं दर्शन घेऊन येतो असं सागून घरा बाहेर पडलो... दताच्या डोंगराकडे जाताना डाव्या हाताला एका टेपाडावर खूप जुनं घुमटाकार बांधकाम आहे... नक्की काय आहे हे मला नीटसं माहिती नाही...

ह्या टेपाडावरुन दताचा डोंगर छान दिसतो...

(डोंगराच्या अगदी टोकाला दत्ताचं मंदिर आहे)

डोंगराच्या पायथ्याशी फार मोठ्ठं गोरखचिंचेच झाड आहे... गोरखचिंचेच झाड फार काळ जगतं; ५००-६०० वर्ष तर आरामात आणि भारतात हे झाड बऱ्यापैकी दुर्मिळ आहे... गोरखचिंच खायलापण छान लागते...

(मी आणि गोरखचिंच)

डोंगराच्या पायथ्या पासून माथ्यापर्यंत पायऱ्या आहेत... साधारण ८०० पायऱ्या असतील... वर चढताना आजुबाजुला वड, उंबर आणि ताडगोळ्याची भरपुर झाडं लागतात...

(वडाचं फळ)

डोंगराच्या माथ्यावरचं लहानसं दत्ताचं मंदिर फार सुंदर आहे... मंदिराच्या बाहेर मस्त पेढे मिळतात... दरवर्षी दत्तजंयतीला ५ दिवस जत्रा भरते... खूप गर्दी असते तेव्हा...

दर्शन घेतलं, थोडावेळ बसलो आणि मग डोंगर उतरायला लागलो... पुन्हा मित्राच्या घरी पोहचलो तेव्हा पुजा उरकुन जेवणाला सुरुवात झाली होती... पोटभर जेवलो, मित्राशी गप्पा मारल्या, त्याचा निरोप घेतला आणि रेवदंड्याचा किल्ला बघायला निघालो...

लहानपणी किल्ल्यात खूप भटकायचो... किल्ल्याच्या भिंतीवर चढायचो... बुरुजावर बसून भरती-ओहटीचा खेळ बघायचो... बुरुजावरुन समुद्रात आणि पुळणीत उड्या मारायचो... खूप धमाल असायची...

पुर्वी रेवदंडा गाव किल्याच्या आतच वसलं होतं, आता जरा पसरलयं... १५५८ मधे पोर्तुगीजांनी रेवदंडा कोट बांधला... १६८४ मधे संभाजीराजांनी हा किल्ला जिंकण्याचा असफल प्रयत्न केला होता... नंतर १७४० मधे मराठ्यांनी हा किल्ला मिळवला, पण १८०६ मधे इंग्रजांनी तो काबीज केला... १८१७ मधे आंग्रेंनी किल्ला परत जिंकला, पण एकच वर्षात परत तो इंग्रजांकडे गेला...

(रेवदंडा कोट)

(किल्ल्यात माडांची वाडी आहे...)

(रेवदंडा किल्ल्याचे अवशेष)

रेवदंडा गाव फार सुंदर आहे... शनीवारी आणि रवीवारी मुंबईकडच्या पर्यटकांची खूप गर्दी असते सध्या... त्यामुळे गावातल्या लोकांना उत्पंनाचा अजून एक मार्ग मोकळा झालायं ह्याचा आनंदच आहे... पण "प्लास्टीकच्या पीशव्या, खोके वगेरे उघड्यावर टाकून इथलं निसर्ग सौंदर्य खराब करु नका" अशी पर्यटकांना विनंती आहे... आता अशा सुंदर, निवांत आणि निर्मळ जागा फारच कमी राहिल्या आहेत... त्यांच संरक्षण आपण केलं पाहिजे...
"I am myself and what is around me, and if I do not save it, it shall not save me" अशी भावना बाळगली पहिजे...

विमुक्त
http://www.murkhanand.blogspot.com/

प्रवास

प्रतिक्रिया

विसोबा खेचर's picture

28 Nov 2009 - 11:59 am | विसोबा खेचर

एकच शब्द - सु रे ख....!!

संदीप चित्रे's picture

3 Dec 2009 - 8:03 pm | संदीप चित्रे

असेच म्हणतो !

ज्ञानेश...'s picture

28 Nov 2009 - 12:01 pm | ज्ञानेश...

गोरखचिंचेचा फोटो मस्तच. (या निमित्ताने भटक्या विमुक्ताचेही दर्शन झाले एकदाचे!)
शेवटचा मेसेजही आवडला.

एकंदर लिखाण व फोटो - नेहमीप्रमाणेच दर्जेदार!

झकासराव's picture

28 Nov 2009 - 12:13 pm | झकासराव

गाव आवडल रे. :)

तसलाच एक घुमटाकार बांधकाम शिवनेरीवर होत. त्यावरच्या फारसी शब्दांच भाषांतर बिपिन करणार आहेत.

मदनबाण's picture

28 Nov 2009 - 12:20 pm | मदनबाण

गावाची मस्त ओळख करुन दिलीस... :)
झकास फोटो.

मदनबाण.....

Love is life. And if you miss love, you miss life.
Leo Buscaglia

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

28 Nov 2009 - 12:21 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

अहाहा, काय फोटो आलेत राव...!
लैच मस्त.

रेवदंडा या गावाला कुठुन कसे जावे लागते ?

-दिलीप बिरुटे

चित्रा's picture

29 Nov 2009 - 2:44 am | चित्रा

मुरूड (जंजिरा) कडे जाताना रेवदंडा वाटेत लागते.

सुंदर फोटो. खूप आठवण आली.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

1 Dec 2009 - 10:58 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

>>मुरूड (जंजिरा) कडे जाताना रेवदंडा वाटेत लागते.
अर्रर्र, आत्ताच तर [म्हणजे ऑगष्टमधे] मुरुडला जाऊन आलो.
अगोदर कळलं असतं तर या गावात फिरलो असतो. :(

माहितीबद्दल धन्यु....!

-दिलीप बिरुटे

बाकरवडी's picture

28 Nov 2009 - 12:31 pm | बाकरवडी

:)

:B :B :B बाकरवडी :B :B :B

श्रावण मोडक's picture

28 Nov 2009 - 12:41 pm | श्रावण मोडक

सुंदर.

धनंजय's picture

29 Nov 2009 - 7:14 am | धनंजय

सुंदर!

समंजस's picture

28 Nov 2009 - 1:21 pm | समंजस

सुंदर छायाचित्रे!!!
रेवदंडा खरंच सुरेख आहे

पाषाणभेद's picture

28 Nov 2009 - 1:27 pm | पाषाणभेद

भटक्या, भाग्यवान आहेस लेका. मागल्या जन्मी पुण्य केलंन असली गावे तुझ्या नशीबी आलीत. हेवा वाटतोय तुझ्या भाग्याचा.
------
आजकाल मी वृत्तपत्रातील, टिव्हीवरील ( व जालावरील धाग्यातही) पाकिस्थान चा उल्लेख असणार्‍या बातम्या/ लेख वाचत नाही.

पासानभेद बिहारी

पर्नल नेने मराठे's picture

29 Nov 2009 - 10:48 am | पर्नल नेने मराठे

भटक्या, भाग्यवान आहेस लेका. मागल्या जन्मी पुण्य केलंन असली गावे तुझ्या नशीबी आलीत. हेवा वाटतोय तुझ्या भाग्याचा.

+१
चुचु

अमोल केळकर's picture

28 Nov 2009 - 1:43 pm | अमोल केळकर

मस्त गाव
--------------------------------------------------
भविष्याच्या अंतरंगात डोकावण्यासाठी इथे टिचकी मारा

अवलिया's picture

28 Nov 2009 - 1:53 pm | अवलिया

सुरेख !

--अवलिया

शिशिर's picture

28 Nov 2009 - 1:58 pm | शिशिर

वर्षा तून दोन तीन वेळा तरी रेवदंड्या ला जात असतो. दत्त शिखरावरुन दृश्य विलोभनिय असत. साळाव च्या खाडी पूला वर रात्री च्या वेळेस उभे रहा. इस्पात कारखान्या चे दिवे, कन्व्हेअर चे दिवे आणि पाण्यातले प्रतिबिम्ब बघण्या सारखे आहे. पुधे बिरला मंदिर अप्रतिमच आहे.

क्रान्ति's picture

28 Nov 2009 - 1:59 pm | क्रान्ति

सुरेख फोटो आणि वर्णनही!

क्रान्ति
अग्निसखा

आशिष सुर्वे's picture

28 Nov 2009 - 2:47 pm | आशिष सुर्वे

अप्रतिम आणि अवर्णनीय..
-
कोकणी फणस

भाग्यश्री कुलकर्णी's picture

28 Nov 2009 - 3:14 pm | भाग्यश्री कुलकर्णी

मस्तच आहेत फोटो.गोरखचिंचेचे झाड कर्‍हाड जवळ आमच्या कुलदेवतेचे मंदिर आहे त्या परिसरात आहे.इकडे मांडु म्हणुन एक पर्यटन स्थळ आहे (म्.प्र.)तिथे गोरखचिंचेची भरपुर झाडे बघितली.

जादू's picture

28 Nov 2009 - 3:30 pm | जादू

अप्रतिम फोटो आणि वर्णनही!

उद्या जात आहे रेवदंडा आणि अलिबागला.

जादू's picture

28 Nov 2009 - 3:30 pm | जादू

अप्रतिम फोटो आणि वर्णनही!

उद्या जात आहे रेवदंडा आणि अलिबागला.

गणपा's picture

28 Nov 2009 - 3:42 pm | गणपा

मस्त रे विमुक्ता.. तुझ्या गावाची छान ओळख करुन दिलीस..
फोटो सुरेख आहेत.
तो गोरखचिंचे चा फोटो मला माझ्या गावाची आठवण जागवुन गेला :)

फोटो पाहूनच आता तिथे जाण्याचा मोह टाळता येणार नाही..
आणी तुझ्या मेसेजवर पूर्णपणे अमल होईल .. :)

सहज's picture

28 Nov 2009 - 6:33 pm | सहज

गोरखचिंच झाड विशेष!

स्वाती२'s picture

28 Nov 2009 - 6:42 pm | स्वाती२

धन्यवाद विमुक्त. लहान असताना नेहमी जाणं व्हायच. तुमच्या लेखामुळे कित्येक वर्षांनी पुन्हा सफर घडली. साळावला अप्रतिम चवीची खोबर्‍याची चिक्की/वड्या मिळायची. आता मिळते की नाही कुणास ठावूक.

शेवटचा मेसेज आवडला.

सुनील's picture

28 Nov 2009 - 6:59 pm | सुनील

चौल-रेवदंडा ही जोडगावे. गच्च हिरव्यागार झाडांनी नटलेली. खाडीपलिकडे साळाव आणि कोरलई. कोरलईचा किल्ल्यावरूनदेखिल मस्त देखावा दिसतो. पूर्वी खाडीवर पूल नव्हता तेव्हा तरीतून जावे लागे. पूल झाला आणि मुरुडकडे जाणारी सगळी वाहतूक चौल-रेवदंडा मार्गे होऊ लागली. अरुंद रस्ता, रस्त्यावरच बसलेला बाजार, आणि त्यातून होणारी रहदारी!!

इथे मोठाली हॉटेले नाहीत पण जागोजाग घरगुती खाणावळी आहेत. त्यातून अत्यंत रुचकर जेवण (विशेषतः मत्स्याहारी) मिळते.

चौलमध्ये बहुधा एक रामाचेदेखिल मंदिर आहे. लगतच एक तलाव - त्याला बहुधा पुष्करणी म्हणतात.

छान लेख आणि फोटो.

जाताजाता - अलिबागमधील कुठल्याही दुकानात प्लॅस्टिकच्या पिशवीतून माल दिला जात नाही. उत्तम निर्णय - सर्वांनी पाळण्याजोगा.

Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.

प्राजु's picture

28 Nov 2009 - 7:19 pm | प्राजु

विमुक्ता,
फोटो फार सुरेख आहेत.
:)
- प्राजक्ता
http://www.praaju.com/

विकास's picture

29 Nov 2009 - 2:59 am | विकास

फारच सुंदर फोटो तसेच माहीती!

धन्यवाद

शाहरुख's picture

29 Nov 2009 - 5:14 am | शाहरुख

भावड्या, तू महान आहेस..पुढच्या वेळेस कुठे जाशील तेंव्हा मला मागच्या शिटवर बसवून ने..

नंदन's picture

29 Nov 2009 - 7:56 am | नंदन

रेवदंड्याची सफर आवडली. लेख आणि छायाचित्रं दोन्ही क्लास. खासकरून माडांच्या वाडीचं.

नंदनमराठी साहित्यविषयक अनुदिनी

अजय भागवत's picture

29 Nov 2009 - 8:48 am | अजय भागवत

रेवदंडाला जाऊन हे सगळे बघण्याची उत्सुकता निर्माण केलीस. ते गोरख चिंचेचे झाड पहायलाच हवे!

ह्या संस्थळाच्या निर्मितीत तुझा हातभार लागला आहे असे दिसते-
http://www.raanvata.com/kokan/revdanda/index.html

प्रदीप's picture

29 Nov 2009 - 10:55 am | प्रदीप

वर्णन, छायाचित्रे व त्यांची कॅप्शन्सही ('मी आणि गोरखचिंच')! हे सर्व आवडले.

manjiri puntambekar's picture

29 Nov 2009 - 12:27 pm | manjiri puntambekar

मस्त! पूर्वी साळावला जायला पुल नव्हता. त्याचे बान्धकाम चालले असताना, आम्ही मैत्रीणी तीथे फीरायला जायचो. त्याची आठवण झाली. आता ५ ता. ला दत्ताच्या यात्रेला जाणार आहोत.

जे.पी.मॉर्गन's picture

2 Dec 2009 - 6:20 pm | जे.पी.मॉर्गन

मी पण चौल रेवदंड्याला गेलो आहे. चांगला ८-१० दिवस मुक्काम केला होता. सकाळी समुद्रावर क्रिकेट खेळून केळकरांकडे राईसप्लेट आणि दुपारच्या क्रिकेट आणि भटकंतीनंतर सामिष भोजन असा दिनक्रम होता ! विक्रम इस्पातचा प्लांट सुद्धा परवानगी काढून पाहिला होता !

लेख वाचून ते दिवस परत आठवले ! सुरेख लेखन !

सन्जोप राव's picture

29 Nov 2009 - 1:46 pm | सन्जोप राव

छान लेख.
रेवदंड्याला फार पूर्वी काही दिवस राहिलो होतो, त्याची आठवण झाली. तेथे केळकरांची एक खानावळ होती. शाकाहारी जेवण छान मिळायचे. पण मर्यादित. एकदा जाम भूक लागलेली असताना लागोपाठ दोन राईस प्लेट खाल्या होत्या, ते आठवले. किंमत प्रत्येकी नऊ रुपये फक्त. त्या खानावळीसमोर एक मत्स्याहारी खानावळ होती. तिच्यात कोळंबीचे झणझणीत कालवण खाल्ले होते. झकासच.
कोकणातल्या अशा लहान लहान गावांत रहायला मजा येते.
सन्जोप राव
जगण्यात मजा आहे, तोवरच मरण्यात मजा आहे.

अशोक पतिल's picture

29 Nov 2009 - 8:24 pm | अशोक पतिल

फारच सुरेख फोटो अहेत !!!

गोरख चिन्चेचा फोटो खुपच छान आला आह्रे . जसा तु ओक्टोपस च्या जाळ यात सापडला आहेस.

---------अशोक पतिल

प्रभो's picture

29 Nov 2009 - 9:12 pm | प्रभो

विमुक्ता, मस्तच रे....सुंदर आहेत फोटो...

--प्रभो
-----------------------------------------------------------------------
काय सांगावे स्वतः विषयी,आहात तुम्ही सूज्ञ !! एका सारखे एकच आम्ही,बाकी सगळे शून्य !!

हर्षद आनंदी's picture

30 Nov 2009 - 6:51 am | हर्षद आनंदी

रेवदंड्यावरुन मुरुड-जंजिरा, अलिबागला बर्‍याच फेर्‍या झाल्या आहेत, पण रेवदंड्याला कधी खास थांबलो नाही. थांबावे अशी फार ईच्छा होते, पण कधी योग नाही आला.

पण अरूंद रस्त्यावरुन जाताना गर्द माडाची झाडी, समुद्राची गाज, लोभसवाणा सुर्यास्त वेड लावतो.

आम्ही हिंदूत्ववादी !! आमची शाखा कुठेही नाही..

विशाल कुलकर्णी's picture

30 Nov 2009 - 9:24 am | विशाल कुलकर्णी

मस्त रे विमुक्ता !

सस्नेह
विशाल
*************************************************************

आम्ही इथेही पडीक असतो "ऐसी अक्षरे मेळविन!"

महेश हतोळकर's picture

30 Nov 2009 - 10:00 am | महेश हतोळकर

आणि सुरेख फोटो.

... एक नंबरचा उनाड होतो...

आताही काही वेगळा वाटत नाहीस. असाच रहा.

दिपक's picture

30 Nov 2009 - 12:00 pm | दिपक

झक्कास रे बाला !

फ्रॅक्चर बंड्या's picture

30 Nov 2009 - 2:09 pm | फ्रॅक्चर बंड्या

मस्तच ...

binarybandya™

sneharani's picture

30 Nov 2009 - 3:50 pm | sneharani

फोटो आणि गावही मस्तच...
आवडले...

चतुरंग's picture

1 Dec 2009 - 12:33 am | चतुरंग

रेवदंड्याची मस्तच सफर घडवून आणलीस रे! लग्गेच ह्या शनिवारी निघावे आणि रेवदंडा करुन यावे असे वाटू लागले पण तसे शक्य नसते ना? :( असो. तुझ्या चित्रातून बघायला मिळते हेही नसे थोडके.

चतुरंग

दत्ता काळे's picture

1 Dec 2009 - 2:11 pm | दत्ता काळे

दोन वर्षापूर्वी मी अलिबाग परिसरातील चार किल्ल्यांचा ट्रेक केला होता, त्यावेळी शेवटचा किल्ला कोरलाईगड करण्याच्या आदले दिवशी रेवदंड्याला मुक्काम केला होता. रेवदंडा मला फारच आवडून गेलं.

माझ्या सुदैवाने मुक्कामाच्या दिवशी त्रिपुरी पोर्णिमा होती. त्यावेळी तिथल्या चौलच्या रामेश्वर मंदिरात आरास केलेली होती, समोर फटाक्यांची आतषबाजी, समोरच्या तळ्याच्या पाण्यात लोक दिवे / तरंगणार्‍या पणत्या सोडत होते, भोवताली अतिशय प्रसन्न वातावरण होतं. ते दृष्य अजूनही डोळ्यासमोर येतं.

पुढील त्रिपुरी पोर्णिमेला रेवदंडा-चौल आणि फणसाडचं अभयारण्य ह्या भटकंतीचं नियोजन आत्ताच करून ठेवलेलं आहे.

विमुक्त, तुमचा लेख आणि छायाचित्रण केवळ अप्रतिम.

यशोधरा's picture

1 Dec 2009 - 5:59 pm | यशोधरा

मस्त आहेत फोटो. रेवदंडा कोटाचे सगळे फोटो तर खूपच आवडले!

केशवराव's picture

1 Dec 2009 - 10:44 pm | केशवराव

विमुक्त , अरे मी पण अलिबाग जवळील चोंढी गावचा.

भटकंती अनलिमिटेड's picture

16 Dec 2009 - 12:00 am | भटकंती अनलिमिटेड

मी एकदा पुणे-अलिबाग ते हर्णे-पुणे ८०० किमीची मोटरसायकल ट्रिप केली होती. तेव्हा अलिबाग, रेवदांडा, कोर्लई, मुरुड, जंजिरा असे बरेच पाहिले होते. छान आहे पोस्ट.

-Pankaj भटकंती Unlimited
www.pankajz.com

स्वतन्त्र's picture

17 Feb 2010 - 12:23 am | स्वतन्त्र

आपले गाव फारच सुन्दर आहे !!!