टर्रर्रर्रर्र...
घड्याळानं भोकाड पसरलं आणि अगदी एका सेकंदात आबासाहेबाचा सरावलेला हात गाप्पकिनी त्या घड्याळाच्या डोक्यावर आपटला. घड्याळाचा आवाज बंद. आबासाहेबानं नुसती कूस बदलल्यासारखी केली आणि परत पहाटेच्या गुलाबी थंडीत विरून गेला. खरं तर आबासाहेबाला घड्याळाची गरजच नव्हती. शाळेत असल्यापासून पहाटे ५ वाजता उठायची सवय लागली होती. आणि आता गेल्या १०-१२ वर्षात तर ही सवय इतकी अंगवळणी पडली होती की एकवेळ घड्याळ बंद पडेल पण आबासाहेबाचा डोळा ५ वाजता उघडणार नाही असं होणारच नाही. शाळेत कॉलेजात अभ्यास तरी असायचा, आता तेही नाही, तरीही येतेच जाग. लोळता लोळता आबासाहेबाला परत छान डुलकी लागली. थोड्यावेळानं खिडकीतून ऊन आत, अगदी डोळ्यावर आलं तसं तो एकदम भानावर आल्यागत उठून बसला.
डोळे चोळत त्यानं आजूबाजूला बघितलं आणि एकदम त्याच्या लक्षात आलं की इतकावेळ आपल्या बाजूला सुमी झोपली आहे असं वाटत होतं ते स्वप्नच होतं. एक क्षणभर तो अगदी कावल्यागत झाला. दबा धरून बसलेलं मांजर आता अगदी दूधाच्या पातेल्यावर झडप घालणार आणि तेवढ्यात त्याच्या पाठीत काठी बसावी अस्सं झालं अगदी त्याला. पण मग त्याला स्वतःचंच हसू आलं. आपल्याच हाताने डोक्यावर टपली मारत तो उठला.
'आबासाहेब, हितं कुटली आली सुमी? तुमचे तुमीच हितं. उटा आनि आवरा. ऑफिसला जायला उशिर होतोय.' स्वतःला समजवल्यागत करत तो चटचट आवरायला लागला.
खरंतर आबासाहेबाला जिल्ह्याच्या गावात एकटं राहणं अगदी जीवावर यायचं. कॉलेजात जाईपर्यंत गावात उंडारत आयुष्य काढलेलं त्यानं. अभ्यासात बरा होता म्हणून बापानं हौसेनं शिकायला कॉलेजात धाडलं त्याला. शहराचं आकर्षण असल्यानं आबासाहेबही खुश झाला होता. पण नव्याची नवलाई ओसरल्यावर 'गड्या आपुला गाव बरा...' असंच वाटायला लागलं त्याला. पण इलाज नव्हता. शिक्षण आवश्यक होतंच. त्याचं घराणं खरं तर तालेवार. एके काळी आपली पाचसहाशे एकर शेती होती असं त्याचा बाप त्याला नेहमी सांगायचा. पण पुढे कूळकायद्यात बरीचशी जमीन गमावली, उरलेली भावकीत वाटण्यात गेली आणि अगदी किरकोळ २५-३० एकर तेवढी राहिली हातात. आबासाहेबाच्या आज्ज्यापर्यंत तर घरात सावकारीही होती आणि जमिनदारीही. आख्खं गाव पायापाशी उभं राहत होतं. दरारा एवढा की वाड्यासमोरून जाताना लोक जोडे हातात घेऊन जात होते. पण जमिनी गेल्या, सावकारी संपली आणि दरारा गेला. समानतेच्या लाटेत जमिनदाराचं घराणं भुईसमान झालं. पण आबासाहेबाच्या बापानं, रावसाहेबानं सगळ्यांशी दिलजमाईचं धोरण ठेवल्यानं आन् संबंध राखल्यानं गावात अजूनही थोडाफार मान होता. पंचवीस एकर जमीन तीन भावात वाटल्यावर काय शिल्लक उरणार आन् कोणाची पोटं भरणार या विचारानं आबासाहेब कॉलेज संपल्यावर तिथं जिल्ह्यालाच नोकरी धरून राहिला. बर्यापैकी चेहरामोहरा आणि चालणारं डोकं या बळावर लवकरच तो नोकरीतही व्यवस्थित स्थिरस्थावर झाला.
गाव तसं फार लांब नव्हतं. एस्टीनं चारेक तासच. पण दर एक दोन दिवसाआड कोणी ना कोणी तरी यायचंच तिथून काहीबाही कामासाठी. त्यांच्याबरोबर माय पाठवायची काहीतरी. कधी भाजी, कधी घरचं तूप, कधी नुसतंच पत्र असं चालायचं. त्यामुळे आबासाहेबाला जरा थंडावा मिळायचा. पंधरा दिवसातून एखादी चक्कर तो स्वतः मारायचा. पण सहा महिन्याखाली लगिन झालं, सुमी आयुष्यात आली आन् आबासाहेबाला करमंना झालं शहरात. बरं सुमीला हिकडं आनावं म्हनावं तर ते पण बरुबर दिसंना. त्यानं एकदा नुसतं हळूच विषय काढायचा प्रयत्न केला तर चुलती फिस्सकनी अंगावर आली त्याच्या.
"मोठी सून हाये ती. येवडी वर्सं तुझ्या मायनं केलं समद्यांचं आन् तू घेऊन चालला लगी तिला. तितं राजा-रानी र्हावा मजेत आन् हितं म्हातारा म्हातारी करतेतच अजून दुसर्यांचं."
सगळ्या बायका फिदीफिदी हसल्या होत्या. आबासाहेबाला कुटं तोंड लपवावं असं झालं होतं. सुमी पण मान खाली घालून पदर तोंडात धरून हसत होती. त्यानं तर अजूनच चिडला होता आबासाहेब. पण नंतर सुमीनंच समजूत काढली होती त्याची. असं वागणं शोभून दिसणार नाही, आपल्याला चार लोकांत रहायचं आहे, थोडं दमानं घ्या. थोडे दिवस जाऊ द्या मग हळूच जमवून आणू आपण, असं समजवल्यावर आबासाहेबाला पण हुरूप आला. अशी समजूतदार बायकू मिळाल्याबद्दल त्यानं खंडोबाला मनोमन नमस्कार घातला. आणि नाईलाजाने का होईना पण नोकरीच्या गावी रुजू झाला. तेव्हापासून हे असं चालू होतं.
आत्तासुध्दा तोंड धुताना, दाढी करताना आरशासमोर उभं राहिल्यावर त्याला सुमीच दिसत होती. पण आता पुढची चक्कर आलीच आहे चार पाच दिवसांवर या विचाराने त्याने मनाला लगाम घातला आणि निमूटपणे आवरून ऑफिसच्या रस्त्याला लागला. पण आज काय त्याचं चित्त थार्यावर येईना. सारखी सुमीची आठवन यायलागली. कसातरी ऑफिसात पोचला आणि मग मात्र जरा ते मागं पडलं. नेमका दुपारी गावाकडचा कैलास ऑफिसात हजर. आबासाहेबाला अगदी तापल्या रानावर हलकेच पाऊस पडून जावं तसं झालं. आज लई आटवन यायलागली होती आन् आला बाबा हा कैलास. कैलास तर त्याच्याच वयाचा, शाळूसोबती. चार घटका त्याच्या संगतीत घालवल्यावर आबासाहेब शांत झाला. कैलासनं रावसाहेबांची चिठ्ठी आणल्याली. त्यानं गडबडीनं पाकिट फोडलं. त्यातनं दोन कागद निघाले. नेहमी चार ओळी लिहिणार्या रावसाहेबांनी आज चक्क २ पानांचं पत्र लिहिलंय!!! त्यानं कागद समोर धरला. त्यात लिहिलेलं,
चिरंजीव आबासाहेबांस,
अनेक आशिर्वाद, उपरी विशेष. सध्या गावात थोडीफार थंडीतापाची साथ चालू आहे, बरेच लोक आजारी आहेत. चार पाच मयती झाल्या आहेत. तरी आम्ही सगळे रानात रहायला जात आहोत. खबरदारी म्हणून. घरात कोणासही त्रास नाही. महादा राखणीला म्हणून राहिल वाड्यावर.
बाकी क्षेम. काळजी नसावी. यावेळचे येणे थोडे लांबवता आले तर उत्तम. काळजी घ्या, तब्येतीला जपा.
रावसाहेब.
आबासाहेबाने घाईघाईने दुसरा कागद उलगडला. त्यात लिहिलं होतं,
आवो, या ना.
सुमी
आधीच आज आबासाहेबाचं चित्त भरकटलं होतं, आता तर पार ढेपाळलाच गडी. कैलासनेच जरा समजूत घालून शांत केले त्याला. गावात तशी काही फार गंभीर परिस्थिती नाहीये. काळजी घेतली तर आटोक्यात येईल. आबासाहेबाला नीट समजवून कैलास निघून गेला. आबासाहेबाला मात्र काही गोड लागेना. त्याची पंचाईतच झाली होती. ऑफिसचं इनिस्पेक्शन दोन दिवसावर आल्यालं, रजा घेता येईना. आन् गावात फोन तरी कुटं करनार. आख्ख्या गावात फक्त दोन फोन. एक पंचायतीच्या कार्यालयात आन् दुसरा पतपेढीच्या कार्यालयात. जरी केला फोन तरी तिथं सुमी कशी येणार? मोठ्या मुश्किलीने त्याने कसेबसे दोन दिवस घालवले. घालमेल चालूच होती. तिसर्या दिवशी संध्याकाळी ऑफिस बंद व्ह्यायच्या वेळी नेमका फोन आला.
'हॅलो, कोण?'
'आवो...'
'सुमे.... तू?'
आबासाहेब हातभर उडालाच. आत्ता या वेळेला सुमीचा फोन? आन् ती कशी काय फोन करतीये? कुठनं?
'आवो, ओरडू नका. मला लै आटवन यायलागली. म्हनून म्हादूकाकाला सांगाती घेऊन आले मी हितं पंचायतीच्या हापिसात. तुमी या ना.'
'अगं पण आत्ता संध्याकाळ व्हायलीये... गाडी गेली आसंल. आता कसं निगू?'
'ते काय मला माहित नाय. तुमी या मंजी या. आन् ऐका, रानात कोनीच न्हाय. समदे आत्याबाईकडे गेले हायेत आज दुपारच्याला. मी उगाच कंबर धरल्याचं नाटक करून मागं र्हायले. रानात येकटी नको म्हनून आज वाड्यावरच हाय, महादूकाका हाय सोबतीला. बरं मी ठिवते फोन, लोकं बघायलेत.' सुमीनं धाडधाड गाडी सोडून फोन बंद केला सुध्दा.
आबासाहेब खुळ्यागत बघतच राहिला. आता काय करावं? कसं जावं? आज मात्र त्याला स्वतःला आवरता येत नव्हते. आलंच नाही. इनिस्पेक्शनही झालंच होतं. त्याने साहेबाला २ दिवसाच्या रजेचा अर्ज दिला आणि तडक दिलप्याच्या घरी थडकला. दिलप्या त्याचा कॉलेजपासूनचा दोस्त. मारवाड्याचा. घरी तीनचार मोटरसायकली वगैरे बाळगून असणारा.
'दिलप्या लेका एक काम कर रे माजं...'
'आरं बोल की... '
'तुझी गाडी दे मला दोन तीन दिवसांकरता. आर्जंट गावी जाऊन यायचंय. सुमीचा फोन आला होता ल्येका... आता काय मला दम न्हाय बघ. गाडी दे नाहीतर चालत जातू बघ मी.'
'मायला आब्या, आसं इचारून गाडी घेऊन जायची वाईट चाल कधी पासून पडली रं आपल्यात? आँ? धर ही चावी आन् सूट. नेमका आजच टँक फुल्ल केलाय. नीट ग्येलास तर आकरा बारा पर्यंत पोचशील पण. ये निवांत, सगळं आटपून', डोळा घालत दिलप्या म्हणाला.
तिथेच चहा नाश्ता करून आबासाहेब थेट निघालाच. अंधार आणि हायवेची रहदारी. आबासाहेब अगदी जपूनच चालवत होता गाडी. गाव जवळ आलं, दिवे दिसायला लागले. आबासाहेब गावात शिरला तेव्हा साडेअकरा वाजून गेले होते. गाव अगदी शांत होतं. उगाच कोण चुकार भेटला तर चौकशा नकोत म्हणून आबासाहेब, थोडा आडवाटेनंच गावात शिरला आणि थेट वाड्यासमोरच गाडी लावली. वाड्यात उजेड दिसत होता. त्याने गाडी बंद करायच्या आतच दार उघडलं गेलं. दारात स्वतः सुमीच होती. आबासाहेब आत शिरला तशी तिनं पटकन दरवाजा लोटून दिला. सोप्यात आल्यावर तिथल्या उजेडात त्याने सुमीला बघितलं आणि बघतच राहिला. लग्नातही सजली नव्हती तशी सजून सुमी त्याच्या स्वागतासाठी वाट बघत होती. आबासाहेबाला एवढा शीण करून आल्याचं सार्थक झाल्यासारखं वाटलं. चारपाच तास मोटारसायकलवर रात्रीच्या अंधारात हायवेवरून यायचं म्हणजे काय चेष्टा नाही. त्याचं अंग अगदी मोडून गेलं होतं. पण सुमीला बघून त्याला अगदी राहवेना,
'सुमे, काय गं? आज काय पेश्शल बेत हाय का काय?'
'तर, मी येवडं प्रेमानं बोलावलं आन् तुमी धावत आलेत मंग पेश्शल खातिरदारी नकू का?'
'सुमे, माझा तर इश्वासच बसंना गं!!! दुपारधरून कासावीस झालो होतो बघ. कोन तरी ओढतंय आसं होत होतं बघ. तुझा फोन येई पर्यंत वाटलं पन नव्हतं की रात्री मी हितं असेन. तुझ्याबरूबर.'
'आसंच आसतंय. कधी काय व्हईल काय सांगावं? आन् आसं अचानक भेटन्यातच गंमत जास्त आसती.'
'आगं पन एकटीच कशी तू? म्हादूकाका कुटं हाये? तू म्हनाली व्हतीस की त्यो पन हाये सोबतीला.'
'आवो हितंच होता की. गेला आसंल मागं गोठ्यात. मी बगते त्याला.'
'बरं, आदी च्या कर गं फस्क्लास. जेवायचं बगू नंतर. तशीबी जेवनाची भूक न्हाईच मला फारशी.' आबासाहेब सुमीकडं रोखून बघत म्हणाला.
'चला...' लाजून हसत हसत सुमी आत मधे पळाली.
आबासाहेब पटकन हातपाय धून कापडं बदलून एकदम हुश्शार होऊन चुलीपाशी सुमी जवळ पाटावर येऊन बसला. सुमी पुढ्यात च्याचा कप घेऊन बसली होती. कसल्यातरी तंद्रीत होती जनू. तो येऊन बसल्याचंही तिला कळलं नाही. निवांत बसत तो भिंतीला टेकला.
'ए सुमे, काय झालं गं? कसला विचार करतेस एवढा? आन तो च्या इकडं.' कप हातात घेत तो म्हणाला. तिला हळूच हलवलं त्याने. सुमी भानावर आली,
'मी काय म्हंते, आता परत जाऊच नका. हितंच र्हावा. काय आसंल ते आपन गोड करून खाऊ. पन आता दूर नाही र्हानार मी.'
'शाब्बास गं माज्जी रान्नी!!! आदी कोन बोलत होतं? तुमी जावा, मी र्हाते, हळूहळू येईन मी तिकडं. आन् आता काय झालं?'
'व्हय हो... मीच म्हनलं होतं. पन आता येगळं हाय. आता न्हाय जमनार तसं. तुमी हितंच र्हावा.' त्याच्या कुशीत शिरून सुमी मुसमुसत म्हणाली. तिच्या डोळ्याला ज्या धारा लागल्या त्या थांबेचनात. बराच वेळ आबासाहेब तिला समजवत राहिला. पण रडणं काही कमी होईना. शेवटी आबासाहेब उगाच तिचं लक्ष हटवायला काहीतरी म्हणायचं म्हणून म्हणाला,
'आर्रर्र, च्यात साखर कमी झाली बघ. तो डबा घे जरा साखरंचा.'
त्याच तंद्रीत सुमीनं हात लांब करून फडताळाच्या अगदी वरच्या फळीवर असलेला साखरेचा डबा अल्लाद उचलला आन् आबासाहेबाच्या पुढ्यात ठेवला. क्षणभर आबासाहेबाला काहीतरी चुकतंय, काहीतरी विचित्र घडतंय असं वाटलं पण नीट कळेना. तेवढ्यात त्याच्या ध्यानात आलं. जमिनीवर बसलेल्या सुमीनं हात लांब लांब लांब करत नेऊन फडताळाच्या अगदी वर म्हणजे अगदी चार पाच फूट लांब असलेला साखरंचा डबा उचललाच कसा. त्याला काहीतरी जाणवलं. तो ताडकन् उठला आणि जीवाच्या आकांताने पळत सुटला. मागनं सुमीचा आवाज आला,
'आवो, कुटं जाताय? पळू नका. थांबा.'
आबासाहेब कुठला थांबायला. पळत पळत तो सोप्यापर्यंत आला. तेवढ्यात त्याला समोर सुमी उभी दिसली. तशीच सुंदर, नटलेली. चेहर्यावर गोड हसू. शांतपणे उभी. तो तिच्याकडे बघतच राहिला.
'मला सोडून जाताय? नका ना. आता नाही राहणार मी तुमच्याशिवाय. तुम्ही आणि मी. आपण दोघंच. बाकी कुण्णी कुण्णी नाही. या ना...' ती दोन्ही हात पसरत म्हणाली.
भारावल्यासारखा आबासाहेब हळूहळू पुढे सरकला. सुमीच्या सान्निध्यात त्याला आता शांत वाटत होतं. त्याने स्वतःला झोकून दिलं आणि तिच्या मिठीत विरघळून गेला.
****
'हवालदार, बॉडीची पोझिशन नीट आखून घ्या. फोटोग्राफर आलाय ना? तेही उरकून घ्या. आणि नातेवाईक कुठे आहेत?'
'साहेब, ते सगळे रानात होते, वाड्यात कोणीच नव्हतं. आत्ताच आलेत, तिथे चौकीत बसवून ठेवलं आहे त्यांना. हे अजून सांगितलेलं नाहीये साहेब त्यांना.'
'का?'
'सकाळी वाड्याचं दार अर्धवट उघडं दिसलं आणि बाहेर ही गाडी दिसली म्हणून लोकं डोकावले तर बॉडी दिसली. लगोलग सांगावा धाडला. तर काल संध्याकाळीच या इसमाची बायको मयत झाली होती साहेब. काल सकाळपासूनच अचानक तापानं फणफणली होती. साथ चालूच आहे साहेब गावात. संध्याकाळी झोपली तर घरच्यांना वाटलं की शांत पडली आहे, सकाळी पत्ता लागला, बहुतेक संध्याकाळीच आटोपली असणार. काय भानगड आहे कळेना साहेब.'
समाप्त
प्रतिक्रिया
11 Sep 2009 - 5:14 am | चतुरंग
काय शेवट असेल ह्याचा अंदाज येत असून सुद्धा वर्णनामुळे खिळून राहिलो शेवटपर्यंत.
बिपिन भयकर्ते! :O :T
(भ्यालेला)चतुरंग
11 Sep 2009 - 10:35 am | एकलव्य
काय शेवट असेल ह्याचा अंदाज येत असून सुद्धा वर्णनामुळे खिळून राहिलो शेवटपर्यंत.
मस्तच बिकाभाऊ!
18 Sep 2009 - 9:09 pm | गणपा
काय शेवट असेल ह्याचा अंदाज येत असून सुद्धा वर्णनामुळे खिळून राहिलो शेवटपर्यंत.
(नजरेतुन सुटला होत हा धागा)
11 Sep 2009 - 1:39 pm | विशाल कुलकर्णी
जबराच ! पण अजुन थोडी भिती दाखवता आली असती तर अजुन बहार आली असती बिकाभाऊ !
सस्नेह
विशाल
*************************************************************
आम्ही इथेही पडीक असतो "ऐसी अक्षरे मेळविन!"
12 Sep 2009 - 9:52 pm | सायली पानसे
जबरदस्त कथा .... आणि बिपिन भयकर्ते एकदम सॉलिड नाव..
11 Sep 2009 - 6:06 am | घाटावरचे भट
लैच भारी...
12 Sep 2009 - 12:36 am | पिवळा डांबिस
मस्तच गोष्ट आहे, बिका...
पण आता काकू कपाटातून डबा काढायला लागली की सगळं लक्ष तिचा हात लांब होतोय का याकडेच लागून रहाणार!!!!:)
पंचाईत केलीत राव!!!!
:)
13 Sep 2009 - 1:10 pm | दिपाली पाटिल
पण आता काकू कपाटातून डबा काढायला लागली की सगळं लक्ष तिचा हात लांब होतोय का याकडेच लागून रहाणार!!!! =))
हे एकदम भारी....
मी कथा रात्री वाचली आणि काय भिती वाटली सांगू...आजुबाजुला पाहीलं एक-दोनदा... :D
दिपाली :)
11 Sep 2009 - 6:32 am | हर्षद आनंदी
सकाळी सकाळी झणझणीत मिसळ... व्वा, तोंडाला चव आली.
बिचारा आबा, ४ फूट लांब हात पाहिल्यावर सगळं (सगळं) विसरला असणार ;)
क्रमशः न ठेवल्याबद्दल हार्दीक अभिनंदन!
वाचल्यावर २ मिनिटे असे वाटले की, आपण त्या घटनेचे प्रत्यक्ष साक्षीदार आहोत. बहोत बढीया !! जिओ...
11 Sep 2009 - 6:46 am | वैशाली हसमनीस
एका प्रेमकथेला अनपेक्षितपणे भयकथेचे वळण .सुंदर पण वेगळाच शेवट.
11 Sep 2009 - 6:53 am | नंदन
सुरुवातीची वातावरणनिर्मिती आणि ऍबरप्ट शेवट (सुमीच्या 'अचानक पाठलागा'सहित) मस्तच :), एकदा वाचून झाल्यावर मग कथेच्या मध्याजवळच्या 'दुपारधरून कासावीस झालो होतो बघ. कोन तरी ओढतंय आसं होत होतं बघ' यासारख्या वाक्यांचं प्रयोजन आणि खुबीने केलेला वापर लक्षात येतो.
नंदनमराठी साहित्यविषयक अनुदिनी
11 Sep 2009 - 7:01 am | रेवती
बापरे!!!
शेवट असा?
असो, कथा वेगळी व अनपेक्षित वळण असलेली.
रेवती
11 Sep 2009 - 10:56 am | विसोबा खेचर
हेच म्हणतो...
बिपिनशेठ, जियो...!
तात्या.
11 Sep 2009 - 7:14 am | सहज
प्रभावी लेखन!
भयकथा का प्युअर ट्रॅजेडी :-(
11 Sep 2009 - 8:09 am | सुबक ठेंगणी
भयकथा का प्युअर ट्रॅजेडी
असंच वाटलं :(
खिळवून ठेवणारे लेखन!
आबासाहेब आणि सुमी स्वर्गात तरी सुखाने एकत्र नांदोत!
11 Sep 2009 - 2:13 pm | कानडाऊ योगेशु
सहमत.
कथा वाचुन फार हळवा झालो.!
11 Sep 2009 - 7:23 am | sujay
बाब्बो,लईच टेरीफीक शेवट !
क्रमशः न ठेवल्या बद्दल थांकु .
(घाबरगुंडी उडालेला) सुजय
11 Sep 2009 - 7:28 am | मीनल
मी म्हनते -ती हात लांब करायची गोस्ट जुनीच हाय.पण ती रंगवून लई छान लिवली हाय. सेवटला काय व्हतय ते आंदी कळालच न्हाई बगा.
मीनल.
11 Sep 2009 - 8:05 am | प्राजु
वर्णन आणि एकूणच कथेचा बाज मस्त सांभाळला आहे.
तापाच्या साथिचा उल्लेख वाचल्यावर अंदाज आला होता शेवटाचा पण.. कथेचा एकूण परिणाम जबरदस्त साधला आहे. :)
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/
11 Sep 2009 - 8:06 am | पाषाणभेद
छान कथा.
आबासाहेब व सुमी बद्दल जास्तच कणव वाटायला लागली. शेवटी ते दोघ एकत्र आलेच.
-----------------------------------
काय! तुमच्या घरी कॉटवरील गादीखाली, दुकानांत मिळणार्या प्लॅश्टीकच्या पिशव्या ठेवत नाही? नक्कीच! तुम्ही अतीउच्च वर्गीय आहात.
- पाषाणभेद उर्फ दगडफोड्या
11 Sep 2009 - 8:37 am | दशानन
:)
काय बात है... लै भारी !
* तिकडे ते अॅडी घरच्या घर साफ करत आहे.. इकडे हे बिकासेठे... सरळ घरातल्यांना वर पाठवत आहे.... =))
चालू दे.. ;)
सकाळ सकाळी काही तरी गोड वाचावं असे वाटलं... सुरवात वाचून प्रेम कथा असेल असे वाटतं होतं.. शेवट वाचला तेव्हा... खाडकन चेहरा उतरला बघा माझा राव :(
11 Sep 2009 - 8:51 am | मुक्तसुनीत
कथा आवडली. अनेक वर्षानी भयकथा वाचली. मजा आली.
11 Sep 2009 - 9:59 am | ३_१४ विक्षिप्त अदिती
मस्त लिहीलं आहेस बिका, वर्णन, शैली आवडलं.
आधी तळापर्यंत स्क्रोल करून क्रमशः नाही ना ते पाहिलं आणि मगच कथा वाचली. ;-)
("मैत्रिण") अदिती
11 Sep 2009 - 1:13 pm | मनिष
+१ सहमत. अगदी अदृश्य मजकुरापर्यंत! :)
11 Sep 2009 - 9:10 am | विंजिनेर
अक्शी झ्याक... प्रियालीबैंच्या कथेची आठवन आली...
नाय म्हनलं तरी आक्शिडन लईच पाप्युलर श्टाईली हाये भुताच्या गोष्टीवाल्यांमदी...
11 Sep 2009 - 10:03 am | निखिल देशपांडे
बिका ची कथा म्हणुन आल्या आल्या हीच उघडली.
मस्त वातावरण निर्मीती केली आहे...
कथेचा शेवट काय असु शकतो अंदाजा येत होता तरी पण शेवट पर्यंत खिळवुन ठेवले.
क्रमशः न ठेवल्याने आनंद झाला.
असो, असेच लवकर तुम्हाला माती चा पुढचा भाग लिहिण्यास वेळ मिळो हीच ईश्वराच्या चरणी प्रार्थना
निखिल
================================
रात्री अडीच वाजता जाग आल्यावरसुद्धा तुम्ही खरडवही चेक करूनच झोपता?? तर तुम्हाला नक्कीच मिपाज्वर झाला आहे!!!!!
12 Sep 2009 - 10:39 pm | सखी
कथेचा शेवट काय असु शकतो अंदाज येत होता तरी पण शेवट पर्यंत खिळवुन ठेवले.
कथा खूपच आवडली.
11 Sep 2009 - 10:49 am | श्रावण मोडक
अचानक शेवट!
क्रमशः नाही याचं बरं वाटलं म्हणायचं तर पंचाईत, कारण कथेला अवकाश होता अजूनही. क्रमशः असतं तर याही कथेची माती झाली असती की काय ही भीती. एकूण पंचाईतच.
लिहिण्याची शैली वगैरे बिकाबाबत दुय्यम. ही हॅज दॅट. आतला दम किती हेच महत्त्वाचे.
11 Sep 2009 - 10:54 am | प्रभो
१ नंबर बिकाशेठ.......झकास वळण...
11 Sep 2009 - 11:00 am | अमित बेधुन्द मन...
काय शेवट असेल ह्याचा अंदाज येत असून सुद्धा वर्णनामुळे खिळून राहिलो शेवटपर्यंत.
11 Sep 2009 - 11:02 am | गोगोल
कथेचा शेवट काय होणार आहे ते आधीच समजले होते. पण निव्वळ अप्रतिम वातावरण निर्मिती, सयुन्क्तीक शब्द योजना यामुळे शेवट पर्यन्त कथा सही झाली.
बिका साहेब तुम्ही या कथेमुळे स्वतःला ए वन लेखकान्च्या श्रेणीत खूप वरती नेवून बसवले.
11 Sep 2009 - 11:12 am | सुधीर काळे
झकास गोष्ट! (८० टनाची) भट्टी मस्त जमली आहे!!
सुधीर
------------------------
छत्रपती शिवाजी आंतरराष्ट्रीय विमानतळावर मराठी भाषेतील फलक लागलेच पाहिजेत.
11 Sep 2009 - 11:31 am | विजुभाऊ
वा बिका काका मस्त कथा.
पास हा शब्द जर इंग्रजी असेल तर नापास हा शब्द कोणत्या भाषेतला आहे
11 Sep 2009 - 11:37 am | परिकथेतील राजकुमार
पॉशच बिका !
©º°¨¨°º© परा ©º°¨¨°º©
'अनीवे' शिवाजी विद्यापिठातुन मिपा आणि मिपाकर 'यांछ्यावर' पी एच डी करण्याच्या विचारात असलेला.
आमचे राज्य
11 Sep 2009 - 11:45 am | यशोधरा
मस्त लिहिलय! सॉल्लीड!
11 Sep 2009 - 12:35 pm | श्रद्धादिनेश
छान आणि धक्कादायक...
11 Sep 2009 - 1:32 pm | अभिज्ञ
.../\...
बिपीनदा,
धन्य आहेस. भयकथा एकदम "कातिल" झाली आहे.
खल्लास.
अभिज्ञ.
--------------------------------------------------------
पॉझिटिव्ह थिंकिंग....? अजिबात जमणार नाहि.
11 Sep 2009 - 1:32 pm | अवलिया
सुरेख !
(माती वेळेत पुर्ण केली असती तर चार ओळींची प्रतिक्रिया दिली असती. असो)
--अवलिया
============
यॉर्कर भल्याभल्यांची दांडी उडवतो... म्हणुन पक्षपाती पंच त्याला नोबॉल ठरवतात.
11 Sep 2009 - 1:38 pm | ऋषिकेश
सुरवात थेट कौंचवधमधून आल्यासारखी वाटल्यामुळे अंदाज वेगळा होता.. पुढेही कथा भयकथेकडे वळेल असं अज्जिबात वाटलं नाहि.
धक्कादायक शेवट.. मस्त कथा!
बाकी ते मातीचं काय झालं पुढं?
ऋषिकेश
------------------
दूपारचे १ वाजून ३६ मिनीटे झालेली आहेत. चला आता ऐकूया "सावरखेड एक गाव" मधील एक सुमधूर गीत "होश्शियाऽऽर...."
11 Sep 2009 - 2:30 pm | भडकमकर मास्तर
पुढेही कथा भयकथेकडे वळेल असं अज्जिबात वाटलं नाहि.
धक्कादायक शेवट.. मस्त कथा!
हेच मन्तो..
आप्ल्याला शेवटापर्यंत अंदाज नाय आला बुवा...
मला वाटलेलं, की घरचे ऐन वेळी परत येणार आन फजिती वगैरे.. मग धावपळ आन आस्लंच काहीबाही... ये भल्तंच..
पण मस्त..
_____________________________
हल्ली प्रातःसमयी ओ सजना बरखा बहार आयी ऐकतो... जय बालाजी
11 Sep 2009 - 1:44 pm | टारझन
जगा ... बिपिनकाका .. जगा !
- टारझन
असो ... प्रतिक्रिया अवांतर वाटू शकते , वाचकांना विनंती आहे की त्यांनी धर्य ठेवावे आणि ऊडायच्या आत वाचावे.
11 Sep 2009 - 2:04 pm | हृषीकेश पतकी
खूप सुरेख कथा..
सुमीचा हात डोळ्यासमोर आला तेव्हा अचानक प्रेमकथेची भयकथा झाली...
पण हा धक्का अनपेक्षीत आणि परिणामकारक...
नक्कीच!!
=D> =D>
आपला हृषी !!
11 Sep 2009 - 2:06 pm | क्रान्ति
काय मस्त भट्टी जमलीय!
क्रान्ति
दिव्यत्वाची जेथ प्रचीती | तेथे कर माझे जुळती
अग्निसखा
रूह की शायरी
11 Sep 2009 - 2:26 pm | विमुक्त
भारी लिहीलयं...पण भीती नाही वाटली वाचताना... जरा रंगवायला हवी होती कथा...
11 Sep 2009 - 2:46 pm | प्रसन्न केसकर
लिखेला है भाई! ऐसेच और लिखते जाओ.
पम्या
11 Sep 2009 - 4:15 pm | अनिल हटेला
सह्ही जमलीये.....आवडली कथा......:-)
बैलोबा चायनीजकर !!!
I drink only days ,which starts from 'T'...
Tuesday
Thursday
Today ;-)
11 Sep 2009 - 4:35 pm | लिखाळ
कथा छान लिहिली आहे.
हात लांब करुन खोलीची कडी लावण्याची गोष्ट बहुधा वपुंची आहे असे वाटते आहे. कथा काय असेल त्याचा अंदाज आला होता. पण शेवटपर्यंत वेग इतका छान पकडला होता की मजा आली. वातावरण वगैरे एकदम फर्मास ... फार छान !!
अजून लिही भयकथा :)
आणि आखातात पाठवलेल्या वडिल-मुलाच्या कथेचे काय झाले?
-- लिखाळ.
आम्ही विभक्ती प्रत्यय शब्दाला जोडून लिहितो. तुम्ही कसे लिहिता?
11 Sep 2009 - 5:07 pm | विनायक प्रभू
कथा आवडली
12 Sep 2009 - 12:16 am | चित्रा
अंदाज नाही आला. पण छान कथा. हॅलोविनचे वारे तुमच्यापर्यंतही आले का?
लिखाळ म्हणतात तशी कथा खूप पूर्वी वाचल्याचे आठवते, त्यातल्या कथानायिकेचे नाव हेमा असावे - ते लक्षात आहे, कारण खूप घाबरले होते :(
या कथेचा ग्रामीण बाज चांगला सांभाळला आहे. आणि दु:खद शेवट.
12 Sep 2009 - 1:19 am | विकास
हात लांब करुन खोलीची कडी लावण्याची गोष्ट बहुधा वपुंची आहे असे वाटते आहे.
ती वपुंच्या भुलभुलैय्या कथासंग्रहातील "हातमोजा" ही गोष्ट आहे. मात्र त्याचे कथानक वेगळे आहे. मला देखील तरी त्याच गोष्टीची आठवण झाली.
11 Sep 2009 - 7:31 pm | धमाल मुलगा
च्यायला,
आधी मस्त काहीतरी गुलाबी प्रेमळकथा म्हणुन वाचत गेलो....
नेमकं शेवटाला कळ्ळं बिपिनदा अजुन विहिरीतून बाहेरच नाही आलेला.... :)
काय राव...खडे खडे हतौडा मार दिया ना शेखसाब तुमने :)
11 Sep 2009 - 7:58 pm | llपुण्याचे पेशवेll
होना आयला.. चांगल्या बहरवता येईल अशा कथेची भयकथा करून घाबरवले बुवा तुम्ही. हे म्हणजे अरेबियन नाईटस् सारखे झाले. :(
आम्ही अंमळ मनोरंजन होईल म्हणून चवीने वाचत होतो. असो.
कथा आवडली.
पुण्याचे पेशवे
एरवी सगळे कागद सारखेच. फक्त कागदाला अहंकार चिकटला की त्याचे सर्टीफिकेट होते.
Since 1984
11 Mar 2011 - 11:14 am | चिगो
होना आयला.. चांगल्या बहरवता येईल अशा कथेची भयकथा करून घाबरवले बुवा तुम्ही. हे म्हणजे अरेबियन नाईटस् सारखे झाले.
आम्ही अंमळ मनोरंजन होईल म्हणून चवीने वाचत होतो. <<
हेच म्हणतो. आम्ही प्रेमकथा/ फजितीकथा म्हणून वाच होतो.. तेवढ्यात हात लांब झाला..
कथा मात्र झक्कास...
11 Sep 2009 - 7:48 pm | अंतु बर्वा
शेवट्पर्यंत अंदाज येउ दिला नाहीत...
मस्त कथा...
11 Sep 2009 - 8:30 pm | योगी९००
मस्त लि़खाणशैली..सुरुवातीला भयकथा असेल असे वाटले नाही.
आवो, या ना.
सुमी
हे आवडले..
खादाडमाऊ
10 Mar 2011 - 11:57 am | मितभाषी
असेच म्हणतो.
11 Sep 2009 - 11:05 pm | स्वाती२
भयकथा आवडली.
11 Sep 2009 - 11:18 pm | विकास
कथानक आणि शैली दोन्ही आवडले.
बाकी इतरांनी वर म्हणल्याप्रमाणे सुमीचा हात क्रमशः लांबत गेला नाही ते बरे झाले. नाहीतर क्रमशः चे मला फार भ्या वाटतं #:S
12 Sep 2009 - 12:40 am | टुकुल
मस्त.... आवडली कथा...
क्रमशः नसल्याबद्द्ल धन्यवाद..
--टुकुल
12 Sep 2009 - 4:41 am | लवंगी
एका फटक्यात लिहिली आहे म्हणून जास्त आवडली
12 Sep 2009 - 7:30 am | प्रदीप
आवडली. वातावरणनिर्मिती सुंदर झालेली आहे. शेवट काय होणार, हे मात्र हळूहळू लक्षात येऊ लागले होते-- 'मधुमति'ची आठवण झाली.
12 Sep 2009 - 10:28 pm | शाल्मली
भयकथा आवडली.
वातावरण निर्मिती मस्त जमून आली आहे.
त्या आखातात गेलेल्या वडिल-मुलाचं काय झालं पुढे???
--शाल्मली.
13 Sep 2009 - 10:55 am | शाहरुख
छानच लिहीली आहे पण मला कथानक तेवढे नाही आवडले..
(कधी-कधी प्रामाणिक) शाहरुख
13 Sep 2009 - 11:48 am | प्रभाकर पेठकर
शेवट अपेक्षितच होता.
आबासाहेब मित्राची बाईक घेऊन जातो..... हायवेवरील रहदारी... वगैरे सूचक वाक्यातून आबासाहेबाचे काही बरेवाईट करण्याचा लेखकाचा विचार आहे की काय अशी शंका येत होती. गावी पोहोचल्यावर वाड्यावर एकट्या सुमीचे असणे ....म्हादबाचे गायब होणे... इत्यादी प्रसंगातून (सूमीचा) शेवट जास्तच सूचित होतो. आता प्रश्न होता दोघेही भूत योनीत गेलेत की काय? (तसे झाले असते तर जास्त मजा आली असती. कथेचे नांव बदलले असते ....'अमरप्रेम') पण तसे न होता शेवट अपेक्षिल्याप्रमाणेच झाला. असो.
सॉरी, बिपिनदा, मजा नाही आली .
आमची भांडणं समजुतीने मिटतात. मी माझी चूक कबूल करतो आणि बायको मला समजून घेते..... हे महत्त्वाचे.
18 Sep 2009 - 8:18 pm | मेघना भुस्कुटे
मलापण आला शेवटाचा अंदाज.
धक्का देण्यातच गोष्ट संपवून काय टाकलीत? अजून थोडी उत्कंठा वाढवणं, सुमीची घालमेल, तिची 'इच्छा', तिच्या 'राहण्याचं' कारण... हे सगळं करायला वाव होता खूप. पूर्वार्ध सुरेख, तपशिलवार. पण उत्तरार्ध कंटाळून घाईत गुंडाळल्यासारखा झालाय. नॉट फेअर.
19 Sep 2009 - 9:59 am | दिपक
मस्त कथा आवडली :)
5 Sep 2010 - 10:42 pm | स्पा
मस्त कथा आवडली ...........
एकदम zakaaaaas
6 Sep 2010 - 1:27 am | इंटरनेटस्नेही
कथा मस्तच आवडली.. साला एकट्याने रुम मध्ये झोपच येन नाही आता...
(बिपीन कार्यकर्ते यांच्य सिद्धहस्त लेखणीचा फॅन)
12 Mar 2011 - 1:19 am | निनाद मुक्काम प...
गावाकडचा बाज मस्त सांभाळाय .
आता वाडा झपाटलेला राहील
संसार अपुरा राहिला
.ह्या इच्छा व वासना त्या अभागी जोडप्यास मृत्युयोनीतून मुक्त होऊ देणार नाही .
13 Mar 2011 - 2:00 am | बबलु
शेवट खासच !! एकूण शैली आवडली.