पुडाच्या वड्या:
हिवाळ्यात कोथिंबीर स्वस्त मिळत असल्याने पुडाच्या वड्या घरोघरी केल्या जातात.
ही चितळेच्या बाकरवडीची रेसिपी नसून कोल्हापुरी बाकरवडी आहे.
साहित्यः
कोथिंबीर ६ मोठ्या गड्ड्या (साधारण १/२ किलो)
२-३ कांदे बारीक चिरलेले
२ लसूण गड्डी
२ इंच आले
२ टे.स्पून धणे-जीरे पावडर
३/४ वाटी वाळलेल्या खोबर्याचा कीस
२ टे.स्पून खसखस, तीळ प्रत्येकी
२ टे.स्पून गोडा मसाला (काळा मसाला)
२ टे.स्पून तिखट (चवीनुसार)
१/४ टी.स्पून हिंग, हळद प्रत्येकी
१ टी.स्पून साखर
मीठ चवीनुसार
तेल तळण्यासाठी
४ वाट्या बेसन
१ वाटी मैदा
१.प्रथम कोथिंबीर निवडून अदल्यादिवशी स्वच्छ धुवून कापडावर/पंचावर वाळवावी. वाळल्यावर दुसर्यादिवशी बारीक चिरावी.
२.खोबरे मंद भाजून हाताने कुस्करून बारीक करावे.
३.कांदे बारीक चिरून तेलावर परतून घ्यावेत.
४.तीळ व खसखस भाजून पूड करून घ्यावी.
५.एका मोठ्या भांड्यात (सारण मिक्स करणेसाठी) कोथिंबीर, खोबरे, तीळ-खसखस पूड, परतलेला कांदा,तिखट, धणे-जीरे पावडर, हिंग, मीठ साखर घालून हलक्या हाताने मिसळून सारण तयार करावे.त्यातच वाटलेले आले, लसूण घालावे.
६.बेसन व मैदा मीठ, हळद व थोडे तिखट घालून कडकडीत तेलाचे मोहन घालावे (साधारण १/४ वाटी) व पुरीप्रमाणे घट्ट भिजवून ठेवावे. साधारण १ तास ठेवावे.
७.साधारण लिंबाएवढा गोळा घेऊन लांबट पातळ पोळी लाटावी.
८.थोड्या तेलात गोडा मसाला मिक्स करावा.
९.लाटलेल्या पोळीला वरील मिश्रण (नं ८)सर्वत्र तेलाप्रमाणे सारखे लावावे. त्यावर कोथिंबीरीच्या सारणाचा पातळ थर पसरावा.
१०.किंचित दाब देऊन, त्याची गुंडाळी करावी व तिरके काप देऊन वड्या कापाव्यात.
११.कडेला पाणी लावून कडा बंद कराव्यात.
१२. कढईत भरपूर तेल गरम करून वड्या मंद आचेवर खरपूस तळ्याव्यात.
टीपः १.कांदे वापरले नाहीत तरी चालतात.(आम्ही फक्त दिवाळी ला वड्या करताना वापरतो).
२.लवंग दालचिनी ची पूड सुद्धा वापरतात.
३.सुक्या खोबर्याऐवजी ओल्या खोबर्याचा वापर करतात पण त्या जास्त दिवस टिकत नाहीत.
प्रतिक्रिया
14 Mar 2008 - 8:49 pm | प्राजु
स्वाती,
काय सुंदर आहे ही रेसिपी. कोल्हापूरला महाद्वार रोड जवळ कोणतं ते मंगल कार्यालय आहे तिथे दिवाळीच्या वेळेला इतर फराळासोबत या वड्याही असतात विक्रिसाठी. आठवतात मला आणलेल्या. अतिशय सुंदर लागतात. पूडाची वडी.. (बाकरवडी नव्हे)
धन्यवाद. पण मला सांग, साधारण एक कोथिंबीर गड्डी असेल तर याचे प्रमाण कसे घ्यावे. म्हणजे किती कमी?
- (सर्वव्यापी)प्राजु
23 Mar 2008 - 7:22 am | सृष्टीलावण्या
महाद्वार / महालक्ष्मी मंदीराजवळ अजून सुद्धा बरेच काय काय छान मिळते. उदा., इंदुमती कन्याशाळेसमोरचा दावणगिरी लोणी डोसा व स्पंज डोसा (केवळ अनुपम), स्वरुपलक्ष्मीची सोलकढी (अप्रतिम), तृषाशांतीचे कॉकटेल आईस्क्रिम (रुप मनोवेधक आणि चव अद्वितीय), मन्याबापू मिसळ (सुंदर), समर्थ उपाहारगृहचा उपमा (खमंग), म्हाडगुतचे भाजके पोहे (खुसखुशीत).
मात्र फडतरे मिसळ चाखता आली नाही (अरेरे) आणि कोल्हापुर संगीत चिवडा हे दुकान सदैव बंदच दिसले नाहीतर खरोखरच संगीत चिवडा हा प्रकार खाऊन पाहायचाच होता.. ( बहुदा मागील दाराने विकत असावेत.. हा हा हा ).
मात्र ह्या पुडाच्या वड्या सर्वत्र विचारल्या पण फक्त दिवाळीतच मिळत असाव्यात (आता इथेच कोणीतरी अस्सल कोल्हापुरकरीण गाठून तिच्याच हातच्या खाऊन पाहायला हव्यात).
बाकी रंकाळ्यावर एक्सप्रेस्सो कॉफी मात्र छानच मिळते हां.
कोल्हापुरच्या खाद्यवैभवाची नुसती एक झलक पाहूनच मन तृप्त होते. विनय हेल्थ होमवरच्या पाट्या आठवतात.... चमचमीत, खमंग, खुसखुसशीत, रसदार, स्वादिष्ट,
पेशवाई, दिलखेच, मनोहर, चुरचुरीत, रसभरीत, चित्ताकर्षक, राजेशाही, झणझणीत इ.इ.
कोल्हापुरचा विजय असो.
जाता जाता : वरील सर्व पदार्थांचे marketing करावे हाच ह्या लिखाणामागचा हेतू आणि वरील सर्व विक्रेते मला त्याबदल्यात आजन्म हे सर्व पदार्थ मोफत देणार आहेत याची कृपया नोंद घ्यावी.
>
>
मना बोलणे नीच सोशीत जावे, स्वयें सर्वदा नम्र वाचे वदावे...
15 Mar 2008 - 10:01 pm | चकली
पाकक्रुती आवडली . करून पाहिन.
चकली
http://chakali.blogspot.com
16 Mar 2008 - 8:20 am | विसोबा खेचर
ही पा कृ सुंदरच वाटते आहे...
धन्यवाद स्वातीताई..
तात्या.
16 Mar 2008 - 3:53 pm | स्वाती राजेश
प्राजु, लक्ष्मी मंगल कार्यालय आणि राधेशाम मंगल मधे दिवाळीच्या वेळी मिळतात..
१पेंडी कोथिंबीर ला साधारण १ वाटी बेसन आणि १/४ वाटी मैदा घेऊन पाहा.
त्यानुसार सारण कमी जास्त कर.
17 Mar 2008 - 12:06 am | प्राजु
हा....... बरोबर. लक्ष्मी मंगल आणि राधेशाम मंगल... बरोबर.
- (सर्वव्यापी)प्राजु
16 Mar 2008 - 8:47 pm | प्रभाकर पेठकर
पाककृती चमचमीत वाटते आहे. करून पाहिली पाहिजे. धन्यवाद.
17 Mar 2008 - 12:17 am | प्राजु
तुला कडाकण्या कशा करतात ते येते का? आणि दुसरे म्हणजे कोल्हापूर, बावडा या बाजूला मिळणारा बटाटा वडा.. तो कसा एकदम जाड आणि स्पाँजी कव्हर असलेला असतो .. पुण्यातल्या त्या पातळ कातड्यासारखा नव्हे...तो येतो का?
माहिती असेल तर देशिल का रेसिपी??
- (सर्वव्यापी)प्राजु
17 Mar 2008 - 11:03 am | मनस्वी
धन्यवाद स्वाती
>> ११.कडेला पाणी लावून कडा बंद कराव्यात. <<
म्हणजे काय.. नीट नाही कळले.
मनस्वी
17 Mar 2008 - 5:43 pm | धमाल मुलगा
स्वातीताई,
आपण स्वय॑पाकघरातला (देखील) माठ आहे.
पण पा कृ एक प्रत छापून घेतली आहे. घरी गेलो की आईला देणार आणि फर्मान सोडणार....'खिलवा आम्हाला' :-)))
वाचूनच तो॑डाला पाणी सुटल॑. खर॑ तर म्हणूनच मी तुमच्या पा कृ भागात फारसा फिरकत नाही. पण शिर्शक वाचूनच जीभ चाळवली...
-हावरट ध मा ल.