प्रस्तावना
गंपू ही एका असामान्य व्यक्तीमत्वाची असामान्य कथा आहे.मात्र "गंपूच्या चारीत्र्यामधे कृष्णाची झलक पाहायला मिळते व बरेचसे प्रसंग कृष्णाशीच संबंधीत असल्यासारखे वाटतात" असा माझ्या विरोधकांनी सूर लावला आहे. पण असल्या कारवायांना मी भिक घालणार नाही.ज्या पुस्तकाच्या एका आठवड्यात वीस हजार प्रती खपाव्या त्या पुस्तकाबद्दल विरोधकांचा जळफळाट होणे हे साहजिकच आहे. त्यामुळे त्यांचा हा विरोध मी माझ्या यशाची पहीली(दूसरी आणि तिसरी) पायरी मानुन चालत आहे,चालतच आहे आणि चालतच राहणार आहे.
गंपूचा उल्लेख
गेल्याच महिन्यात पुण्यात झालेल्या अखिल ताडीवाला रोड साहित्य संमेलनात या कादंबरीचा "असामान्य व्यक्तीमत्वाची व्यथा जनसामान्यांसमोर मांडणारे विद्रोही साहित्य" म्हणून विशेष उल्लेख करण्यात आला("मात्र विरोधकांनी त्यात विशेष काही नव्हते" अशी टिका केली होती.) शिवाय मार्केट यार्ड साहित्य परिषदेतर्फे "गंपू आणि भारतीय व्यापार" हा परिसंवाद आयोजित करण्यात आला होता.(त्यातही विशेष काहीच नव्हते अशी पुनश्च टिका झाली)
गंपूबद्दल काही-थोरांची मते
"गंपू हा आधूनिक विचारांच्या तरुणांचा प्रतिनिधी बनून रुढ परंपरांवर घणाघाती हल्ला करणारा नवनायक आहे"--श्री. पा.द.लेले(जेष्ठ साहित्यिक व अध्यक्षः प्रभातनगर जेष्ठ नागरीक संघ)
"गंपूच्या ह्या असामान्य प्रवासाची तुलना सिंदबादच्या सफरींशीच करता येईल." --श्री. का.रे.बोले(साहित्यिक व खजिनदारःहिंदू कॉलनी भ्रमण मंडळ)
"गंपूरावांसारख्या माण्साची आज ग्रामीन समाजाला गरज ह्ये.आम्ही त्यांना आव्हान कर्तो की त्यांनी आम्हाला सामील व्हावे."--श्री.झुंजारराव तुळपुळे(आमदार व संस्थापक-अध्यक्ष: ग्रामिण साक्षरता भियान)
टिपः प्रस्तूत लेख हा 'गोखूळवाडी बुद्रूकचा गंपू 'या कादंबरीचा संक्षीप्त परिचय आहे.रसिक वाचकांनी पुर्ण कादंबरी घरपोच मिळविण्याकरिता कृपया श्री.ध.र. लेले किंवा श्री. मा.र.लेले(डेक्कन जिमखाना,पुणे) यांच्याशी संपर्क करावा.
माथेरानचा नगरसेवक कणसे पाटील याचे अत्याचार दिवसेंदिवस वाढतच होते.या ना त्या विकासनिधीत फक्त त्याच्या एकट्याचाच विकास होत होता.गेली पंधरा वर्षे नगरसेवकपदी असूनही वॉर्डासाठी तो काहीच करायला नव्हता.विरोधक ही त्याच्याकडे असलेल्या गुंडांची फौज पाहून मूग आणि जे काही मिळेल ते गिळून गप्प बसले होते.भ्रष्टाचार करुन गडगंज संपत्ती मिळवूनही त्याची पैशाची भूक काही भागायला तयार नव्हती.आपले राजकीय आणि आर्थीक सामर्थ्य वापरुन नुकतीच त्याने विधानसभेची उमेदवारीही पदरात पाडून घेतली होती,यामुळे त्याची पाच गुणीले चार बरोबर विसही बोटे तुपात होती.अशातच एक दिवशी कणसेची एकूलती एक लाडकी बहीण देवयानी हिच्यासाठी माथेरानातच राहणार्या वासूअण्णा जाधव यांचे स्थळ चालून आले.वासूअण्णा बर्यापैकी सधन होते.(तरीही हे स्थळ चालून का आले-गाडीने का नाही आले याबाबत संभ्रम आहे)दिसायलाही बर्यापैकी होते.(थोडे सावळे होते एवढंच) देवयानीवर त्यांचे लहानपणापासूनच प्रेम होते.कणसे पाटील जाधवांच्याच परीचयातला असल्यामुळे त्वरीत होकार मिळाला.लवकरच चांगला मुहूर्त गाठून दोघांचे लग्न ठरले.वासूसारखे चांगले स्थळ बहीणीला मिळाले म्हणून कणसेला अपार समाधान लाभले होते.आणि देवयानीसारखी श्रीमंत बापाची एकूलती एक मुलगी(हूंड्यासकट) मिळाली म्हणून वासूअण्णाही खुषीत होते.लग्न समारंभ थाटात झाला.आणि साश्रृ नयनांनी बहीणीला निरोप देत असतानाच नेमका कणसेच्या जोतिषांचा निरोप आला व तुमचा आठवा भाचा तुमची राजकीय कारकीर्द संपुष्टात आणू शकतो म्हणून भविष्यातल्या धोक्याची सूचना दिली.कणसे पाटील कमालीचा अंधश्रद्ध होता.आणि शिवाय आता आपल्या राजकीय महात्वाकांक्षेवर आपलाच भाचा वरवंटा फिरवणार म्हटल्यावर तो रागाने लालबूंद झाला..ज्या बहीणीला निरोप द्यायचा त्याच बहीणीला तिच्या नवर्यासकट त्यांनी हाय वे जवळ असलेल्या आपल्या गुटख्याच्या कारखान्यात कैद केले.देवयानीच्या बाळंतपणावर त्याने करडी नजर ठेवली.ती प्रसूत झाली की प्रत्येक वेळी तो तिचं पोरं नेऊन उकीरड्यावर सोडून यायचा.खरेतर तो वाट पाहत होता तिच्या आठव्या अपत्याची.जोपर्यंत स्वत:च्या हाताने तो देवयानीच्या आठव्या पोराला यमसदनिकेत पाठवत नाही तोपर्यंत त्याला चैन पडणार नव्हती.
वासूअण्णा आणि देवयानीही कमालीचे आशावादी होते.त्यांनी कच खाली नाही("यावरुनच त्यांचे कैदेतही खायचे प्यायचे वांदे नव्हते हे सिद्ध होते"-अभ्यासकांचे मत). दिवसांमागून दिवस गेले तसे देवयानीलाही पुन्हा दिवस गेले.तिची प्रसूतीची वेळ जवळ आली होती.कणसेही यावेळी निवडणूकीच्या प्रचारात व्यस्त होता.आणि एक दिवशी देवयानी प्रसूत झाली.तिनं आपल्या आठव्या अपत्याला जन्म दिला.अनंत वेदना सोसूनही तिच्या चेहर्यावर समाधान झळकत होते.आपल्या नुकत्याच जन्मलेल्या पोराकडे देवकी आनंदाने पाहत होती."पोरगं रंगाने बापावर गेलं,आमच्या खानदानातली गोर्या रंगाची परंपरा याने मोडली"-देवकी मनातल्या मनात म्हणाली.पण रंगाने सावळा असला तरी त्याच्या चेहर्यावर वेगळेच तेज होते.डोळे बंद असल्याने त्या माऊलीला त्याचे चमकदार डोळे पाहता आले नाहीत.आपल्या मुलाकडे असे कौतूकाने पाहत असताना अचानक ती भानावर आली.आपलं हे मुलही दादा कुठल्यातरी उकीरड्यावर टाकून देणार आणि आधीच्या पोरांसारखाच हा ही लावारीसच्या अमिताभसारखा भटकत राहणार?. तिच्या मनाला अनेक विचारांनी घेरले. "नाही...नाही!या मुलाला तरी वाचवायलाच हवे.आपल्या मातापित्यांच्या,भावांच्या छळाचा बदला घ्यायला तुला मोठा व्हावंच लागेल." तीने मनोमन विचार केला आणि वासूअण्णाला सांगितला.त्यांनीही तत्काळ होकार दिला. कारखान्याच्या मागच्या बाजूस मैलापाणी बाहेर जाते;त्या मोठ्या गटारातून वासू बाहेर पडला.मध्यरात्र उलटून गेली होती.मुसळधार पाऊस चालू होता.आसपास कुठे रिक्षाही दिसत नव्हती,बारा वाजून गेले असल्यामुळे रिक्षावाला हाफ रिटर्न मागणार हे त्याच्या चाणाक्ष मनाने ओळखले.सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे त्याच्याजवळ पैसेच नव्हते,आणि आजकालचे रिक्षावाले जिथे रात्रीच्या पासिंजराला लूटायला कमी करत नाहीत ते एवढी माणूसकी कुठून दाखवणार.असा मनोमन विचार करुन त्याने सरळ चालतच एस.टी. डेपो गाठला.खिशात पैसे तर नव्हते पण सकाळ उजडायच्या आत त्याला गोखूळवाडी बूद्रूकला जाऊन परत यायचे होते. मनातल्या मनात देवाचे नाव घेत (कुठल्या देवाचे हे सांगायचे टाळल्यामुळे काही अभ्यासकांच्या टाळक्याने लेखकाची 'टाळभैरव' म्हणून हेटाळणी केली.मात्र लेखकाने त्यांच्या रटाळ बोलण्याकडे लक्ष देणे चाणाक्षपणे टाळले)तो गाडीच्या मागच्या बाजूची शिडी चढून टपावर जाऊन बसला.काही वेळाने गाडी हिंदकळत गोखूळवाडीकडे निघाली.चालून चालून दमल्यामुळे पोराला छातीशी धरुन तो निश्चिंतपणे झोपी गेला.
पहाट झाली होती.ड्रायव्हरने करकचून ब्रेक मारीत गाडी थांबवल्यामुळे वासूअण्णाला जाग आली.अर्धवट झोपेतच त्याने आजूबाजूला नजर टाकली. गोखूळवाडी बूद्रूकचा बस डेपो आला होता. तो खाली उतरला.नुकताच पाऊस होऊन गेल्यामुळे हवेत चांगलाच गारवा होता.त्याने बाजूच्याच टपरीवर जाऊन चहा बिडी मारली आणि नंदू मानेच्या घराकडे निघाला.नंदू माने हा सुप्रसिद्ध माने डेअरीचा(गाईचे व म्हशीचे ताजे-सकस दूध मिळण्याचे तालूक्यातले एकमेव ठिकाण) संस्थापक-चालक व वासुआण्णाचा मित्र विष्णूबुवा शेषनागपूरकर याचा आतेभाऊ होता.विष्णूबुवांमुळे तो वासूच्याही चांगलाच परीचयाचा झाला होता.नंदू निपूत्रिक होता.आपल्याला मूल नाही या विचाराने त्याची पत्नी येसूबाई सारखी आजारी असायची.पहाटेची वेळ असल्याने नंदू गोठ्यात गाई-म्हशींच्या धारा काढत बसला होता.वासूअण्णा सरळ घरात गेला.आणि त्याने आपल्या पोराला आजारी येसूबाईच्या बाजूला झोपवले आणि नंदूला काही न बोलताच परत कारखान्यावर गेला.आपलं मुल कुठे आहे हे काही त्यां दोघांनी(लाथा खाऊनही) कणसेला कळू दिले नाही. जोतिषाच्या सांगण्यावरुन नाही नाही त्या खटपटी करुनही कणसे निवडणूकीत दणकून आपटला.म्हणून त्याने जोतिषाच्या पार्श्वभागावर लाथा घालीत त्याला हाकलून दिले.आणि शेवटी वैतागून वासू आणि देवयानीलाही सोडून दिले.
इकडे इतकी वर्षे मूल नाही म्हणून कुठल्या कुठल्या देवांना नवस करणारे माने दांपत्य घरात मूल सापडल्याने आनंदून गेले.त्यांनी नवस फेडून देवाचे आभार मानले(नक्की कुठल्या देवाचा चमत्कार हे माहीत नसल्यामुळे ,सगळ्याच देवांचे विनाकारण फेडले-नवस)आणि पोराचं बारसं थाटामाटात केलं. आजूबाजूचे लोक त्यांना बरीच नावे ठेवीत पण त्यांनी मुलाचे नाव गणपत ठेवले. येसूबाई मात्र त्याला लाडाने गंपू म्हणत असे.लहानग्या गंपूच्या आगमनाने माने कुटूंब पुर्ण झाले.आणि नंदू मान्याने डेअरीवरचा 'माने डेअरी'चा(गा. व म्ह.चे ता.-स.दू.मि.ता.ए.ठि.) फलक काढून 'माने ऍन्ड सन्सचा' फलक चढवला.दिवसां मागून दिवस गेले.गंपू आता रांगू लागला होता.त्याच्या रांगण्यामुळे घर भरल्यासारखे झाले होते.मात्र गंपूच्या काही विचित्र सवयींमुळे येसूबाई फार चिंतीत होती.एकदा नंदूशेठच्या पलंगाजवळ ठेवलेल्या तंबाखूच्या बटव्यातली मुठभर तंबाखू गंपूने गिळली आणि मस्तपणे चावू लागला.येसूबाई घाबरली.तिला तर जणू आभाळ कोसळल्यासारखे झाले.तिने त्याच्या पाठीत रट्टा घालून त्याचं तोंड उघडलं आणि तिला आश्चर्याचा धक्काच बसला.गंपूच्या मुखात तिला साक्षात चंद्रदर्शन झाले व त्या दिवशी तिचा चतुर्थीचा उपवास असल्याने चंद्रदर्शनानंतर तिने लगेच उपवास सोडला.(टिकाकारांच्या मते येसूबाईला उपवास सहन न झाल्यामुळे तिने खोटे बोलून उपवास सोडला असावा तर काही अभ्यासकांच्या मते आपल्या मातेला उपाशी पाहवले गेले नाही म्हणून गंपूने मुद्दाम तांबूलभक्षण करुन आपल्या दैवी शक्तीचा वापर करुन चंद्रदर्शन घडवले असावे-अंनिसच्या मते -हा निव्वळ भास असावा).
पुन्हा दिवसांमागून दिवस गेले.एकदा बाजूच्याच कुणा एका इसमाची पुतणी (नावाबद्दल संभ्रम असल्याने पुन्हा एकदा खुबीने टाळले)जी शाळेला सुट्ट्या लागल्या असल्यामुळे गावी आली होती; खेळता खेळता येसूबाईच्या घरी आली.त्यावेळी येसूबाई पाणी भरायला विहीरीवर गेली होती(ग्रामपंचायतीच्या कृपेने तिथे जलवाहीनी पोचली नव्हती-पहा गोखूळवाडी बूद्रूक ग्रामपंचायत- विकासकामांचा अहवाल ) आणि नंदू ही गोठयात म्हशींकडे लक्ष देण्यात गर्क होता. बाळ गंपू त्यावेळी आपल्या दूधाच्या बाटलीतील दूध पिण्यात गर्क होता. त्याचा हेवा वाटून त्या पूतणीने गंपूच्या हातातली दूधाची बाटली हिसकावण्याचा प्रयत्न केला मात्र बाळ गंपू बाटली सोडत नाही हे लक्षात आल्याने तिने गंपूला चापट मारली.यामुळे चिडून बाळ गंपू तिला चावला,तेव्हा गंपूच्या पाठीत धपाटा घालून रडत रडत ती तिच्या घरी गेली.पुढे काही दिवसानी त्याचा साईड इफेक्ट होऊन ती पूतणी वारली. बाल गंपूचे बालपण अशाच अचाट चमत्कारांनी भरुन वाहत होते.त्याच्या चमत्कारांचे वर्णन करायला शब्दसागरही अपूरा पडेल.
गंपू आता ब-यापैकी मोठा झाला होता.रंगानं सावळा असला तरी गोंडस दिसत होता,चाणाक्ष होता.नुकत्याच वयात आलेल्या पोरींच्या आकर्शणाचा तो केंद्रबिंदू ठरला होता.मोठ्यांच्याही लक्षात न राहणारी सिनेमाची गाणी गंपू आपल्या जिभेवर अलगद नाचवायला लागला होता. गोखूळवाडीतली बारीक सारीक पोरंही दिवसभर गंपूच्या मागे मागे पळत रहायची,प्रत्येक वेळी त्यांना गंपूच हवा असायचा.गंपू आपला खाऊ आपणच खायचा आणि वर त्यांचा खाऊ ही फस्त करायचा यावरुनच भविष्यात हा पोलिस खात्यात किंवा राजकारणात पडणार असा अंदाज नंदूने बांधला.दिवसभर दंगा मस्ती करण्यात,खोड्या काढण्यात आणि भरपेट जेवण करण्यात गंपूचे दिवस जात होते. शिवाय त्याच्या गोजिरवाण्या रुपामुळे गोखूळवाडीतल्या पोरीही त्याचे पटापटा पापे घेत असत.अल्पावधीतच गंपू गोखूळवाडीत पॉप्यूलर झाला.सिनेमावाले बालकलाकाराकाराच्या भूमिकेकरिता नंदू मानेच्या घराबाहेर रांग लावू लागले.मात्र गंपूचा जन्म असले ऐहीक सुख भोगण्यासाठी झाला नव्हताच मूळी त्याला आपल्या आई बाबांच्या(हल्लीच्या भाषेत मम्मी पपांच्या) आणि भावंडाच्या छळाचा बदला घेण्यासाठी जणू राखिव जागा देऊन विधात्याने पाठविले होते.(या घटनेमुळे यमलोकांतही आऊटसोर्सिंग चालू झाल्याचा काही धंदेवाईक लोकांना साक्षात्कार झाला असून; भविष्यातली बाजारपेठ म्हणून यमलोकाकडे पाहिले जात आहे-इति अभ्यासक) याचा प्रत्यय तो पदोपदी देत होता.एकदा गावाजवळच्याच माळरानात गंपू आणि मंडळी क्रिकेट खेळत होती.बाजूलाच असलेल्या नदिकिनारी कालीया नावाच्या गुंडाची दारुची भट्टी होती.गंपूने मारलेला बॉल एका भट्टीत पडल्यामुळे कालियाचे अंदाजे पाचहजार रु.चे नुकसान झाले.(पहा: दै. पहाट-बातमीदार: श्री.स.दा.खोटे) या नुकसानीमुळे चिडून जाऊन कालियाने गंपूला नुकसान भरपाई म्हणून आपल्या पाच गाई कालिया ऍन्ड सन्सच्या पांजरपोळात जमा करण्याचा आदेश दिला मात्र गंपू आणि मंडळींनी हा आदेश झूगारुन देत असहकार आंदोलन सुरु केले.यामुळे सहकारावर विश्वास असलेल्या कालिया व त्याच्या गुंडांनी गंपू आणि मंडळींवर हल्ला केला.(या हल्ल्याची जालियानवाला बागच्या हल्ल्याशी तुलना होऊ शकते-इतिहासकार श्री. का.ल.गोरे व श्री. आ. ज. काळे)त्यावेळी हातात असलेल्या बॅटने कालिया ऍन्ड कंपनीला गंपू ऍन्ड कंपनीने चांगलेच प्रत्यूत्तर दिले.या घटनेमुळे गोखूळवादीतील वातावरण चांगलेच ढवळून निघाले व शेवटी कालीयाला पोलिसांकडून अटक झाली.पोलिस ठाण्यात त्याची चांगलीच धूलाई झाली.शिवाय त्याच्यावर मोका कायद्याअंतर्गत खटला भरण्यात आला.या घटनेचा दूसर्या दिवशी सगळ्याच आघाडीच्या वृत्तपत्रांनी 'कालिया मर्दन' म्हणून उल्लेख केला.
गंपूचे नाव आता पंचक्रोशीत गाजू लागले होते.शिवाय आता तो ऐन जवानीत येऊ लागल्याने गावातल्या सगळ्याच तरूणींच्या आणि त्यांच्या चिंताग्रस्त आईबापांच्या चर्चेचा मुख्य विषय होता. गंपूने साधी विजार घातली तरीही गावातील पोरे 'लेटेस्ट फॅशन' म्हणून त्याचे अनूकरण करित होती. येता जाता गावातल्या सगळ्याच तरूणी गंपूच्या कॉमेंट्सच्या शिकार होत होत्या,आणि त्यातच धन्यता मानत होत्या.गंपू पोरींचे माठ गिलोरीने फोडत असे,यामुळे गावात तरुणींकडून पितळी व तांब्याच्या हंडयांची मागणी घसरली व मातीच्या माठांचे भाव वधारले.(याच कारणास्तव मागच्या महिन्यातील कुंभारवाडा टाईम्सच्या मुखपृष्ठावर गंपूचे छायाचित्र झळकले व गंपूचा 'उद्योगशील तरुण' म्हणून विशेष उल्लेख करण्यात आला.)अंदरकी बात म्हणजे मागच्या वर्षीची 'मिस गोखूळवाडी बुद्रूक' ठरलेली व त्यानंतर घरच्यांच्या बळजबरीने त्याच गावात लग्न झालेली सौ. प्रेमलता उर्फ राधिका विश्वासपुरेचा गंपूवर खास जिव होता.गंपूलाही ती आवडत होती.मात्र जालिम जमान्यापुढे त्याचे काही चालले नाही.तरीही तो तिला चोरुन माळावर भेटायचाच.'गोखूळवाडी बूद्रूक आयडॉल' च्या अंतीम फेरीत गंपूने पाव्यावर वाजवलेले 'जब हम जवॉं होंगे' हे गाणे प्रेमलताला उद्देशून असल्याची जोरदार चर्चा आहे.
क्रमशः
प्रतिक्रिया
14 Mar 2008 - 8:34 pm | प्राजु
पुढचा भाग येऊदे लवकर...
- (सर्वव्यापी)प्राजु
15 Mar 2008 - 4:45 pm | ब्रिटिश टिंग्या
मस्त लिहीलयं.....पुढचा भाग येऊदे लवकर....
अवांतर : कणसे पाटलांनी देवयानी आणि वासुअण्णांना एकाच गुटख्याच्या कारखान्यात कैद का केलं बॉ?
आपला,
(वडगांव बुद्रुकचा) टिंग्या ;)
15 Mar 2008 - 7:48 pm | इनोबा म्हणे
कणसे पाटलांनी देवयानी आणि वासुअण्णांना एकाच गुटख्याच्या कारखान्यात कैद का केलं बॉ?
आपण फारच जिज्ञासू वृत्तीचे आहात हो! आता त्या वासूअण्णाला आणि देवयानीला एकत्र ठेवले नसते तर कथानायक कसा जन्माला आला असता? आणि तो नसता तर कादंबरी ऐवजी 'गुटखा उत्पादन प्रक्रिये'वरचा लेख लिहावा लागला असता ना!
"दिसामाजी काही(च्या काही) तरी ते लिहावे"
-इनोबा म्हणे
15 Mar 2008 - 7:26 pm | अभिज्ञ
कृष्णकथेचे हे जाहिर विडंबन फ़र्मास झाले आहे.
विनोदि नावांची खुसखुशित पेरणी झक्कास जमली आहे.
प्रस्तावना फ़ार आवडलि.फ़ारच छान.
पुढचा भाग केंव्हा देताय?
अबब
15 Mar 2008 - 8:06 pm | गोट्या (not verified)
राधे राधे !!!!!!!!!!
कृष्ण चे गुंपू ?? नामांतर :) क्या बात है.....
योगायोग पाहा चार दिवसापासून सध्या मी श्री कृष्णा चं वाचतो आहे (कादंबरी म्हणावे की व्यक्तीचित्रण ह्यावर अजून मी ठाम नाही आहे )
पण तुमचा प्रयोग मात्र जबराच :))
राजे
(*हेच राज जैन आहेत)
माझे शब्द....
15 Mar 2008 - 9:47 pm | लिखाळ
इनोबा,
फार सुंदर गद्य विडंबन ! सर्व नावे आणि प्रसंग एकदम मजेदार. ह. ह. पु. वा. झाली. :)
फार मजा आली. (उदाहरणादाखल अनेक वाक्ये इथे चिकटवावी असे वाटत आहे :)
पुढचे भाग लवकर टाका.
--लिखाळ.
'शुद्धलेखन' आणि 'शुद्ध लेखन' यांवरील चर्चा वाचून आमची पार भंबेरी उडाली आहे.
16 Mar 2008 - 12:40 am | स्वाती राजेश
छान विडंबन आहे. ह. ह. पु.वा.:))))))))))))))
16 Mar 2008 - 1:04 am | इनोबा म्हणे
प्रतिसाद दिलेल्या आणि न दिलेल्या(आयाला आता तुमच्याकडे बघायलाच पाह्यजे) सर्वांचे मनापासून आभार*.
*(हे वाक्य मा. केशवसुमार यांचे पेटंट वाक्य असून त्यांच्या परवानगीशिवाय इतरत्र वापरण्यात येऊ नये.)
"दिसामाजी काही(च्या काही) तरी ते लिहावे"
-इनोबा म्हणे
16 Mar 2008 - 10:44 am | विसोबा खेचर
प्रतिसाद दिलेल्या आणि न दिलेल्या(आयाला आता तुमच्याकडे बघायलाच पाह्यजे) सर्वांचे मनापासून आभार*.
तसं काही प्रतिसाद न दिलेल्यांकडे बघायलाच पाहिजे अश्यातला भाग नाही! :)
कारण अहो काही संकेतस्थळांवर तर शुद्धीचिकित्सक वापरून देखील फारसे प्रतिसाद मिळत नाहीत असा अनुभव आहे! त्या मानाने अवघी पाच-सहाशेच लोकवस्ती असलेल्या आमच्या मिपावर पाचसहाच का होईना परंतु मनापासून प्रतिसाद आले आहेत हे केव्हाही महत्वाचे! :)
असो, लेखमाला चांगली वाटते आहे. पुढील भागांच्या प्रतिक्षेत असून वाचायला उत्सुक आहे!
आपला,
(प्रशासक!) तात्या.
16 Mar 2008 - 11:11 am | इनोबा म्हणे
कारण अहो काही संकेतस्थळांवर तर शुद्धीचिकित्सक वापरून देखील फारसे प्रतिसाद मिळत नाहीत असा अनुभव आहे! त्या मानाने अवघी पाच-सहाशेच लोकवस्ती असलेल्या आमच्या मिपावर पाचसहाच का होईना परंतु मनापासून प्रतिसाद आले आहेत हे केव्हाही महत्वाचे! :)
ते महत्वाचे आहेत म्हणूनच मी इथे आहे.कितीही झाले तरी आपले घर ते आपले घर... मात्र घरातल्या वडिलधार्यांनी वारंवार लहानग्यांना "आपलं घर आणि दूसर्याचं घर" यांतला फरक सांगायची गरज असते काय?लहान असली तरी पोरं आपलं घर ओळखतातच. :)
मिपावर येऊन आता बराच काळ लोटला आहे.आजवर इथे जितका खेळलो,बागडलो आणि आपटलो सुद्धा तो आठवणींचा ठेवा मला जन्मभर पुरण्यासारखा आहे.त्याबद्दल आपला व मिपावासियांचा मी आभारी आहे. लहान तोंडी मोठा घास घेतला असेल तर क्षमस्व.
"दिसामाजी काही(च्या काही) तरी ते लिहावे"
-इनोबा म्हणे
16 Mar 2008 - 12:07 pm | विसोबा खेचर
कितीही झाले तरी आपले घर ते आपले घर...
वा! क्या बात है.. आपल्या या वाक्याने बाकी आम्ही भरून पावलो..
मात्र घरातल्या वडिलधार्यांनी वारंवार लहानग्यांना "आपलं घर आणि दूसर्याचं घर" यांतला फरक सांगायची गरज असते काय?
ठीक आहे. आता पुन्हा नाही समजावून सांगणार! आमचं चुकलं बरं का!:)
मिपावर येऊन आता बराच काळ लोटला आहे.आजवर इथे जितका खेळलो,बागडलो आणि आपटलो सुद्धा तो आठवणींचा ठेवा मला जन्मभर पुरण्यासारखा आहे.
क्या बात है...!
त्याबद्दल आपला व मिपावासियांचा मी आभारी आहे.
अहो आभार मानून असं परकं करू नका...
असो, पुढील भागही येऊ द्या...
आपला,
(ठाणेबुद्रुक निवासी) तात्या.
16 Mar 2008 - 9:07 am | सुधीर कांदळकर
फार्फार मज्जा आली. नावे अप्रतिम. कदाचित धर्ममार्तंड तुम्हाला झोडतील. त्या मारात (देण्यात नव्हे खाण्यात) मी सहभागी असेनच.
यमलोकांतही आऊटसोर्सिंग छानच.
16 Mar 2008 - 10:39 am | इनोबा म्हणे
कदाचित धर्ममार्तंड तुम्हाला झोडतील. त्या मारात (देण्यात नव्हे खाण्यात) मी सहभागी असेनच.
काही लोक याचा निषेध करण्यासाठी माझ्या घराबाहेर जमले होते मात्र मी भाईंचा('साहित्यविश्वातला' हे सांगीतले नसेल बहूधा) माणूस आअहे अशी कोणीतरी त्यांना माहीती दिल्याने जिंदाबादच्या घोषणा देत त्यांनी घर गाठले.असो.ही भाईकाकांची पुण्याई.
"दिसामाजी काही(च्या काही) तरी ते लिहावे"
-इनोबा म्हणे
17 Mar 2008 - 2:20 pm | धमाल मुलगा
इनोबा....
हाण तिच्याआयला.
एकदम खल्लास लेख.
आयला लेका, हे असल॑ कायतरी लिहिशील अन् किसनद्येवाची गैरमर्जी झाली तर बसशील हरी-हरी करत :-))
एकदम जबरा रे!!!! कणसे पाटील काय, माने डेअरी काय...चालूद्या :-)))
आपला,
- ग॑पूचा पे॑द्या जमदाडे
5 Oct 2008 - 1:21 am | शितल
गंपु (आधुनिक कृष्ण ) वाचताना एकदम हसुन ह्सुन दमले.
:)
मस्त लिहिले आहेस.
5 Oct 2008 - 1:30 am | बिपिन कार्यकर्ते
खतरनाकच... :)
बिपिन.
5 Oct 2008 - 9:26 am | रेवती
ह. ह. पु. वा.
रेवती
5 Oct 2008 - 10:00 am | यशोधरा
मस्तच लिहिलेस रे इणूभाव! लई मज्जा आली वाचायला!! :)
5 Oct 2008 - 10:07 am | ३_१४ विक्षिप्त अदिती
इनोबा, लय भारी ब्वॉ!
अदिती (बाणेर खुर्द)
5 Oct 2008 - 10:12 am | पिवळा डांबिस
माझा प्रतिसाद उडवलेला दिसतोय!!!!
ठ्सका लागलेला दिसतोय कुणालातरी!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!
6 Oct 2008 - 4:28 pm | टारझन
हा ना राव .. पिडा भै ...
माझा पण प्रतिसाद उडवलेला दिसतोय ... पण मी तर त्यात काहीच ठेचा टाकला नव्हता .. मग कोणाला आणि कसा लागला ठसका ?
-- ( टारझन ऊर्फ खवीस )
नवरात्र असो वा गणपती , दिवाळी असो वा दसरा
टारपिल्स वापरा , सगळी टेंशनं विसरा
5 Oct 2008 - 10:48 am | प्रमोद देव
तोडलंस मित्रा!
मस्त लिहीतो आहेस.
असाच लिहीता राहा.
6 Oct 2008 - 12:03 pm | llपुण्याचे पेशवेll
झक्कास चाल्ले आहे . आताच दुसरा भाग पण वाचला.
पुण्याचे पेशवे
6 Oct 2008 - 3:57 pm | संजय अभ्यंकर
लई दिवसांनी, काहीच्या काही (परंतु जबरा) लिवलेत!
संजय अभ्यंकर
http://smabhyan.blogspot.com/
6 Oct 2008 - 4:19 pm | केवळ_विशेष
दे बंगाडी...लवकर येउ देत (कथेचा बरं का... ह्.घ्या) पुढचा भाग!!!
मजा आला...वाचण्यास उत्सुक :)
7 Oct 2008 - 11:38 pm | वाटाड्या...
पंत..
तिकडं कृष्ण लोळला असेल आपला गंप्या अवतार पाहून...
और भी लिखो...
मुकुल