..मोक्ष..
-------------------------------------
फुले वेचिली देवपूजेस जी तू
तुझ्या कुंतलात जरा माळ काही
नवा अर्थ दे तु बहरण्यास माझ्या
कुणी देव काही म्हणणार नाही
नको एकटी तु राहुस ऐसे
नको होऊस माझ्या आठवणीत चूर
तिथे तेज माझे वातीसम फडफडे
कसा मंद राहु मी तारकांत दूर?
भाळावरील तुझ्या मोहक ती बट
अजुनि आहे तैसीच पण भासे उदास
पुन्हा उमलु दे गालावरी खळ्या गं
पुन्हा मुक्त उधळु दे मनी वसंतास
जरा न्याय अप्सरे,दे तू तुझ्या यौवनाला
दिसे मज सारे दुरुनि नभात
अजुनि आहेस तु लावण्यखाणी
स्वत:ला पाहा तु पुन्हा आरशात
जरा मोकळे केस सोडुन..गं..तु सुकेशा
होऊनि अल्लड ये पुन्हा अंगणात
तिथे मी कधीचा बरसतोय इतुका
आता रिक्त होईन मी पाहुनीया वाट
नको आणुस हरिणी,तु डोळ्यात पाणी
आता शक्य नाही मला ते पूसणे
इतस्तत: विखुरलो मी गंगेत ऐसा
नसे शक्य मजला आता मी वेचणे
काढुन टाक आता तू मनातुनि मजला
नको ठेवु कोरे तुझे हळवे विशाल भाळ
खरी शांती मिळेल तेव्हाच मजला
अन पुरे मुक्त होईल माझे आभाळ
रातेस दे सौभाग्य , पुन्हा लाडके तु
उंबर्यातुनि हळवी होऊनि ती परतते
तुझे दु:ख मजलाही होई अनावर
अश्रु मी ढाळतो रोज पहाटे पहाटे
पुरे शोक झाला पुरे दु:ख झाले
नवी कर सुरवात, तु पुन्हा एक राणी
रुळु देत ओठावरी आता पुन्ह्यांदा
मधु पेरलेली, साखरेची गोड गाणी
हो सुवासिनी पुन्हा तू
भरु देत दुधाने वास्तल्यी वक्ष
कवटाळीता माऊलि..तु तुझ्या तान्हुल्याला
कदाचित तिथेच मग, मला मिळेल मोक्ष..
-------------- योगेश
प्रतिक्रिया
27 Aug 2009 - 11:54 am | क्रान्ति
वेगळी कल्पना सुरेख मांडलीय. कविता आवडली.
क्रान्ति
दिव्यत्वाची जेथ प्रचीती | तेथे कर माझे जुळती
अग्निसखा
रूह की शायरी
27 Aug 2009 - 3:06 pm | विमुक्त
भारी!!!!...
27 Aug 2009 - 4:43 pm | मदनबाण
सुरेख कविता...
मदनबाण.....
Stride 2009 :---
http://www.southasiaanalysis.org/%5Cpapers34%5Cpaper3354.html
27 Aug 2009 - 6:04 pm | मनीषा
वेगळी आणि सुरेख कविता..
27 Aug 2009 - 7:07 pm | मीनल
विषय खूप वेगळा आहे.
एका विधवे चे वर्णन आहे. बाह्य आहे ----उदा: एकटी,बांधलेले केस, मोकळ कपाळ, भरेलेले डोळे, उदास चेहरा.
पण त्याच बरोबर तीच्या मानातील अवस्था ही प्रतित होते आहे. ती दु:खी ,निराश आहे हे प्रत्येक ओळीतून दिसते आहे.
नुसतीच वर्णनात्मक कविता नाही.
त्या उदास,एकाकी जिवनातून तीला पुन्हा नव्याने उभ करण्याचा प्रयत्न आहे. पुन्हा नविन आयुष्य सुरू करणे तिला कसे सहजी शक्य आहे याची तिला जाणिव दिली जात आहे.उदा:भाळावरील तुझ्या मोहक ती बट अजुनि आहे तैसीच,अजुनि आहेस तु लावण्यखाणी.
ती जाणिव तिचा मृत पतीच देत आहे
मृत... कारण ---`कसा मंद राहु मी तारकांत दूर?` आणि ` इतस्तत: विखुरलो मी गंगेत ऐसा` .
प्रियकर नाही तर पती.. कारण --`हो सुवासिनी पुन्हा तू` म्हणजे ती पूर्वी सुवासिनी होती पण आता नाही.
त्याच्या मृत्युमुळे ती कायम अशी राहू नये यासाठी प्रामाणिक,सच्चा प्रयत्न आहे. तिच्या दु:खा मुळे तो मृत पती हे दु:खी आहे ---`तुझे दु:ख मजलाही होई अनावर,अश्रु मी ढाळतो रोज पहाटे पहाटे`
त्या मुळे त्याचा जीव मृत्यु नंतरही तिच्यातच अडकलेला आहे.त्याला मोक्ष मिळालेला नाही. आणि ती जो पर्यंत पुन्हा दुस-याबरोबर नवीन आयुष्य सुरू करणार नाही तो पर्यंत ते शक्य नाही हे त्यातून दिसत आहे.
शिवाय कवितेचे शिर्षक आणि `कदाचित तिथेच मग, मला मिळेल मोक्ष..` यातून ही कळते आहे.
एकमेकांवरच्या आत्यंतिक प्रेमाची प्रचिती या कवितेतून प्रतित होत आहे. आणि म्हणूनच तो सांगतो आहे --`काढुन टाक आता तू मनातुनि मज--` आणि `नको होऊस माझ्या आठवणीत चूर`
अस केल तरच ती नविन आयुष्य सूरू करू शकेल याची त्याला खात्री आहे.तिने त्याला विसरून जावे हीच त्याची इच्छा आहे.
कविता शब्दालंकारने सजलेली किंवा रूपकांनी जड झालेली नाही म्हणूनच ती त्यातील नायिकेसारखी साधी आहे.
समजायलाही सोपी आहे.पण खूप खूप काही सांगून जाणारी आहे.
तांत्रिक दृष्ट्या अजून बरेच बदल ,सुधारणा आहेत.मी ते सांगण्याइतका माझा अभ्यास नाही.
कविता आवडली.
मीनल.
27 Aug 2009 - 7:20 pm | प्राजु
खूपच सुंदर!
विषय अतिशय वेगळा आहे.
खूप आवडली कविता.
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/
28 Aug 2009 - 10:25 am | प्रशांत उदय मनोहर
विषय वेगळा आहे, पण थेट हृदयाला भिडणारा. विधवेचं वर्णन आणि तिला पुन्हा सुवासिनी व्हायला सांगणं खूपच आकर्षकपणे मांडलंय. तुम्हाला एवढाच अर्थ अभिप्रेत आहे की आणखीही काही सांगायचंय हे माहित नाही. पण विधवा हे आयुष्यातल्या वादळात खचलेल्या व्यक्तीसाठी रूपक आहे असं मानलं, तरी कविता अर्थपूर्ण होते. हेच या कवितेचं शक्तीस्थान आहे असं मला वाटतं. तांत्रिक गोष्टींबद्दल बोलायचं तर मात्रांमध्ये गडबड आहे, पण ठीक आहे. कविता वाचताना विशिष्ट शब्दांवर वजन देणं, शब्द/शब्दसमूह आवश्यक तेव्हा रिपीट करणं, इत्यादिंच्या सहाय्याने मात्रांची घडी बसवता येतेच. शिवाय, कवितेचा भाव खूप महत्त्वाचा आहे. आणि तो इतक्या प्रभावीपणे या कवितेत उतरला आहे, की तांत्रिक बाबी गौण वाटू लागतात.
आपला,
(रसिक) प्रशांत
---------
एक मी आभाळ आहे ठेविले पंखांत माझ्या, सांगते मज हे न क्षितिज न बिंदु तुझिया थांबण्याचा
28 Aug 2009 - 3:49 pm | कानडाऊ योगेशु
इतक्या उत्साहवर्धक अभिप्रायांबद्दल सर्वांचेच आभार.
मीनल आणि प्रशांत -
तुमच्या विश्लेषणामुळे कवितेच्या पुनःप्रत्ययाचा आनंद घेता आला.!
(आनंदित) योगेशु
28 Aug 2009 - 4:18 pm | sneharani
वेगळी आणि सुरेख कविता..