जीवधन आणि नाणेघाट...

विमुक्त's picture
विमुक्त in जनातलं, मनातलं
18 Aug 2009 - 8:06 pm

आम्हा चौघांचा (मी, यशदीप, शिऱ्या आणि सम्या) जीवधनला जायचा बेत पक्का झाला. एका शनीवारी पुण्याहून जून्नरला पोचलो तेव्हा सकाळचे ९.३० वाजले होते. घाटघरला जाणारी बस लागली होती पण सुटायला अजून जरा वेळ होता. मग बसस्टँडच्या जवळच मिसळपाव आणि चहा उरकून बस मधे बसलो. बस सुरु झाली आणि थोड्याच वेळात चावंड किल्ल्याला फेरी घालून पुढे निघाली. आता दोन्ही बाजूला नुसते उघडे-बोडके डोंगर दिसत होते. डोंगर म्हणजे नुसता काळा कातळ आणि त्याच्या तळात थोडी झाडी. जरा वेगळ्याच जगात घुसल्या सारखं वाटू लागलं. साधारण १ तासात घाटघरला पोचलो. दुपारचं उन्ह शेकत जीवधन एखाद्या मगरी सारखा पहारा देत घाटघरच्या मागेच बसला होता.

वाट नीटशी माहीती नव्हती पण गडावर कुठून चढायचं हे माहीती होतं. त्या दिशेनं चालायला सुरुवात केली. थोडावेळ चालल्यावर पायवाट एकदमच सुकलेल्या ओढ्यात संपली. आता इथून पुढे कसं? असा प्रश्न पडला. तीथून मान वर करुन गडाकडं पाहील्यावर, गडाच्या अगदी माथ्या जवळ कातळ पोखरल्या सारखा दिसत होता. तीच वाट असणार असं ठरवून टाकलं. मग सुकलेल्या ओढ्यातूनच चढायला सुरुवात केली. मे चा महीना होता आणि दुपारचे १२ वाजले होते. उन्हामुळे दगडपण तापला होता आणि जीवधन म्हणजे नुसता अखंड दगड; सावली देणारं एकपण झाड नव्हतं. सम्याला trekking ची जास्त सवय नव्हती. भर दुपारच्या उन्हात चढताना सम्याला त्रास होऊ लागला. त्याला आता मळमळायला लागलं होतं. अजून जरा वर गेल्यावर त्यानं उलटी केली. मग पाणी प्यायला आणि तोंडावर रुमाल टाकून भर उन्हातच जरावेळ आडवा झाला. उठल्यावर सम्याच्यात तरतरी आली होती. त्याला जरा धीर दिला आणि पुन्हा चढायला सुरुवात केली. थोड्याच वेळात कातळात खणलेल्या पायऱ्या लागल्या.

पायऱ्या चढून वर जाऊ लागलो. माथ्याच्या जवळच्या पायऱ्या उध्वस्त झाल्या होत्या (इंग्रजांनी १८१८ मधे बरेच किल्ले उध्वस्त करायचा प्रयत्न केला होता. त्यावेळी जीवधनावर पण तोफगोळे सोडले होते; त्याचे हे परिणाम). हा टप्पा, दगडात खणलेल्या खोबण्यांच्या मदतीने चढणं फारसं अवघड नव्हतं, पण जर चूक झाली आणि घसरलो तर थेट खालीच पोचणार ह्यात काहीच शंका नव्हती.

(वाट खूप अवघड आहे असं फोटोतून वाटतयं... पण चढायला वाट बऱ्यापैकी सोपी आहे...)

मी हा टप्पा पार केला आणि गडाच्या माथ्यावर पोचलो. माझ्या मागोमाग शिऱ्या पण पोचला. तीथं पाठपीशवी टाकली आणि टप्पा उतरुन मी पुन्हा खाली आलो. यशदीप जरा घाबरला होता. त्याला जरा धीर देत म्हणालो की पीशवी मी घेऊन येतो, तु न घाबरता सावकाश चढ. मग थोडावेळ लावला पण यशदीप सुद्धा सुखरुप वर पोचला. नंतर सम्याने तर फारच आरामात हा टप्पा पार केला. मग पीशवी घेऊन मी पण वर पोचलो. जरा वेळ आराम केला आणि किल्ला भटकायला सुरुवात केली. वर एक धान्याचं कोठार आहे. म्हणे त्यात कधीतरी आग लागली होती तेव्हा सगळं धान्य जळून राख झालं आणि ती राख अजून त्या कोठारात आहे. कोठार बघून झाल्यावर मागच्या टेकाडावर चढलो. ही जीवधन वरची सर्वात उंचीची जागा. डोळ्यात मावणार नाही एवढा परीसर दिसतो इथून... तळात कोकण... डावीकडे ढाकोबा आणि दुर्ग किल्ला... उजवीकडे नानाचा अंगठा, भैरवगड, हरीशचंद्रगड... मागे चावंड, हडसर आणि निमगीरी.

(नानाचा अंगठा... नाणेघाट अंगठ्याला लागूनच आहे...)

कोकणातून येणाऱ्या वाऱ्याला थेट छातीवर झेलत जीवधन कित्येक युगं नाणेघाटावर पहारा देत उभा आहे. ह्या टेकाडावर उभं राहायचं आणि स्वच्छ, मोकळी हवा छातीत भरुन घ्यायची आणि आजुबाजूचा आसमंत न्याहाळायचा... मग सह्याद्री म्हणजे काय ह्याची जाणीव होते; शिवाजी आणि मावळ्यांच्या अंगात स्वातंत्र्यासाठी बादशाही विरुद्ध लढायचं साहस कुठून यायचं ह्याची जाणीव होते; महाराष्ट्राला दगडांच्या देशा कणखर देशा... असं का म्हणतात ह्याची जाणीव होते; अंगा-खांद्यात प्रचंड बळ आल्याची जाणीव होते. शाळेतल्या मुलांना जर गड-किल्ल्यांवर भटकून इतिहास शिकवला तर अनेक मावळे उभे राहतील...

मग थोडंफार खाऊन घेतलं आणि उतरायचा विचार करु लागलो. आलो तसं न उतरता दुसऱ्या वाटेनं उतरायचं ठरलं. ह्या वाटेनं उतरलो तर नाणेघाटाच्या गुहेत लवकर पोचणार होतो. उतरताना सत्तत नानाचा अंगठा डोळ्या समोर होता.

(परतीची वाट...)

ह्या वाटेवरच्या पायऱ्या सुद्धा उध्वस्त झाल्या आहेत, पण आरामात उतरता येत होतं. थोडं उतरल्यावर वाट कड्या वरुन खाली जंगलात उडी घेत होती. मग डावीकडे वळून आम्ही जीवधनचा कातळ डाव्याहाताला ठेवत आडवं जायला लागलो. थोड्याच वेळात वानरलिंगी सुळक्याच्या पायथ्याशी पोचलो. ह्याला खडाफारशी असं सुद्धा म्हणतात. ह्या सुळक्यावर चढायचं म्हणजे वानरांची चपळता अंगात असली पाहीजे. दोर लावून वानरलिंगीवर चढता येतं.

(वानरलिंगी सुळका...)

पण खाली उतरायची वाट सापडत नव्हती. मुंबईहून येणारे इथूनच कुठूनतरी गडावर चढतात हे मीहीती होतं, पण काही केल्या वाट सापडत नव्हती. वानरलिंगी आणि जीवधनच्या मधे प्रचंड उतार असलेली फारच लहान घळ आहे. ही ती वाट नाही ह्याची पुर्ण खात्री आम्हा सर्वांना होती. आता... वाट काही सापडत नाही म्हंटल्यावर, मी ह्या घळीतूनच उतरायच ठरवलं. माझा प्लान मी इतरांना सांगीतला, तर ते म्हणाले... गप ये! उगीच मस्ती नको... फारच उतार आहे आणि पुढे ही वाट कशी आहे हे पण माहीती नाही... उगीच risk घेण्यात point नाही. पण मलातर उतरायचं होतं तीथूनच, मग मी इतरांना समजवलं की... तुम्ही तीघं परत जा आणि वर चढलेल्या वाटेनेच उतरा आणि मग नाणेघाटाच्या गुहेत पोहचा... मी तो पर्यंत इथून उतरुन गुहेत पोचतो... समजा मला नाहीच जमलं तर मी पण येतोच तुमच्या माघून. जरावेळ असं नको तसं नको करत ते तीघे माघारी वळले.

त्यांना माझ्या पेक्षा जास्त चालायचं होतं त्यामुळे माझ्याकडे भरपूर वेळ होता. मी जरावेळ निवांत बसून खालचा परीसर न्याहाळत होतो. जरा भीती होतीच आणि शिवाय ही वाट खाली जंगलात उतरते. जंगलातून नीट वाट सापडेल की नाही अशी शंका होती. मग जास्त विचार न करता मी उतरायला लागलो. खूपच उतार होता. मी घसरतच खाली सरकत होतो. बरंच उतरलो होतो, पण आता एकदम उभा तीन माणूस उंच टप्पा उतरायचा होता (हा टपा म्हणजे दोन कातळांच्या मधली भेग...chimney). फार अवघड नव्हतं पण कसं उतरायचं कळत नव्हतं आणि त्यात एकटा. उडी मारावी म्हटलं तर खालीपण उतार आणि दगडं होती. चला... आता माघारी वळूत असा विचार हळूच आला. माघारी जायचा मोह टाळण्या साठी मी पाठपीशवी खाली टाकली तर ती गडगडत बराच खाली जाऊन थांबली. आता माघारी जायचा सवालच नव्हता. जरा शांत झालो आणि कसं उतरता येईल ह्याचा विचार करु लागलो. दोन हात दोन बाजूच्या दगडावर चिकटवले आणि शरीर जरा खाली सरकवलं आणि पाय फाकवून दोन बाजूंच्या कातळावर ठेवले. नीट grip नसल्यामुळे जास्त वेळ दोन पायांवर उभं राहणं शक्य नव्हतं. आता हात सोडून शरीर जरा खाली सरकवलं आणि पाया जवळ परत हातांनी pressure holds घेतले. पाय सोडले आणि खाली सरकून परत पायांनी आधार घेतला. आता हात सोडले तर दोन्ही पाय पण नीसटले आणि दगडावर अंग घासत खाली आपटलो. जरा खरचटलं पण जास्त लागलं नाही. आता टप्पा पार झाला होता (मी ज्या पध्दतीनं उतरलो तीला wriggling म्हणतात असं घरी आल्यावर एका पुस्तकातून कळालं), मग पाठपीशवी उचलली आणि जंगलात घुसलो. एकदम दाट जंगलात एका सुकलेल्या ओढ्यातूनच चालायला लागलो. हा ओढा कधीतरी नक्कीच जंगलातून बाहेर पडणार ह्याची खात्री असल्यामुळे जंगलातला एकांत अनुभवत चालायला लागलो. थोड्याच वेळात जंगलातून बाहेर आलो तर उजव्या हाताला नानाचा अंगठा खुणावत होता. नसलेली वाट धरुन सुखरुप उतरल्याच्या आनंदात मग आरामात नाणेघाटाकडं चालू लागलो. अर्ध्या तासाच्या आतच गुहेत पोचलो. बराच वेळ वाट पाहीली तरी तीघं अजून पोचले नव्हते. मग मीच घाटघरच्या दिशेनं चालायला लागलो. १-१.५ कि.मी. चालल्यावर तीघं येताना दिसले. मग मी कसा उतरलो हे त्यांना सांगत पुन्हा गुहेत पोचलो.

पाठपीशवीतून जेवणाचं सामान काढलं. लाकडं गोळा केली आणि चुलीवर खिचडी शीजवायला लावली. यशदीपने पापड पण आणले होते, मग ते पण भाजून घेतले. खिचडी शीजे पर्यंत काळोख पडू लागला होता. मग रम्य सुर्यास्त बघत खिचडी आणि पापडाचा आस्वाद घेत जेवण उरकलं आणि गुहेत गाड झोपी गेलो.

पहाटे सुमारे ३ वाजता खूप गोंगाट सुरु झाला आणि जाग आली. मुंबईचा एक ग्रुप रात्री कोकणातून नाणेघाट चढून आला होता आणि त्यांचा धिंगाणा चालू होता. नंतर काय झोप लागली नाही. पहाटे सुमारे ६ ला उठलो आणि नानाच्या अंगठ्यावर जाऊन बसलो. तळातलं कोकण धुक्याचं पांघरुण घेऊन झोपी गेलं होतं. धुक्याच्या आणि ढगांच्या आड सुर्य वेगळाच भासत होता.

(हा सुर्य आहे बरं का...)

बराच वेळ निवांत बसून होतो. Trek ला जाताना असंच किंवा तसंच करायचं हे ठरलेलं नसतं. त्यावेळी जे वाटेल ते करायचं. मग जीवधनच्या जंगलात भटकायचा बेत ठरला. खाली उतरुन गुहेत पोचलो आणि सामान गुंडाळून जीवधनच्या दिशेने चालायला लागलो.

(नाणेघाटची गुहा आणि काही trekkers...)

वाटेत चुल पेटवून चहा आणि maggy बनवलं. मग कड्यावर बसून कोरा चहा आणि maggy चा नाष्टा सुरु केला. आकाशात ढगांचा पकडा-पकडी चा खेळ चालू होता. त्या ढगांच्या सावल्यापण कोकणात तोच खेळ खेळत होत्या. अश्या निवांत क्षणी हे सगळं बघायला, अनुभवायला छान वाटतं. उन्ह जरा वाढल्यावर आम्ही जीवधनच्या दिशेने निघालो. जीवधन आणि त्याचा खडाफारशी मस्तच दिसत होते.

(जीवधन आणि पहारा देणारा खडाफारशी...)

जंगलात बराच वेळ भटकलो आणि मग थोडावेळ सगळे आडवे झालो. उठलो तेव्हा दुपारचे २.५ वाजले होते. मग १ तासात घाटघरला पोचलो आणि जुन्नरच्या S.T. ची वाट बघत झाडाखाली बसलो. थोडा वेळात S.T. ने जुन्नर आणि मग पुण्यात पोचलो. दोन दिवस मे महीन्याच्या उन्हात दगडांच्या प्रदेशात भटकण्याचा अनुभव मस्तच होता.

थोडा इतिहास: नाणेघाट आणि आजुबाजूचे किल्ले सातवाहन राजाने बांधलेत. कल्याण आणि जुन्नर मधे व्यापार व्हावा म्हणून नाणेघाटाचा वापर व्हायचा. नाणेघाटची गुहा साधारण 2nd - 1st cent. B.C. मधली आहे. गुहेत ब्राम्ही लीपीतला लेख आणि काही चित्रं आहेत. लेखात सातवाहनच्या राजा-राणीं चा उल्लेख आहे.

नाणेघाट जुन्नरहून २७ कि.मी. आहे. जुन्नरहून घाटघर पर्यंत बस येते. मग घाटघरहून ३ कि.मी. वर नाणेघाट आहे.
मुंबईहून येताना वैशाखरेला उतरायचं आणि मग नाणेघाट चढून वर यायचं. गुहा अगदी घाटमाथ्यावर आहे.

कथा

प्रतिक्रिया

श्रावण मोडक's picture

18 Aug 2009 - 8:52 pm | श्रावण मोडक

आवडली. लेख अद्याप वाचलेला नाही. सवडीने वाचतो. सकाळच्या सूर्याचे अगदी आवडले.
सायबा, घळीतून उतरतानाचा प्रसंग अंगावर क्षणभर काटे आणून गेला.

बाकरवडी's picture

18 Aug 2009 - 8:26 pm | बाकरवडी

अप्रतिम वर्णन !

:B :B :B बाकरवडी :B :B :B

प्रमोद देव's picture

18 Aug 2009 - 8:30 pm | प्रमोद देव

निवेदन,लेखन आणि छायाचित्रं....सगळंच मस्त आहे.

विशाल कुलकर्णी's picture

20 Aug 2009 - 12:46 pm | विशाल कुलकर्णी

निवेदन,लेखन आणि छायाचित्रं....सगळंच मस्त आहे आणि तुमची धोका पत्करण्याची वृत्ती .....!
ती मात्र जपुनच वापरत जा . :-)

सस्नेह
विशाल
*************************************************************

आम्ही इथेही पडीक असतो "ऐसी अक्षरे मेळविन!"

अनामिक's picture

18 Aug 2009 - 8:40 pm | अनामिक

विमुक्त... तुला साष्टांग दंडवत रे बाबा!

...तुम्ही तीघं परत जा आणि वर चढलेल्या वाटेनेच उतरा आणि मग नाणेघाटाच्या गुहेत पोहचा... मी तो पर्यंत इथून उतरुन गुहेत पोचतो... समजा मला नाहीच जमलं तर मी पण येतोच तुमच्या माघून. जरावेळ असं नको तसं नको करत ते तीघे माघारी वळले....

हे वाचून जरा धस्स झालं... अश्या ठिकाणी काय होऊ शकेल आपल्याला काय माहीत, तेव्हा जरा काळजीपुर्वक आणि कोणीतरी बरोबर असेल तरच असले साहस करत जा.

सगळीच चित्रे छान!

-अनामिक

लवंगी's picture

18 Aug 2009 - 11:08 pm | लवंगी

बा विमुक्ता, सांभाळून जरा.. बाकि वर्णन आणि फुटु फस्टक्लास..

सूहास's picture

18 Aug 2009 - 8:44 pm | सूहास (not verified)

8>
वा मस्त....

सू हा स...

पिवळा डांबिस's picture

18 Aug 2009 - 10:42 pm | पिवळा डांबिस

मस्त चित्रे आणि सुरेख वर्णन!
खूप जुन्या आठवणी जाग्या झाल्या!!! धन्यवाद!!

बाय द वे, माझ्या माहितीप्रमाणे तो 'वानरलंगी' सुळका आहे. 'वानरलिंगी' नव्हे. वानरलंगी याचा अर्थ फक्त वानरं ज्याला लंघून चढू शकतात इतका बिकट असलेला. 'वानरलिंगी' चा अर्थ वेगळाच होतो हो!! चूभूद्याघ्या...

राजा सातवाहनाच्या काळातला ट्रेकर,
पिवळा डांबिस
(माजी सदस्य, सेंट झेवियर ट्रेकिंग क्लब)

चतुरंग's picture

18 Aug 2009 - 11:08 pm | चतुरंग

त्या सुळक्याचं नाव वानरलिंगीच आहे. (’वानरलिंगी’ म्हणजे लगेच काहीतरी वेगळाच अर्थ घ्यायला हवा असे नाही. ;))
वानरलिंगी किंवा खडा पारशी.
ह्यावर चढाईसुद्धा झालेली आहे. हे एक चॅलेंजिंग रॉकक्लाईंबिंग समजले जाते.
नानाच्या आंगठ्याच्या पायथ्याशी आम्ही ट्रेक केलेला आहे. फारसे रॉकक्लाइंबिंग मात्र कधी करण्याचा योग आलेला नाही.

(रॉक)चतुरंग

पिवळा डांबिस's picture

19 Aug 2009 - 4:32 am | पिवळा डांबिस

आम्हाला आमच्या ट्रेकच्या वेळेला तेथील एका स्थानिकाने त्याचं नांव वानरलंघी म्हणून सांगितलं होतं. आणि वरील अर्थही सांगितला होता म्हणून मी म्हटलं की "माझ्या माहितीनुसार" त्याचं नांव वानरलंगी!

तुमची जर खात्रीच असेल तर तुम्ही त्या सुळक्याला वानरलिंगी म्हणायला आमची अजिबात हरकत नाही. त्यासाठीच तिथे ते चूभूद्याघ्या लिहिलं होतं.

(’वानरलिंगी’ म्हणजे लगेच काहीतरी वेगळाच अर्थ घ्यायला हवा असे नाही)
शब्दातून सरळ व्यक्त होणारा अर्थ घेतला आहे. जर तो "लगेच काहितरी वेगळा" वाटत असेल तर मग सामान्यपणे अभिप्रेत असलेला दुसरा अर्थ कोणता ते सांगून टाकावे!!

चतुरंग's picture

19 Aug 2009 - 4:37 am | चतुरंग

'वानरलिंगीचा' अर्थ वेगळाच होतो हो !!
हे वाक्य वापरले आहेत म्हणून मी म्हटले की लगेच वेगळाच अर्थ असेल असे नाही!
बाकी मला काहीही म्हणायचे नाही.

(स्पष्ट)चतुरंग

स्वाती२'s picture

18 Aug 2009 - 10:49 pm | स्वाती२

मस्त वर्णन आणि छायाचित्रे.

अनिल हटेला's picture

18 Aug 2009 - 11:09 pm | अनिल हटेला

अगदी सहमत...
छायाचित्रांबरोबर वर्णनही सुरेख केलये...

बैलोबा चायनीजकर !!!
I drink only days ,which starts from 'T'...
Tuesday
Thursday
Today ;-)

फत्तरा कातळांच्या सान्निध्यात राहून त्यांच्याशी एकप्रकारची मैत्री होते तसं तुझं झालं असावं!
फोटो आणी वर्णन खासच आहे. तुझी भटकंती एकदम हटके आणी मनस्वी असते. सूर्योदयाचा फोटू खासच.
खडापारशी सुद्धा जबराट आलाय (तळाशी असलेल्या दोघांच्या आकाराने त्याची भव्यता आणखीनच नजरेत येतेय.)
पुढच्या भटकंतीला शुभेच्छा!

(ओल्ड ट्रेकर)चतुरंग

श्रावण मोडक's picture

18 Aug 2009 - 11:41 pm | श्रावण मोडक

तळाशी असलेल्या दोघांच्या आकाराने त्याची भव्यता आणखीनच नजरेत येतेय.
क्या बात है. मला ते दिसले होते, पण शंका आली. म्हटलं चुकाय नको. तुम्ही बरोबर टिपलेत.

ऋषिकेश's picture

18 Aug 2009 - 11:20 pm | ऋषिकेश

नाणेघाट आणि जिवधन म्हणजे सह्याद्रीच्या मुख्यरांगेतील माझाही एक आवडता ट्रेक. पावसाळ्यात तर वाटेत दोन-तीन ओढे लागतात. ते पार करताना पाणी जास्त असेल तर एकमेकांचा हात धरून साखळी करून पार जावे लागते ते आठवले.

बाकी वर्णन, फोटु सगळेच मस्त!!

वि.सु.: नाणेघाटाचा ट्रेक ज्यांनी केला नसेल त्यांनी लवकरात लवकर करून घ्यावा. आता वरपर्यंतचा गाडी रस्ता (मागील अंगाने) पक्का होत आहे असे सुत्रांकडून (!) कळते. त्यानंतर ह्याचाही सिंहगड होण्यास वेळ लागणार नाहि :(

ऋषिकेश
------------------
रात्रीचे ११ वाजून १९ मिनीटे झालेली आहेत. चला आता ऐकूया एक गीत "जय जय महाराष्ट्र माझा...."

विद्याधर३१'s picture

19 Aug 2009 - 6:42 am | विद्याधर३१

कच्चा गाडी रस्ता घाटघरपासून आहेच. १५ दिवसांपूर्वीच गेलो होतो. आता तर नाणेघाट पिकनीक स्पॉट झाला आहे. गुहेत त्या दिवशी चहा भजी वगैरे विकायला घेवून पोरे बसली होती.

विद्याधर

ऋषिकेश's picture

19 Aug 2009 - 10:36 am | ऋषिकेश

आता तर नाणेघाट पिकनीक स्पॉट झाला आहे

:(
बाकी, बरोबर तोच घाटघरपासूनचा कच्चा रस्ता पक्का करायचं चाललं आहे :(
थोडक्यत काय आता झुंडीच्या झुंडी जाणार आणि आपणच आपले गड, किल्ले, डोंगर, टेकड्या, ऐतिहासिक स्थळांचे विदृपीकरण करणार!

ऋषिकेश

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

19 Aug 2009 - 11:38 am | ३_१४ विक्षिप्त अदिती

नाणेघाटाचाही पिकनिक स्पॉट होऊ नये. मी नऊ-दहा वर्षांपूर्वी गेले असेन तिकडे, तेव्हा फारच शांत होतं. आमचा सहा लोकांचा गट वगळता बाकी कोणीही नव्हतं तिथे!
घाट उंचावर आहे आणि कोकणपट्टी समुद्रसपाटीवर आहे हा भूगोल नाणेघाटात नेऊन शिकवला असता तर फार बरं झालं असतं असं तेव्हा सगळ्यात पहिल्यांदा 'दिसलं'.

जिवधनची जशी इंग्रजांनी वाट लावली आहे, तशीच चावंडचीही! तिथेही रेलिंग्ज टाकून चढण्याची व्यवस्थित सोय केली आहे. हडसरही छान किल्ला आहे. तिथल्या पायर्‍या, गुहा का खोबणी मस्त आहेत. आम्ही लोकं तिकडे गेलो होतो तेव्हा डिजीटल क्यामेर्‍यांचा जमाना यायचा होता त्यामुळे फोटो नाहीत. पण आज आठवणीमात्र जाग्या झाल्या.

वर्णन आणि फोटो नेहेमीप्रमाणेच, मस्त!

अदिती

नंदन's picture

19 Aug 2009 - 12:22 am | नंदन

फोटो आणि वर्णन नेहमीप्रमाणे सुरेख. खासकरून उगवत्या सूर्याचा फोटो. आमचाही दंडवत मान्य करून घ्यावा :)

नंदनमराठी साहित्यविषयक अनुदिनी

धनंजय's picture

19 Aug 2009 - 2:26 am | धनंजय

छानच

घाटावरचे भट's picture

19 Aug 2009 - 4:48 am | घाटावरचे भट

असेच म्हणतो.

पाषाणभेद's picture

19 Aug 2009 - 4:34 am | पाषाणभेद

छान वर्णन आणि छायाचित्रे.

वा वा. छान छान. असेच लिहीत रहा.

- पाषाणभेद उर्फ दगडफोड्या

मदनबाण's picture

19 Aug 2009 - 4:42 am | मदनबाण

मस्त लेख आणि सुंदर फोटु... :)

मदनबाण.....
चट्यागो चझीमा चवडतीआ चलिकामा चतीहो. :)
http://www.youtube.com/watch?v=z3z6limgwMo

सहज's picture

19 Aug 2009 - 7:00 am | सहज

भारी लेख, सही फोटो.

वैशाली हसमनीस's picture

19 Aug 2009 - 7:12 am | वैशाली हसमनीस

आपले अनुभव फारच सुंदर सांगितले आहेत.पूर्वी ह्या घाटातून मी बरेच वेळा ये-जा करीत असल्यामुळे (अर्थात गाडीने) फोटो बघताना फारच मजा वाटली.

शैलेन्द्र's picture

19 Aug 2009 - 9:52 am | शैलेन्द्र

नाणेघाटातुन?, गाडीने? की माळशेजने?

नरेंद्र गोळे's picture

19 Aug 2009 - 10:25 am | नरेंद्र गोळे

नाणेघाटातून? गाडीने? कमाल आहे!

यशोधरा's picture

19 Aug 2009 - 7:37 am | यशोधरा

सुरेख फोटो आणि भारी वर्णन..

याच गुहेत आम्हीही राहिलो होतो, त्याची याद आली!

ते १९८१-८२ साल असावं. जीवधन किल्ल्यावरून काढलेल्या नाणेघाटाच्या फोटोत "डेक्कन बसॉल्ट" भूस्तराचे तीन थर स्पष्टपणे दिसून येतात. अपूर्वच दृश्य दिसते ते. तुमचे फोटोही सुंदरच आलेले आहेत. काळजीपूर्वक स्थान निवडून काढलेले दिसतात. अभिनंदन!

फोटो छानच आलेत!

समंजस's picture

19 Aug 2009 - 10:46 am | समंजस

सुरेख वर्णन!
तुमची भटकंती आणी वर्णन दोन्हीही हेवा वाटण्या सारखे आहेत!! =D>

झकासराव's picture

19 Aug 2009 - 11:32 am | झकासराव

नेहमीप्रमाणेच लेखन आणि फोटो सुंदरच. :)
बाकी माहित नसलेल्या ठिकाणी संभाळुन उतरणे , संभाळुन राहणे हा सल्ला आहेच.
कुणा एकाने आम्हाला दिलेला सल्ला.
पाणी , आग आणि डोंगरासंग मस्ती नको. अंगलट येण्याची शक्यता जास्त.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

19 Aug 2009 - 11:49 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

वर्णन आणि फोटो केवळ सुरेख...!

आजानुकर्ण नाणेघाटावर गेला होता, त्यांच्याही लेखाची आठवण झाली.

-दिलीप बिरुटे

क्रान्ति's picture

19 Aug 2009 - 12:52 pm | क्रान्ति

नेहमीप्रमाणेच सुरेख फोटो आणि लेख.

क्रान्ति
दिव्यत्वाची जेथ प्रचीती | तेथे कर माझे जुळती
अग्निसखा
रूह की शायरी

अनिरुध्द's picture

19 Aug 2009 - 5:35 pm | अनिरुध्द

नाणेघाट आणि मग जिवधन असा ट्रेक केला होता. मस्त मजा आली होती. ट्रेक फारच छान आहे.

संदीप चित्रे's picture

20 Aug 2009 - 12:32 am | संदीप चित्रे

तुमच्या लेखांमधून महाराष्ट्रात मस्त भटकंती होते.

तुम्ही ट्रेकिंग / गिर्यारोहणाचे वगैरे शास्त्रशुद्ध शिक्षण घेतले नसेल तर जरूर घ्या. भटकंतीसाठी आवश्यक 'किडा' तुमच्याकडे आहेच. योग्य गुरू मिळाल्यास त्यातून आणखी रेशीम मिळू शकेल.

शाल्मली's picture

20 Aug 2009 - 5:00 pm | शाल्मली

लेख आणि छायाचित्रे दोन्ही सुरेख.
तुमचे धाडस नक्कीच वाखाणण्याजोगे आहे.

--शाल्मली.

अभिज्ञ's picture

20 Aug 2009 - 5:23 pm | अभिज्ञ

अगदी हेच म्हणतो.

और भी आने दो.

अभिज्ञ.
--------------------------------------------------------
पॉझिटिव्ह थिंकिंग....? अजिबात जमणार नाहि.

लिखाळ's picture

20 Aug 2009 - 7:22 pm | लिखाळ

वा .. फार छान लेख. तुमच्या धाडसाचे कौतुक वाटते.
नाणेघाटाचा सिंहगड होणार हे खालच्या प्रतिसादांत वाचून वाईट वाटले.

मग जास्त विचार न करता मी उतरायला लागलो.

साहसासाठी आवश्यक सामुग्री ! :) बहाद्दर !!

-- लिखाळ.
'वाटते आहे', 'कुठेतरी वाचले आहे', अशी संदिग्ध विधाने करणार्‍याला म. संकेतस्थळां वरच्या चर्चेत मानाचे पान असते असे वाटते ;)

विमुक्त's picture

21 Aug 2009 - 11:59 am | विमुक्त

माझा अनुभव वाचल्या बद्दल सर्वांचा आभीरी आहे...

स्वाती दिनेश's picture

21 Aug 2009 - 12:14 pm | स्वाती दिनेश

मस्त चित्रे आणि लेख!
स्वाती