अर्थ नेमका संसाराचा
कधी कुणास कळला आहे
उंबरठ्यावरी तडजोडीच्या
जीव सतत हा जळला आहे
कुणी जपावे? का जपावे?
अन कोणाचे मोठेपण?
किती पुरावे? किती उरावे?
आकांक्षांचे आत्मसमर्पण..
अहंकार तव फ़ोल पणाचा
सर्व समक्ष मी लपवावा
घेऊन सार्या चुका मजवरी
दुभंगलेला जीव जपावा
हसरा चेहरा जनांत राही
मनांत सार्या गर्द छटा
शांत जळाच्या अंतरी असती
गढूळलेल्या वादळी लाटा
नाव तुझे नि गाव तुझे
ओळख माझी विरून गेली
कर्तव्याच्या मढ्याखाली
स्वप्ने सारी पुरून गेली..
- प्राजु
प्रतिक्रिया
20 Jul 2009 - 11:09 am | दत्ता काळे
प्राजुताई, कविता फार छान झालीये. सगळीच कडवी छान झालीयेत, त्यामध्ये शेवटचे अतिशय आवडले.
20 Jul 2009 - 11:25 am | अवलिया
संसारी स्त्रीचे यथार्थ चित्रण !
उत्तम कविता :)
--अवलिया
=============================
क्या तुमने परबुभाई का नाम नही सुना? .... मैने भी नही सुना :)
20 Jul 2009 - 11:28 pm | बेसनलाडू
कविता छान आहे. आवडली.
नाना, चंद्रशेखर गोखले, कवितेतून (तुम्हाला) संसारी 'स्त्री'चे वर्णन जाणवत असले, तरी स्पष्टपणे तसे कोठेही आलेले नाही. ते पुरुषाचेही मनोगत/व्यथा असू शकेल, या शक्यतेचाही जरूर विचार व्हावा. अशी कविता वाचून लगेचच 'स्त्री'चे चित्र/वर्णन आठवणे वगैरे प्रकारचे टाइपकास्टिंग सुद्धा स्त्रियांच्या प्रगतीच्या आड येते की काय, याचा विचार करावा.
(विचारशील)बेसनलाडू
20 Jul 2009 - 11:36 pm | प्राजु
नाना, चंद्रशेखर गोखले, कवितेतून (तुम्हाला) संसारी 'स्त्री'चे वर्णन जाणवत असले, तरी स्पष्टपणे तसे कोठेही आलेले नाही. ते पुरुषाचेही मनोगत/व्यथा असू शकेल, या शक्यतेचाही जरूर विचार व्हावा. अशी कविता वाचून लगेचच 'स्त्री'चे चित्र/वर्णन आठवणे वगैरे प्रकारचे टाइपकास्टिंग सुद्धा स्त्रियांच्या प्रगतीच्या आड येते की काय, याचा विचार करावा.
कोणाकडून तरी मला असा प्रतिसाद यावा असं वाटत होतं. धन्यवाद बेला. :)
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/
20 Jul 2009 - 12:26 pm | Dipa Patil
दिपा
खुप छान कविता...
प्राजुताई,माझ मनच तुमच्या कवितेतुन उलगडल.
20 Jul 2009 - 6:49 pm | अनामिक
प्राजु तैची अजून एक सुंदर, वास्तवदर्शी कविता आवडली. शेवटचे कडवे तर सुरेखच!
-अनामिक
20 Jul 2009 - 8:47 pm | दशानन
छान कविता.
खास करुन
नाव तुझे नि गाव तुझे
ओळख माझी विरून गेली
कर्तव्याच्या मढ्याखाली
स्वप्ने सारी पुरून गेली..
हे सुंदर.
+++++++++++++++++++++++++++++
काय ? देवाला गंध, फुल वहाणे, देवळाला पैशाची वगैरे मदत करणे म्हणजे भ्रष्टाचार वाटतो तुम्हाला? वा ! आनंद वाटला आपल्याला भेटुन. ;)
20 Jul 2009 - 9:20 pm | लिखाळ
ह्म्म ..
कविता चांगली आहे !
-- लिखाळ.
'काहीतरी कुठेतरी चुकते आहे.' असली वाक्ये आपल्या 'सूक्ष्म' विचारशक्तीची बतावणी करायला उपयोगी असतात :)
20 Jul 2009 - 10:21 pm | चन्द्रशेखर गोखले
भावस्पर्शी , वास्तवदर्शी कविता !! स्त्रीमनाच्या कुचंबणेचे यथार्थ वर्णन !! काय बोलु...?
20 Jul 2009 - 10:42 pm | घाटावरचे भट
छान कविता.
20 Jul 2009 - 10:43 pm | कपिल काळे
सुंदर कविता.
तडजोड दोघांकडूनही अपेक्षीत आहे.
21 Jul 2009 - 12:02 am | आपला अभिजित
नाव तुझे नि गाव तुझे
ओळख माझी विरून गेली
कर्तव्याच्या मढ्याखाली
स्वप्ने सारी पुरून गेली..
कविता छानच आहे.
पण एक बदल सुचवावासा वाटतो.
मढ्या(प्रेता)खाली काही पुरत नाहीत. प्रतीक असले, तरी जरासे खटकतेय.
मढ्याखाली स्वप्ने गाडली गेली किंवा `थडग्याखाली पुरली गेली' असा बदल करता येईल का प्राजु?
21 Jul 2009 - 12:26 am | ऋषिकेश
चांगली कविता. आवडली
ऋषिकेश
------------------
बुद्धीसाठी लोह वाढवणारी औषध घ्यायला लागल्यापासून "डोकं गंजलं तर!" ही भिती वाढली आहे
21 Jul 2009 - 6:19 am | प्राजु
सर्वांचे मनापासून आभार.
बेला आणि कर्क, आपले विशेष आभार. आपल्यात झालेली चर्चा वाचून खरंच खूप बरं वाटलं.
अभिजित, मढे या अर्थी वापरला आहे, की तिथे सजीवतेच्या सगळ्या कल्पना संपतात. प्रेत हा शब्द मला जो भाव अभिप्रेत आहे तो तितक्या राकट पणे किंवा स्पष्टपणे दाखवू शकला नसता.. म्हणून मढे!
सुचवणी आवडली तुझी तरिही. धन्यवाद.
:)
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/
21 Jul 2009 - 6:22 am | llपुण्याचे पेशवेll
छान कविता..
पुण्याचे पेशवे
एरवी सगळे कागद सारखेच. फक्त कागदाला अहंकार चिकटला की त्याचे सर्टीफिकेट होते.
Since 1984
21 Jul 2009 - 7:46 am | नंदन
कविता आवडली. बेला-कर्क यांची चर्चाही उत्तम.
नंदनमराठी साहित्यविषयक अनुदिनी
22 Jul 2009 - 12:54 pm | केशवसुमार
प्रजुताई,
कविता आवडली. बेला-कर्क यांची चर्चाही उत्तम.
(आस्वादक)केशवसुमार
22 Jul 2009 - 3:04 pm | विसोबा खेचर
हम्म! म्हणूनच तर आम्ही संसारात पडलो नाही..
असो,
छान काव्य..
तात्या.