आचार्य प्रल्हाद केशव अत्रे यांच्या मृत्युला आज चाळीस वर्षे पूर्ण होत आहेत. अत्रेंच्या या पुण्यतिथीनिमित्त त्यांना स्मरून त्यांच्याविषयी थोडंसं.
आचार्य प्रल्हाद केशव अत्रे (१३ ऑगस्ट १८९८ - १३ जून १९६९)
यांना बाबूराव अत्रे असेही म्हणत असत. ते एक खंबीर मराठी लेखक, एक श्रेष्ठ कवी, वृत्तपत्राचे संस्थापक व संपादक, राजकीय नेते, चित्रपट निर्माते-दिग्दर्शक-पटकथा लेखक होते.
ते एक उत्कृष्ट क्रिकेटपटूदेखील होते.
गोविंदाग्रजांना ते स्वत:चे गुरू मानत. गोविंदाग्रजांचे धाकटे भाऊ अत्रेंच्या वर्गात होते. त्यांच्याकरवी अत्रेंनी गोविंदाग्रजांशी आपली ओळख करवून घेतली. उभयतांत चांगले दहा-बारा वर्षांचे अंतर होते. पण एक्कलकोंडे असे राहणारे गोविंदाग्रज आणि बाबूराव अत्रे यांची चांगलीच गट्टी जमली. गोविंदाग्रजांच्या विनोदी लेखनाचा, काव्यशैलीचा प्रभाव अत्रेंवर मोठ्या प्रमाणावर पडला. गोविंदाग्रजांच्या शैलीची नक्कल करणारे अनेक जण होऊन गेले. पण अत्रेंनी त्यांच्या शैलीला खर्या अर्थाने आदर्श मानून घेऊन गोविंदाग्रजांच्या तोडीचे लेखन त्यांनी केले. गोविंदाग्रज हे एक उत्कृष्ट विनोदी लेखक होते. आपल्या मृत्युसमयीदेखील त्यांना अनेक विनोद सुचत होते. गुरुची विनोदाला जागे ठेवण्याची प्रथा त्यांच्या शिष्याने म्हणजे अत्र्यांनी चालू ठेवली.
अत्र्यांनी कोणत्याही व्यवसायक्षेत्रात शिरताना जास्त काळजी करत बसत वेळ दवडला नाही. ते बेधडक घुसायचे. पण ज्या क्षेत्रात त्यांनी पाऊल टाकलं, ते क्षेत्र त्यांनी हादरवून सोडलं. अत्र्यांनी नवयुग फिल्म्स लिमिटेड ही कंपनी स्थापली, पण कालांतराने या कंपनीतून बाहेर पडणारे तेच पहिले ठरले. पुढे अत्रे फिल्म्सने एकेक बहारदार चित्रपट काढल्याचे सर्वांना ज्ञात आहेच. त्यातील वसंतसेना या चित्रपटावर त्यांनी प्रचंड खर्च केला होता. चौदा महिने राबून तयार केलेला हा सुंदर चित्रपट इतर निर्मात्यांच्या जाचामुळे तीन महिन्यात पडला. पण जवळ जवळ सर्वच्या सर्व वृत्तपत्रांनी व नियतकालिकांनी त्या चित्रपटाचे भरघोस कौतुक केले.
अत्रे हे शिक्षण क्षेत्रात विशेष गाजले. म्हणून तर सावरकरांनी त्यांना आचार्य ही पदवी दिली. त्यांनी सर्व स्तरांतील मुलांना एकाच शाळेत शिकवले. त्यांनी तत्कालीन पाठ्यपुस्तकांवर जबरदस्त ताशेरे ओढले व स्वतः काही शिक्षकांच्या व शिक्षणतज्ज्ञांच्या मदतीने नवयुग वाचनमाला सुरू केली. मुलांना अभ्यासात गोडी वाटावी, म्हणून सोप्या भाषेतील अनेक धडे आणि कविता त्यांनी या वाचनमालेत निवडल्या. त्यांच्या वाचनमालेचे गुजरातीत भाषांतरही झाले. अत्र्यांनी लंडनला जाऊन दीड वर्षे अभ्यास केला, व परतले तेव्हा त्यांचा कायापालट झाला होता. पण त्यांच्या त्या बदलाकडे त्यावेळी कोणी लक्ष दिले नाही. कारण ते परत आल्यावर त्यांना कळले, की त्यांच्या पत्नीला क्षय झाला होता. त्या काहीच दिवसात निर्वतल्या. त्यानंतर उदास झालेल्या अत्र्यांना 'ट्रॅकवर' कोणी आणले असेल, तर त्यांच्या नाट्यलेखनाने.
सांष्टांग नमस्कार हे त्यांचे विनोदी नाटक त्यांच्या नाट्यलेखनाची सुरुवात होती. तोवर ते विनोदी वक्ते म्हणून गाजलेले होतेच, त्यात या नाटकाचीही भर. हे नाटक भयंकर गाजले. त्यानंतर घराबाहेर हे गंभीर विषयावर आधारित नाटक लिहून अत्र्यांनी सर्वांना थक्क करून सोडले. त्यावेळी सर्वांना त्यांच्या अष्टपैलूपणाची जाणीव झाली.
१९३१-३२ ही वर्षे अत्र्यांसाठी वाईट ठरली, असं स्वतः अत्रेच लिहीतात. (संदर्भ - कर्हेचे पाणी खंड २रा) यात त्यांना निष्कारण एका कोर्टकेस मध्ये गुंतवण्यात येऊन दोषी करार देण्यात आला, व हजार रूपये जामीनावर सुटका करण्यात आली. त्याच कालावधीत अत्र्यांना मद्यपानाची सवय लागली असावी. या केसचे प्रकरण चालू असताना कित्येकदा आत्महत्या करावीशी त्यांना वाटली. पण त्यांनी धीर धरला.
त्यानंतर काँग्रेसच्या वतीने त्यांनी स्वातंत्र्यसंग्रामात त्यांनी भाग घेतला. त्यावेळची त्यांनी दिलेली एकेक भाषणे अत्यंत गाजली व त्यांच्या वक्तृत्वाची किर्ती सार्या महाराष्ट्रभर पसरली. त्यांची स्वातंत्र्यपूर्व काळातील काही मोजकी भाषणे देखील त्यांनी लिहून ठेवली आहेत(कर्हेचे पाणी खंड २रा व ३रा).
आचार्य अत्रे हे भारतवर्षांतील एक महान नेते होते. त्यांच्या एकेकाळच्या अस्तित्वामुळे आज संयुक्त महाराष्ट्र होऊ शकला आहे. ते महाराष्ट्राचे प्रणेता होते. त्यांच्यासारखा नेता आज जर देशाला लाभला, तर...
अत्र्यांना माझा प्रणाम!! त्रिवार प्रणाम!!
प्रतिक्रिया
13 Jun 2009 - 4:38 pm | निखिलराव
अत्र्यांना माझा पण प्रणाम
13 Jun 2009 - 6:01 pm | विकास
आचार्य अत्र्यांच्या स्मृतिदिना निमित्त त्यांच्या कर्तुत्वाची आठवण करून दिल्याबद्दल धन्यवाद! त्यांच्या भाषेत गेल्या दहा हज्जार वर्षात तयार झालेली ही असामान्य व्यक्ती आहे!
विनोदा इतकेच गंभीर लेखन आणि राजकारणा इतकेच समाजकारण पण सहजतेने हाताळणारे फारच विरळ. मुलांचे मानसशास्त्र पण त्यांना चांगले अवगत होते.
जसे सावरकरांनी त्यांना आचार्य ही पदवी दिली तशीच अत्र्यांनी सावरकरांना स्वातंत्र्यवीर ही! त्याच सावरकरांच्या सैन्यभरती धोरणाचा अर्थ लक्षात आला नाही तर त्यांना रिक्रूटवीर पण हेच म्हणाले आणि नंतर समजल्यावर चूक मोकळ्यामनाने मान्य पण केली!
असे बरेच काही...
13 Jun 2009 - 6:25 pm | स्वप्नयोगी
त्यांचं झेन्डूची फुले फारच छान
पंखांना क्षितीज नसते,
त्यांना फक्त झेपेच्या कक्षेत मावणारे
आभाळ असते.
13 Jun 2009 - 7:26 pm | अविनाशकुलकर्णी
आचार्य अत्रे सारख व्यक्तिमत्व गेल्या १० हजार वर्षात झाले नाहि व पुढिल १० हजार वर्षात होणार नाहि...
13 Jun 2009 - 7:33 pm | नीधप
ह्म्म असे उत्तुंग व्यक्तिमत्व एखाद्यावर टिका करताना त्याच्या बायकोच्या बाळंतपणासाठी दिलेले १५० रूपये जाहीरपणे काढत असे हे ही नाकारता येणार नाही.
(संदर्भः वासूनाका वर केलेली टिका. लिखाण अर्वाच्य म्हणत म्हणत केलेली अत्र्यांची टिका वासूनाका पेक्षा जास्त अर्वाच्य वाटते.)
- नी
http://saaneedhapa.googlepages.com/home
14 Jun 2009 - 7:00 am | Nile
आत्म्याची शांती ढळेल असे काही बोलु नये म्हणतात. ;)
जुनी पुस्तकं विशेषतः मुलाखती वाचल्या की बर्याच थोर लोकांमधील 'माणसाची' जाणिव होते आणि मग आदर कमी होतो. असो!
अत्र्यांमधील मला भावलेल्या व्यक्तीमत्त्वाला आदरांजली! :)
14 Jun 2009 - 7:14 am | सहज
हेच म्हणतो.
>अत्र्यांमधील मला भावलेल्या व्यक्तीमत्त्वाला आदरांजली!
अगदी योग्य टिपणी मिस्टर एन.
14 Jun 2009 - 6:42 pm | नरेंद्र गोळे
अत्रे म्हणाले होते की:
मेल्यावर अमुचे सगळे, उभारतील दगडी पुतळे |
भवताली धरतील फेर, आज परी करती जेर ||
हे अक्षरश: खरे ठरले आहे.
त्यांच्या झेंडूच्या फुलातील खोबरे खाणारेच असंख्य आहेत.
14 Jun 2009 - 6:57 pm | आनंद घारे
अष्टपैलू व्यक्तीमत्व असलेल्या कै.आचार्य अत्रे यांनी संयुक्त महाराष्ट्राचा लढा अत्यंत जोमाने चालवला होता. ते चालवीत असलेले मराठा हे वर्तमानपत्र महाराष्ट्राचे मुखपत्र झाले होते. त्यांच्या जीवनातील या महत्वाच्या पर्वाची माहिती द्यायला हवी.
त्यांच्या स्मृतीला अभिवादन.
आनंद घारे
मी या जागी चार ओळी खरडल्या आहेत, जमल्यास वाचून पहाव्यात.
http://360.yahoo.com/abghare
http://anandghan.blogspot.com/