काजळल्या रात्री - आशंकित गात्री
उसासे ही धात्री - भयभीत ।
गोठलेले जिणे - बंध हे पडले
कोडे हे कसले - ईश्वरास ।
दुर्दैवी पखाली - दैन्यही सामोरी
कावड अंधारी - काळ वाही ।
अस्मानी, सुल्तानी - घोर हा जीवासी
नसे आसराही - कोणा येथे ।
करपली भूमी - उजाड ही सृष्टी
ओसाड ही वस्ती -खिन्न शांत ।
तेज ते उजळे - काळोख्या गर्भात
आस ही नेत्रात - वसुधेच्या ।
स्वये भाग्य लक्ष्मी - बळ ते सावरी
माळराना वरी - अवतरी ।
शपथ ग्रहण - करिती प्रमाण
राष्ट्रास्तव प्राण - देऊ आम्ही ।
शृंखला दास्याच्या - गळोनी पडती
बंध हे तुटती - अमानुष ।
निजाम, आदिल - ही कुतुबशाही
मात अन घेई - मोगलाई ।
सिद्धी तो नमला - झुकला इंग्रज
अन पोर्तुगीज - हत:प्रभ ।
तो जरीपटका - झळके डौलात
उजळे डोळ्यात - अभिमान ।
आनंद भुवनी - ओसंडूनी वाही
सौभाग्यासी नाही - खळ काही ।
सुखावली प्रजा - जागे मनी आस
सकळांना ध्यास - एक लागे ।
सह्यागिरीस या - लाभो असा एक
न्यायी, पुण्यवान - वीर राजा ।
दशदिशांना ही - वार्ता आनंदाची
राज्याभिषेकाची - फिरे द्वाही ।
ती छत्रचामरे - आणि आभूषणे
मंगल तोरणे - गगनात ।
ते अष्टप्रधान - ते शूर सोबती
जिजाउ पाहती - क्षात्रतेज ।
वर्धिष्णू अशी ही - चंद्रकलेसम
विश्ववंदनीय - राजमुद्रा ।
सुवर्ण मंडित - सिंहासनावरी
आरोहण करी - महाराजा ।
जयजयकार - करिती हे जन
नाद हा भेदून - नभ जाई ।
जलाभिषेक त्या - सप्तनद्या करती
शिवछत्रपती - राजा होई ।
प्रतिक्रिया
1 Jun 2009 - 8:40 am | अनिता
छान आहे...आवडली कविता...
1 Jun 2009 - 5:46 am | मदनबाण
छान कविता...
मदनबाण.....
I Was Born Intelligent,But Education Ruined Me.
Mark Twain.
1 Jun 2009 - 6:50 am | प्राजु
कविता आवडली.
काही ठिकाणी वृत्त थोडे चुकल्यासारखे वाटते..
आशय सुंदर आहे कवितेचा.
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/
1 Jun 2009 - 11:09 am | मनीषा
मी "देवद्वार छंदात " ही कविता लिहायचा प्रयत्न केला आहे.
1 Jun 2009 - 7:40 am | क्रान्ति
नाट्यातला राज्याभिषेकाचा भव्य प्रसंग नजरेसमोर उभा राहिला. अप्रतिम कविता!
:) क्रान्ति
क्या पता किस मोडपर मिल जायेगा वो?
गुमशुदा दिल को दिवाने ढूंढते हैं|
अग्निसखा
1 Jun 2009 - 11:16 am | जागु
जय भावानी ! जय शिवाजी !
1 Jun 2009 - 11:38 am | प्रमोद देव
छान आहे कविता!
हाती नाही येणे,हाती नाही जाणे,हसत जगावे,हसत मरावे, हे तर माझे गाणे!
2 Jun 2009 - 2:23 pm | मराठमोळा
अप्रतिम.. :)
जबरदस्त. डोळ्यासमोर चित्र उभे केलेत तुम्ही.
आपला मराठमोळा.
कोणत्याही गोष्टीचा ताप येईपर्यंत ठीक असते, पण तिचा कर्करोग होऊ देऊ नये!!