खाली दिलेले आत्मकथन नाही. पन्नास वर्षांपूर्वी खेड्यात वाढलेल्या मुलांच्या अनुभवाची मिसळ आहे. त्यात चवीसाठी पदरचे तिखटमीठ घातले आहे.
डॉक्टर की कलेक्टर ?
शाळेत शिकत असतांना थोरामोठ्या लोकांची चरित्रे वाचायला मिळाली. त्यांच्याबद्दलची माहिती कळली आणि समजही वाढली. मोठी माणसे कांही ठरवून मोठी होत नाहीत. अनेक खडतर दिव्यातून पार पडल्यानंतर त्यांना मोठेपण प्राप्त होते. तसेच मोठे झाल्यानंतरसुद्धा त्यांना नेहमीच कठीण प्रसंगांना तोंड द्यावे लागते. म्हणूनच "जया अंगी मोठेपण तया यातना कठीण" असे म्हंटले आहे. हे समजल्यानंतर "आपल्याला ते मोठेपण कशाला पाहिजे?" असे वाटायला लागले. "लहानपण देगा देवा, मुंगी साखरेचारवा" हे तुकोबांचे वचन ऐकल्यावर मोठेपणाचे आकर्षण आणखीनच कमी झाले. सगळे मोठे लोक चांगले वयस्क दिसायचे. म्हणजे असेच आपल्यालाही आयुष्यात पोक्तपणी मोठेपण मिळाले तरी तोंपर्यंत तग धरण्यासाठी आधी पोटापाण्याचा प्रश्न सोडवणे भाग होते. आमच्या पूर्वजांनी पुढील पिढ्यांना बसून खाण्यासाठी गडगंज संपत्ती जमवून मागे ठेवलेली नव्हती. घरातला असा कोणता उद्योगधंदा नव्हता. त्यामुळे माझे मोठे भाऊ शिक्षण घेऊन नोकरी करू लागले होते किंवा अजून शिक्षण घेत होते. मलाही त्याच मार्गाने जायचे होते यात शंका नव्हती. फक्त शाळा सोडल्यानंतर कोणत्या कॉलेजचा रस्ता धरायचा याबद्दल तेवढी अनिश्चितता होती.
माझ्या लहानपणाच्या काळात शिक्षणाचा प्रसार फारसा झाला नव्हता आणि आजच्या एवढी स्पर्धा त्यात आलेली नव्हती. ब-यापैकी हुषार मुलाला कोणत्याही कॉलेजात त्याला हव्या त्या शाखेत प्रवेश मिळत असे. पुढे तो अभ्यासक्रम न झेपल्यामुळे किंवा शिक्षणासाठी शहरात राहण्याचा खर्च परवडत नसल्यामुळे अर्ध्याहून अधिक विद्यार्थी ते अर्धवट सोडून नोकरीला लागत असत. त्या काळात अशा नोक-या मिळतही असत. त्यामुळे कशाचेच टेन्शन नव्हते. शाळा संपल्यानंतर कोणता अभ्यासक्रम निवडावा याची निवड आपणच करायची होती.
मला स्वतःला वाचनाची भयंकर आवड असल्यामुळे फडके, खांडेकर, अत्रे, पु.ल.देशपांडे वगैरे माझी दैवते होती. पण "प्रतिभा शिकून मिळत नाही, नक्कल करून तर नाहीच नाही, तिचे वरदान जन्मतःच घेऊन यावे लागते." वगैरे बरेचसे वाचनात आले असल्यामुळे आपण प्रसिद्धच काय पण नुसता लेखक बनू आणि आपण लिहिलेल्या चार ओळी दहा लोक वाचतील या भ्रमात मी कधी राहिलो नाही. प्रतिभावंत साहित्यिकांनी लिहावे आणि आपण ते वाचावे एवढीच माझी सोपी भूमिका होती. मला नोकरीची गरज नसती तर मी नक्कीच आर्टसला प्रवेश घेऊन मिळेल तितके मराठी, इंग्रजी व संस्कृत वाङ्मय वाचून काढले असते. पण "हल्ली नुसत्या बी.ए.ला नोक-यांच्या बाजारात फारसा भाव नाही. त्यानंतर बी.टी. करून मास्तर व्हायला हवे नाही तर एल.एल.बी करून वकील तरी!" असे ऐकण्यात आले. लहान गांवातल्या समाजात शिक्षक आणि वकीलांना भरपूर मान असायचा आणि बाहेरचे जग मी कधी पाहिलेच नव्हते. त्यामुळे शाळामास्तर किंवा वकील व्हायला माझी कांही हरकत नव्हती किंवा निदान पन्नास टक्के तीच शक्यता मला दिसत होती, पण त्याहून चांगले कांही मिळवता आले तर ते पाहिजे होते. त्यातून त्या काळात बी.ए. झाल्यामुळे मुलींचा लग्नाच्या बाजारातला भाव वाढत असल्यामुळे कलाशाखेच्या वर्गात नव्वद टक्के तरी मुलीच असायच्या. माझ्या अंगात श्रीकृष्णाचे गुण नसल्यामुळे ती परिस्थिती मला एक संधी वाटली नाही त्यापेक्षा तिची धास्तीच जास्त वाटली. माझे शाळेतले यश पाहून मला मेडिकलला सहज प्रवेश मिळेल आणि तो घेऊन मी डॉक्टर व्हावे असे घरातल्या कांही लोकांना वाटायचे. पण डॉक्टरी जीवनाकडे मी वेगळ्या दृष्टीकोनातून पहात होतो. त्या काळात साध्या ताप व खोकल्याच्या इलाजासाठी लोक डॉक्टरकडे जात नसत. अंगणातल्या तुळशीची व गवती चहाची पाने आणि स्वयंपाकघरातले आले, लवंग, मिरे अशा पदार्थांचा काढा पिऊनच ते बरे होत असत. आजार फारच चिघळला आणि त्याचा त्रास असह्य झाला तर डॉक्टरांना बोलावीत. आजारी माणसाला तपासण्यासाठी आमचे फॅमिली डॉक्टर घरीच येत असत, पण त्यांच्या कंपौंडरकडून औषध नेण्यासाठी मला दवाखान्यात जावे लागायचे. जेंव्हा जेंव्हा मी तिथे गेलो तेंव्हा असह्य वेदनांमुळे विव्हळणारे रुग्ण, गंभीर चेहेरा करून बसलेले त्यांचे चिंताक्रांत आप्त, अपघातात घायाळ झालेले लोक अशीच मंडळी त्या जागी बसलेली दिसत असे. त्यात कोणाचे तोंड सुजले आहे, कोणाच्या जखमेतून भळाभळा रक्त वाहते आहे, कोणाला भयानक धांप लागली आहे तर कोणाची ढास थांबत नाही अशी सगळी दृष्ये पाहिल्यानंतर त्या दुःखी कष्टी लोकांची सेवा करून पुण्य मिळवण्याचा उदात्त विचार कांही माझ्या मनात येत नव्हता. उलट या असल्या निरुत्साही वातावरणात सगळे आयुष्य घालवायची कल्पना माझ्याने करवली जात नव्हती. त्यात मेडिकलला जाण्यापूर्वी सायन्स कॉलेजमध्येच गांडूळाला चिमटीत पकडून उभे चिरावे लागते आणि जीवंत बेडकाचे चारी पाय पिनने टेबलाला टोचून ठेऊन त्याचा कोथळा सुरीने बाहेर काढतात वगैरे क्रूरपणाची वर्णने ऐकल्यावर तर त्या प्रकारांची शिसारीच आली. यामुळे कांही झाले तरी डॉक्टर व्हायचे नाही हे मी मनाशी ठरवले.
स्वातंत्र्य मिळण्यापूर्वी आमच्या गांवावर तिथल्या संस्थानिकाचे राज्य होते. संस्थाने संघराज्यात विलीन झाल्यानंतर जिल्ह्याच्या कलेक्टरकडे सारे प्रशासनिक अधिकार आले. त्यामुळे कलेक्टर हा राजासारखा मोठा माणूस मानला जाऊ लागला. मी सुद्धा चांगले शिकून कलेक्टर बनावे अशी माझ्या आईची इच्छा होती. पण त्यासाठी मुंबईला जाऊन कसली तरी अतीशय कठीण परीक्षा द्यायची असते एवढेच तिने कुठे तरी उडत उडत ऐकले होते. माझे वडील सरकारी नोकरीतूनच सेवानिवृत्त झाले असल्यामुळे त्यांना संपूर्ण कल्पना असावी, पण ते या विषयावर कधी मोकळेपणाने बोलायचे नाहीत. त्यांना मिळणा-या तुटपुंज्या पेन्शनमध्ये घरखर्च चालवणेच सोपे नसतांना माझ्या उच्च शिक्षणासाठी कुठून पैसे आणायचे याची विवंचना त्यांना वाटत असणार, पण त्यांनी ती कधी व्यक्त केली नाही. "पांडुरंगाच्या मनात असेल तर सगळे नीट होईल." असे आशावादी उद्गारच ते नेहमी काढीत.
शाळेत इंग्रजी शिकतांना 'कलेक्ट' म्हणजे 'गोळा करणे' आणि 'कलेक्टर' म्हणजे 'गोळा करणारा' असे या शब्दांचे अर्थ समजले. सगळ्या लहान मुलांना नाना प्रकारच्या आकर्षक वस्तू गोळा करण्याचा छंद असतोच. मला तर त्याचे अगदी वेड होते. पोस्टाची तिकीटे, नाणी, सह्या वगैरे गोळा करण्याच्या छंदांना तेंव्हाही प्रतिष्ठा प्राप्त झाली होती. पण त्यांशिवाय वेगवेगळ्या रंगाचे आणि आकारांचे खडे, खडू, गोट्या, रिकाम्या काडेपेट्या, पक्ष्यांची पिसे, वडापिंपळाची पाने, बाटल्यांची झाकणे, पेस्टच्या ट्यूबची टोपणे अशा विविध प्रकारच्या वस्तू माझ्या संग्रहात असत. पण माझे अशा प्रकारे 'कलेक्टर' होणे आईला मान्य नव्हते. मी घराबाहेर गेलेलो असतांना ती माझा खण रिकामा करून त्यातली चालू शकणारी नाणी बाजारात खपवून टाके आणि बाकीची अडगळ फेकून देत असे. पुढल्या आयुष्यात संग्रही ठेवण्याच्या वस्तू बदलल्या असल्या तरी माझा हा नाद मात्र अजून सुटलेला नाही. हजारो निरनिराळी चित्रे, लेख, माहिती वगैरेचा पसारा मांडून पहात बसणे मला मनापासून आवडते. मी अशा प्रकारचा 'कलेक्टर' जन्मभर राहिलो असलो तरी 'डिस्ट्रिक्ट कलेक्टर' मात्र होऊ शकलो नाही कारण त्यासाठी काय करायचे असते तेच त्या वेळी समजले नाही. बहुतेक ते शक्यही झाले नसते तो भाग वेगळा.
प्रतिक्रिया
27 Feb 2008 - 11:26 pm | प्राजु
मोठा लिहा ना काका. आणि प्रामाणिक मत सांगायचं तर.. या भागात लेख पुढे नाही सरकला थोडा सुद्धा. पुढच्या भागाच्या प्रतीक्षेत..
- (सर्वव्यापी)प्राजु
28 Feb 2008 - 1:21 am | पिवळा डांबिस
तू सगळ्यांना 'काका' करून ठेव!!
अगं ते २५ वर्षांचेही असू शकतात!
तुझंच नांव आपण बदलून आता (सर्वव्यापी) प्राजु च्या ऐवजी (काकाकुवा) प्राजु असं ठेवलं पाहिजे!!:)
28 Feb 2008 - 1:42 am | टिउ
माझ्या लहानपणाच्या काळात शिक्षणाचा प्रसार फारसा झाला नव्हता आणि आजच्या एवढी स्पर्धा त्यात आलेली नव्हती. ब-यापैकी हुषार मुलाला कोणत्याही कॉलेजात त्याला हव्या त्या शाखेत प्रवेश मिळत असे.
असं ते म्हणतायेत त्या अर्थी त्यांचं वय ४०+ असलं पाहिजे! वय २५ असतं तर ८-१० वर्षांपुर्वी त्यांनी कॉलेजात प्रवेश घेतला असता जेव्हा 'बर्यापैकी हुषार' मुलाला सुद्धा कोणत्याही कॉलेजात हव्या त्या शाखेत प्रवेश मिळत नसे...
28 Feb 2008 - 1:49 am | टिउ
खाली दिलेले आत्मकथन नाही. पन्नास वर्षांपूर्वी खेड्यात वाढलेल्या मुलांच्या अनुभवाची मिसळ आहे. त्यात चवीसाठी पदरचे तिखटमीठ घातले आहे.
हे वाचलंच नाही आधी! :-(
28 Feb 2008 - 8:02 am | आनंद घारे
मला आजोबा म्हणायलाही माझी हरकत नाही. माझ्या भावांची नातवंडे मला आजोबाच म्हणतात. ती आता नोकरीला लागली आहेत.
मोठा लिहा ना काका.
वयोमानाने हात थोडे हळू चालणार !
आणि प्रामाणिक मत सांगायचं तर.. या भागात लेख पुढे नाही सरकला थोडा सुद्धा. पुढच्या भागाच्या प्रतीक्षेत..
पुढच्या भागात तो सरकेलच नव्हे तर संपेलसुद्धा. कृपया वाट पहा.
28 Feb 2008 - 8:04 am | आनंद घारे
मला आजोबा म्हणायलाही माझी हरकत नाही. माझ्या भावांची नातवंडे मला आजोबाच म्हणतात. ती आता नोकरीला लागली आहेत.
मोठा लिहा ना काका.
वयोमानाने हात थोडे हळू चालणार !
आणि प्रामाणिक मत सांगायचं तर.. या भागात लेख पुढे नाही सरकला थोडा सुद्धा. पुढच्या भागाच्या प्रतीक्षेत..
पुढच्या भागात तो सरकेलच नव्हे तर संपेलसुद्धा. कृपया वाट पहा.
28 Feb 2008 - 9:34 am | प्राजु
तुझंच नांव आपण बदलून आता (सर्वव्यापी) प्राजु च्या ऐवजी (काकाकुवा) प्राजु असं ठेवलं पाहिजे!!:)
वा! काय भारी नाव आहे...
- (सर्वव्यापी)प्राजु सॉरी...(काकाकुवा)प्राजु..