मी कोण होणार ? : भाग ४

आनंद घारे's picture
आनंद घारे in जनातलं, मनातलं
29 Feb 2008 - 11:29 am

खाली दिलेले आत्मकथन नाही. पन्नास वर्षांपूर्वी खेड्यात वाढलेल्या मुलांच्या अनुभवाची मिसळ आहे. त्यात चवीसाठी पदरचे तिखटमीठ घातले आहे.
अखेर इंजिनियर
इंजिनियर होण्याची अंतःप्रेरणा मात्र लहानपणी माझ्या मनात कधीच उठली नाही, कारण मी इंजिनियर हा प्राणीच पाहिला नव्हता आणि त्या शब्दाचा अर्थसुद्धा मला कळला नव्हता. आमच्या गांवातली एकूण एक जुनी घरे दगडमातीच्या भिंती उभारून बांधलेली होती. मी शाळेत जायला लागल्यानंतर सिमेंटचे पहिले पोते आमच्या गांवात आले असावे. पिढीजात बांधकाम करत आलेले गांवातले निष्णात गवंडी लोक येऊन बांधकाम करीत आणि सुतार येऊन दारे खिडक्या बसवण्याचे काम करीत असत. घराचे मालक स्वतःच कुठे काय बांधायचे ते त्यांना सांगायचे. गांवातले अनुभवी लोक त्यांना मार्गदर्शन करायचे. त्यात सुद्धा शनी, यम, अग्नी, वायू, ऊन, पाऊस वगैरेंच्या दिशा अशा गोष्टींना प्राधान्य असे. घर बांधण्यापूर्वी त्याचा नकाशा काढणे व सरकारकडून त्याची मंजूरी मिळवणे असल्या भानगडी कोणी ऐकल्यासुद्धा नसतील. पिठाची चक्की आणि छापखाना या गांवातल्या दोन प्रकारच्या 'कारखान्यां'त थोडी यंत्रसामुग्री होती. तिथे काम करणारे मजूर त्याची देखभाल करत. मोटारगाड्यांना तेल पाणी पुरवायचे काम 'किन्नर' (क्लीनरचा अपभ्रंश) करायचे. वीजपुरवठा करणारी एक बेभरंवशाची यंत्रणा होती. ती वायरमन (इलेक्ट्रिशियन) चालवत असे. यामुळे सिव्हिल, मेकॅनिकल किंवा इलेक्ट्रिकल यातल्या कोठल्याच शाखेच्या इंजिनियरची गांवाला गरज नव्हती. त्यांच्या सहाय्याशिवाय गांवाचा गाडा सुरळीत चालत होता. तोंपर्यंत आमच्या नात्यागोत्यातसुद्धा कोणी इंजिनियर झालेला नव्हता. आताच्या पुढच्या पिढीतली ऐंशी नव्वद टक्के मुले मात्र कसल्या ना कसल्या प्रकारचे तांत्रिक कामच पाहतात.
खूप पूर्वी एकदा दूर कुठे तरी एकादा पूल कोसळला किंवा कारखान्यात मोठा अपघात झाला होता. त्याची बातमी वर्तमानपत्रात छापून आली तेंव्हा घरातली मोठी माणसे त्या विषयी जी चर्चा करू लागली त्यात 'इंजिनियर' हा शब्द पहिल्यांदा कानावर पडला. अर्थातच त्या दुर्घटनेचा सगळा दोष त्याला दिला गेला. त्यातले जेवढे कळले त्याप्रमाणे हा प्राणी बंगल्यात राहतो, जीपगाडीत बसून हिंडत असतो (जीपा उडवतो!) आणि पैसे खातो अशी चमत्कारिक वाटणारी माहिती मिळाली. त्या काळी आमच्या गांवात वाडे होते, घरे होती, झोपड्या होत्या आणि गांवापासून दूर एक राजवाडासुद्धा होता, पण 'बंगला' म्हणता येईल अशा प्रकारची वास्तू नव्हती. 'बंगला' हा शब्द एका रहस्यमय सिनेमातच ऐकला होता. त्यातल्या खोल्यांमध्ये सगळीकडे जळमटे झाली असतील, कपाटातून हाडाचे सांगाडे बाहेर पडतील, गडद अंधारात भुते वावरत असतीन आणि लालबुंद डोळ्याचा सहा फुटी तगडा रखवालदारच तिथे रहात असेल अशी माझी त्याबद्दलची कल्पना होती. हा इंजिनियर या असल्या भयाण जागेत कां वास्तव्य करत असेल?
जीपगाडीची ओळख देखील अशाच प्रकारची होती. शहरातला कोणी पोलिस इन्स्पेक्टर किंवा तत्सम बडा अधिकारी कधी तरी आमच्या गांवातून आरपार जाणा-या रस्त्यावरून इकडून तिकडे गेला तर त्याच्या जीपगाडीचे आम्हाला दर्शन व्हायचे. तिचा भयानक आवाज दुरूनच ऐकू आला की आम्ही मुले घाबरून मिळेल त्या आडोशाला जाऊन उभे रहात असू आणि प्रचंड खडखडाट करीत व धुळीचे लोट उडवीत जाणा-या त्या बेढब वाहनाकडे दुरूनच चोरट्या नजरेने पहात असू. सगळ्या बाजूने उघडी असलेली ती गाडी कांही मनाला भावत नसे. हा इंजिनियर मुद्दाम असल्या गाडीतून कशाला प्रवास करत असेल? अखेर तो अगदी जंगलात रहात असला आणि तिथे खायला वरण भात मिळत नसला तरी पैसे ही काय खाण्याची गोष्ट आहे? एकदा चुकून मी एक ढब्बू पैशाचे नाणे दातात धरून चावले होते तेंव्हा माझे हलत असलेले दोन दांत पडले होते. शिवाय आईने पाठीत धपाटा घातला होता तो वेगळाच. "नरड्यात पैसा अडकला तर जीव जाईल" असे ती म्हणाली होती. आणि हा इंजिनियर म्हणे सरळ पैसे चावून गिळतो! त्याचे सगळेच काम और दिसत होते.
अशा प्रकारची चित्रे मनात बाळगून कोण इंजिनियर होण्याचे स्वप्न पाहील? वाढत्या वयाबरोबर हळू हळू त्यातल्या एकेका गोष्टीचा खुलासा होत गेला. बंगला हे एक प्रकारचे छानसे स्वतंत्र आणि प्रशस्त असे घरच असते आणि रानावनात व खेड्यापाड्यातल्या कच्च्या रस्त्यावरून जाण्यासाठी मजबूत बांधणीची जीपच उपयोगाला येते हे समजले. पैसे खाणे काय असते ते कळले. फक्त इंजिनियरच पैसे खातात किंवा सगळेच इंजिनियर पैसे खातात अशातला भाग नाही, हा संपूर्ण समाजात पसरलेला रोग आहे हे देखील समजले. जेंव्हा दुर्घटना घडते त्या वेळी संबंधित लोकांबद्दल अशी शंका घेतली जाते त्यामुळे त्याचा संबंध इंजिनियरशी जोडला गेला हे लक्षात आले. अशा प्रकारे इंजिनियरांच्या पेशाबद्दल मनातला आकस दूर झाला. पण तरीही तो नेमके काय काम करतो हे मात्र समजत नव्हते. त्यामुळे त्याचे आकर्षण वाटत नव्हते.
पंडितजींच्या नेतृत्वाखाली पंचवार्षिक योजना सुरू झाल्या आणि देशात जागोजागी मोठमोठी धरणे व कारखाने उभे करण्याचे प्रकल्प सुरू झाले. त्यानंतर इंजिनियरांचे महात्म्य दिवसेदिवस वाढत गेले. "मुलगा इंजिनियरिंगची परीक्षा पास झाला रे झाला की त्याला बंगला, गाडी यासकट नोकरीची ऑर्डर मिळते." अशा प्रकारच्या वदंता उठल्या आणि आमच्या गांवापर्यंत येऊन पोचल्या. मोठमोठ्या नद्यांचे पाणी धरण बांधून अडवण्याचे काम करणारा भगीरथाचा अवतार असणार आणि रेल्वेगाड्या किंवा जहाजांसारख्या अगडबंब धुडांची निर्मिती करणारा विश्वकर्म्याचा अंश असणार!  "असले आव्हानात्मक काम करायला मिळाले तर?" हा विचार मनाला मोहून टाकणारा होता. त्यामुळे शालेय जीवनाच्या अखेरीस मलाही इंजिनियरिंगचे आकर्षण वाटू लागले. शिवाय त्या काळात घरातली नाजुक आर्थिक परिस्थिती पाहता ती सुधारण्यासाठी चांगल्या नोकरीची मला गरज होती. मला बंगला गाडीचे एवढे आकर्षण नव्हतेच आणि प्रत्यक्षात ती मिळाली नाही याचे वैषम्यही वाटले नाही.
कुणाचे भले होत असले तर त्यात खोडा घालणारे लोक भेटतातच. "इंजिनियरच्या कामात जिवाला धोका असतो म्हणे." किंवा "त्या कोर्सचा अभ्यास फारच कठीण असतो, त्यात भयानक शारीरिक कष्ट असतात, ते याला झेपतील काय?" अशा प्रकारच्या माहितीने माझ्या मातापित्यांचे कान भरून झाले. आमच्या लहान गांवात बरोबर व पूर्ण माहिती देणारा कोणीच नव्हता. सगळेच ऐकीव गोष्टी सांगणारे होते. पण होणारा विरोध पाहून माझ्या मनातल्या सुप्त इच्छेचे रूपांतर निर्धारात झाले. प्रवेशासाठी पाहिजे होते तेवढे गुण मिळवण्यात मला  अडचण नव्हती. ते मिळवून इंजिनियरिंग कॉलेजात प्रवेश तर मिळवलाच, शिवाय नॅशनल स्कॉलरशिप मिळाल्याने खर्चाचा प्रश्नही आपण होऊन सुटला. तरीही कॉलेजात प्रवेश करेपर्यंत मला एकही इंजिनियर प्रत्यक्षात भेटला नव्हता की त्या कोर्सचे एकही पुस्तक दृष्टीला पडले नव्हते. इंजिनियरिंग म्हणजे काय हा प्रश्न अजून अनुत्तरितच होता.

प्रतिक्रिया

धमाल मुलगा's picture

29 Feb 2008 - 12:02 pm | धमाल मुलगा

वा !!!हा भाग तर एकदम आवडला. मस्त जमलाय. बढिया!!!आपला- ध मा ल.

राजमुद्रा's picture

29 Feb 2008 - 1:28 pm | राजमुद्रा

वा आनंदघन!
मला तर ही माझीच गोष्ट वाट्ते आहे. फक्त मी इंजिनियर झाले नाही तर चित्रकार झाले. तुमची गोष्ट पन्नास वर्षांपूर्वीची आहे आणि माझी नऊ वर्षांपूर्वीची. मला दहावीनंतर योग्य अभ्यासक्रम निवडायचा होता. अभ्यासक्रम निवडताना योग्य मार्गदर्शक मिळाला नाही तर किती त्रास होतो हे मी  चांगलं अनुभवलयं. अशिक्षित आईबाबा आणि चित्रकारांबाबतच्या वावड्या यामुळे अडचण वाटली खरी, पण तेच अशिक्षित आईबाबा जेव्हा ठामपणे मागे उभे राहिले तेव्हा खरच नवी उभारी मिळाली आणि अर्धवेळ काम करून का होईना पण  माझे शिक्षण पूर्ण झाले.
धन्यवाद आनंदघन! आज तुमच्या लेखामुळे बर्‍याच आठवणी जाग्या झाल्या.
राजमुद्रा :)

मलापण लहानपणी "इंजिनीयर" म्हणजे एकदम अचाट गोष्टी करणारे लोक वाटायचे. हे प्रकरण म्हणजे एकतर 'गोर्‍या चामडीच्या लोकांचे किंवा ईथल्या अवलिया व विक्षिप्त ' लोकांनाच साध्य आहे असा माझा समज होता[ त्याला माझ्या नात्यातल्या एका इंजिनीयर असलेल्या 'विक्षिप्त मामाने' बळकटी दिली ]. त्यामुळे लहानपणापासूनच मला त्याचे आकर्षण होतेच . "मोठीपणी काय होणार ?"  याचे उत्तर लहानपणी प्रसंगानुरूप बदलत गेले , सांगायचे तर "दूसर्‍यावर सूड घेण्यासाठी त्याला इंजेक्शन देण्यासाठी मला डॉक्टर व्हावे असे वाटे , एस टी कंडक्टर चा मस्त प्रवास व हातातली पैशाने भरलेली बॅग बघून मला ते आवडे , भेळचा गाडा चालवणार्‍या भैयाची लै ऐश असेल असे मानून माझी भेळचा गाडा टाकायची ईच्छा होत असे, सिनेमे बघून तर विचारायलाच नको ( 'बॉर्डर' बघितल्यावर मी सैनिक होतो असे म्हणल्यावर पिताजीनी अशा नजरेने बघितले की मला तो विचार जागेवर्च सोडून द्यावा लागला. मग मी ठरवले की आधी मला विरोध करणार्‍या 'घरातील दूश्मनांशी लढू मग देशाचे  दूश्मन आहेतच की.'), 'डब्ल्यु डब्ल्यु एफ' बघून आम्ही 'फायटर' व्हायचे ठरवल्यावर पिताजींनी घरातील 'केबल कनेक्शन बंद' करून टाकले. पण त्यातल्या त्यात "इंजिनीयर " व्हायची ईच्छा मनात तशीच होती .............पुढे १० वी व १२ वी ला जबरदस्त मार्क पडून बोर्डात आल्यावर आपोआप 'इंजिनीयरिंला जाण्याचे मार्ग' यक्दम सोपे झाले. शेवटी [कसेतरी] शिक्षण पूर्ण करून आज एका प्रतिष्ठित आस्थापनात नोकती करताना लहानपणाचे विचार आठलले की हसू येते ........असो. आपल्या लेखामुळे त्या आठवणी जाग्या झाल्या ......
आठवणीत हरवलेला छोटा डॉन [ आम्हाला इथे भेट द्या http://chhota-don.blogspot.com/ ]याव्यतिरिक्त आमची कोठेही शाखा नाही ...........

प्राजु's picture

29 Feb 2008 - 8:00 pm | प्राजु

हा भाग अयिशय छान झाला आहे.
'बंगला' हा शब्द एका रहस्यमय सिनेमातच ऐकला होता. त्यातल्या खोल्यांमध्ये सगळीकडे जळमटे झाली असतील, कपाटातून हाडाचे सांगाडे बाहेर पडतील, गडद अंधारात भुते वावरत असतीन आणि लालबुंद डोळ्याचा सहा फुटी तगडा रखवालदारच तिथे रहात असेल अशी माझी त्याबद्दलची कल्पना होती. हा इंजिनियर या असल्या भयाण जागेत कां वास्तव्य करत असेल?
हे वाचून हसू आले.
- (सर्वव्यापी)प्राजु

सुधीर कांदळकर's picture

29 Feb 2008 - 8:34 pm | सुधीर कांदळकर

भावना अगदी अचूक पकडल्या आहेत. छानच. धन्यवाद.
पु भा शु

ऋषिकेश's picture

29 Feb 2008 - 8:43 pm | ऋषिकेश

हा भाग एकदम चुरचुरीत झालाय :).. नर्मविनोद खासच!!
-('मिसळ'लेला) ऋषिकेश

स्वाती दिनेश's picture

29 Feb 2008 - 8:59 pm | स्वाती दिनेश

हा भाग मस्त जमून आला आहे,
नर्मविनोद खासच!ऋषिकेशशी सहमत.
स्वाती

पुढील भाग येऊदेत!
चतुरंग

विसोबा खेचर's picture

2 Mar 2008 - 6:08 pm | विसोबा खेचर

पुढील भाग येऊ देत!

हेच म्हणतो. आनंदराव, खूप छान लिहिलं आहे...

तात्या.

llपुण्याचे पेशवेll's picture

29 Feb 2008 - 10:12 pm | llपुण्याचे पेशवेll

'बंगला' हा शब्द एका रहस्यमय सिनेमातच ऐकला होता. त्यातल्या खोल्यांमध्ये सगळीकडे जळमटे झाली असतील, कपाटातून हाडाचे सांगाडे बाहेर पडतील, गडद अंधारात भुते वावरत असतीन आणि लालबुंद डोळ्याचा सहा फुटी तगडा रखवालदारच तिथे रहात असेल अशी माझी त्याबद्दलची कल्पना होती. हा इंजिनियर या असल्या भयाण जागेत कां वास्तव्य करत असेल?
असे मला डाक बंगला म्हटले की वाटते. :) प्रत्येक डाक बंगल्यातून एकतर स्मगलिंग चालते किंवा त्यात भुते असतात असा माझा समज आहे.  :)
बाकी वर्णन छान. माझे एक काका सिव्हील इंजिनीअरची ऐट बघून सिव्हील इंजिनीअर झाले. ते म्हणत 'जीप मधून सफारी सूट घालून येणारा सिव्हील इंजिनीअर पाहीला की त्याच्या ऐटीचे आकर्षण वाटे. तसेच सिव्हील इंजिनीअरींग सोडून ईलेक्ट्रीकल, मेकॅनिकल अशा इतर शाखा असतात हे इंजिनीअरींग कॉलेज ला जाईपर्यंत माहीतच नव्हते.' त्यामुळे आपण लिहीलेला लेख वाचून मला माझ्या वयस्कर काकांची आठवण झाली.
तसेच माझ्या आजोबानी सागितलेल्या एका गमतीची आठवण झाली. ती अशी की एक 'डेक्कन कॉलेजचे' सुपरीटेंडंट असलेल्या गृहस्थांच्या वृद्ध आईने घरी आलेल्या पाहुण्याना 'आमचा बन्या ढेकूण कालेजात सुपारीटुण् टुण् आहे' असे सांगितले होते. :)
पुण्याचे पेशवे

रंजन's picture

29 Feb 2008 - 10:37 pm | रंजन

तुमचे कथन चालू द्या ..आमच्या वेळेस तर फावला वेळ कसा घाल्वायचा म्ह्णुन जायचे बॉ लोक इंजिनियर व्हायला.

बापु देवकर's picture

2 Mar 2008 - 4:07 pm | बापु देवकर

खरच...खुप छान आहे...

हे वाचून आठवले की लहानपणि माझ्यासठी इंजिनियर चा अर्थ रेल्वे इंजिन चालक असा होता...आणी मलादेखिल तेच व्हायचे होते.

राज....

धनंजय's picture

2 Mar 2008 - 7:48 pm | धनंजय

हाही भाग आवडला.

अवांतर : मलाही रेल्वे इंजिन चालकाच्या पेशाबद्दल फार आकर्षण होते.

आनंद घारे's picture

2 Mar 2008 - 7:36 pm | आनंद घारे

सर्व वाचकांनी दिलेल्या प्रोत्साहनाबद्दल मी त्यांचा आभारी आहे. माझ्या मूळच्या नियोजनानुसार करिअरचे एक एक पर्याय मोडीत काढून अखेर इंजिनिअरिंगला या मालिकेचा शेवट झाला होता. आता त्यापुढे काय यावर विचार करून लिहावे असे वाटू लागले आहे. त्यासाठी थोडा वेळ द्यावा लागेल.