साहित्यः पुरीसाठी:मैदा - १ (नैवेद्याची) वाटीबारीक रवा - १ वाटीमीठ - चवी नुसारतेल - तळण्यासाठी
पाणीपुरीचे पाणी:पुदीना पाने - एक मूठकोथींबिर - २ मूठीहिरव्या मिरच्या - ४काळे मिठ - १ टेबलस्पून
चिंच-गुळाचे पाणी:चिंच - १ लिंबाएवढीगूळ - २ लिंबांएवढाजीरे पावडर - १ टीस्पूनपांढरे मीठ - १/२ टीस्पून
रगडा:पांढरे वाटाणे - १/४ वाटीकांदा - १टोमॅटो - २आलं-लसूण पेस्ट - १/२ टीस्पूनतेल - पाव वाटीतिखट - १/२ टीस्पूनहळद - १/४ टीस्पूनछोले मसाला - १ टीस्पून
कृती:
पुर्या:मैदा, रवा आणि मीठ एकत्र करून घट्ट भिजवा.त्याची पातळ पोळी लाटून एखाद्या छोट्या झाकणाने पुर्या कापून घ्या.मध्यम आंचेवर तेल तापवून सोनेरी रंगावर तळून घ्या.
पाणीपुरीचे पाणी:पुदीना, कोथींबिर, मिरच्या बारीक चिरून मिक्सरवर ग्राइंड करून घ्या. एखाद्या बारीक गाळणीतून वरील मिश्रण गाळून घ्या. गाळलेल्या पाण्यात काळे मिठ चवीनुसार मिसळून थंड पाण्याने हे गाळलेले पाणी पातळ करून घ्या.
चिंच गुळाचे पाणी:चिंच आणि गुळात थोडे पाणी घालून शिजवून घ्या. गॅस वरून खाली उतरवून थंड होऊ द्या. थंड झाल्यावर चिंच हाताने कुस्करून मिश्रण गाळणीने गाळून घ्या. त्यात आता जीरे पावडर आणि मीठ घालून चव जुळवून आणा.
रगडा:वाटाणे किंचीत सोडा घालून ५-६ तास भिजत घाला.नंतर, कुकर मध्ये किंवा ओपन शिजवून घ्या.कांदा, टोमॅटो बारीक चिरून घ्या.कढईत तेल तापवून त्यावर बारीक चिरलेला कांदा गुलाबी रंगावर परतून घ्या. कांदा परतला की आलं-लसूण पेस्ट परतून घ्या. त्या नंतर बारीक चिरलेला टोमॅटो त्यात घालून वरून चवीनुसार मीठ घाला आणि टोमॅटो शिजेस्तोवर परता. टोमॅटो शिजून एकजीव झाला की त्यात तिखट, हळद, छोले मसाला घालून तेल सुटेस्तोवर परता. आता यात शिजवलेले वाटाणे घाला. जास्त पाणी घालू नका. घट्टसरच ठेवा. किंचीत उकळून खाली उतरवा.
आता, तिन वाट्यांमध्ये चिंच-गुळाचे पाणी, पुदीना-कोथींबिर पाण आणि रगडा काढून त्या बरोबर बशीत ७-८ पुर्या सजवून सादर करा.
टीपः पाणीपुरीचे पाणी आणि रगड्यातील साहित्याची प्रमाणे ऐच्छिक आहेत. आपल्या चवीनुसार प्रमाण कमी जास्त करण्यास हरकत नाही. पुर्या आणि चिंच गुळाचे प्रमाणे शक्यतो बदलू नये.
प्रत्यक्ष पाणीपुरी बनविताना, चिंच गुळाच्या पाण्याचे प्रमाण तिखट पणाच्या आवडीनुसार जुळवून घ्यावे. चिंच गुळाचे पाणी पुर्णतः टाळले तरी चालेल.
धन्यवाद.
शुभेच्छा.....!
प्रतिक्रिया
26 Feb 2008 - 11:09 pm | मीनल
फोटो काय क्लास आहे !
एक एक उचलून तोंडात घालाविशी वाटते आहे पुरी.पण पुरणार नाही एक प्लेट!
सोपी आहे करायला कॄती.पण वेळ खूप जाईल.
26 Feb 2008 - 11:45 pm | चतुरंग
प्रभाकरपंतांची पाणीपुरी आली!त्या प्लेटीतल्या पाणीपुर्या मला वेडावून दाखवताहेत असा भास होतोय हो :((
पंत, तुमचे अपराध वाढत चालले आहेत आणि ह्याची सजा आम्ही जातीने पुण्यपत्तनी येऊन देऊ!
चतुरंग
26 Feb 2008 - 11:51 pm | प्रभाकर पेठकर
ह्याची सजा आम्ही जातीने पुण्यपत्तनी येऊन देऊ!
मानगुट हाजीर है जहाँपनाह.....
27 Feb 2008 - 9:27 am | केशवसुमार
आमच आगमन झाले आहे. ह्या शनिवार- रविवारी आपल्या उपहारगृहावर धावा बोलण्यात येणार आहे.. तयार रहा.. जेव्हढे फोटो इथे लावलेत ते सगले पदार्थ तयार ठेवा..आलोच..केशवसुमार..
26 Feb 2008 - 11:46 pm | प्राजु
ते बरे झाले. पाणी सगळ्या प्रकारचे येत होते तसे आणि रगडाहि. पुर्याच जमत नव्हत्या.
पण प्रभाकरपंत.. फोटो इथे लावून माझ्या वर्मावर बोट ठेवलं आहे तुम्ही. याची शिक्षा भोगावी लागेल तुम्हाला. भारतात आले की.. नुसती तुमच्या घरीच तळ ठोकेन मी. बघा.. काय काय करून खायला घालायला लावीन तुम्हाला ते..
- ( पुरी सारखी टम्म फुगुन बसलेली)प्राजु
26 Feb 2008 - 11:59 pm | प्रभाकर पेठकर
जरूर, प्राजु. तुमचे स्वागतच होईल. चवीने खाणारे भेटले की करणार्याच्या अंगावरही चांगले मुठभर मांस चढते. (डॉक्टरांनी अगदी बाळमूठीसही मनाई केली असली तरी...).
27 Feb 2008 - 12:36 pm | स्वाती दिनेश
मीनल यांनी म्हटल्याप्रमाणे पुरी उचलून तोंडात टाकावीशी वाटते आहे.पाणी सुटले तोंडाला..:-)क्लासच! म्हणजे आता मला इथे पाणीपुरी करता येईल तर.. वावा,पेठकरसाहेब ,धन्यु..:-)शंका-ह्या प्रमाणात साधारण किती पुर्या होतील?एका नेवैद्याच्या वाटी मैदा+१ वाटी बारीक रवा,कोणती वाट्या? नेवैद्याची की साधी?शेवपुरीच्या पुर्या करताना हेच प्रमाण घेऊन तळायच्या आधी फोर्कने टोचा मारायच्या का?आणि रगडा पॅटीसची कृती द्या ना प्लीज.
स्वाती
27 Feb 2008 - 12:14 am | प्रभाकर पेठकर
साधारणपणे १५ ते २० पुर्या होतात.नैवेद्याची वाटी = २ इंच व्यास, १ इंच खोली.ज्या वाटीने मैदा घ्यायचा त्याच वाटीने रवा घ्यायचा.शेवपुरीच्या पुर्यांसाठी हेच प्रमाण. पुर्या लाटून थोडावेळ तशाच उघड्या ठेवायच्या (म्हणजे जरा वाळतील), तसेच फोर्कने टोचे मारल्यावर फुगणार नाहीत. चपट्या आणि कडक होतील.
रगडा पॅटीसची कृती देईन लवकरच.
धन्यवाद.
27 Feb 2008 - 12:41 pm | स्वाती दिनेश
धन्यवाद ,आता लवकरच फ्राफु मध्ये पापु होणार आणि तुम्हाला दुवा देत देत आम्ही खाणार,:)प्राजुने म्हटल्याप्रमाणे पुर्यांची कृती माहित नसल्याने पापु येथे करता येत नव्हती,आणि भारतातून येताना मी शेवपुरीच्या पुर्या आणते पण पापुच्या पुर्या न मोडता आणणे म्हणजे.. असो.पुन्हा एकदा धन्यवाद.स्वाती
27 Feb 2008 - 2:22 pm | प्रभाकर पेठकर
आता लवकरच फ्राफु मध्ये पापु होणार आणि तुम्हाला दुवा देत देत आम्ही खाणार,:)
शुभेच्छा..!
कशी झाली पाणीपुरी जरूर कळवा.
27 Feb 2008 - 2:32 am | मीनल
तश्या मी पण करते घरी पु-या.
फुगली तर पाणिपुरी .चपटी झाली तर शेवपुरी आणि मोडली तर ,अजून चुरून भेळेत घालून खाल्ली.
सर्व चाट प्रकार पार पाडतात या पु-या प्रकरणात. काही काही म्हणून वाया जात नाही .
हे सांगातचा हेतू हाच की प्रयत्न जरूर करावा पु-यांचा. व्हरायटी खाता
येईल घरच्या घरी एकाच वेळी. बीच किंवा चन्ना भंडार शोधायला नको.
माझ्या पाककृती तील अजून एक गंमत सांगते याच अनुशंघाने.मी चतुर्थीला
मोदक केले की बरोबर होत नाही. मोडतात सरखे.म्हणून मी तो नाद सोडून
दिला.माझे अहो म्हणतात ,`` यावर्षी नाही का तुझे मोडक ?कर ना कधी तरी घरी.मी खाईन मोडक असले तरी.``
तुम्ही सांगा माझी काय भिशाद होईल का असं ऐकल्यावर?
27 Feb 2008 - 5:25 am | विसोबा खेचर
पेठकरशेठ, अहो का असे छळताय?! च्यामारी त्या संगणकाच्या स्क्रीनच्या! अहो अशी जिवघेणी चित्रं नुसती पाहवत नाहीत हो! :)
असो, अप्रतिम पाणीपुरी!
तात्या.
27 Feb 2008 - 7:45 am | पिवळा डांबिस
चाळवलंत आम्हांला!!
आता घरी कारभारणीला पाणीपुरी करायला सांगितलं पाहिजे नाहीतर 'लिट्ल इंडिया' ला गेलं पाहिजे!!!
-डांबिसकाका
27 Feb 2008 - 7:53 am | विसोबा खेचर
चाळवलंत आम्हांला!!
??
खाद्यपदर्थांच्या बाबतीत 'जीभ चाळवली' असं म्हणतात! ओव्हरऑल चाळवणार्या गोष्टी वेगळ्या असतात रे डांबिसा!
अर्थात, हे मी तुला सांगायला नको परंतु तुझे नुसतेच 'चाळवलंत आम्हाला' हे शब्द अंमळ खटकले! :)
असो..! चूभूद्याघ्या...
आपला,(शंकेखोर) तात्या.
27 Feb 2008 - 7:59 am | पिवळा डांबिस
अहो जीभच म्हणायचं होतं मला!
तुम्ही काय दादा कोंडकेंची ट्युशन लावली होती का हो? :))
27 Feb 2008 - 1:10 pm | धोंडोपंत
पंत पंत पंत,
सर्वप्रथम मिसळपावावर हार्दिक स्वागत.
आपला,(स्नेही) धोंडोपंत
पानीपुरी लईईईईईईईईई झ्यांक.....
अशाच पाककृती येऊ द्यात. च्यायला लई दिसं उपाशी ठेवलं रावं तुम्ही.
तुमची "नमोगतावरची" डाल फ्राय नियमीतपणे आमच्या घरी होते आणि दरवेळेस "प्रभाकर पेठकर सुखी भव" हा आशीर्वाद आम्ही तुम्हाला देत असतो.
आपला,(उपकृत) धोंडोपंत
गेली काही वर्षे आम्ही वेलणकरांबरोबर असलेल्या आमच्या वैयक्तिक स्नेह, आपुलकी आणि जिव्हाळ्यामुळे नमोगतावर जाणे बंद केले आहे .
त्यामुळे तुम्ही जरी तिथे पाककृती देत असाल तरी त्याला आम्ही मुकलो होतो.
आता तुम्ही इथे आलात हे पाहून आम्हांदिकांस आत्यंतिक आनंद झाला.
आपला,(हर्षभरीत) धोंडोपंत
आम्हाला येथे भेट द्या http://dhondopant.blogspot.com
27 Feb 2008 - 2:31 pm | प्रभाकर पेठकर
श्री. तात्या,तुम्हाला मराठी पाणीपुरी मिळावी म्हणून हा उपद्व्याप.
श्री. पिवळा डँबिस,चित्रातील पाणीपुरीच्या पाण्याचा रंग पाहा. असं चमचमीत/झणझणीत पाणी हवं पाणीपुरीसाठी.
श्री. धोंडोपंत,सर्वप्रथम मिसळपावावर हार्दिक स्वागत.धन्यवाद.
दाल फ्रायबद्दलच्या आपल्या भावना पोहोचल्या. आपले आशीर्वाद असेच पाठीशी असू द्यावेत.
पुनःश्च धन्यवाद.
27 Feb 2008 - 3:13 pm | राजमुद्रा
आता आम्हीही घरबसल्या 'मराठी' पाणीपूरीची चव घेवू
राजमुद्रा :)
27 Feb 2008 - 3:17 pm | प्रभाकर पेठकर
धन्यवाद राजमुद्रा,
घरच्या 'मराठी' पाणीपुरीला जो झ्झ्झ्झणका आहे नं, तो भय्यांच्या पाणीपुरीला नाही.
27 Feb 2008 - 3:27 pm | राजमुद्रा
झ्झ्झ्झ्झण्क्याशिवाय पाणीपूरी अगदीच पाणचट लागते. आणि झ्झ्झ्झण्क्याशिवाय मराठीची तर कल्पनाच करवत नाही, भैय्यानी फार फार तर मिठाया, लाडू बनवावेत.
राजमुद्रा :)
27 Feb 2008 - 4:34 pm | विसोबा खेचर
घरच्या 'मराठी' पाणीपुरीला जो झ्झ्झ्झणका आहे नं, तो भय्यांच्या पाणीपुरीला नाही.
माझ्यामते ही तुलना चुकीची वाटते! प्रत्येकाच्या हाताची चव वेगळी! त्यामुळे,
'घरच्या 'मराठी' पाणीपुरीला जो झ्झ्झ्झणका आहे नं, तो भय्यांच्या पाणीपुरीला नाही.'
हे जसं म्हणता येईल तसंच आणि तितक्याच ठामपणे,
'चौपाटीवरील भैय्याच्या हातची पाणीपुरी खाण्यातली गंमतही घरच्या 'मराठी' पाणीपुरीला नाही!'
असंही म्हणता येईल!
प्रत्येकाच्या हाताची चव वेगळी, अंदाज वेगळा! शिवाय जागेचंही माहात्म्य आहेच. जशी घरच्या घरी पाणीपुरी खाण्यातली मजा वेगळी तशीच चौपाटीवर पाणीपुरी खाण्यातली गंमतही काही औरच!
पेठकरसाहेबांनी केलेली पाणीपुरी उत्तमच आहे यात काहीच वाद नाही. परंतु मला पेठकरसाहेबांच्या मराठी पाणीपुरीबद्दल पूर्ण आदर राखून असे म्हणावेसे वाटते की चौपाटीवरच्या भैय्याच्या हातची पाणीपुरीही उत्तमच असते, न्यारी असते! आणि जोपर्यंत मला चौपाटीवर मराठी माणसाच्या हातची पाणीपुरी मिळत नाही तोपर्यंत मी भैय्याच्या हातची पाणीपुरीही तेवढ्याच चवीने खाणार!
मी मुंबईच्या चौपाटीवरील भैय्याच्या हातची अतिशय उत्तम आणि चविष्ट पाणीपुरीच गेली अनेक वर्ष खात आलेलो आहे. पेठकरसाहेबांनी बनवलेल्या घरच्या पाणीपुरीची जशी गंमत वेगळी तशीच चौपाटीवर भैय्याच्या हातची पाणीपुरी खाण्याचीही मजा काही औरच!
असो..
आपला,(ठाम!) तात्या.
27 Feb 2008 - 9:42 pm | प्रभाकर पेठकर
श्री. तात्या,
मनोगतावर ....आपलं.... मिपावर प्रत्येकाला मताधिकार आहे. त्यामुळे मी आपल्या मतांचा जरूर आदर करतो.
27 Feb 2008 - 4:44 pm | सुनील
फर्मास चित्र आणि पाककृती.
घरी पाणीपुरी करताना मी मसाला घरी बनवला तरी पुर्या बाहेरूनच आणत होतो. आता पुर्यादेखील घरी करायला हरकत नाही असे वाटते.
उत्तरेत पाणीपुरीला "गोलगप्पा" म्हणतात. त्याचा गोल कोंडाळे करून गप्पा मारत खायचा पदार्थ असा सोयीस्कर अर्थ मी काढला आहे!
सुनील (पाणीपुरीवाला)
Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.
27 Feb 2008 - 5:18 pm | लिखाळ
लवकरच पाणीपुरी करावी म्हणतो.
पुर्यांच्या पिठामध्ये सोडा घालायचा नसतो का? (ही शंका बाळबोध असली तरी प्रमाणिक आहे :)
पाकृ साठी आभार.
-- लिखाळ.
'शुद्धलेखन' आणि 'शुद्ध लेखन' यांवरील चर्चा वाचून आमची पार भंबेरी उडाली आहे.
27 Feb 2008 - 9:46 pm | प्रभाकर पेठकर
'पुर्यांच्या पिठामध्ये सोडा घालायचा नसतो का?'
छे... छे... प्रत्येक गोष्टीत सोडा नाही घालू. फक्त पाणी घालावे.
27 Feb 2008 - 10:01 pm | सुनील
प्रत्येक गोष्टीत सोडा नाही घालू. फक्त पाणी घालावे.
मान्य!!!
सोड्यामुळे काही (द्रव) पदार्थांची मूळ चव बिघडते, तेव्हा पाणी किंवा बर्फ उत्तम!!
Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.
28 Feb 2008 - 9:29 pm | लिखाळ
प्रत्येक गोष्टीत सोडा नाही घालू. फक्त पाणी घालावे.
हा हा हा.. मस्त !
सोड्यामुळे काही (द्रव) पदार्थांची मूळ चव बिघडते, तेव्हा पाणी किंवा बर्फ उत्तम!!
हेच म्हणतो. मला सुद्धा सोड्या पेक्षा पाणी अधिक आवडते :)
--लिखाळ.
'शुद्धलेखन' आणि 'शुद्ध लेखन' यांवरील चर्चा वाचून आमची पार भंबेरी उडाली आहे.
27 Feb 2008 - 6:43 pm | झकासराव
काय सॉलेट फोटु हाये.
तोंडात नळच सुरु झाला पाहिल्या पाहिल्या :)
पेठकर साहेब खासच.
तुमच्या उपहार गृहावर चक्कर मारलीच पाहिजे.
कुठे आहे हे??
भारतातच आहे ना?? पुण्यात??
27 Feb 2008 - 9:51 pm | प्रभाकर पेठकर
माझे कँटीन पुण्यात सिंबॉयसिसच्या मॉडेल कॉलनीतील भाषाविषयक कॉलेजात आहे.
पण, मिपावर प्रकाशित केलेली प्रत्येक पाककृती तिथे बनतेच असे नाही. घरी आलात तर फर्माईश पुरी करता येईल. कँटीनला आलात तर तिथला मेन्यू पाहून काय खायचे ठरवावे लागेल.
27 Feb 2008 - 10:58 pm | झकासराव
मग तर जरुर भेट देवु घेवु :)
पुणेकर सगळे कधी जमत आहेत? के सु पुण्यात आगमन पावलेत अस कळालं.
मग कधी करायची मिसळ पार्टी?? :)
त्यावेळी येइनच.
मॉडेल कॉलनीत येणार असेन तर आधी कळवुन नक्की येइन :)
पुणे पेशल असा एक नवीन धागा सुरु करावा का आता??
5 Mar 2008 - 2:48 am | स्वाती राजेश
छान आहे.
पेठकर तुम्ही छान रेसिपी दिली. तुम्ही म्हणाल कि, मी रेसिपी दिली कि स्वाती लगेच आपली रेसिपी देते पण, मी देते कारण मी करते त्यात काय बदल करता येइल हे आपल्या कडून कळेल म्हणून.....
मी प्रथम बारीक रवा १ वाटी घेऊन त्यात मीठ कोमट पाणी घालून मळते नंतर पाणी शोषून घेइल् इतका त्यात मैदा घालते (साधारण १-२ टे.स्पून). १/२ तासाने कढइत तेल जास्त गरम करून पुर्या घालून मंद गॅस वर तळते. साधारण ५० पुर्या होतात (नैवेद्याच्या वाटीएवढ्या).
पुर्या फुगल्या कि "पाणी पुरी", नाही फुगल्या कि "दही बटाटा शेव पुरी"
5 Mar 2008 - 9:03 am | विसोबा खेचर
पुर्या फुगल्या कि "पाणी पुरी", नाही फुगल्या कि "दही बटाटा शेव पुरी"
हा हा हा! हे बाकी मस्तच! :)
आपला,
(ऍडजस्टेबल) तात्या.
6 Mar 2008 - 10:44 pm | प्रभाकर पेठकर
ह्याला रव्याच्या पुर्या म्हणतात. मी कधी करून नाही पाहिल्या पण अंदाज आहे जरा कडकडी त होत असाव्यात. हरकत नाही.
पाकशास्त्रातल्या परंपरांनुसार एखाद्या पिठातील पाणी शोषुन घेण्यासाठी रव्याचा वापर करतात. तसेच, भिजवलेल्या पिठात नंतर किंवा भिजवताना रवा घातला की थोड्यावेळानंतर, वरील कारणाने, पीठ घट्ट होते. सैल पडत नाही. त्यामुळे पुर्या चांगल्याच होतात.
7 Nov 2008 - 9:42 pm | मनस्वी
पेठकर काका.. खूपच उशीरा पाहिली मी ही पाककृती.
सॉल्लिड आहे. आता प्रयोग करायला हरकत नाही.
:)
7 Nov 2008 - 10:34 pm | टारझन
आता प्रयोग करायला हरकत नाही.
आम्ही स्वयंसेवक आहोत ना ... आमच्यावरच प्रयोग करा ... अंमळ पाच-सातशे पुर्या तयार ठेवा , टेस्टींग साठी ...
बाकी आज आम्ही इथे तडपतो आहोत तो फोटू पाहून ... पुण्यात आठवड्यातला १-२ दिवस चुके ,,, आम्ही इकडे आल्यापासून भैयाचा बिजनेस थंडावला असेल ..
--टारपुरी
7 Nov 2008 - 10:57 pm | वाटाड्या...
अगदी बेस्ट जमली आहे पाणीपुरी...
इकडे अमेरीकेत असली अस्सल पाणीपुरी मिळतच नाही..नाहीतर पुण्याला कमला नेहरु पार्काची पाणीपुरी खाल्याशिवाय दिस जायचा नाही...परत आठवणीने जीव भरुन आला....गेले ते दिन गेले...
मोठा धन्यवाद...
7 Nov 2008 - 11:21 pm | वर्षा
पुर्या हमखास फुगायला काही खास सूचना?
मी आतापर्यंत ४/५ वेळा 'पाणीपुरीच्याच' पुर्या घरी करायचा प्रयत्न केला. पुर्या फुगण्याचा success rate फारच कमी होता. सर्वकाही मापाने घेऊनही फुगल्या नाहीत. बाहेर होलसेलवर करतात ते कश्या करत असतील...आणि खरोखर बाहेरच्या पुर्या केव्हढ्या टम्म फुगलेल्या असतात मस्त..घरी चुकून फुगल्याच तरी तेव्हढ्या टम्म नाही होत. :(
पाणीपुरी कातण्यासाठी पाणीपुरी कटर मिळतं म्हणे? कसं असत ते? कोणाकडे आहे का?
पाणीपुरी जमल्या नाही तर शेवपुरी वगैरे उपाय असले तरी पण मग शेवटी पाणीपुरीची हौस भागत नाही ना!
-वर्षा
7 Nov 2008 - 11:23 pm | वर्षा
चिंचगुळाच्या चटणीची रेसिपी दिल्याबद्दल धन्यवाद.
गॅसवर केली नव्हती कधी
-वर्षा
20 Dec 2008 - 7:29 pm | chaitu7567
कालच रात्री आपली बैठक झाली ... मजा आली ... आज पुण्याला पोचलाही असाल ... वरची रेसिपि आणि फोटो मस्तच आहेत. ट्राय करुन बघतो जमते आहे का ते. पुर्या मात्र विकतच्याच!
"यज्ञकर्म" यशस्वी होवो ही शुभेच्छा!
21 Dec 2008 - 3:02 am | मीनल
का आणला हा धागा पुन्हा वरती ?
अहो ,तोंडाच्या पुरीत पाणी सुटत ना!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!
पोट पुरीसारख रिकाम वाटत.
खायला मिळल नाही तर चेहरा चिंचेसारखा आंबट होतो.
फोटो पाहुन गुळासारखा गोड करावा लागतो.
मीनल.
21 Dec 2008 - 8:12 am | दवबिन्दु
एकडाव पैज मारुन २०० पानीपुऱया खाल्ल्या होत्या. ते आटवलं तरी शिरशिरी येते, मी फार त फार ७-८ पानीपुऱया खाउ शकतो. त्या पन मला झेपत नाईत.
21 Dec 2008 - 2:01 pm | सोनम
तुम्ही दिलेली पाककृती खूप छान आहे. आणि वाचून तर मला पाणीपुरी खाण्याची इच्छा होत आहे.
9 Jun 2015 - 12:58 am | अक्षदा
Aaj cha maza pahilach divas hota mipa var.. Khar tar panipuri recipe search kartana Mala mipa baddal samjal ani mi sadasya zale.. Aajch karun baghitali recipe.. Pappni khup kautuk kel Maz... Purya ghari kelya sarkhya vatatch nahi as mhanale.... Recipe sathi khup dhanyawad....
9 Jun 2015 - 1:00 am | अक्षदा
Photo kadhlet pan kase takayche mahit nahi aani marathi madhe tumhi sagle kase lihita... ?
9 Jun 2015 - 1:08 am | किसन शिंदे
या पानावर तुम्हाला मदत मिळेल फोटो चढवण्यासाठी.
9 Jun 2015 - 1:09 am | श्रीरंग_जोशी
या दुव्यांवर मदत मिळेल.
काही प्रश्न असल्यास खरडफळ्यावर विचारा. उपस्थितांपैकी कुणी ना कुणी उत्तर देईल.
9 Jun 2015 - 1:09 am | सौन्दर्य
नेटवरून गुगल इनपुट टूल्स डाऊनलोड करून कॉम्प्युटरवर सेव करा. देवनागरीत लिहिणे एकदम सोपे आहे. फोटो टाकण्यासाठी मदत पानाचा उपयोग करा. आणखी माहिती हवी असल्यास व्यक्तिगत मेल करा.
पाणीपुरी फोटो आणि कृती वाचून तोंडाला पाणी सुटले. खूप छान.
9 Jun 2015 - 3:20 pm | प्रभाकर पेठकर
अक्षदा आणि सौंदर्य धन्यवाद.
७ वर्षांपूर्वीची पाककृती आहे. हल्ली मी पाणीपुरी साठी पीठ मळताना चिमुटभर खायचा सोडा सुद्धा वापरतो. छान होतात पुर्या.
11 Jun 2015 - 2:25 pm | अक्षदा
मी सुद्धा त्या दिवशी पीठ भिजवताना सोडा घातला होता. छान झाल्या होत्या पुर्या.
11 Jun 2015 - 8:52 pm | प्रभाकर पेठकर
७ वर्षांनंतर माझ्या एक चुक लक्षात आणून देण्यात आली आहे. रगड्याच्या कृती मध्ये शिजवलेले वाटाणे केव्हा घालायचे हेच लिहायचे राहून गेले आहे. ते, 'टोमॅटो शिजून एकजीव झाला की त्यात तिखट, हळद, छोले मसाला घालून तेल सुटेस्तोवर परता.' ह्या पायरी नंतर घालावेत.
चुकी बद्दल क्षमस्व.
चुक लक्षात आणून देणार्या माझ्या ज्येष्ठ भगिनीचे मनापासून आभार.
11 Jun 2015 - 9:12 pm | जेपी
हाफशेंच्युरी निमीत्त पेठकर काकांचा आणी अक्षदा यांचा सत्कार एक एक प्लेट पाणीपुरी देऊन करण्यात येत आहे.
शुभेच्छुक- जेपी आणी तमाम पाणीपुरीप्रेमी कार्यकर्ते.
17 Jun 2015 - 6:21 pm | अक्षदा
धन्यवाद... धन्यवाद...
.... पाणीपुरीप्रेमी
18 Jun 2015 - 1:36 am | प्रभाकर पेठकर
हाफ सेंच्यूरीच का? काय चांगला भाव आला नाही पाणीपुरीला......
18 Jun 2015 - 1:44 am | श्रीरंग_जोशी
बहुधा एखाद्या वादाची फोडणी दिल्याखेरीज मिपावर शतक होत नाही आजकाल :-) .