जोगेश्वर महादेव मंदिर,देवळाणे

गोरगावलेकर's picture
गोरगावलेकर in जनातलं, मनातलं
3 Dec 2025 - 4:01 pm

दिवाळीनंतर काही महत्वाच्या कामानिमित्त आमच्या मूळ गावी जाणे झाले. सकाळी लवकर निघून नाशिक-मालेगाव-धुळे मार्गे संध्याकाळपर्यंत जळगांव भागात पोहचणे असा नेहमीचा प्रवास. यावेळी आदल्या रात्री नाशिकला मुक्काम झाल्याने आम्हाला पुढच्या प्रवासासाठी भरपूर मोकळा वेळ मिळणार होता.
सकाळी साडे आठला नाशिक सोडले . एक दीड तासात चांदवड पर्यंत आलो .
चांदवडचे डोंगर

चांदवडचा घाट उतरून मालेगावजवळ आलो आणि या परिसरातील एका प्राचीन मंदिराची आठवण झाली . काही वर्षांपूर्वी मिपाकर दुर्गविहारी यांचा या मंदिराविषयी लेख वाचला होता आणि तेव्हाच माझ्या भटकंतीच्या यादीत या स्थळाची नोंद झाली होती.
दुर्गविहारी यांच्या लेखाचा दुवा
नकाशाप्रमाणे मालेगावपासून हे ठिकाण एक तासापेक्षाही कमी अंतरावर दाखवत होते . गाडी रावळगावमार्गे पुढे निघाली . (थोडे आधी आठवले असते तर नाशिक - सटाणा - देवळा असा मार्ग घेता आला असता )
रस्त्याच्या दुतर्फा डाळिंबाच्या बागा दिसत होता , झाडे फळांनी लगडलेली होती .

थोड्याच वेळात पोहचलो देवळाणे येथील जोगेश्वर महादेव मंदिराजवळ. या मंदिराची खासियत म्हणजे दगडात कोरलेली शिल्पकला जी मानवी जीवनातील सृजन, प्रेम, आणि अध्यात्म यांचा संगम दाखवते.
मंदिराला दगडी प्राकारभिंत आहे . प्राकाराच्या बाहेरून दिसणारे मंदिराचे पहिले दृष्य.


मंदिराच्या आवारात प्रवेश केल्यावर दिसणारे मंदिर . हे संपूर्ण मंदिर काळ्या दगडातील असून ते मंदिर हेमाडपंथी शैलीत बांधलेले आहे . मंदिर दगडी जोत्यावर बांधलेले असून दगडांच्या सांध्यांमध्ये चुन्याचा वापर नाही .

मंदिर बांधणीतील जोत्याच्या वर पहिला थर आहे तो हंस पट्टी ,हंस माला किंवा हंस फेरी . हंस हा ब्रह्माचे वाहन म्हणून ओळखला जातो; त्यामुळे तो सृष्टीच्या प्रारंभाशी जोडला जातो तसेच हंस भारतीय शिल्पकलेत शुद्धता, ज्ञान आणि विवेक यांचे प्रतीक आहे. हंसमालेच्या वर अजून दोन पट्टीका आहेत त्यामध्ये भौमितिक. फुले वगैरेंच्या आकृती आहेत . अतिशय कलात्मक रित्या सूक्ष्म कोरीवकाम केले आहे .

मुखमंडपा समोरील शीर विरहीत नंदी . पाठीवरचे अलंकारिक पट्टे आहेत .

मुखमंडपात अजून एक सुंदर अलंकारित नंदी दिसतो . गळ्यात घंटा, हार आणि शरीराभोवती सुबक दोरखंड नक्षीकाम.

शिखरावर श्रकृष्ण-गोपिका शिल्प खूपच लक्षवेधी आहे . कृष्णाचे नटवर रूप असून तो गोपिकांमध्ये नृत्यरत असा हा प्रसंग.

मंदिराचे नक्षीकृत खांब

अतिशय सुबक प्रमाणात कोरलेले भारवाहक .

गर्भगृह व शिवलिंग

सभागृहाच्या दोन्ही बाजूस व छताकडील भितींवर अनेक सुंदर शिल्प आहेत .

बाह्य भिंतींवर देवदेवता, मातृका , अप्सरा, नर्तक, संगीत वादन करणारे कलाकार यांची जिवंत वाटावी अशी शिल्पे कोरलेली दिसतात .

मकरशिल्प

मंदिराच्या बाह्य भिंतीवर अनेक मिथुन शिल्पे कोरलेली आहेत . या शिल्पांमध्ये पुरुष आणि स्त्री यांच्या स्नेह, नृत्य, आलिंगन, सौंदर्य आणि कौटुंबिक जीवनाचे विविध पैलू दाखवलेले आहेत ज्यांना अश्लील नव्हे तर भावपूर्ण आणि सांस्कृतिक प्रतीक म्हणता येईल आणि त्यांच्याकडे देवत्व , कला आणि सृष्टीचे दर्शन म्हणून पाहता येईल .

नाग मिथुन शिल्प

या शिल्पांमधून मध्ययुगीन कलाकारांनी जीवनातील आनंद, प्रेम आणि संतुलन यांचे दर्शन घडवले आहे. नाशिक -धुळे भागात कधी येणे झाल्यास आपल्या संस्कृतीचा हा जिवंत वारसा पाहण्यास विसरू नये .

प्रवास

प्रतिक्रिया

गोरगावलेकर's picture

3 Dec 2025 - 4:04 pm | गोरगावलेकर

लेख भटकंती विभागात हलवावा ही संपादकांना नम्र विनंती .
तसेच लेखात जे आहे, ते जसे आहे तसेच एक सांस्कृतिक वारसा स्थळ म्हणून दाखवायचा प्रयत्न केला आहे . कुठेही अश्लीलता दिसल्यास लेख उडवला तरी चालेल .

कर्नलतपस्वी's picture

3 Dec 2025 - 5:55 pm | कर्नलतपस्वी

खजुराहो प्रमाणेच शिल्पकला आहे. खजुराहो मधे सॅण्डस्टोन वापरला आहे तर इथे काळा दगड असावा असे वाटते.

पुढील पिढीचे दुर्दैवच म्हणावे लागेल,जर सरकारने या बहुमूल्य संपत्ती कडे लक्ष दिले नाही तर लवकरच नष्ट होण्याची चिन्हे दिसत आहेत.

लेख व प्रचि बद्दल धन्यवाद.

माझ्या या भटकंतीच्या आठवणी पुन्हा एकदा ताज्या केल्याबद्दल धन्यवाद !

माझ्या इथल्या धाग्यावरुन यु ट्युबवर व्हिडीओ तयार केले गेले आहेत. या मंदीराचे महत्वाचे वैशिष्ट्य म्हणजे हे त्रिदल पध्दतीचे मंदीर आहे. म्हणजे मध्ये मुख्य गाभारा आणि दोन्ही बाजुला दोन गाभारे अशी याची रचना आहे. सभमंडपात पुर्ण स्तंभ आणि वामन स्तंभ आहेत. शिवाय वामन मंडपात बसण्यासाठी दगडी बाक आहेत, हि रचना बरीचशी चालुक्य शैलीतील मंदीराची असते. हे मंदीर चालुक्य किंवा राष्ट्रकुटांनी उभारले असावे.
https://lh3.googleusercontent.com/pw/AP1GczOjJDveCZH51-MBeeS5AAUS8PiQsI9...
तुम्ही जो मंदीराच्या अधिष्ठाण म्हणजे हंसाचा थर असलेला फोटो पोस्ट केला आहे, त्यात तळाशी हंस थर , त्यावर खुर हा थर आहे, त्यावर कुंभ, मग कणिका, त्याच्यावर आतल्या बाजुला खोल गेलेला आंतरपत्री हा थर आणि सगळ्यात वर आहे तो ग्रास पट्टी ज्यावर कीर्तिमुखांचा थर दिसतो आहे.

https://lh3.googleusercontent.com/pw/AP1GczMPUXzzFOPm3Hzb--ADAFrZsBWWSQw...

या कोरीव पुर्ण स्तंभाच्या स्तरावरुन मंदीराची उभारणी नक्कीच चालुक्य किंवा राष्ट्रकुटांच्या काळातील आहे.

https://lh3.googleusercontent.com/pw/AP1GczMNBcKystt1R7TFd8iCQaBfb611FQC...

हि मुर्ती बहुधा नंदीवर आरुढ झालेल्या शिवाची असावी. मंदीर तसेही शंकराचे आहे.

https://lh3.googleusercontent.com/pw/AP1GczMYeUIujNwKfS-NqruDaZAPU71Jnvv...

हे मकरप्रणाल आहे. शंकराच्या पिंडीला अभिषेक केलेल जल येथून बाहेर येते. मकर म्हणजे मगरीचे मुख असण्यामागे दोन कारणे सांगितली जातात. एक म्हणजे मकर हे गंगेचे वाहन आहे. सहाजिकच यातून येणारे जल हे गंगाजला इतके पवित्र असेल. आणि दुसरे कारण म्हणजे मकर हे वरुणाचे वाहन आहे.

आपल्या या धाग्यामुळे पुन्हा एकदा या मंदीराला भेट देण्याची इच्छा झाली आहे.

गोरगावलेकर's picture

4 Dec 2025 - 12:34 pm | गोरगावलेकर

आपल्या प्रतिसादातून माझ्याकरिता खूपच मोलाची माहिती मिळाली .
धन्यवाद !

चांगली झाली आहे भटकंती. हजार वर्षंतरी जुने मंदिर असणार. शंकराची मंदिरे आहे पण कृष्णाची शिल्पेही आहेत.

गोरगावलेकर's picture

4 Dec 2025 - 12:32 pm | गोरगावलेकर

आपल्या बहुमूल्य प्रतिसादाबद्दल खूप खूप आभार

रेल्वे मार्ग नाशिक मनमाड चाळीसगाव जळगाव जातो त्यामुळे या भागात जायचे तर एसटीच लागते. मुद्दामहून जायला हवे.

Bhakti's picture

4 Dec 2025 - 7:56 pm | Bhakti

खुपच अनोखं मंदिर आहे.