नमस्कार,
दिनांक ६ आणी ११ नोव्हेंबर २०२५ रोजी बिहार विधानसभेसाठी निवडणूका होत आहेत. निवडणूकीचे निकाल १४ नोव्हेबर २०२५ रोजी येतील.
निवडणूक निकालांवर मिपावरील बरेच सदस्य लक्ष ठेऊन असतीलच तर निकालांची कारणीमिमांसा करणारे काही लेख १४ नोव्हेंबर २०२५ नंतर मिपावर येऊ शकतील.
मला मुख्यतः महाराष्ट्र विधानसभा आणी राष्ट्रीय स्तरावरील लोकसभेच्या निवडणूकांमधे विशेष रस असतो. मात्र बिहार विधानसभेच्या निवडणूकांबद्दल रस निर्माण झाला ते केवळ एका व्यक्तीमुळॅ ते म्हणजे प्रशांत किशोर पांडे ! (बिहार मधे आडनावाचा उल्लेख सार्वजनिक जीवनात केला जात नाही मात्र मराठी वाचकांसाठी आणि 'तुही जात कंची ?' या प्रश्नात रस असणार्यांसाठी 'पांडे' असण्याचा विशेष उल्लेख !
भारतातील राजकीय निवडणू़कांचा अभ्यास करणार्या व्यक्ती आणी संस्थांसाठी प्रशांत किशोर उर्फ पीके हे नाव अगदी ओळखीचे आहे. प्रशांत किशोर यांनी आपल्या कारकिर्दीच्या सुरुवातीची आठ वर्षे संयुक्त राष्ट्रसंघ (युनोच्या) अंतर्गत 'सार्वजनिक स्वास्थ्य कार्यक्रम' योजनेअंतर्गत काम केले. त्यानंतर त्यांनी राजकीय रणनीतीकार म्हणून अनेक राजकीय पक्षांसाठी काम केले. मला स्वतःला त्यांना राजकीय रणनीतीकार म्हणण्यापेक्षा राजकीय व्युव्हरचनाकार म्हणणे जास्त संयुक्तिक वाटते.
त्यांच्या राजकीय व्युव्हरचनाकार म्हणून काम करण्याच्या कार्यकाळात त्यांनी केलेली आणि प्रसिद्ध पावलेल्या कामांची यादी खालीलप्रमाणॅ.
भाजपा : गुजरात विधानसभा आणी लोकसभेसाठी २०१२ आणि २०१४ मधे काम केले. त्यांच्या "चाय पे चर्चा", 'रन फॉर युनिटी' "3 डी रॅली' सारख्या संकल्पना कमालीच्या यशस्वी ठरल्या.
जनता दल (युनायटेड) : २०१५ मधे नितिश कुमार आणि महागठबंधनसाठी काम केले. २०१५ मधे प्रशांत किशोर आणी इतर काही जणांनी मिळून Indian Political Action Committee (I-PAC) नावाची संस्था स्थापन केली. ह्या संस्थेने मग अनेक राज्यात आणी अनेक पक्षांसाठी निवडणूका जिंकण्यासाठी काम केले.
पंजाब काँग्रेस : २०१७ मधे पंजाबमधील निवडणूकांमधे कॅप्टन अमरींदर सिंह यांचेसाठी 'पंजाब दा कॅप्टन' मोहीम राबविली.
उत्तर प्रदेश काँग्रेस : '२७ साल बेहाल', "खाट पे चर्चा" अशा मोहिमा राबविल्या. मात्र सभेसाठी जमलेल्या लोकांनी त्या खाटा पळविल्याने ही मोहिम वेगळ्या कारणाने गाजली. या निवडणूकीत कॉंग्रेसला आणी पीके टीम ला विजय मिळवता आला नाही.
वायएसाआर कॉंग्रेस / जगनमोहन रेड्डी : यांचेसाठी २०१९ आणि २०२४ मधे निवडणूक मोहिम (२०२४ मधे वायएसाआर कॉंग्रेस / जगनमोहन रेड्डी चा पराभव होऊन तेलगु देसम पार्टीचे चंद्राबाबू नायडू मुख्यमंत्री झाले).
शिवसेना (अखंड शिवसेना, आताची उबाठा शिवसेना) : पीके आणी (I-PAC) यांनी यांचेसाठी काम केले. या कामाची फी म्हणून प्रशांत किशोर यांनी उद्धव ठाकरेंना विनंती केली होती की तुमच्या राजवटीत बिहारी मजुरांना शिवसेनेकडून मारहाण होऊ नये याची काळजी घ्या.
२०२० मधे केजरीवाल आणि आम आदमी पार्टी दिल्लीसाठी काम केले.
२०२१ मधे तामिळनाडू मधे एम. के. स्टॅलीन साठी काम केले.
२०२१ आणी २०२४ मधे प.बंगालमधे तृणमुल कॉग्रेस साठी निवडणूक मोहिमेत भाग घेतला. (प्रशांत किशोर यांनी मात्र २०२१ मधेच राजकीय व्युव्हरचनाकार म्हणून आपल्या कामातून निवृत्ती घेतली आणी त्यांनी आपले पुर्ण लक्ष बिहारवर केंद्रीत केले.
२०२२ मधे त्यांनी जनसुराज आंदोलन चालू केले आणी त्या बॅनरखाली जवळ्जवळ दोन वर्ष ३००० किलोमीटर पदयात्रा करुन पुर्ण बिहार उभा आडवा पिंजून काढला, गावोगाव फिरले आणी बिहारची स्थिती जाणून घेतली आणी आपण राजकीय पक्षाची स्थापना करु असे जाहिर केले. पिवळ्या रंगाच्या झेंड्यावर सुरुवातीला गांधीजीची प्रतिमा होती.
२ ऑक्टॉबर २०२४ गांधीजयंतीच्या दिवशी आपण "जनसुराज पक्ष" ची स्थापना करत असून त्या नावाखाली निवडणूका लढवू असे जाहिर केले. आता पक्षाच्या झेंड्यावर गांधीजींसोबत बाबासाहेबांची देखील प्रतिमा आहे. पक्षाचे निवडणूक चिन्ह "स्कुल का बस्ता" म्हणजे "शाळेचे दप्तर" आहे.
उद्याच्या निवडणुकीत त्यांनी जवळपास सगळ्याच मतदारसंघांमधे (२४३ पैकी २३८ जागांवर) उमेदवार दिले आहेत. जवळपास सगळेच उमेदवार पहिल्यांदाच निवडणूक लढत आहेत. बरेचसे उमेदवार चागले शिकलेले, प्रशासकीय पदावरून किंवा चांगल्या पदावरुन निवृत्त झालेले आहे. मात्र मुस्लीम, मागासवर्गीय आणि अगदी तळागाळातील जातीतील उमेदवार देखील दिले आहेत.
त्यांची बिहार स्थितीबद्द्लची बरीचशी अनुमाने सटीक आहेत व विचार करण्यास प्रवृत्त करतात. उदा.
१. बिहार मधे कागदावर दिसते त्यापेक्षा जास्त गरीबी आहे.
२. बिहारी मतदार जातीपातीवर आधारीत मतदान करतात हा गैरसमज आहे. देशातील बाकी मतदार जितका जातीपातीचा विचार करुन मतदान करतात तेवढाच विचार बिहारी मतदार करतात.
३. ज्यांनी लालूंचे जंगलराज अनुभवले आहे ते केवळ ते जंगलराज परत येऊ नये म्हणून नितीश कुमारांना आणि (एनडीए ला) मतदान करतात.
४. मुसलमानांना भाजपाची भीती वाटते त्यामुळे बरेचशे नाईलाजाने लालूंच्या पक्षाला मतदान करतात.
५. देशातील सगळ्यात जास्त आय एस / आय पीएस हे बिहारमधून येतात हा मोठा गैरसमज आहे. हे बिहारी मुळातच बिहारमधून निघून इतरत्र स्थायिक झालेत व तिकडे त्यांना जे चांगले वातावरण लाभले आहे त्याच्या परीणाम म्हणून आपल्याला जास्त बिहारी सरकारी नोकरीत दिसतात.
६. बिहारी मजूर म्हातारपणी थकल्यावर तरी आपल्या घरी परत येईल मात्र शिकला सवरलेला बिहारी आजची परिस्थिती पाहता बिहार मधे येण्याची शक्यताच नाही.
७. दक्षिण भारतातील राज्ये प्रगत होण्याचे एक मोठे कारण म्हणजे तिथले मतदार भाकरी फिरवितात. सलग १० वर्षे किंवा त्यापेक्षा जास्त काळ कोणताच पक्ष सत्तेवर राहत नाही. त्यामानाने बिहारमधे पर्याय नसल्यामुळे मतदार आलटून पालटून लालू किंवा नितिश यांनाच मते देतात.
मतदारांना तिसरा व चांगला पर्याय मिळावा म्हणून आपण जनसुराज पक्षाची स्थापना केल्याचे ते सांगतात आणी बिहार मधून पोटपाण्यासाठी बाहेर पळणार्यांना बिहार मधे रोजगार उपलब्ध व्हावा आणि प्रत्येक मुलाला चांगले शिक्षण मिळावे हे त्यांचे मुख्य कार्यक्रम आहेत असे ते सांगतात.
निवडणूकांमधे त्यांना किती जागा मिळतील त्याच्या अंदाज सांगताना ते म्हणतात की मुळात बिहार ची परिस्थिती सुधरु शकते हा विश्वासच तेथील लोक गमावून बसले आहेत. जनसुराज पक्ष हा तिसरा पर्याय आहे याची त्यांना व्यवस्थित जाणीव झाली तर १५० पेक्षा जास्त जागा येऊ शकतील आणि नाही झाली तर १० जागांच्या आतमधेच त्यांचा खेळ संपेल असे अनुमान ते सार्वजनिक रित्या वर्तवतात. कोणत्याही परिस्थितीत त्यांच्या प़क्षाला ३० ते ६० दरम्यान जागा येऊ नयेत असे त्यांना वाटते कारण त्यामूळे इंडिया किंवा एनडीए ला घोडेबाजार करायला उत्तेजन मिळेल आणी त्या गोंधळात जनसुराज चे विजयी उमेदवार इतर पक्षांच्या वळचणीला जाऊ शकतील आशी भिती त्यांना वाटते.
युट्यूबवर त्यांच्या बर्याच चित्रफिती आहेत, अधिक माहितीसाठी त्या इच्छूकांनी बघाव्यात.
"इस बार अपने बच्चों के भविष्य के लिए वोट दो" हे त्यांचे निवडणूक घोषवाक्य आहे.
मी भाजपासमर्थक असलो तरी प्रशांत किशोर आणि जनसुराज पक्षाला बिहार मधे चांगले यश मिळावे असे मनापासून वाटते.
नितीश, तेजस्वी किंवा काँग्रेस यांचेपैकी कुणाकडेही सत्ता गेल्यास मागील पाढे पंचावन्न असेच म्हणावे लागेल.
लोक जनशक्ती पक्षाचे चिराग पासवान देखील एक उत्तम नेते आहेत त्यांना देखील चांगले यश लाभावे असे वाटते. त्यांचा पक्ष २८ जागांवर लढत आहे.
प्रशांत किशोर यांचेकडे अनेक निवडणूकांची रणणिती तयार करणे, इतर राजकीय पक्षाची रणणिती माहित असणे, उत्तम वक्ता असणे, चांगले व्यक्तीमत्त्व, भारदस्त आवाज, दुर्दम्य मात्र आंधळा नसलेला आशावाद, आणि हे सगळे गुण आहेत.
मात्र ते ब्राह्नण असणे, प्रत्यक्ष राजकीय पक्ष चालविण्याचा अनुभव नसणे, पक्षात इतर लोकप्रिय नेते नसणे अशा काही कमतरता आहेत.
शेवटी एक बिहारी सब पे भारी पडतो, की मागे पडतो, की उठून अजून संघर्ष करतो हे १४ नोव्हेंबर आणी त्यानंतर येणारा काळच ठरवू शकतो.
मात्र बिहारला तिसरा पर्याय हवा हे बिहारींच्या आणि इतर देशासाठी देखील महत्वाचे आहे.
प्रतिक्रिया
6 Nov 2025 - 5:22 am | शाम भागवत
प्रशांत किशोर एक चांगला माणूस आहे. पण राजकारणात डॅबीसपणा आवश्यक असतो. काहीजण हा डॅंबीसपणा स्वत:ची धन करण्यासाठी वापरतात हा भाग वेगळा.
पेरे पाटील या डॅबीसपणामुळेच यशस्वी झाले. हा गुण प्रशांत किशोरकडे नाहीत. त्यामुळे ते निवडणूक जिंकण्याची शक्यता कमी वाटते.
6 Nov 2025 - 10:14 am | विवेकपटाईत
बिहार मध्ये यादव 14.26% आणि मुस्लिम 17.7% आहेत. दोन्ही मिळून 33% पेक्षा जास्त आहेत. लोकसभा निवडणूकीत मुस्लिम समाजाचे मत विभाजणी झाली नाही. मुस्लिम समाज मतदान कितीही टक्के असले तरी 80 टक्के मतदान करतो. पूर्वांचलच्या काही जागा सोडून बाकी सर्व ठिकाणी तो 90 टक्के आरजेडीला मतदान करणार. यादव समाज ही सत्तेपासून वंचित असल्याने यावेळी भरपूर मतदान करणार. आता इतर समाजाचे मत विभाजन झाले तर आरजेडी सहज निवडणूक जिंकेल.
प्रशांत किशोर ने पैश्यांसाठी सर्व राजनीतिक पक्षांसाठी काम केले आहे. भरपूर पैसा कमविला आहे. प्रशांत किशोर साठी बिहार निवडणूक एक काम आहे. काम फत्ते झाल्यावर मोबदला ही भरपूर मिळेल. बाकी भाजपचा स्टार प्रचारक एक मोठी अडचण आहे.
6 Nov 2025 - 7:15 pm | धर्मराजमुटके
तो त्याचा व्यवसायाच एक भाग होता ना ? त्याचा इथे काय संबंध ते समजले नाही.
कोणते काम फत्ते झाल्यावर मोबदला मिळेल आणि तो कोण देणार आहे ?
6 Nov 2025 - 11:43 am | चंद्रसूर्यकुमार
बिहारच्या मतदारांची मानसिकता कळणे अवघड आहे. १९९० पासून प्रत्येक विधानसभा निवडणुकीत मुळच्या समाजवादी कुटुंबातून पुढे आलेल्या राजद आणि जदयु या पक्षांच्या जागांची बेरीज नेहमीच बहुमतापेक्षा जास्त राहिली आहे. देशाच्या इतर कोणत्याही राज्यात मुळच्या समाजवादी कुटुंबातून निर्माण झालेल्या शेकडो पक्षांपैकी पक्ष असे डॉमिनेटिंग राहिलेले नाहीत. आश्चर्याची गोष्ट म्हणजे १९७७ चा अपवाद वगळता १९९० पूर्वी काँग्रेस पक्ष डॉमिनेटिंग होता. पण नंतरच्या काळात हे समाजवादी कुटुंबातील पक्ष तसे झाले. म्हणजे ज्या काळात राष्ट्रीय पातळीवर समाजवादी राजकारणाला उतरती कळा लागायला सुरवात झाली त्याच काळात बिहारमध्ये त्यांचा उत्कर्ष झाला. तसेच भाजपने उत्तर भारतात इतर सगळ्या राज्यांमध्ये आपले पाय अगदी घट्ट रोवले पण बिहारमध्ये नाही. पूर्वी झारखंड बिहारचा भाग असताना त्या भागात भाजप पुढे आला पण बिहारच्या इतर भागात तितक्या प्रमाणात नाही.
दुसरे म्हणजे बिहारी मतदार बाहेरच्या उमेदवारांना अगदी सहजपणे स्विकारतो. मुळचे महाराष्ट्राचे मधू लिमये बिहारमधून निवडून जात. मुळचे कर्नाटकचे जॉर्ज फर्नांडिस एकदा मुंबईतून जिंकले पण १९८९ पासून बिहारमधून निवडून जात होते. त्याप्रमाणे मुळचे मध्य प्रदेशातील शरद यादव पण १९९१ पासून बिहारमधून निवडून जात होते. असे इतर राज्यात होणे तितके सोपे नाही.
या सगळ्या पार्श्वभूमीवर प्रशांत किशोर या नव्या नेत्याला कितपत यश मिळते हे बघायचे. कोणताही नवा नेता नवे राजकारण वगैरे बोलत पुढे आला तर केजरीवालांच्या अनुभवामुळे बहुसंख्य लोक त्याच्यावर सहज विश्वास ठेवतील असे वाटत नाही. दुसरे म्हणजे प्रशांत किशोर हा एक स्ट्रॅटेजीस्ट आहे. पण तो मोठ्या प्रमाणावर मतदारांना आकर्षित करू शकेल का यावर अजून तरी प्रश्नचिन्ह आहेच. इतकी वर्षे जे आघाडीचे घोडे होते त्यांनाच त्याने मदत करून जिंकवून दिले त्यातून चित्र असे उभे राहिले की प्रशांत किशोरमुळे ते नेते (२०१४ मध्ये मोदी, २०१५ मध्ये नितीश कुमार, २०१७ मध्ये अमरिंदर सिंग, २०१९ मध्ये जगन रेड्डी वगैरे) जिंकले. सत्य परिस्थिती तशी आहे असे वाटत नाही. तराजूवर वजन करताना साखरेच्या शेवटच्या काही दाण्यांमुळे पारडे इकडचे तिकडे होऊ शकते याचा अर्थ एका पारड्यात आधीच साखर ठेवलेली असते त्याचा काही वाटा नसतो असे थोडीच आहे? प्रशांत किशोर त्या शेवटच्या दाण्यांप्रमाणे आहे. आता त्याला एका पारड्यात आधीपासून ठेवलेल्या दाण्यांवरच आरूढ व्हायचे नाहीये तर स्वतःचा ठसा उमटवायचा आहे. त्यात बिहारी मतदारांची काहीशी अनाकलनीय मानसिकता.
बघू काय होते ते.
6 Nov 2025 - 2:34 pm | कपिलमुनी
आता दिल्ली चे लोक केजरीवालची आठवण काढत आहेत..
प्रदूषण मोजणार्या मशीन बाहेर पाणि मारून चुकीचे रीडींग दाखवणे ,
यमुना साफ केलि म्हणायचे आणि पी एम साठी पिन्याच्या पाण्याचा अंघोळी साठी तलाव बनवणे अशा मजेशीर गोष्टी आहेत
8 Nov 2025 - 9:41 am | विवेकपटाईत
दिल्लीत कोणीही केजरीवालची आठवण काढत नाही. दिल्लीत यमुनेच्या दोन्ही काठांवर बांध आहे. त्यामुळे गाळ मोठ्या मात्रेत नदीत जमा होतो. दर दोन तीन वर्षानी गाळ काढावा लागतो. केजरीवालच्या संपूर्ण काळात एकदा ही गाळ काढला गेला नाही. दिल्लीत भाजप आल्या नंतर यमुनेतून मोठ्या प्रमाणात गाळ काढला गेला. यमुना छट पूजा करण्यालायक स्वच्छ झाली.
केजरी काळात सर्वच ठिकाणी पिण्याच्या पाण्याचे तलाव बनायचे.
केजरी काळात मेट्रोचे प्रोजेक्ट अडकवून ठेवले होते. काम बंद पाडले होते. जे प्रोजेक्ट 2024 मध्ये पूर्ण व्हायाला पाहिजे होते ते आता 2026 मध्ये पूर्ण होतील. उदा. जनकपुरी ते आरके आश्रम मार्ग मेट्रो लाइन.
पुढील निवडणूकीत कांग्रेस दुसर्या नंबरचा पक्ष बनला तर आश्चर्य होणार नाही.
6 Nov 2025 - 7:32 pm | धर्मराजमुटके
सहमत आहे.
बरोबर आहे. मला स्वतःला प्रशांत किशोर यांनीच पक्षांना निवडणूका जिंकवून दिल्यात असे अजिबात म्हणायचे नाही. पक्षांकडे जी काही पुर्वपुण्याई म्हणा, नेटवर्क म्हणा, त्यांचे काम म्हणा, त्या सगळ्या गोष्टींचा फायदाच होतो. मात्र पीके यांनी निवडणूक मोहिमेचे व्यवस्थित संचालन केले, जरुर तिथे पॉलिश करुन पक्षांचे अजेंडे चमकवायला मदत केली हे नाकारता येणार नाही. करोडो रुपये मोजून राजकीय पक्ष त्यांना राजकीय व्युव्हरचनाकार नेमत असतील तर त्याची काहीतरी उपयोगिता नक्कीच आहे.
मी मुळ लेखात प्रशांत किशोरांचे काही विचार मांडले होते. त्यातील खालील एक वाक्य लिहिले आहे.
मला मात्र स्वतःला यात तथ्य वाटत नाही. मी कामानिमित्त अनेक उत्तर प्रदेशी, बिहारींच्या संपर्कात असतो. यात जातीने ब्राह्मण, धोबी, सुतार आणी इतरही अनेक जातीतील माणसांचा संबंध येतो. मधून मधून तिथल्या राजकीय परिस्थितीवर चर्चा देखील करत असतो. अशी चर्चा सुरु झाली की अरे वह ठाकूर है, यह यादव है, यह पासी है, वह नीचले जातवाला है , इनका दिमाग ऐसे ही चलता है असले डायलॉग वारंवार ऐकायला येतात. त्यामुळे युपी बिहार मधे महाराष्ट्रापेक्षा जास्त जातीयवाद आहे असे जाणवते पण मी शहरात राहत असल्यामुळे कदाचित महाराष्ट्रातील ग्रामीण भागात अजूनही अशा प्रकारचा जातियवाद असू शकेल आणी मला तो जाणवत नसेल अशीही एक शक्यता आहे.
मुळात प्रशांत किशोर यांना बिहारमधे काँग्रेस सोबत काम करुन बदल घडवायचा होता मात्र कॉंग्रेस ने नेहमीप्रमाणे माती खाऊन त्यांना नकार दिला नाहीतर आज बिहार मधे काँग्रेसला सोनियाचे दिवस येण्याची काही एक आशा होती.
मी प्रशांत किशोर यांची बिहार यात्रा मागील एक वर्षांपासून ऑनलाईन पध्दतीने फॉलो करत आहे. सुरुवातीला प्रशांत किशोर निवडणूक निर्णयाबद्द्ल जास्त आशावादी होते असे वाटत होते मात्र जसजशा निवडणूका जवळ आल्यात तसतसा त्यांचा जागा जिंकण्याबाबतचाअ आत्मविश्वास कमी कमी होत गेलेला दिसतो.
काय ते लवकरच कळेल.
7 Nov 2025 - 5:44 pm | चंद्रसूर्यकुमार
नक्कीच. तुम्ही तसे म्हटलेले नाही. मात्र गेल्या काही वर्षात काही चर्चांमध्ये प्रशांत किशोरने कोणाकोणाला निवडणुका जिंकून दिल्या असे मिपावरही म्हटले गेले होते म्हणून तसे लिहिले.
नक्कीच. पण प्रशांत किशोर हा काही जादुगार नाही. मुळात अशक्त घोड्याला तो पहिला नंबरवर जिंकवू शकणार नाही. २०१७ मध्ये उत्तर प्रदेशात विधानसभा निवडणुकांच्या वेळेस काय झाले हे आपण बघितलेच. त्याची उपयोगिता किती आहे हे बघून भाजपने त्याला २०१४ मध्येच राज्यसभेची सीट द्यायला नकार दिला म्हणून मग तो नंतर केजरीवाल, नितीश कुमार वगैरेंबरोबर गेला. म्हणजे त्याची जी काही उपयोगिता असेल त्या तुलनेत त्याला राज्यसभेची सीट देणे ही खूप जास्त किंमत असेल असे भाजपला कदाचित वाटले असावे.
याविषयी मला तरी काही लिहिता येणार नाही. तिथे प्रत्यक्ष जाऊन तिथल्या लोकांशी बोलल्याशिवाय नक्की जमिनीवर काय चालू आहे हे समजणार नाही. मी तरी बिहारमध्ये कधीच गेलेलो नाही- ती कधी वेळच आली नाही. नाही म्हणायला माझा बिहारी लोकांबरोबर संवाद करायचा एकच अनुभव आहे. माझ्याकडे एका एम.बी.ए एन्ट्रन्स परीक्षेसाठीच्या मॉक परीक्षेत लॉजिकल रिझनिंगचे काहींनी बनविलेले सेट तपासायला आले होते- ते सेट त्या परीक्षेत घेता येतील का हे ठरवायला. काही काही सेट्स असतात त्यात 'अ' या प्रकारचे लोक नेहमी खरे बोलतात, 'ब' या प्रकारचे लोक नेहमी खोटे बोलतात, 'क' या प्रकारचे लोक एक वाक्य खरे आणि दुसरे वाक्य खोटे बोलतात अशाप्रकारचे. तो सेट एका बिहारीने बनविला होता. त्याने 'अ', 'ब', 'क' असे न लिहिता चक्क जातींची नावे थोडी अक्षरे बदलून लिहिली होती- म्हणजे कुर्मी असे न लिहिता कुमरी वगैरे. त्याला म्हटले- अरे बाबा असले काही इथे चालायचे नाही. असे आडवळणाने का होईना जातीविषयक लिहायचे नसते. मग त्याला 'अ','ब' आणि 'क' असे लिहायला भाग पाडून मग तो सेट घेतला होता. बिहारच्या लोकांवर जातीपातींचा बराच पगडा असतो हे नेहमी वाचत आलो आहे ते खरे असावे असे तेव्हा वाटून गेले. अर्थात तो एकच अनुभव आहे त्यामुळे त्याविषयी ठाम काही लिहिता येणार नाही.
10 Nov 2025 - 7:53 pm | राघव
पीकेंची तिसरा पर्याय उभा करण्याची धडपड.. दोन वर्षांपासून फिरत आहेत.. चांगले उमेदवार दिलेत.. त्यात वाढलेले मतदान.. आणि जातींचं समीकरण!
तसंच पीकेंनी एवढ्या जागा लढवण्याचं कारण देखील पाण्याची खोली किती हेच बघण्यासाठी आहे हे उघड आहे. तसंच कुठे कोणते उमेदवार द्यायचे हे त्यांनी अनुभवानं काढलंच असणार. पण पैशाचा खेळ आणि राजकारणाचा मेळ यात त्यांना किती स्पेस घेता येते त्यावर बरंच अवलंबून आहे.
पीकेंनी काही टक्के मतं पळवलीत तर नुकसान सत्ताधारी पक्षाचं होणार की विरोधी पक्षाचं.. त्या बरहुकुम काठावर पास होणारे नेते बराच गोंधळ करू शकतात..
7 Nov 2025 - 4:23 pm | शाम भागवत
मतदानाची टक्केवारी वाढलीय.
२०१० मधे ५२.० टक्के
२०१५ मधे ५५.९ टक्के
२०२० मधे ५६.१ टक्के
२०२५ मधे ६४.६६ टक्के
९ टक्के म्हणजे खूपच वाढलंय. मला वाटतंय की गेली अनेक दशके मतदानापासून लांब राहिलेला मतदार सामील झालाय की काय.
एक शक्यता म्हणजे केपी फॅक्टर. यामुळे त्रिशंकू विधानसभा अस्तित्वात येईल.
दुसरी शक्यता म्हणजे पहलगाम इफेक्ट. बांगलादेशातील हिंदूवर झालेल्या हल्यामुळे जसा महाराष्ट्राच्या मतदानावर परिणाम झाला तसाच परिणाम दिसायची शक्यता आहे. तसे झाले तर कॉंग्रेस व तेजस्वी हे दोघेही ५० पेक्षा कमी आमदारांचे धनी होतील.
मला दुसरी शक्यता जास्त जाणवतेय. कारण गेल्या अनेक निवडणूकांत स्पष्ट बहुमत देण्याचे मतदारांचे कौल दिसून आले आहेत.
10 Nov 2025 - 8:27 am | चंद्रसूर्यकुमार
मतदानाची टक्केवारी वाढली आहे असे सगळीकडे येत आहे. मात्र यात एस.आय.आर चा वाटा किती असावा? म्हणजे पूर्वी मतदारयाद्यांमध्ये रोहिंग्ये, बांगलादेशी घुसखोर वगैरे लोकही होते. मरण पावलेल्या मतदारांची नावे आणि त्या ठिकाणी राहायला नसलेल्या मतदारयादीत तशीच होती. त्या मतदारयाद्यांची सफाई एस.आय.आर मध्ये झाली. त्यामुळे पूर्ण बिहारमध्ये ६५ लाख नावे मतदारयादीतून कमी झाले असेही येत होते. मागच्या वर्षी लोकसभा निवडणुकांमध्ये राज्यात सव्वाचार कोटी मतदान झाले आणि ते साधारण ५६% होते. त्याचा अर्थ मागच्या वर्षी मतदारयादीत असलेल्यांचा आकडा साडेसात कोटीच्या आसपास असावा. त्यात ६५ लाख नावे कमी झाली असतील तर त्याचा अर्थ पूर्वी मतदारयादीत कृत्रिमपणे असलेले साधारण ९% लोक कमी झाले- म्हणजे डिनॉमिनेटर कमी झाला. ९% घट हा आकडा थोडा नक्कीच नाही. त्यातील बांगलादेशी-रोहिंग्या वगैरे लोक नक्कीच मतदान करत आले असतील ते यावेळी करू शकले नसतील. त्यामुळे डिनॉमिनेटर ९% ने कमी झाला तरी न्युमरेटर ९% ने कमी होणार नाही. तरीही मतदान थोडेसेच जास्त झाले तरी मुळातला बेस कमी झाल्यामुळे थोड्याच जास्त मतदानामुळे टक्केवारी भरपूर वाढली असे दिसत असेल का?
10 Nov 2025 - 8:32 am | धर्मराजमुटके
एस.आय.आर मुळे घाबरुन / जर आपण मतदान केले नाही तर आपले नाव मतदार यादीतून काढले जाऊ शकते या भितीने देखील अनेक मतदारांनी यावेळेस मतदानास हजेरी लावली असावी असा अंदाज आहे. या अंदाजास पुष्टी मिळावयाची असेल तर उद्याच्या मतदानाचे आकडे बघावे लागतील. ६ तारखेला अनेक मतदार छटपुजेनिमित्त गावी परत आले होते. यावेळेस त्यातील काही परत आपल्या कामधंद्यासाठी परतले असावे.
10 Nov 2025 - 10:35 pm | शाम भागवत
नुसत्या टक्केवारीचा विचार केला तर तुमच्या शंकेत तथ्य आहे असे म्हणता येईल.
त्यासाठी प्रत्यक्ष संख्या लक्षात घेतली तर वस्तूस्थिती लक्षात येऊ शकेल. मागच्या वेळेस २.१५ कोटी लोकांनी मतदान केलं होतं पण यावेळेस तिथे २.४२ कोटी लोकांनी मतदान केलेले आहे असे आकडे समोर यायला लागले आहेत. म्हणजे अंदाजे १२.५६% मतदान वाढलेलं आहे.
जबरदस्त ध्रुविकरण होत चाललंय असं मला तरी गेली अनेक वर्षे वाटत आलेलं आहे.
सनातन नावाचा हत्ती जागा झालाय. त्याला मजबूत करण्याचे काम सनातन धर्म प्रेमी करतातच आहेत. पण तो परत झोपू नये यासाठी त्याच्या अंगावर सतत खडे मारायचे काम विरोधक करत राहिले आहेत. त्यामुळेही सनातनी लोकांचं फावत चाललंय.
मला वाटतं या सगळ्याचं खरं विश्लेषण २०-२५ वर्षांनी लोकांच्या समोर येईल. तोपर्यंत हत्ती झोपणार नाही याची काळजी सगळे घेत राहतील.
:)
10 Nov 2025 - 10:41 pm | आग्या१९९०
तरीही हरियाणातून बिहारला एका दिवसात चार स्पेशल ट्रेन सोडाव्या लागल्या सरकारला. निवडणूक जिंकण्याचे सगळे गैरमार्ग वापरले जात आहेत. निवडणूक आयोग झोपा काढतंय.
11 Nov 2025 - 4:59 am | शाम भागवत
:)
11 Nov 2025 - 10:23 am | सुबोध खरे
हरियाणातून बिहारला एका दिवसात चार स्पेशल ट्रेन सोडाव्या लागल्या सरकारला
लोक तिकिटं काढून गेले ना.इतके प्रवासी असतील तर काय वाईट आहे. रेल्वेला पैसे मिळतील कि .
मग रडारड कशाला?
अशा असंख्य विशेष गाड्या गणपती दिवाळीच्या मोसमात रेल्वे चालवते. त्यात काय विशेष?
उगाच रडारड करायची सवयच लागली आहे.
11 Nov 2025 - 10:43 am | आग्या१९९०
ह्या स्पेशल गाड्यांची घोषणा करण्याचा दिवस आणि वेळ बघा. त्यातही ह्या गाड्या अनारक्षित होत्या. २ -३ तारखेला बिहारमध्ये कुठला मोठा सण, उत्सव होता? अर्थात ह्याचे उत्तर नसणार ह्याची खात्री आहे.
11 Nov 2025 - 11:26 am | सुबोध खरे
मुंबई हुन बिहारला (नेपाळ ला) जाण्यासाठी रोज चार अनारक्षित गाड्या चालू आहेत. कित्येक वर्षे.
जनसाधारण एक्सप्रेस अंत्योदय एक्सप्रेस कर्मभूमी एक्सप्रेस इ
कल्पना आहे का?
11 Nov 2025 - 11:42 am | आग्या१९९०
सणासुदीला सोडल्या जाणाऱ्या गाड्यांची घोषणा अगोदरच केली जाते आणि त्यांचे आरक्षण करण्याची सुविधा असते. ह्याचे ह्या स्पेशल ट्रेनची घोषणा कुठल्या कारणाने केली आहे ह्याचे उत्तर द्या. उगाच नसते मुद्दे उपस्थित करू नका.
11 Nov 2025 - 12:58 pm | सुबोध खरे
जरा गुगलून पहा कि रेल्वे गर्दी असली कि खास गाड्या आयत्या वेळेस कशा आणि केंव्हा सोडते.
11 Nov 2025 - 1:43 pm | आग्या१९९०
म्हणून तर म्हटलं की स्पेशल रेल्वेगाडी सोडण्याची तारीख आणि वेळ बघा. चार गाड्या सोडल्या तेव्हा इतकी गर्दी का झाली ह्याचा cctv footage असेलच रेल्वेकडे. फक्त ३ तारखेलाच बिहारला जाणारी गर्दी कशामुळे वाढली ?
12 Nov 2025 - 9:30 am | आग्या१९९०
उत्तराच्या प्रतीक्षेत. आता कळेल तुम्हाला तुमचे सवंगडी मिपा का सोडून जातात. अर्धवट बचावाच्या पुढे तुमची गाडी कधीच सरकत नाही.
13 Nov 2025 - 9:30 am | सुबोध खरे
तुम्हाला सगळं रेडिमेड हवंय
गुगलून पहा कि.
दिलाय स्वच्छपणे का खास गाड्या सोडल्या ते.
फुक्कटचा काथ्याकूट
13 Nov 2025 - 12:49 pm | आग्या१९९०
तुम्हाला सगळं रेडिमेड हवंय
गुगलून पहा कि.
मी खात्री केली म्हणून तर रेल्वेवर आरोप करतोय. रेल्वेने ३ तारखेच्या गाड्यांबद्दल ( वेळ आणि गर्दीचे कारण ) २ तारखेला रात्री कसे केले ह्याचा अधिकृतपणे खुलासा केला नाही. तुम्हाला सापडले तर द्या. सापडणार नाही ह्याची खात्री आहे.
13 Nov 2025 - 7:58 pm | सुबोध खरे
बवोर्र्र
13 Nov 2025 - 9:47 pm | आग्या१९९०
बवोर्र्र
शहानिशा न करता धर्मेंद्रला श्रद्धांजली वाहताना तुमचे लाडके केंद्रीय मंत्री , बुलडोझरबाबा आणि गोदी मिडियाने जशी घाई केली,तशीच तुम्हीही केली. त्यांनी जशी चूक कबूल केली नाही तशी तुम्हीही केली नाही किंवा करणार नाही. असेच सातत्य ठेवा, गोदी मीडियाची पहिली पात्रता फेरी उत्तीर्ण झालात. अभिनंदन!
11 Nov 2025 - 6:21 pm | कंजूस
पण आमची एक मुंबई -नाशिक- भुसावळ पॅसेंजर चालू ठेवणे जड जातं रेल्वेला. ( आता मुंबईहून सुटणारी एकही अनारक्षित गाडी उरली नाही.)
बाकी मतदानासाठी अधिक लोक ( मतदार) आले तर कुणा पक्षाच्या पोटात का दुखावं? ते त्यांच्या विरोधातच मतदान करणार हा न्यूनगंड का आहे?
11 Nov 2025 - 2:50 am | अभ्या..
.
सांभाळून जरा.
वनतारा वाले धरून नेतील. धार्मिक हत्ती फार आवडतात त्यांना.
सोमनाथ ते अयोध्या करून परत गुजरात रिटर्न ट्रिप व्हायची हत्तीची.
.
आधीचा एक खरा हत्ती निद्रिस्त होता तो उठत आहे तिकडे लक्ष ठेवा.
11 Nov 2025 - 4:57 am | शाम भागवत
:)
11 Nov 2025 - 6:23 pm | कंजूस
हत्तीला सात सोंडा असल्या तर तो फारच डिमांडमध्ये असेल. आणि त्यात तो पांढरा असला तर खूपच रस्सीखेच होईल.
11 Nov 2025 - 8:28 am | चंद्रसूर्यकुमार
मागच्या वेळेस म्हणजे २०२० मध्ये असे गृहित धरतो. त्यावेळेस निवडणुक कोरोना काळात झाली होती त्यामुळे गर्दी टाळायच्या उद्देशाने अन्यथा केले असते त्यापेक्षा कमी लोकांनी मतदान केले असेल ही पण एक शक्यता आहे. याविषयीचा कोणताही विदा माझ्याकडे नाही. तो माझा तर्क आहे. दुसरे म्हणजे दरवर्षी किमानपक्षी १% ने लोकसंख्या वाढली तरी पाच वर्षात ५% लोकसंख्या तशीही वाढली असेल. या दोन कारणांमुळे दिसताना १२.५६% ने मतदान वाढले असे दिसत असले तरी प्रत्यक्षात तो आकडा स्टॅटिस्टिकली सिग्निफिकन्ट आहे का याविषयी साशंकता आहे. अर्थात हे सिध्द करायला कोणतीही आकडेवारी माझ्याकडे नाही. पण नुसत्या आकड्यांपेक्षा आत काही दडले आहे का हे शोधायला मला आवडते त्यातून असे मला वाटते.
त्यापेक्षा मोठे काम निखिल वागळे, विश्वंभार चौधरी, अवधूत परळकर, हेमंत कर्णिक असले लोक करत असतात. आपापल्या परीने मिपावरही ती जबाबदारी उचलणारे लोक आहेतच. या चर्चेतही त्यातील काही आले आहेतच :)
7 Nov 2025 - 5:05 pm | धर्मराजमुटके
याचे अजून एक कारण म्हणजे छटपुजेच्या आसपास आलेली निवडणूकांची तारीख. छटपुजेचे युपी /बिहार मधे फार मोठ्या प्रमाणावर प्रस्थ आहे. बरेच बिहारी या काळात आपल्या गावी जातात. अर्थात वाढीव मतदानाचा फायदा कोणाला होईल हे अजून स्पष्ट नाही. सगळेच पक्ष वाढीव मतदानाचा आम्हालाच फायदा होणार म्हणत असले तरी वाढीव टक्क्याने त्यांच्या पोटात गोळा आलेला असणार.
10 Nov 2025 - 8:36 am | धर्मराजमुटके
वरील अंदाजाला पुष्टी देणारी ही बातमी
10 Nov 2025 - 9:17 am | चंद्रसूर्यकुमार
लिंक चालत नाही.
10 Nov 2025 - 5:46 pm | धर्मराजमुटके
https://www.jansatta.com/national/if-i-go-now-my-employers-will-cut-my-daily-wage-workers-in-west-bengal-are-worried-about-sir/4226691/
7 Nov 2025 - 6:47 pm | कंजूस
अकरा तारखेला रात्री अंदाज वर्तवायला सुरुवात होईल.
त्याचा परिणाम मुंबई महापालिका निवडणुकीत होईल का?
7 Nov 2025 - 7:55 pm | सुबोध खरे
public memory is short
लालू प्रसाद यादव यांचे जंगल राज मी स्वतः पाहीलेले आहे. परंतु नवीन मतदारांना त्याची माहिती नाही.
लालू प्रसाद यांच्या विरुद्ध ५३ फौजदारी गुन्हे दाखल आहेत आणि त्यापैकी दोन खटल्यात त्यांचरे गुन्हे सिद्ध होऊन त्यांना शिक्षा सुद्धा झाली आहे.
यानंतर पूर्ण शिक्षा न भोगता ते जामिनावर बाहेर आहेत ( यात बऱ्याच अर्थपूर्ण घटना घडल्या असे ऐकिवात आहे)
हीच स्थिती त्यांच्या पूर्ण कुटुंबाची आहे.
परंतु गुन्हे करण्याबाबत किंवा गुन्हेगारांबाबत बिहारी लोकांची मनोवृत्ती आपल्या मनोवृत्ती पेक्षा बरीच वेगळी आहे.
लांच /पैसे खाणे हा तेथे तेवढा सहज गुन्हा समजला जात नाही. उलट वर संशोधनाच्या वेळेस हुंडा देताना मुलाची लायकी पाहताना "उपरी आमदनी" सुद्धा गृहीत धरली जाते. आणि सरकारी नोकर हा पैसे खाणारच हि मनोवृत्ती झालेली आहे त्यामुळे तेथे खुनासारखे भयानक गुन्हे असणारे उमेदवार सुद्धा सहज निवडून येतात.
या स्थितीचे कारण असलेली प्रचंड गरिबी. कसेही करून पैसे मिळवणे आणि या भयानक परिस्थितीतुन बाहेर पडणे एवढेच लोकांना समजते.
त्यातून जातीची समीकरणे फार मोठ्या प्रमाणावर चालतात. मुंबई तील बिहारी यादव सुद्धा लालू आणि कुटुंबाला पाठिंबा देताना सहज आढळतात.
सरकार मध्ये कोणीही आले तरी आपल्या स्थितीत काहीही बदल होणार नाही हि नैराश्यवादी वृत्ती बिहारी लोकांच्यात मोठ्या प्रमाणावर आढळते. त्यामुळे मतच द्यायचे तर आपल्याच जातीच्या उमेदवाराला का नको असा बाळबोध विचार ते करतात.
लालू प्रसाद/ रा ज द हे मुसलमान आणि यादव यांच्या एकगठठा मतांवर अवलंबून आहेत.
यातील मुसलमान हे अत्यंत मागासलेले आणि गरीब आहेत त्यामुळे तेथे मौलवी सांगतील त्या उमेदवाराला मत देतात. भाजप आणि त्यांनी युती केलेल्या कोणत्याही उमेदवाराला ते कधीच मत देणार नाहीत हि काळ्या दगडावरची रेघ आहे.
उत्तर प्रदेशातील मुसलमान मतदार विशेषतः महिलांनी तीन तलाक बंद केल्याबद्दल छुप्या प्रमाणात भाजपाला थोड फार मतदान केलं पण तसं बिहार मध्ये होण्याची शक्यता फार कमी आहे.
प्रशांत किशोर यांच्या बद्दल काही सांगणे मला शक्य नाही कारण गेल्या दशकभरात बिहारमध्ये गेलेलो नाही आणि माझे बहुसंख्य लष्करी मित्र निवृत्त झाल्यावर बिहार सोडून अन्य राज्यातच स्थयिक झालेले आहेत.
बिहारची स्थिती कधीही उत्तम नव्हती आणि उद्योगाला चालना मिळेल अशी कोणतीही राजकीय किंवा सामाजिक स्थिती तेथे नाही. त्यातून खाण उद्योगातून येणार पैसा आता झारखंड हे नवीन राज्य झाल्यामुळे बंद झाल्याने उर्वरित बिहार ची स्थिती अजूनच गंभीर झाली आहे.
मैलोगणती शेती (जी जमीनदार लोकांच्या ताब्यात आहे) आणि खेडी असेच बिहारचे चित्र आजही दिसते. यामुळे रोजगारासाठी जगाच्या पाठीवर कुठेही जाणे एवढाच उपाय तेथे आहे.
लालू यांच्या जंगल राज मध्ये १९९९ मध्ये लष्कराच्या भरतीसाठी तेथे गेलो असताना शेतमजुराचा मिळणारे वेतन पाहून मी दोन दिवस अस्वस्थ होतो,
दोन वेळचा लिट्टी चोखा ( जेवण) आणि १८०० रुपये वर्षाला हे वेतन घेणाऱ्या शेतमजुराचा मुलगा भरतीसाठी आला होता.
त्यावेळेस लषकरी जवानाला महिन्याला पगार १५ हजार आणि बाकी सर्व फुकट असे वेतन होते. त्यामुळे वाटेल ते करून कोणत्यातरी सरकारी नोकरीत भरती होणे एवढेच मर्यादित स्वप्न असलेले हजारो तरुण तेथे प्रचंड गर्दी करून येत असत.
आज या स्थितीत आमूलाग्र असा बदल झालेला आहे असे वाटत नाही.
7 Nov 2025 - 8:32 pm | रामचंद्र
ही माहिती वाचून वाईट वाटले. पण अशी स्थिती असताना महाराष्ट्रासारख्या तुलनेने सौम्य, अनुकूल राज्यात येऊन मुंबईसारख्या शहरात भाषिक हटवादीपणा, सांस्कृतिक मुजोरी असे प्रकार ही मंडळी करत असतील तर त्यांची मानसिकता खरंच अनाकलनीय आहे.
7 Nov 2025 - 9:18 pm | स्वधर्म
हे फक्त बिहारमध्येच नसून सगळ्या गायपट्ट्यात असाच कमालीचा वैचारिक, सामाजिक मागासलेपणा व भ्रष्टाचार आहे. दुर्दैवाने भाजप आणि धर्मवादी लोक तिथून सत्ताबळ मिळवून ते महाराष्ट्रासारख्या पुरोगामी राज्याला पुन्हा धर्माच्या गुंगीत ढकलून त्याचा युपी बिहार सारखा मागासलेला जंगल राज्य असलेला प्रदेश करत आहेत. त्याचे दाखले अनेक देता येतील उदा. फलटणचे प्रकरण. किंवा शेतकरी कर्जमाफीला पैसे नाहीत पण कुंभमेळ्याला हजारो कोटी देणार आहेत. महाराष्ट्रातले अनेक सुशिक्षित राजकीय दृष्ट्या जागृत लोक तरीही अशा पक्षांचे हिरिरिने समर्थन करत आहेत, हे मोठे आश्चर्य आहे. गोबर युगात सत्य व नीती यांची व्याख्याच बदलली आहे.
7 Nov 2025 - 10:17 pm | रामचंद्र
हे त्यांच्या मातृसंस्थेने शंभर वर्षांच्या चिकाटीने आणि कष्टांनी साध्य केले आहे. त्याचा प्रतिवाद करणारे प्रयत्न, सातत्य आणि नवनवीन कल्पना यात कमी पडतात त्यामुळे जे घडणार ते अटळ आहे असे आज तरी वाटते.
7 Nov 2025 - 11:21 pm | स्वधर्म
विषाला एक्स्पायरी डेट नसते. - राजू परुळेकर
7 Nov 2025 - 10:18 pm | अमरेंद्र बाहुबली
अनेक सुशिक्षित राजकीय दृष्ट्या जागृत लोक तरीही अशा पक्षांचे हिरिरिने समर्थन करत आहेतसुशिक्षित आहे म्हणजे जागृत असतीलच असे नाही, गोबरयुगाचे, अशिक्षित नेत्याचे, त्याच्या खोट्या गोष्टींचे उघद समर्थन करतात!
8 Nov 2025 - 9:44 am | विवेकपटाईत
बहुतेक अनेकांना शिक्षित आणि अशिक्षितचा फरक कळत नाही. गोबर युगात विज्ञान सहित सर्व क्षेत्रांत सर्वात अभूतपूर्व प्रगति झाली आहे. (एआय वर डाटा तपासू शकतात) बाकी अशिक्षित लोकांना ती दिसणार नाही. . असो.
11 Nov 2025 - 6:29 pm | कंजूस
नेता अशिक्षित आहे, त्याला मतदान करू नका असा प्रचार करून काहीच परिणाम दिसला नाही ना मग आता त्या मतदारांना फिरवण्यासाठी दुसरा कोणतातरी मुद्दा शोधायला हवा होता. लालूप्रसाद आणि राबडीदेवी यांचं उदाहरण पाहा.
11 Nov 2025 - 9:04 pm | विवेकपटाईत
आपल्या महाराष्ट्रात जेवढा जातीवाद आहे तेवढा उत्तर प्रदेशात निश्चित नाही. बाकी एक वेळा नोएडा ग्रेटर नोएडा भागात फिरा तिथल्या उंच उंच इमारती, मोठे मोठे माल पाहून तुम्हाला निश्चितच भोवळ येईल. आजच्या घटकेला दोन लक्ष पेक्षा जास्त कारखाने नोएडा गाजियाबाद मोदी नगर पर्यंतच्या भागात आहे. दोन्ही DFC दादरी पासून सुरू होतात. देशातील सर्वात मोठे एअरपोर्ट जेवर येथे बनत आहे. उत्तर प्रदेश प्रगतीच्या मार्गावर आहे.
कुंभमेळ्यामध्ये सरकारला कमाई झाली आहे नुकसान नाही. याशिवाय सर्वात जास्त अनुदान शेतीला महाराष्ट्र सरकारने दिले आहे. मागचे सर्व आकडे आरटीआय करून तपासून घ्या. कर्नाटक मध्ये उसाला किती भाव दिला आहे आणि महाराष्ट्रात किती हे तपासू शकतात.
जवळपास दोन लक्ष मराठी माणसे एनसीआर फरीदाबाद गुडगाव दिल्ली नोएडा या भागात काम करतात. याचा अर्थ आपण असा काढावा की महाराष्ट्रात बेरोजगारी आहे आणि मराठी लोकं रोजगार साठी एनसीआर मध्ये येतात??
शेवटी गेल्या अकरा वर्षात देशाया प्रगतीला जंगल राज म्हणणे.... पुढे काही बोलणे योग्य दिसणार नाही तुम्ही काय ते स्वतःच समजून घ्या.
12 Nov 2025 - 10:18 am | कंजूस
जातीयवादाचा सुरवंट
.
.
.
>>महाराष्ट्रात जेवढा जातीवाद आहे तेवढा उत्तर प्रदेशात निश्चित नाही....>
मोठ्या शहरांत नसतात जातीयवादाचे केसाळ सुरुवंट. खेडेगावांतून - भारतात कुठल्याही आहेत.
उगाच नाही जातीयवाद उघडा पाडणाऱ्या विविध राज्यांतील लेखकांना पुरस्कार मिळत.
11 Nov 2025 - 8:57 am | कंजूस
महाराष्ट्रात गायपट्टा कुठे आहे? कुठे नाही?
11 Nov 2025 - 11:27 am | सुबोध खरे
जिथे जिथे भाजप चे उमेदवार निवडून येतात तो गाय पट्टा किंवा शेणपट्टा
हा का ना का
विचारा बिरुटे मास्तरांना
11 Nov 2025 - 6:22 pm | शाम भागवत
पाच वाजता ६७.१४ % मतदान झाल्याचे निवडणूक आयोगाने जाहीर केले आहे. हा आकडा आणखी वाढणार आहे.
याचा अर्थ पहिल्या फेरीतील वाढलेल्या मतदानामागे निश्चित एक विचार आहे व तो ठामपणे मतदार मांडत आहेत.
निर्विवाद बहुमताने सत्ता स्थापन होताना दिसू शकते. भाजपची ताकद एवढी वाढलेली असेल की, नितीशकुमारांची जरूरीच भासू नये. पण मुमं नितीशच असतील.
नितीशकुमारांची व त्यांच्या पक्षाची घटती मतदान टक्केवारी व घटती आमदार संख्या असण्याचा कल चालूच राहण्याची शक्यता आहे. अर्थात त्यासाठी त्यांचीच धरसोड वृत्ती कारणीभूत आहे.
कॉंग्रेस व तेजस्वी यांची स्थिती दयनीय असण्याची शक्यता वाढली आहे.
11 Nov 2025 - 6:26 pm | शाम भागवत
आता अबा, अभ्या, आग्या व बिरूटे साहेबांच विश्लेषण ऐकूया.
:)
11 Nov 2025 - 6:35 pm | कंजूस
पूर्व विश्लेषण राहू द्या बाजूला.
१४ तारखेला निकालानंतरचे विश्लेषण हवंय.
कोण कोणत्या भागात का निवडून आले असावेत?
अमुक एक ठिकाणी मागील उमेदवार का पडला असावा?
ओतलेला पैसा आणि आश्वासनांनी पारडं किती जड केलं का वायाच गेला खटाटोप?
11 Nov 2025 - 8:52 pm | विवेकपटाईत
लोकसभा निवडणुकीपेक्षा यावेळी मतदारांची संख्या जास्त आहे.
प्रवासी बिहारी जनतेने मतदानात हिस्सा घेतला पाहिजे म्हणून जास्त गाड्या सोडल्या गेल्या. त्यांना मतदान देण्यापासून रोखले पाहिजे होते असे अनेकांचा विचार आहे. हा विचार लोकतंत्र साठी घातक आहे. प्रत्येक मतदाराला बूथ पर्यंत पोहोचविण्याची व्यवस्था करणे हे सरकारचे कर्तव्य आहे.
फक्त 60 ते 70 हजार सॅम्पल वरून साडेचार कोटी मतदारांनी कुणाला मत दिली याचा अंदाज घेणे म्हणजे जुगार खेळणे आहे. हरियाणात सर्वच एक्झिट पोल चुकले होते कारण तिथे फक्त एखाद टक्क्याचा फरक असतो त्या राज्यात अंदाज बांधणी कठीण असते. हिमाचल छत्तीसगड झारखंड येथे पोल चुकले होते.
13 Nov 2025 - 1:24 am | खटपट्या
धर्मराज मित्रा - १४ तारखेनंतर धाग्याला खूप प्रतिसाद येतिल. बाकी प्रशांत भुषण हे स्वतः गोंधळात आहेत असे वाटते. त्यांच्या अनेक मुलाखती पाहील्या, त्यात त्यांची समाजाबद्दलची तळ्मळ दीसते पण तशी तळ्मळ केजरीवाल ही दाखवत होते आणि नंतर केजरी ने काय केलान ते दुनियेला माहीत आहे.
असो.
बिहार मधे एन डी ए किती फरकाने जिंकते तेच बघायचे बाकी आहे. त्यानंतर वोट्चोरी, इव्हीएम वगैरे चालु होइल ते थेट मुंबै महापालिका निवड्णुका झाल्यावर बंद होइल.
13 Nov 2025 - 9:35 am | धर्मराजमुटके
सहमत आहे.
13 Nov 2025 - 9:28 am | विवेकपटाईत
ऍक्सिस माय इंडिया नुसार 90% यादव आणि 90% मुस्लिम यांनी राजदला मत दिले आहे. दोघांची संख्या बिहारमध्ये 33 प्रतिशत आहे. याशिवाय जनसुराज्य ने फक्त उच्च वर्गातील मतांचे विभाजन केले आहे. अर्थात जेवढे जास्त मत तेवढेच एनडीएला नुकसान. राजदला इतर जातींचे फक्त २० टक्के मतांची गरज आहे. अर्थात तेजस्वी मुख्यमंत्री बनण्याचे चान्स जास्त आहे.
बाकी जनसुराजला फक्त दोन टक्के मिळाले तर महाराष्ट्राची पुनरावृत्ती बिहारमध्ये होऊ शकते.
आमची मोलकरीण आज पुन्हा कामावर आली. तिला बिहारमध्ये जंगल राज नको होते म्हणून पंधरा दिवसाच्या पगाराचे नुकसान सहन केले.
14 Nov 2025 - 5:27 pm | कंजूस
पी.के. म्हणजे केजरीवाल नव्हे.
14 Nov 2025 - 7:22 pm | नावातकायआहे
बालबुद्धिची "बालदिनी" ५/६१ भेट. सुकडा साफ!!
हा "कार्ल्याचा" रस कसा बरे "Ghandy चाटू" पचवणार?
वोटचोरी, ईव्हीएम चोरी, मतअधिकार यात्रा, चुकिचा SIR ह्या बिनबूडाच्या प्रचाराला बिहारच्या जनतेने खांग्रेसला "फाट्यावर" मारण्यात आले आहे!
बाकी चालू द्या! :-)
14 Nov 2025 - 8:39 pm | अमरेंद्र बाहुबली
पण ज्या चुना आयोगामुळे एवढा मोठा विजय मिळाला त्या चुना आयोगाचे कुठल्याजी भाजप नेता, कार्यकर्त्याने आभार मानले नाहीत! फक्त स्वीस बँकेत पैसा पोहोचवला म्हणजे सगळ झाल का? सार्वजनिक रित्या आभार मानायचा रीत भात आहे की नाही? दृष्ट मेले. :)
15 Nov 2025 - 6:32 am | रात्रीचे चांदणे
समजा बिहार सरकारने महिलांना दहा हजार दिले नसते तर एव्हढा मोठा विजय मिळाला असता का? मला तरी वाटतंय नसता मिळाला. ही तर उघड उघड दिलेली लाच आहे. बिहार सारख्या गरीब राज्यात दहा हजार म्हणजे भरपूर झाले. एकूण दोन लाख रुपयांची मदत देण्याची घोषणा केली होती.
15 Nov 2025 - 8:36 am | टर्मीनेटर
PK तेरी मोरनी को मोर ले गये...
बाकी जो बचा था काले चोर ले गये 😀
शून्य उमेदवार निवडून आले असले तरी पहिल्याच प्रयत्नात त्यांच्या पक्षाला जवळपास साडेतीन टक्के मते मिळाली हे ही नसे थोडके, परंतु
"जदयू च्या 25 पेक्षा जास्ती जागा निवडून आल्या तर राजकारणातून संन्यास घेईन" अशी काहीतरी भीष्मप्रतिज्ञा प्रशांत किशोर ह्यांनी केली केली असल्याने आता 'Better luck next time' अशा शुभेच्छाही त्यांना देता येत नाहीयेत...