डोळस कुटुंबीयांची झालेली फसवणूक ही काही आपल्या देशाला नवीन नाही. फक्त डोळस कुटुंबियांच्या मुळे अशा फसवणुकीच्या आकड्यात एकाने वाढ झाली इतकेच.
आय टी मध्ये काम करणारे, जिथे औद्योगिक क्रांती ने जन्म घेतला त्या इंग्लंड सारख्या देशात नोकरी मिळवून तिथे काम करणारे कुटुंब निश्चितच उच्च शिक्षित असणार. असे उच्च शिक्षित कुटुंब अशा बाबा बुवांच्या मागे का लागले असेल ? अंगात येणे, शापाचा पैसा अशा अवैज्ञानिक संकल्पनांच्या मागे आंधळेपणाने का गेले असेल ?
आणि आपण फसवले गेलोय हे त्यांना त्यांची सर्वस्व लुटून झाल्यावर का उमगले असेल ? असे अनेक प्रश्न इथे निर्माण होतात.
डोळस कुटुंबाला आता मुर्खात काढणारे , त्यांच्यावर टीका करणारे अनेक जण निर्माण होतील. कारण हे करणे सहज सोपे आहे. पण जेव्हा मी वर उल्लेखित प्रश्न विचारात घेतो आणि त्यांची उत्तरे शोधतो तेव्हा मी माझ्या बालपणात जातो. कारण ही तसेच आहे.
माझी मोठी बहीण जन्मजात मतिमंद होती. तिच्यात आणि माझ्यात १० वर्षांचे अंतर. या वर्षीच तिच्या ५७ व्या वर्षी ती वारली. ती माझ्या इतर मित्रांच्या बहिणीसारखी नाही, ती अशी का आहे हे मला कधी समजायला लागले ते आठवत नाही.
पण माझ्या बहिणीसाठी आई बाबांनी ती बरी व्हावी म्हणून त्यांच्या परीने खूप प्रयत्न केलेले मला आठवत आहेत आणि काही आईने सांगीतले आहेत. यात मॉडर्न मेडिसिन [ज्याला ऍलोपॅथी हा चुकीचा शब्द आज प्रचलित आहे], मग आयुर्वेद , मग होमिओपॅथी असे सगळे उपचार झाले. मला आठवतंय की ही होमिओपॅथीची औषधे बाबा जर्मनीहून मागवत. माझे एक शिक्षक म्हसकर सर जे मोदी गणपतीशी अजूनही राहतात त्यांचे वडील ती औषधे कोणाकडूनतरी मागवायचे.
पण या कशाचाही परिणाम बहिणीवर झाला नाही. तिच्या मतिमंदत्वात काहीही उतार पडला नाही.
मग कोणीतरी त्यांना "तुम्हाला नाग हत्येचा शाप आहे " असे सांगीतले. मग नाशिकला जाऊन नारायण नागबळी केलेला मला आठवतोय. १९८५ किंवा ८६ ला ५००० ते १० हजार रुपये खर्चून तो नागबळी केलेला मला आठवतोय.
मग कोणीतरी सांगोतले की आमच्या घराण्यात कोणी पूर्वजांकडून कोणा स्त्रीला खूप त्रास दिला गेलाय आणि ती स्त्री आज माझ्या बहिणीच्या रूपाने येऊन सूड उगवत आहे. मग त्याच्या शांती केलेल्या आठवतायत.
मग कोणाच्या तरी ओळखीतून एक अनोळखी व्यक्ती बाबाना भेटायला आली. त्याला बहिणीबाबत असेच कोणाकडून तरी कळले होते. त्याने काही विधी करायला लागतील त्यासाठी मगरीचे तेल, कासवाचे कवच अशा वस्तू लागतील. बाबांनी सांगितले विचारले की या गोष्टी मी कुठून आणणार ? मग ती व्यक्ती म्हणाली की मी अरेंज करेन, मला पैसे द्या. सुदैवाने बाबा या भानगडीत पडले नाहीत.
शेवटी बाबांची भेट सुदैवाने एका मानसोपचार तज्ज्ञ व्यक्तीशी झाली [यांचे नाव मी देऊ शकत नाही]. त्यांनी बाबांना स्पष्ट सांगितले की माझी बहीण कधीही नॉर्मल होणार नाही. तुम्ही हे स्वीकारून पुढे वाटचाल करा. मग आम्ही बहिणीवरील सर्व उपचार थांबवले [बाकी नेहमी होणारे आजार सोडून].
मूळ मुद्दा असा की : माझे बाबा PHD आहेत. आई MA B ed आहे. तरी त्यांनी मी वर सांगितलेले उपाय का केले असावेत ?
आपले मूल इतरांसारखे नाही ही वास्तव स्वीकारणे खूप कठीण असते. त्यात निराशा, राग , दुःख , विषण्णता या सगळ्या भावना असतात. आणि जेव्हा आजच्या विज्ञानाला माहित असलेल्या सर्व उपाय योजना असफल होतात त्यावेळी कदाचित मग माणूस अशा अलौकिक उपायांकडे वळत असेल का ? इतके करून बघितलंय आता हेही करून बघू या पासून ही सुरुवात होते. समाजात अनेक बाबा, बुवा, स्वामी, महाराज, पीरबाबा, प्रिस्ट, सद्गुरू बसलेलेच असतात. आणि असे रंजलेले गांजलेले पालक, इतर अडचणीत सापडलेले लोक यांचे गिऱ्हाईक बनतात. या लोकांचे पाद्य पूजन , तुला, करणे, ते अमक्याचा अवतार आहेत, त्यांच्या अंगात अमुक येतात तमुक येतात अशा ऐकीव गोष्टींवर भरवसा ठेऊन, ते म्हणतील ती पूर्व दिशा मानून ते सांगतील ते करत बसणे, त्यांच्या नावाने पैसे ट्रान्सफर करणे .. इथं पासून त्यांना स्वतःचे शरीर अर्पण करण्यापर्यंत, नरबळी देण्यापर्यंत रंजलले गांजलेले लोक पुढे जातात.
आशा संपत नाही आणि मूल बरे होत नाही. हे बाबा, बुवा, स्वामी, महाराज, पीरबाबा, प्रिस्ट अशांकडून थोडे थोडे पैसे उकळत राहतात. सायबर चोरी मध्ये सलामी अटॅक असतो तसाच. थोडे थोडे लुटले गेल्याने खूप मोठे नुकसान होईपर्यंत आपण किती लुटले गेलोय हेच लक्षात यायला वेळ लागतो. आणि जेव्हा लक्षात येते तेव्हा जवळपास सर्वस्व गेले असते. हेच डोळस कुटुंबाबाबत घडले. डोळस कुटुंबाचे १३ ते १४ कोट रुपये परत मिळतील का याबाबत मला शंकाच आहे.
यावर निश्चित उपाय असा काही नाही. फक्त निदान आपण जे करतोय ते बरोबर आहे ना हे निदान एकदा तरी आपल्या सद्सद्विवेक बुद्धीला आणि आपल्या तर्क बुद्धीला विचारून पाहावे हे उत्तम. नाहीतर सावरकर, गाडगेबाबा यांची चरित्रे आणि लेख वाचून वाचून काय उपयोग?
कधीकधी वास्तव स्वीकारून पुढे वाटचाल करावी हे शहाणपणाचे ठरेल नाही का ?
कौस्तुभ पोंक्षे
प्रतिक्रिया
8 Nov 2025 - 3:54 pm | अमरेंद्र बाहुबली
तुम्ही कितीही हुशार असा गंडवणारे बरोबर गंडवतातच, मागे मलाही एकाने मोठा गंडा घातला त्याचा माझ्या मनावर मोठा आघात झाला आहे.
8 Nov 2025 - 5:21 pm | विवेकपटाईत
मेंदूतील कोशिका क्षतिग्रस्त किंवा विकृत असतील तर त्या ठीक करण्यासाठी अजून औषधांची निर्मिती झाली नाही किंवा ऑपरेशन करून त्या बदलण्याची क्षमता ही विकसित झालेली नाही. परिणाम अनेक लोक विकृत उपायांकडे वळतात. कोट्यवधी उधळण्यापूर्वी बहुतेक कुणाचाही सल्ला घेत नाही. हा लेख वाचून एआयच्या मदतीने योग आणि प्राणायामचा काही प्रभाव होतो का हे पाहण्याचा प्रयत्न केला.
"योग आणि प्राणायाम केल्याने मेंदूच्या तांत्रिकेवर (न्यूरल स्ट्रक्चर आणि फंक्शन) खूप चांगली सुधारणा होते. नियमित भस्त्रिका, कपालभाती, अनुलोम-विलोम आणि भ्रामरी यांसारखे प्राणायाम मेंदूतील हिप्पोकॅम्पस (स्मृती केंद्र) आणि प्रिफ्रंटल कॉर्टेक्स (निर्णय-क्षमता केंद्र) यांचा आकार वाढवतात, ग्रे मॅटरची घनता सुधारतात आणि न्यूरॉन्समधली जोडणी (सिनॅप्टिक प्लॅस्टिसिटी) मजबूत करतात. यामुळे एकाग्रता, स्मरणशक्ती, भावनिक संतुलन आणि बुद्धिमत्ता यांत दीर्घकाळ टिकणारी सुधारणा होते – हे हार्वर्ड, UCLA आणि पतंजली रिसर्च फाउंडेशनच्या MRI-आधारित अभ्यासांनी सिद्ध केले आहे. एआय वर काही शोध प्रबंध सापडले
1) Alternate-Nostril Breathing (अनुलोम-विलोम) और ध्यान क्षमता
Journal: International Journal of Yoga
Title: Immediate effects of alternate nostril breathing on attention and working memory
Authors: Shirley Telles, et al. (Patanjali Research Foundation)
मुख्य परिणाम:
अनुलोम-विलोम के तुरंत बाद attention span और reaction time में सुधार झाला ।
2) प्राणायाम का मस्तिष्क पर प्रभाव (EEG आधारित अध्ययन)
Journal: Medical Science Monitor
Title: Effect of pranayama on brain functional connectivity using EEG coherence analysis
Author Team: PRF, Haridwar
मुख्य परिणाम:
धीमी नाड़ी-श्वास से प्रीफ्रंटल कॉर्टेक्स और भावनात्मक नियंत्रण क्षेत्रों में बेहतर समन्वय।
3) योग और धीमी-नाड़ी-श्वास का स्वायत्त तंत्रिका तंत्र पर प्रभाव
Journal: Frontiers in Psychiatry
Title: Yogic breathing and vagus nerve stimulation pathways
Author: Shirley Telles (PRF)
मुख्य परिणाम:
प्राणायाम vagus nerve activation बढ़ाता है → तनाव कम, ध्यान स्थिर।
4) बच्चों में योग/प्राणायाम और संज्ञानात्मक सुधार
Journal: Child and Adolescent Mental Health Review
Title: Yoga for improving cognitive function in school children
Author: Research team PRF + AIIMS collaboration
5–12 वर्ष के बच्चों में concentration और memory में हल्का-पर-स्थिर सुधार।
5) Intellectual Disability से संबंधित प्रासंगिक केस-स्टडी
Journal: Annals of Neurosciences
Title: Role of yoga practices in improving neuroplasticity
मंदबुद्धि/न्यूरो-डेवलपमेंटल स्थितियों में योग प्रत्यक्ष “IQ Increase” नहीं करता, पर
Neuroplasticity + Behavior Regulation + Learning Readiness में सुधार दिखता है।
8 Nov 2025 - 6:59 pm | कंजूस
काहीबाही भुलथापांवर विश्वास ठेवायचा आणि काहीही करायचे तर त्याला सामान्य जनता काय करणार?
8 Nov 2025 - 11:16 pm | कॉमी
वाचून वाईट वाटले.
9 Nov 2025 - 8:24 am | युयुत्सु
काही जणांमध्ये अगतिकता विवेकाला संपवते.
निसर्ग विवेकाची वाटणी सर्वांना समान करत नाही.
9 Nov 2025 - 10:23 am | चंद्रसूर्यकुमार
वाचून वाईट वाटले.
अशा प्रसंगी इतरांनी काय करायला पाहिजे अशी लेक्चर झोडणे सोपे असते. अमुक तमुक बॉलरला विराटने कसा शॉट खेळायला पाहिजे होता हे स्वतः हातात बॅटही न धरता, मैदानात कधीही न जाता घरी बसून सांगणे एकदम सोपे असते तसेच. संकटात सापडलेल्या त्या व्यक्तीवर जी वेळ आलेली असते त्यावेळेस ती व्यक्ती नक्की कशाप्रकारे विचार करेल आणि वागेल ती मानसिकता इतरांना नाही कळायची. आपण जसे वागलो ते कसे वागलो हा प्रश्न त्या व्यक्तीलाही भविष्यात पडत असेल.
या लेखात दिलेल्या प्रसंगाच्या ०.१% कठीण प्रसंगाला मी पण सामोरा गेलेलो आहे त्यामुळे अशा वेळेस कशी मानसिकता असेल याचा अंदाज करता येतो. माझ्या १२ वी च्या महत्वाच्या वर्षी वडील आजारी होते आणि वरच्या दाराची बेल वाजवून तीन वेळा परतले होते. तेव्हा घरची परिस्थिती, आईला मदत करणे, पैशाची चणचण आणि त्याचवेळेस अभ्यास या सगळ्या गोष्टी सांभाळताना तारांबळ उडत होती. मी स्वतः देव देव करणारा अजिबात नाही पण त्यावेळेस वडील बरे झाल्यावर अष्टविनायक की दुसरीकडे कुठे जाऊन या असे एकाने सांगितले होते ते मला पटलेही होते आणि आपण जावे असे वाटू लागले होते. शेवटच्या आजाराच्या वेळेस ठाण्याच्या मासुंदा तलावात एक नारळ फोडून सोडावा आणि परत येताना कोणाशीही न बोलता घरी यावे असे दुसर्या एकाने सांगितलेले पण मी केले होते. त्यावेळेस आपण असे कसे केले हा प्रश्न मला आजही पडतो. पण तेव्हाची एकंदरीत परिस्थिती पाहता बुडत्याला काडीचा आधार या न्यायाने काडी वाटणारी अशी प्रत्येक गोष्ट खूप आधार देईल असे वाटते.
असो. लेख आवडला.
10 Nov 2025 - 10:17 am | अगम्य
लेख आणि ती बातमी वाचून वाईट वाटले. कदाचित त्या कुटुंबाला मूर्ख ठरवून कुणी they deserved to lose their money वगैरेही म्हणू शकेल. परंतु पोटच्या गोळ्याची अशी अवस्था पाहून आई वडिलांच्या हृदयात काय कालवाकालव होत असेल ह्याची कल्पना येणे कठिण आहे. अशा परिस्थितीत मनुष्य अगतिक होऊन आपण जे करतो आहोत तो आत्मघात आहे हे दिसत आणि कळत असूनसुद्धा ते करतो अशी चमत्कारिक स्थिती निर्माण होते. अशा कुटुंबियांच्या अगतिक असहाय मनस्थितीचा बरोब्बर गैरफायदा हे असले भामटे घेतात.
महाराष्ट्रात अंधश्रद्धाविरोधी कायदा आहे. तो कायदा ह्या भोंदूवर आधी लावला पाहिजे. जरी त्या कुटुंबीयांनी स्वतःहून आपले पैसे आणि मालमत्ता त्या भोंदूंच्या नावावर केली असेल तरी ते under duress केले असे धरून ते व्यवहार रद्दबातल करून जितकी होईल तितकी रक्कम परत त्यांच्याकडे वळती केली गेली पाहिजे.
स्वर्ग नरक वगैरेंवर माझा विश्वास नाही परंतु अशा परिस्थितीतल्या कुटुंबाची सगळी मालमत्ता हड्पणाऱ्या त्या निर्लज्ज भोंदूबाबा आणि त्याच्या सहकाऱ्यांना जिवंतपणी नरकयातना मिळाल्या तरी हे पाप धुतलं जाणार नाही.
10 Nov 2025 - 11:30 am | कॉमी
बाडीस
10 Nov 2025 - 12:14 pm | सुबोध खरे
आमचा लहानपणचा शेजारी अमेरिकेत असतो दुर्दैवाने त्याची मुलगी स्वमग्न (autistic) आहे. जालावर शोध घेतल्यावर त्याला कोणीतरी मुंबईतील होमीओपॅथी वाला नजरेस आला.
त्याने त्याच्या कडे औषधासाठी संपर्क केला. होमीओपॅथी वाल्याने त्याला औषधाचे ५ हजार रुपये सांगितले.
हा मुंबईत आला तेंव्हा त्या होमीओपॅथीवाल्याकडे गेला तेंव्हा त्याने ५००० डॉलर्स सांगितले.
हा म्हणाला तुम्ही तर ५००० रुपये म्हणाला होता.
त्यावर तो होमीओपॅथीवाला म्हणाला तुम्ही अमेरिकेत असता तुम्हाला ५००० डॉलर्स जड नाहीत.
आमचा शेजारी भडकून त्याला म्हणाला ५००० डॉलर्स कमवायला आम्ही किती मेहनत करतो तुम्हाला महिती नाही. ५००० रुपयात औषध द्यायचे तर द्या नाहीतर मी चाललो
त्याने याला ५००० रुपयात औषध दिले.
अर्थात त्याचा काहीही उपयोग झाला नाही हा भाग अलाहिदा
14 Nov 2025 - 12:21 pm | योगी९००
लेख वाचला... तुमच्या विषयी थोडी कल्पना असल्याने तुम्ही व तुमच्या कुटूंबियांनी तुमच्या बहिणीचे शेवटपर्यंत केले या बद्दल तुम्हाला सलाम. खरं म्हणजे अशी गतिमंद मुले ज्यांच्या घरी असतात त्यांच्याकडे इतर लोकांचे जाणे येणे कमी असते व तसेच या घरातील इतर मुलांचीही लग्न कार्ये लवकर ठरत नाहीत. कुठल्याही मुलीला सासरी जाऊन मतिमंद नातेवाईकाची सेवा करणे आवडत नाही. अश्यावेळी तुमच्या मिसेसने तुम्हाला साथ दिली हे ही कौतूकास्पद....
सॉरी थोडे अवांतर झाले. पण मूळ जो विषय मांडला आहे त्याबाबत सहमत. उच्चशिक्षित माणूस ही बर्याचवेळा नियतीपुढे हतबल होतो व जे जे मार्ग दिसतील त्याच्या मागे लागतो. अश्यावेळी आपली बुद्धी गहाण पडते. माझ्याही आई-वडीलांच्या आजारपणात मी असे काही केले आहे. त्यावेळी समोर दिसणार्या जीवाच्या हालापुढे बाकी सर्व गोष्टी दुय्यम वाटतात व जे जे काही उपाय आहेत किंवा लोकं सांगत आहेत ते करून बघू, उगाच कोणी तुम्ही हे प्रयत्न केले नाहीत असे कोणी म्हणू नये ही कारणे त्यामागे असतात. माझे आई वडील दोघेही एकाच वेळी आजारी होते. आईला कॅन्सर होता तर त्यावेळी कोणीतरी डोंबीवलीत डॉक्टर रानवेलीची औषधे कॅन्सरवर देत होता. (त्या डॉ. ला नंतर अटक झाली होती). माझी मिसेस डॉक्टर आहे. तिला ह्याचा काही उपयोग होणार नाही हे माहित होते तरीही तिने त्या डॉ. शी संपर्क साधला होता. मी वडील कोमात असताना सर्व प्रकारचे डॉ. नाही तर बाबा गुरू पण केले होते. एकदा तर एक रेकी करणारा माणूस हॉस्पिटलमध्ये बोलावला होता. त्याने जे काय त्यावेळी प्रकार केले व वैश्विक उर्जा शोषून घेतो असे काहीतरी म्हणत होता, त्याने मला असे नक्की वाटत होते की वडील कोमातून बाहेर येणार. पण कश्याचाही काहीही उपयोग झाला नाही. दोन-तीन महिने हाल व त्रास सहन करून माझे आई वडील दोघेही १५ दिवसांच्या अंतरात गेले.
14 Nov 2025 - 12:58 pm | कर्नलतपस्वी
आपत्य जर आजारी,दिव्यांग किवा संकटात असेल तेव्हा पालक काहिही करायला तयार असतात.त्याचाच फायदा भोंदू लोक घेतात. आपत्य आथवा आईवडील किवां प्रियजनांनसाठी विशेषत दुर्धर आजार वगैरे मधे विवेक काम करत नाही असा आरोप करणे अतिशय चुकीचे आहे. असो मला वेगळेच काही सांगायचे आहे.
संभाजीनगर मधे आमच्या सासर्यांच्या मित्राच्या सुनेला ऑटिस्टिक मुलगा झाला. ती माऊली व घरचे डिप्रेशन मधे गेले ,जाणे स्वाभाविकच. थोड्याच दिवसात आईने पदर खोचला. ऑटिस्टिक मुलांचे संगोपन कसे करावे याचा शास्त्रशुद्ध कोर्स केला. पुढे जर्मनीत जाऊन ॲडव्हांन्स कोर्स केला. स्वताच्या मुलाचे संगोपन तर केलेच पण अशा मुलांच्या पालकांना जाऊन समुपदेशन केले. मुलांसाठी शाळा काढली. संस्था हळुहळू मोठी होत गेली. अनेक मान्यवरांनी भेट देवून शक्य ती अर्थिक व इतर प्रकारे मदत केली. बरीच मुले मुली मधे लक्षणीय प्रगती दिसून आली. आजही नावारूपास आलेली संस्था कार्यरत आहे.
ती माऊली काही वर्षापुर्वी स्तन कॅन्सरने जग सोडून गेली पण एक खुप मोठे कार्य करून गेली. आता हिला देवमाणूस च म्हणावे लागेल ना!
14 Nov 2025 - 4:18 pm | स्वधर्म
आपल्या वाट्याला आलेले भोग रडत न बसता भोगत भोगत त्यातून इतरांच्या वाट्याला तसले भोग आले तर त्यांनाही मदत व्हावी असे कार्य करणे _/\_ केवळ सलाम आहे अशा व्यक्तीमत्वाला.
धन्यवाद आपण एक अत्यंत प्रेरणादायक व सकारात्मक उदाहरण सांगितलेत.
15 Nov 2025 - 11:19 pm | कॉमी
अतिशय कौतुकास्पद.
15 Nov 2025 - 12:04 am | सौन्दर्य
खरंच कर्नल साहेबांनी अतिशय चांगले उदाहरण व माहिती दिली. अशा व्यक्तिमत्त्वांना मनापासून सलाम, कारण अश्या व्यक्ती इतरांना जगण्याची नवीनच ऊर्जा देतात.
माझी एक मामी तिच्या पायाने अधू मुलाला त्याच्या तेरा-चौदा वर्षांपर्यंत कोठेही उचलून न्यायची.
माझ्या एका मित्राचा मुलगा जन्मतः नीट होता, पण दोनेक वर्षांचा असताना त्याला ताप आला, त्यावेळी डॉक्टरने दिलेल्या एका इंजेक्शनमुळे मानसिक रित्या अधू झाला. त्याच्या आई - वडीलानी आपले संपूर्ण आयुष्य त्याच्यासाठी झिजवले. तो सतरा - अठरा वर्षांचा झाल्यावर अंगाने थोराड झाला व घरातील इतरांना तो धक्काबुक्की करायला लागला. शेवटी नाइलाजाने त्याला एका संस्थेत दाखल केले. तेथे तो आनंदात असतो असे कळले.
शेवटी काय की घरची किंवा अत्यंत जवळची व्यक्ती अशा काही रोगांनी ग्रस्त असतील तर घरातील इतर मंडळी सांगण्यात आलेले सर्वच उपाय करून बघतात, माणूस शेवटी आशेवरच जगतो हेच खरे.
15 Nov 2025 - 2:09 am | गामा पैलवान
यावरून लस हे एक रशियन रुले आहे, असं म्हणावं का? लशीच्या साधकबाधकत्वाची चर्चा व्हावी.
-गा.पै.
18 Nov 2025 - 8:25 pm | निपा
सगळी इंजेकशन्स लसी नसतात. लसी मुळे मानसिक अधूत्व आल्याचे पुरावे द्या मग चर्चा सुरु करू . पुरावे नसल्यास काही उदाहरणे दिली तरी चालतील.
18 Nov 2025 - 11:08 pm | गामा पैलवान
इथे ९५% सूचकत्व (( 95 % confidence in association ) असल्याचा पेपर आहे : https://pmc.ncbi.nlm.nih.gov/articles/PMC5244035/
-गा.पै.
19 Nov 2025 - 3:28 pm | निपा
Conclusion
This pilot epidemiologic analysis implies that the onset of some neuropsychiatric disorders may be temporally related to prior vaccinations in a subset of individuals. These findings warrant further investigation, but do not prove a causal role of antecedent infections or vaccinations in the pathoetiology of these conditions. Given the modest magnitude of these findings in contrast to the clear public health benefits of the timely administration of vaccines in preventing mortality and morbidity in childhood infectious diseases, we encourage families to maintain vaccination schedules according to CDC guidelines.
लसींचे महत्त्वपूर्ण आरोग्यदायी फायदे लक्षात घेता, कुटुंबांनी शिफारस केलेल्या लसीकरणाच्या वेळापत्रकाचे पालन सुरू ठेवावे, असा अभ्यासकांचा निष्कर्ष आहे.
९५% कॉन्फिडेंतील इंटर्वल आहे, अससोसिएशन नाही.
19 Nov 2025 - 11:32 pm | कॉमी
निपा,
असे संशोधन साहित्य गामांना समजत नाही हे मागेही दिसले आहे. ते एखाद्या वाक्याचा सगळा संदर्भ तोडून, निम्मे चुकीचे समजून घेऊन इतर लेख वाऱ्यावर टाकून देतात आणि केवळ तीन चार शब्दांवर अडून बसतात.
20 Nov 2025 - 9:13 pm | गामा पैलवान
निपा,
अशा प्रकारचं अन्वेषण अगोदरही झालं आहे. पण त्याची दखल कोण घेणार! बोलो, है कोई माईका लाल जो मांजरके गळेमे घंटा बांधेगा ?
आ.न.,
-गा.पै.
19 Nov 2025 - 11:40 am | युयुत्सु
लशीकरणाने घातलेला गोंधळ?
यामुळे लशींवरील विश्वास उडू शकतो!
https://www.youtube.com/watch?v=BJnNrpS6lTE