मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

जेव्हा माणसाचा देव बनवला जातो !

kvponkshe · · काथ्याकूट
डोळस कुटुंबीयांची झालेली फसवणूक ही काही आपल्या देशाला नवीन नाही. फक्त डोळस कुटुंबियांच्या मुळे अशा फसवणुकीच्या आकड्यात एकाने वाढ झाली इतकेच. आय टी मध्ये काम करणारे, जिथे औद्योगिक क्रांती ने जन्म घेतला त्या इंग्लंड सारख्या देशात नोकरी मिळवून तिथे काम करणारे कुटुंब निश्चितच उच्च शिक्षित असणार. असे उच्च शिक्षित कुटुंब अशा बाबा बुवांच्या मागे का लागले असेल ? अंगात येणे, शापाचा पैसा अशा अवैज्ञानिक संकल्पनांच्या मागे आंधळेपणाने का गेले असेल ? आणि आपण फसवले गेलोय हे त्यांना त्यांची सर्वस्व लुटून झाल्यावर का उमगले असेल ? असे अनेक प्रश्न इथे निर्माण होतात. डोळस कुटुंबाला आता मुर्खात काढणारे , त्यांच्यावर टीका करणारे अनेक जण निर्माण होतील. कारण हे करणे सहज सोपे आहे. पण जेव्हा मी वर उल्लेखित प्रश्न विचारात घेतो आणि त्यांची उत्तरे शोधतो तेव्हा मी माझ्या बालपणात जातो. कारण ही तसेच आहे. माझी मोठी बहीण जन्मजात मतिमंद होती. तिच्यात आणि माझ्यात १० वर्षांचे अंतर. या वर्षीच तिच्या ५७ व्या वर्षी ती वारली. ती माझ्या इतर मित्रांच्या बहिणीसारखी नाही, ती अशी का आहे हे मला कधी समजायला लागले ते आठवत नाही. पण माझ्या बहिणीसाठी आई बाबांनी ती बरी व्हावी म्हणून त्यांच्या परीने खूप प्रयत्न केलेले मला आठवत आहेत आणि काही आईने सांगीतले आहेत. यात मॉडर्न मेडिसिन [ज्याला ऍलोपॅथी हा चुकीचा शब्द आज प्रचलित आहे], मग आयुर्वेद , मग होमिओपॅथी असे सगळे उपचार झाले. मला आठवतंय की ही होमिओपॅथीची औषधे बाबा जर्मनीहून मागवत. माझे एक शिक्षक म्हसकर सर जे मोदी गणपतीशी अजूनही राहतात त्यांचे वडील ती औषधे कोणाकडूनतरी मागवायचे. पण या कशाचाही परिणाम बहिणीवर झाला नाही. तिच्या मतिमंदत्वात काहीही उतार पडला नाही. मग कोणीतरी त्यांना "तुम्हाला नाग हत्येचा शाप आहे " असे सांगीतले. मग नाशिकला जाऊन नारायण नागबळी केलेला मला आठवतोय. १९८५ किंवा ८६ ला ५००० ते १० हजार रुपये खर्चून तो नागबळी केलेला मला आठवतोय. मग कोणीतरी सांगोतले की आमच्या घराण्यात कोणी पूर्वजांकडून कोणा स्त्रीला खूप त्रास दिला गेलाय आणि ती स्त्री आज माझ्या बहिणीच्या रूपाने येऊन सूड उगवत आहे. मग त्याच्या शांती केलेल्या आठवतायत. मग कोणाच्या तरी ओळखीतून एक अनोळखी व्यक्ती बाबाना भेटायला आली. त्याला बहिणीबाबत असेच कोणाकडून तरी कळले होते. त्याने काही विधी करायला लागतील त्यासाठी मगरीचे तेल, कासवाचे कवच अशा वस्तू लागतील. बाबांनी सांगितले विचारले की या गोष्टी मी कुठून आणणार ? मग ती व्यक्ती म्हणाली की मी अरेंज करेन, मला पैसे द्या. सुदैवाने बाबा या भानगडीत पडले नाहीत. शेवटी बाबांची भेट सुदैवाने एका मानसोपचार तज्ज्ञ व्यक्तीशी झाली [यांचे नाव मी देऊ शकत नाही]. त्यांनी बाबांना स्पष्ट सांगितले की माझी बहीण कधीही नॉर्मल होणार नाही. तुम्ही हे स्वीकारून पुढे वाटचाल करा. मग आम्ही बहिणीवरील सर्व उपचार थांबवले [बाकी नेहमी होणारे आजार सोडून]. मूळ मुद्दा असा की : माझे बाबा PHD आहेत. आई MA B ed आहे. तरी त्यांनी मी वर सांगितलेले उपाय का केले असावेत ? आपले मूल इतरांसारखे नाही ही वास्तव स्वीकारणे खूप कठीण असते. त्यात निराशा, राग , दुःख , विषण्णता या सगळ्या भावना असतात. आणि जेव्हा आजच्या विज्ञानाला माहित असलेल्या सर्व उपाय योजना असफल होतात त्यावेळी कदाचित मग माणूस अशा अलौकिक उपायांकडे वळत असेल का ? इतके करून बघितलंय आता हेही करून बघू या पासून ही सुरुवात होते. समाजात अनेक बाबा, बुवा, स्वामी, महाराज, पीरबाबा, प्रिस्ट, सद्गुरू बसलेलेच असतात. आणि असे रंजलेले गांजलेले पालक, इतर अडचणीत सापडलेले लोक यांचे गिऱ्हाईक बनतात. या लोकांचे पाद्य पूजन , तुला, करणे, ते अमक्याचा अवतार आहेत, त्यांच्या अंगात अमुक येतात तमुक येतात अशा ऐकीव गोष्टींवर भरवसा ठेऊन, ते म्हणतील ती पूर्व दिशा मानून ते सांगतील ते करत बसणे, त्यांच्या नावाने पैसे ट्रान्सफर करणे .. इथं पासून त्यांना स्वतःचे शरीर अर्पण करण्यापर्यंत, नरबळी देण्यापर्यंत रंजलले गांजलेले लोक पुढे जातात. आशा संपत नाही आणि मूल बरे होत नाही. हे बाबा, बुवा, स्वामी, महाराज, पीरबाबा, प्रिस्ट अशांकडून थोडे थोडे पैसे उकळत राहतात. सायबर चोरी मध्ये सलामी अटॅक असतो तसाच. थोडे थोडे लुटले गेल्याने खूप मोठे नुकसान होईपर्यंत आपण किती लुटले गेलोय हेच लक्षात यायला वेळ लागतो. आणि जेव्हा लक्षात येते तेव्हा जवळपास सर्वस्व गेले असते. हेच डोळस कुटुंबाबाबत घडले. डोळस कुटुंबाचे १३ ते १४ कोट रुपये परत मिळतील का याबाबत मला शंकाच आहे. यावर निश्चित उपाय असा काही नाही. फक्त निदान आपण जे करतोय ते बरोबर आहे ना हे निदान एकदा तरी आपल्या सद्सद्विवेक बुद्धीला आणि आपल्या तर्क बुद्धीला विचारून पाहावे हे उत्तम. नाहीतर सावरकर, गाडगेबाबा यांची चरित्रे आणि लेख वाचून वाचून काय उपयोग? कधीकधी वास्तव स्वीकारून पुढे वाटचाल करावी हे शहाणपणाचे ठरेल नाही का ? कौस्तुभ पोंक्षे

वाचन 4132 प्रतिक्रिया 21