सध्या महाराष्ट्रात, पहिलीपासून हिंदीची सक्ती करण्याचा भाजप सरकारने निर्णय घेतला आहे, ह्या विरोधात अनेक मराठी प्रेमी नी महाराष्ट्राचे हित चिंतनाऱ्या संघटना विरोधात उतरल्या आहेत!
-महाराष्ट्राचे हिंदीकरण करण्याचा भाजपचा डाव आहे का?
- उत्तर भारतीय फुगलेली लोकसंख्या महाराष्ट्रात आणून वसवण्यासाठी भाजप हे करतय का?
- २२ अधिकृत भाषांमधली एक भाषा हिंदी लादण्यामागे भाजपाचे कारस्थान काय?
- हिंदीचा नी महाराष्ट्राचा संबंध काय?
- हिंदी भाषकांच्या सोयीसाठी १ लितील कोवळ्या जीवाना हिंदी लादून त्रास द्यायचा का?
संघटनांच्या मागण्या:-
१. हिंदी ही राष्ट्रभाषा नाही. ती केवळ इतर भारतीय भाषांप्रमाणेच एक राज्यभाषा असून तिची सक्ती करणे अयोग्य आहे.
२. राज्याच्या सांस्कृतिक अस्मितेवर आघात: महाराष्ट्राची ओळख ही स्वतंत्र मराठी भाषा, साहित्य, संस्कृती व परंपरेशी निगडित आहे. अन्य राज्यातील भाषा लादणे हे सांस्कृतिक आक्रमणच म्हणावे लागेल.
३. शिक्षणाचे ओझे वाढवणारा निर्णय: पहिलीपासूनच तीन भाषा सक्तीने शिकविणे बालकांच्या बौद्धिक व मानसिक विकासासाठी अयोग्य व अन्यायकारक ठरेल.
४. मराठीतील बोलीभाषांना सरकारकडून प्रोत्साहन नाही: मराठीच्या विविध बोलीभाषांच्या संवर्धनासाठी शासन काहीही प्रयत्न करीत नाही, हे दुर्दैवी आहे.
५. स्थानिक विद्यार्थ्यांवर स्थलांतरितांचे भाषिक वर्चस्व लादले जात आहे, ज्यामुळे स्थानिक भाषिक विद्यार्थ्यांचा अधिकार आणि संधी हिरावली जाऊ शकते.
६. केंद्र सरकारच्या त्रिभाषा सूत्राचा चुकीचा अर्थ: त्रिभाषा सूत्र हा प्रशासनापुरता मार्गदर्शक आहे; त्याची सक्ती शालेय शिक्षणात लादणे अन्यायकारक आहे.
७. भाषिक स्वायत्ततेचा संपूर्ण अभाव: प्रत्येक राज्याला त्याच्या भाषिक गरजेनुसार शिक्षण धोरण ठरवण्याचा अधिकार आहे. केंद्राच्या दबावाखाली घेतलेला निर्णय हे राज्याच्या स्वायत्ततेचे उल्लंघन आहे.
त्यामुळे, आम्ही खालील मागण्या आपल्यास सादर करीत आहोत –
१. राज्य शासनाने इयत्ता पहिलीपासून हिंदी भाषा सक्तीने शिकविण्याचा निर्णय तात्काळ रद्द करावा.
२. या निर्णयाच्या रद्दबाबत तात्काळ शासन आदेश किंवा स्पष्ट परिपत्रक निर्गमित करावे.
३. सदर बाबीबाबत शालेय शिक्षण संचालनालय, शिक्षण आयुक्त, शिक्षण मंडळ, गटशिक्षणाधिकारी, शाळा व्यवस्थापन समित्या यांना स्पष्ट सूचना द्याव्यात.
४. बालभारतीसह इतर सर्व पुस्तक छपाई केंद्रे व मुद्रण विभागांना नवीन शैक्षणिक वर्षासाठी हिंदी सक्तीबाबत कोणतीही योजना राबवू नये, याबाबत स्पष्ट लेखी सूचना द्याव्यात.
५. यापुढील अभ्यासक्रम नियोजन प्रक्रियेत विद्यार्थ्यांना तृतीय भाषा निवडीचा संपूर्ण स्वातंत्र्य देण्यात यावा, कोणतीही सक्ती करू नये.
६. त्रिभाषा सूत्राचे पालन हे राज्याच्या शैक्षणिक धोरणाच्या अनुषंगाने व ऐच्छिक स्वरूपात मर्यादित ठेवावे.
७. राज्यातील मराठी बोलीभाषा, लोकपरंपरा व स्थानिक संस्कृती यांचा अभ्यासक्रमात अंतर्भाव करून स्थानिकतेला प्राधान्य द्यावे.
८. सदर निर्णयामुळे निर्माण होणारा संभ्रम, असंतोष आणि प्रशासकीय अडचणी टाळण्यासाठी त्वरित ठोस कृती करण्यात यावी.
प्रतिक्रिया
19 Apr 2025 - 2:16 pm | अमरेंद्र बाहुबली
हिंदी ही राष्ट्रभाषा आहे असे महाराष्ट्राच्या जनतेला खोटे सांगण्यागे देवेंद्र फडणवीस आणी चंद्रशेखर बावणकुळे ह्यांचा हेतू काय?
19 Apr 2025 - 3:26 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
हिंदी ही संपर्कसूत्राची भाषा आहे- मा.मुख्यमंत्री फडणवीस
मग मराठी काय आहे ?
-दिलीप बिरुटे
19 Apr 2025 - 3:30 pm | अमरेंद्र बाहुबली
नी असा माणूस आपल्यावर मुख्यमंत्री म्हणून….
19 Apr 2025 - 2:24 pm | मुक्त विहारि
लोचट माणसाचा मनोरंजक लेख....
19 Apr 2025 - 3:18 pm | विजुभाऊ
हिंदी ही राष्ट्रभाषा आहे हे आजवर शाळेतही ऐकत आलोय. पण हे धादान्त खोटे आहे.
माझा हिंदी भाषेच्या सक्तीला पूर्ण विरोध आहे.
शक्य असेल तर बिहार किंवा उत्तरप्रदेशात तमिळ किंवा तेलगू भाषेची सक्ती करून पहा. त्रिभाषा सूत्र सर्वच राज्यात लावाना.
हिंदी भाषीक केवळ दोनच भाषा शिकतात. त्याना तसेही हिंडीशिवाय इतर भाषांचे वाव्डेच असते.
19 Apr 2025 - 10:33 pm | अमरेंद्र बाहुबली
सहमत आहे!
19 Apr 2025 - 3:19 pm | अमरेंद्र बाहुबली
हिंदी सत्तिने शिकवली तर राज्यभर १००००० हिंदी भाषिक शिक्षक लागणार आहेत?
गावा गावात उत्तरभारतीय शिक्षक अतिक्रमण करणार?
शिक्षक वेतन अंदाजे ७० हजार × १००००० = ७०० कोटी
वार्षिक ८४०० कोटी (३०% वाटले तर २५२० कोटी)
हा साधा खेळ नद्रे, हा खेळ कोणाच्या लक्षात येत नाहीय?
हा पैसा कोणाकडे जाणार?
19 Apr 2025 - 4:44 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
आदरणीय मा. मुख्यमंत्री साहेब,
महाराष्ट्र राज्य.
स.न.वि.वि. आपलं 'मराठी भाषे'च्या निमित्ताने हिंदी ही 'संपर्कसुत्राची भाषा' असल्याचं दळण प्रसार माध्यमावर पाहिलं आणि सामान्य मराठी माणूस म्हणून मराठी माणसाला जो संताप यायचा तो मलाही आला. आपल्या मराठी भाषेच्या प्रेमाबाबत शंका नाही पण, केंद्रसरकारच्या भावना दुखावल्या जाऊ नयेत म्हणून मराठी भाषेच्या बाबतीत आपण जी 'अर्धमेली' भूमिका घेतली आहे, ती वेदनादायी आहे.
अध्यक्ष महोदय, आम्ही आपल्या निदर्शनास आणू इच्छितो की, भाषावार प्रांतरचनेनुसार दि. १ मे १९६० रोजी महाराष्ट्र राज्याची निर्मिती झाली. स्वतंत्र राज्याचा प्रशासकीय कारभार हा मराठी भाषेतून व्हावा म्हणून महाराष्ट्र राजभाषा अधिनियम १९६४ अन्वये मराठी भाषा ही राजभाषा म्हणून स्वीकृत करण्यात आली आहे. पुढे मराठी भाषेचा प्रचार, प्रसार, संवर्धन विकासासाठी महाराष्ट्र राज्याचे मराठी भाषेसंबंधी पुढील पंचवीस वर्षाचं धोरण ठरविण्यासाठी एक समिती करण्यात आली. समितीचं नाव होतं, भाषा सल्लागार समिती. मराठी भाषेसाठी मग पुढे मराठी अभिजात भाषेचा अहवालाची समिती आली. मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जाही मिळाला पण तत्पूर्वी म्हणे १३ मार्च २०२३ ला मराठी भाषा धोरण जाहीर झाले.
अध्यक्ष महोदय, आता सगळं मराठी भाषा धोरण लिहित नाही पण आपण महाराष्ट्र राज्याचे जवाबदार मुख्यमंत्री आहात आणि आपणास माहिती आहे की, मराठी भाषा केवळ संवादाचे माध्यम नाही, लोक व्यवहार आणि सरकारी कामकाजाची भाषा नाही तर, ती मराठी माणसाच्या जीवनाचा अविभाज्य भाग आहे, तेव्हा सर्वसामान्य मराठी माणसाच्या जगण्याच्या भाषेबाबत अशी संपर्कसूत्राची भूमिका घेऊ नये ही नम्र विनंती.
आम्ही सर्व आणि आपणही, ज्या शाळांमधे शिकला असाल त्यापूर्वी आम्ही घरादारात मराठी भाषा बोलायला लागलो समजायला लागलो आणि शाळेत आम्हाला मराठी भाषेने जगाचं ज्ञान दिलं. मराठी भाषेचं धोरण ठरवतांना शासन निर्णय बघा आपण २०४७ पर्यंत मराठी भाषेसाठी काय काय करायचं ते ठरवले आहे. सर्व ज्ञानशाखांमधे मराठी भाषेतून सर्व पुस्तके आणि ज्ञान उपलब्ध करुन देणे. मराठी भाषिक प्रयोगशाळा उघडणे, मराठी भाषा बोली, जतन, संवर्धन करायचं ठरलं आहे. मराठी भाषेतून शालेय शिक्षणात मराठी ही पहिलीपासून ते उच्चशिक्षणातील सर्व शाखांमधे मराठी ही अनिवार्य असेल असे आपले मराठी भाषा धोरण ठरविणा-या शासन निर्णयात ठरलेले आहे, त्याचबरोबर जगातील ज्ञानासाठी इंग्रजी भाषाही पहिलीपासून ते उच्चशिक्षणामधे अनिवार्य असेल असे आपले ठरले आहे.
अशा वेळी ही हिंदीभाषा ही 'संपर्कसूत्राची' भाषा कोणत्या धोरणानुसार ठरवल्या जात आहे ? कोणत्याही भाषेचा द्वेष असण्याचे कारण नाही. मराठीबरोबर हिंदी, इंग्रजी भाषा असलीच पाहिजे पण ती शिकण्यासाठी 'ऐच्छिक' स्वरुपाची असावी असे वाटते. पहिलीपासून 'हिंदीसक्तीचा' शासनाने विचार करु नये एकीकडे नव्या शैक्षणिक धोरणात प्रादेशिक भाषेला प्राधान्य द्यावे असे धोरण आहे, अशा वेळी महाराष्ट्रात 'हिंदी' लादण्याचा आपण जो प्रयत्न करीत आहे, ते संतापजनक आहे. महाराष्ट्र म्हणजे मराठी माणूस ही ओळख आपण पुसण्याचा प्रयत्न करीत आहात, तेव्हा असे काही न करु नये एवढीच नम्र विनंती. थांबतो.
-दिलीप बिरुटे
(मराठी भाषाप्रेमी )
19 Apr 2025 - 10:34 pm | अमरेंद्र बाहुबली
+१I
19 Apr 2025 - 5:01 pm | कंजूस
हिंदी नको.
19 Apr 2025 - 5:15 pm | वामन देशमुख
महाराष्ट्रात मराठी व इंग्लिश याव्यतिरिक्त कोणत्याही मानवी भाषा* शिकण्याची सक्ती कुणीही कुणावरही करू नये. शासनाने जनतेवरही करू नये. जर कुणी तसे करत असेल, सक्तीच नव्हे तर केवळ सुचवणीही करत असेल तर तो प्रयत्न हाणून पाडायला हवा.
---
*मानवी भाषा हे मुद्दामहून यासाठी लिहिलेलं आहे की कुणी डावा तर्कशुन्य उपटसुंभ पुढे येऊन "जावा, पायथन पण शिकायची नाही का?" असे विचारू नये.
19 Apr 2025 - 10:37 pm | अमरेंद्र बाहुबली
+१
हिंदीसक्तीविरोधात जास्तीत जास्त मेल CM@maharashtra.gov.in ला पाठवा. नाहीतर आपल्या कोवळ्या मुला- नातवंडाना पहिलीत वह पेड है शिकताना आठवा, आणी ते नाही आले तर ओरडा/मार खाताना आठवा.
20 Apr 2025 - 11:21 pm | श्रीगुरुजी
मी ईमेल पाठवलंय. इतरांनी सुद्धा पाठवायला हवे. ईमेल बॉक्स तुडुंब भरून गेला पाहिजे.
21 Apr 2025 - 11:37 am | धर्मराजमुटके
मसुदा इथे प्रकाशित करा म्हणजे इतरांना मदत होईल.
आणि त्यात युपी / बिहार मधे त्रिभाषा सुत्रानुसार मराठी / गुजराती / तामिळ / कन्नड / तेलुगु यापैकी एक भाषा अनिवार्य करावी ह्याबद्दल देखील उल्लेख करावा जेणेकरुन उत्तर भारतीयांना इतर राज्यात पोट भरायला सोपे जाईल याचा देखील समावेश करावा.
अवांतर : सरकारने काय करावे करु नये यावरच चर्चेचा रोख आहे. आपण वैयक्तीकरित्या व मराठी समुदाय म्हणून मराठी साठी काय करु शकतो यावर चर्चा करणारा वेगळा धागा काढा कुणीतरी.
21 Apr 2025 - 11:47 am | श्रीगुरुजी
यावर मी आजच वेगळा लेख प्रकाशित करणार आहे.
19 Apr 2025 - 5:46 pm | प्रसाद गोडबोले
हमको चलेगा हिंदी।
आम्ही सुस्पष्ट, सानुनासिक, व्याकरण शुद्ध, न च्या जागी न , ण च्या जागी ण असे बोलायला लागलो की "काय तुपकट बामणी बोलत आहेस" असे आम्हाला ऐकायला मिळते.
आम्ही काहीही उपमा, उत्प्रेक्षा, रूपक अलंकार वापरून काहीही लिहिलं की त्याला "शब्दांचा पिसारा फुलवणे " असे म्हणाले जाते.
आम्ही "थोर थोर समाज सुधारकांचे" विखारी विद्वेषपूर्ण लेखन जे की स्वयं महाराष्ट्र शासनाने प्रकाशित केलेलं आहे , ते मिसळपाववर लोकांच्या निदर्शनास आणून दिले की आमचे प्रतिसाद संपादित केले जातात.
मराठीचा गौरव करणाऱ्या संतानी वेद विरुद्ध चकार शब्द उच्चारला नसला, वर्णाश्रम धर्माचे स्पष्ट समर्थन केलेले माहीत असले तरीही महाराष्ट्र साहित्य संमेलनाच्या अध्यक्षा व्यासपीठावरून "संत पुरोगामी होते" असे धादांत खोटे बोलतात !
तस्मात् आजच्या घडीला तरी मराठी भाषेत काही "राम " राहिलेला नाही असेच वाटते. हम को हिन्दी चलेगा।
मराठी माणसाशी हिंदीत बोलायचं
हिंदी माणसावर इंग्रजी झाडायची
आणि इंग्रजी बोलणाऱ्या समोर फ्रेंच
आणि कोणी तिन्ही भाषा बोलणारा समोर आल्यास सरळ संस्कृत मध्ये बोलायला सुरुवात करायची असे आम्ही आमचे नवे धोरण आखले आहे.
आता मराठी फक्त टाईम पास करिता =))
जाता जाता , उरल्या सुरल्या मराठीत एवढेच लिहितो
"आर् रांडेच्या आणाजी पंत टरबुज्या, तुझं मढ बाशिवलं , मायझया , थांब मोर्चाच काढतो आता बघ आता तुझ्या विरोधात. "
=))))
19 Apr 2025 - 6:27 pm | मुक्त विहारि
बाय द वे...
गुलटी पण वेळ प्रसंगी हिंदी भाषेतच बोलतात ....
19 Apr 2025 - 6:21 pm | कर्नलतपस्वी
जनरेशन झेड का काय म्हणतात ते डिजिटल माध्यमातून फ्रेंच,जर्मन, जापनीज...... सारं काही एक्सप्लोअर करत आहे.
हि नको,ती हवी असले मुद्दे फक्त चघळण्यासाठी.
पंजाब मधे जा सारे फलक पजांबीत आहेत. दक्षिणेकडील सर्व लोक आपल्याच भाषेत बोलतात. काटपाडी,चेन्नई, मदुराई रामेश्वरम् सगळीकडेच दुभाषा घेऊन फिरावे लागते.
मराठी माणूस मात्र समोरचा मराठी असूनही हिन्दीतच बोलणार.
संपुर्ण आयुष्य मराठीतेर भाषिक प्रांतात गेल्याने हिन्दी व साहेबांची भाषा वैखरी मुक्कामी होती.
सेवानिवृत्ती नंतरही आपण महाराष्ट्रात आलो आहे असे वाटतच नाही.
भाजीवाले सुद्धा प्रथम भयानक मन्दी (मराठी+हिन्दी) मधेच बोलतात.
मराठी माणसाने याचा गांभीर्याने विचार केला पाहीजे.
सर्व भाषांचा आदर जरूर केला पाहिजे. हे मर्म साहेबांनी चांगले ओळखले होते. सर्व साहेबांना स्थानिक भाषा चांगल्या प्रकारे आवगत होत्या. आजही सैन्यात मद्रास रेजिमेंट मधला शिख अधिकारी अस्खलित तामीळ, तेलगु तत्सम भाषा बोलतो. मराठा पलटनीतला मद्रासी, दक्षिणेकडील अधिकारी " चल गणपत दारू आण", असे शुद्ध मराठीत बोलतो.
19 Apr 2025 - 7:34 pm | अमरेंद्र बाहुबली
सहमत कर्नल साहेब, आपलेच नायक हिंदीत बोलतात!
19 Apr 2025 - 6:26 pm | कर्नलतपस्वी
पहिली पासून हिन्दी सक्तीची हवी नको या बद्दल मला वाटते भाषा विषय असावा. ज्याला जेव्हढे शिकायचे तेव्हढे शिकू द्या. राजकारण नको.
दहावीनंतर संस्कृत, बारावीनंतर मराठी हिन्दी असे सगळे सोडावेच लागते.
19 Apr 2025 - 6:28 pm | मुक्त विहारि
सहमत आहे...
19 Apr 2025 - 10:38 pm | अमरेंद्र बाहुबली
+१ हिंदी लादली जात नाही तोपर्यंतच चांगली आहे.
19 Apr 2025 - 6:29 pm | रात्रीचे चांदणे
पहिली पासून हिंदी सक्तीची नाही करायला पाहिजे. मोदी शहांना खुश करण्यासाठी फडणवीसांनी हा निर्णय घेतला असवा.
19 Apr 2025 - 6:46 pm | मुक्त विहारि
एक राष्ट्र एक भाषा..
थोडा विचार मंथन करा आणि मग ठरवा...
अजुन थोडी वर्षे जाऊ द्या...
इंग्रजी हीच भारताची राष्ट्र भाषा होईल...
19 Apr 2025 - 7:12 pm | श्रीगुरुजी
देफना राष्ट्रीय महत्त्वाकांक्षा आहे. त्यासाठी हिंदी भाषिक पट्ट्यात आपली स्वीकारार्हता वाढविण्यासाठी मराठी भाषेचा आणि पर्यायाने महाराष्ट्राचा बळी दिला जात आहे.
आता मराठीची अधिकृत मृत्युघंटा वाजली आहे. काही वर्षांंनी मराठी फक्त काही घरात बोलली जाईल व कालांतराने खंगून देवाघरी जाईल (काही मराठी कुटुंबात आपल्या कॉन्वेंटमधील मुलामुलींशी इंग्लिशमध्ये संभाषण करणारे मी पाहिले आहेत). घराबाहेर सर्वत्र हिंदी व संगणक वगैरे व्यवसायांच्या कार्यालयात इंग्लिशमध्ये संभाषण होईल. महाराष्ट्राचा समावेश हिंदी भाषिक राज्यांमध्ये होईल. नंतर मराठी ऐच्छिक व फक्त हिंदी आणि इंग्लिश सक्तीची असेल.
भाजप समर्थकांनी अत्यंत आक्रमकपणे हिंदुराष्ट्रासाठी रांग लावून भाजपला मत दिले होते. पण हिंदुराष्ट्र न मिळता पदरात पडतंय हिंदीराष्ट्र. एका हिंदीभाषिकाला मुख्यमंत्री केल्याची किंमत द्यायलाच हवी.
हिंदी राष्ट्रभाषा आहे असे बावकुळेंनी तारे तोडलेत तर हिंदीला विरोध करणारे निरूद्योगी आहेत असे अजित पवार बरळलेत. हिंदी ही संपर्कभाषा महाराष्ट्रात सर्वांना यायलाच पाहिजे या देफच्या बरळण्यावर संताप व दु:ख व्यक्त करणे एवढेच आपण करू शकतो कारण मराठीचा वृक्ष तोडण्यासाठी कुऱ्हाडीला दांडा मराठी माणसांनीच दिलाय.
१९६० च्या दशकात त्रिभाषा सूत्र लादणाऱ्या नेहरू व इंदिरा गांधींना महाराष्ट्राने विरोध न करता स्वत:हून प्रचंड पाठिंबा दिला व हिंदी आपल्यावर लादून घेतली. त्यांनी निदान ५ वी पासून हिंदी लादली. देफने चार पावले पुढे टाकून पहिलीपासूनच हिंदी लादली. हिंदी लादणे, अमराठींना विशेषतः हिंदी भाषिकांना महाराष्ट्रातून संसदेत पाठविणे या नालायकपणाला मराठी माणसांनी कधीही विरोध न करता उलट पाठिंबा दिला. आता हा हिंदीचा अजगर मराठी माणसाला घट्ट वेटोळे घालून गुदमरुन मारून टाकणार.
या मुद्द्यावर मला स्टालिन आदर्श वाटतो. हिंदी सक्तीविरूद्ध त्याने स्पष्ट निसंदिग्ध भूमिका घेतली आहे. अनुदान नाही दिले तरी चालेल पण तामिळनाडूत हिंदी लादून देणार नाही ही भूमिका कौतुकास्पद आहे. दुर्दैवाने महाराष्ट्राने आजवर अत्यंत लाचार व कणाहीन राज्यकर्ते निर्माण करून स्वत:चीच चिता रचली आहे. कोणत्याही पक्षातील कोणताही नेता याला अपवाद नाही.
अनेक मराठी व्यावसायिकांनी फक्त हिंदीभाषिक कामासाठी ठेवलेत. सध्या सोसायटीत स्वयंपाकाच्या इंधनाची वायूनलिका टाकण्याचे काम सुरू आहे. कंत्राटदार जाधव व रस्ते खोदून नलिका टाकणारे ५-६ जण हिंदी भाषिक. काही विचारले तर उर्मटपणे हिंदीमे बोलो असे गुरकावतात. २ वर्षांपूर्वी गो क्रेझी नावाचे सिंहगडाच्या पायथ्याशी असलेल्या एका मंगलकार्यालयात गेलो होतो. जवळपास ५ एकर जागा आहे. मालक निंबाळकर, व्यवस्थापक कामत, आजूबाजूचा सर्व परिसर मराठी व काम करणारे सर्व २४-२५ जण एकही मराठी शब्द न बोलू शकणारे हिंदी भाषिक. ते सुद्धा हिंदीमे बोलो असे उर्मटपणे गुरकावतात. आता यापुढे या हिंदी भाषिकांना हिंदीमे बोलो असे सांगण्याची गरजच पडणार नाही.
एकंदरीत ९ व्या शतकात जन्मलेली, अमृताहूनही.गोड असलेली.माझी मराठा भाषा सुमारे १२०० वर्षे जगून २१ व्या शतकात स्वर्गवासी होणार. मराठी भाषेसाठी मराठी भाषिकच कुऱ्हाडीचा दांडा गोतास काळ ठरणार हे दुर्दैव.
भविष्यात मराठी फक्त परदेशात जिवंत असेल.
19 Apr 2025 - 7:38 pm | अमरेंद्र बाहुबली
खूप उत्तम प्रतिसाद! माय मराठी मरणार. असेच दिसतेय. भाजप्यानी हिंदूंच्या नावाखाली हिंदी लादली, मराठीचा गळा अधिकृतरित्या घोटला.
19 Apr 2025 - 7:46 pm | श्रीगुरुजी
नीट वाचलेले दिसत नाही. आधी कॉंग्रेसींनी मराठीच्या गळ्याभोवती दोरी आवळली आणि भाजपने ती अजून करकचून घट्ट केली. दोन्ही पक्ष, खरं तर महाराष्ट्रातील सर्व पक्ष, अत्यंत नीच, लाचार व कणाहीन आहेत.
19 Apr 2025 - 7:51 pm | अमरेंद्र बाहुबली
+१
शिवसेनेची सत्ता होती तेव्हाही त्यांनी शालेय अभ्यासक्रमातून हिंदी उखडून फेकली नाही, सगळेच पक्ष मराठी बाबतीत नीचपणा करताहेत.
19 Apr 2025 - 7:45 pm | कर्नलतपस्वी
सोसायट्या मधे चौकीदार,गाड्या धुणारे,रंगकाम करणारे,भाजीचा ठेला (मराठी असेल तर हातगाडी),पाणीपुरीवाला,बांधकाम मजुर,बालाजी ट्रेडर्स सर्व सर्रास अन्य भाषिक.
महाराष्ट्रात लोकसंख्या कमी आहे का?
घराला सुरक्षा दरवाजे,डांसाच्या जाळ्या लावण्यासाठी मराठी म्हणून एकाला काम दिले जवळपास दिडलाखाचे काम होते. सत्यानाश केला. तसेच पण कमी पैशाचे काम दुसर्याच भाषिकाला दिले उत्तम काम व नंतरही सेवा उपलब्ध होती.
सुतार काम राजस्थानी लोक करतात.
मराठी बलुतेदार कुठे गेले?
विचार करण्यासारखी गोष्ट आहे.
शेतीत काम करण्यास शेतमजूर नाही. शेतीत काॅक्रिटची जंगलं उगवली. पैशे मिळाले. काही बळीराजे गब्बर झाले तर काही....
करायचा असेल तर गांभीर्याने चर्चा व्हायला हवी. नाही आपापली डफली तुणतुणं वाजविण्यात काही अर्थ नाही.
फडणवीस, ठाकरे पवार शिंदे हे जबाबदार तर आहेतच पण मराठी माणूस म्हणून प्रत्येकाची जबाबदारी आहे.
20 Apr 2025 - 1:04 am | कंजूस
पूर्ण सहमत.
21 Apr 2025 - 12:18 pm | सुक्या
सहमत आहे. मराठी माणसाला / तरुणाला काम करायला जमत नाही.
कसली गुर्मी असते कुणास ठाउक. आताची गोष्ट सांगतो. घरी एका रुमला एसी बसवला. तो बसवायला एक मराठी कामगार आला. तो पण ऐटीत. जरुरी पेक्षा मोठे भोक पाडले भिंतीला, नळ्या पाहिजे तश्या टाकल्या. ठिक इन्सुलेशन नाही की काही नाही.
तक्रार केली तेव्हा दुसरा कारागिर आला परप्रांतीय होता. त्याने व्यवस्थित नवी नळ्या टाकुन भोक बुजवुन गेला.
मराठी माणसाला का जमु नये?
असो जास्त लिहित नाही. आवांतर होइल.
21 Apr 2025 - 12:29 pm | अमरेंद्र बाहुबली
तो दोष कामगाराचा आहेच मराठी आहे म्हणून तो वाईट होता असे नाही. चितळेंचे खाद्य पदार्थ बिकानेर वाल्यापेक्षा उत्कृष्ट असतात, तेव्हा काय? मराठी आहे म्हणून चितळेनी वाईट पदार्थ बनवायला हवेत ना?
21 Apr 2025 - 12:39 pm | सुक्या
फाटे फुटु नये म्हणुन ...
मी तो माणुस वाईट होता हे म्हटलोच नाहिये. त्याने केलेले काम वाईट होते.
असो. जास्त बोलणे नको. धाग्याचा विषय दुसरा आहे .. आवांतर नको ..
19 Apr 2025 - 6:35 pm | माईसाहेब कुरसूंदीकर
जो काही अधिकचा पैसा हिंदी शिक्षकांना पगार द्यायला लागणार आहे तो येणार कुठुन?
उत्तर भारतीय फुगलेली लोकसंख्या महाराष्ट्रात आणून वसवण्यासाठी भाजप हे करतय का?
उत्तर प्रदेश खालोखाल आपणच जास्त फुगलो आहोत हे राज्य सरकारला माहित नाही का?(उत्तर प्रदेश १९ कोटी. महाराष्ट्र १३ कोटी)
- २२ अधिकृत भाषांमधली एक भाषा हिंदी लादण्यामागे भाजपाचे कारस्थान काय?
फार मोठे कारस्थान नसावे. अगदी पुर्वीपासुन संघाचे लोक देशभर प्रचारासाठी जातात. तेथील स्थानिक भाषा/संस्क्रुती आत्मसात करतात.भाषा म्हणजे संवाद साधण्याचे माध्यम..भाषा कोणती ह्याला महत्व नाही त्यांच्या दृष्टीने.
- हिंदी भाषकांच्या सोयीसाठी १ लितील कोवळ्या जीवाना हिंदी लादून त्रास द्यायचा का?
सहमत. तिसरी भाषा पाचवी नंतर शिकवावी. ती कोणती हे राज्यसरकारवर सोडावे.
19 Apr 2025 - 7:52 pm | कर्नलतपस्वी
मराठी शिक्षक हिन्दी शिकवतात की. मराठी माणसा साठी रोजगार नाही का उपलब्ध होणार.
केरळ मधे केरळी शिक्षक हिन्दी शिकवतात.
मी काही तज्ञ नाही पण असे म्हणतात की लहानपणी ग्रहणशक्ती तीव्र असते. मुले लवकर शिकतात.
19 Apr 2025 - 6:42 pm | कर्नलतपस्वी
सर्व उदघोषणा फ्रेच मधेच होतात. फ्रेच हवाई सुंदरी मुख्यता फ्रेच भाषेतून बोलतात पण गरज पडल्यास आंग्ल भाषेतही वार्तालाप करतात. अम्रीकेत इंग्रजीतच बोलायला लागते.
काही उर्मट,मग्रूर लोक मी मराठी का बोलू,का शिकू असा जे वाय झेड स्टॅन्ड घेत आहेत यावर माझे मत आहे की जिथे रहाता, खाता, जीवनयापन करण्यासाठी इतक्या दुर आलात तर इथली भाषा,इथली संस्कृती याचा स्विकार करा नाहीतर परत जिथे जन्मलात तीकडे परत जा.
थोड्या दिवसासाठी,पर्यटक अशा लोकांवर स्थानिक भाषेची सक्ती नको.
मराठी नेतृत्वाने मुद्दा राजकारण म्हणून लावून न धरता अस्मितेचा म्हणून लावून धरावा.
19 Apr 2025 - 6:48 pm | मुक्त विहारि
खोटी अपेक्षा...
काही राजकीय नेत्यांची मुले, इंग्रजी माध्यमातून पण शिकत असतील....
विनोदी धागा आहे..
मन गुंतवू नका...
19 Apr 2025 - 7:36 pm | माईसाहेब कुरसूंदीकर
"सर्व उदघोषणा फ्रेच मधेच होतात. फ्रेच हवाई सुंदरी मुख्यता फ्रेच भाषेतून बोलतात पण गरज पडल्यास आंग्ल भाषेतही वार्तालाप करतात."
पण फ्रेंच राजकीय नेते आपल्या मुलांना जर्मन्/इंग्रजी शाळेत घालतात का?तेथील फ्रेंच सरकारी शाळांची अवस्था कशी आहे? तिथले उच्च शि़क्षण-मेडीकल आणि उच्च अभियांत्रीकी(सिविल-मेकॅनिकल-एरोस्पेस्)हेही फ्रेंचमध्ये आहे.
वस्तुस्थिती ही की युरोपियन भाषिकांना ईतर भाषांची मदत घ्यावी लागत नाही. बालवाडीपासुन ते पी.एच.डी पर्यंत ते त्यांच्याच मातृभाषेत शिकतात.आपल्या भारतिय भाषा इकडे कमी पडल्याने ,मातृभाषा फक्त अभिमानाचा विषय उरली.
20 Apr 2025 - 10:37 am | मनो
> तेथील फ्रेंच सरकारी शाळांची अवस्था कशी आहे? तिथले उच्च शि़क्षण-मेडीकल आणि उच्च अभियांत्रीकी(सिविल-मेकॅनिकल-एरोस्पेस्)हेही फ्रेंचमध्ये आहे.
हे जरी खरं असलं तरी फ्रेंच माध्यमातून शिकायला आरामात जागा मिळते. इंग्रजीतून शिकायला मिळण्याच्या जागा कमी आणि तिथे प्रवेश घेण्यासाठी रांगा लागतात, त्यामुळे जगभरात घरोघरी मातीच्याच चुली आहेत. कोणत्याही गोष्टीची सक्ती वाईटच आहे, परंतु आपण जमेल त्या मार्गाने शिक्षण घेऊन प्रगती करून घेणार की आमच्यावर अनंतकाळ कसा अन्याय झाला याचे रडगाणे गात बसणार?
21 Apr 2025 - 12:56 pm | मूकवाचक
"जिथे रहाता, खाता, जीवनयापन करण्यासाठी इतक्या दुर आलात तर इथली भाषा,इथली संस्कृती याचा स्विकार करा नाहीतर परत जिथे जन्मलात तीकडे परत जा ..."
अस्मितेचा हट्ट धरणार आपण, मात्र त्याची जबर किंमत अन्य प्रांतातल्या मराठी भाषिक समाजाला भोगावी लागू शकते हे लक्षात घ्यायला हवे.
21 Apr 2025 - 1:26 pm | श्रीगुरुजी
अन्य प्रांतातील मराठी भाषिक आडमुठेपणा करून हट्टाने मराठीचा दुराग्रह करीत नाहीत. जेथे जातात तेथे जमवून घेतात.
समजा त्यांना काही त्रास भोगावा लागणार असेल तर तो भोगावा लागू नये महाराष्ट्रातील सर्व मराठी माणसांनी आपली मातृभाषा मारून टाकून परकीय भाषा डोक्यावर बसवून घ्यायची का?
19 Apr 2025 - 10:50 pm | धर्मराजमुटके
मराठीचा विजय असो. ह्या धाग्यावर खाँग्रेसी आणी अंधभक्त एकाच सुरात गाताहेत हे पाहून जीवाला गार गार वाटले.
ड्वाले पानावले की काय तसला प्रकार झाला.
त्रिभाषा सुत्र माझ्या मुलाने चांगले अंमलात आणले आहे. शाळेत इंग्रजी, मित्रांमधे हिंदी आणि घरात केवळ मराठी.
आम्ही (चुकीचे) इंग्रजी बोलण्याचा प्रयत्न केले तरी तो मराठीतूनच उत्तर देतो. व्हॉटसअपवर मराठीच (इंग्रजी लिपीमधून) प्रतिसाद देतो.
20 Apr 2025 - 2:00 am | सुक्या
सहमत आहे !!
महाराष्ट्रात शालेय शिक्षणात हिंदी अगोदरपासुन असताना सक्ती करण्याचे गुढ मला अजुन उमगले नाही. त्यातही ईयत्ता १ ली जिथे वयोमानाप्रमाणे एक (कुठलीही एक) भाषा असेल तर मुले लवकर शिकतात. दोन तीन भाषांची घुसमळ झाली (जसे की मराठी + ईंग्रजी + हिंदी) तर बालमन गोंधळते आणी मग भाषेची खिचडी होते.
महाराष्ट्रात तर ही सक्ती अगदी काहीही उपयोगाची नाही. इथे मुले पाचवी / सहावी त गेली की बहुभाषी होतातच.
मी (८ / ९ / १० वी) मराठी + ईंग्रजी + (५० % हिंदी व ५० % संस्कृत) असे शिकलो आहे.
20 Apr 2025 - 7:15 am | श्रीगुरुजी
मुळात महाराष्ट्रातील सुकाणू समितीने तिसरी भाषा ही मातृभाषा व इंग्लिश सोडून इतर कोणतीही भारतीय भाषा असावी अशी सूचना केली होती. तिसरी भाषा हिंदीच हवी अशी कोणतीही सूचना नव्हती.
तरीसुध्दा जाणूनबुजून स्वत:ची राजकीय पोळी भाजण्यासाठी, हिंदी भाषिकांच्या मतांसाठी, हिंदी राज्यात आपली स्वीकारार्हता वाढविण्यासाठी, पक्षश्रेष्ठींची मर्जी राखण्यासाठी हिंदी ही राष्ट्रभाषा आहे असे धडधडीत खोटे सांगत हिंदीची सक्ती केली आहे.
20 Apr 2025 - 8:10 am | माहितगार
कोणत्याही गोष्टीचे एक्स्ट्रीम किती करावे? पाचवी पासून त्रिभाषा सुत्री आहेच ना! माध्यमिक शाळेतील त्रिभाषा सुत्रीला महाराष्ट्राने कधीच नाकारलेले नाही.
आमच्याकडची महाराष्ट्रातील बालक मंदिर वयाची चिमुरडी पण हिंदी गाणी चित्रपट हिंदीच्या कोणत्याही शिक्षणाशिवाय सहज समजतात. त्यासाठी पहिलीपासून हिंदी शिकवण्याचा अट्टाहास भाषा आणि शिक्षण शास्त्रीय दृष्ट्या अयोग्य आणि निरर्थक आहे.
मला शिक्षण शास्त्रीय दृष्ट्या प्राथमिक पासून सक्तीच्या इंग्रजी शिक्षणही योग्य वाटत नाही. आणि आज भाषा तंत्रज्ञान इतके विकसीत झाले आहे कि एकमेकांच्या जागतिक भाषा येत नसताना सहज संवाद साधता येतोय तेव्हा महाराष्ट्राची सांस्कृतिक ओळख मराठी या पलिकडे इतर भाषांना महाराष्ट्रात लादण्याचे विचार अनाठायीच ठरतात किंवा कसे
20 Apr 2025 - 8:35 am | धर्मराजमुटके
आजच एक सुंदर व्हॉट्सअॅप फॉरवर्ड वाचला !
"जर अर्धा देश महाराष्ट्रात येऊन पोटपाणी चालवत असेल तर महाराष्ट्राला हिंदी नव्हे तर देशाला मराठी शिकण्याची आवश्यकता आहे."
20 Apr 2025 - 9:10 am | अमरेंद्र बाहुबली
बरोबर! आज अख्खा भारत मराठीत बोलताना दिसायला हवा होता, कुणेएकेकाळी अटकेपार झेंडे रोवणारी मराठी, मागच्या दोन तीन पिढ्यातील काही मूर्ख मराठी लोकांच्या हिंदीलाळघोटेपणामुळे महाराष्ट्रातच पोरकी झालीय.
20 Apr 2025 - 10:13 am | श्रीगुरुजी
"जर अर्धा देश महाराष्ट्रात येऊन पोटपाणी चालवत असेल तर महाराष्ट्राला हिंदी नव्हे तर देशाला मराठी शिकण्याची आवश्यकता आहे."
अतिथी देवो भव!
यांच्या सोयीसाठी आम्हीच हिंदी शिकू. हे उघडे असतील आम्ही अंगातला सदरा यांना देऊन उघडे बसू.
20 Apr 2025 - 11:24 am | अमरेंद्र बाहुबली
समोरचे ताट द्यावे पण बसायचे पाट देऊ नये म्हणतात, मराठी माणसाने सगळच हिंदी भाषिकांना देऊन टाकले!
20 Apr 2025 - 11:29 am | अमरेंद्र बाहुबली
हिंदी भयंकर प्रकारे लादली जातेय, प्ले ग्रुप मधे जाणाऱ्या माझ्या ३ वर्षाच्या मुलाला मी येरे येरे पावसा शिकवू लागलो तर मला थांबवून तो बारीश आई बारिश आई म्हणायला सांगतो, छोटा ए, बडा ए म्हणतो, रुको, बचाओ, भागो, असे शब्द उच्चारतोय, प्ले ग्रुपमध्ये ८० टक्के मुले मराठी आहेत, पण २० टक्के उत्तर भारतीय मुलांसाठी हिंदीत शिकवले जातेय. शिक्षिका मराठी आहेत तरीही, घरातले लोक ऐकत नाही तरीही प्ले ग्रुप लवकरच बदलनार आहे, आता उन्हाळी सुट्या आहेत पण दुसऱ्या प्ले ग्रुपला वेगळी अवस्था असेल असे वाटत नाही.
20 Apr 2025 - 12:17 pm | धर्मराजमुटके
त्रिभाषा सुत्र जर देशभर लागू करणार असतील तर युपी, बिहार मधे मराठी हा तिसरा पर्याय दिला आहे काय शिकायला ?
20 Apr 2025 - 1:08 pm | श्रीगुरुजी
तिसरा पर्याय राष्ट्रभाषा शिकण्यासाठी आहे. हिंदी पट्ट्यात तिसऱ्या भाषेची गरज नाही.
20 Apr 2025 - 1:14 pm | धर्मराजमुटके
हिंदी शिकण्याची भलेही गरज नसेल पण जसे इथे मराठी, हिंदी आणि इंग्रजी हे तीन पर्याय दिले आहेत तसे तिकडे पण कोणतेतरी तीन पर्याय असायला हवेत.
मला वाटते युपी बिहार मधे मराठी / गुजराती / कन्नडा / तमिळ /तेलुगू यापैकी एक भाषा तरी पहिलीपासून सक्तीचे करावी कारण तिकडची जनता याच भाषा बोलणार्या राज्यांत कामासाठी जात असते. फारच वाटले तर याला राष्ट्रभक्तीचा मुलामा चढवावा म्हणजे बघा उत्तरेतून येऊन कशी दक्षिणवासियांची मने जिंकली वगैरे. या सगळ्या भाषा शिकल्या तर उत्तरेच्या राजकीय पक्षांना देखील दक्षिण मधे प्रवेश करायला मदत होईल. मार्ग थोडा अवघड आहे पण पहिलीपासूनच ब्रेनवॉश केला तर जमून जाईल.
20 Apr 2025 - 10:56 pm | माहितगार
तिसरा पर्याय राष्ट्रभाषा शिकण्यासाठी आहे. हिंदी पट्ट्यात तिसऱ्या भाषेची गरज नाही.
इथे महत्वाचा प्रॉब्लेम आहे
20 Apr 2025 - 11:07 pm | अमरेंद्र बाहुबली
राष्ट्रभाषा?
20 Apr 2025 - 1:15 pm | मूकवाचक
भारतातील अन्य राज्यात नोकरी करणारे/ तिकडे स्थायिक झालेले महाराष्ट्रातले लोक तेथील स्थानिक भाषा (गुजराती, तेलगू, तमिळ, केरळी वगैरे) शिकतात का?
ठराविक वय ओलांडल्यावर नवीन भाषा शिकणे सोपे नसते. त्यामुळे भारतातल्या एखाद्या राज्यातला नागरिक अन्य राज्यात नोकरी/ उद्योग करू लागल्यास स्थानिक भाषा शिकण्यासाठी त्याला नोकरी देत असलेल्या संस्थेने तशी तयारी करून घ्यावी, व ठरलेल्या कालावधीत एखादी परीक्षा घेण्यात यावी हा एक व्यावहारिक पर्याय आहे. या बाबतीत काही कायदा अस्तित्वात आहे का?
स्थानिक भाषा न शिकलेल्या मराठी माणसाला अन्य राज्यांमधे मारहाण होणे, त्याला अपमानास्पद पद्धतीने स्थानिकांनी हिसका दाखवणे रास्त आहे का?
20 Apr 2025 - 1:47 pm | धर्मराजमुटके
म्हणूनच युपी / बिहार इथे पहिलीपासून मराठी / गुजराती / कन्नड / तामिळ / तेलुगू यापैकी एक भाषा सक्तीची करावी. म्हणजे त्यांना दुसृया राज्यात जाऊन पोट भरण्याची सोय होईल आणि अपमान देखील होणार नाही. बिहार मधील मुले खूप हुशार असतात. बरेचसे सरकारी नोकर तिथूनच येतात. एवढ्या हुशार जनतेला एखादी भाषा शिकता येणे अवघड जाणार नाही.
नाही. पण मराठी माणसाला अन्य राज्यात मारहाण झाल्याची फारशी उदाहरणे पाहण्यात आलेली नाहीत.
20 Apr 2025 - 8:42 pm | माईसाहेब कुरसूंदीकर
"पण मराठी माणसाला अन्य राज्यात मारहाण झाल्याची फारशी उदाहरणे पाहण्यात आलेली नाहीत."
दक्षिणेतील राज्यांत दुसर्याला झोडपणे, जाहीर सभांमध्ये दुसर्या भाषेची/संस्क्रुतीची खिल्ली उडवणे हे प्रकार होत नाहीत."तू आमची भाषा का नाही बोलत" असले प्रश्नही विचारले जात नाहीत. तामिळनाडुचे उदाहरण घ्या. मारवाडी/बिहारी तामिळनाडुत गेले ५० हुन अनेक वर्षे आहेत. राजकीय पक्ष भाषेबद्दल खूप जागरूक असतात पण मारहाण झाल्याचे कधी ऐकले नाही.
20 Apr 2025 - 1:19 pm | चावटमेला
घृणास्पद निर्णय. राक्षसी बहुमताचा माज आहे.
20 Apr 2025 - 3:19 pm | श्रीगुरुजी
अजून एक नालायक
20 Apr 2025 - 3:21 pm | श्रीगुरुजी
या राज्यात जो राहील त्याला मराठी यायलाच हवी असैल तर निर्लज्जपणे वाहिन्यांसमोर हिंदीत का बोलता? वाहिन्यांना मराठी यायला नको का?
20 Apr 2025 - 3:54 pm | अमरेंद्र बाहुबली
भाजपेयीनी सगळी लाजलज्जा सोडलीय, हिंदी ही राष्ट्रभाषा आहे असे खोटे सांगून महाराष्ट्रावर हिंदी लादत आहेत, दोन्ही ठाकरेंनी ह्या निर्णयाला विरोध केलाय.
20 Apr 2025 - 8:33 pm | माईसाहेब कुरसूंदीकर
" प्ले ग्रुप मधे जाणाऱ्या माझ्या ३ वर्षाच्या मुलाला मी येरे येरे पावसा शिकवू लागलो तर मला थांबवून तो बारीश आई बारिश आई म्हणायला सांगतो, छोटा ए, बडा ए म्हणतो, रुको, बचाओ, भागो, असे शब्द उच्चारतोय"
काही वर्षापुर्वीचे एक उदाहरण आठवले. ए आर रेहमान तामिळ चॅनेलवर बोलत असताना मध्येच हिंदीत बोलू लागला. मुलाखतकर्त्याने त्याला तिथेच थांबवुन 'हा तामिळ चॅनेल आहे" असे सांगितले. उगीच 'आमचा जगप्रसिद्ध रेहमान, बोलु देऊ या' असले लाड नाहीत.
नाहीतर आमचे बॉलिवुडमधील मराठी कलाकार? उर्दु शायरीपासुन हिंदी कविता.. मराठी चॅनेलवर ओतत असतात. मराठी चॅनेलही बॉलिवूडवाल्यांना तासाभराच्या मुलाखतीसाठी कट्ट्या-फट्ट्यावर बोलावतात. थोर-थोर म्हणून नावाजले गेलेले मराठी कलाकार- बॉलिवुडमधील कलाकारांचे कौतुक केल्याशिवाय, ह्यांची मुलाखत संपत नाही.
गेले २५-३० वर्षे दोन-तीन पिढ्या हेच टी.व्ही.वर बघत आल्या आहेत.तीशीतल्या-चाळीशीतल्या १० मराठी तरूणांना तुझे आवडते ४ गायक सांग असे विचारा आणि 'किशोर्,लता,आशा,अरिजीत, अरिजीत घोशाल' ह्यापैकी नावे आली नाहीत तर सांगा. तामिळ्,तेलुगु,कन्नड्,बंगाली लोकांना विचारा- खात्री आहे की त्यांच्या राज्यातील ४ पैकी २ नावे येतील. हिंदीचा प्रभाव हा असा गेले ५० वर्षे होतोय.
20 Apr 2025 - 9:02 pm | श्रीगुरुजी
माईडे,
तुला आणि तुझ्या ' ह्यां'ना आवडते गायक/गायिका विचारले तर गजाननबुवा वाटवे, बबनराव नावडीकर, दीनानाथ मंगेशकर, बालगंधर्व, मास्टर कृष्णराव फुलंब्रीकर, शांता आपटे, ज्योत्स्ना भोळे ही नावे सांगतील.
20 Apr 2025 - 10:55 pm | माईसाहेब कुरसूंदीकर
नक्कीच रे गुरुजी. हे तर आहेतच शिवाय सैगल्,बाबुजी,रफी,मुकेश्,शमशाद बेगम.. यादी खूप मोठी आहे. फक्त मराठी कलाकारांचे फॅन व्हा असे बिलकूल म्हणणे नाही पण दुसर्याना डोक्यावर घेण्याच्या नादात गेल्या एक-दोन पिढ्या काय करुन बसल्या आणि इथ पर्यंत वेळ आली.
20 Apr 2025 - 9:57 pm | अमरेंद्र बाहुबली
हरामखोर मराठी कलाकार, सिनेमा आदळला की मराठी प्रेक्षकांना दोष देतील पण मराठीवर असे संकट आले की तोंडातून शब्द उच्चारणार नाहीत.
20 Apr 2025 - 11:14 pm | श्रीगुरुजी
"मला आश्चर्य वाटते की हिंदीसारख्या भारतीय भाषेला आपण विरोध करतो आणि इंग्रजीचे आपण गोडवे गातो. इंग्रजी खांद्यावर घेऊन मिरवतो आणि भारतीय भाषा दूरची का वाटते याचाही विचार केला पाहिजे."
- देवेंद्र फडणवीस
हे वाचून संताप अनावर होतोय. भाजपला मत देणाऱ्यांनी नक्की का भाजपला मत दिले होते? ही मुक्ताफळे किती भाजप समर्थकांना मान्य आहेत? नोकरी व्यवसायाची संधी इंग्लिश येत नसेल पण हिंदी येत असेल तर किती आणि इंग्लिश येत असेल पण हिंदी येत नसेल तर किती? हिंदी इतकी महत्त्वाची आहे तर हिंदीभाषिक पट्ट्यातील अनेकांना इतर राज्यात जाऊन कष्टाची कामे का करावी लागतात? इंग्लिशला हिंदी पेक्षा कमी महत्त्व असेल तर दक्षिणेतील राज्ये तुलनेने प्रगत कशी?
आपल्या राष्ट्रीय राजकीय महत्त्वाकांक्षेसाठी मराठीचा बळी द्यायला, इंग्लिशला कमी लेखून हिंदीचे कौतुक करायला जनाची नसली तरी मनाची तरी नको का? आपल्या मुलीला यांनी हिंदी माध्यमाच्या शाळेत शिकविले की इंग्लिश माध्यमाच्या?
महाराष्ट्राच्या नशिबी सातत्याने नालायकच सत्ताधारी का येत आहेत?
20 Apr 2025 - 11:44 pm | माईसाहेब कुरसूंदीकर
देफची पत्नी पंजाबी गाण्यावर ठेका धरते.'मूड बनालेया' म्हणते नाचते त्या घरात कसले मराठी आणि कसले हिंदी?

" इंग्रजी खांद्यावर घेऊन मिरवतो आणि भारतीय भाषा दूरची का वाटते याचाही विचार केला पाहिजे." देफ
देफला हेच वाक्य तामिळ्नाडूच्या भाजपाच्या कार्यालयात म्हणायला सांगा. रेहमानला जसे हिंदी वाक्य पुरे करू दिले नव्हते, तसेच त्याला थांबवतील.
21 Apr 2025 - 1:56 am | सुक्या
देवेंद्र फडवणीस व त्यांच्या पत्नी ह्या दोन वेगवेगळ्या व्यक्ती आहेत. देवेंद्र फडवणीस ह्यांच्या पत्नीने कुठल्या गाण्यावर ताल / ठेका धरावा हा त्यांचा प्रश्न आहे. त्यांना ते स्वातंत्र आहे. उगा त्यांना ह्यात ओढण्याची आवश्यकता नाही.
21 Apr 2025 - 1:14 pm | अनन्त अवधुत
तेव्हा माइइंचे बेअरिंग सुटत चाललय असे वाटायला लागले.
पण हा प्रतिसाद पाहून माईंनी आपला आयडी आणि पासवर्ड कोणा ट्रोलरला शेअर केलाय याची खातरजमा झाली.
21 Apr 2025 - 1:41 pm | माईसाहेब कुरसूंदीकर
अरे अनंता, ज्या घरात अशा न्रुत्याचे,गाण्याचे सराव केले जात असतील त्यांना काय मराठीबद्दल जिव्हाळा असणार आहे? तो असावा अशी माझी अजिबात अपेक्षा नाही. भारतिय नागरिकाने कोणत्या भाषेत बोलावे,कोणत्या भाषेची गाणी गावीत्,न्रूत्य करावे.. हा ज्याचा त्याचा प्रश्न. पण लोकांसमोर हे करत आहात ते प्रतिसाद येणारच ना?केजरीवाल ह्यांची कन्या उद्या स्पॅनिशमधुन व्हिडियो बनवु लागली,सालसा नृत्य करू लागली तर आमचे अमित मालविय आणि त्यांचा कंपू ट्रोल करेलच ना?
21 Apr 2025 - 2:01 pm | अमरेंद्र बाहुबली
माई फडणवीसांच्या मुलीला मराठी येत नाही, हिंदीत बोलते, ह्यावर “तिला सांभाळणारी बाई हिंदी भाषीक आहे असे उत्तर मिळाले होते” तो व्हिडिओ युट्युबवरून गायब करण्यात आलाय.
20 Apr 2025 - 11:45 pm | अमरेंद्र बाहुबली
+१
हा माणूस मला महाराष्ट्राची वाट लावणार.
21 Apr 2025 - 12:53 am | रीडर
करंटेपणाचा कळस. अत्यंत वाईट निर्णय
21 Apr 2025 - 8:05 am | प्रसाद गोडबोले
काहीही म्हणा
पण आपल्या भाषेवर आक्रमण होतं आहे. आपल्यावर अन्य भाषा लादली जात आहे , ह्या विचाराने वर लोकांचा जो जीव कळवळला आहे ते पाहून भारी वाटतंय.
अगदी तसेच ...
जेव्हा आपल्या धर्मावर दुसऱ्या धर्माचे आक्रमण होते, आपल्यावर अन्य धर्म , अन्य संस्कृती लादली जात आहे ह्या विचाराने सनातनी लोकांचा जीव कळवळतो.
आपल्या पहिलीतील लहान मुलांच्या दप्तरात मराठी पुस्तके बाजूला सारून हिंदी पुस्तके बसवली जातात तेव्हा तुम्हाला जे दुःख होतेच
अगदी तसेच
जेव्हा आपली मंदिरे उध्वस्त करून तिथे बसवलेली अन्य धार्मिक स्थळे पाहून , आपल्या धर्माची पुस्तके दहन केलेली पाहून सनातनी लोकांचा जीव कळवळतो.
आता वरील काही प्रतिसादात लोकांनी देवेंद्र फडणवीस ह्यांच्यावर राग व्यक्त केला आहे.
हेच जर कोणी फडणवीसांना " महात्मा" ही पदवी दिली तर तुमच्या तळपायाची आग मस्तकात जाईल की नाही !!
अगदी सेम टू सेम तसेच , सनातनी लोकांचा जीवाचा जळफळाट होतो जेव्हा देव देश अन् धर्माची हानी केलेल्या लोकांना "महात्मा" ही पदवी लावली जाते.
जी अस्मिता तुम्हाला भाषेबद्दल वाटत आहे तीच सनातनी लोकांना देव देश अन् धर्माबाबत बाबत वाटत आहे.
I hope you can understand each other better now.
- महात्मा प्रसाद गोडबोले=))))
21 Apr 2025 - 8:48 am | श्रीगुरुजी
या दोन वेगळ्या गोष्टी आहेत. सरमिसळ नको. धाग्याचा विषय हिंदीची अनावश्यक सक्ती हा आहे.
हिंदीचे व्यावहारिक लाभ, जागतिक पातळीवरील स्वीकारार्हता इंग्लिशच्या तुलनेत अत्यल्प आहेत. हिंदीत प्राविण्य मिळवून हिंदी राज्यात साधारण नोकरी मिळू शकेल. परंतु इंग्लिशमध्ये प्राविण्य असल्यास अनेक देशात, उच्चभ्रू स्वरूपाच्या नोकरीत संधी मिळू शकते.
एकतर तीन भाषा शिकण्याची सक्तीच नको. तिसरी भाषा सक्तीने शिकवायची असेल ज्या भाषांचा ज्ञानग्रहणासाठी व व्यावहारिक उपयोग सर्वाधिक आहे त्याच भाषा शिकायला हव्या. या दोन्ही मुद्द्यांवर हिंदी निरूपयोगी आहे.
अजून एक मुद्दा म्हणजे हिंदी अजिबात न शिकताही समान लिपी, समान व्याकरण, समान वाक्यरचना व अनेक समानार्थी शब्दांमुळे हिंदी समजण्यासाठी मराठी येणाऱ्यांना अत्यल्प प्रयत्न करावे लागतात. हिंदी अजिबात न शिकलेल्या वयातही हिंदी चित्रपट समजत होते.
देफने स्वतःच्या मुलीला हिंदी माध्यमाच्या शाळेत न शिकवितख इंग्लिश माध्यमाच्या शाळेत शिकविले होते. परदेशात गेल्यानंतर हे हिंदीत न बोलता इंग्लिशमध्ये संवाद साधतात. तरीही शहाजोगपणे विचारतात की आपल्याला देशी हिंदीपेक्षा विदेशी इंग्लिशसाठी आत्मीयता का वाटते? आपल्या राष्ट्रीय राजकीय महत्त्वाकांक्षेसाठी हे मराठी माणसांचा बळी देताहेत.
लिपी समानतेमुळे मराठी मुलांना हिंदी शिकणे सोपे जाईल हा दावा असेल तर तिसरी भाषा दॉईच, डच, फ्रेंच यापैकी शिकवा ज्यांची व इंग्लीशची लिपी समान आहे व ज्यांचा व्यावहारिक उपयोग हिंदीपेक्षा खूप जास्त आहे.
21 Apr 2025 - 6:01 pm | प्रसाद गोडबोले
सरमिसळ नाहीच.
राममंदिर, मंदिर पुनर्संपादन आणि जीर्णोद्धार, वगैरे सर्वच बाबतीत हिंदू द्वेषी भूमिका घेणाऱ्या फुरोगामी मराठी माणसाच्या बाजूला उभे राहण्यापेक्षा सनातनी हिंदी भाषिक मला "दगडापेक्षा वीट मऊ " वाटतात.
तुम्हीही मराठी मराठी म्हणून ज्यांच्या बाजूला उभे रहात आहात हे लोकं -
सावरकरांना माफीवीर म्हणणारे आहेत. नाशिकच्या साहित्य संमेलनात सावरकरांचे नामोनिशाण पुसून टाकणारे लोकं आहेत हे.
ज्ञानेश्वरांना धूर्त चलाख देशस्थ ज्ञानोबा म्हणणारे लोक आहेत हे.
रामदासांना हे लोकं काय बोलतात हे लोकं हे मी तुम्हाला सांगायची गरज नाही.
लिस्ट खूप मोठ्ठी आहे.
अहो , एवढं लांब चे कशाला, पंतप्रधानांनी त्यांच्या व्यस्त दिनक्रमातून मराठी साहित्य संमेलनासाठी मोजका वेळ काढून दिला , तर त्याचा अर्थ " मला जास्त बोलायचं नाही असा दम देण्यात आलेला आहे." असा काढणारे महाभाग आहेत हे लोकं.
नुसती भाषा एक असून काय उपयोग, वृत्ती एक असली पाहिजे.
कर्वे गोखले आगरकरांच्या पुरोगामी महाराष्ट्रात संयुक्त महाराष्ट्र चळवळीत लढलेल्या एसएम जोशी, श्रीपाद डांगे, सीडी देशमुख, प्र के अत्रे ह्यांची नावे महाराष्ट्राच्या इतिहासातून आणि सार्वजनिक इतिहासातून कशी पुसली गेली आहेत हे पहा.
ह्यातून खूप काही शिकण्यासारखे आहे . ज्यांना शिकायचे ते शिकले आहेत !
असो.
21 Apr 2025 - 7:00 pm | श्रीगुरुजी
पुन्हा एकदा सरमिसळ झाली. ब्राह्मणद्वेष अनेक शतकांपासून आहे व पुढेही राहील. ब्राह्मणद्वेष सर्वभाषिक करतात. त्यात रामस्वामी नायकर होता, काशीराम होता, कांचा इलैय्या आहे, आव्हाड आहे, पार्थ पोळके आहे, कोकाटे आहे, खेडेकर आहे, देफ सुद्धा आहे, महाराष्ट्रातील अनेक तथाकथित समाजसुधारक होते, अनेक राज्यातील अनेक जण सापडतील.
सांप्रत मुद्दा मराठी भाषेच्या अस्तित्वाचा आहे. मराठीला ठार मारण्याचा प्रयत्न हिंदुत्ववादी करू देत वा निधर्मांध करू देत वा परप्रांतीय करू देत वा मराठी माणसे करू देत, मी विरोधच करणार. मराठीचा बळी देऊन उभारलेले हिंदुराष्ट्र मला नको.
21 Apr 2025 - 7:12 pm | प्रसाद गोडबोले
ह्यात सरमिसळ नाहीच आहे.
मी तुमची गाठभेट सावरकरांना "संडासवीर " म्हणणाऱ्या काही जाज्वल्य मराठी प्रेमी लोकांशी घालून देतो, त्यांना तुम्ही सावरकरांचे मराठी भाषेतील योगदान, सावरकरांच्या कविता, नाटके, महाकाव्ये ह्यांचे महत्व पटवून दाखवा .
घेता का चॅलेंज ? लावता का 100 रुपयाची पैज ?
21 Apr 2025 - 7:30 pm | श्रीगुरुजी
हिंदीची सक्ती केल्याने हे सावरकरांचे कौतुक करणे सुरू करतील? हिंदी महाराष्ट्रातून हद्दपार केली तर हे सावरकरांचे कौतुक करणे सुरू करतील?
ज्यांनी आयुष्यभर फक्त सावरकरद्वेष केला ते कोणत्याही परिस्थितीत द्वेषच करीत राहतील. त्यामुळे तो मुद्दाच नाही येथे.
मूळ मुद्दा विनाकारण पहिलीपासून हिंदी लादणे हा आहे व त्यामुळे मराठीची मृत्यूघंटा वाजली आहे आणि त्या विरोधात सर्व मराठी माणसांनी आवाज उठवायला हवा.
सावरकरद्वेष, ब्राह्मणद्वेष, हिंदुराष्ट्र हे सर्वस्वी वेगळे मुद्दे आहेत व त्या मुद्द्यांची हिंदी सक्ती या मुद्द्याबरोबर सरमिसळ नको.
22 Apr 2025 - 9:06 am | प्रसाद गोडबोले
सरमिसळ नाहीये हो.
तुम्ही मुद्दा लक्षात घेत नाहीये.
जेव्हा पाकिस्तान मधून बांगलादेश स्वतंत्र झाला तेव्हा त्यांचा धर्म विचारधारा एकच होती, ह्यांची बंगाली अस्मिता म्हणून आपल्या देशातील बंगाली काफिरानी त्यांना सहानुभूती दाखविली.
आता बांगलादेश ला दात आलेत तर कसे लगेच काफिरांना पळता भुई थोडी केली आहे पहा =))))
हेच तुम्ही करत आहात.
तुम्ही मराठी मराठी म्हणून ज्यांच्या सोबत जाऊन उभे रहात आहात ना ते लोकं एक ना एक दिवस तुम्हाला "तुमची जागा " दाखवल्या शिवाय राहणार नाहीत बघा.
आम्ही निरीक्षण आणि अनुमानातून धडा घेतो , तुम्ही अनुभवातून शिका.
असो. आता मी काही बोलत नाही.
22 Apr 2025 - 9:50 am | मूकवाचक
मराठीची मृत्यूघंटा वाजली आहे असे गेली कित्येक दशके कानावर पडते आहे. या समस्येमागचे मूळ कारण काही वेगळेच असावे. त्रिभाषा धोरण हा काल परवाचा विषय आहे. हे धोरण रद्द केले तरी मूळ समस्या तशीच राहणार आहे. असो.
22 Apr 2025 - 12:33 am | रामचंद्र
<मराठीचा बळी देऊन उभारलेले हिंदुराष्ट्र मला नको>
गुरुजी, ही खरी आईच्या उपकारांची जाण ठेवणं. आपल्या सहप्रवाशांमध्येही इतकी जाज्वल्य निष्ठा निर्माण व्हावी, ही प्रार्थना.
22 Apr 2025 - 2:55 am | अमरेंद्र बाहुबली
खरे आहे.
21 Apr 2025 - 9:11 am | श्रीगुरुजी
मी सातत्याने हिंदीत बोललो तर हिंदीभाषिक राज्यात माझी स्वीकारार्हता वाढेल, त्यामुळे राष्ट्रीय राजकारणात माझा प्रवेश सुलभ होईल, महाराष्ट्रातील हिंदीभाषिक मलाच मत देतील, मोदी-शहांची माझ्यावर मर्जी राहील, भविष्यात मी पंतप्रधान होईन व मराठी माणसांना हिंदुराष्ट्राच्या स्वप्नात गुंगवून त्यांचा हिंदीविरोध मोडून काढता येईल आणि आपल्या होणाऱ्या नुकसानाची त्यांना जाणीव होणार नाही . . .
ही सर्व आकडेमोड करून व गणित करून हा अत्यंत स्वार्थी, संतापजनक व महाराष्ट्रघातकी निर्णय घेतलाय.
21 Apr 2025 - 10:30 am | अमरेंद्र बाहुबली
+१
21 Apr 2025 - 1:42 pm | कंजूस
पहिले दोन वर्षं ओडिओ कोर्स करून घ्यावा नवीन भाषेचा आणि नंतर लेखन वाचनाला सुरुवात करावी.
यूट्यूबवर आहेत विडिओ. काही साइट्सवर ओडिओसुद्धा आहेत.
21 Apr 2025 - 2:14 pm | श्रीगुरुजी
मुळात समान लिपी व भाषा साधर्म्यामुळे मराठी विद्यार्थिनींंना/विद्यार्थ्यांना अजिबात न शिकताही हिंदी समजू शकते. असे असताना अभ्यासक्रमात हिंदी हा एक सक्तीचा विषय करून त्यांचा वेळ व श्रम वाया जाणार आहेत. त्याऐवजी मराठी व इंग्लिश या दोधच भाषा सक्तीच्या करून संगणक, एखादी कला, एखादे वाद्य, गायन, एखादा खेळ शिकविल्यास खरा लाभ होईल. हिंदी शिकून कोणताही व्यावहारिक लाभ नाही. सर्वात वाईट म्हणजे महाराष्ट्रात आलेले कोणीही मराठी बोलणार नाहीत.
आजच एका विमा प्रतिनिधीने संपर्क केला. तिने प्रारंभ हिंदीतून केला. मला हिंदी येत नाही असे सांगितल्यानंतर तिने बऱ्यापैकी मराठीत बोलून माहिती दिली. पहिलीपासून हिंदी शिकविली तर मराठीची गरजच भासणार नाही.
22 Apr 2025 - 8:56 am | Bhakti
एकदम बरोबर.हिंदी ही मराठीला पर्याय म्हणून वापरली जातेय.आत्ताच थांबवा नाहीतर फक्त हि़दीतच संभाषणाची अघोषित मक्तेदारी वाढेल.
22 Apr 2025 - 9:12 am | श्रीगुरुजी
हिंदीभाषिक राज्ये, तामिळनाडू या राज्यात दोनच भाषा शिकाव्या लागतात. हिंदीभाषिक राज्यात तीन भाषा का अभ्यासक्रमात सक्तीच्या नाहीत? हिंदी न शिकविताही तामिळनाडू इतर राज्यांच्या तुलनेत प्रगत आहे. हिंदी न शिकल्याने त्या राज्याच्या प्रगतीत कोणतेही अडथळे आले नाही.
मग महाराष्ट्रालाच तीन भाषा (त्यातील एक हिंदी) सक्तीने लादण्याचा दुराग्रह का? सर्वानाच हिंदी आले तर मराठी बोलण्याची गरजच काय? हिंदीभाषिक राज्यात तुम्ही गेला तर तेथे मराठी येत नसल्याने व तुम्हाला हिंदी येत असल्याने संभाषण हिंदीत होणार आणि ते जेव्हा महाराष्ट्रात येतात तेव्हा त्यांना मराठी येत नसल्याने व दोघांनाही हिंदी येत असल्याने संभाषण हिंदीतच होणार. मग मराठी शिकायचीच का?
हिंदी शिकली नाही तरी राज्याच्या प्रगतीत बाधा येत नाही. उलट हिंदी राज्यभाषा असलेली राज्ये अजून बरीच मागे आहेत.
विनाकारण हिंदी हा निरूपयोगी विषय शिकण्यात, परीक्षा देण्यात, अभ्यास करण्यात वेळ व्यर्थ घालविण्यापेक्षा हाच वेळ एखादी कला, कौशल्य, क्रीडाप्रकार, दॉइच/फ्रेंच/डच/जपानी अश्यासारखी व्यावहारिक लाभ असलेली भाषा शिकण्यात हा वेळ वापरायला हवा.
22 Apr 2025 - 10:08 am | अमरेंद्र बाहुबली
+१
21 Apr 2025 - 4:14 pm | बेन१०
आगोदरच मराठीचे हिंदीकरण होतच आहे, उदाहरणादखल जसे पंतप्रधानांना "प्रधानमंत्री" म्हणणे (गेल्या काही वर्षांतले राजकारण्यांचे व्हिडीओज् पाहिल्यास लक्षात येईल).
मराठी बातमीदारांचे विशेष वाईट झाले आहे : निवडणूक निकालांवेळी वेळा "चुरशीची लढत" ऐवजी "कांटे की टक्कर" ऐकायला मिळतं इतरही अनेक उदाहरणे आहेत.
असो, या असल्या भिकार निर्णयामुळे आपण पायावर धोंडा मारुन घेत आहोत.
21 Apr 2025 - 4:35 pm | श्रीगुरुजी
घर "खाली" करायला सांगितलंय, त्यांनी असा "सवाल" केलाय हे तर सातत्याने कानावर पडतंय.
महाराष्ट्र बँकेच्या कर्मचाऱ्यांनी शनिपार चौकात फलक घेऊन आंदोलन केले तेव्हा "*** तुम आगे बढो, हम तुम्हारे साथ है", "*** तुम संघर्ष करो", "सरकार हमसे डरती है" अश्या घोषणा फलकांवर होत्या.
22 Apr 2025 - 12:50 am | कंजूस
पंढरीनाथ महाराज की जय.
22 Apr 2025 - 12:04 pm | कानडाऊ योगेशु
उदाहरणादखल जसे पंतप्रधानांना "प्रधानमंत्री" म्हणणे
त्याच बरोबर अतिरेक्यांना आतंकवादी असे म्हणणे.
दुसरा चीड आणणारा वाक्यप्रयोग म्हणजे मला त्याचा गर्व आहे हा.अभिमान च्या जागी सर्रास गर्व हा शब्द वापरला जातो.
त्याला मदत कर असे योग्य वाक्य आहे आणि हिंदीकरणामुळे त्याची मदत कर असे बदलले जाते. आता तर माझाही गोंधळ उडतो कि नक्की कुठला वाक्यप्रयोग बरोबर आहे.
सुमार मालिका आणि मराठी चित्रपटांमध्ये अशी भेसळ फार प्रमाणात दिसुन येते आहे.
आपली पिढी प्रथम भाषा मराठी असल्याने काही प्रमाणात तरी ह्या बाबती जागरुक आहे पण नंतरच्या पिढीची मराठी ही फक्त घरापुरती बोलली जाणारी भाषा (जर पालक आंग्लाळलेले नसतील तर ) उरल्याने असेच प्रकार कालांतराने रुळले जातील.
21 Apr 2025 - 4:29 pm | अमरेंद्र बाहुबली
भाजप हे करणार हे वाटलेच होते, प्रादेशिक पक्ष ताकदवान असणे का महत्वाचे असते ते ह्यावरून कळते.
21 Apr 2025 - 4:38 pm | श्रीगुरुजी
या मुद्द्यावर महाराष्ट्रातले सर्व प्रादेशिक पक्ष, सर्व प्रादेशिक नेते भाजपइतकेच भिकारचोट आहेत. कोणीही अपवाद नाही.
21 Apr 2025 - 5:14 pm | मारवा
आदित्य उद्धव ठाकरे Bombay Scottish School या मराठी माध्यमाच्या प्रख्यात शाळेत शिकलेले आहेत.
हे वाचून उर अभिमानाने भरून आला.
राज ठाकरे यांचे चिरंजीव अमित ठाकरे कुठल्या शाळेत शिकले आहेत
कोणास ठाऊक आहे का ?
कळले तर उरलेला ऊर भरून घ्यायला किंवा बडवायला
मदत होईल
22 Apr 2025 - 12:49 pm | माईसाहेब कुरसूंदीकर
राज ठाकरे ह्यांची मुले बाँबे स्कॉटिशमधेच शिकली आहेत. आपली वस्ताद मीडिया/वर्तमानपत्रे अशी खाजगी नाहिती देत नाहीत पण ती अमराठी मीडियात येतेच.
https://timesofindia.indiatimes.com/city/mumbai/now-miscreants-target-th...
एकदा ह्यांच्या काकांना 'मराठीचा मुद्दा का घेतलात?" असा प्रश्न विचारल्यावर "तरूणांना सतत कोणता ना कोणता मुद्दा द्यावा लागतो. त्यांना सतत भडकावत ठेवणे गरजेचे असते" असे उत्तर दिले होते.
१२ कोटी लोकांना त्यांची भाषा सांभाळण्यासाठी राजकीय पुढार्याची गरज लागते हेच आधी लज्जास्पद आहे. तसेच "तू माझी मात्रुभाषा का शिकत नाहीस?" असे विचारणे म्हणजे मातृभाषेचाच अपमान आहे असे वाटते. "मला अण्णा ऐवजी अण्णासाहेब का म्हणत नाहीस?" विचारण्यासारखे आहे.
22 Apr 2025 - 1:38 pm | कर्नलतपस्वी
+१