अवडंबर म्हणजे काय ? ते कसे थांबवणार?

उपयोजक's picture
उपयोजक in काथ्याकूट
22 Dec 2024 - 9:06 pm
गाभा: 

https://www.misalpav.com/node/41837
हा धागा वाचनात आला. यातल्या काही मुद्द्यांना अजून उजाळा मिळून त्याबद्दल अधिक स्पष्टता यावी यासाठी हा धागा.

सदर धाग्यात प्रामुख्याने देवावर श्रद्धा असणार्‍यांच्या श्रद्धेबद्दल विज्ञानवाद्यांना काय त्रास आहे असे विचारले आहे. माझ्या मते खर्‍या विज्ञानवाद्यांना देवावर श्रद्धा असणे याचा त्रास होत नसावा. तर त्या श्रद्धेमागून बर्‍याचदा येणार्‍या धार्मिक अवडंबराचा होत असावा. आता अवडंबर कशाला म्हणायचं ही व्याख्या प्रत्येकाची निरनिराळी असू शकेल.

देवश्रद्धाळू लोक हे जे काही करतात त्यामागे बहुतांशवेळी त्यांच्या जीवनातील समस्या समूळ नष्ट व्हाव्यात किंवा निदान सौम्य तरी व्हाव्यात हा उद्देश असतो.

तर तुमच्या मते हिंदूधर्मात देवावरील श्रद्धा व्यक्त करणं यासाठी काय काय करणं हे योग्य आहे ?

देवावरील श्रद्धा व्यक्त करताना हिंदू लोक जे जे काही करतात त्यातले तुम्हाला काय काय खटकते? हे अगदी बेसिकपासून म्हणजे देवाच्या मुर्ती/तसबिरीसमोर हात जोडणे , फूल वाहणे यापासून ते प्रसिद्ध देवस्थानाला कोट्यावधी रुपयांचे दागिने/वस्त्रे दान करणे किंवा थेट रक्कम दान देणे , जमीन देणे , मोफत बांधकाम करुन देणे अशा अगदी वरच्या टोकापर्यंत असू शकते.

अशाच प्रकारे हातात वेगवेगळ्या अंगठ्या घालणं , धागे बांधणं , देवांची स्तोत्रे , अध्याय वाचणे , भजने म्हणणे , व्रतवैकल्ये करणे , पवित्र तिथीला उपवास करणे , वास्तूशास्त्रानुसार घराच्या रचनेत बदल करणं , घरच बदलणं असं बरंच काही असू शकतं.

या विस्तृत रेंजमधे लोकांनी कुठे थांबावे ? मर्यादा कुठपर्यंत असावी असे तुम्हाला वाटते? आणि तसे का वाटते?

अवडंबराची व्याख्या तुम्ही कशी करता?

याला जोडून दुसरा प्रश्न असा की जिथून पुढचं तुम्हाला खटकतं ते खटकणारे(तुमच्या मते अवडंबर) थांबवण्यासाठी तुम्ही काय करता? आतापर्यंत तसे प्रयत्न करताना सांगण्यासारखे काही अनुभव आहेत का? घरातलाच एखादा सदस्य असा असेल तर तुम्ही त्याचे ते अवडंबर थांबवायला जमले का? काय केलेत ते थांबवण्यासाठी ?

(नोंद : वरील यादीतून खूप शारीरीक त्रास , खूप मानसिक त्रास देणार्‍या गोष्टी जसे की तंत्रविद्या , जादूटोणा या गोष्टी हानिकारकच असल्याने त्या यादीत टाळल्या आहेत.)

प्रतिक्रिया

परिस्थितीला, संकटाला थेट समोरून तोंड देणे, कर्तव्य पार पाडणे इत्यादि कामांसाठी जे काही करावे लागते त्यात अडथळा अथवा विलंब होऊ शकेल इतपत कर्मकांड किंवा श्रद्धेपायी केलेली रिच्युअल्स जास्त होऊ लागली तर ते अवडंबर. जर जाता जाता सहज काही प्रार्थना, कृती, पूजा, स्मरण वगैरे करून या कामात मानसिक सहाय्य होत असेल तर चांगलेच.

जितके होईल तितके आलेल्या गोष्टींना समोरून तोंड द्यावे हे उत्तम. इतर कोणत्याही थेट संबंधित नसलेल्या कृती या केवळ मानसिक समाधानापुरत्या आहेत हे मनाशी कुठेतरी जाणून असावे.

जितके होईल तितके जास्त लक्ष आणि ताकद मूळ संकट किंवा परिस्थितीकडे केंद्रित करावी .. कारण त्याला नाईलाज असतो.
शेवटी खुद्द घेतलेले निर्णय आणि थेट कृती यांनीच समस्या सुटण्याची त्यातल्या त्यात शक्यता असते.
उदा.
एखादे सहज उपलब्ध फूल पान देवाला मनापासून वाहणे पुरेसे. विशिष्ट दिवशीच विशिष्ट फुलांची विशिष्ट संख्याच असली पाहिजे हे अवडंबर म्हणता येईल.

योग्य उदाहरण..

वामन देशमुख's picture

23 Dec 2024 - 2:25 am | वामन देशमुख

तुमच्या मते हिंदूधर्मात देवावरील श्रद्धा व्यक्त करणं यासाठी काय काय करणं हे योग्य आहे ?

देवावरील श्रद्धा व्यक्त करताना हिंदू लोक जे जे काही करतात त्यातले तुम्हाला काय काय खटकते?

Exclusively हिंदू देवावरील श्रद्धेवरच प्रश्नचिन्ह उभे करण्याचे काय कारण आहे?
("त्यांया"बद्दल का बोलत नाहीत असं माझं म्हणणं नाही) तुम्ही स्वतः specifically लिहिले आहे म्हणून विचारत आहे.

- (Open minded) द्येस्मुक् राव

उपयोजक's picture

23 Dec 2024 - 9:31 am | उपयोजक

माझ्या धर्माबद्दल आस्था आणि त्यातल्या खटकणार्‍या अशा दोन्ही गोष्टींबद्दल बोलण्याचा अधिकार मला असलाच पाहिजे. बाकीच्या धर्मांचा सार्वजनिक जीवनात त्रास होत असेल तर तिथेही मी बोलतोच.

वामन देशमुख's picture

23 Dec 2024 - 11:45 am | वामन देशमुख

सहमत

माझ्या धर्माबद्दल आस्था आणि त्यातल्या खटकणार्‍या अशा दोन्ही गोष्टींबद्दल बोलण्याचा अधिकार मला असलाच पाहिजे.

तसं असेल तर तुम्ही हिंदू आहात हे इथे मिसळपाववर सिद्ध करण्याची जबाबदारी तुमची आहे असे मला वाटते.‌

सदर धाग्याच्या सुरुवातीला तुम्ही दिलेल्या त्या दुसऱ्या लेखावरील प्रतिसादांमध्ये, "जोपर्यंत एखादी गोष्ट खरी आहे असे निर्विवादपणे सिद्ध होत नाही, तोपर्यंत तिच्या खरेपणा शंकास्पद राहतो" असा एक मतप्रवाह आहे.‌

हा तर्क बरोबर आहे असं म्हणायला हवं, नाही का?
थोडक्यात तुम्ही हिंदू आहात हे इथे मिसळपाववर निर्विवादपणे सिद्ध होईपर्यंत, "तुम्ही हिंदू नाहीत" असं, किमान "तुम्ही हिंदू आहात की नाही याबद्दल खात्रीने काही सांगता येत नाही" असे गृहीत धरू यात का?

प्रतिसादाच्या प्रतीक्षेत...

वामन देशमुख's picture

27 Dec 2024 - 1:57 pm | वामन देशमुख

सदर धागालेखक आपण हिंदू असल्याचा दावा करतो आणि हिंदूंच्या श्रद्धास्थानावर चिखलफेक करतो.

संपादक मंडळाला विनंती की सदर धागा अप्रकाशित करावा.

Nitin Palkar's picture

23 Dec 2024 - 8:14 am | Nitin Palkar

अवडंबराची व्याख्या करणे कठीण आहे.

माझ्या घरात पूर्वापार असलेला देव्हारा आहे, ज्यात मोजक्याच देवांच्या मूर्ती/मूर्त्या आहेत. रोज सकाळी अंघोळ झाल्यावर त्यांची पूजा करणे हे अंगवळणी पडलेले कर्तव्य आहे. वेळेअभावी कधी पूजा करणे न जमल्यास माझी पत्नी पूजा करते पण देवपूजा कधीही चुकत नाही.

दिवे लागणीच्या वेळेस पत्नीच देवाजवळ दिवा लावते व शुभं करोति म्हणते. मी घरी असल्यास तिच्या जोडीने मी सुद्धा म्हणतो, देवाला नमस्कार करतो.

या अंगवळणी पडलेल्या सवयी आहेत. यात मला स्वतःला कसलेही अवडंबर आहे असे वाटत नाही.

दर मंगळवारी साधारणपणे पत्नी गणपतीच्या देवळात जाते. या सर्व बाबतीत आम्हाला कसलेही अवडंबर आहे असे वाटत नाही.

परंतू हे व्यक्ती सापेक्ष आहे. एखाद्याला हे देखिल अवडंबर वाटू शकेल...

उपयोजक's picture

23 Dec 2024 - 9:35 am | उपयोजक

हे अगदी प्राथमिक आहे. कोणासही त्रास न देणारे. त्यामुळे स्विकारार्ह आहे.

पण एक एखाद्या घरात नोकरीसाठी जाणारी काही लोक असतील आणि त्यातले काही घरातच बसणार आहे असे निवृत्त लोक असतील तर निवृत्त लोक अंघोळ वगैरे आधी करून घेतात. कारण त्यांना देवपूजा करायची असते. वास्तविक कामाला जाणाऱ्या माणसाला तो प्राधान्यक्रम मिळायला हवा. पण मी देवपूजा करतो , मला अध्याय वाचायचे असतात किंवा देवाचे काही उपचार करायचे असतात. त्यामुळे पहिला हक्क माझा. आपण देवाचं काही करतो म्हणजे मला काहीतरी स्पेशल स्टेटस मिळालंच पाहिजे अशी अपेक्षा असते. मला आहे. अवडंबर वाटतं.

कर्नलतपस्वी's picture

23 Dec 2024 - 9:46 am | कर्नलतपस्वी

आपण देवाचं काही करतो म्हणजे मला काहीतरी स्पेशल स्टेटस मिळालंच पाहिजे अशी अपेक्षा असते. मला आहे. अवडंबर वाटतं.

सर्व साधारण पणे असा हट्ट कुणी करत नाही
शाळेत जाणारे,नोकरदार यांना घरात प्राधान्य असतेच.

चंद्रसूर्यकुमार's picture

23 Dec 2024 - 9:58 am | चंद्रसूर्यकुमार

याचा देवपूजा किंवा तत्सम तथाकथित अवडंबराशी काही संबंध असेल असे नाही. वय वाढते त्याप्रमाणे काही व्यक्ती अधिक हेकट बनत जातात आणि प्रत्येक ठिकाणी आपले म्हणणे खरे करायला जातात. त्याचाही अशा वर्तणुकीशी संबंध असू शकेल. जो हेकटपणा सगळीकडे असे लोक चालवतात तोच देवपूजेच्या बाबतीतही चालवत असतील ही शक्यता आहे.

उपयोजक's picture

23 Dec 2024 - 10:21 am | उपयोजक

शक्यता आहे.

चित्रगुप्त's picture

24 Dec 2024 - 6:42 am | चित्रगुप्त

वास्तविक कामाला जाणाऱ्या माणसाला तो प्राधान्यक्रम मिळायला हवा.

हल्ली बरी परिस्थिती असलेल्यांच्या घरात दोन-तीन न्हाणीघरे असतात. वृद्ध मंडळींसाठी वेगळी खोली आणि न्हाणीघर असते, अश्या परिस्थितीत त्यांनी अगदी पहाटे चार-पाच वाजता जरी प्रातःकर्मे उरकली तर त्यात कुणाची गैरसोय होणार आहे ?
अगदी लहान घर, त्यात एकच न्हाणीघर असे असेल तर गोष्ट वेगळी. बहुतेक वृद्ध मंडळींची झोप कमी झालेली असते आणि त्यांना अगदी लवकर उठायची सवय पण असते. एकदा उठले की जास्त वेळ 'पारोसे' रहाणे त्रासदायक वाटते, असे अनेक पैलू यात आहे.

कर्नलतपस्वी's picture

23 Dec 2024 - 9:28 am | कर्नलतपस्वी

आपल्याशी शतप्रतिशत सहमत. या सर्व गोष्टी बहुतेक घरातून दिसून येतील.

लग्न झाल्यावर गोंधळ/भराड घालणं ही परंपरा. पण तो गोंधळ घालताना डिजे वापरून रात्रभर आख्या वस्तीला वेठीस धरणे म्हणजे आवडंबर....

मूकवाचक's picture

23 Dec 2024 - 9:50 am | मूकवाचक

अवडंबर म्हणजे काय - व्याख्या व्यक्तिसापेक्ष असणे साहजिक आहे. या बाबतीत दोन व्यक्तींचे एकमत होणे देखील दुरापास्त आहे.

ते कसे थांबवणार - सामाजीक उपद्रव थांबवण्यसाठी कायदे आहेत/ असावेत. आपापल्या आनंदासाठी स्वखर्चाने कुणीही काहीही करत असेल, जोवर ती गोष्ट निरूपद्रवी आहे, त्यात कुणाचे शोषण नाही की कुणावर अन्याय नाही ती थांबवणे अनावश्यक आहे.

तळटीप - अवडंबराचा परिघ श्रद्धा आणि धर्मापुरताच मर्यादित नसतो. असो.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

23 Dec 2024 - 10:14 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

देवाळु लोकांना असे वाट्त असतं की, आपल्या जीवनात अधिक सुख, अधिक आनंद, अधिक ऐश्वर्य, अधिक मुलं-बाळं, अधिक मानसिक समाधान... अधिक अधिक आणि अधिक इश्वरकृपेनेच मिळते- मिळावे आणि आपल्या जीवनात येणारी सर्व प्रकारची संकटे, आजार वगैरे दूर व्हावीत यासाठी निमित्ताने येणा-या पूजाअर्चा, प्रार्थना,श्लोक, अष्टक, उपवास, तंत्र-मंत्र, वगैरे हे सर्व घरात असतं आणि जो पर्यंत इतरांना कोणाला त्रास होत नाही तो पर्यंत हे सर्व बरं वाटतं आणि जेव्हा हे अधिक प्रमाणात होतं तेव्हा अवडंबराची सुरुवात होते असं वाटतं.

-दिलीप बिरुटे

चौथा कोनाडा's picture

23 Dec 2024 - 10:42 am | चौथा कोनाडा

अवडंबर म्हण्जे मार्केटींग ... अ‍ॅग्रेसिव्ह मार्केटींग ... हॅमरींग मार्केटींग ...

स्वतःचा ब्रॅण्ड टिकवण्यासाठी केलेलं मार्केटींग !
देवा धर्माच्या नावाखाली प्रलोभनं दाखवून, भिती दाखवुन केलेलं मार्केटींग !
स्वतःचे चेले जमवून, शक्ती खर्च करून प्रसंगी पैसे खर्च करून केलेलं अवडंबर !
जयंत्या, प्रकटदिन, पुण्यतिथ्या, सोहळे, पादुका पुजन, भोजनं, यज्ञ, याग करुन केलेलें अवडंबर !

अवडंबर अर्थात मार्केटींग .. कसं थांबवणार ?
शक्यच नाही थांबवणं .... कारण काही विशिष्ट लोकांची अन सामन्यजनांची ती गरज आहे, शारिरिक, मानसिक, सामाजिक, राजकिय, धार्मिक, अध्यात्मिक इ इ ! शतकानुशतके हे सुरु आहे, सुरु राहणार !

अवडंबर चालूच राहणार,
............. चालूच राहणार,
.................... राहणारच !

विजुभाऊ's picture

23 Dec 2024 - 1:24 pm | विजुभाऊ

१००००% सहमत
मी करतो तेच बरोबर आहे म्हणत दैवतांबद्दल काहितरी अनावश्यवक रुढी निर्माण करणे आणि लोकाना त्याचे पालन करण्याचा दुराग्रह म्हणजे अवडंबर.
दुसरे हे की एखादी रुढी का निर्मान झाली याची कारणमिमांसा टाळणॅ म्हणजे अवडम्बर

उपयोजक's picture

23 Dec 2024 - 2:02 pm | उपयोजक

सहमत

श्रीगुरुजी's picture

23 Dec 2024 - 2:12 pm | श्रीगुरुजी

दैवतांबद्दल काहितरी अनावश्यवक रुढी निर्माण करणे आणि लोकाना त्याचे पालन करण्याचा दुराग्रह म्हणजे अवडंबर.

एखादी पूजा करताना भटजी दर दोन मिनिटांनी पळीभर पाणी सोडा, आचमन करा असे सांगतात: डोक्यावर टोपी असलीच पाहिजे अशी सक्ती करतात, वास्तुशांत करताना गृहप्रवेशावेळी आधी उजवे पाऊल आत टाका असे सांगतात, अनेक मंदिरात प्रवेशावेळी डोके झाकले असले पाहिजे अशी सक्ती असते, काही ठिकाणी पुरूषांनी मंदिरात प्रवेश करताना व जेवताना उघडे असलेच पाहिजे अशी सक्ती करतात, केरळमध्ये पद्मनाभ मंदिरात लुंगीची सक्ती करतात, मुलींनी चुडीदार घातलेले चालत नाही पण पंजाबी सलवार चालते, विवाहप्रसंगी कन्यादान हा शब्द हीन नसून त्यात गहन अर्थ असल्याने तो शब्द म्हणण्याची सक्ती करतात . . . हे सर्व अवडंबराचे विविध प्रकार.

श्रीगुरुजी's picture

23 Dec 2024 - 2:26 pm | श्रीगुरुजी

दक्षिणेतील काही मंदिरात अंतर्वस्त्र दिसेल इतकी लुंगी वर केलेल्या उघडेबंब पुरूषांना प्रवेश आहे कारण नियमाप्रमाणे कंबरेखाली लुंगी आहे, परंतु अर्धी किंवा तीन चतुर्थांश विजार परीधान केलेल्यांना प्रवेश नाही. आपल्या मंदिराचे महत्त्व वाढविण्यासाठी काहीतरी फालतू पद्धत सक्तीची करणे म्हणजेच अवडंबर माजविणे.

चंद्रसूर्यकुमार's picture

23 Dec 2024 - 10:43 am | चंद्रसूर्यकुमार

माझ्या मते खर्‍या विज्ञानवाद्यांना देवावर श्रद्धा असणे याचा त्रास होत नसावा.

आता या निमित्ताने खरा विज्ञानवादी कोण आणि खोटा विज्ञानवादी कोण अशीही चर्चा सुरू करता येऊ शकेल :)

माझा अनुभव या बाबतीत पूर्ण उलटा आहे. तो माझा अनुभव आहे त्यामुळे कितपण प्रातिनिधिक आहे याची कल्पना नाही. माझ्या परिचयातील बहुसंख्य विज्ञानवादी व्यक्ती श्रध्दा हा शब्द ऐकला तरी अंगावर पाल पडल्यासारखे करतात आणि अगदी आक्रमक होऊन समोरच्याला मूर्ख म्हणून लगेच मोकळे होतात. तुम्ही वर दिलेल्या धाग्यातही त्याचे प्रत्यंतर येतेच. असल्या लोकांच्या तोंडी लागण्यात अर्थ नसतो हे अनुभवांती समजले आहे.

तर तुमच्या मते हिंदूधर्मात देवावरील श्रद्धा व्यक्त करणं यासाठी काय काय करणं हे योग्य आहे ?

काही कल्पना नाही बुवा. मुळात मनातून सश्रध्द असले तरी पुरेसे असावे असे मला तरी वाटते. अमुक एक गोष्ट योग्य की अयोग्य हे ज्याने त्याने आपल्या पातळीला ठरवावे.

देवावरील श्रद्धा व्यक्त करताना हिंदू लोक जे जे काही करतात त्यातले तुम्हाला काय काय खटकते?

इन जनरल पब्लिक न्युजन्स होईल अशी कोणतीही गोष्ट मला तरी खटकते. पण पब्लिक न्युजन्स कोणत्याही कारणामुळे होऊ शकतो. देवावरील श्रध्दा व्यक्त करतानाच तो होऊ शकतो असे नाही. गणपतीत जसा धांगडधिंगा आणि लाऊडस्पीकरवर बोंबलणे चालते तसे स्थानिक नगरसेवकाच्या वाढदिवसालाही होणार नाहीच याची काय खात्री आहे?

या विस्तृत रेंजमधे लोकांनी कुठे थांबावे ? मर्यादा कुठपर्यंत असावी असे तुम्हाला वाटते? आणि तसे का वाटते?

मला माझी मर्यादा कुठपर्यंत आहे हे माहित आहे. पण माझी जी काही मर्यादा आहे तीच इतरांचीही असावी असा अट्टाहास नक्कीच नाही. त्यामुळे 'तू अमुक कर आणि तमुक करू नकोस' असले इतरांना सांगायला मी तरी जात नाही. आणि तसे का वाटते असा विचार मी अजून तरी केलेला नाही. भविष्यातही करेन असे आता तरी वाटत नाही.

अवडंबराची व्याख्या तुम्ही कशी करता?

यात इतर लोक अवडंबराची व्याख्या करत असतात/असतील हे गृहितक झाले. मी मुळात असल्या व्याख्या जाणीवपूर्वक करायलाच जात नाही. जर का एखादी गोष्ट खटकत असेल त्यावरून नकळतपणे तशी व्याख्या केली जात असली तर कल्पना नाही.

याला जोडून दुसरा प्रश्न असा की जिथून पुढचं तुम्हाला खटकतं ते खटकणारे(तुमच्या मते अवडंबर) थांबवण्यासाठी तुम्ही काय करता?

एखादी गोष्ट खटकत असेल तर ते अवडंबर असेल तर वर म्हटल्याप्रमाणे कोणत्याही कारणाने होणारा पब्लिक न्युजन्स मला तरी खटकतो. तरीही ते थांबविण्यासाठी मी तरी काहीही करत नाही. असा पब्लिक न्युजन्स वर्षभर कुठेनाकुठे कोणत्या ना कोणत्या कारणाने चालू असतो म्हणून अनेकांची (मांडववाले, टेबल खुर्च्यावाले, ढोलताशेवाले, लाऊडस्पीकर वाले वगैरे अनेक वाले तसेच इलेक्ट्रिशिअन्स, दुकानदार वगैरे) पोटं भरतात हे पण खरंच. जशी लग्नात भरपूर खर्च केला जातो ती व्यर्थ उधळपट्टी आहे असे अनेकांना वाटते पण त्यातून अनेकांची नोकरी-व्यवसायाची सोय होते आणि ती एक 'सिंबायोटिक इकॉनॉमी' आहे तसेच याविषयीही. एक सुशिक्षित मध्यमवर्गीय पांढरपेशा व्यक्ती म्हणून आपल्याला खटकतात नेमक्या त्याच गोष्टींमुळे कितीतरी लोकांची पोटे भरली जात असतात हे आपल्या आजूबाजूला होत असलेले जाणवेलच. समजा त्या गोष्टी आवडत नसल्या तरी बंद करायला गेल्यास संबंधित लोकांची पोटं भरायचा दुसरा कोणता कार्यक्रम आपल्याकडे आहे का? नसेल तर इतर कोणाला 'तू हे कर आणि ते करू नकोस' असे सांगायला न जाणेच इष्ट.

घरातलाच एखादा सदस्य असा असेल तर तुम्ही त्याचे ते अवडंबर थांबवायला जमले का? काय केलेत ते थांबवण्यासाठी ?

अगदी घरात नाही तरी नात्यात असे काही लोक आहेत. कधीही भेटल्यावर कोणत्यातरी देवाचा फोटो गळ्यात मारणारे- दरवेळेस नवा फोटो देताना तो फोटो पाकिटात ठेव, चांगले होईल असा सल्ला देणारे. एक तर मला स्वतःला असल्या फोटोंमध्ये अजिबात रस नसतो. पाकिटात ते फोटो ठेवायलाही आवडत नाही. पण नातेवाईकांचे मन मोडायला नको म्हणून ते फोटो घेतो आणि घरी आल्यावर बायकोला देतो. ती बघते काय करायचे त्या फोटोंचे? :)

मुक्त विहारि's picture

23 Dec 2024 - 12:21 pm | मुक्त विहारि

मस्त प्रतिसाद

उपयोजक's picture

23 Dec 2024 - 2:15 pm | उपयोजक

काही मुद्दे पटण्यासारखेच आहेत.

मूकवाचक's picture

23 Dec 2024 - 12:04 pm | मूकवाचक

अवडंबर माजवणे हा प्रकार फक्त आचारत नव्हे, तर विचारात देखील असतो.

आपण सर्वसामान्य, कुणाच्या खिजगणतीत नसलेल्या व्यक्ती आहोत हे मान्य नसणारे लोक मोठमोठी बिरूदे लावत वैचारिक अवडंबर माजवतात. ते देखील इतरेजनांना तापदायक आणि उबगवाणे असू शकते/ असते.

चौथा कोनाडा's picture

23 Dec 2024 - 10:41 pm | चौथा कोनाडा

पु लं यांच्या तुज आहे तुजपाशी मधले आचर्य हे पात्र आठवले.

आंद्रे वडापाव's picture

23 Dec 2024 - 12:42 pm | आंद्रे वडापाव

हा खरा धर्म.

d

बाकी सर्व अवडंबर ..

कंजूस's picture

23 Dec 2024 - 1:50 pm | कंजूस

ज्याचा त्याचा प्रश्न.

आंद्रे वडापाव's picture

23 Dec 2024 - 11:01 pm | आंद्रे वडापाव

A

चौथा कोनाडा's picture

24 Dec 2024 - 10:16 pm | चौथा कोनाडा

छान .. आवडले चित्र .. निरागस बालक आणि मायेने स्पर्शणारे प्रेमळ आजोबा !

मुक्त विहारि's picture

24 Dec 2024 - 10:51 pm | मुक्त विहारि

कुमरिका पूजन...

सुबोध खरे's picture

25 Dec 2024 - 9:29 am | सुबोध खरे

हायला

मला वाटलं हा "निर्भय बनो" चा आवस मागणाऱ्या अवडंबर चौधरी बद्दल लेख आहे !

असो

आपल्याला वाटणारे आवश्यक कर्मकांड हे दुसऱ्याच्या दृष्टीने अवडंबर असू शकते. उदा. घरातून निघताना देवाला केलेला नमस्कार हा सुद्धा एखाद्या नास्तिकाच्या दृष्टीने अवडंबर असू शकते.
भले त्याला त्याचा काहीही त्रास नाही.

श्रीगुरुजी's picture

27 Dec 2024 - 2:52 pm | श्रीगुरुजी

अवडंबर म्हणजे काय या प्रश्नाचे GROK ने दिलेले उत्तर -

अवडंबर हा शब्द मराठी भाषेत वापरला जातो आणि त्याचा अर्थ "अनावश्यक गोंधळ" किंवा "अतिरिक्त किंवा अनावश्यक व्याप" असा होतो. हा शब्द वापरला जातो जेव्हा एखादी गोष्ट फार जास्त महत्त्व देऊन किंवा अवाजवी प्रमाणात करण्यात येते, ज्यामुळे ती गोष्ट अनावश्यकपणे गुंतागुंतीची किंवा क्लिष्ट होते.

अवडंबराची काही उदाहरणे अशी आहेत:

लग्न समारंभ - एखाद्या लग्न समारंभात जर खूप जास्त प्रकारचे कार्यक्रम, नाचगाणी, भाषणे, वेषभूषा बदलणे इत्यादी असतील, तर हे अवडंबराचे उदाहरण म्हणता येईल.

बैठकीचे आयोजन - एका साध्या बैठकीसाठी जर अनेक अनावश्यक प्रोटोकॉल, स्वागत समारंभ, अतिरिक्त प्रेझेंटेशन्स, विशेष पाहुणे इत्यादी असतील, तर ते अवडंबर म्हणता येईल.

परीक्षेची तयारी - विद्यार्थ्याने परीक्षेच्या तयारीसाठी अनेक अनावश्यक पुस्तके, नोट्स, ऑनलाइन कोर्सेस घेतले, पण मूलभूत संकल्पना न शिकताच त्यावर खूप वेळ घालवला.

सणांचे साजरेपण - एखाद्या सणाच्या निमित्ताने घर सजवणे, खर्च करणे, जास्त जास्त पदार्थ बनवणे किंवा खरेदी करणे या गोष्टींचा अतिरेक झाला तर ते अवडंबर म्हणता येईल.

मुक्त विहारि's picture

27 Dec 2024 - 3:21 pm | मुक्त विहारि

प्रतिसाद आवडला..