परीक्षा ..... परीक्षा ... कोणा एकाच्या मृत्यूनंतरच संपणारी परीक्षा !!

kvponkshe's picture
kvponkshe in काथ्याकूट
6 Dec 2024 - 11:23 pm
गाभा: 

मनातलं फक्त तुमच्याशी सामायीक करतोय. सगळ्यांना हे पटेल किंवा ते मान्य करावे असा आग्रह नाही. नाही पटलं तर दुर्लक्ष करून स्क्रोल डाउन करा ....

लग्नानंतर पहिले अपत्य होणे हा परमोच्च आनंदाचा क्षण असतो. पण सगळी जोडपी अशी भाग्यवान नसतात. काहीना मूल जन्माला यायच्या आधीच कल्पना असते की आपले मूल सर्व सामान्य नसणार आहे. किंवा काही केसेस मध्ये ते दोन किंवा तीन वर्षांनी समजते.

मग सुरु होते ती जन्मभराची अग्नी परीक्षा ! त्या जोडप्याची .... त्या मुलाची ....

काही वर्षे गेली की त्या जोडप्याला काळजी लागून राहते की आपल्यानंतर याचे / हिचे कोण करणार .... मग दुसरा चान्स घेण्याचा विचार सुरु होतो ... पुन्हा त्या जोडप्याच्या मनात काळजी ... दुसरे अपत्य सुद्धा असेच जन्मले तर ?

.. मग पॉसिटीव्ह थिंकिंग वगैरे संकल्पनांच्यावर भरवसा ठेऊन काही जोडपी दुसरा चान्स घेतात.... काही घेत नाहीत ...

क्वचित प्रसंगी मूल पुन्हा तसेच जन्मते ....

बऱ्याच प्रसंगी दुसरे अपत्य नॉर्मल असते ....

मग त्या दुसऱ्या अपत्याला असेच डिझाईन केले जाते की तुझा भाऊ / बहीण याला सांभाळणे हीच तूझी प्राथमिक जबाबदारी ....

तुला त्याच साठी जन्मास घातलय....

आणि मग नियतीच्या परीक्षार्थींमध्ये भर पडते ती त्या दुसऱ्या अपत्याची ....

परीक्षा ..... परीक्षा ... कोणा एकाच्या मृत्यूनंतरच संपणारी परीक्षा !!

कौस्तुभ पोंक्षे

प्रतिक्रिया

अमरेंद्र बाहुबली's picture

7 Dec 2024 - 1:23 am | अमरेंद्र बाहुबली

कौस्तुभ सर तुम्हाला भेटलो आहे नी तुम्ही कुठल्या परिस्थितीत लढत आहात ह्याची पूर्ण जाणीव आहे. पण खरे सांगतो देवाने तुमच्या सारखा एक खंबीर माणूस मुद्दामहून ह्या ठिकाणी दिलाय जो परिस्थितीशी लढू शकतो. सगळ्यांनाच जमेल असे हे काम नाहीये. तुम्हाला नी कुटुंबाला देव शक्ती नी स्वास्थ्य देवो हीच ईश्वरचरणी प्रार्थना.

कर्नलतपस्वी's picture

7 Dec 2024 - 4:40 am | कर्नलतपस्वी

अतिशय मोजक्याच शब्दात मांडलेली व्यथा,वेदना माझ्यापर्यंत पोहचली. इतर वाचकांपर्यंत सुद्धा नक्कीच पोहोचेल.

नातेवाईकांमधे,मित्र परिवारात अशा घटना जरूर दिसतात. माझ्याच एका अगदीच जवळच्या कुटुंबातील तरूण जोडपे अगदी अशाच परिस्थितीला तोंड देत आहे. त्यांची होणारी घालमेल, घुसमट कदाचित फरफट म्हटल्यास चुक ठरणार नाही. तसेच त्यांच्याबरोबर नाही म्हणले तरी निगडीत नातेवाईक आजी,आजोबा यांनाही झळ लागतेच आहे.पहिले अपत्य सर्व सामान्य नाही म्हणून पुन्हा प्रयत्न केला. जुळे अपत्य झाले. बरेच वर्ष संसार झाल्याने एक प्रकारे ॲक्सेपट्न्स आले आहे. पण,

उषःकाल होता होता काळरात्र झाली,
अरे पुन्हा आयुष्याच्या पेटवा मशाली

अशीच परिस्थिती आहे.

दुसरे एक दांपत्य अशीच लढाई लढत आहे पण थोड्या वेगळ्या पद्धतीने. पहिले अपत्य दिव्यांग उपजल्यावर त्याच्या आईने अशा मुलांचे कसे संगोपन करायचे याबद्दल प्रशिक्षण घेतले. आपल्या अपत्या बरोबरच आसपासची अशीच मुले व पालक गोळा करून त्यांना मार्गदर्शन सुरू केले. तीची लढाई सरकार, सामाजिक संस्थांनी उचलून धरली. अमिताभ बच्चन यांनी शाळेला भेट देऊन मुलांचे पालकांचे मनोबल वाढवले. आज ती संस्था अनेक पालकांना आधार वाटते.

पण तरीही आपण म्हणता ते बरोबरच आहे. ही एक परिक्षाच आहे.मी कुठल्याच प्रकारचा सल्ला, सहानुभूती वैगेरे देण्यास सक्षम नाही पण इश्वर तुम्हांला आणी समाजातील अशा पालकांना त्यानेच टाकलेली जबाबदारी पार पाडण्यात मदत करावी आणी नक्कीच करेल अशीच प्रार्थना.

आपण आपले मन मित्र बरोबर मोकळे केलेत या बद्दल मनापासून आभार.

श्रीगुरुजी's picture

7 Dec 2024 - 8:43 am | श्रीगुरुजी

आपण खंबीर राहून लढत आहात. आपल्याला कायम शक्ती मिळो व आपल्या व कुटुंबियांच्या सर्व समस्या दूर जावोत हीच ईश्वरचरणी प्रार्थना!

मुक्त विहारि's picture

7 Dec 2024 - 11:44 am | मुक्त विहारि

अक्षरे धूसर झाली...

चौथा कोनाडा's picture

7 Dec 2024 - 7:21 pm | चौथा कोनाडा

अतिशय दुर्दैवी म्हणायचे हे !

जे ही कठीण खडतर परिस्थितीशी खंबीर राहून सामना करतात आणि परिक्षा पार पाडतात त्यांना कसं वंदन करावे तेच कळत नाहीत.
अशा वेळी ईश्वर बिश्वर सगळं झूठ आहे असं वाटतं !

देवा, मला सगळं ठाकठीक दिलंस, मग त्याला / त्यांना का हे नशिबाचे भोग ? का त्यांची खडतर परिक्षा घेतोयस ?
.. आणी मी / आपण अगतिक .. अगदी अल्प मदत करू शकतो किंवा करूच शकत नाही याचे मनाला क्लेश होतात..
सहनही होत नाही आणि सांगूही शकत नाही अशी अवस्था !

आणि जे समजावून घेऊन यांच्या पाठीशी राहतात त्यांना ही मनोमन धन्यवाद दिले जातात..

समाजातील जे दाते मदत करतात त्यांचे ॠण कसे व्यक्त करायचे ?

माझ्या / आमच्या मनापासूनच्या सदिच्छा आपल्या पाठीशी आहेत.
या सदिच्छा जोरकस काम करोत आणि यश लाभो याच प्रार्थना !

|| शुभं भवतु ||

नठ्यारा's picture

9 Dec 2024 - 3:39 am | नठ्यारा

हा लेख आठवला : https://www.maayboli.com/node/47559

जवळच्या नातेवाईकाच्या घरात असंच मूल पाहिलं आहे. सुदैवाने वा दुर्दैवाने ते १२ वर्षांचं होऊन गेलं. प्रसूतीत गुंतागुंत झाल्याने प्राणवायूच्या अभावी हा प्रकार घडला होता.

मैत्रिणीच्या भावाच्या घरात एक असाच नग ( case ) आहे. तिच्याच बोलण्यांत आलं होतं. पुढे काही विचारायची हिंमत झाली नाही. तितकाही खंबीरपणा माझ्यांत नाही. गप्पा मारणं वेगळं आणि प्रत्यक्षात खंबीर राहणं वेगळं असतं.

कौस्तुभ पोंक्षे व कुटुंबियांच्या धैर्यास अभिवादन.

-नाठाळ नठ्या

मार्गी's picture

10 Dec 2024 - 12:34 pm | मार्गी

ओहह..... एका पुस्तकाचं शब्दांकन केल्यामुळे ह्या विषयाचा परिचय आहे. तुमच्यापुढे असलेल्या परिस्थितीची थोडी कल्पना करू शकतो. आपल्यासाठी प्रार्थना करतो. जे शक्य आहे ते होवो व जे शक्य नाही ते सहन करण्याचं- त्याचं व्यवस्थापन करण्याचं बळ मिळो, ही इच्छा व्यक्त करतो. धन्यवाद.

कंजूस's picture

10 Dec 2024 - 12:48 pm | कंजूस

कल्पना करू शकतो.

अवघड आहे.

( ज्योतिषात असल्या फेऱ्यांचा करता ग्रह गुरू असतो. गुरूसारखा मान्यवर ग्रह यामागे असेल हे कोणाला पटणारही नाही. गुरु रडवतो.)

मग त्या दुसऱ्या अपत्याला असेच डिझाईन केले जाते की तुझा भाऊ / बहीण याला सांभाळणे हीच तूझी प्राथमिक जबाबदारी

यासाठी अशा आई वडिलांचे समुपदेशन करणे आवश्यक असते कि तुमच्या नंतर दुसरे अपत्य हि खरं तर भावंडाची जबाबदारी नाही. ती मुळात तुमचीच जबाबदारी आहे.

आपल्या वार्धक्यात आपल्याला कोण संभाळणार या विवंचने बरोबर आपल्यानंतर अशा दिव्यांग बाळाची जबाबदारी घेण्यासाठी दुसरे मूल जन्माला घालणार आहात का ? हा स्वार्थी विचार आहे हे परखडपणे आई वडिलांना सांगणे आवश्यक आहे.

आपल्याला होणारे मूल हे आपले दुर्दैव आहे हि वस्तुस्थिती आई वडिलांना सांगणे आवश्यक असते. आपले दुर्भाग्य आपल्या दुसऱ्या मुलाच्या डोक्यावर आपण देणार नाही हे आईवडिलांना पटवून देणे आवश्यक आहे.

कारण एक मूल दिव्यांग असल्यामुळे दुसऱ्या हुशार मुलाला उत्तम संधी असूनही परदेशी पाठवण्यास मनाई केलेले एक स्नेही आमच्या पाहण्यात आहेत.

असे परखड विचार ऐकवणारी माणसे / समुपदेशक लोकांना झेपत नाहीत. परंतु त्यामुळे वस्तूस्थिती बदलत नाही.

मी गरीब घरात जन्माला की आलो? मी सोन्याचा चमचा तोंडात धरून का जन्माला आलो नाही याचे उत्तर कुणाकडेही नसते.

नऊ वेळेस गर्भपात झालेली स्त्री मी पाहिलेली आहे.

मागच्या आठवड्यात वय वर्षे ४९ या वयात पहिल्यांदा गरोदर असलेली स्त्री मी पाहिली आहे. (अर्थात उपचार करूनच हे गर्भारपण मिळालेले आहे)
ज्या वेळेस तिचे मूल प्रथम शाळेत जाईल त्यावेळेस तिचे वय ५२-५३ असेल. म्हणजे ज्यावेळेस स्त्रिया आज्या होऊन आपल्या नातवंडाला शाळेत सोडायला येतात त्या वेळेस हि स्त्री आई म्हणून आपल्या मुलाला शाळेत सोडायला जाईल.

असे का? याचे उत्तर दुर्दैव, दुर्भाग्य, कर्म किंवा सांख्यिकीचा केवळ एक भाग म्हटले तरी वस्तुस्थिती बदलत नाही.

अशा वेळेस अशा आईवडिलांना स्पष्ट शब्दात सांगणे आवश्यक असते कि आपले दिव्यांग मूल हि प्राथमिक दृष्ट्या आपलीच जबाबदारी आहे आणि त्यासाठी या बाळासाठी उत्तम आर्थिक तरतूद करून ठेवणे आवश्यक आहे.

आपल्यला दुसरे मूल झालेच नसते तर आपण काय केले असते तेच आपल्याला करायचे आहे म्हणजे आपणच आपल्या दुसऱ्या अपत्यावर अन्याय करत नाहीं हे त्यांना समजावून सांगणे आवश्यक असते.

असंख्य वेळेस वयाने केवळ दोन तीन वर्षे मोठ्या असलेल्या मुलीस "तू ताई आहेस" म्हणून तुझ्या लहान भावाची जबाबदारी घेतली पाहिजेस असे सांगणारे असंख्य सुशिक्षित पालक मी पाहिलेले आहेत.

गोव्यात असताना समुद्रावर गेल्यावर माझी मुलगी ५ वर्षाची आणि मुलगा अडीच वर्षाचा होता. तेंव्हा माझ्या मुलीला असे सांगणाऱ्या अधिकारी वर्गातील एका स्त्रीला मी असे सुनावले होते. तिला मी सांगितले कि माझ्या मुलीला तू धाकट्या भावाची जबाबदारी घे हे सांगताय संपूर्णपणे चूक आहे. माझा मुलगा हि संपूर्णपणे माझी जबाबदारी आहे, पाच वर्षाच्या मुलीची नाही.

काय विचित्र माणूस आहे अशा नजरेने तिने माझ्याकडे पाहिले. आमच्या मुलामुळं आपल्या गप्पात व्यत्यय होतो म्हणून मुलीच्या गळ्यात धाकट्या भावाची जबाबदारी टाकणे हे तिला चूक वाटतच नव्हते. (अर्थात अशा असंख्य स्त्रिया/ पुरुष आपण डोळे उघडे ठेवल्यास आजूबाजूला रोज पाहत असतो).

आपल्या दिव्यांग मुलामुळे जर आपण दुसऱ्या अपत्यास जन्माला घालणार असाल तर जन्मापासून त्या मुलाच्या गळ्यात आपल्या जबाबदारीचे लोढणे टाकणे हि गोष्ट चूक आहे. असेच मी परखडपणे म्हणेन.

अगदी योग्य प्रतिसाद. एक प्रश्न मनात आला की आर्थिक तरतूद करून ठेवल्यास अशा मुलांची आपल्यानंतर (आपण निजधामास गेल्यानंतर) पूर्णवेळ कायमची जबाबदारी घेणाऱ्या संस्था किंवा अन्य काही व्यवस्था असते का उपलब्ध? भारतात.

अदित्य सिंग's picture

11 Dec 2024 - 1:42 pm | अदित्य सिंग

अशी एक संस्था पुण्यात मला माहित आहे.
वनाझ कंपनीजवळ उमेद फाऊंडेशन म्हणुन संस्था आहे. राकेश सणस नावाचे गृहस्थ बघतात त्याचे कामकाज.
ही संस्था फक्त मुलांचाच सांभाळ करत नाही तर पालकांनाही आधार देते.

अत्यंत कठीण परिस्थीतीत अनेक आव्हानांना तोंड देत संस्था चालवत आहेत.

आपल्याला होणारे मूल हे आपले दुर्दैव आहे हि वस्तुस्थिती आई वडिलांना सांगणे आवश्यक असते.

दिव्यांग मुल होणे हे कुणाच्याच हातात नसते. तसेच इच्छासुद्धा नसते. बाळ बाळंतीण सुखरूपपरतघरी यावी अशीचप्रत्येकाचीइच्छा असते.(सामान्य माणसाचे मत. वैद्यकीय मत वेगळे असू शकते).ते झाल्यानंतरच कळते. बाळ कसेही असले तरी आई वडील त्याच्यावर प्रेम करतात. दिव्यांग मुल टाकून देणारे आहेत पण प्रमाण कमी. त्यानंतर जबाबदारी स्विकारण्या शिवाय पर्याय नसतो.

दुसऱ्या अपत्यास जन्माला घालणार असाल तर जन्मापासून त्या मुलाच्या गळ्यात आपल्या जबाबदारीचे लोढणे टाकणे हि गोष्ट चूक आहे. असेच मी परखडपणे म्हणेन.

मुल ही पालकांचीच जबाबदारी यात शंकाच नाही.दिव्यांग मुल जन्माला आल्यास आई वडील त्याचा सांभाळ योग्य प्रकारे करतातच.अपवाद सोडून द्या.मग,स्वाभावीकच प्रश्न पडतो की अशा मुलाचे पुढे काय? जर हे प्रथम अपत्य असेल तर आपल्या नंतर कुणीतरी याचा य्योग्य सांभाळ करावा ही पालकांची अपेक्षा अनाठायी नाही. जगरहाटी बघता रक्ताच्या नातेवाईकां व्यतिरिक्त सामाजिक संस्थाच अशी जबाबदारी पार पाडू शकतात. आणी त्या दृष्टीकोनातून दुसरे अपत्य होऊ देणे म्हणजे जन्मापासून त्याच्यावर जबाबदारी टाकणे नव्हे. जन्मापासून कुठलेही मुल आपल्या भावंडांचा संभाळ अथवा जबाबदारी घेऊ शकत नाही. ही जबाबदारी तो सज्ञान, सक्षम झाल्यानंतरच तो उचलू शकतो.

दुसरा मुद्दा असा की सक्षम भाऊ/बहीण आपल्या आई वडीलांच्या संपत्ती मधे वाटेकरी मग त्यांची जबाबदारी सक्षम अपत्यांनी का वाटून घेऊ नये?त्यामुळे दुसरे अपत्य निरोगी असेल आणी त्याने आपल्या दिव्यांग भाऊ/बहीणीला सांभाळावे किंवा त्याचे उर्वरित आयुष्य सुखकर जावे याची सोय त्यालाच मिळणाऱ्या संपत्तीच्या वाट्या मधून करावी ही नैसर्गिक जबाबदारी म्हणावी लागेल. उत्तराधिकार मिळताना जबाबदारीही स्विकारायला हवी.

जर दिव्यांग अपत्या आगोदरच एखाद दुसरे सक्षम अपत्ये असतील तर अशा परिस्थितीत आपल्या मृत्युनंतर दिव्यांग भाऊ, बहिणीला मोठी भावंडे सांभाळतील असा विचार, विश्वास आई वडिलांना असतो.(तो पुढे खरा,खोटा ठरतो तो भाग निराळा)

आता यातूनही अनेक प्रश्न निर्माण होतात. संपत्तीच नसेल तर? जास्त भाऊ बहिणी असतील तर कुणी सांभाळायचे वगैरे....

का ,आई वडिलांनी कुणाच्याही भरवशावर न सोडता दिव्यांग अपत्य स्वता:बरोबर घेऊन जावे?...पण अशी सोयच नाही. मग ती जबाबदारी सरकारवर किंवा समाजावरच पडणार.

मुलांना साभाळायची पालकांची जबाबदारी, खरे आहे. पालकांच्या असामायीक मृत्यूनंतर मोठ्या भाऊ बहिणीवर लहान भाऊ बहिणींच्पा शिक्षणाची,विवाहाची जबाबदारी पडते ती नेमकी कुणाची,जबाबदारी घ्यावी किवां नाही.....

आपल्या वार्धक्यात आपल्याला कोण संभाळणार या विवंचने बरोबर आपल्यानंतर अशा दिव्यांग बाळाची जबाबदारी घेण्यासाठी दुसरे मूल जन्माला घालणार आहात का ? हा स्वार्थी विचार आहे हे परखडपणे आई वडिलांना सांगणे आवश्यक आहे.

मग पहिले मुल तरी कशाला जन्माला घालायचे? मुलावर निदान वार्धक्यात आई-वडील यांचा सांभाळ करावाच लागणार.

हा स्वार्थी विचार नसून व्यवहारिक विचार आहे. वार्धक्याची कुणी तरी काळजी घेणारे असावे हा रास्त विचार आहे. नसेल तर वास आल्यानंतर समाज, सरकार दरवाजे तोडून आत घुसेलच.

आई-वडील गेल्यानंतर त्यांची सपंत्ती चोरा पोरी जाणार हे निश्चित. जर एखादे लहान भावंड असेल तर प्रेमापोटी, लाजेकाजेस्तव ते आपल्या दिव्यांग भावा,बहिणीची सोय बघेलच. समाजावर,सरकार भार पडणार नाही.

कारण एक मूल दिव्यांग असल्यामुळे दुसऱ्या हुशार मुलाला उत्तम संधी असूनही परदेशी पाठवण्यास मनाई केलेले एक स्नेही आमच्या पाहण्यात आहेत.

हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे पण एकुलती एक मुले परदेशात जाऊन, स्थायीक राहून भारतातील आपल्या आई वडिलांची सोय बघतातच ना....
त्या हुशार मुलाला जाऊ दिले असते तर प्राप्त परिस्थितीत कदाचित वेगळा फायदा झाला असता. तसेही त्या हुशार मुलाच्या डोक्यात हे पक्कं बसले असेल की दिव्यांग भावामुळे आपली संधी हुकली. अशा भावनेतून तो त्याची देखभाल निट करेल किंवा नाही. थोडाफार परिणाम पालकांच्या देखभाली वरही होऊ शकतो.

कुटुंब व्यवस्था ही समाज स्वास्थ्यासाठीच बनली आहे.कालानुसार त्यात बदल होत आहे तरी पण समाजातील प्रश्नांवर संवेदनशील पणे विचार व्हावा ना की परखडपणे.असे माझे प्रामाणिक मत आहे.

प्रत्यक्षात काय होत आहे हे आपण सर्वजण पहातच आहोत.

या विषयाला लेखन सीमा नाही.....

अमरेंद्र बाहुबली's picture

11 Dec 2024 - 9:23 am | अमरेंद्र बाहुबली

प्रतिसाद आवडला.

कर्नलतपस्वी's picture

11 Dec 2024 - 9:13 am | कर्नलतपस्वी

असे वैद्यकीय दृष्टीकोनातून कळाले तर ते होऊ द्यायचे का नाही हा विषय वेगळा आहे. झाल्यावर त्याची जबाबदारी स्विकारणे क्रमप्राप्त आहे.

सुबोध खरे's picture

11 Dec 2024 - 11:05 am | सुबोध खरे

दुर्दैवाने आपण बघायला जात असलेल्या मुलाला किंवा मुलीला दिव्यांग भावंड असेल तर ते स्थळ बहुतांशी नाकारले जाते.

कारण आयुष्यभराची जबाबदारी कोण कशाला जाणून बुजून घेणार आहे?

आर्थिक बाजू भक्कम असेल तर आईवडिलांना अशा दिव्यांग मुलाला सांभाळणे त्यातल्या त्यात सोपे जाते. अन्यथा संपूर्ण घराचीच परवड होते.

पण दुसरे मूल जन्माला घालताना हा सर्व विचार भावनेच्या आहारी न जाता आईवडिलांनी करणे अत्यावश्यक आहे.

अमरेंद्र बाहुबली's picture

11 Dec 2024 - 11:09 am | अमरेंद्र बाहुबली

डॉ. साहेब पण आता तंत्रज्ञानाने कळते ना? मूळ दिव्यांग आहे की नाही ते? तसे असेल तर अबोर्शन करतात हे ही एकलेय.
रच्याकने एक आजार लपवून एका नातेवाईक मुलीचे लग्न लावले गेले होते, पहिल्या चार महिन्यातच मुलाने ओळखलं! डॉ. नी सांगितले की तिला होणारे मुलही तसेच असेल. घटस्फोट झाला!

कर्नलतपस्वी's picture

11 Dec 2024 - 7:19 pm | कर्नलतपस्वी

काही प्रमाणात सहमत. वेगळीच कारणे दाखवून नाते संबंध जोडण्यास नकार देतात.

परंतू समाजात समंजस माणसे सुद्धा आहेत. उदाहरणे अजुबाजूस दिसतातच.

एका कुटुंबातील सर्वात मोठी मुलगी दिव्यांग, (मानसिक )असूनदेखील तीच्या तीन बहिणी व एका भावाचे लग्न झाले. पुढे आई वडीलांच्या हयातीतच तीचा मृत्यू झाला.

आर्थिक बाजू भक्कम असेल तर आईवडिलांना अशा दिव्यांग मुलाला सांभाळणे त्यातल्या त्यात सोपे जाते. अन्यथा संपूर्ण घराचीच परवड होते.

आयुष्यात परवड सर्वांचीच ,कुणाची कमी ,कुणाची जास्त. भगवान बुद्ध असते तर.... जाऊ द्या.

घरात एखादा कपूत,कुटुंबातील एखाद्या सदस्याला दुर्धर आजार या सारख्या गोष्टी संपूर्ण घराची वाताहात करू शकतात.

दिव्यांग अपत्याला एखादा लहान मोठा भाऊ बहीण असल्यास कदाचित पालकांच्या पच्छात निट संगोपन झाले तर चांगलेच. नाहीतर प्रारब्ध म्हणायचे.

हल्लीतर सक्षम आई-वडीलांचे हाल चाललेत तेथे दिव्यांग, अविवाहित, विधवा,बेरोजगार कुटुंबातील अशा सदस्यांबद्दल काय बोलायचे.

सर्वांचेच भोग. टाळता येत असल्यास ठिक नाहितर पांडुरंग हरी...