काल श्रीहरीकडे पावभाजीसोबत गप्पागोष्टी सुरु होत्या. गप्पात बालपणातल्या खेळांचा विषय आला. कर्मधर्मसंयोगाने आभासी दुनियेतल्या मिमिवर देखील त्याच गप्पा रंगल्या होत्या.
Hide and Seek म्हणजे लपाछपी हा तर राष्ट्रीय खेळ असल्यासारखा फेमस. अजूनही तितकीच बालप्रियता टिकवून आहे. आपल्या वेळेला डबा ऐसपैस् होतं. करवंटी, डवा लांब फेकायचा, तो आणेपर्यंत आपण लपायचं.
गल्लीत देवीच मोठ मंदिर,. नवरात्रीत संपूर्ण गल्लीत मांडव टाकलेला असतो. त्या वेळी खांबखांबोळी पेश्शल. खांब असणाऱ्या देवळात कधी ताकतुंबा खेळलाय? तसंच झाड पकडून ? प्रत्येकाने खांब पकडून उभा रहायचे आणि एकावर राज्य. ज्याच्या वर राज्य आले आहे, त्याने प्रत्येक खांबासमोर जाउन ताकतुंबा म्हणायचे. तोपर्यंत बाकीच्यांनी पळत एकमेकांच्या खांबाला पकडायचे. या गडबडीत ज्याच्यावर राज्य आले आहे, त्याने खांब पकडला तर जो मधे सापडेल त्याच्यावर राज्य. असाच अजून एक डोंगर-पाणी , डोंगर का पाणी मध्ये खांब नसून उंच भाग आणि सखल भाग असायचा.
ते पाटावर चौकोन आखुन चिंचोके झेलायचा खेळ, चल्लस ! दुसरं नांव काचकवड्या. चिंचोके आणि फ्लास्टिकची बटणं हि आणखी धमाल. त्याला चल्लस असेही बोलतात. काही पाच घरे, काही सात घरे तर काही बारा घरांचीही असल्याचे ऐकून आहे.
लोखंडी रिंग , सायकलच्या चाकाची चकारी , पुठ्ठे खोक्यांपासून बनवलेल्या मोटार गाड्या, त्यांना लावलेली जुन्या स्लीपर्स कापून बनवलेली चाके, या गाड्या सजवायला घोटीव कागद, थोड्या अडवान्स स्टेजवर गट्टू सेल अन् वायरी जोडून दिवे देखील बसवायचो गाडीला.
सूरपारंब्या खेळलंय का कोणी? वडाची झाडे आता दुर्मिळ. तेव्हा देवीच्या मंदिरात वडाच भलं मोठ्ठ झाड होत. खऱ्या पारंब्या असलेल्या वडाच्या झाडावर सूरपारंब्या खेळायला जाम मज्जा यायची. असाच आणखी एक खेळ म्हणजे डाँकी. विटांनी रस्त्यावर चौकोन आणि मधे रेघा ओढून चार भाग करायचे. ज्याचा वर राज्य तो फक्त या रेघांवर पळणार. त्याचा चुकवून चारही चौकोनात जाऊन यायचे. हा खेळ विशेषतः वाहतुक बंद झाली कि रात्री खेळायचो.
अप्पारप्पीला अपारंपारिक चेंडूला प्राधान्य. चिंध्या, मोजे (आता कुणी म्हणतच नाही) हे वापरून बनवायचा हा चेंडू . आबाधुबी, लगोरी, निंगोरच्या तसे राकट खेळ. कापडी चेंडूवर खेळले जायचे गल्ली क्रिकेट. शेवरीच्या काड्यांचे स्टंप, कधीकधी कचाकड्याच्या नाहीतर रबरी बॉल पण असायचा.
सिझनल खेळ म्हणजे, पावसाळ्यात गजाचा तुकडा घेऊन रपारपी, गज चिखलात रुतवायचा, काठी दगडावर् ठेऊन राज्य घ्यायला लावायचे, डॉज बॉल हा शाळेतला राष्ट्रीय खेळ, एकाचवेळी इतके बॉल उडायचे कि काय सांगु. शाळेला स्वतंत्र पटांगण नव्हत. मधल्या सुटीत हत्त्तीची सोंड खेळायचो. साखळी करून एक एक भिडू टिपायचा. आउट झालेला साखळीत जोडला जायचा. झटापटी, विष अमृत, शिवाजी म्हणाला हे देखील लोकप्रिय खेळ होता.
कोया खेळलंय का कुणी? कापडी बॉल, कोयबा अन त्यावरचा जुगार्, देढ,चौकोन्. सोरट हा आणखी एक जुगाराचा प्रकार पाहिला आहे. या जुगार शब्दापायीच कदाचीत तेव्हा घरी पत्ते खेळू देत नव्हते. अजूनही जोड पान सोडला तर पत्याचा एकही डाव मांडता येत नाही. बदाम सात, रमी, मेंढी कोट हे चढत्या भाजणीने आजही अगम्य आहेत. गोट्या, पतंग अन् विटी दांडू देखील असेच अकारण हुकलेले खेळ.
प्रतिक्रिया
3 Nov 2018 - 5:09 pm | आनन्दा
गोट्या पत्ते खूप खेळलो..
पण विटीदांडू, भोवरा आणि पतंग खेळायचं राहूनच गेलं..
3 Nov 2018 - 5:14 pm | उगा काहितरीच
नॉस्ट्याल्जीक केलं राव तुम्ही ! सगळे नाही पण या खेळांचे बरेचसे व्हर्जन्स खेळलेलो आहे. याशिवायही बरेचसे खेळ खेळलेलो आहे. याबरोबरोच मारीयो , काँट्रा , SD फायटर , पुढे पुढे मॉर्टल काँबॕट ४ यात पण बालपण गेलंय. सोबतीला विस , गोनिदा , पुल , ॲलिस्टर मॕक्लिन , रॉबीन कुक हे ही होतेच. हम्म ! खरंच निरागस लहानपण मिस करतोय खूप ! :'(
3 Nov 2018 - 6:16 pm | यशोधरा
लपाछपी, डब्बा ऐसपैस येस्स!
तो खांबवाला खेळ पण, पण त्याला काहीतरी दुसरे नाव होते. आता आठवत नाहीये. बहुतेक खांब - खांब असं काहीतरी म्हणायचो. डोंगर पाणी पण खेळायचो. गाडीची चाके घेऊन ती घरंगळवत न्यायची, हा अजून एक आवडता खेळ असायचा. आधी एक लांब रेषा आखायची आणि त्या रेषेवरून ते चाक वेगात न्यायचे. इकडे तिकडे गेले की आऊट.
अप्पारप्पी, आबाधुबी, लगोरीही खेळलो आहोत. विष अमृत हाही एक खेळ असायचा. खो खो पण. डॉजबॉल ची टीम होती आमची शाळेत!
जुन्या आठवणींत रमायला लावणारा धागा. :)
14 Nov 2024 - 10:32 pm | आग्या१९९०
तो खांबवाला खेळ पण, पण त्याला काहीतरी दुसरे नाव होते. आता आठवत नाहीये. बहुतेक खांब - खांब असं काहीतरी म्हणायचो.
खांब खांब खांबोळ्या
3 Nov 2018 - 6:20 pm | बबन ताम्बे
तुम्ही उल्लेख केलेले सर्व खेळ लहानपणी खेळलोय.मे महिन्याच्या सुट्टीत आंब्यांच्या कॊया जमवून एक खेळ खेळायचो. हातात सपाट दगडाचे तुकडे घेऊन (त्याला आम्ही टफ्फर म्हणायचो) खेळायचो.
गोटयांमध्ये नक्का पूर्रा नावाचा भन्नाट खेळ होता.
14 Nov 2024 - 3:53 pm | अनुस्वार
नक्का पूर्रात फेव्हिकॉलचा दोन किलो आणि एक किलोचा डबा गच्च भरून गोट्या जिंकलो होतो मी. त्या श्रीमंतीची सरच न्यारी होती.
3 Nov 2018 - 8:29 pm | अभ्या..
गोट्या खेळलाव का कधी?
राजा राणि (ह्यन्न गंड), ढीस, मासा, ते जाऊ द्या.
गोट्यातला एकलम खाजा खेळला का कधी?
एकलम खाजा
दुर्री बाजा
तिरान बोजे
चारी चौकटी
पच्चा पांडव
सह्ह्या दांडव
सात पुतुळे
आष्टिक नल्ले
नौ नौ किल्ले
दश्शा गोंडा (इथपर्यंत गल घेणे किंवा उडवणे चलते)
अक्कल कैची (इथे कंपलसरी गल घ्यायची, कॅरमच्या राणि कव्हर सारखी)
मारा मैची (कंपलसरी दुसर्याची गोटी उडवायची).
...
कुया खेळताना गस्टल कसा बनवायचा म्हैते का? आमच्यातला एकजण मार्बल गस्टलने खेळायचा.
...
रिसायकल प्लास्टिकचे स्वस्त भवरे फिरवून फोडायचा खेळ म्हैते का?
...
हाताखाली येईल तो धपाटा खाईल म्हैते का?
...
आट्य्या पाट्या खेळलाव का?
खालवर गाबडं कशाला म्हणतेत म्हैते का?
सूराच्या (सूर दिड, सूर अडीच) कशाच्या हिशोबाने घेतेत म्हैते का?
....
अॅल्युमिनियमच्या ओव्हरहेड वायरीची गाडी केलाव का कधी स्टिअरिंगवाली?
...
जवारीच्या दिवसात कडब्याच्च्या सोलावुड सारख्या मगजाची बैलगाडी, बैल केलाव का?
आमचा एक जिगर त्याचं हिरिवरचं इंजन, त्रॅक्टर, ट्रायली, माणसं, मशीनगन असलं सगळं बनवायचा.
...
जाउदे यार... माहित असलं तरी कोण येणार नाही खेळायला.
4 Nov 2018 - 5:46 am | vcdatrange
लैच खेळकर हैसा, अभ्या भौ
4 Nov 2018 - 10:28 pm | नाखु
जवारीच्या दिवसात कडब्याच्च्या सोलावुड सारख्या मगजाची बैलगाडी, बैल केलाव का?
आमचा एक जिगर त्याचं हिरिवरचं इंजन, त्रॅक्टर, ट्रायली, माणसं, मशीनगन असलं सगळं बनवायचा.
उस सोलल्या नंतर जशी वरची सालकाठी निघते तशीच काढायला लागते
बैलगाडी व नांगर जमायचे, बाभळीच्या काट्याला शेळीच्या लेंडी लावून भिरभिरे करण्यात मजा यायची.
दामुके किती जणांना माहीत आहेत.
ज्वारी ताटे उसासारखी खाता येतात,
5 Nov 2018 - 4:49 am | हरवलेला
दामुके - शेळीच्या लेंडीत सापडणारे बाभळीचे बी.
जनावरांचा गोठा म्हणजे वर्कशॉप. लै उद्योग केले तिथे.
3 Nov 2018 - 10:38 pm | कंजूस
>>जवारीच्या दिवसात कडब्याच्च्या सोलावुड सारख्या मगजाची बैलगाडी, बैल केलाव का?
आमचा एक जिगर त्याचं हिरिवरचं इंजन, त्रॅक्टर, ट्रायली, माणसं, मशीनगन असलं सगळं बनवायचा.
...
जाउदे यार... माहित अ>>
हो.
बहुतेक खेळ खेळलोय॥
4 Nov 2018 - 2:00 am | मुक्त विहारि
एकलम खाजा, धोबी राजा.. :)
https://www.misalpav.com/node/24661
4 Nov 2018 - 7:22 pm | जानु
आम्ही तर बैल, बैलगाड्या बनवायचो. कुल्फीच्या काड्यांचा मांडव. लै मजा यायची. त्या गोटयांपाई किती मार खालल्याय गणतीच नाही.
4 Nov 2018 - 8:04 pm | तुषार काळभोर
तरी रुमाल पाणी, अप्पारप्पी, लंगोरचा, विषामृत, मूळ लेखातील चार/सहा खांब पकडून शिरापुरी-पुढच्या घरी, डॉजबॉल, लंगडीपाणी, लपाछपी खेळालोय.
गोट्या खेळलो नसलो तरी राज्य आल्यावर ढोपरानं गोटी ढकलायचा एक खेळ खेळला जायचा, थोडं लांबवर एक रेघ आखून उभं राहून/बसून पलीकडच्या गोट्यांमधली सांगाल ती गोटी उडवायची, गोट्यांसारखा हाडक्या असायचा. हे पाहिलंय. खेळता कधी आलं नाही.
पतंग कधी उडवली नाही.
सायकल ने हडपसरच्या पंचक्रोशीतील गावे- मुंढवा, मगरपट्टा, मांजरी, फुरसुंगी, इथे भटकलोय. कवडीपाटला दिवाळीनंतर पक्षी बघायला गेलोय.
अल्युमिनियमतारेची दोन चाकं, त्याला एक उभी तार आणि वरती स्टेरिंग लावून गाडी बनवलीय. चिखलात लोखंडाचा रॉड रोवायचा, ते एक खेळलोय.
सायकलचा टायर तर लै पळवलाय.
शाळेत बेंचची फळी काढून बॅटबॉल खेळालोय. पॅड आणि कागदाचा बोळा बनवून बॅडमिंटन खेळलोय.
पत्त्यांमध्ये भिकार सावकार, सात आठ, पाच तीन दोन, मेंढीकोट आणि अगदी रमीसुद्धा खेळालोय. यात्रेला गावी तीनचार दिवस मुक्कामी गेल्यावर सर्व चुलत भावंडे (बहिणींसह!) मिळून रमी खेळत असू. दुसरीकडे आमच्या आधीची पिढी त्यांच्या चुलत भावंडात रमीचा डाव रंगवत असत. आता आम्ही, चुलत भाऊ, चुलते असे मिळून रमी खेळतो.
14 Nov 2024 - 10:43 pm | आग्या१९९०
गोट्या खेळलो नसलो तरी राज्य आल्यावर ढोपरानं गोटी ढकलायचा एक खेळ खेळला जायचा,
कानढोपरी म्हणायचो आम्ही ह्या खेळाला. कान पकडून ढोपराने गोटी ढकलायची. ढोपर सोलून निघायचे.
4 Nov 2018 - 10:48 pm | आनन्दा
वर्गात बेंचवर पेनफायटर कोण खेळलंय?
5 Nov 2018 - 12:48 pm | vcdatrange
शाळेवरुन जॉली ची आठवण झाली . . बॉल पेनने तळ्हातावर गोल मार्क करायचा
5 Nov 2018 - 2:39 pm | तुषार काळभोर
पिवळ्या खटल्याचा ?
5 Nov 2018 - 3:54 pm | टर्मीनेटर
लेख आणि त्यावरील प्रतिसाद वाचून लहानपणीच्या बऱ्याच आठवणी ताज्या झाल्या. वर उल्लेख झालेले बहुतांश खेळ खेळलो आहे.
क्रिकेट व्यतिरिक्त लगोरी, भोवरा, विषामृत, पकडा पकडी, डब्बा ऐसपैस, स्टॅच्यु, गोट्या हे विशेष आवडीचे खेळ.
आमच्या बिल्डींग समोर एक गॅस वेल्डिंग करणाऱ्याचे दुकान होते. त्या दुकानदाराने कधी मेहेरबान होऊन त्याच्या सिलेंडर मध्ये गॅस तयार करण्यासाठी वापरले जाणारे राखाडी रंगाचे खडे (काय पदार्थ होता तो नाही माहित) दिले तर आणखीन एक मजेदार प्रकार करायला मिळायचा.
एक लहानसा खडा रस्त्यावर ठेऊन त्यावर ५-६ थेंब पाणी टाकायचे, तळाला मध्यभागी खिळ्याने छोटे भोक पाडलेला पत्र्याचा डबा त्या खड्यावर उपडा ठेवायचा आणि २-३ मिनिटे वाट बघून कागदाची सुरनळी करून तिची एकबाजू पेटवून फुलबाजीने अनार पेटवतो तशी त्या भोकाजवळ नेली कि 'ठो' असा सुतळीबॉम्ब फुटल्या सारखा मोठा आवाज होऊन तो डबा मस्तपैकी ४०-५० फुट उंच उडत असे, प्रत्येक वेळी तो खडा गॅस तयार करून करून आकाराने लहान होत जात असे. त्याची गॅस निर्माण करण्याची क्षमता संपेपर्यंत ह्या खेळाची पुनरावृत्ती होत असे. खूप मजा यायची. :)
5 Nov 2018 - 6:10 pm | गामा पैलवान
राम लक्ष्मण सीता नामे एक खेळ बरेच वेळा खेळलो आहोत लहानपणी आम्ही (अनेकवचनार्थी). राज्य आलेल्याने भिंतीकडे तोंड करून उभे राहायचे असते. बाकीचे भिडू दूर रेघेपल्याड उभे असतात. राज्यवाला भिडू 'राम लक्ष्मण सीता' असं बोलंत असतांना बाकीचे भिडू पुढे भिंतीकडे सरकतात. बोलणे संपले की राज्यवाला उलट वळतो. तेव्हा सगळ्या भिडूंनी आपापल्या जागी स्तब्ध राहायचं असतं. राज्यवाला पुडे येऊन प्रत्येकासमोर वेडेचाळे करतो. जर कोणी हलला किंवा हसला तर त्याच्यावर राज्य. अन्यथा काही वेळ गेला की राज्यवाला परत भिंतीकडे तोंड करून परत 'राम लक्ष्मण सीता' बोलतो. बाकीचे भिडू परत पुढे सरकतात. असं होत सतत राहिलं कि कोणतरी एक भिडू भिंतीच्या निकट येतो. त्याने 'राम लक्ष्मण सीता' असा घोष होत असतांना राज्यवाल्याच्या पाठीस स्पर्श करायचा. तो झाला की सर्वांनी धावंत रेघेच्या अल्याड यायचं असतं. राज्यवाल्याने अगोदरच कोणाला रेघेपर्यंत पोहोचायच्या आधी स्पर्श केला तर पकडल्या गेलेल्या भिडूवर राज्य.
-गा.पै.
9 Nov 2018 - 2:22 pm | पुजारी
..असं म्हणायचे
एकलम खाजा
दुब्बी राजे
तिराण भोजे
चारी चौकटी
पंचल पांडव
सहीया दांडव
सत्तक टोले
अष्टक नलले
नव्यान्नव किल्ले
धडस गुलाबा
अकर करकटा
बाळू मर्कटा
तिरंगी सोटा
चौदा लंगोटा
-- हे असं पुढे वीस पर्यंत होत . एकेकाळी पाठ होत खेळात असल्यामुळे
आता इतकंच आठवतंय
14 Nov 2024 - 9:47 pm | कर्नलतपस्वी
हाडक्या गोट्यांनी खेळायचा खतरनाक खेळ.
वरील सर्व खेळ मनसोक्त खेळलो आहे. नदीकाठावर वडाच्या पारंब्या धरून सुर पारंब्या खेळलो आहे. वह्यांचे पुष्टे घेऊन देशी बॅडमिंटन आणी सुर काठी सारखा तासंतास चालणारा खेळ पण खेळलो.
सगळेच खेळ मैदानी त्यामुळे अंगकाठी मजबूत झाली आणी अजून तरी आधार काठीची जरूर पडली नाही. कदाचित भविष्यातही पडणार नाही.
मस्त आठवणी.