केरळ कन्याकुमारी लेखमाला: दिवस सातवा (अंतिम) - पद्मनाभ पुरम पॅलेस, अझिमला शिवा टेम्पल व पद्मनाभस्वामी मंदिर

श्वेता२४'s picture
श्वेता२४ in भटकंती
18 Sep 2024 - 5:41 pm

या आधीचे भाग

1)पूर्वतयारी

2)केरळ कन्याकुमारी लेखमाला: दिवस पहिला

3)केरळ कन्याकुमारी लेखमाला: दिवस दुसरा

4)केरळ कन्याकुमारी लेखमाला: दिवस तीसरा

5)केरळ कन्याकुमारी लेखमाला: दिवस चौथा

6)केरळ कन्याकुमारी लेखमाला: दिवस पाचवा

7)केरळ कन्याकुमारी लेखमाला: दिवस सहावा

     आज आमच्या सहलीचा शेवटचा दिवस होता. आम्ही उठून लवकर आवरले आणि त्याचबरोबर त्रिवेणी संगम पाहायचा म्हणून बाहेर पडलो. आज आम्हाला कन्याकुमारी मध्ये शॉपिंग करायची होती. कारण इतक्या स्वस्त वस्तू आम्हाला पुन्हा मिळाल्या नसत्या. आम्ही मंदिराच्या जवळ असलेल्या एका छोट्या हॉटेलमध्ये नाष्टा केला व लगेच त्रिवेणी संगम कडे मोर्चा वाळवला.

photo

photo

photo

      हे ठिकाण म्हणजे भारताचे सर्वात दक्षिणेकडचे टोक!! इथेच बंगालचा उपसागर, अरबी समुद्र आणि हिंदी महासागर एकत्र येतात. या ठिकाणी बरेच शेवाळे साचलेले असल्यामुळे सावकाश उभे राहावे लागते. बाजूलाच बीच सारखी जागा होती. तिथे उभारून आम्ही हे पाणी थोडे अंगावर घेतले. तथापि आम्हाला भिजायचं नव्हते. त्यामुळे आम्ही साधारण अर्धा तासातच तिथून बाहेर पडलो.
     आता आम्ही खरेदी कडे मोर्चा वळवला. शिंपल्यांचे कोटिंग असलेले सुंदरसे आरसे, त्याचबरोबर झुंबर आणि शिंपल्यांची गुंफण असलेले दरवाजावर पडद्यांसारखे लावायचे आम्ही अत्यंत माफक किमतीत खरेदी केले.

     अर्थात यामध्ये बार्गेनिंग करण्यात एक्सपर्ट असलेले माझे पती आणि सासूबाई असल्यामुळे मी फक्त पैसे द्यायचे काम करत होते. सव्वा दोनशे अडीचशे रुपयांचा आरसा आम्ही साठ रुपयात घेतला. त्याचबरोबर साडेपाचशे रुपयांचा मोठा आरसा केवळ दोनशे रुपयात घेतला. आता हे आरसे आम्ही आमच्या घरात सुद्धा लावले आहेत. आमचे हे सर्व सामान वाढल्याने जाताना आम्हाला बॅगा कमी पडणार होत्या. तिथे बॅगा देखील स्वस्त मिळत असल्यामुळे आम्ही काही बॅगा खरेदी केल्या आणि त्यामध्ये सामान टाकून दिले.

      आता साधारण सकाळचे दहा वाजले होते. कन्याकुमारीपासून पॅलेस साधारण दोन तास लागतात. पॅलेस सकाळी 9.00 ते 12.30 व दुपारी 2.00 ते 4.30 असे वाचले असल्याने माझी धाकधुक वाढली होती. आम्ही पद्मनाभ पुरम पॅलेस कडे प्रस्थान केले पॅलेस मध्ये पोचेपर्यंत बारा वाजले होते.

      येथे कमालीची स्वच्छता आहे. त्याचबरोबर आत मध्ये आल्यानंतर आपले सर्व सामान ठेवण्यासाठी ते आपल्याला लॉकर देतात. तसेच पायामध्ये घालण्यासाठी कापडी सॉक्स देतात. त्याचे ते वेगळे वीस रुपये घेतात. पॅलेस ची एन्ट्री फी साधारण 35 रुपये प्रति व्यक्ती आहे. ऑफिसमध्ये दुपारी साडेबारा ते दोन पॅलेस बंद असतो का? असे विचारले. त्यावरती त्यांनी सांगितले केवळ तिकीट विक्री बंद असते. तेही दुपारी एक ते दीड या लंच ब्रेक मध्ये. अन्यथा पॅलेस उघडाच असतो. ज्या पर्यटकांनी तिकीट घेतलेली आहेत ते त्या वेळेला पॅलेस पाहू शकतात. केवळ कार्यालयीन कामकाज या वेळेमध्ये बंद असते. सर्वसाधारणतः सकाळी साडेनऊ ते संध्याकाळी साडेपाच या वेळेत पॅलेस पर्यटकांसाठी खुला असतो. सोमवारी पॅलेस बंद असतो. त्यामुळे या सर्व वेळा ध्यानात घेऊन येथे जाण्याचे नियोजन करावे. पद्मनाभपुरम पॅलेस संकेतस्थळ या संकेतस्थळावर सर्व माहिती उपलब्ध आहे.

दक्षिण भारतामध्ये केवळ लाकडी काम करून बांधलेला हा एकमेव असा राजवाडा आहे.
फोटो

फोटो

फोटो

यावरचे कोरीव काम हे अप्रतिम असे आहे. तुम्ही पहाल की हा जो पलंग आहे तो दगडाचा आहे.

photo

     अख्या राजवाड्या मध्ये केवळ हीच एक अशी वस्तू आहे जी दगडाची आहे. बाकी सर्व सामान हे लाकडी आहे. हा बेड Detachable आहे. म्हणजे हा वेगळा करता येतो आणि पुन्हा जोडून ठेवता येतो.

ही खुर्ची चीन वरून मागवण्यात आली होती.

फोटो

ही राजसभा आहे. राजा मंत्रीमंडळासोबत इथे बैठक घेत असे.

photo

अन्य फोटो
फोटो

फोटो

हा स्तंभ एकमेव असा आहे की जो फणसाच्या लाकडाचा आहे.
फोटो

फोटो

फोटो

फोटो

      या पॅलेसचे वैशिष्ट्य म्हणजे तुम्ही जसे जसे आत जाता तसे प्रत्येक ठिकाणी/खोलीत तुम्हाला तेथील माहिती सांगण्यासाठी गाईड हा तिथे उपस्थित असतो. त्यामुळे तुम्हाला वेगळ्याने काही माहिती करून घेण्याची गरज पडत नाही. ते स्वतः तुम्हाला सर्व माहिती करून देतात. ही सेवा नि:शुल्क आहे.
हा जो पलंग दिसत आहे तो साठ प्रकारच्या औषधी लाकडांपासून पासून बनवलेला आहे.

फोटो

photo

photo

फोटो

हा रंग मंडप येथे नृत्य होत असे.

photo

फोटो

फोटो

फोटो

फोटो

हे दालन येथे जेवायला लोक बसत असत.

फोटो

फोटो

हे तत्कालीन स्वयंपाक गृह आहे.

फोटो

फोटो

दगडी रगडा

फोटो

हा एक गुप्त जीना आहे. येथून राज स्त्रिया येत जात असत.
फोटो

फोटो

फोटो

फोटो

तत्कालीन शौचालय

फोटो

कोरीव कामाचे काही फोटो

फोटो

फोटो

फोटो

फोटो

झाडांना टेबल आणि खुर्च्यांचा आकार दिलेला आहे.

फोटो

हे खूप जुने घड्याळ असून याचा आवाज कित्येक मैल ऐकू जायचा असे म्हणतात
फोटो

फोटो

फोटो

फोटो

येथून राजा जनतेला दर्शन देत असे.

फोटो

फोटो

फोटो

फोटो

      हा राजवाडा बघून आमचे मन अतिशय तृप्त झाले. हा राजवाडा शांतपणे बघायला दोन तास तरी काढायलाच लागतात. खूप सारे फोटो काढून आम्ही येथून बाहेर पडलो. आता जेवायची वेळ झाली होती. आम्ही कन्याकुमारीला येत असताना जे चित्रा हॉटेल लागले होते, ते आता परत जाताना देखील लागणार होते. त्यामुळे आम्ही तिथेच जेवण करायचं ठरवलं.

फोटो

आता दुपारची वेळ असल्यामुळे इथे तमिळ पद्धतीचे पानावरचे राइस प्लेट मिळत होती. पण जेवण “द बेस्ट” होते. निव्वळ अप्रतिम! गरम-गरम भात, सांबर, वरून भाज्या, लोणची अत्यंत वेगळ्या पद्धतीचे आणि प्रत्येक पदार्थाला एक उत्तम स्वाद होता. आम्ही यथेच्छ जेवण जेवलो तरीही हलके वाटत होते.

फोटो

डावीकडून उजवीकडे पहायला गेले तर सगळ्यात कडेला डावीकडे खालच्या बाजूला आमसुलाची चटणी, आंबा लिंबूचे लोणचे, ढबू मिरचीचे लोणचे, गाजराची कांदा खोबरे व मुगाची डाळ घालून केलेली कोशिंबीर, भेंडी आणि दुधी भोपळ्याची दह्यातली भाजी, कांदा टोमॅटोची भाजी, कोबीची भाजी, त्याचबरोबर आणखीन एक भाजी होती ती कशाची ते काय शेवटपर्यंत कळले नाही!! खाली मी सरळ भाताचे तीन ढीग केले, एकात रसम आहे, मध्ये सांबार आहे आणि साधं वरण याशिवाय पापड आणि कढी देखील होती. आणि गोडासाठी पातळ पुरण केलं तर कशी चव लागेल असं एक खिरीसारखं काहीतरी होतं. ज्याला काही फारशी चव नव्हती. म्हणजे केरळी साध्या मध्ये खिरी अतिशय महत्त्वाच्या व उत्तम चवीच्या होत्या. पण इथलं गोड म्हणजे नावालाच दिलेलं होतं. पण बाकीचा जेवणातील प्रत्येक घटक, प्रत्येक भाजी, चटणी, कोशिंबीर याची चव वेगवेगळी होती आणि जाणवेल इतकी चविष्ट होती. जेवण गरम गरम वाढले होते. अनलिमिटेड होते सगळे. हे जेवण देखील काही मोजक्या जेवणाच्या अनुभवांमध्ये आणले जाईल एवढे चांगले होते.

      आता नियोजनानुसार आम्हाला जायचे होते ते म्हणजे आझिमला शिवा टेम्पल, त्यानंतर आम्हाला कोवालम बीच ला जायचे होते व सर्वात शेवटी आम्ही पद्मनाभस्वामी टेंपल येथे दर्शन घेऊन रात्री मुक्काम करणार होतो. दुसऱ्या दिवशी पहाटे पाच वाजता आमचे मुंबईला परतीचे विमान होते. असा एकंदरीत कार्यक्रम होता. परंतु आझीमला शिवा टेम्पल कडे प्रस्थान करत असतानाच अचानक वातावरणात बदल झाला आणि धो धो पाऊस पडायला लागला. साधारण 3.30 वाजता आम्ही देवळाजवळ पोचले. पण पावसामुळे आम्ही बराच वेळ गाडीत बसून होतो. शेवटी पाऊस थांबण्याचे नाव घेईना म्हणल्यानंतर साधारण चार वाजता मंदिर नुकतेच उघडल्यावर आम्ही मंदीरात गेलो.

      आझीमला शिवा टेम्पल मधील शिल्प हे 58 फूट उंच गंगाधरेश्वराच्या स्वरूपातील शिल्प आहे. आझीमला येथील स्थानिक रहिवासी असलेले पी.एस. देवदाथन यांनी हे शिल्प तयार केले आहे. हे शिल्प तयार करण्याचे काम 2014 ला सुरू झाले आणि 31 डिसेंबर 2020 ला हे शिल्प सर्व भाविकांसाठी खुले झाले. आम्ही पावसातच त्या भव्य शिवाच्या पुतळ्याजवळ फोटो काढले.

फोटो

फोटो

फोटो

फोटो

      शंकराच्या जटेतून गंगा अवतिर्ण होते अशा पद्धतीचे हे शिल्प आहे. अत्यंत देखणे शिल्प आणि त्याहूनही देखणा म्हणजे त्या शंकराच्या पुतळ्या मागचा दिसणारा समुद्र!!

फोटो

photo

      आम्ही मंदिरात देवाचे दर्शन घेतले. पाऊस थांबण्याचे नाव घेत नव्हता. आम्ही तसेच पुढे निघालो.
आता ड्रायव्हरचे म्हणणे पडले की कोवालम बीचवर जाऊन काही उपयोग नाही. खूप पाऊस पडत आहे. आम्हालाही त्याचे म्हणणे पटले. अजून आम्हाला पद्मनाभ स्वामी टेम्पल येथे जाण्यासाठी दीड तास लागणार होता. पाच वाजून गेले होते. त्यामुळे आम्ही एके ठिकाणी थांबून चहा घेतला. तिथे जवळच टॅपिओका वेफर्स चे दुकान होते. आम्ही ते पहिल्यांदाच पाहत असल्यामुळे ड्रायव्हरने आम्हाला ते टेस्ट करायला दिले. आम्हाला टेस्ट अतिशय आवडली. आम्ही थोडे फ्रेश वेफर्स खरेदी केले. त्याचबरोबर त्याने आम्हाला केळ्याचे वेफर्स देखील टेस्ट करायला दिले. आम्हाला ते देखील अत्यंत आवडले त्यामुळे ते देखील खरेदी केले. आमचा खाण्यातला उत्साह बघून त्या माणसाने एक एक पदार्थ टेस्ट करून द्यायला सुरुवात केली. आम्ही त्याला सांगितले की आम्हाला काही नको आहे. आम्ही खरेदी करणार नाही आहोत. त्या दुकानदाराला मुळीच हिंदी किंवा इंग्रजी येत नव्हते. तो माझ्याशी मल्याळीत बोलत होता व त्याप्रमाणे ड्रायव्हर मला समजावून सांगत होता. त्याने पदार्थ घेऊ नका पण टेस्ट तर करा अशी विनंती केली. त्यांने हा हलवा आमच्या इथली स्पेशालिटी आहे म्हणून दोन-तीन प्रकारचे हलवे टेस्ट करायला दिले. त्यातले दोन प्रकारचे हलवे मला आवडले. शुद्ध तुपात तयार केलेले होते. त्यामुळे ते मी पाव पाव किलो विकत घेतले. मला ते हलवे खरोखरीच आवडले म्हणून आम्ही घेतले आणि खरं सांगते घरी जाईपर्यंत आमचे ते खाऊन झाले सुद्धा... महाराष्ट्रीयन माणसाच्या प्रवृत्तीत आणि केरळी माणसाच्या प्रवृत्तीत मला जागोजागी एक फरक प्रकर्षाने जाणवला ते म्हणजे इथल्या लोकांच्या दैनंदिन जीवनामध्ये पर्यटकांना कसे वागवले पाहिजे हे पुरेपूर मुरलेले आहे. त्या माणसाने मला आग्रह करून करून वेगवेगळे पदार्थ चाखायला दिले नसते तर मी कशाला घेतले असते आणि मला खात्री आहे कोणत्याही मराठी माणसाने असे उत्साहाने आलेल्या गिऱ्हाईकाला घेऊ नका पण खाऊन तर बघा म्हणून खायला दिले नसते. असो.

      आणखीन एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे पहिल्या दिवशी मुन्नारला संध्याकाळी मी एका हॉटेलमध्ये चहा पिला तेव्हाच इथला चहा हा कॉफीच्या कित्येक पटीने चांगला आहे याचा मला साक्षात्कार झाला. कदाचित इथेच चहाचे उत्पन्न होत असेल म्हणून असेल किंवा तिथे चहा करताना चहाचे पाणी हे वेगळे उकळून ठेवलेले असते व दूध वेगळे उकळून दिलेले असते, आपण ज्याप्रमाणे ऑर्डर देऊ त्या वेळेला या दोन्ही गोष्टी केवळ ते एकत्र करून देतात. या चहा करण्याच्या पद्धतीमुळे असेल, पण तो चहा हा निव्वळ अप्रतिम आणि अमृततुल्य असतो. फक्त तुम्हाला एक सांगायचे असते की मला स्ट्रॉंग चहा हवा आहे. कारण तिथला नॉर्मल चहा हा चहाचे प्रमाण कमी असलेला असतो. पण स्ट्रॉंग चहा हवा म्हणून सांगितले की तुम्हाला परफेक्ट चहा मिळतो आणि हा चहा तुमचा एकदम मूडच बनवून टाकतो. मी केरळमध्ये जागोजागी चहा पिऊन त्याच्या सुंदर आठवणी मनात जपल्या आहेत.
      मस्तपैकी चहा घेऊन आम्ही पुढे निघालो. बहुदा त्यावेळी वादळ झाले होते आणि खूप जोरात पाऊस पडत होता. अशा परिस्थितीमध्ये कोवालम बीच येथे जाणे शक्य नव्हते. त्यामुळे आम्ही थेट पद्मनाभस्वामी टेंपल येथे जाण्याचे ठरवले. आज रात्रीचा मुक्काम कुठे करावा याबद्दल मी बुकिंग केले नव्हते. देवळाच्या जवळच कुठेतरी रात्रीचा मुक्काम करायचा असेल ठरवले होते. कारण पहाटेचे पाच वाजताचे विमान होते. त्यामुळे साधारण चार वाजता तरी आम्हाला तेथे पोहोचायचे होते. आम्ही साधारण सातच्या सुमारास देवळाच्या एका द्वारापाशी पोहोचलो. आमचे सर्व सामान बाहेर सोडावे लागले. इथे लॉकर उपलब्ध आहेत. त्याचबरोबर तिथेच बाहेर असलेल्या एका दुकानातून पन्नास रुपये दराचे एक पांढरे वस्त्र विकत घेऊन ते आम्ही कमरेला गोल गोल असे गुंडाळून घेतले.

photo

      साडी असेल तर अशा स्त्रियांना थेट आत मध्ये सोडतात. तथापि साडी सोडून अन्य कोणताही पेहराव असेल तर आपल्या पंजाबी ड्रेस भोवती किंवा इतर कोणत्याही पेहराव भोवती हे वस्त्र गुंडाळून घ्यावे लागते. लुंगी सारखे. पुरुषांना बनियन काढावा लागतो. अशा पद्धतीने आम्ही तयार होऊन आत मध्ये गेलो.
मंदिरात कमी गर्दी होती. तथापि हे सर्व सोपस्कार करून आत जाईपर्यंत साडेसात वाजून गेले होते. मंदिर बंद होण्याची वेळ जवळ आली होती. त्यामुळे उगाच रिस्क नको म्हणून मी एक्सप्रेस दर्शनाचे तिकीट काढले. तिकीट किती होते हे फारसे आठवत नाही. पण प्रतिमाणशी काहीतरी शंभर सव्वाशे रुपये वगैरे असे होते. त्या तिकिटामुळे आम्ही साधारण पंधरा मिनिटातच मूर्तीच्या समोर उभे ठाकलो. पद्मनाभ स्वामी मंदिरातील शेषशायी विष्णूची निद्रिस्त आसनातील मूर्ती आहे. त्यामुळे ही मूर्ती आडवी आहे. तीन सलग द्वारांमधून विष्णूचे दर्शन होते. पहिला द्वारामध्ये विष्णूंचे पाय, मधल्या भागांमध्ये विष्णूंचे शरीराचा मधला भाग, तर तिसऱ्या द्वारातून डोक्याखाली हात घेतलेल्या विष्णूचे दर्शन होते. तसेच वरती शेषशायी नागाने धरलेला फणा असे मनोहारी दर्शन होते. दक्षिणात्य मंदिरांप्रमाणे येथे देखील केवळ दिव्यांच्या नैसर्गिक प्रकाशामध्येच मूर्तीचे दर्शन होते. हे दर्शन एक दिव्य अनुभव देणारे आहे. आत मध्ये बऱ्यापैकी गर्दी होती. त्यामुळे एक्सप्रेस तिकीट काढले हे बरे झाले. अन्यथा यावेळी देखील आम्हाला सव्वा ते दीड तास लागला असता असे वाटले. नंतर एका माणसाकडून कळाले हे आत्ता काहीही गर्दी नाही. सकाळी प्रचंड गर्दी असते. शांतपणाने आमचे दर्शन झाले. तिथे अन्य देवी देवतांच्या ही मूर्ती आहेत. त्यांचे देखील आम्ही दर्शन घेतले. त्यानंतर बाहेर येऊन आम्ही प्रसाद खरेदी केला . काही काळ देवाच्या प्रांगणात आम्ही बसलो आणि मग बाहेर आलो . आमचे सामान परत घेतले.
      साधारण साडेआठ वाजले होते . आता आम्हाला हॉटेल बघणे गरजेचे होते. तेथून जवळच असलेले एक पंधराशे रुपये दराचे एसी हॉटेल आम्हाला मिळाले. एका रात्री थांबण्याकरिता हॉटेल चांगले होते . एक ट्रिपल मोठा बेड व एखादी एक्स्ट्रा बेड त्यांनी दिला होता . आम्ही समोरच असलेल्या एका व्हेज हॉटेलमध्ये जाऊन शेवटची आठवण म्हणून केरला पराठा आणि पनीर मशरूम मसाला ऑर्डर केला. आज शमीभाईला सोबत घेऊन आम्ही जेवण केले.

      एरवी तो त्याच्या वेळेनुसार जेवण करत असे. आज आम्ही त्याला आग्रहाने आमच्या सोबत जेवायला घेतले. इतक्या दिवसात तो आमचा एक कौटुंबिक सदस्य झाला होता.
माझ्या पतीने शिंपल्यावरती कोरलेले एक सुंदर गिफ्ट त्याला दिले. त्यावर लिहिले होते कार्डोमम टूर्स अँड ट्रॅव्हल्स!!! पुढच्या वेळी येईन त्यावेळी या नावाच्या गाडीतून आम्हाला फिरव असे म्हणतात त्याच्या डोळ्यात पाणी आले कारण या प्रवासादरम्यान तो एकदा बोलला होता की आता मला माझा स्वतःचा टूर्स अँड ट्रॅव्हल्स बिजनेस करायचा आहे आणि त्याचे नाव असेल कार्डोमम टूर्स ॲड ट्रॅव्हल्स!!! आज देखील त्याच्याशी कधी कधी फोनवर बोलणे होत असते. त्याने तो शिंपला त्याच्या घरी जपून ठेवला आहे.
      पहाटे चार वाजता आम्हाला शमीभाई ने एअर पोर्ट वरती पोहोचवले. आत्ता देखील पावसाची भिरभिर चालूच होती. शमीभाईला त्याची बक्षीस देऊन आम्ही एअरपोर्ट वरती आमच्या विमानात बसलो. एकंदरीतच केरळची यात्रा सुपर संपूर्ण झाली होती. या ट्रिप मध्ये फसलेले नियोजन म्हणजे टेकडीला अजून एक दिवस द्यायला हवा होता.. वर्कलाला जाण्याचा आमचा डिसिजन चुकला. वर्कला ट्रिपमध्ये इन्क्लुड करण्याऐवजी आम्ही मुनरो आयर्लंड येथे राहायला हवे होते. शिवाय आमचे कोवालम बीच ला जायचे राहून गेले.. अर्थात कोवालम बीच पाहिला नाही याचे काहीच वाईट वाटत नाही कारण बीच वरती फिरण्यासाठी आमच्यापैकी कोणीच फारसे उत्सुक नव्हते. तसेही वर्कलाला पाण्यामध्ये डुंबायचा आनंद घेतला होता. असो. टूर ट्रॅव्हल कंपन्यांच्या तुलनेत निम्म्यापेक्षाही कमी खर्च आला त्यामुळे आपण आपल्या सवलतीप्रमाणे व आवडीप्रमाणेच ट्रिप प्लॅन केली पाहिजे याबाबत माझ्या मनात शिक्कामोर्तब झाले!!!

प्रतिक्रिया

कंजूस's picture

18 Sep 2024 - 8:47 pm | कंजूस

सुनियोजित सहल झाली.

अगदी प्रथम जातो तेव्हा घाबरायला होते. पण पुढे सवय होते आणि आपण स्वतंत्रपणे जाऊ लागतो.
पॅलेसच्या फोटोंसाठी धन्यवाद. आम्ही गेलो होतो तेव्हा मोबाईल नव्हता आणि कॅमेराही डब्बा होता त्यामुळे फोटो काढले नव्हते. महालातील काळी फरशी हे वैशिष्ट्य आहे. एकमेव आहे. करवंटीचा कोळसा, अंड्याचा बलक आणि शिंपल्याची भुकटी खलून वाटून दगडाने घोटून बनवली आहे. चकाकी पाहा.
पद्मनाभस्वामि मंदिरात अगोदरच्या नृत्य मंडपात वाजणारे दगडी खांब आहेत. पाचशे तरी असतील. पण ते बंदिस्त केले आहेत. साडे पाचला गोपुरात वरती जाता येत होते. आता माहीत नाही.
चांगली झाली सहल. मुलांच्या आठवणीत राहील.

आठवणी जाग्या झाल्या.

थोडी पुर्व तयारी केली तर ट्रॅव्हल्स कंपनी पेक्षा चांगली भटकंती कमीतकमी पैशात होऊ शकते. हे अनुभवले असेलच. त्याचे एक वेगळाच आनंद असतो.

आपले अनुभव शेअर केल्याबद्दल धन्यवाद.

राजवाडा सुंदर आहे.मस्त ट्रीप होती.

झकासराव's picture

19 Sep 2024 - 4:50 pm | झकासराव

सुंदर ट्रिप झाली.
अगदी सविस्तर सचित्र।लिहिल्यामुळे हे एक ट्रॅव्हल guide झाले आहे :)

प्रचेतस's picture

20 Sep 2024 - 8:51 am | प्रचेतस

ही लेखमाला खूपच आवडली. केरळ-कन्याकुमारी सहल जर कधी काळी केली तर अत्यंत उपयुक्त ठरेल. ओघवत्या वर्णनामुळे वाचनीय.

चौथा कोनाडा's picture

21 Sep 2024 - 6:09 pm | चौथा कोनाडा

प्रचिंची सुंदर मेजवानी !
डोळ्यांचे पारणे फिटले !
अप्रतिम लेखमाला ! खुप छान माहिती दिलीय !

श्वेता२४'s picture

25 Sep 2024 - 10:31 am | श्वेता२४

प्रतिसादाबद्दल मनःपूर्वक धन्यवाद

टर्मीनेटर's picture

14 Oct 2024 - 1:08 pm | टर्मीनेटर

मस्त झाली लेखमालिका 👍
पुढील लेखनास शुभेच्छा!

असा मी असामी's picture

4 Nov 2024 - 9:47 pm | असा मी असामी

साधारण किति खर्च आला?

श्वेता२४'s picture

4 Nov 2024 - 11:12 pm | श्वेता२४

विमानप्रवास, राहणे,खाणे,एन्ट्री फी,खाजगी वाहन (7 सीटर) व सगळ्या ॲक्टीविटी पकडून 1.20 लक्ष खर्च आला. यात मुलगा लहान असला (8 वर्ष) तरी त्याचा स्वतंत्र पलंग होता. म्हणजेच चौघांनाही नीट झोपता येईल अशा पद्धतीने प्रशस्त खोल्या असलेले हॉटेल आम्ही निवडले होते. शिवाय कोणतेही ऍक्टिव्हिटी केली तरी लहान मुलगा म्हणून त्याला कुठेही सवलत नाही. त्याचे चार्जेस द्यावेच लागले. त्यामुळे एकंदरीतच चार माणसांचा खर्च मी दिला आहे. म्हणजे माणशी जवळपास तीस हजार खर्च आला. आमची एकूण आठ रात्री नऊ दिवस अशी ट्रीप होती व स्थळ दर्शन म्हणाल तर कोणत्याही टूर ऑपरेटर च्या स्थलदर्शनामध्ये आम्ही पाहिलेल्या सर्व स्थळांचा समावेश नव्हता त्यामुळे या दरामध्ये ही सहल खूप जास्त परवडली.

असा मी असामी's picture

5 Nov 2024 - 11:20 pm | असा मी असामी

धन्यवाद, मी पण सहल प्लन करत आहे तुमच्या अनुभवावरुन.

वेदांत's picture

6 Nov 2024 - 12:11 pm | वेदांत

खूप छान मालिका .. शमीभाई चा नम्बर द्याल का ?

श्वेता२४'s picture

6 Nov 2024 - 12:31 pm | श्वेता२४

व्यनि पहा.

वेदांत's picture

6 Nov 2024 - 1:05 pm | वेदांत

धन्यवाद.

श्वेता२४'s picture

6 Nov 2024 - 12:34 pm | श्वेता२४

पेपर केरला होलिडेज चा क्र.९४९७१७७७७४