केरळ कन्याकुमारी लेखमाला : दिवस तिसरा "थेकडी"

श्वेता२४'s picture
श्वेता२४ in भटकंती
25 Jul 2024 - 11:20 pm

आधीचे भाग
1)पूर्वतयारी

2)केरळ कन्याकुमारी लेखमाला: दिवस पहिला

3)केरळ कन्याकुमारी लेखमाला: दिवस दुसरा

     आज आम्हाला थेकडी ला जायचे होते. थेकडी हे पेरियार अभयारण्यासाठी प्रसिद्ध आहे. सकाळी उठल्यावर येथील प्रसिद्ध “सर्वना भवन” येथे आम्ही नाश्ता करण्यासाठी गेलो. हे मुन्नार मधले एक अतिशय उत्तम व मस्ट ट्राय असे हॉटेल आहे. इथे आम्ही इडली, मेदुवडा, डोसा, पोंगल व त्याचबरोबर अप्पम आणि गोड नारळाचे दूध हे पदार्थ ट्राय केले.

फोटो

     हा एक अतिशय उत्तम अनुभव होता. केरळमध्ये अप्पम हे व्हेज कुर्मा/अंडा करी/फीश करी बरोबर खातात. पण इथे तो गोड नारळाच्या दुधाबरोबर सर्व्ह केला गेला. मस्त चव होती अप्पमची. पोंगल हा साधारण खिचडीभातासारखा प्रकार आहे. एकदा खायला छान वाटला. हे सर्व पदार्थ नारळ, आलं+मिरची+पुदीना व टोमॅटो अशा 3 प्रकारच्या चटण्या व सांबार सोबत दिले. इथे केरळमध्ये सर्वच ठिकाणी सांबार दाट व चवीला साधारण होते. पण चटण्या मात्र 1 नंबर. त्यामुळे चवीचा सगळा गेम चटण्यांचा होता. चटण्या व सांबार सगळीकडे अनलिमिटेड असते. तसेच इकडे नगावर इडली व मेदूवडा देतात. म्हणजे तुम्ही कितीही इडली, मेदूवडा खा शेवटी ते नगानुसार बिल करतात. 1 इडली 15 रु. व एक मेदूवडा 20रु. याप्रमाणे. भरपेट नाश्ता करून, तृप्त होऊन आम्ही साधारण साडेनऊ वाजता थेकडीला प्रस्थान केले.

     आता थोडे थेकडी बद्दल बोलूया. थेकडीला जावे की न जावे याबद्दल अनेकांची अनेक मते असतात. असेही रिव्ह्यू वाचले आहे की थेकडीला काहीही नाही, त्यामुळे ते स्किप केले तरी चालते. परंतु मुन्नार वरून थेट मुनरो आयर्लंड येथे जाण्याचा रस्ता हा साधारण गुगल मॅप वरती सात ते आठ तासांचा दाखवत होता. त्यामुळे मध्येच कुठेतरी स्टॉप घेऊन हा प्रवास करणे आवश्यक होते. त्यामुळे मी थेकडी या ठिकाणाचा समावेश आमच्या सहलीमध्ये केला. या ठिकाणाकडून मला फार काही अपेक्षा नव्हत्या. इथे प्रसिद्ध असलेली ऍक्टिव्हिटी म्हणजे इथल्या बॅक वॉटर मध्ये करायचे बोटिंग. साधारण तीन तासाच्या या बोटिंगमध्ये तुमचे नशीब चांगले असेल तर काही प्राणी दिसू शकतात. तथापि आम्हाला इतका वेळ बोट राईड करण्यामध्ये रस नव्हता.
     मी periyartigerriserve.org या वेबसाईट वरती तिथे करण्यात येणाऱ्या बऱ्याच ऍक्टिव्हिटी बघितल्या होत्या. ज्यामध्ये नेचर वॉक, ग्रीन वॉक, बांबू राफ्टींग- हे पूर्ण दिवस व अर्धा दिवस अशा पद्धतीने होते, शिवाय ट्रेकिंग, नाईट सफारी, हायकिंग, ट्रायबल डान्स, जंगल कॅम्प, बर्ड सॉंग ट्रेल, गावी नावाच्या जंगल एरियामध्ये जंगल सफारी, असे अनेक पर्याय अत्यंत माफक दरामध्ये उपलब्ध असलेले दिसले. या एकाच साईट वरती तुम्ही जंगलामध्ये राहण्यासाठी कॉटेज देखील बुक वगैरे करू शकता. अतिशय अद्यावत अशी ही वेबसाईट असून याच्यावरून ऑनलाइन बुकिंग करता येते.
     ज्यावेळी मी सहलीचे नियोजन करत होते त्यावेळी माझा अंदाज होता की आम्ही साधारण एक वाजेपर्यंत थेकडी येथे पोहोचलो की त्यानंतर दोन तासाचा नेचर वॉक बुक करायचा. त्यानंतर हत्तीची सफारी करायची. संध्याकाळी वेळ मिळाला व दर योग्य असेल तर तर मसाज घ्यायचा किंवा मार्केट फिरायचे. इथे सुद्धा दोनशे रुपये प्रतिमांशी दरामध्ये कलरीपट्टू व कथाकलीचे शो संध्याकाळी असतात. ही सर्व ठिकाणे जवळजवळ असल्यामुळे मुन्नार मध्ये जसे प्रत्येक ठिकाणाहून दुसरीकडे जाण्यामध्ये वेळ जातो तसा मात्र येथे जात नाही. कारण हे खूप छोटेसे शहर असल्यामुळे तिथल्या तिथेच बरीच ठिकाणे आहेत.
     खरंतर मुन्नार येथील बऱ्याच ऍक्टिव्हिटी या थेकडी येथे उपलब्ध आहेत आणि बरेचसे पर्यटक या सर्व ऍक्टिव्हिटी मुन्नारला आधीच करून आलेले असतात. त्यामुळे त्यांच्यासाठी थेकडी येथे बोटिंग सोडले तर करण्यासारखे विशेष असे वेगळे काही उरत नाही. टुरिस्ट कंपन्या आपला ग्राहकांना इथे उपलब्ध असलेल्या इतर ऍक्टिव्हिटी बद्दल कितपत सांगतात याबद्दल मला शंका आहे. त्यामुळे हे ठिकाण स्किप करण्याचा देखील सल्ला बरेच जण देतात. परंतु मला मात्र जंगलात फिरायला आवडते वेबसाईटवरील बऱ्याचश्या ऍक्टिव्हिटी या मला अतिशय आकर्षक वाटल्या. खरं म्हणजे थेकडी येथे भविष्यात मी नक्की पुन्हा भेट देणार आहे व राहिलेल्या सर्व ऍक्टिव्हिटी पूर्ण करणार आहे जसे की जंगल वॉक ,नाईट सफारी हा अनुभव मला जंगलातीलच कॉटेजमध्ये राहून घ्यायचा आहे. बघूया कधी जमेल ते. असो.
     मुन्नार ते थेकडी हा मार्ग अत्यंत निसर्गसौंदर्याने नटलेला आहे. हा प्रवास अविस्मरणीय असा होता. केरळ सहलीमध्ये सर्वात आवडलेले काही क्षण जर मला कोणी सांगायला लावले तर हा मुन्नार- थेकडी प्रवास , मुनरो आयर्लंड मधील बोट राईड, आणि पद्मनाभम पॅलेसची सफर असे मी तीन हाय पॉइंट सांगेन. एकाच वेळी आपल्याला चहाचे हिरवेगार मळे आणि जंगलाने वेढलेले डोंगर आणि निळे शार आकाश असं एक सुंदर कॉम्बिनेशन दिसतं. हे दृश्य कितीही डोळ्यात साठवलं तरी मन भरत नाही. प्रत्येक वळणावरती निसर्गाचा नवीन कॅनव्हास आपल्यासमोर एक नवीन निसर्ग चित्र निर्माण करतो. या प्रवासाने आमच्या डोळ्यांचे पारणे फिटले इतकेच म्हणेन.

फोटो

कधीतरी मध्ये चहाचे मळे दिसत होते तर कधी सुंदरशा डोंगर रांगा

फोटो

फोटो

हिरवेगार चहाचे मळे.... त्याच्यामागे उभे असलेले उंच पहाड आणि वरती निळे शार आकाश.......

फोटो

फोटो

     या मार्गांवरती काही ठिकाणी थांबून खूप फोटोग्राफी केली.

प्रत्येक वळणावरती निसर्गाची एक नवीन फ्रेम समोर येत होती. आता इथेच बघा आकाश किती सुंदर दिसत आहे आणि खाली साधारण जंगलाचा भाग पण संपूर्ण चित्र निळाईत रंगल्यासारखं वाटत आहे
फोटो

हे सर्व दृश्य किती बघू आणि किती नको असेच होते
फोटो

सुंदर से निळे आकाश आणि मागे डोंगरांच्या कित्येक रांगा ......लांबून त्याही निळाईने रंगलेल्या वाटत होत्या ......
फोटो

निळाईची उधळण...

फोटो

वाटेत सुंदर वॉटर फॉल दिसला...

फोटो

या धबधब्यामध्ये पाणी भरपूर होते
फोटो

     तेवढ्यात एके ठिकाणी पेरियार धरणाचे बॅकवॉटर आम्हाला दिसले. टाटा टी चे चहाचे मळे त्याला लागूनच होते आणि त्या चहाच्या मळ्यांमध्ये आम्हाला दोन हरणे बागडताना दिसली. आम्ही गाडी थांबवली आणि घाटाच्या कठड्यावरती बसून त्या दृश्यांचा आस्वाद घेऊ लागलो. चहाचे मळे, त्याला लागून असलेले बॅक वॉटर आणि त्याच्या पलीकडे असलेले डोंगर आणि डोंगराच्या वरती असलेले निळेशार आकाश! असे वाटले इथून कधीही उठू नये!! आमच्याकडे दुर्बीण होती आणि आम्ही त्यातून पाहू लागलो तर आम्हाला त्या धरणाच्या बॅक वॉटर मध्ये तीन हत्ती पाणी पीत असताना दिसले. त्याचबरोबर एक हत्तीचे पिल्लू देखील होते. खाली जिथे बाण दाखवला आहे तिथे हरणाचे एक पिल्लू दिसत आहे.असे दोन पिल्ले आजूबाजूला बागडत होती .

फोटो

फोटो

फोटो

फोटो

     आम्हाला अलभ्य असा लाभ झाला होता! मुळात आम्ही थेकडीला बोट राईट घेणार नव्हतो. कारण मी बऱ्याच ठिकाणी वाचलं होतं की दोन-तीन तास फिरून देखील एकही प्राणी दिसत नाही. त्यामुळे आम्ही टेकडीला फक्त जंगलात नेचर वॉक करणार होतो, हत्तीवरून फिरणार होतो आणि तेथील मसाल्यांच्या मार्केटमध्ये फिरणार होतो. जे काही करायला मिळेल तो आमचा बोनस होता. कारण आम्ही कधी पोहोचू याची शाश्वती नव्हती. आम्ही तिथे थांबलेले बघून काही पर्यटकांच्या गाड्या देखील तिथे थांबल्या. आम्ही त्यांना सांगितले तिथे खाली हरणे आहेत. तसेच हत्ती देखील आहेत. त्यावेळी एक पर्यटक स्त्री म्हणाली आत्ताच आम्ही थेकडीला दोन तासाची बोट राईड करून आलो परंतु एकही प्राणी आम्हाला दिसला नाही,नशीब आमचं की इथे तरी आम्हाला काही प्राणी दिसले.

फोटो

फोटो

     आम्ही साधारण तासभर तरी तिथे थांबलो. कारण ते दृश्यच इतके नयनरम्य होते की तिथून उठावे असे वाटतच नव्हते. तेवढ्यात एक जंगली गवा तिथे पाणी पिण्यासाठी आला. आम्ही सर्वजण कठड्यावरती पाय सोडून निवांत बसलो होतो व त्या दृश्यांचा आनंद घेत होतो.

फोटो

तेथील जवळ एका नारळ पाणी पिणाऱ्या विक्रेत्याकडून नारळ पाणी पिण्यासाठी घेतले आणि साधारण तासा-दीडतासा नंतर आम्ही तिथून निघालो. त्यावेळी 12 वाजले होते.

      आम्ही जरा पुढे आलो आणि तिथे शमीभाईने गाडी टाटाटीच्या फॅक्टरीमध्ये नेली. समोरचे दृश्य बघून आम्ही स्तिमित झालो. कारण सुंदर नदी वाहत होती व त्याच्या काठावरती टी प्लांटेशन झाले होते. शमीभाई म्हणाला इथे आपण चहा वेचणाऱ्या बायकांच्या रूपात तुमचे फोटो सेशन करूयात. त्याने माझ्या सासूबाईंचा स्कार्फ विशिष्ट पद्धतीने डोक्यावरती बांधला. आता आम्ही थोडे चहा खुडणाऱ्या बायकांसारखे दिसत होतो. त्यांनी आमचे मस्त फोटोशूट केले. त्यातील काही फोटो-

फोटो

फोटो

     प्रवासातील दृश्य एन्जॉय करत करत आम्ही थेकडीला साधारण 3.00 वाजता पोहोचलो. पोहोचल्या पोहोचल्या तिथे हत्तीच्या सफारीची तिकिटे काढली. खूप गर्दी होती. टोकन नंबर नुसार आमचा नंबर यायला साधारण दीड ते दोन तास जाणार होते. त्यामुळे आम्ही तेवढ्या वेळात तेथीलच एका जवळच्या हॉटेलमध्ये जेवून घेतले. नॉर्थ इंडियन थाळी होती. बरी होती. जेवून आम्ही हत्तीच्या सफारीसाठी आलो. इथेच बाजूला कलारीपट्टू आणि कथकलीच्या शोची तिकिटे मिळणार होती. तथापि आम्ही हे शो आधीच पाहिले होते. हत्तीच्या सफारीसाठी किती वेळ जाईल हे माहित नव्हते. तसेच प्रवासाचा थकवा जाणवत होता, त्यामुळे नेचर वॉकचा बेत रद्द केला व संध्याकाळी केवळ मार्केटमध्ये फेरफटका मारू असा विचार केला. थेकडीमध्ये आम्ही जे हॉटेल बुक केले होते, तेथील मालकाला आम्ही उशिरा येत आहोत हे कळवले.
      हत्तीची सफारी अतिशय उत्तम झाली.
फोटो

फोटो

मसाल्याच्या बागेतून 15 मिनिटे हत्तीने आम्हाला फिरवून आणले.

फोटो

फोटो

मुलाने हत्तीच्या सोंडेतून पडणाऱ्या पाण्यात अंघोळ करून घेतली. त्याला खूप मजा वाटली.

फोटो

फोटो

हे सर्व प्रतिमाणशी 500 रुपयांमध्ये झाले. आंघोळीचे पाचशे रुपये वेगळे.
     त्यानंतर आम्ही आमचे हील व्ह्यू नावाचे हॉटेल होते, तिथे चेक-इन केले. मालक अतिशय सहकार्य करणारा होता. हॉटेलमधून समोर दिसणारे दृश्य अप्रतिम होते. कारण समोर उभा डोंगरच्या डोंगर दिसत होता. धुके दाटून आले होते.

फोटो

     खरंच असं वाटलं की थेकडीला अजून एक दिवस ठेवायला पाहिजे होता. त्या हॉटेलच्या आमच्या रूमच्या बाहेर मस्त मोठा व्हरांडा होता. तिथे बांबूच्या छान दोन खुर्च्या टाकून दिल्या होत्या. मी आणि माझा नवरा निवांत तिथे बसलो. समोरचे दृश्य एवढे सुंदर होते की काही बोलावे असे वाटत नव्हते.

फोटो

खरं म्हणजे मुन्नार मध्ये एक दिवस कमी करून तो थेकडीला एक दिवस वाढवायला हवा होता असे वाटले. केवळ हॉटेलमध्ये बसून देखील आम्ही राहिलो असतो तरी देखील समोरचे दृश्य बघतच आम्ही दिवस घालवला असता, इतके सुंदर दृश्य होते.
      रूम ताब्यात घेऊन बाकीचे सगळे सोपस्कार करेपर्यंत साडेसात वाजले होते. आम्ही मार्केटमध्ये फिरायला बाहेर पडलो. फिरून काही मसाले घेतले. हे मसाले स्वस्त नसले तरी चांगल्या दर्जाचे असतात. (खरं तर सासूबाईंना मात्र गावी वापरण्यासाठी मसाले घ्यायचे होते. मला मसाल्यांची खरेदी करण्यामध्ये फारसा इंटरेस्ट नव्हता. परंतु सासूबाईच्या इच्छे खातर मसाल्याची थोडीफार खरेदी झाली. घरी आल्यानंतर मी या मसाल्यांचा वापर करून मिसळ बनवली आणि फरक लगेच जाणवला. खड्या मसाल्यांचा सुंदर असा वास कटाला आला होता आणि मग इतके दिवस मी केरळमधील विविध हॉटेलमध्ये पदार्थ खात असताना मसाल्यांचा जो ताजेपणा जाणवत होता तो का जाणवत होता याचे उत्तर मिळाले. आपणही थोडे जास्तीचे खडे मसाले खरेदी केले असते तर बरे झाले असते असेही वाटून गेले....) तसेच मला मार्केटमध्ये बऱ्याच ठिकाणी गव्हाच्या हलवा दिसला. एका दुकानांमध्ये आम्ही मसाले व ड्रायफ्रूट हलवा व गव्हाचा हलवा विकत घेतला.

फोटो

      साधारण 80 ते 90 रुपये पाव किलो या दराने हा हलवा मिळतो.

फोटो

हा हलवा चवीला उत्तम लागतो. हा पदार्थ केरळला कुणी गेले तर मीस करु नये. तेवढ्यात समोर एक चाट वाला दिसला. त्याच्याकडे आम्ही पाणीपुरी, भेळ असे चाट खाल्ले. दुपारी उशिरा जेवण झालेले असल्यामुळे भूक फारशी नव्हती.
      त्यामुळे हॉटेलवर आलो आणि लवकर झोपी गेलो. कारण उद्या लवकर उठायचे होते. उद्या आम्हाला मुन्रो आयर्लंड येथे जायचे होते. गुगल मॅप चार तास दाखवत असले तरी आजच्या अनुभवावरून मला लक्षात आले होते की त्याहीपेक्षा जास्त वेळ लागू शकतो. शिवाय केरळ मधील रस्ते हे अरुंद असल्यामुळे तसेच ड्रायव्हरला 60 पेक्षा जास्त स्पीडने गाडी चालवण्यास कंपनीकडून बंदी असल्याने, ट्रॅफिक नसले तरीही ड्रायव्हर जास्त स्पीडने गाडी चालवत नाही. त्यामुळे उशीर लागणार आहे हे लक्षात घेऊन शमीभाईला सांगितले की उद्या सकाळी साडेसहा वाजता तयार रहा, आपल्याला लवकर लिहायचे आहे.मुनरो आयर्लंड च्या नितांतसुंदर अनुभवाची गोष्ट पुढील भागात.....

प्रतिक्रिया

छान भाग! निसर्गाचे फोटोज सुंदर आहेत. “सर्वना भवन” इथल्या नश्त्याचा फोटो विशेष आवडला 👍

अप्पम आणि परोटा हे दोन्ही पदार्थ केरळ आणि तामिळनाडूमध्ये चांगले मिळत असले तरी केरळचे अप्पम (पालप्पम) आणि परोटा (मलबार परोटा) माझ्या विशेष आवडीचे! केरळी लोकांच्या घरी पारंपरिक पद्धतीने तयार केल्या जाणाऱ्या अप्पमसाठी ज्यांच्या घरी ताडाचे झाड असेल ते ताज्या 'ताडीत' आणि ज्यांच्याकडे ते नसेल ते लोक आपल्या घरच्या काहीशा जून झालेल्या शहाळ्याच्या पाण्यात तांदूळ भिजवतात. शहाळ्याच्या वरच्या पातळ पापुद्र्याला छिद्र पाडताना सोड्याची बाटली उघडताना येतो तसा आत तयार झालेला गॅस 'स्स्स्स्स....' आवाज करत बाहेर पडेल ते शहाळे ह्यासाठी उत्तम मानले जाते.
ह्या दोन्ही प्रकारे बनवलेले अप्पम चवीला अप्रतिम लागत असले तरी ताडीत भिजवलेल्या तांदुळाचे अप्पम चवीला अधिक उजवे वाटतात आणि ह्या पारंपरिक पद्धतीत यीस्टचा वापर होत नसल्याने हॉटेलमध्ये मिळणाऱ्या अप्पमपेक्षा ते फारच छान लागतात.

माझ्या काही केरळी मित्रांच्या घरी असे अप्पम नाश्त्याला चटणी-सांबार बरोबर आणि जेवताना चिकनच्या रश्श्या बरोबर खायला मला आवडतात आणि मलबार परोटे हे तिथे कुर्मा, चिकन, बोकडाचे मटण, बीफ, पोर्क, अंडा/फिश करी वगैरे बरोबर खाल्ले जात असले तरी मला ते कुर्मा, चिकन किंवा अंडा करी बरोबर खायला आवडतात.

गेल्या अडीच-तीन दशकांपासून अप्पम आणि परोटे हे पदार्थ बऱ्याच स्नॅक कॉर्नर्स मध्ये छान मिळत असल्याने अनेक डोंबिवलीकरांच्या ते चांगल्याच परिचयाचे आणि आवडीचे आहेत. त्यात गेल्या काही वर्षांपासून बाजारात 'फ्रोझन मलबार परोटेही' मिळू लागल्याने चांगली सोय झाली आहे.

बाकी सांबारचे म्हणाल तर आंध्र प्रदेशातल्या खूपच पातळ आणि कर्नाटकमधलया विशेषतः उडपी पातळ व गोडसर सांबारपेक्षा केरळ आणि तामिळनाडूमधले दाटसर सांबारच चवीला बेस्ट असे माझे वैयक्तिक मत 😀

श्वेता२४'s picture

26 Jul 2024 - 2:05 pm | श्वेता२४

अप्पम बनवण्याची ही प्रोसेस माहित नव्हती. आता कळाले की अप्पम चा आंबटपणा आहे तो इतरांपेक्षा वेगळा का असतो. डोसा आणि अप्पमच्या चवी मध्ये खूप फरक आहे. धन्यवाद

सुंदर वर्णन! हत्तीला आंघोळ घालायला मुलांना खूप आवडेल.
केरळी पदार्थ गव्हाचा हलवा,अप्पम तूनळीवर शोधायला हवे.
खडे मसाले...अर्थात उत्तमच असणार केरळ मसाल्यांची राजधानी आहे!

श्वेता२४'s picture

26 Jul 2024 - 2:06 pm | श्वेता२४

तुमचा प्रतिसाद वाचल्यानंतर गव्हाच्या हलव्याचा फोटो चढवला आहे.

गव्हाचा हलवा केलाय,भक्तीघाईत जरा लवकर सेट झाला का पाहण्याची उचापती केली.तेव्हा संध्याकाळी पाहते वड्या पडतात का? 😅 प्रयोग यशस्वी झाल्यानंतर पाककृती फोटो दिले जातील 😇
धन्यवाद अशाच नाविन्यपूर्ण पाककृती द्या!

म्हणजे संध्याकाळपर्यंत वाट पाहते.नाहीतर नंतर परत करून पाहते.

श्वेता२४'s picture

27 Jul 2024 - 3:07 pm | श्वेता२४

तुम्ही करूनही पाहिलेत ? तुमच्या पाककृतीच्या प्रतीक्षेत!!

Bhakti's picture

27 Jul 2024 - 9:47 pm | Bhakti

केरळा स्टाईल गव्हाचा हलवा,ही घ्या पाककृती -
https://www.misalpav.com/node/52375

कर्नलतपस्वी's picture

26 Jul 2024 - 1:14 pm | कर्नलतपस्वी

कुठला छायाचित्रक वापरता. प्रकृतीच्या अप्रतिम रंगाची उधळण जशीच्या तशी टिपली आहे.

छायाचित्रातील निळ्याशार नभाने वेड लावले आणी अनेक दिग्गज,मान्यवर कविवर्यांची निळाई बद्दल ची समज आणी त्यानीं रेखाटलेली शब्द चित्रे मनात नाचू लागली. त्या पैकी काही इथे आपल्या छायाचित्रणाच्या सन्मानार्थ....

बा भ बोरकर म्हणतात....

निळा - बा. भ. बोरकर

एक हिंवटीचा निळा, एक धुवटीचा निळा,
दूर डोंगरांचा एक जरा त्यांच्याहून निळा,
मोरपिसाच्या डोळ्याचा एक मखमाली निळा,
इंद्रनिळांतला एक गोड राजबिंड निळा,
विसावल्या सागराचा एक ओलसर निळा,
आकाशाच्या घुमटाचा एक गोलसर निळा...

असे नानागुणी निळे किती सांगू त्यांचे लळे?
ज्यांच्यामुळे नित्य नवे गडे तुझे माझे डोळे :
जेथे उगवे मावळे त्यांचा लावण्यसोहळा....

माझे अतिशय आवडते कवी ग्रेस,महादु:खाचा दुर्बोध कवी अशी उपाधी लाभलेला,तरी त्यांची ही कवीता सहज आकलनात येते. ते म्हणतात...

ग्रेस - निळाई

असे रंग आणि ढगांच्या किनारी
निळे ऊन लागे मला साजणी
निळे घाटमाथे निळ्या राउळांचे
निळाईत माझी भिजे पापणी

निळ्याशार मंदार पाउलवाटा
धुक्याची निळी भूल लागे कुणा?
तुला प्रार्थनांचे किती अर्ध्य देऊ 
निळ्या अस्तकालीन नारायणा?

निळे गार वारे जळाची शिराणी
निळ्या चंद्रओवीत संध्या डुले
निळे दुःख चोचीत घेऊन आली
निळ्या पाखरांची निळी पाउले

निळे सूर आणि निळी गीतशाळा
निळाईत आली सखीची सखी
निळ्या चांदण्याने निळ्या चंदनाची
भिजेना परी ही निळी पालखी...

किती खोल आणि किती ओल वक्षी
तुझा सूर्य आणि तुझे चांदणे?
प्राणातले ऊन प्राणात गेले
तुझ्या सागराची निळी तोरणे...

शब्दांचे ओझे आणी रंगाचे इद्रंधनू यांना सहज लिलयेने पेलणारे कवी आणी चित्रकार सुधीर मोघे यांचा निळा काही वेगळाच....

सुधीर मोघे-

झुलतो बाई रास झुला
नभ निळे,रात निळी,कान्हाही निळा

गंगाधर महाम्बरे यांचा तिसर्‍याच प्रकारचा निळा...

गंगाधर महाम्बरे-

निळा सावळा नाथ
तशी ही निळी सावळी रात
कोडे पडते तुला शोधता
कृष्णा अंधारात ...

काळाच्या पडद्याआड गेली तरी स्मृतीत वेरुळच्या शिल्पा प्रमाणे अवीट,अमर गायिका कुंदा बोकील यांनी या निळ्याशार निळ्याला वेगळ्याच उंचीवर नेऊन ठेवलाय.

माफ करा छायाचित्रातील निळा रंग पाहून थोडा वहावत गेलो.आणखीन बरीच उदाहरणे देता येतील.

लेख आवडला हे वेगळे सांगत नाही.

अनन्त्_यात्री's picture

28 Jul 2024 - 9:35 am | अनन्त्_यात्री

कवितेबद्दल धन्यवाद!

श्वेता२४'s picture

26 Jul 2024 - 2:14 pm | श्वेता२४

तुम्हाला दंडवतच घातला पाहिजे. किती सुंदर लिहिलं आहे. निळ्या या शब्दावरून इतक्या सुंदर कविता आहेत तुमच्यामुळे आजच माझ्या वाचनात आल्या.
कुठला छायाचित्रक वापरता. प्रकृतीच्या अप्रतिम रंगाची उधळण जशीच्या तशी टिपली आहे.
Samsung m33/32 आमच्या मोबाईल वरूनच टिपले आहेत माझा M33 मिस्टरांचा M32 आहे परंतु बरेच सुंदर जी चित्र आहेत ती मिस्टरांनी टिपलेली आहेत. त्यांना फोटो काढायला चांगले जमतात.

गोरगावलेकर's picture

27 Jul 2024 - 2:19 pm | गोरगावलेकर

फोटो अप्रतिम . छान वर्णन आणि टर्मिनेटर व कर्नल तपस्वी यांचे प्रतिसादही आवडले.

खरं म्हणजे थेकडी येथे भविष्यात मी नक्की पुन्हा भेट देणार आहे व राहिलेल्या सर्व ऍक्टिव्हिटी पूर्ण करणार आहे जसे की जंगल वॉक ,

जरूर करा. जंगल वॉक चा आमचा अनुभव भारी होता . येथील जंगलात खूप जळू/जळवा आहेत. चालतांना बूट आवश्यक. बुटांपासून गुडघ्यापर्यंत दोन्ही बाजूस बांधता येईल जाड कापडी पिशवी लावूनच चालायचे . तरीसुद्धा कुठूनतरी काही जळू अंगाला चिकटतातच. जळू काढून टाकली तरी रक्त लवकर थांबत नाही.

प्रचेतस's picture

27 Jul 2024 - 3:02 pm | प्रचेतस

हा भागही आवडला, केरळचं निसर्गसौंदर्य छानपैकी उलगडून दाखवलं आहे.

श्वेता२४'s picture

27 Jul 2024 - 3:09 pm | श्वेता२४

प्रतिसादासाठी मनःपूर्वक धन्यवाद!!

चौथा कोनाडा's picture

27 Jul 2024 - 6:03 pm | चौथा कोनाडा

हिरवेगार चहाचे मळे.... त्याच्यामागे उभे असलेले उंच पहाड आणि वरती निळे शार आकाश......

मुन्नार "थेकडी". इथला निसर्ग बघून डोळे तृप्त जाहले !

मस्त झक्कास ओघवतं लिहीत आहात ! आणि फोटो, लै भारी .. बोले तो एक नंबर !

पुढील भागाच्या प्रतीक्षेत !

श्वेता२४'s picture

27 Jul 2024 - 7:11 pm | श्वेता२४

पुढचा भाग लवकर टाकण्याचा नक्की प्रयत्न करेन.

श्वेता व्यास's picture

31 Jul 2024 - 5:45 pm | श्वेता व्यास

तिसरा दिवसही छान व्यतीत केलात, त्या पाण्याच्या सफारीत खरंच कोणाला काही दिसत नाही असं वाटतंय :D
बाकी केरळ नैसर्गिक सुंदर तर आहेच, पण पर्यटन चांगलंच डेव्हलप केलंय तिथल्या लोकांनी.
कुठे लोकांना पैसे काढायलाच लावायचे ते बरोबर करतात :)
आमच्या ड्रायवरचा पहिल्याच दिवशीचा एक किस्सा: आम्ही मध्ये थांबून पाण्याची बाटली घेतली होती, अजून पाणी पितच होतो, तर तो म्हणे पाण्याची बाटली गाडीतून बाहेर रस्त्यात टाकू नका. आम्ही त्याच्याकडे आश्चर्याने पाहिलं अशा अर्थाने की आम्ही का कचरा बाहेर रस्त्यात टाकू, ते त्याला बरोबर समजलं तो म्हणे, वाईट वाटून घेऊ नका पण नॉर्थ इंडियन्सना सवय असते अशी, इथे आम्ही खूप मेहनत घेतो सगळं स्वच्छ, सुंदर ठेवण्यासाठी. मग आम्ही उत्तर भारतीय नसून मराठी आहोत सांगितल्यावर त्याच्या बऱ्याच सूचना कमी झाल्या :)

श्वेता२४'s picture

1 Aug 2024 - 12:09 pm | श्वेता२४

टेकडी मधील बोटिंग मध्ये प्राणी दिसणे हा नशिबाचा भाग असतो. कारण प्राण्यांच्या पाणी पिण्याच्या वेळेला ते तिथे आले तर ते दिसू शकतात. आम्ही जिथे बॅक वॉटर च्या ठिकाणी थांबलो होतो तिथे 3हत्त्ती व त्यांचे पिल्लू अंघोळ करण्यासाठी आले होते. गवा,एक जंगली घोडा(? तसेच काहीसे दिसत होते:)),असे पाणी पिण्यासाठी आले होते. खाली हरणे तर बागडतच होती. हत्ती जवळपास अर्धा तास तिथे डुंबत होते. अर्थात ते बरेच लांब असले तरी दुर्बिणीमुळे त्यांना व्यवस्थित पाहणे शक्य झाले. थोडक्यात काय बरेच नशीब आणि योगायोगाचा भाग असतो हा!