कृष्ण निळा निळा
बासुरीचा लावितो लळा..
जन्माष्टमीच्या शुभेच्छा!!
कृष्ण(विष्णू )का तो निळा आहे? कोणी म्हणतो कालिया नागाच्या विषामुळे तो निळा झाला.कोणी म्हणे तो सागरात राहतो म्हणून..
पण कृष्णच काय,रामही निळा होता.एवढचं काय तर पहिल्या वनवासानंतर आणि महाभारतानंतर पांडव जेव्हा पुन्हा वानप्रस्थाश्रमाला निघाले.तेव्हा युद्धिष्ठिरही निळा होत गेला.तो तर देवही नव्हता?
आता हे सर्व आपल्याला असे समजते तर या गोष्टींवरून काढलेल्या चित्रांमुळे,हो पण सर्व निळे का?
ते सर्वज्ञ होते.सर्व गोष्टींचे ज्ञान त्यांना आहे .सुख -दु:खाच्या पलीकडे ते गेले ,स्वधर्माची संपूर्ण जाणीव झाली.त्यांनी स्वतःमध्ये ते ज्ञान सामावून घेतले.त्यांच्या ज्ञानाची सीमा आकाशाप्रमाणे,सागराच्या तळाप्रमाणे थांग न लागणारी होती.म्हणून निळ्या नभासम ते निळे !! युद्धिष्ठिरला धर्माचे, स्वत्वाचे संपूर्ण ज्ञान झाल्याने तोही निळा जाहला.
एक विज्ञान शिक्षिका असल्याने जरा ,ध्यानभंग करते ;):)
सूर्यप्रकाश पृथ्वीच्या वातावरणात पोहोचतो आणि हवेतील सर्व वायू आणि कणांद्वारे सर्व दिशांना विखुरला जातो. निळा प्रकाश इतर रंगांपेक्षा जास्त विखुरलेला आहे कारण तो लहान, लहान लहरी म्हणून प्रवास करतो. त्यामुळेच आपल्याला बहुतेक वेळा निळे आकाश दिसते.
वसंत बापट यांची या निळ्या रंगावर एक अफलातून कविता / गीत आहे . त्यांनाही समजलं अंतरंग निळा म्हणून तो निळा :)
देव माझा निळानिळा |
देव माझा निळानिळा, डोळे माझे निळे
माझा समुद्रही निळा, आभाळही निळे
श्रावणाच्या खुळ्या धारा आल्या तशा गेल्या
तेव्हा ओल्या उन्हातून मोर आले निळे
आश्विनात आठ दिशा निळ्यानिळ्या झाल्या
नदीकाठी लव्हाळ्यांना तुरे आले निळे
फूलवेड्या वसंताची चाहूल लागली
निळ्यानिळ्या फुलांवरी पाखरू ये निळे
कशी बाई सावळ्याची जादू अशी निळी?
श्रीरंगही निळे आणि अंतरंग निळे
गीतकार-वसंत बापट
https://youtu.be/ro8xrNs9A0o?si=ZVhyKJdcpzKliS4h
-भक्ती
इथे अश्विनात आठ दिशा निळ्या निळ्या झाल्या असे का म्हटलं आहे?
प्रतिक्रिया
26 Aug 2024 - 1:25 pm | प्रचेतस
पण कृष्ण श्यामवर्णी अर्थात काळा असे महाभारत, हरिवंश आणि भागवतात वर्णन आहे. निळा रंग कुठून आला?
26 Aug 2024 - 2:01 pm | Bhakti
बाई ग! तुम्ही तर लेखच सपेशल पाडून टाकला ;)
हो तो ग्रंथानुसार सावळा ,काळाच आहे.पण चित्रात,अनेक गीतांमध्ये तो निळा दाखवतात ना.
.
पण युद्धिष्ठिर वनवासानंतर निळा झाला होता असं एका फोटोत मी पाहिलं,गोष्ट वाचली.
26 Aug 2024 - 1:38 pm | टर्मीनेटर
कदचित कविता प्रसवताना कविने दोन ऐवजी चार पैशांची भांग घेतली असावी किंवा त्याक्षणी अतिनील किरणांची (Ultraviolet Rays) वेव्हलेंथ काही कारणाने अचानक वाढल्याने कविला सगळा आसमंत निळा निळा झाल्याचे दिसले असावे 😀 😀 😀
26 Aug 2024 - 1:55 pm | Bhakti
हा हा!असेल असेल!
काल मी एक भयपट पाहत होते त्यात भूताची बाधा झाली की हिरोईनला सगळ जग लाल लाल दिसायचं,तसं असेल हे :)
26 Aug 2024 - 2:06 pm | प्रचेतस
बापट सज्जन कवी हो
26 Aug 2024 - 2:10 pm | Bhakti
ओह,वेरी वेरी सॉरी.,जरा गंमत.तरी मी म्हटलं ना इतकं मोठं लिहावं लागतं हे असं का ते असं का? पण बापटांची प्रतिभा पहा 'अंतरंग निळा , म्हणून हे सर्व निळे ,श्रीरंगही निळा भासत आहे ' वाहवा!!
26 Aug 2024 - 2:15 pm | टर्मीनेटर
अच्छा! म्हणजे साक्षात बाळ गंगाधर टिळकांनी ठरवुन दिलेल्या भांगेच्या मात्रेचे उल्लंघन त्यांच्याकडुन होणे कदापि शक्य नाही, मग तुम्ही खाली दिलेले कारण/अर्थच योग्य असावा 😀
26 Aug 2024 - 1:49 pm | प्रचेतस
पाऊस थांबलेला असतो, मेघ दिसेनासे झालेले असतात सर्व आकाश धूळरहित झाल्याने स्वच्छ झालेले असते त्यामुळे अश्विनात सगळे आभाळच निळे झालेले दिसते म्हणून सर्व आठ दिशा निळ्या असे म्हटलेले आहे.
26 Aug 2024 - 1:53 pm | Bhakti
वाह!
26 Aug 2024 - 2:24 pm | Bhakti
https://youtu.be/8CpM-LshANI?si=dBpyyOsWVthu7opr
निळासावळा नाथ, तशी ही निळी सावळी रात
कोडे पडते तुला शोधिता कृष्णा अंधारात
तुडवूनि वन, धुंडुनी नंदनवन
शोधुनि झाले अवघे त्रिभुवन
एक न उरले गोपीचे घर हाकेच्या टप्प्यात
नील जळी यमुनेच्या साची
होडि सोडिली मी देहाची
गवसलास ना परि तू कान्हा लाटांच्या रासांत
-गंगाधर महाम्बरे
या गीताप्रमाणे तसेच प्रचेतस यांनाही सांगितल्याप्रमाणे कृष्ण (इतरही )निळा न म्हणता निळा सावळा असा उल्लेख यापुढे करेन :)
26 Aug 2024 - 2:44 pm | Bhakti
पंढरपुरींचा निळा लावण्याचा पुतळा ।
विठो देखियेला डोळां बाईयेवो ॥१॥
वेधलें वो मन तयाचियां गुणीं ।
क्षणभर विठ्ठलरुक्मिणी न विसंबे ॥२॥
पौर्णिमेचें चांदिणे क्षणक्षणा होय उणें ।
तैसें माझे जिणें एक विठ्ठलेंविण ॥३॥
बापरखुमादेविवरु विठ्ठलचि पुरे ।
चित्त चैतन्य मुरे बाईये वो ॥४॥
-ज्ञानेश्वर माऊली
आता मात्र काहीच कळेना खुद्द माउलींनाही विठू निळा दिसतोय!!
26 Aug 2024 - 2:55 pm | Bhakti
https://youtu.be/p0h2BBrkYW0?si=QzQnSI3u0I2-baby
26 Aug 2024 - 3:01 pm | श्वेता२४
समयोचित लेख
26 Aug 2024 - 5:27 pm | कंजूस
डोक्यावरून
26 Aug 2024 - 5:56 pm | भागो
घन नीळा लडिवाळा झुलवू नको हिंदोळा