या आधीचे भाग
2)केरळ कन्याकुमारी लेखमाला: दिवस पहिला
3)केरळ कन्याकुमारी लेखमाला: दिवस दुसरा
4)केरळ कन्याकुमारी लेखमाला: दिवस तीसरा
5)केरळ कन्याकुमारी लेखमाला: दिवस चौथा
दुसऱ्या दिवशी सकाळी आम्ही सर्फिंगला तिथल्याच एका जवळच्या बीचवर गेलो. ज्या बीचवर आम्ही गेलो होतो तो वरकला पासून तीन चार किलोमीटर लांब होता आणि तिथे पाण्याची उंची फार काही नव्हती. कमरेपेक्षा जास्त पाणी तिथे होते. बरेचसे देशी विदेशी पर्यटक तिथे आधीपासूनच सर्फिंग करत होते. सकाळी सात ते आठ असा एक तासाचा वेळ होता.
तेथे गेल्यावर त्यांनी आम्हाला स्विमिंग ड्रेस ,त्याचबरोबर सर्फिंग पॅड , त्यावर कसे उभे राहायचे, लाट आल्यानंतर नेमके काय करायचे, अशा पद्धतीच्या काही सूचना दिल्या व हलका व्यायाम करून घेतला. आमच्या सोबत अजून दोन नवरा बायकोचे ग्रुप होते. खरंतर त्या सर्व्हिंग पॅड वरती पूर्णपणे हात वर करून आडवे झोपायचे आणि लाट आल्यानंतर पटकन हात छाती खाली घेऊन पाय न वाकवता उभे राहून तोल सांभाळायचा अशा पद्धतीच्या पाच ते सहा वेळा प्रॅक्टिस करून घेतले.
त्यावेळी ते सहज जमले कारण आम्ही वाळूवर होतो. नंतर आम्ही आमचे सरफिंग पॅड हातात घेऊन समुद्रात गेलो. एक माणूस समुद्राच्या काठावर देखरेखीसाठी उभा होता आणि तीन-चार मदतनीस समुद्रात आमच्या मदतीसाठी होते.
मी, माझा नवरा आधी आत गेलो. मुलाला त्यांनी सगळ्यात शेवटी थोडा वेळ देणार असे सांगितले. साधारण छातीला लागेल एवढ्या पाण्यामध्ये आम्ही त्या सर्फिंग पॅड वरती आडवे झोपलो आणि लाट कधी येते आहे हे पाहू लागलो. मदतनीस लोकांनी पॅड धरले होते आणि लाट आली की ते सोडणार होते व आम्हाला त्यासाठी वरती उभे राहण्यासाठी सांगितले होते. आणि लाट आली ……. लाट येताच मी छातीखाली दोन्ही हात घेऊन उभे राहण्याचा प्रयत्न केला तर निश्चितपणे मी आता पाण्यावरती होते त्यामुळे ते सर्फिंग पॅड एका दिशेला म्हणजेच उजव्या बाजूला कलंडले आणि मी पाण्यात पडले…….!!! पाण्यात पडल्यानंतर तेथील रेती वरती उभे राहायचे असे आम्हाला सांगितले होते. पण मी उभे राहण्याचा प्रयत्न करताच पायाखालची वाळू सरकून जात होती. मी हातपाय मारत होते आणि जवळपा पंधरा सेकंद पाण्याखाली होते. मग तिथल्या इन्स्ट्रक्टरने जवळ येऊन मला पाण्याबाहेर काढले. हा अनुभव माझ्यासाठी अत्यंत भयानक होता. याचे कारण म्हणजे त्या पॅड वरती उभा राहणे हा काही खेळ नाही. आणि एका दिवसात अशा प्रकारचे कौशल्य येणे हे केवळ अशक्य आहे. तिथे अनेक परदेशी पर्यटक या सगळ्या गोष्टी सहज करत होते. पण आम्हाला काही या गोष्टी जमत नव्हत्या. माझ्या मिस्टरांनी त्यातल्या त्यात बऱ्यापैकी ते जमवले. जमवले म्हणजे काय , तर पहिल्या लाटेतच त्यांना कळाले की या पॅड वर उभे राहता येणे शक्य नाही. तेव्हा त्यांनी लाट येतात पॅड वरती तसेच झोपून राहत होते व लाटांवर तरंगण्याचा आनंद घेत होते. त्यांचे काय चालले आहे याकडे माझे लक्ष नव्हते. परंतु मी मात्र पाण्यात बुडतच होते. सोबतच्या इन्स्ट्रक्टरने दोन-तीन वेळेला मला बुडता-बडता बाजूला काढले. शेवटी ते म्हणाले की तुम्ही हे करू नका जमणार नाही. चुकून तुम्ही बुडाल. जवळपास चार ते पाच वेळा मी समुद्राच्या आतल्या पाण्यामध्ये दहा-पंधरा सेकंद बुडले होते. त्यामुळे आता पाण्यात पडले तर बुडण्याची भीती राहिलेली नाही.
मी निमूटपणे किनाऱ्यावर येऊन सासूबाईंच्या जवळ उभी राहिले. त्या खरच खूप घाबरल्या होत्या आणि माझे बुडणे पाहून त्या म्हणाल्या मी काही हे करणार नाही. मग तिथेच एका सर्फिंग पॅड वरती मी सासूबाईंना आपण फोटो काढूयात म्हणले त्यावर समुद्रकिनाऱ्यावर उभे असलेला सरफिंग इन्स्ट्रक्टर मात्र ओरडला की असे काही करू नका मी सांगेन त्याच वेळेला फोटो काढा ते धोकादायक आहे, असे सांगू लागला. मला कळेना की यात काय नेमकं धोका आहे. तो आगाऊपणा करतोय असं मला वाटायला लागलं . एक दहा पंधरा मिनिटे गेली असतील आणि तेवढ्यात अचानकच एक मासेमारीची बोट जोरात आल्यावर ती त्यांनी सर्व सर्व्हिंग करणाऱ्यांना बाजूला व्हा बाजूला असे जोरजोरात बोलून बाजूला व्हायला सांगितले. आम्हाला कळेना नेमकी काय झाले . ती बोट आडवी तीडवी अशी कशीपण येत होती आणि शेवटी कशीतरी करून ती किनाऱ्याला लागली. किनाऱ्यावरचे सगळे ममच्छीमार धावत तिकडे गेले आणि त्यांनी ती बोट अडवली होती. मी त्यांना विचारले की एवढे तुम्ही का घाबरलात? हे तर तुमचं रोजचं काम असेल की बोट कुठे पार्क करायचे? बाकीच्यांना बाजूला व्हायला का सांगत होता ? त्यावेळी त्यांनी एक भयानक गोष्ट सांगितली ती म्हणजे त्या बोटीला आतून ब्रेक नसतो म्हणे!!!! त्यामुळे वाटेत जर कोणी आलं तर त्यांना ती पूर्ण धडकूनच जाते. याआधी तिथे असे अनेक अपघात झालेले आहेत. तसेच यामध्ये कित्येक विदेशी पर्यटकांची हाडे फ्रॅक्चर झालेली आहेत. असे त्यांनी सांगितले. ते ऐकल्यानंतर मात्र मला खरंच भीती वाटली. हे सरफिंग च खुळ उगाच आपण काढलं असं मला वाटलं. हे अत्यंत रिस्की आहे. कारण तिथे सर्फिंग करणाऱ्या कंपन्या कितीही काळजी घेत असल्या तरी बऱ्याच गोष्टींवर त्यांचा कंट्रोल नाही हे स्पष्ट दिसत होतं.
मुलाला मात्र पहिल्याच झटक्यात सरफिंग पॅड वर उभे राहता आले. त्याने तीन ते चार वेळा सर्फिंगचा आनंद घेतला.
तथापी तो लहान असल्यामुळे त्यांनी त्यापेक्षा जास्त वेळा त्याला ते करू दिले नाही. थोडेफार फोटो शूटिंग करून व समुद्राच्या पाण्यात खेळून एकंदरीतच सरफिंग साठी घातलेले पैसे पुरेपूर वसूल केले .असो. कोणी फॅमिली येथे जाणार असाल तर त्यांना हे सर्व माहिती असावे म्हणून मी मुद्दाम हे लिहीत आहे. फॅमिली साठी वर्कला ही जागा योग्य नाही असं माझं निरीक्षण आहे.
साधारण साडेनऊ ते दहा वाजता रूमवरून आंघोळ करून नाश्ता करण्याकरता कालच्याच हॉटेलमध्ये पोहोचलो. तेथे केरळाचा पारंपारिक नाश्ता पुट्टु आणि कडला करी म्हणजेच चण्याची उसळ या वरती ताव मारला.
हा पट्टू, कडला करी व व्हेज कुर्मा यासोबत दिला होता. आम्ही पापड वेगळ्याने मागून घेतले. पुट्टूला स्वतःची अशी वेगळी काही चव नसते. तांदळाचे पीठ त्यावरती ओल्या नारळाचा कीस परत तांदळाचे पीठ त्यावर ओल्या नारळाचा कीस अशा एका साच्यामध्ये भरून तो वाफवून काढतात. त्यामध्ये कडला करी व पापड मिक्स करून खातात. या हॉटेलमधली कडला करी अतिशय चविष्ट होती. अजिबात स्पायसी नव्हती . आम्ही एक्स्ट्रा मागून घेतली . पोटभर नाश्ता करून तृप्त मनाने आम्ही बाहेर पडलो.
त्यानंतर जटायू अर्थ सेंटर कडे प्रस्थान केले. जटायू अर्थ सेंटर हे वर्कला पासून साधारण दीड तासाच्या अंतरावर आहे. आता थोडे जटायू अर्थ सेंटर बाबत…. जटायूचे हे शिल्प एखाद्या पक्ष्याचे असलेले आशियातील सर्वात मोठे शिल्प आहे. या शिल्पाचे शिल्पकार आहेत राजीव अंचल. हे शिल्प दोनशे फूट लांब दीडशे फूट रुंद व 70 फूट उंच आहे. जर आपण त्रिवेंद्रमच्या आसपास असाल तर हे पर्यटन स्थळ अजिबात चुकवू नये असेच आहे.
आम्ही तिथे साडेबाराच्या सुमारास पोचलो. तेथे केबल कारने जटायूच्या शिल्पा जवळ जावे लागते.
केबल कारने शिल्पा जवळ पोहोचण्यासाठी साधारण दहा ते पंधरा मिनिटे लागतात. वाटेतील दृश्य ही अत्यंत सुंदर आहेत. केबल कार साठी साधारण आम्हाला 15 ते 20 मिनिटे थांबावे लागले.
केबल कार मधून जटायू शिल्पाचे होणारे पहिले दर्शन
वरती राम लक्ष्मण सीतेचे देऊळ आहे. श्रीरामाचे प्रत्यक्षातले दगडात उमटलेले पाय आहेत असे म्हणतात.
साधारण हे सर्व पाहून आम्हाला तिथून परत यायला दुपारचे दोन वाजले.
आम्हाला आता कन्याकुमारीला जायचे होते . शमी भाई ने आम्हाला सुचवले की त्याला कन्याकुमारीला जाण्यासाठी गाडीचे परमिट काढावे लागते तेवढ्या वेळात तुम्ही पुवरला बोटिंग करून घ्या. म्हणजे आपल्याला परत उलटे तिकडे यायला नको .आम्ही ते मान्य केले आणि पूवरला साधारण आम्ही पाच वाजता पोहोचलो. पूवर वरून आम्ही एक बोट ठरवली. ते आम्हाला गोल्डन सँड बीच, एलिफंट रॉक व मदर मेरी या पॉईंट वरती नेणार होते. तेथे आम्हाला सूर्यास्त पाहता येणार होता .
हा देखील एक अविस्मरणीय व न चुकवू नये असा अनुभव ठरला. जरी मुनरो आयलँड मध्ये आपण बोटिंग केले तरीही पूवर मध्ये स्पीड बोट ने केलेले बोटिंग हा एक वेगळा अनुभव होता. दोन्ही ठिकाणी तेच पक्षी, प्राणी दिसत असले तरीही निसर्ग अत्यंत वेगळा आहे !!!
आम्हाला तुलनेने संध्याकाळची वेळ असल्यामुळे खूप भरपूर असे पक्षी दिसले.
अत्यंत घनदाट अशा खारफुटी जंगलातून आपण जात आहोत असा अनुभव तिथे येतो. जो मुनरो आयलंड मध्ये येत नाही…
इथले पाणी जरी गढूळ असले तरी झाडी मात्र घनदाट आहे.
शेवटी आम्ही गोल्डन सँड बीच वरती पोहोचलो . येथे एका बाजूला नेयर नदी आणि एका बाजूला अरबी समुद्र आणि मधेच तो बीच आहे . हे दृश्य फार सुंदर आहे!!!
आम्ही येथे सूर्यास्ताचे अत्यंत मनोहर असे दृश्य पाहिले!!! आणि परत निघालो .
येताना हा एलिफंट रॉक दिसतो. याचा आकार हत्तीसारखा आहे म्हणून याला एलिफंट रॉक म्हणतात .
मदर मेरी
क्लब महिंद्रा चे फ्लोटिंग रिसॉर्ट
परतत असतानाची काही सुंदर निसर्ग चित्रे
.अत्यंत तृप्त मनाने आम्ही कन्याकुमारी कडे प्रस्थान केले ….त्यावेळी संध्याकाळचे सात वाजले होते. पूवर येथील बोटिंग मुळीच चुकवू नये आणि शक्यतो संध्याकाळी किंवा पहाटे लवकर बोटिंग करायला मिळेल हे पाहावे असे सुचवेन. कारण या वेळेला पक्ष्यांची संख्या खूप जास्त असते. तसेच तुम्हाला सूर्योदय व सूर्यास्त पाहता येईल. जो अत्यंत सुंदर व मनोहर आहे.
कन्याकुमारीला जाताना आम्हाला वाटत चित्रा नावाचे एक हॉटेल सापडले. हे हॉटेल जर कोणी जाणार असेल तर जेवणासाठी मुळीच चुकवू नये असे आहे. इथला मेदुवडा हा मी आतापर्यंत खाल्लेला जगातील सर्वोत्तम मेदुवडा आहे. हा मेदू वडा इतका चांगला होता की तो नुसताच खावा अशी त्याची अत्यंत फ्रेश चव होती .मेदुवडा फस्त करून झाल्यानंतर लक्षात आले की अरे आपण तर फोटो काढलाच नाही. त्यामुळे याचा फोटो माझ्याकडे नाही . येथेही आम्ही मलाबार पराठा व पनीरची भाजी, तसेच मशरूम फ्राईड राईस घेतला.
फारच चविष्ट होता. पुन्हा इथे जेवायला यायचे हे आम्ही ठरवले. मुळात हे हॉटेल तमिळ थाळी साठी प्रसिद्ध होते. त्यामुळे पुन्हा येताना इथे जेवायला मिळाले तरी यायचे हे ठरवूनच आम्ही निघालो. कन्याकुमारीला आम्ही पोहोचलो तेव्हा रात्रीचे नऊ वाजले होते. चेकइन करून आम्ही सामान टाकले आणि निद्रादेवीच्या आधीन झालो . उद्या आम्हाला कन्याकुमारी येथील स्थळ दर्शन करायचे होते. कन्याकुमारीच्या अप्रतिम स्थलदर्शनाची गोष्ट पुढील भागात…..
प्रतिक्रिया
15 Aug 2024 - 8:15 pm | श्वेता२४
हा धागा तसेच या लेखमालेचा आधीचा भाग कृपया भटकंती या सदरामध्ये हलवावा.
15 Aug 2024 - 10:28 pm | कर्नलतपस्वी
किंगफिशर, डार्टर व इतर पाणपक्षी सह फोटो छान आलेत आहेत.
16 Aug 2024 - 9:38 am | श्वेता२४
प्रतिसादासाठी धन्यवाद....
18 Aug 2024 - 7:33 pm | गणेशा
अप्रतिम .. मस्त वाटाले सर्व पाहुन .. माझय जुन्या केरळ ट्रिप च्या आठवणी जाग्या झाल्या ...
18 Aug 2024 - 9:03 pm | श्वेता२४
प्रतिसादासाठी मनःपूर्वक धन्यवाद. खरंतर मिपावरील कंजूसजी, समीरसूर यांच्याकडून व्यक्तिगत संदेशाद्वारे केरळ सहली बद्दल माहिती मिळवली होती. शिवाय, मिपावरील तुमचे लेख आणिही कुणाचे तरी लेख आहेत मला आता नाव आठवत नाही. ते लेख वाचूनच मी केरळ सहलीचे नियोजन केले आहे. तुम्ही त्यावेळी लेखमाला लिहिली म्हणून बरं झालं. त्याचा खूप फायदा झाला. त्यामुळे तुम्हाला देखील मनापासून धन्यवाद!!
19 Aug 2024 - 8:42 am | कंजूस
सहल आयोजन, डिटेल्स आणि भरपूर फोटो पाहून केरळला जावेसे वाटेल.
कोणत्याही सहल आयोजकांबरोबर एकगठ्ठ्याने जाण्यापेक्षा चांगली योजना आहे.
-----------------------
कंकणाकृती सूर्यग्रहण १६ जानेवारी २०१० कन्याकुमारी येथून चांगले दिसणार होते.
ही बातमी कळली तेव्हा फक्त पंधरा दिवस शिल्लक होते. ठाण्याचा एक सहल आयोजक यासाठी साडेचार हजार रु सांगत होता. ते जास्ती वाटले. केरळला जाणाऱ्या गरीब रथ गाडीची तिकीटे ( एसी सीटर cc) मिळत होती. लगेच मुंबईतील तमिळनाडू टुरिझम ऑफिस( दादर सेंट्रल पूर्व, स्वामिनारायणच्या मागे), केरळा टुरिझम ऑफिस (वर्ल्ड ट्रेड सेंटर येथे होते आता मंत्रालयाजवळ आहे) येथून सर्व माहितीपत्रके आणली आणि मी एकटाच गेलो. रेल्वे, सिटी बसने प्रवास करत त्रिशूल ते कन्याकुमारी येथील ठिकाणे पाच दिवसांत पाहिली. कन्याकुमारीला चौथ्या दिवशी सूर्यग्रहण पाहिले. मला चार हजार रु खर्च आला होता. त्या काळी यूट्यूबवरच्या विडिओंची चलती नव्हती. काय पाहावे काय नाही ठरवण्यासाठी उपयोगाचे असते. मुन्नार, थेक्कडी आणि अळेप्पी बोटिंग यामध्ये आवड नसल्याने ते गाळले होते.परंतू माहिती सर्व गोळा केली होतीच. नंतर २०१२ मध्येही हीच सहल कुटुंबासह केली होती.
हिल स्टेशन्स/ बॅकवॉटर बोटिंग/ हाऊस बोटीत राहाणे/समुद्र किनारे/आणि देवळे - महाल यांपैकी जे आवडत असेल तेवढेच केल्यास सहल आटोपशिर होते. गाईड घेणे, टॅक्सी भाड्याने घेणे हे ऐपतीवर अवलंबून आहे.
श्वेता यांनी बऱ्याच गोष्टी एकाच सहलीत जमवल्या आहेत. वाॅटर सर्फिंगचाही अनुभव घेतला. मुलाने ते एवढ्या थोड्या अवधीत सहज करून दाखवले याचा आनंद झाला. साहसी पर्यटनात वयाचा फार फरक पडतो.
20 Aug 2024 - 9:12 am | श्वेता२४
कोणत्याही सहल आयोजकांबरोबर एकगठ्ठ्याने जाण्यापेक्षा चांगली योजना आहे.
हे मात्र अगदी बरोबर आहे.सहल आयोजकांचा निश्चित असा कार्यक्रम असतो. कुठे थांबायचे, किती वेळ थांबायचे आणि तिथे काय करायचे याबाबत काही निश्चित गोष्टी ठरलेल्या असतात. त्यामुळेच एखाद्या जागेचा वेगळा अनुभव घ्यायचा झाला तर घेता येत नाही आणि इथेच सगळी गडबड होते. मुनरो आयलँड, वर्कला व जटायू अर्थ सेंटर हे सर्वच कंपनीच्या आयटनरीमध्ये नसतात . त्याचप्रमाणे बऱ्याच ट्रॅव्हल कंपन्या कन्याकुमारी केवळ एका दिवसात किंवा अर्ध्या दिवसात आटोपतात असे दिसले. पद्मनाभपुरम पॅलेस हे तर कोणाच्याच कार्यक्रमात नसते, जे खरंतर 'मस्ट वॉच'या कॅटेगरीत वाटले. हे तुम्ही मला सुचवले होते.
हिल स्टेशन्स/ बॅकवॉटर बोटिंग/ हाऊस बोटीत राहाणे/समुद्र किनारे/आणि देवळे - महाल यांपैकी जे आवडत असेल तेवढेच केल्यास सहल आटोपशिर होते.
आम्ही चौघेही वेगवेगळ्या वयोगटातील माणसे आहोत. तरी देखील सर्वांच्या आवडीचे काहीतरी दिवसभरात राहील व कोणती ना कोणती ऍक्टिव्हिटी करायला मिळेल याबाबत मी सहल नियोजन करताना काळजी घेत असते. जेणेकरून प्रत्येक जण सहलीबाबत उत्साही राहील. सहल नियोजनातील हा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे. या एकाच सहलीत मी बऱ्याच गोष्टी जमवल्या याचे श्रेय अर्थातच तुमच्यासारख्या मार्गदर्शक मिपाकरांचे, त्याचबरोबर निरनिराळे युट्युब ब्लॉग, ट्रिप अडवायझरचे रिव्यू यांना जाते. मी गेली दोन वर्षे केवळ केरळची माहिती घेण्यासाठी घालवले आहेत. त्यामुळेच एवढे बारीक नियोजन मी करू शकले. तरी देखील काही गोष्टी या नियोजनाप्रमाणे झाल्या नाहीत हेही खरे. भविष्यात आम्ही उत्तर केरळ करणार आहोत. त्यावेळेला गुरुवायूर व त्रिशूल मंदिर करायचे आहे . तुम्ही सुचवल्याप्रमाणे वडकूनाथन मंदिर हे दीपप्रज्वलनाच्या तिथीलाच घडवून आणायचे ठरवले आहे.
विस्तृत प्रतिसादाबद्दल मनःपूर्वक धन्यवाद
20 Aug 2024 - 7:10 am | Bhakti
वाॅटर सर्फिंगचाही अनुभव सुपर्ब वाटतोय, मस्त!
20 Aug 2024 - 9:14 am | श्वेता२४
वॉटर सरफिंग करण्यासाठी बारीक असणे गरजेचे आहे... मी आणि माझा नवरा दोघेही तब्येतीने जास्तच होतो . त्यामुळे ते पटकन जमले नाही. मुलगा मात्र बारीक, सडपातळ आणि कमी वजनाचा असल्यामुळे तो त्या पॅड वरती पटकन उभे राहू शकत होता . शिवाय तोलही सावरू शकत होता. त्याला तीन ते चार वेळा करायची संधी मिळाली त्यात प्रत्येक वेळी तो ते करू शकला हे विशेष..
प्रतिसादासाठी मनःपूर्वक धन्यवाद!
20 Aug 2024 - 11:39 am | Bhakti
अहो, प्रयत्न हाही मोठा अनुभव असतो,भले यश ना मिळो.आणि मला पाणी खुप आवडतं पाण्याशी निगडित सगळेच खेळ आनंददायीच असतात ना 😀
20 Aug 2024 - 1:02 pm | प्रचेतस
हा भागही आवडला. नेहमीची ठिकाणे न करता तुम्ही एकदम हटके ठिकाणे करत आहात हे फार आवडले.
20 Aug 2024 - 1:13 pm | गोरगावलेकर
छान सुरु आहे सहल
वाॅटर सर्फिंगचे अनुभव मस्तच . पूवर बिचचे बोटिंग करतांना दिसणारा निसर्ग , सोनेरी वाळू किनारा एकदा तरी अनुभवावा असाच . आपल्या लेखामुळे परत एकदा तेथे फिरून आल्यासारखे वाटले .
20 Aug 2024 - 7:15 pm | श्वेता२४
@प्रचेतस - प्रतिसादासाठी मनःपूर्वक धन्यवाद
@गोरेगावलेकर-
पूवर बिचचे बोटिंग करतांना दिसणारा निसर्ग , सोनेरी वाळू किनारा एकदा तरी अनुभवावा असाच .
100% सहमत. प्रतिसादासाठी मनःपूर्वक धन्यवाद.
26 Aug 2024 - 4:31 pm | टर्मीनेटर
हा भागही मस्तच! वाॅटर सर्फिंगचा अनुभव मजेशीर, जटायू अर्थ सेंटर भारीच. राजीव अंचल ह्यांच्या कलाकारीला सलाम, पुवर पण आवडले 👍
मी सहा दिवसांपुर्वी म्हणजे २० तारखेला वर्कला बीच वर गेलो होता. समुद्र काहिसा खवळलेला असल्याने वाळुत ठोकलेल्या बांबुना दोरी बांधुन पहारेकरी/लाइफगार्ड्स कोणाला पाण्याजवळ फिरकु देत नव्हते.आणि मागील भागावर दिलेल्या प्रतिसादात म्हंटल्याप्रमाणे जुलै अखेरिस वायनाड येथे झालेल्या दुर्घटनेमुळे आणि हवामान खात्याच्या निर्देशांमुळे सर्व वॉटर स्पोर्ट्स्/अॅक्टीव्हीटीज तुर्तास बंद होत्या.
वर्कला बीच...
वर्कला ते कोल्लम कोस्टल रोड आणि त्यावरुन टीपलेली सुर्यास्ताची दृष्ये (ढगात लपलेला सुर्यनारायण काही दर्शन द्यायला तयार नव्हता 😀)...