जेव्हा एखादी गोष्ट मिळवण्यासाठी तुम्हाला बराच वेळ वाट पहावी लागते, कित्येक वेळा तुम्ही ती मिळवण्याच्या अगदी समीप जाता पण ती प्राप्त करनं तुम्हाला शक्य होत नाही. अशी गोष्ट जेव्हा तुम्हाला मिळते तेव्हा जो आनंद होतो तो अवर्णनीय असतो, माऊंट एव्हरेस्ट सर केल्याच्या feeling पेक्षा तो कमी नसतो. सेम feeling व आनंद शनिवारी भारतीय खेळाडू, क्रिकेटरसिक व संपूर्ण भारतवर्षाने अनुभवला..!!
११ वर्षांनंतर भारताने आयसीसी ट्रॉफी जिंकली..! आता काहींना ११ वर्षे म्हणजे comparatively छोटा कालावधी वाटेल पण गेली ११ वर्षे या विजयाची वाट पाहणाऱ्या, या विजयाच्या अगदी समीप जाऊन आलेल्या भारतीय खेळाडूंसाठी, करोडो चाहत्यांसाठी हा विजय खूप महत्वपूर्ण होता. या ११ वर्षांच्या कालखंडात भारतीय क्रिकेट संघ एकूण दहा आयसीसी स्पर्धांमध्ये ५ वेळा फायनल व ४ वेळा सेमीफायनल स्टेजला पोहचला. प्रत्येक वेळेस भारतीय संघाची ट्रॉफी साठीची दावेदारी भक्कम होती, पूर्ण स्पर्धेत भारत एकहाती सामने जिंकत knockout मध्ये पोहचायचा पण सेमीफायनल किंवा फायनल सामन्यात नेमकी माशी शिंकायची आणि १-२ पाऊलांवर आलेलं स्वप्न अधुरं राहायचं..
पण परवाचा दिवस व २०२४ ची टी-२० ट्रॉफी भारताचीच होती. खरतर ऑस्ट्रेलिया, इंग्लंड, साऊथ आफ्रिका, न्यूझीलंड, वेस्ट इंडिज सारखे भक्कम संघ, यूएसए, वेस्ट इंडीज मधील धीम्या खेळपट्ट्या यामुळे अनेकांनी भारत सेमी फायनल मध्ये देखील पोहचणार नाही असा अंदाज लावला होता, पण भारतीय संघाने तो अंदाज फोल ठरवला.
पूर्ण स्पर्धेत व परवाच्या अटीतटीच्या सामन्यात सर्वांनीच चांगला खेळ केला. या स्पर्धेत भारतीय खेळाडूंनी जी एकजुटता दाखवली, टीम वर्क केले त्यामुळेच ही ट्रॉफी आपण यावेळेस खेचून आणू शकलो.. पाकिस्तान विरुद्धच्या सामन्यात संपूर्ण बॅटिंग ऑर्डर ध्वस्त झालेली असताना रिषभ पंतची धडाकेबाज खेळी व बुमराहची चमत्कारिक गोलंदाजी, ऑस्ट्रेलिया व इंग्लंड विरुद्ध रोहित शर्माची आतिषी खेळी, अफगाणिस्तान विरुद्ध सूर्याचे महत्वपूर्ण अर्धशतक, इंग्लंड विरुद्ध अक्षर पटेल व कुलदीप यादवची गोलंदाजी, संपूर्ण स्पर्धेत अपयशी ठरलेल्या विराटची अंतिम सामन्यातील राखून ठेवलेली special innings, हार्दिक पांड्याची अष्टपैलू कामगिरी, बुमराह व अर्शदिपची भेदक गोलंदाजी... थोडक्यात गरजेच्या वेळी, मोक्याच्या क्षणी प्रत्येकाने स्वतःला मिळालेले काम चोख बजावले.
अंतिम सामन्यात थोड्याफार प्रमाणात चोकर्सचा शिक्का असलेले दोन संघ समोरासमोर होते. भारताला हा शिक्का गेल्या काही वर्षांत मिळाला होता तर पहिल्यांदाच विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात पोहचलेला दक्षिण आफ्रिका संघ हे ओझं अनेक वर्षांपासून वाहतोय. साऊथ अफिका संघ जरी चोकर असला तरी त्यांना हलक्यात घेण्याची चूक करून चालणार नव्हतं. कारण त्यांनी या स्पर्धेत एकही सामना हरला नव्हता व इंग्लंड, वेस्ट इंडिज सारख्या भक्कम संघाना धूळ चारून ते इथवर पोहचले होते..
पॉवरप्लेमध्येच भारताची टॉप ऑर्डर डगआऊट मध्ये पाठवून त्यांनी ते सिद्ध करून दाखवले. सपाट, बॅटिंग फ्रेंडली पिचवर ३४-३ अशी धावसंख्या, रोहित, पंत व सूर्या सारखे बिग हिटर्स बाद झालेले. तेव्हा भारताची सर्व भिस्त संपूर्ण स्पर्धेत ज्याच्या बॅटने धावांचा दुष्काळ पहिला होता त्या विराट कोहली व हार्दिक पांड्या यांच्यावर होती.. २०२२ टी-२० विश्वचषकात पाकिस्तान विरुद्ध याच्याहूनही खराब अवस्था असताना या दोघांनीच भारताला तारले होते.
अपेक्षित नसताना पहिल्या तीन विकेट्स लवकर गेल्यानंतर कर्णधार रोहित शर्माने ५ व्या क्रमांकावर पांड्या व शिवम दुबेच्या आधी अक्षर पटलेला फलंदाजीसाठी पाठवले.. त्याने आक्रमक खेळ करून धावफलक हलता ठेवला व विराट कोहलीवर असलेला दबाव कमी केला. विराटने एक बाजू लावून धरली व योग्य वेळ आल्यानंतर गिअर्स चेंज केले. २० षटकांनंतर भरताने १७६ धावा फलकावर लावल्या.
स्पिनर्सना खेळपट्टी जरा देखील मदत करत नव्हती, बॉल सहज बॅटवर येत होता. व त्यातच एका एंडला जोरात वाहणारा वारा फलंदाजांनी हवेत मारलेले जोराचे फटके सिमारेषेपार पोहचवत होता. त्यामुळे सुरवातीच्या पडझडीनंतर द. आफ्रिकेच्या ट्रिस्टन स्टब्बस, क्विंटन डी कॉक व हेनरीक क्लासेन यांनी जी फटकेबाजी केली, विशेषतः क्लासेन ज्या सहजतेने चेंडू मैदानाबाहेर भिरकावत होता ते पाहून वाटू लागलं की भारत १५-२० धावांनी कमी राहिला की काय..?
मधल्या षटकांत क्लासेनने जो धडाका लावला तो पाहून भारतीय पाठीराख्यांची धाखधूक वाढायला सुरुवात झाली. अक्षर पटेलच्या १५ व्या षटकात जेव्हा त्याने २४ धावा चोपल्या व equation ३० चेंडूत ३० असं झालं तेव्हा जवळ जवळ सामना भारताच्या हातातून गेल्याताच जमा होता, भारतीय खेळाडूंचे पडलेले चेहरे व बदललेली बॉडी लँग्वेज हेच सांगत होती. इथे काहीतरी चमत्कार किंवा देवच भारताला वाचवू शकणार होता. आणि तो चमत्कार घडवण्यासाठी रोहितने जसप्रीत बुमराहच्या दोन ओव्हर्स राखून ठेवल्या होत्या. बुमराहने १६ व्या षटकात फक्त चार धावा दिल्या व वेगाने ट्रॉफीकडे मार्गक्रमण करणाऱ्या साऊथ आफ्रिका संघाला थोडासा का होईना दबाव जाणवला. पुढच्या षटकातील पहिल्याच चेंडूवर पांड्याने धोकादायक बनलेल्या क्लासेनचा अडथळा दूर केला व फक्त ४ धावा दिल्या.. आणि इथे वाऱ्याची दिशा बदलली.. अठराव्या षटकात बुमराहने पुन्हा एकदा टीच्चून मारा केला, फक्त दोन धावा आणि एक विकेट.. त्यानंतर महत्वाच्या १९ व्या षटकात गोलंदाजीसाठी आलेल्या अर्शदीपने सुद्धा फक्त ४ च धावा दिल्या.
शेवटच्या पाच ओव्हर्स शिल्लक होत्या तेव्हा सामना पूर्णपणे द. आफ्रिकेच्या खिशात होता. It is south game to lose असं सांगितलं जात होत पण अचानक वाऱ्याने दिशा बदलली... पुढच्या २४ चेंडूत द. आफ्रिकेने फक्त १४ धावा काढल्या व दोन महत्वपूर्ण विकेटस् गमावल्या.. त्यांना इंटरनॅशनल क्रिकेट मध्ये चोकर्स का म्हटलं जातं ते त्यांनी दाखवून दिलं.. आता शेवटच्या षटकात भारत आणि ट्रॉफीच्या मध्ये एकच खेळाडू उभा होता तो म्हणजे द. आफ्रिकेचा अनुभवी व मॅचविनर फलंदाज डेव्हिड मिलर... पहिल्याच चेंडूवर त्याने पांड्याचा चेंडू हवेत भिरकावला.. इथे काही क्षणांसाठी भारतीय प्रेक्षकांनी श्वास रोखून धरला होता.. पण आज फलंदाजीत अपयशी ठरलेल्या सूर्याकुमार यादवचे या सामन्यातील योगदान अजून बाकी होते. त्याने सीमारेषेवर तो अविश्वसनीय झेल नाही तर वर्ल्डकप ट्रॉफीच झेलली, आणि १४० करोड भारतीयांच्या जीवात जीव आला..
चांगली कामगिरी करून देखील ११ वर्षे सतत पराभव पचवल्यानंतर मिळालेल्या या विजयाची टेस्ट वेगळीच होती. फक्त मैदानावरील खेळाडूच नाही तर प्रेक्षकांच्या डोळ्यांतून देखील आनंदअश्रू ओघळत होते..
शेवटचा चेंडू अडवून रोहित शर्मा मैदानावर झोपला व त्यानंतर इतर खेळाडूंनी त्याच्याकडे धाव घेतली.. तो क्षण डोळ्यात साठवून ठेवण्यासारखा होता.!
२००७ व २०११ प्रमाणे हा विजय व त्यानंतरचे moments प्रत्येक क्रिकेटप्रेमीच्या मनावर कायमचे कोरले जातील..
मावळत्या पिढीतील दोन सुपर स्टार्स रोहित व विराटच्या इतक्या वर्षांच्या कष्टाचे चीज झाले, स्वप्नपूर्ती झाली.. पुढच्या पिढ्यांना या विजयाची व भारताच्या ११ वर्षांच्या संघर्षाची कहाणी सांगितली जाईल...!!
प्रतिक्रिया
2 Jul 2024 - 7:10 am | nutanm
छान वर्णन! छान माहिती !! पण एकही फोटो दिसत नाही माझया मोबाईल वरुन बघताना . आगदी छान वर्णनाचा छान रसभंग होतोय एकही फोटो दिसत नाहीय. वेगळा देश वेगळे वर्णन, गोष्टी. लिहित रहा.छान वाटतेय.नविन माहिती वाचताना.
2 Jul 2024 - 9:18 am | सुजित जाधव
माझ्या इकडे व्यवस्थित दिसत आहेत.. तुम्हालाच कसे काय दिसत नाहीयेत?
इतर वाचकांना दिसतायेत का.?
मिसळपाव वर फोटो चढवताना नेहमीच अडचणी येतात.. आणि चढला तरी तो दिसेल याची शास्वती नसते.
दर सहा महिन्यांनी फोटो चढवायला नवीन वेबसाईटचा शोध घ्यावा लागतो किंवा प्रोसेस बदललेली असते.. आता हे दोन फोटो चढवण्यासाठी एक तास खर्च झाला.
डायरेक्ट फोटो का चढवता येत नाही इथे?
2 Jul 2024 - 11:24 am | मनो
मला फोटो दिसतायत.
2 Jul 2024 - 11:53 pm | सुजित जाधव
2 Jul 2024 - 11:54 pm | सुजित जाधव
लेखाला दिलेल्या प्रतिसादाबद्दल, प्रोत्साहनाबद्दल तुमचे आभार मानायचे राहूनच गेले.. धन्यवाद..!!
3 Jul 2024 - 7:11 am | फारएन्ड
मस्त लेख! आवडला.
यावेळेस द्रविडचे सेलिब्रेशनही आवडले. इतके त्याने त्याच्या खेळण्याच्या काळातही कधी उत्स्फुर्त केले नसेल.