तो ऑफिसात कामात गढून गेला होता. अशावेळी येऊन कुणी व्यत्यय आणला असता तर त्याला ते आवडण्यासारखे नव्हते. पण जग कुणाच्या आवडीनिवडीवर चालत नाही. आपण खूप मारे ठरवतो कि आज “हे” करायचं आणि नेमके त्यावेळी “ते” येऊन मध्ये तडमडते.
व्यत्ययची आठवण झाली आणि तो आलाच.
पांडू –म्हणजे- ऑफिसचा हरकाम्या प्यून. तो आला आणि त्याच्या टेबलासमोर उभा राहिला. पांडू काही बोलायच्या आधीच तो म्हणाला,
“मला भेटायला कोणीतरी आलं आहे ना. मला माहित आहे. त्यांना सांग थोडा वेळ थांबा म्हणून.”
लोकांना उगीचच थांबायला लावणे यात अवर्णीय आनंद असतो. आपण सगळीकडे थांबत असतो. डॉक्टरकडे, सरकार दरबारी, बसच्या थांब्यावर, सिनेमाच्या तिकिटाच्या लाईनीत. सगळ्यात गंमत म्हणजे आपण थांबतो आणि नंबर लागला कि वर पैसे पण देतो.
सिनेमा! तिथं तर तिकीट मिळाले तरी हॉलचे दरवाजे उघडायची वाट पहावी लागते.
दरवाजे.
“मी तेच सांगितले सर. तर तो म्हणाला, “आम्ही थांबत नसतो. साहेब बाहेर आला नाही तर मलाच आत यावं लागेल.””
अरे व्वा. हा म्हणजे “काळाचा” कळीकाळ दिसतोय. काळ कुणासाठी थांबत नाही. कटकट साली.
“पांडू, त्याला सांग कि साहेब म्हणतोय कि साक्षात यमराज जरी रेडा आणि पाश घेऊन आला तरी त्याला थांबावे लागेल.”
पांडू हसायला लागला. “साहेब, यमाने सध्या तरी फक्त रेड्यालाच पुढे पाठवले आहे अस दिसतंय. आणि त्या रेड्याला वेसण घालायला आपली यमी पण जागेवर नाहीये. सर, माझ ऐकाल तर त्याला जाऊन भेटा.”
“असं म्हणतोस? तू हो पुढं. मी हा आलोच.”
पांडू हा त्याचा शीक्रेट सल्लागार आहे. त्याच्या मते पांडूला “सिक्स्थ सेन्स” आहे.
पण पांडूचं कथा कथन करायला आता वेळ नव्हता. बाहेर अस्वस्थ रेडा वाट बघत होता ना.
रिसेप्शनमध्ये तो बसला होता.
“भानगौडा गोपाळगौडा पाटील? बस.” फळ्यावर नखाने खरवडल्यासारखा त्याचा आवाज होता.आणि तो असं बोलत होता कि जणू भागो त्याच्या ऑफिसात त्याला भेटायला आला होता. वर तुच्छतापूर्ण एकेरी संबोधन. “बस.”
“तुम्ही कोण? आपण कधी भेटलो नाहीये. काय काम होतं माझ्याकडे?”
त्यानं भागोकडे पूर्ण दुर्लक्ष केले.
त्याने आपला मोबाईल काढला, बोटाने टिक टिक केलं, बोटानेच पानं उलटली. मग मोबाईल माझ्या समोर धरला.
“हा फोटो तुझाच आहे ना.” त्याचा प्रश्न विचारायचा ढंग असा होता कि त्याला “हो” असं उत्तर अपेक्षित होते.
मरीन ड्राईवच्या कट्ट्यावर सगळ्या जगाला फाट्यावर मारून बसलेल्या एका जोडप्याचा फोटो होता. आश्चर्याची गोष्ट अशी होती कि तो फोटो समुद्राच्या बाजूने घेतला होता. हा इथे येऊन हा फोटो दाखवून मला का बोअर करत होता?
“हे त्या जोडप्याच्या प्रायवसीवर आक्रमण आहे.”
“प्रायवसी गेली तेल लावत. एक सांग, हा तुझाच फोटो आहे ना.”
फोटो बहुत करून त्याचाच होता. शेजारी लता गुर्जर होती. फोटो किमान वीस वर्षांचा जुना होता.
त्याने मोबाईलचे बटन दाबले. चित्र हलायला बोलायला लागले. ओके ही विडीओ क्लिप होती तर. त्याने क्लिप म्यूट केली.
“तू काय मला ब्लॅकमेल करायला आला आहेस?” मी सुद्धा एकेरीवर आलो.
“नाही, मी तुला वॉर्निंग द्यायला आलो आहे.”
“वॉर्निंग! आणि ती कशाबद्दल भाईसाब? तुझी काय ऑथॉरीटी मला वॉर्निंग द्यायची?” थिस वॉज गेटिंग इंटरेस्टिंग. आपला कथानायक इच्छा नसताना संभाषणात ओढला जात होतो.
“सांगतो. आम्ही रिअललँड आणि ड्रीमलँडच्या सीमेवर गस्त घालतो. तू हल्ली ड्रीमलँडच्या खूप चकरा मारायला लागला आहेस.”
“पण माझ्या माहितीप्रमाणे ड्रीमलँडमध्ये कोणीही जाऊ येऊ शकतो. वॉर्निंग दिल्याबद्दल आभार! आता आपण जाऊ शकता. बाहेर जायचा हा दरवाजा इकडे आहे. उघडा आहे.”
त्याने सीमा सुरक्षावाल्याला सुनावले.
“नो नो. इतकी घाई करायची नाही. ड्रीमलँडमधून तू डीपलँडमध्ये ग्रेलास. मान लिया कि ये भी ठीक है. पण नंतर तू डार्कलँडमध्ये गेलास. तुम्ही फक्त एक आणि एकच टेक्निकल चूक केलीत. त्यामुळे तुमचं कव्हर ब्रेक झालं. डार्कलँडमध्ये काय चालते ते तुम्हाला चांगले माहित आहे. हॉररलँड तिथून फार दूर नाहीये. पण तुम्ही तिथे जाऊन काय करता हे आम्हाला समजले नाहीये. हरकत नाही, आम्ही ते शोधून काढू. इट इज जस्ट ए...”
“ओके समजलं.”
“शिवाय तुझ्या बरोबर कोण होता? तो “फोटोजेनिक” नसल्या मुळे आम्ही त्याचा फोटो काढू शकलो नाही. त्यालाही हा संदेश पोहोचता कर.”
छद्मी हसून तो चालता झाला.
लोक्स असं म्हणतात कि ड्रीमलँड-डीपलँड-डार्कलँड असा प्रवास केला कि मग “ला ला लँडचे” दर्शन होते. ह्या “ला ला लँड” जर तुम्ही पोहोचलात तर “हर्ष खेद ते मावळले” त्या “झपूर्झा”चे दर्शन होते.
ड्रीमलँडमध्ये स्वप्नं रहातात तर डार्कलँडमध्ये नको नको त्या गोष्टी रहातात. राक्षस. हे पहा डार्कलँडचे “नागरिक!”
हॅकर्स= तुम्ही पैसे सोडलेत तर तुम्ही सांगाल ते हॅक करून देऊ. हा ह्यांचा बाणा.
भाडोत्री खुनी= फक्त पैसे द्या नि टार्गेट दाखवा काम होणार. पुरावा म्हणून खुनाचा विडिओ पण मिळेल. एक्स्ट्रा चार्जेस अप्लाय.
मादक पदार्थ= मागणीनुसार पुरवठा!
पोर्नोग्राफी= जास्त लिहित नाही.
राजकारण= राजकारणी,पत्रकार, खबरी, स्टिंग ऑपरेट इ.चा वावर.
शिवाय टेररिस्ट, क्रांतिकारक, जुगारी, भाडोत्री सैनिक ह्यांची दुकाने, अड्डे, गाळे ते वायले.
ड्रीमलँडच्या उजव्या हाताला वंडरलँड आहे. हा तीच ती अलिस जिथे गेली होती. आणि डाव्या बाजूला नंबरलँड!
अरे, मी एक आश्चर्यजनक लँड विषयी बोललोच नाही. त्याचे नाव आहे “फ्लॅटलँड.” ह्याचा शोध १८८४ साली एडविन अॅबट अॅबट नावाच्या इंग्लिश पाद्र्याने लावला. ह्या द्विमिती विश्वाचा मनोरंजक वृत्तांत त्याने “फ्लॅटलँड” नावाच्याच पुस्तकात दिलेला आहे. ज्यांना रुची असेल त्याना हे पुस्तक नेटवर कुठेही मिळेल. आपल्या त्रिमिती विश्वाला स्पेसलँड म्हणूयात. मी जर तुम्हाला सांगितले कि आपल्यापेक्षा हायर डायमेंशन मध्ये रहाणारे अतिप्रगत जीव आहेत, आणि त्यांचं आपल्या हालचालीवर बारीक लक्ष असते तर तुम्ही विश्वास ठेवला नसता, पण “फ्लॅटलँड” हे पुस्तक वाचल्यावर तुमचा भ्रमनिरास होईल ह्याबद्दल माझी पूर्ण खात्री आहे.
जे लोक तिकडे जाये करतात त्यांच्या मते आपले जग म्हणजे -आपण ज्या जगात रहातो ते- ह्या अदृश्य जगाच्या तुलनेत नगण्य आहे. महासागरात जसे थरावर थर असतात आणि पृष्ठभागाचा तळाशी काही संबंध असतोच असे नाही. तसेच आहे हे. शास्त्रज्ञ सांगतात कि समुद्राच्या तळाशी खनिजांचे खजिने आहेत! सागरात बुडालेल्या स्पॅनिश जहाजांच्या बरोबर बुडालेले सोन्याचे डब्ळून आहेत! आपल्याला पृथ्वीवरच्या जीवसृष्टीची संपूर्ण माहिती नाही. मग खोल समुद्राच्या तळाशी असणारे कूट प्राणीमात्र आपल्या विरुद्ध काय कट कारस्थाने रचित असतील काय सांगावे?
ह्या खोल जगात ये जा करणाऱ्या लोकांपैकी नव्वद टक्के लोक तर एफबीआय, एमआय6 (हा तेच ते 007 वाले) सीआयए, एसवीआर आरएफ, मोसाद, रॉ इत्यादि-इत्यादि चे एजंट असतात. पण एव्हढे आपटून ह्यांच्या हाताशी एखादाच मासा घावतो. कारण? इथे क्वांटमक्रिप्टो भाषेत व्यवहार चालतात. ही भाषा फक्त बोलणाऱ्या आणि ऐकणाऱ्यालाच समजते. इथले चलनही क्रिप्टो आहे. क्रिप्टो कहासे आता है और कहा जाता है? उपरवालाही जाने. तुमच्या माहितीसाठी, इथे सगळे मुखवटे घालून वावरतात. त्यामुळे एक एफबीआयवाला दुसऱ्या एफबीआय वाल्यावर पाळत ठेवतात अगदी स्वतःच्या नकळत!
भागो तिकडे जायच्या प्रयत्नात होता का?
भागो आपल्या जागेवर परत आला आणि त्याने फोन लावला.
(कुठल्या नंबरला लावला हे मी तुम्हाला सांगणार नाहीये. कारण? नाही. कारण सुद्धा सांगणार नाही.)
“हलो, आज एक सीमा सुरक्षाचा इन्स्पेक्टर मला भेट देऊन गेला.”
“...”
“आपण काळजी घ्यायला पाहिजे. एव्हढेच.”
“...”
zzzzzzzzzzzzzzzzzzzzzzzzzzzzzzzzzzzzzzzzzzzzzzzzzzz
प्रतिक्रिया
20 Jun 2024 - 10:55 pm | भागो
डार्कलँड(डार्कनेट) हे खरेच अस्तित्वात आहे. आपण जे इंटरनेट म्हणतो ते म्हणजे केवळ त्याचा पाच परसेंट आहे. समुद्राचा केवळ पृष्ठ भाग. पण आपल्या फायरफॉक्स, च्रोम वगैरेंनी तिकडे जाता येणार नाही.
NEET-UG पेपर डार्क नेट वर लीक झाला असे मंत्री महोदय म्हणत आहेत. शक्य आहे.
21 Jun 2024 - 5:58 am | कर्नलतपस्वी
भागो सर,अदृश्य वास्तवाला कल्पना शक्तीत कोंबून. दृष्य वास्तववादी पण आभासी चित्रण आपलं वर्णन.
टोपी काढून सलाम.(हॅट्सऑफ).
समीर चौघुले-शिवाली,हे खरयं का?
शिवाली - हो बाबा....
21 Jun 2024 - 7:39 am | कंजूस
थोडं समजलं.
डार्कनेट
आता पुढे काय? पेपर लीक झाला.....
तयार उत्तरंं मिळाली.....
ती लिहिली......
आणखी बऱ्याच जणांनी लिहिली असतील....
काहींनी परीक्षकांकडेच पुरवण्या पोहोचवल्या असतील जोडण्यासाठी....
शंभर टक्के मिळवणाऱ्यांची गर्दी होईल....
जॉबसाठीही वशिला लावावा लागेल. .....
त्यातही कुणाचा यावर चढाओढ होईल......
पुन्हा डार्कनेटमध्ये.
डार्विन/अर्थशास्त्र म्हणते जीव वाढले की त्यांना खाणारे जीव निर्माण होतील...
आता गॉडफादर म्हणतो .. मारायचे कशाला ....थोडी थोडी चोच मारायची....wet my beak.
21 Jun 2024 - 8:10 am | कर्नलतपस्वी
कृबुने अवघ्या सात मिनीटात सोडवला व १७०/२०० गुण अर्जित केले. तसे १०० गुण मिळाले तर डोक्यावरून पाणी.
अशी बातमी ऐकली होती.
काय म्हणावे.
21 Jun 2024 - 9:12 am | भागो
हा एका कथेचा पहिला भाग आहे. हे लिहायचे राहिलेच होते. त्याबद्दल क्षमस्व. ही अशीच बासनात पडली होती. आज "डार्कनेट" चा उल्लेख झाल्यामुळे आठवली. ह्यातील डार्कनेट चे वर्णन फ़ॅक्चुअल आहे बाकी माझी फँटसी.
21 Jun 2024 - 6:39 pm | पॅट्रीक जेड
डार्कनेटला मराठी शब्द काय?? कृष्णजाळ??
21 Jun 2024 - 7:21 pm | भागो
चांगला आहे डार्क नेट हा डीपनेट चा एक पार्ट आहे. त्यासाठी पण एक सुचवा.
21 Jun 2024 - 7:22 pm | Bhakti
इनसेप्शन-नोलन आठवला!!
21 Jun 2024 - 7:25 pm | Bhakti
आता लवकर परत सिनेमा पाहावा लागणार :)