गं...!

प्राची अश्विनी's picture
प्राची अश्विनी in जे न देखे रवी...
20 May 2024 - 10:45 am

कसला वेल्हाळ आणि गोssड असतो हा 'गं'!
मागचे "सा रे" विसरायला लावणारा,
पुढलं "मा प" ओलांडू न देणारा,
"धा नी" रंगात मोहरवणारा,
पायाला हळूच मिठी मारणारा ठेहरावसा उंबराच जणू..
थोडासा सरळ, थोडासा वळणदार..
पण आतल्या गाठीचा मात्र बिलकुलच नाही.
कान्याला टेकून आपला ऐटीत उभा.
सुबक, कमनीय, गोजिरा अगदी!
आणि जेव्हा तो तुझ्या तोंडून ऐकते ना,
त्याचा लगाव, लहेजा आणि लगन...किती रे कातील!
तुझ्या ग च्या लडीवाळ चक्रव्यूहात मी कधी कशी ओढली जाते कळतच नाही..
गोल गोल गोल गोल, तिथंच फिरत रहाते मी.
आजुबाजुचे शब्द विरून जातात.
ऐकू येतात ती फक्त आणि फक्त तुझ्या गंधाराची निर्गुण आवर्तनं..
धुपाचा कर्पूरचंदनी गंध ल्यालेली..
एकांत एक गुंफलेली, कोमल नी शुद्ध,
माझ्या गंभीर "रे" ला वेढून टाकणारी...
..
अशावेळी माझा अभिमन्यू नाही झाला तर नवल

मुक्तक

प्रतिक्रिया

Bhakti's picture

20 May 2024 - 11:30 am | Bhakti

एकदम भारी!

प्राची ताई पहिल्या ओळीत वाचून माझ्या डोक्यातही "रे" वर पण कविता होईल असं आलं.शेवटच्या काही ओळी "रे" आलाच :)
माफी असावी पण हा घ्या माझा "रे"!

अ"रे"
माझ्या उंचावलेल्या भुवयांच्या कमानी
ऊतू गेलेले आश्चर्यमिश्रित हसू...
तुला आवडत म्हणूनच अ"ग" असं"ग" करीत
उगाच गोष्टी पेरत बसतो..
"रे"चा धागा घरंगळत पसरल्यावर
"गं" चा वेटोळा माझ्याभोवती घालत
तुझा ऐक "ना" माझ्या रूसलेल्या जा"ना"
ता"ना"शाहीत मी "ना" "जा" करत
तुझा श्वासं तगमगतो " ना" "रे"
आता कोणतं महाभारत होणार विचारात माझा अर्जून होतो रे...

प्राची अश्विनी's picture

20 May 2024 - 7:38 pm | प्राची अश्विनी

आहा! अर्जुन... मस्त
गंमत म्हणजे मी पण "रे" लिहिलीय. करते पोस्ट इथे.:)

प्रभाकर कारेकर, रामदास कामत द्वयींनी गायलेल्या खालील गाण्याचा,
तुझी मूर्त सुंदर देवा,सजवितो सुरात

https://youtu.be/idAshwnegjw?si=gDuanGPERqObDTxQ

कसला वेल्हाळ आणि गोssड असतो हा 'गं'!
मागचे "सा रे" विसरायला लावणारा,
पुढलं "मा प" ओलांडू न देणारा,
"धा नी" रंगात मोहरवणारा,
पायात पडलेली मोह मायेची मिठी हळूच सोडवून या दिठी चा सहर्ष, सहज स्वीकार करणारा जणू लोक परलोका मधला उंबरठाच..

कवीता आवडली. प्रथम दर्शनी वाटणारी प्रेम कवीता कुठल्या कुठे घेऊन जाते.

माझा विठुराया आहेच मुळी चक्रव्यूहा सारखा. भक्त एकदा आत मधे घुसला की त्याचा अभिमन्यू होणार हे नक्कीच.

प्राची अश्विनी's picture

20 May 2024 - 7:40 pm | प्राची अश्विनी

वाह! हे गाणं माहीत नव्हतं. शब्द देखील किती अर्थवाही आहेत.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

20 May 2024 - 2:35 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

आवडली रचना.

-दिलीप बिरुटे

प्राची अश्विनी's picture

20 May 2024 - 7:40 pm | प्राची अश्विनी

धन्यवाद सर!

चौथा कोनाडा's picture

20 May 2024 - 10:45 pm | चौथा कोनाडा

सुं - द - र ....... !

वाव! सुंदर काव्य. आणि वर भक्ती ताईंची "अरे" रावी.

प्राची अश्विनी's picture

21 May 2024 - 9:33 am | प्राची अश्विनी

प्रतिसादाबद्दल सर्व रसिकांना मनापासून धन्यवाद!