शॉर्ट शॉर्ट फिक्शन.

भागो's picture
भागो in जनातलं, मनातलं
1 May 2024 - 11:33 pm

शॉर्ट शॉर्ट फिक्शन.
कमीत कमी किती शब्दात लेखक कथा लिहू शकतो? मानवी भावनांची गुंतागुंत व्यक्त करण्यासाठी कमीत कमी किती शब्दांची गरज आहे? आता हे तर सर्वमान्य आहे कि शंभर शब्द पुरेसे आहेत.(कथा शंभरी), कथापन्नाशी वा कथापच्चीसी. असे प्रयोग करायला काय हरकत आहे? दहा शब्द? पुरेसे आहेत? अर्नेस्ट हेमिंग्वे ह्या महान कथा लेखकाने केवळ सहा शब्दात लिहिलेली ही अजरामर कथा. मराठीत भाषांतर करायची माझी हिम्मत नाही.
“For sale: baby shoes, never worn.”
ही कथा वाचून दहा वर्ष झाली. पण अजून ती आकलन झाली आहे असं वाटत नाही.
हे सहा शब्द वाचून तुमच्या मनात काय भाव दाटून येतात? मला काय वाटलं ते आधी मी इथे लिहितो.
हे वाक्य कुणी लिहिले असावे? बहुतेक बेबीच्या बाबांनी. विकायला का काढले? आठवणींपासून सुटका मिळावी म्हणून. नशिबाने जे दान दिले आहे ते बाबांनी मुकाट्याने मान्य केले आहे. No Arguments.
काही वाचकांच्या प्रतिक्रिया बोलक्या आहेत.
-चोराने दुकान फोडले असावे आणि आता हे बेबी शूज विकायला काढले.
-बेबी स्टिलबॉर्न. तिच्यासाठी आवडीने घेतले असावे.
-मूल आपल्या नशिबातच नव्हते. दुसरा चान्स घ्यायची हिम्मत नाही. किंवा बस झाले.
-आठवणीचा ठेवा म्हणून जपून ठेवायला पाहिजे होते.
-माझ्या बेबीला मित्रांनी भेट म्हणून हे शूज दिले होते. पण ते पायात बसत नव्हते. मी नवीन पेअर घेतली आणि ही विकायला काढली. काही चुकलं का माझं?
-काय बकवास स्टोरी लिहिली आहे.
-सॅड टेल.
ह्या प्रतिक्रिया मी सँपल म्हणून ठेवल्या आहेत. पण पहा सहा शब्दात केव्हढे सामर्थ्य आहे. लोकांच्या भावनांना उद्दीपित करायचे सामर्थ्य.
मी जर सायको अॅनॅलिस्ट असतो तर मी ही कथा “टेस्ट” म्हणून ठेवली असती. पेशंटची पर्सनॅलीटी समजून घेण्यासाठी.
पण आपला मूळ प्रश्न बाजूलाच राहिला. परिणामकारी कथा लिहिण्यासाठी किती शब्दांची गरज आहे?
ह्यातूनच मग लघु लघु कथा (शॉर्ट शॉर्ट फिक्शन) हा वाङ्‌मय प्रकार प्रचलित झाला. रुजला. आणि फोफावला.
आता फ्लॅश फिक्शन आणि सडन(sudden) फिक्शन असे दोन प्रकार झाले. फ्लॅश फिक्शन म्हणजे शब्दसंख्या २५० ते ७५० च्या दरम्यान, त्यानंतर म्हणजे शब्दसंख्या १७५० पर्यंत ह्याला म्हणायचे सडन स्टोरीज.
शब्दसंख्या हजाराने कमी झाली. पण कथेचे वाचकांच्या मनाला स्पर्श करायचे सामर्थ्य हे शब्दसंख्येवर अवलंबून असते काय? नाही. अनेक लेखकांनी हे दाखवून दिले. मी इथेच अर्नेस्ट हेमिग्वेच्या “A Very Short Story” ह्या कथेचा स्वैर अनुवाद केला होता. मानवी जीवनाची निरर्थकता आणि त्यातून “नो एक्झिट”- अगदी भावूक प्रेम देखील अखेर निरर्थक आहे हे वैश्विक सत्य दाखवणारी कथा. अगदी मोजक्या शब्दात. (हेमावैम).
कधी कधी कमी शब्द हेच कथेचे सामर्थ्य होऊ शकते. हजारो शब्द लिहून जे होत नाही ते युवतीच्या एका कटाक्षाने एका क्षणात होऊन जाते.
आर्थर क्लार्क ह्या सुप्रसिद्ध विज्ञान कथा लेखकाने – “२००१-ए स्पेस ओडेसी” “रान्देव्हू विथ राम” फेम त्याने एक विज्ञान कथा लिहिली नाव होत “siseneG”. मला ही नीटशी कळली नाही. ती अशी आहे.
And God said: DELETE lines One to Aleph. LOAD. RUN.
And the Universe ceased to exist.
Then he pondered for a few aeons, sighed, and added: ERASE.
It never had existed.
ही ३१ शब्दांची कथा. मी एक क्लू देतो. “siseneG”. हे उलट वाचले तर होते “Genesis”.
“Genesis” ही बायबल मधील विश्व निर्मितीची कथा आहे.
ह्या नंतर नेटवर कुणीतरी आवाहन केले कि सहा शब्दांची विज्ञान कथा लिहा. त्याला हजारो वाचकांनी प्रतिसाद दिला.
त्यातील ही काही गाळीव रत्ने. मी मराठीत केलेल्या भाषांतरावर जाऊ नका. ह्या “कथा” खरोखर सहा शब्दांच्याच आहेत.
--काळाचा अंत झाला. काल.
--शेवटी जेव्हा त्याला ज्ञानप्राप्ती झाली, तेव्हा त्याने आपला सप्लाय स्वीच ऑफ केला.
--विश्वाचा अंत झाला. त्याचा नाही.
--आहा! पृथ्वीवरचा शेवटचा माणूस. कित्ती चवदार!
--बाबा, सूर्य असा का भगभगतो आहे?
--टेलेपोर्टरचा प्रयोग यशस्वी झाला. पण मी लिबलिबीत का झालो आहे?
--बाळा छान! तुझ पहिलंवहिलं विश्व! छान जमलय.
अशी बरीच आहेत. पण मी इथे लघुत्तम कथांचे गुणगान करतो आहे. मग इथेच थांबणे इष्ट नाही का?

कथा

प्रतिक्रिया

नठ्यारा's picture

2 May 2024 - 1:25 am | नठ्यारा

मी सोडल्यास या ब्रह्मांडात उरलं काय ?

-नाठाळ नठ्या

मी सोडल्यास कुणाला काही कळत नाही

श्रीरंग_जोशी's picture

2 May 2024 - 2:41 am | श्रीरंग_जोशी

अतिसंक्षिप्त काल्पनिक लेखन या रोचक लेखन प्रकाराची ओळख करुन दिल्याबद्दल धन्यवाद.

यावरुन आठवले: १९९१-९२ च्या दरम्यान सुदेश बेरी अभिनेता असलेल्या एका हिंदी मालिकेत एका अभिनेत्रीची स्क्रीन टेस्ट असते. त्यात तिला 'वो गया' हे दोन शब्द विविध परिस्थितींमधे बोलून दाखवायला सांगितले जाते. किमान ७-८ प्रकारे तरी ती त्यांचा उपयोग करुन दाखवते.

भागो's picture

2 May 2024 - 6:45 am | भागो

नठ्यारा श्रीरंग_जोशी.
दोनी प्रतिसाद रोचक आहेत.
"तो गेला."
मराठीतील कि जगातील एकमेवाद्वितीय कथा.
नेटवरच्या भटकंतीत एका "वनवासी" (आदिवासी) कवियत्रीने लिहिलेल्या कवितेतील एक लाईन
"--- पण मी परकर सोडला नाही."
बापरे!

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

2 May 2024 - 2:42 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

"--- पण मी परकर सोडला नाही. यावरुन "सआदत हसन मंटोच्या 'खोल दो' ची आठवण झाली.

-दिलीप बिरुटे

अहिरावण's picture

2 May 2024 - 3:04 pm | अहिरावण

अगदी अगदी

जबरदस्त कथा आहे ती. मंटोस्टाईल नुसार शेवटच्या वाक्यात वा परिच्छेदार कलाटणी मिळते.

सुबोध खरे's picture

2 May 2024 - 11:22 am | सुबोध खरे

For sale: baby shoes, never worn.”

प्रत्येक वेळेस अर्थ तसाच निघेल असे नाही.

माझी मुलगी दीड वर्षाची होती तेंव्हाची गोष्ट.

ती छान गट्टू होती.

तिच्यासाठी एका दुकानातुन छोट्याशा रंगीबेरंगी स्लीपर्स आणल्या.

पण तिचा पाय इतका जाडा होता कि त्या स्लीपर्स तिच्या पायात शिरल्याच नाहीत

पहिल्यांदाच आम्हाला पैसे फुकट गेल्याचे वाईट वाटले नव्हते.

आम्ही त्या कुणाला तरी देऊन टाकल्या.

"-माझ्या बेबीला मित्रांनी भेट म्हणून हे शूज दिले होते. पण ते पायात बसत नव्हते. मी नवीन पेअर घेतली आणि ही विकायला काढली. काही चुकलं का माझं?"
हा प्रतिसाद लेखात नोंद केला आहे.
डॉक्टर आभार.

असती. सहा शब्दांची गोष्ट वाचताच हाच विचार मनात आला. व्यक्तीमत्व चाचपण्या साठी एक शब्द सुद्धा पुरेसा आहे. सर्व्हिस सिलेक्शन बोर्डात अशा प्रकारच्या चाचण्या घेतात.

एक छोटी गोष्ट/कवीता....

If I lost my soul,
I will never get up from ground
If you help me to rise,
I will get up from the mound

If you sent a call for me
I will never forget that sound
I shall be happy,
To enjoy my second round

भागो's picture

2 May 2024 - 12:32 pm | भागो

कर्नलसाहेब
आभार. कविता एकदम क्लासिक आहे. उगम कुठे आहे? मला वाटतंय आपणच लिहिली असणार. हो ना!

कर्नलतपस्वी's picture

2 May 2024 - 1:53 pm | कर्नलतपस्वी

माझी नऊ वर्षाची नात या दोन ओळी नेहमी गाते.
तीला अर्थ विचारला ,म्हणाली माहीत नाही. पण त्यातला गहन अर्थ मला भावला व पुढील ओळी सुचल्या.

आणखीन एक आवडती कवीता.

Lost soul,
I have become.
No home or purpose,
deaf and blind to your urgent call.
Unable to be saved, darkness soon falls...
Without you here, life's a hassle.
I'm an empty vessel
forever a
lost soul.

कर्नलतपस्वी's picture

2 May 2024 - 1:55 pm | कर्नलतपस्वी

मराठीत भाषांतर करायची माझी हिम्मत नाही.
“For sale: baby shoes, never worn.”

अगदी अगदी.....

अहिरावण's picture

2 May 2024 - 2:00 pm | अहिरावण

सहमत आहे.

चामुंडराय's picture

6 May 2024 - 8:46 pm | चामुंडराय

ह्या कथेवरून एक जुनी छोटी कथा आठवली.

He proposed.
She refused.
And they lived happily everafter.

मुक्त विहारि's picture

6 May 2024 - 10:43 pm | मुक्त विहारि

अहं ब्रह्मास्मी

मी, म्हणतोय तेच सत्य...

चामुंडराय मुक्त विहारि
प्रतिसादांसाठी अनेक आभार!
मिपाने पुढची स्पर्धा शशक च्या ऐवजी २५/५० शब्दांची ठेवायला पाहिजे.

अहिरावण's picture

7 May 2024 - 10:14 am | अहिरावण

पशक किंवा पंशक किंवा दशक किंवा साशक किंवा कसेही...