एक लघुकथा.

भागो's picture
भागो in जनातलं, मनातलं
22 Apr 2024 - 8:32 am

एक लघुकथा.
उन्हाळ्यातल्या एका संध्याकाळी ते त्याला गच्चीवर घेऊन गेले. तिथून त्याला पदुआ शहराचा देखावा दिसत होता. संध्याकाळ सरली आणि अंधाराचे साम्राज्य प्रस्थापित झाले. आकाशात सर्च लाईट टाकले जात होते. बरोबरचे दारुच्या बाटल्या आणण्यासाठी खाली गेले. गच्चीत आता फक्त तो आणि लुझ होते. लुझ बेडवर बसली होती. ती फुलासारखी टवटवीत दिसत होती.
तीन महिने लुझ नाईट ड्युटी करत होती. सगळेच खुश होते. त्याच्या शस्त्रक्रियेची वेळ आली, लुझ त्याला शस्त्रक्रियेसाठी तयार करत होती. शस्त्रक्रियेच्या टेबला वर सुद्धा त्यांचे शत्रू आणि मित्र ह्याबद्दल जोक चालूच होते. त्याला जेव्हा भूल दिली गेली तेव्हाही तो स्वतःवर ताबा ठेऊन होता. बेशुद्धीत उगीच काहीतरी बडबडू नये म्हणून. शस्त्रक्रिया झाल्यावर त्याला कुबड्या घेऊन फिरावे लागत होते. तरी सुद्धा तो भल्या पहाटे उठून स्वतःचे टेंपरेचर स्वताच घेत होता. लुझची झोपमोड न व्हावी म्हणून.
हॉस्पिटलमध्ये मोजकेच पेशंट होते. त्यांना ह्याची जाणीव होती. सर्वाना लुझ आवडायची. जेव्हा तो हॉलमध्ये फिरायचा तेव्हा त्याला लुझची आठवण व्हायची. त्याच्या कुशीत झोपलेली लुझ!
जेव्हा फ्रंटवर रिपोर्ट करायची वेळ आली तेव्हा त्यांनी चर्चमध्ये जाऊन प्रार्थना केली. चर्चमध्ये इतरही बरेच लोक होते बहुतेकांची एकच मनीषा होती कि लग्न व्हावे. पण प्रत्येकाच्या काहीना काही अडचणी होत्या. लग्न करायच्या नोटीस द्यावी लागते. तेव्हढा वेळ काहीजणांकडे नव्हता. जन्मतारखेचा दाखला तर कुणाच्याही पाशी नव्हता. ते जणू लग्न झालेच आहे अशा थाटात वावरत होते. एकमेकांपासून ताटातूट होऊ नये एव्हढीच त्यांची इच्छा होती.
लुझ त्याला पत्र लिहित होती. पण युद्धामुळे त्याला ती पत्रं मिळत नव्हती. शांती प्रस्थापित झाल्यावर त्याला लुझने लिहिलेली पंधरा पत्र एकगठ्ठा मिळाली. त्याने ती तारीखवार लावली आणि सगळ्या पत्रांची पारायणे केली.सगळ्या पत्रात जवळपास एकाच मजकूर होता. हॉस्पिटल, तिचे त्याच्यावर किती प्रेम आहे, त्याच्या शिवाय आयुष्य कसे वैराण झाले आहे आणि तिला त्याची किती आठवण येते विशेषतः रात्री झोपताना.
युद्ध संपल्यावर त्याने अमेरिकेला परत जावे, तिथे नोकरी शोधावी, ह्याबद्दल त्यांचे एकमत होते. मात्र त्याला नोकरी मिळाल्याशिवाय ती अमेरिकेत यायला तयार नव्हती. दारू पिणार नाही. त्याने प्रॉमिस केले. अमेरिकेत त्याचे एकच ध्येय होते. नोकरी. त्याने दोस्तांशी संबंध तोडले. ती अमेरिकेत यायला राजी नव्हती. पादुआ ते मिलान प्रवासातही त्यांची ह्यावरून झक्काझक्की चालूच होती.
अखेर निरोप घ्यायची वेळ आली. त्यांनी निरोप घेतला खरा, पण त्यावर भांडणाची छाया होती. ती त्याच्या बरोबर अमेरिकेला आली असती तर. एक प्रकारचा कडवटपणा.
मिलानहून त्याने बोटीने अमेरिकेला प्रयाण केले. लुझ माघारी आली. एक नवीन हॉस्पिटल उघडायचे काम होते. त्यात ती रमली.
ती आता एकाकी पडली होती. ज्या गावात ती काम करत होती त्या गावात पाउस पडत होता. सगळीकडे नुसता चिखल झाला होता.
त्या गावात इटालिअन सैन्याची एक तुकडी स्थाइक होती. त्या तुकडीचा प्रमुख एक मेजर होता. त्याची लुझशी दोस्ती झाली. ते एकमेकांच्या प्रेमात पडले.

शेवटी तिने त्याला पत्र लिहिले. कि “त्यांचे प्रेमप्रकरण भावनातिरेकाने नकळत वहावत जाऊन केलेला मूर्खपणा होता. कोवळ्या वयातलं “काफ लव.” तुला समजेल कि नाही? बहुतेक नाहीच समजणार. तुला जेव्हा समजेल तेव्हा तू मला क्षमा करशील अशी आशा आहे.
हिवाळा सरून वसंत आलाकी आम्ही लग्न करायचे ठरवले आहे. सगळे कसे अचानक घडत गेले. तू जे काय करिअर निवडशील त्यात तुला निश्चित यश मिळेल. तू आहेसच तसा हुशार. जे झाले ते आपल्या दोघांच्या भल्यासाठीच झाले आहे.”
लुझने पाठवलेल्या पत्राला उत्तर मिळाले नाही. मेजरचे आणि तिचे लग्न झाले नाही. तिने ठरवले होते तसे काही घडले नाही.
त्याचे काय झाले? एका सेल्स गर्ल बरोबर टॅक्सी मध्ये केलेल्या प्रणयाचे प्रताप त्याला भोगावे लागले. बस एव्हढच.

कथा

प्रतिक्रिया

मूळ लेखक अर्नेस्ट हेमिंग्वे. नाव आहे "A Very Short Story"
शॉर्ट फिक्शन ह्या प्रकारची अत्यंत गाजलेली, बहु चर्चित कथा. प्रथम प्रकाशित १९२४ साली. युद्ध,
प्रेम, ताटातूट आणि जीवनाचा फोलपणा ह्यावर झोत टाकणारी कथा. पहा आवडतेय का.

कर्नलतपस्वी's picture

22 Apr 2024 - 11:35 am | कर्नलतपस्वी

नाही लावला जीव कुणी
ना ही दिला कुणाला धोका
शिंक्यामधले लोणी पहात
उपाशी राहीला बोका.....

आख्खं आयुष्य इस्पितळात घालवले पण...

सारे तिचेच होते सारे तिच्याचसाठी
हे चंद्र सूर्य तारे होते तिच्याच पाठी
आम्हीही त्यात होतो, खोटे कशास बोला
कुणी झुरले नाही तरीही माझ्याच साठी-विंदा,(modified)

आवडली.

विवेकपटाईत's picture

22 Apr 2024 - 11:47 am | विवेकपटाईत

गोष्ट आवडली

कुणी प्रेम केले
कुणी दगा दिला
प्रेमाच्या आठवणी
आयुष्याचा जखमा.

दुर्दैवी होते ते
प्रेमाचा प्याला
ज्यांनी पिलाच नाही.

अरे इथे तर महफिल सजली आहे. माझा पण चांदीचा एक रुपया -उसनाही सही. पुढच्या कविजन्मात परत करेन.
बिचारा तो.
हमसे ये सोचकर कोई वादा करो एक वादे पे उमरे गुजर जायेगी.
राह देखते देखते शाम हुई रात हुई.
ना वो कल आये ना आज...
कर्नल साब, पटाईत सर, येऊ द्या अजून. वाट मोकळी करून द्या.

अहिरावण's picture

22 Apr 2024 - 12:15 pm | अहिरावण

हेमिंग्वेच्या कथा मोठ्या उद्बोधक असतात. त्यांच्या लांबीपेक्षा खोली अधिक घन आणी आशयपूर्ण असतात.

त्यांचीच द ओल्ड मॅन अ‍ॅण्ड सी अशीच सुंदर आहे.

त्यांच्या लांबीपेक्षा खोली अधिक घन आणी आशयपूर्ण असतात. >>> क्या सही पकडे है!