“ते शब्द ऐकून तिचे मन मोहरले ”, “माळरानालाही मोहर फुटला”, “अंकुराचे फुटणे,आंब्याचे मोहरणे आणि चाफ्याचे दरवळणे”
अशा अनेक वाक्यांत नाजूक मोहरणे हा शब्द प्रयोग कायमच आवडतो.गात्री रसांचा उन्माद झाली की झाड काय माणसाचे मनही मोहरत अशी आनंददायी ही कविकल्पना आहे.
पण वसंतोत्सवाचा खरा प्राण अनेक मनमोहक फुलांचा ‘मोहर’ आहे.याच मोहरामध्ये ज्याची आतुरतेने वाट पाहिली जाते तो आंब्याचा घमघमणारा मोहर! वसंताची ही किमया आहे.
अरविदमशोकं च चुतं च नवमल्लिका।
नीलोत्पलं च पञ्चैते पंचबाणस्य सायकाः ॥
"संमोहनं च कामस्य पंचबाणाः प्रकीर्तिताः ॥
अरविंद (लालकमल), अशोक,आम्रमंजिरी, मोगरा व नीलकमल ही पाच फुले पंचबाण म्हणजे मदनाचीं पंचबाण अथवा पंचशर म्हणतात.याच्या धनुष्याचे बाण म्हणजे पांच फुलें असें मानलें आहे.आणि हा त्याचा बाण उसाच्या इकाकाठीपासून बनलेला असतो.
कामदेव,प्रत्यंचा भुंग्यांपासून बनली आहे तर ऊसाचा धनुष्यबाण.
इतर कोणत्याही फुलांच्या मदमस्त सुगंधापेक्षाही आब्यांचा मोहर सुगंध कामदेवाला प्रेमिकांमध्ये प्रेम फुलण्याच्या क्रियेला अधिक सहकार करतो.म्हणून या सुगंधाला सहकार असेही म्हणतात.
अङ्कुरिते पल्लविते कोरकिते विकसिते च सहकारे।
अङ्कुरितः पल्लवितः कोरकितो विकसितश्च मदनो ऽसौ॥
आंब्याच्या मोहराचे अगदी टोकदार असे बाण त्यावर रुंजी घालणारे भ्रमरानापासुंच कामदेवाच्या धनुष्याची दोरी बनवली आहे.असा हा वसंताचा योद्धा येत आहे ,सखी अनेक हृदयांना घायाळ करायला.
आम्रतरूचे नूतन पल्लव बाण तीक्ष्ण साचा
रूंजी घाली माळ भ्रामरी धनुची प्रत्यंचा
हाती घेऊन पहा पातला योद्धा ऋतुराज
मना जिंकण्या प्रणयिजनांच्या चढवितसे साज ॥
(धनंजय बोरकर यांनी कालिदासाच्या ‘ऋतुसंहार’चा मराठीत भावानुवाद केला.)
प्रफुल्लचूताङ्कुरतीक्ष्णसायो
द्विरेफमालाविलसद्धनुर्गुणः।
मनांसि वेद्धुम् सुरतप्रसङ्गिनां
वसन्तयोद्धा समुपागतः प्रिये
-ऋतुसंहार ६-१
महाकवी कालिदास यांच्या ऋतुसंहार या ग्रंथात मदनदेवाच्या या बाणांपैकी आम्रमंजिरीचे मुक्त हस्त कौतुकच केले आहे.
हिमालयाला जरी अनेक पुत्र होते तरी लाडक्या पर्वतीपासून त्याची नजर हटत नसे जसे वसंतात अनेक फुलं फुलली असली तरी भ्रमाराला आम्र फुलांवरच विशेष अनुराग असतो.
महीभृतः पुत्रवतो ऽपि दृष्टिस्तस्मिन्नपत्ये न जगाम तृप्तिम्।
अनन्तपुष्पस्य मधोर्हि चूते द्विरेफमाला सविशेषसङ्गा॥
-कुमारसंभव १-२७
याच मधुर अशा आम्र फुलांचा रस पिऊनच कोकिळेला पंचम स्वर फुटतो.
ज्याचा सर्वोत्तम बाण आंब्याच्या फुलांचा आनंददायक गुच्छ आहे, ज्याचे धनुष्य किमशुकाचे फूल आहे, ज्याचा चंदेरी चंद्र असे छत्र आहे, ज्याचा रौप्य हत्ती झुलत निघता ज्याच्या स्वारीसाठी मल्याया पर्वताची झुळूक वारासह घमघमणारी चंदनाच्या वासासम आहे. ज्याचे मधुर गीत गाणारे पक्षी आहेत, म्हणजे कोकिला तो जसा आहे, तो जगाचा विजय करणारा, तो निराकार प्रेमदेव, त्याच्या मित्राबरोबर, म्हणजे वसंता, वसती ऋतु, तुम्हा सर्वांवर उदार मनाने, उदार भावनेने जोडू दे.
आम्रीमञ्जुलमञ्जरीवरशरः सत्किंशुकम् यद्धनुर्
ज्या यस्यालिकुलम् कलङ्करहितम् चत्रम् सितांशुः सितम्।
मत्तेभो मलयानिलः परभृतो यद् वन्दिनो लोकजित्
सोऽयम् वो वितरीतरीतु वितनुर् भद्रम् वसन्तान्वितः॥
ऋतुसंहार-६-२८
काही काव्यामध्ये या सुन्दर मोहरा पाहुन ज्यान्चे पती व्यापारासाठी देशभ्रमण करीत असतील अशा स्त्रीयान्चा व्याकुळही शब्दोदित केला आहे.
कवींची अशी रसभरीत वसंत आणि आम्र तरूचे रूप यांचा घनिष्ठ संबंधावर अनेक काव्ये आहेत.
आपणही निरीक्षण करता दिसते की दिवसभर या आंब्याच्या रसाळ ,सुगंधी मोहरावर ना ना प्रकारची पाखरे असतात.पण मधमाशीचा प्रिय हा रस ,दिवसभर तिच्या हुम्मम्म्म्म आवाजाने भरलेला असतो.असे म्हणतात की जणू आंब्याचे झाडच हुम्म्म्म स्वर काढत कंपण पावत असते.ह्या मधमाश्यांमुळे त्यांना चिकटलेले पराग कण एका झाडाच्या फुलापासून दुसऱ्या झाडाच्या फुलावर पडून क्रॉस पॉलीनेशन घडून येते .आणि फलधारणा घडून येते.आंब्याच्या झाडाचे सेल्फ पॉलीनेशनही होते .म्हणजे एकाच फुलामध्ये स्त्री व पुरुष बीज असलेले फुल असेल तर अथवा स्त्रीबीज ,पुरुष फुलही वेगवेगळी असतात.पण स्त्री बीज असणारेच फुल फळ धारणा करू शकते.
आंब्याचा मोहर पाहता झाड अगदी त्या एका एका शेंडयावर शेकडो फुलांनी भरून गेलेले असते.पण हळू मोहर गळू लागतो.आणि मोजकीच फळे झाडाला दिसतात.याचाच एक अर्थ की कितीही संकटे आली ,सुंदरता (फुले)देखील गळाली तरी त्यातूनही चांगले घडू शकते ,चांगले फळ मिळू शकते,हिम्मत हरायची नाही.
क्रमशः
-भक्ती
सन्दर्भ-The Mango Motif in Sanskrit Poetry-Dr.S.R.Sarma
प्रतिक्रिया
22 Mar 2024 - 9:56 am | विवेकपटाईत
सुंदर लेख. आवडला.
22 Mar 2024 - 10:16 am | अहिरावण
वा !
22 Mar 2024 - 12:17 pm | कर्नलतपस्वी
मोहरला अंबा
मोहरला निंब
कोकीळ कुजने
मन झाले धुंद
कुणा ओढ अंब्याची
कुणा ओढ खंब्याची
वसंताळले मन गाते होरी
वाट होळीच्या सणाची
लेख आवडला.
22 Mar 2024 - 2:06 pm | Bhakti
एकंदरीत सर्व धुंद :)
22 Mar 2024 - 7:00 pm | कंजूस
कुणा ओढ अंब्याची
होय, पण आम्हाला झाडाखाली पडलेल्या पिकलेल्या अंब्याची.
22 Mar 2024 - 1:27 pm | कंजूस
अहो कामदेव, डायबेटिसचा मनुष्य असेल तर उसाचा बाण नका ना मारू. कडुनिंबाचा मारा.
22 Mar 2024 - 2:08 pm | Bhakti
हा हा ,हा एक छान खुसखुशीत लेख होईल :)
22 Mar 2024 - 2:05 pm | Bhakti
विवेकपटाईतजी,अहिरावणजी, कर्नलतपस्वीजी,कंकाका खुप खुप धन्यवाद.
22 Mar 2024 - 2:53 pm | अहिरावण
आम्रमोहोराचे आंबे होतात. चांगले "आंबे" कोणते आणि ते कसे निवडावे?
22 Mar 2024 - 5:47 pm | कुमार१
सुंदर लेख.
22 Mar 2024 - 10:49 pm | सौन्दर्य
संदर्भ देखील उत्तम व वैविध्यपूर्ण
23 Mar 2024 - 8:50 am | भागो
तुमचा संस्कृत लेख वाचून झटकाच बसला. लेख एकदम भारी झाला आहे. पुढील भागाच्या प्रतिक्षेत.
23 Mar 2024 - 9:19 am | Bhakti
कुमारी, सौंदर्यजी,भागोजी खुप खुप धन्यवाद!
23 Mar 2024 - 9:20 am | Bhakti
माफ करा,कुमारजी धन्यवाद!
23 Mar 2024 - 11:32 am | प्रचेतस
सुरेख लिहिलंय.
23 Mar 2024 - 2:53 pm | नठ्यारा
लेख व्यासंगी आहे. आवडला.
-ना.न.
23 Mar 2024 - 3:10 pm | टर्मीनेटर
संस्कृत अक्षर भैस बराबर… अशी अवस्था असलेल्या माझ्यासारख्या वाचकांसाठी त्याचा समजेल असा अनूवाद करून देण्यासाठी तूमचे आणि प्रचेतस अशा मिपाकरांचे आभार मानावे तेवढे थोडेच!
पूढील भागाच्या प्रतिक्षेत…
24 Mar 2024 - 9:02 pm | Bhakti
प्रचेतस,नठ्यारा,टर्मीनेटर खुप खुप धन्यवाद!
25 Mar 2024 - 1:50 am | चामुंडराय
व्वा, सुंदर लेख.
आम्रमंजिरी ही फुलताना झाडास आंबे यावे ...
"आम्रमंजिरी" हा शब्द विशेष आवडला.
25 Mar 2024 - 8:24 am | प्राची अश्विनी
किती नवीन माहिती कळली.
लेख खूप आवडलाय
25 Mar 2024 - 5:08 pm | गोरगावलेकर
खूप छान लिहलंय.
26 Mar 2024 - 1:14 pm | चांदणे संदीप
सुरेख लिहिलंय. अगदी गारगार वाटलं.
पुभाप्र!
सं - दी - प