“जेव्हा काठीचा मार पडला तेव्हाच देश योग्य मार्गावर आला.” - पाकिस्तानातील एक वयस्क.
पाकिस्तानने पहिल्या दशकात सात पंतप्रधान पाहिले. लियाकत अली खान वगळता उर्वरित दोन वर्षांपेक्षा कमी काळ टिकले. कोणत्याही राष्ट्रीय निवडणुका झाल्या नाहीत. प्रांतिक निवडणुकीत मोठ्या प्रमाणात हेराफेरी झाली. बलुचिस्तान आणि पख्तूनिस्तानला आपले स्वातंत्र्य हवे होते. पूर्व पाकिस्तानही हातातून निसटणार होता. निरक्षरता आणि गरिबी वाढत होती. अहमदिया पंथाचे मूलतत्त्ववादी सुन्नी मुस्लिमांशी भिडत होते.
अमेरिकेने अय्युब खान यांना सत्ता हातात घ्यावी लागेल, अन्यथा डॉलर्स मिळणार नाहीत, असा इशारा दिला.
अय्युब खान
7 ऑक्टोबर 1958 रोजी राष्ट्राध्यक्ष इस्कंदर मिर्झा यांनी मार्शल लॉ जाहीर केला आणि अयुब खान यांच्याकडे सत्ता सोपवली. मात्र 24 ऑक्टोबर रोजी तो मागे घेतला. 27 ऑक्टोबर रोजी अयुब खान यांनी राष्ट्रपतींनाच अटक केली. काही महिन्यांपूर्वी पंतप्रधान असलेले आणि पाकिस्तानच्या संस्थापकांपैकी एक सुहरावर्दी यांना तुरुंगात टाकण्यात आले. मग हुकूमशाही सुरू झाली, जी कमी-अधिक प्रमाणात पुढच्या दशकभर टिकली. प्रेस सेन्सॉर झाली. लष्कराने “रेडिओ पाकिस्तान” ताब्यात घेतला. विरोध करणाऱ्यांना तुरुंगात टाकले गेले.
मात्र, मार्शल लॉने भरकटलेल्या पाकिस्तानलाही एक दिशाही दिली. अयुब खान आपल्या आत्मचरित्रात लिहितात, “भ्रष्ट राजकारण्यांच्या हाती देश सोपवून देशही भ्रष्ट होत होता… मार्शल लॉ लागू होताच 170 कोटी रुपयांचा कर जमा झाला. मी एका व्यावसायिकाला विचारले की त्याने त्याचे खरे उत्पन्न का सांगितले? तो म्हणाला की, भिंतींवर लावलेले तुझे ते छायाचित्र ज्यात तू आमच्याकडे बोट दाखवतोय आणि तुझ्या चेहऱ्यावर गुरगुरनारे भाव आहेत, ते पाहिले तर आम्हाला भीती वाटायची की हा माणूस माफ करणार नाही.
तीन हजार भ्रष्ट आणी हलगर्जी अधिकाऱ्यांना नोकरीवरून काढून टाकण्यात आले. गुन्हेगारांना शिक्षा देण्यासाठी 'जलद न्यायालये' निर्माण करण्यात आली. त्यांच्या राजवटीत एका व्यक्तीला जास्तीत जास्त पाचशे एकर सुपीक जमीन ठेवण्याची परवानगी होती. उर्वरित जमीन हिसकावून भूमिहीनांना वाटण्यात आली.
अमेरिकेच्या सांगण्यावरून त्यांनी एक नवीन स्वच्छ राजधानी बनवली, ज्याला ‘इस्लाम’ च्या नावावरून इस्लामाबाद नाव देण्यात आले. हे शहर लष्करी तळ रावळपिंडीजवळ होते, त्यामुळे लष्करावर नियंत्रण ठेवणेही सोपे होते. दुसरे कारण असे की, कराची यूपी-बिहारमधून आलेल्या काही चांगल्या सुशिक्षित मुस्लिमांनी भरले होते, ज्यांच्या चालिरीती त्यांना आवडत नव्हत्या.
अयुब खान यांनीही उलेमांना (धार्मिक नेत्यांना) कमी महत्त्व दिले. त्यांच्या आत्मचरित्रात ते पाकिस्तानला कट्टर आणि विक्षिप्त बनवण्यास ऊलेमा जबाबदार असल्याचे लिहितात. त्यांनी पहिल्या पत्नीच्या परवानगीशिवाय दुसरी पत्नी करण्यास बंदी घातली, मुलांच्या जन्मावर बंधने घातली आणि स्त्रियांना बुरख्यातून बाहेर येण्यास सांगितले.
ते म्हणाले, “विसाव्या शतकातील मुस्लिमाने जुन्या संस्कारातून स्वत:ला खरा मुस्लिम सिद्ध करू नये. आपल्याला आजच्या जगाच्या नियमांनुसार जगायला हवं.''
केनेडी
हद्द तर तेव्हा झाली जेव्हा त्यांनी 'इस्लामिक रिपब्लिक ऑफ पाकिस्तान'चे 'रिपब्लिक ऑफ पाकिस्तान' असे नामकरण केले. मात्र, 1962 मध्ये त्यांना पुन्हा ‘इस्लामिक’ लावावे लागले.
एवढे सगळे होऊनही पाकिस्तानची प्रगती मंदावली होती. जनतेच्या विश्वासाला तडा जात होता. जॉन एफ केनेडी हे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष झाले, ज्यांचा कल भारताकडे होता. अयुब खान यांनी जनतेचा विश्वास जिंकण्यासाठी निवडणुका जाहीर केल्या. मृत लोकशाहीत निवडणुका ही केवळ औपचारिकता असते.
काहीसं जेपींच्या शैलीत, एक नेता तिच्या दीर्घ राजकीय निवृत्तीतून परतली; आणि अयुब खानच्या हुकूमशाही विरोधात उभी राहिली. ही लढाई अयुब खानसाठी अवघड होती. हे ते नाव होतं जे पाकिस्तानचं अस्तित्व होतं. अयुब खान यांच्यासमोर होती कायद-ए-आझम यांची बहीण आणि पाकिस्तानची 'मदर-ए-मिल्लत' (राष्ट्रमाता) फातिमा जिन्ना! (क्रमशः)
मूळ लेखक - प्रविण झा.
पुस्तक - दास्तान- ए- पाकिस्तान.
प्रकाशक- ई संपदा प्रकाशन.
https://esamaadprakashan.com/books/dastan-e-pakistan/
प्रतिक्रिया
1 Mar 2024 - 10:11 pm | मुक्त विहारि
वाचत आहे..
1 Mar 2024 - 11:33 pm | चित्रगुप्त
विविध व्यक्तींचे फोटो देताना ते अयूबखानाच्या फोटोसारखे लहानसे दिलेलेच बरे. खूप भव्य निसर्ग किंवा अन्य जास्त तपशील असलेले फोटो देताना (उदाहरणार्थ डॉन दैनिकाचा फोटो) ६००-७०० रुंदी ठेवणे योग्य.
केनेडी आणि फातिमा जिन्ना यांचे येवढे मोठे फोटो अप्रस्तुत वाटले. अयूबखानचा तो बोट दाखवणारा, 'गुरगुरणारे भाव' वाला फोटो हुडकून टाका राव. लहानपणी अयूबखानची व्यंगचित्रे पेप्रात बघितलेली आठवतात.
राणी एलिझाबेथ - नेहरू, अयुबखान वगैरे.
2 Mar 2024 - 7:46 am | तुषार काळभोर
https://www.flickr.com/photos/pimu/22170537203
फ्लिकर वरून इमेज थेट शेअर करता आली नाही.
फोटो खाली कॅप्शन असं आहे -
In the early days of military rule such gestures could be very effective
2 Mar 2024 - 9:27 am | अमरेंद्र बाहुबली
फोटोंना कुठलीही साईज टाकली नाही.
2 Mar 2024 - 1:57 pm | चित्रगुप्त
प्रयोगादाखल मी खालील फोटो नेटवरून copy image address घेऊन इथे चढवल्यावर त्याच्या मूळच्या 1600 x 1000 (518 kb) आकारात इथे दिसत आहे.
आता width 200 ठेऊन तो इथे चढवल्यावर खालीलप्रमाणे लहान आकारात दिसत आहे. तेंव्हा मिपावर फोटो चढवताना नुस्ता चेहरा किंवा अगदी कमी तपशील असलेले फोटो २००-३०० रुंदी ठेऊन देणे बरे. जास्त तपशील असणारे, भव्य दृष्य वगैरे, किंवा ज्यात काही 'वाचायचे' असते असे फोटो ६००-७०० रुंदीत द्यावेत.
1 Mar 2024 - 11:54 pm | नठ्यारा
'ये धोती पहननेवाले क्या कर सकते है', असं हाच अयूबखान लालबहाद्दूर शास्त्रीजींना उद्देशून म्हणाला होता. अयूबखान सहा फुटाहून अधिक उंची असलेला धिप्पाड सेनानायक होता. याउलट शास्त्रीजी अगदीच चिमुकले पाचफुटी होते व चेहऱ्यावरून निरागस वाटायचे. १९६५ च्या युद्धाच्या आधी शास्त्रीजींनी भारतीय सेना पश्चिम पंजाबात घुसेल असं सांगितलं आणि सेना त्याप्रमाणे घुसली. भारतीय सेना रावी नदीच्या पूर्व किनाऱ्यावर दाखल झाली व तिने डागलेले काही तोफगोळे नदी ओलांडून लाहोरात जाऊन पडले. अयूबखानची पळता भुई थोडी झाली.
शास्त्रीजी असेच दटून राहिले तर पाकिस्तान नामशेष होईल हे अमेरिका व रशिया दोघांनाही कळलं. शास्त्रीजींना तहाच्या निमित्ताने ताश्कंदात आणलं. शास्त्रीजींनी आपला मुस्लीम खानसामा त्यावर नको तेव्हढा विश्वास टाकून सोबत नेला होता. त्याने तिथे शास्त्रीजींना विष देऊन ठार मारलं. नंतर तो परस्पर पाकिस्तानांत पळून गेला. या घटनेवर अयूबखानची देखरेख होती अशी वदंता आहे.
शास्त्रीजींच्या मृत्यूचं भांडवल करून अयूबखानाने अनेक पाश्च्यात्यांना रहस्यांकित ( ब्लॅकमेल ) केलं म्हणतात.
-नाठाळ नठ्या
2 Mar 2024 - 7:16 am | अमरेंद्र बाहुबली
छान माहीती. धन्यवाद.
2 Mar 2024 - 12:20 pm | सुबोध खरे
पाकिस्तानच्या लोकशाहीत इतकी बजबजपुरी आहे कि राष्ट्रपती अगदी फडतुस कारणासाठी सुद्धा पंतप्रधानांना बरखास्त करून सत्ता हातात घेतात आणि असं झालं कि अस्थिरतेचे कारण देऊन लष्कर सत्ता काबीज करते.
पाकिस्तानचे राष्ट्रपती इस्कंदर मिर्झा यांनी मार्शल लॉ लावून लष्कराला पाचारण केले ते सापाला घरात घेण्यासारखे होते. यानंतर जेंव्हा जेंव्हा संधी मिळाली तेंव्हा लष्कराने सत्ता हातात घेतली.
मुळात पाकिस्तानात लोकशाहीची बीजे रुजलीच नाहीत. ज्या इस्लामवर पाकिस्तानची निर्मिती झाली त्या धर्माला मुळातच लोकशाही हा विचार माहिती नाही.
कोणत्याही इस्लामी राष्ट्रात सुलतान( राजा) याने तुर्कस्तानच्या खलिफाचा मांडलिक म्हणून राहून इस्लामच्या तत्वाप्रमाणेच (शरिया) राज्य चालवायचे हाच नियम
यामुळेच कोणत्याही इस्लामी राष्ट्रात लोकशाही नांदू शकत नाही हि वस्तुस्थिती.
भारताच्या पश्चिमेस फक्त इस्रायल मध्ये लोकशाही आहे. मधल्या कोणत्याही राष्ट्रात लोकशाही नांदू शकत नाही
2 Mar 2024 - 1:53 pm | अमरेंद्र बाहुबली
अगदी खरं आहे. मुहम्मद पैगंबरांनंतर खलिफापद सुरू झाले, त्याचा ईतिहास भयानक रक्तरंजित आहे. खलिफापद आधी मक्का, मग दमास्कस, बगदाद करत ईजिप्त ला स्थिरावले, तिथून खलिफाला तुर्कस्तानमध्ये ऊचलून नेण्यात आले. खलिफाला पैगंबरांचे वस्त्र वगैरे वस्तू मिळतात. पण तूर्कींकडे खलिफापद अरबांना मान्य नाही/नव्हते. शेवटचा खलिफा १९२८ साली झाला नंतर खलिफापद केमालपाशा ने रद्द केले.
आपल्या इथल्या शाह्यांनाही खलिफाचा मान्यता मिळवावी लागायची. टिप्या बराच झटला होता मान्यता मिळवायला.
4 Mar 2024 - 5:46 pm | टर्मीनेटर
टिप्या खूप जुना झाला, तेवढ्या मागे जायचीही गरज नाही! तुर्कांवर झालेल्या अन्यायाचा निषेध तसेच पहिल्या महायुद्धानंतर इस्लामचा खलीफा म्हणून ऑट्टोमन साम्राज्याच्या सुलतानाचा अधिकार अबाधित ठेवण्यासाठी ब्रिटीश सरकारवर दबाव आणण्याच्या नावाखाली १९१९ ते १९२४ ह्या कालावधीत भारतीय मुस्लिमांनी 'खिलाफत चळवळ' सुरु केली होती. आश्चर्याची गोष्ट म्हणजे मो.क. गांधी, वल्लभभाई पटेल आणि बाळ गंगाधर टिळक अशा तत्कालीन राजकारण्यांनीसुद्धा ह्या चळवळीला पाठिंबा दिला होता 😀
असो, लेखमाला छान चालू आहे!
पुढील भागाच्या प्रतीक्षेत असलेला...
टर्मीनेटर (मोदी का परीवार)
4 Mar 2024 - 11:52 pm | नठ्यारा
टर्मीनेटर,
मुस्लीम कार्यासाठी तोंडदेखला पाठिंबा द्यायला टिळकांची हरकत नव्हती. बदल्यात असहकार चळवळीस मुस्लिमांचा पाठिंबा मिळणार होता. लखनौ कराराच्या पार्श्वभूमीवर हिंदूमुस्लीम सहयोगाची चांगली संधी होती.
-नाठाळ नठ्या
5 Mar 2024 - 7:16 am | अमरेंद्र बाहुबली
द्विराष्ट्रवागाची बीजे लखनौ करारात रोवली गेली होती असे म्हणतात. टर्मानेटर साहेब धन्यवाद.
6 Mar 2024 - 2:45 pm | टर्मीनेटर
म्हणजे ज्याला आज मुस्लिम तुष्टीकरण वगैरे म्हणतात त्याची ही सुरुवात होती का?
माझे कैक राष्ट्रवादी मुस्लिम मित्र आहेत ज्यांच्या लेखी ही फक्त आणि फक्त राजकीय खेळी होती!
बादवे तुम्ही गांधी आणि पटेल ह्यांच्या तत्कालीन भूमिकेविषयी काही लिहिले नाहीये...
10 Mar 2024 - 2:39 am | नठ्यारा
हे मुस्लिम तुष्टीकरण वाटंत नाही. टिळकांनी पुढे केलेला दोस्तीचा हात वाटतो.
-नाठाळ नठ्या
5 Mar 2024 - 2:23 pm | श्वेता व्यास
वाचत आहे. बाकी जीनांची बहीण त्यांच्यासारखीच दिसते आहे.
12 Mar 2024 - 6:07 pm | सुधीर कांदळकर
अयूबखानबद्दल नवी माहिती मिळाली. इतरही बरेच काही ठाऊक नव्हते. छान, ओघवते रूपांतर आवडत आहे. धन्यवाद.
12 Mar 2024 - 7:50 pm | अमरेंद्र बाहुबली
धन्यवाद.
12 Mar 2024 - 11:03 pm | रामचंद्र
अयूबखान राजवटीत पाकिस्तानची आर्थिक स्थिती भारतापेक्षा बरी होती असं वाचायला मिळतं. पण नेहरू-शास्त्री काळात भारतात जास्तीत जास्त उद्योग परकीय मदतीने का होईना भारतीय प्रयत्नांतून उभे करण्यावर भर असल्यामुळे भारत हा खऱ्या अर्थाने विकसनशील होता. पाकिस्तानसारखा परकीय उत्पादनांचा सुळसुळाट, त्यामुळे दिखाऊ सुबत्तेच्या खुणा कमी दिसत असाव्यात, अपवाद मुंबई, दिल्ली, कलकत्ता, मद्राससारखी शहरं.