व्ही फॉर - भाग चार - अंतिम
--------------------------------
त्यांच्या गॅंगमध्ये एक उत्तमसिंग नावाचा पोरगा होता. मध्य प्रदेशातला. त्याच्या सहाय्याने तिकडून भारीभारी शस्त्रास्त्रं यायची . थातूरमातूर गुन्हेगारीपण आता काळाबरोबर बदलली होती .
दिप्या आणि आणखी चार पोरं पळाली . आधी नाशिक , गुजरात आणि मग तिथून मध्यप्रदेशांत एके ठिकाणी .
नर्मदामैय्याच्या काठावर एक छोटं गाव होतं ते. मस्त मोकळी हवा ,मुबलक खायलाप्यायला. डोक्याला शॉट नव्हता . शेतावरच्या त्या घरात सगळ्या गोष्टी उपलब्ध होत होत्या . सगळ्या ... सगळ्यांचं वजन वाढलं होतं. त्यांच्यावर हल्ला झाला असता तर पळणं मुश्किल होतं जाड्यांचं !
तिथे दिप्याला गांजाचं व्यसन लागलं. त्याच्या कडू वासात तो त्याच्या कडू आठवणी फुंकू पहायचा; पण त्या धुरांच्या वलयातही त्याला रियाच दिसायची .
एके दिवशी विचारांनी दिप्याची नशाच उतरवली .. किती दिवस इथं लपून राहायचं ? त्याला घराची , छोट्या बहिणीची . आई -बापाची आठवण यायला लागली . त्याला स्वतःच्या शहराची आणि त्यांच्या एरियाची आठवण यायला लागली .
आणि एके दिवशी खबर आली - मोठी धक्कादायक खबर ! मोठा भाईला उडवण्यात खुद्द बापूसाहेबांचा हात होता.
दिप्या बिथरला. चवताळला. पोरं भंजाळली .
दिप्याने घरी परत जायची सुरुवात केली. आता पुढचं टार्गेट अर्थातच बापूसाहेब होतं .
पण एकेक गोष्टी असतात जगात . भानगडीच म्हणा हवं तर .
बापूसाहेबांचे वर्चस्व पुन्हा वाढलं होतं . त्यासाठी त्यांनी गुंड टोळ्यांना हाताशी धरलं होतं. जो त्यांना आडवा येईल त्याचा एन्काऊंटर ! त्यासाठी त्यांनी शहरात एक खास एन्काऊंटर स्पेशालिस्ट आणला होता- इन्स्पेक्टर रवी.
दिप्या शहरात परतला . त्याने पोरांना त्या नवीन इन्स्पेक्टरची कुंडली काढायला सांगितली.
शहराच्या उपनगरी भागात एक नवीन मॉल झाला होता. त्यामध्ये एक नवीन दागिन्यांचं दालन झालं होतं - ऑल ज्वेल्स . त्याचं उद्घाटन बापूसाहेबांच्या हस्ते होणार होतं . गर्दी असणार होती ;पण फार नाही.
दिप्याने रिस्क घ्यायची ठरवली होती . आर या पार !
XXX
तो दिवस उजाडला . सकाळी अकराची वेळ होती . दिप्या मात्र अस्वस्थ होता . ते गाडीतून कामगिरीवर निघाले . वाटेत त्यांचं कॉलेज लागलं . पुन्हा त्याला तिची तीव्रतेने आठवण आली. कॉलेजच्या आसपास पोरापोरींची गर्दी होती . त्याने खंड्याला विचारलं,' काय आहे रे आज ? '
तो हसत म्हणाला ,'भाई , आज वॅलेंटाईन डे आहे ! विसरला का तू ? ... टेन्शनमध्ये आहेस का ? '
' नाही रे ! ' दिप्याने त्याला झटकलं आणि 'अस्सं होय ? ' तो कडवटपणे स्वतःशीच म्हणाला . त्याच्या काळजात कळ आली . आजच्या गेमच्या नादात तो दिवसही विसरला होता. त्याने पहिल्यांदा रियाला विचारलं होतं तो हाच तर दिवस होता.
थांबायचा प्रश्न नव्हता . थांबायला वेळ नव्हता.
गाडी मॉलच्या पार्किंगमध्ये घुसली . ते कार तशीच थांबवून आतमध्येच बसून राहिले.
शेजारी एक पोरगा टेम्पोतून काही सामान उतरवत होता . वॅलेंटाईन डेच्या सजावटीचं तें सामान होतं. दिप्या त्याकडे बघत होता. त्यामध्ये एक मोठा बदाम होता. व्ही लिहिलेला .
बापूसाहेबांची गाडी आली आणि त्यांच्या मागे पोलिसांची गाडी . आता सगळंच अवघड होतं.
बापूसाहेब उतरले आणि गेले.
पोलिसांच्या गाडीतून पोलीस खाली उतरले अन इन्स्पेक्टर रवी . पण त्यांनी पटापट आडोसा घेतला , पोझिशन घेतली. त्यांनी दिप्याच्या गाडीवर , विशेषतः काचांवर गोळीबार सुरू केला.
त्यांना टीप होतीच...
दिप्याचा ड्रायव्हर जागेवरच गेला . तो आणि आणखी दोन पोरं खाली उतरली . त्यांनी आडोसा घेतला व फायरिंगला सुरुवात केली . दोन्ही पोरंही गेली . आता दिप्या एकटाच होता .
रवी एका खांबामागे होता . एक क्षण असा आला की रवी दिप्याच्या रेंजमध्ये आला . एक गोळी आणि काम तमाम ! पण दिप्याने त्याचं नेम धरलेलं ग्लॉक पिस्तूल खाली केलं ... त्याने सरळसरळ ... पण रवीने ती संधी वाया घालवली नाही . त्याच्या गोळीने दिप्याच्या हृदयाचा वेध घेतला .
दिप्या खाली पडला . पडताना त्याचा हात शेजारच्या सामानाला लागलं . तेही त्याच्या अंगावर पडलं. आणि व्ही लिहिलेला तो बदाम त्याच्या छातीवर .
रवीने दोन बोटं उंच करून त्याच्या टीमला व्ही करून दाखवला .
दिप्याने ते पाहिलं . त्यानेही त्याच्या बोटांचा अस्पष्टसा व्ही करून दाखवला ; पण तो कोणी पहिला नाही .
रवीचा व्ही फॉर व्हिक्टरी होता .
आणि - दिप्याचा व्ही फॉर वॅलेंटाईन होता .
आज वॅलेंटाईन डे होता आणि रिया ...
और उसके किये इतना तो बनताही था ! ...
दिप्याला कळलं होतं - रवी हा रियाचा नवरा होता ...
त्याच्या छातीवरचा बदाम आता रक्ताने पूर्ण भरला होता .
----------------------------------------------------
समाप्त
-----------------------------------------------
कॉपीराईट - बिपीन सांगळे
प्रतिक्रिया
14 Feb 2024 - 11:27 am | श्वेता व्यास
चांगली उतरवलीत कथा!
थोडी दीर्घही करता आली असती कदाचित.
14 Feb 2024 - 1:55 pm | Trump
छान. बर्याच दिवसांनी असले काही तरी वाचले. प्रेमकथा आता वाचु वाटत नाहीत.
14 Feb 2024 - 2:29 pm | टर्मीनेटर
अरेरे…
अशीच अवस्था झाली की दिप्या ‘भाई’ची 😀
पहिला भाग वाचल्यावर फारच छोटा वाटला होता, त्यावरचा तुमचा प्रतिसाद वाचल्यावर कथा छोटीशी असुनही तुम्ही ती छोट्या छोट्या भागांत लिहिणार आहात हे समजले!
लहान लहान भाग वाचायला अजिबात आवडंत नसल्याने मग ‘तुकडे तुकडे बिस्मिल्ला’ करण्यापेक्षा अंतीम भाग आल्यावरच एकसंध वाचून प्रतिसाद देउ असे ठरवले 😀
असो, ‘आशिक मिजाज’ असुनही “दिल को कभी दिमाग पे हावी नही होने देना चाहिये” ह्या तत्वाचे पालन करत असल्याने असेल कदाचीत, पण दिप्या ‘भाई’की लव्ह स्टोरी कुछ खास नही लगी… अर्थात हे माझे वैयक्तिक मत झाले, भावनांना जास्त महत्व देणाऱ्यांची प्रतिक्रीया वेगळी असु शकेल.
मला तुमच्या कथा वाचायला आवडतात त्यामुळे पुढच्या कथेची प्रतिक्षा आहेच.
14 Feb 2024 - 8:20 pm | नठ्यारा
बिपीन सुरेश सांगळे,
कथा आवडली. काही बाजू आजून खुलवायला हव्या होत्या. उदा. : टीप देणारा कसा नाराज होता, इत्यादी.
हिला कथा म्हणण्यापेक्षा कथाबीज म्हणावंसं वाटतं. हिच्यावर वेबसिरीज चांगली निघेल. उत्कंठावर्धक होईल.
-नाठाळ नठ्या
14 Feb 2024 - 10:16 pm | कर्नलतपस्वी
ठिक.
16 Feb 2024 - 7:41 am | बिपीन सुरेश सांगळे
कर्नलजी
अमरेंद्र
श्वेता
ट्रम्प
टर्मिनेटर
नठ्यारा
आणि सगळे वाचक
खूप आभार
16 Feb 2024 - 7:42 am | बिपीन सुरेश सांगळे
व्हॅलेंटाईन डे ची कथा लिहायची होती .तो मुहूर्त गाठायचा होता . ही कल्पना सगळ्यात पहिल्यांदा सुचली .इतर कल्पनांवर विचार केला त्या मला तेवढ्या शा पटल्या नाहीत .त्यामुळे ठरवलं की याच कथेवर लिहूया आणि सुरुवात केल्या केल्या मला लक्षात आलं. कथेचा आवाका मोठा आहे .ही कथा अशी लिहून लोकांच्या मनावर ठसणार नाही आणि तसंच झालं
माझी नेहमीची शैली आली नाही .
लेखन फसलं असं वाटतंय .
असो
वाचक मायबाप ! ...
आपला खूप आभारी आहे
16 Feb 2024 - 1:23 pm | Trump
व्हॅलेंटाईन डे ची कथा लिहायची होती
माझे काही ओळखीचे लेखक आहेत. ते आधी कथेचा उत्तरार्ध लिहितात आणि मग पुर्वार्ध लिहीतात. त्यामुळे कथा दुरुस्त करणे, सुधारणे सोपे जाते.
16 Feb 2024 - 7:49 am | बिपीन सुरेश सांगळे
कर्नलजी
अमरेंद्र
टर्मिनेटर
आपण आवर्जून वाचता याचा आनंद आहे .
अदरवाईज लक्षात येत नाही की वाचक वाचत आहेत , त्यांना आवडत आहे ?
मध्ये एके ठिकाणी विषय निघाला - तुम्ही कमी पोस्ट करता .
तर मी लिहितो खूप पण पोस्ट फार करत नाही , कारण लोकांचा प्रतिसाद नसेल तर आपण थांबणं योग्य , असं मला वाटतं
तरी खूप नाही पण थोडंफार तरी पोस्ट करायलाच हवं , नाहीतर मलाच चैन पडणार नाही
पण आभार तर खूपच आहेत साऱ्यांचे
16 Feb 2024 - 7:53 am | बिपीन सुरेश सांगळे
नठ्यारा
कथा आवडली. काही बाजू आजून खुलवायला हव्या होत्या. उदा. : टीप देणारा कसा नाराज होता, इत्यादी.
हिला कथा म्हणण्यापेक्षा कथाबीज म्हणावंसं वाटतं. हिच्यावर वेबसिरीज चांगली निघेल. उत्कंठावर्धक होईल.
आपल्या अशा प्रतिक्रियेसाठी आपले विशेष आभार
16 Feb 2024 - 8:02 am | बिपीन सुरेश सांगळे
टर्मिनेटर
अहो काय सुंदर प्रतिक्रिया लिहिली आहे तुम्ही
लै च भारी . खरंच .
एवढी मोठी प्रतिक्रिया , मुख्य म्हणजे त्यातला आशय मला पूर्ण पटलेला आहे
खूप आभार
पुसणारं कोणी असेल
तर डोळे भरून यायला अर्थ आहे
तसं
वाचणारं कोणी असेल
तर लिहायला अर्थ आहे
16 Feb 2024 - 4:06 pm | कर्नलतपस्वी
एकदम पटलं.
पण हे दु:ख तुमच्या एकट्याचं नाही.
महान दु:खाचा कवी यांनी असेच काहीसे मत आपल्या "कावळ्याचा रंग" या कवीते द्वारे व्यक्त केले आहे.
कवीवर्य आरती प्रभू,सुधीर मोघे एव्हढचं काय तुकोबाराय आणी मी स्वत: या बाबतीत खंत व्यक्त केली आहे.
ही निकामी आढ्यता का ? दाद द्या अन् शुद्ध व्हा
सूर आम्ही चोरतो का ? चोरिता का वाहवा
-आरती प्रभू
कुणी आपले म्हणेना
कुणी बिलगेना गळा
कंठ दाटताना झाला
रंग कावळ्यांचा काळा...
-ग्रेस
साद प्रतीसाद, छिन्नी हातोडीचे घाव
ठोके पडल्याविना मुर्ती घडणार नाही.
प्रतीसाद भावनांना जीथे मिळणार नाही
तीथे मी उपेक्षितांचा धनी होणार नाही....
-अस्मादिक
"प्रतिसादाच्या निमीताने प्रती प्रतिसाद", हा माझा मिपावर लेख आहे.
लिहीत रहा. पहिल्या पंक्तीचे लेखक आहात.
16 Feb 2024 - 7:35 pm | नठ्यारा
कर्नलसाहेब,
पहिल्या पंक्तीबद्दल सहमत. मी पूर्वीपासून यांचं लेखन वाचीत आलोय. पहिलेपहिले बाळबोध होतं. पण नंतर त्यांनी बरेच परिश्रम घेऊन सुधरवलं. निदान मलातरी असंच वाटतं. ते वाचकांच्या मतांची दखल घेतात, हे मला विशेषकरून आवडलं.
-नाठाळ नठ्या
26 Feb 2024 - 3:15 pm | चौथा कोनाडा
काहीसा अपेक्षित शेवट (गुन्हेगारीचा शेवट या पेक्षा काय वेगळा असतो ?)
व्ही फॉर चा फारसा धक्का किंवा सरप्राईझ मिळालं नाही !
दिप्याची लव्हकथा आणखी रंगायला हवी होती.. गुन्हेगारीतील आणखी तपशिल देता आले असते.
(अश्या प्रकारची दीर्घकथा मालिका / कादंबरी लिहायला वाव आहे तुम्हाला.
एकंदरीत व्ही फॉर एन्टरटेनिन्ग होती.
धन्यू बिपीन सुरेश सांगळे _/\_