११ वर्षाच्या मुलीला बलात्कारानंतर गर्भधारणा झाली होती. परंतु आता गर्भ ३१ आठवड्यांचा असल्यामुळे तिला गर्भपाताची परवानगी उच्च न्यायालयाने नाकारली
नुकतीच ही जयपूरची बातमी वाचली आणि सुन्न व्हायला झाले. इतक्या अल्पवयीन मुलींवर बलात्काराच्या घटनेतून जे मातृत्व लादले जाते ते अत्यंत दुःखद आणि निषेधार्ह आहे. या निमित्ताने या विषयाचा घेतलेला हा शास्त्रीय कानोसा.
2022 मध्ये प्रसिद्ध झालेल्या युनिसेफच्या अहवालानुसार सुमारे 13 टक्के मुलींवर अशा प्रकारचे मातृत्व लादले जाते. आफ्रिका खंडातील सहारा वाळवंटाखालील देशांमध्ये तर हे प्रमाण 25% आहे; दक्षिण आशियात ते १०% आहे. अशा घटनांमध्ये सुमारे 20% घटना बाललैंगिक अत्याचार या सदरात मोडतात. त्या वरील वयोगटांमध्ये 33% प्रकरणांमध्ये बलात्कार हे मातृत्वाचे कारण असते.
अल्पवयीन मातृत्वाची सामाजिक कारणे
१. दैनंदिन पाणीपुरवठा आणि मलनिस्सारण या मूलभूत सुविधा घरांपासून लांब अंतरावर असणे.
२. शाळा घरापासून खूप दूर असणे आणि तिकडे जाण्याचा मार्ग असुरक्षित असणे. खुद्द शाळेच्या वर्गातील मुलग्यांकडून आणि शिक्षकांकडून देखील भय संभवते.
३. प्राथमिक आरोग्य केंद्र सुद्धा दूरच्या अंतरावर असणे आणि तिथली अपुरी वैद्यकीय सुविधा
४. गरिबी हे तर अत्यंत महत्त्वाचे कारण. दारिद्र्यरेषेखालील पालकांकडून आपल्या मुलांच्या मूलभूत गरजा देखील पुरवल्या जात नाहीत. त्यामुळे अशा कुटुंबांमधील काही मुली नाईलाजाने परिचयातील सधन पुरुषांशी लैंगिक संबंध ठेवून त्या बदल्यात पैसे आणि इच्छित वस्तू मिळवतात.
५. विवाहवय कायदा अस्तित्वात असूनही अजूनही कित्येक प्रदेशांमध्ये बालविवाह सर्रास होताना दिसतात.
युनिसेफच्या 2021च्या माहितीनुसार जगभरात मिळून आजपर्यंत झालेल्या बालिकाविवाहांपैकी (किंवा प्रथम लैंगिक संबंधातून गरोदर) सुमारे 65 कोटी महिला जिवंत आहेत. त्याची जागतिक टक्केवारी खालील चित्रात पाहता येईल :
(चित्रसौजन्य : युनिसेफ)
अशा प्रकारच्या मातृत्वातून संबंधित मुलींना काही गंभीर शारीरिक आणि सामाजिक दुष्परिणामांना तोंड द्यावे लागते. ते आता थोडक्यात पाहू :
शारीरिक दुष्परिणाम
१. गरोदरपणात उच्च रक्तदाब आणि फीट्सचा विकार होण्याची शक्यता
२. प्रसूतीपूर्व डॉक्टरी सल्लामसलतीकडे दुर्लक्ष आणि हेळसांड
३. मुदतपूर्व प्रसूती
४. प्रसूती दरम्यान गंभीर अडथळा, सिझेरियन किंवा अन्य शास्त्रक्रियांची गरज
५. प्रसूतीनंतर होणारा fistula, अतिरिक्त रक्तस्त्राव, गर्भाशय अस्तराचा दाह. तसेच क्षयरोग आणि अन्य जंतुसंसर्ग
६. आधीच कुपोषणग्रस्त असल्यास तीव्र ऍनिमिया सुद्धा असतो
७. खूप कमी वजनाच्या बालकाचा जन्म आणि/ किंवा जन्मानंतर लवकरच त्याचा मृत्यू.
सामाजिक दुष्परिणाम
१. शालेय शिक्षण थांबवावे लागणे
२. कुटुंब आणि आजूबाजूच्या समाजाकडून सतत दूषणे मिळणे; वेळप्रसंगी जवळच्या कुटुंबीयांकडून मारहाण
३. कुमारी माता हा आयुष्यभरासाठीचा कलंक लागतो.
४. गरोदरपणी योग्य वेळेत हस्तक्षेप न केल्यास जन्माला येणाऱ्या मुलांच्या पोषणाचा प्रश्न; अनाथालयांवरील बोजा वाढणे.
अशा प्रकारच्या शोषित मुलींच्या मुलाखती घेण्यात आल्या असून त्यांत त्यांनी त्यांचे मनोगत व्यक्त केले आहे. अशा समूहाकडून आलेल्या काही मागण्या अशा आहेत :
१. बलात्कारी पुरुषांना कठोर शासन करणे
२. पीडित मुलींना शाळेत पुन्हा घेऊन शैक्षणिक संधी देणे
३. या वयोगटातील मुलामुलींचे लैंगिक शिक्षण आणि गर्भनिरोधन या विषयावर प्रबोधन व्हावे
४. शाळांमधील वातावरण सुरक्षित होणे आवश्यक असून त्याची हमी देण्यात यावी. या संदर्भात पालक व शिक्षकांचे समुपदेशन व्हावे
५. पीडीत मुलींकडे बघण्याच्या सामाजिक दृष्टिकोनातही बदल झाला पाहिजे
६. विवाहवय कायद्याची कठोर अंमलबजावणी
अल्पवयीन मातृत्वाचे जागतिक पातळीवर नोंदलेले न्यूनतम वय किती असेल याचा शोध घेतल्यावर खालील धक्कादायक माहिती मिळाली :
सन 1939मध्ये पेरू देशातील ही घटना.
पाच वर्षे सात महिने वयाची मुलगी (Lina Medina) माता बनली. त्या बालकाला सिझेरियनने काढावे लागले.
या मुलीला वयाच्या तिसऱ्या वर्षापासूनच मासिक पाळी येत होती (? Precocious puberty).
या बातमीची वैद्यकीय तसेच पत्रकारीय प्रांतात बरीच शहानिशा झालेली दिसते. त्यानंतर ही बातमी खरी असल्याचे दिसते आहे. अर्थात मातृत्वाचे इतके लहान वय हे अपवादात्मक मानावे लागेल.
या दुःखद विषयाचे गांभीर्य लक्षात घेता संबंधित देशांतील सामाजिक आणि आरोग्य यंत्रणांनी या संदर्भात योग्य ती पावले प्राधान्याने उचलणे महत्त्वाचे आहे.
******************************************************************************
प्रतिक्रिया
29 Jan 2024 - 12:20 pm | राजेंद्र मेहेंदळे
एक वेगळाच विषय वाचायला /चर्चेला आणल्याबद्दल अभिनंदन.
एका लेखात वाचल्याप्रमाणे उसतोड मजुरांमध्ये बाल विवाहाचे प्रमाण खुप आहे, त्यालाही हेच कारण. मुलीला एकटी घरात ठेवुन आईबाप शेतावर जाउ शकत नाहीत. मग आली वयात की द्या लग्न लावुन आणि संपवा जबाबदारी. चाईल्ड ट्रॅफिकींग, बालमजुरी वगैरे फार सौम्य असे म्हणण्यासारखी परीस्थिती
29 Jan 2024 - 4:15 pm | कुमार१
हे माहीत नव्हते.
29 Jan 2024 - 5:19 pm | वामन देशमुख
सहमत.
हे प्रकार पाहून, "बालमजुरी हा तर गैरप्रकार नाहीच" असे म्हणावे म्हणावे लागेल.
बाकी धाग्यातील विषयाशी सहमत. बालमाता हा अनेक देशांतील प्रश्न आहे.
29 Jan 2024 - 4:21 pm | टर्मीनेटर
बापरे... ऐकावे ते नवलच! एकंदरीत विषय गंभीर आहे.
30 Jan 2024 - 5:18 am | कंजूस
या मुली कुटुंबात असूनही खरेतर निराधार आणि दुर्लक्षितच असतात आणि त्याचं कारण गरीबी. आजुबाजुच्या समाजही उद्योग आणि ध्येयहीनही असतो.
लोकसंख्या वाढ हे गरीबीची कारण सांगतात,पण साडेचार हजार वर्षांपूर्वीचे इजिप्तमधील ऐतिहासिक पुरावे सांगतात की गरीबी होतीच. म्हणजे काय तर आर्थिक विषमता हे कारण. धनवान, सत्तावान बांधीव दगडी घरांत आणि जनता, गुलामीत मातीच्या खोपटांत. कुमारी मातेने मोझेसला पेटीत घालून सोडून दिलं. इकडे पौराणिक कथेतला कर्ण.
समाजातल्या तरुणांना काही ध्येय निर्माण करून ठेवणे कठीण काम.
30 Jan 2024 - 5:35 am | कुमार१
आपण सर्वांनी व्यक्त केलेले विचार मननीय आहेत.
सहमत.
30 Jan 2024 - 6:50 am | गवि
विचित्र प्रकार आहे पाचव्या वर्षी मूल होणे म्हणजे. आणि त्यामागील व्यक्ती कायम अज्ञात राहिली हे वाईट.
वरील तुम्ही दिलेली केस वाचताना बरोबर उलट बाजूची केस विकिपीडियाने दाखवली. सर्वात जास्त वयात अपत्य प्राप्ती. वयाच्या ७२ आणि ७३ व्या वर्षी मूल झालेल्या दोन्ही स्त्रिया भारतीय आहेत.
30 Jan 2024 - 7:44 am | कुमार१
विचित्र आहे खरे !
म्हातारपणीच्या मातृत्वाचा विक्रम बघायला गेल्यास त्यात दोन प्रकार पडतील :
१. नैसर्गिक मार्गाने गरोदर झालेली स्त्री : याचा 2017 च्या ‘गिनेस’ नोंदणीनुसार विक्रम, वय 59 असा दिसतो आहे.
२. कृत्रिम गर्भधारणेने गरोदर झालेली स्त्री : हे वर तुम्ही म्हटल्याप्रमाणे वय 73.
30 Jan 2024 - 9:00 am | गवि
धन्यवाद. बाकी कृत्रिम का असेना, पण ते गर्भाशयात रोपण करून मग डिलिव्हरी झाली असे वाटते आहे.
साठ, सत्तर या वयातही गर्भाशय आदि अवयव काम करत असतात असे माहीत नव्हते.