मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

अल्पवयीन मातृत्वाची गंभीर समस्या

हेमंतकुमार · · जनातलं, मनातलं
लेखनप्रकार
११ वर्षाच्या मुलीला बलात्कारानंतर गर्भधारणा झाली होती. परंतु आता गर्भ ३१ आठवड्यांचा असल्यामुळे तिला गर्भपाताची परवानगी उच्च न्यायालयाने नाकारली
नुकतीच ही जयपूरची बातमी वाचली आणि सुन्न व्हायला झाले. इतक्या अल्पवयीन मुलींवर बलात्काराच्या घटनेतून जे मातृत्व लादले जाते ते अत्यंत दुःखद आणि निषेधार्ह आहे. या निमित्ताने या विषयाचा घेतलेला हा शास्त्रीय कानोसा. 2022 मध्ये प्रसिद्ध झालेल्या युनिसेफच्या अहवालानुसार सुमारे 13 टक्के मुलींवर अशा प्रकारचे मातृत्व लादले जाते. आफ्रिका खंडातील सहारा वाळवंटाखालील देशांमध्ये तर हे प्रमाण 25% आहे; दक्षिण आशियात ते १०% आहे. अशा घटनांमध्ये सुमारे 20% घटना बाललैंगिक अत्याचार या सदरात मोडतात. त्या वरील वयोगटांमध्ये 33% प्रकरणांमध्ये बलात्कार हे मातृत्वाचे कारण असते. ok अल्पवयीन मातृत्वाची सामाजिक कारणे १. दैनंदिन पाणीपुरवठा आणि मलनिस्सारण या मूलभूत सुविधा घरांपासून लांब अंतरावर असणे. २. शाळा घरापासून खूप दूर असणे आणि तिकडे जाण्याचा मार्ग असुरक्षित असणे. खुद्द शाळेच्या वर्गातील मुलग्यांकडून आणि शिक्षकांकडून देखील भय संभवते. ३. प्राथमिक आरोग्य केंद्र सुद्धा दूरच्या अंतरावर असणे आणि तिथली अपुरी वैद्यकीय सुविधा ४. गरिबी हे तर अत्यंत महत्त्वाचे कारण. दारिद्र्यरेषेखालील पालकांकडून आपल्या मुलांच्या मूलभूत गरजा देखील पुरवल्या जात नाहीत. त्यामुळे अशा कुटुंबांमधील काही मुली नाईलाजाने परिचयातील सधन पुरुषांशी लैंगिक संबंध ठेवून त्या बदल्यात पैसे आणि इच्छित वस्तू मिळवतात. ५. विवाहवय कायदा अस्तित्वात असूनही अजूनही कित्येक प्रदेशांमध्ये बालविवाह सर्रास होताना दिसतात. युनिसेफच्या 2021च्या माहितीनुसार जगभरात मिळून आजपर्यंत झालेल्या बालिकाविवाहांपैकी (किंवा प्रथम लैंगिक संबंधातून गरोदर) सुमारे 65 कोटी महिला जिवंत आहेत. त्याची जागतिक टक्केवारी खालील चित्रात पाहता येईल : ok (चित्रसौजन्य : युनिसेफ) अशा प्रकारच्या मातृत्वातून संबंधित मुलींना काही गंभीर शारीरिक आणि सामाजिक दुष्परिणामांना तोंड द्यावे लागते. ते आता थोडक्यात पाहू : शारीरिक दुष्परिणाम १. गरोदरपणात उच्च रक्तदाब आणि फीट्सचा विकार होण्याची शक्यता २. प्रसूतीपूर्व डॉक्टरी सल्लामसलतीकडे दुर्लक्ष आणि हेळसांड ३. मुदतपूर्व प्रसूती ४. प्रसूती दरम्यान गंभीर अडथळा, सिझेरियन किंवा अन्य शास्त्रक्रियांची गरज ५. प्रसूतीनंतर होणारा fistula, अतिरिक्त रक्तस्त्राव, गर्भाशय अस्तराचा दाह. तसेच क्षयरोग आणि अन्य जंतुसंसर्ग ६. आधीच कुपोषणग्रस्त असल्यास तीव्र ऍनिमिया सुद्धा असतो ७. खूप कमी वजनाच्या बालकाचा जन्म आणि/ किंवा जन्मानंतर लवकरच त्याचा मृत्यू. सामाजिक दुष्परिणाम १. शालेय शिक्षण थांबवावे लागणे २. कुटुंब आणि आजूबाजूच्या समाजाकडून सतत दूषणे मिळणे; वेळप्रसंगी जवळच्या कुटुंबीयांकडून मारहाण ३. कुमारी माता हा आयुष्यभरासाठीचा कलंक लागतो. ४. गरोदरपणी योग्य वेळेत हस्तक्षेप न केल्यास जन्माला येणाऱ्या मुलांच्या पोषणाचा प्रश्न; अनाथालयांवरील बोजा वाढणे. अशा प्रकारच्या शोषित मुलींच्या मुलाखती घेण्यात आल्या असून त्यांत त्यांनी त्यांचे मनोगत व्यक्त केले आहे. अशा समूहाकडून आलेल्या काही मागण्या अशा आहेत : १. बलात्कारी पुरुषांना कठोर शासन करणे २. पीडित मुलींना शाळेत पुन्हा घेऊन शैक्षणिक संधी देणे ३. या वयोगटातील मुलामुलींचे लैंगिक शिक्षण आणि गर्भनिरोधन या विषयावर प्रबोधन व्हावे ४. शाळांमधील वातावरण सुरक्षित होणे आवश्यक असून त्याची हमी देण्यात यावी. या संदर्भात पालक व शिक्षकांचे समुपदेशन व्हावे ५. पीडीत मुलींकडे बघण्याच्या सामाजिक दृष्टिकोनातही बदल झाला पाहिजे ६. विवाहवय कायद्याची कठोर अंमलबजावणी अल्पवयीन मातृत्वाचे जागतिक पातळीवर नोंदलेले न्यूनतम वय किती असेल याचा शोध घेतल्यावर खालील धक्कादायक माहिती मिळाली : सन 1939मध्ये पेरू देशातील ही घटना. पाच वर्षे सात महिने वयाची मुलगी (Lina Medina) माता बनली. त्या बालकाला सिझेरियनने काढावे लागले. या मुलीला वयाच्या तिसऱ्या वर्षापासूनच मासिक पाळी येत होती (? Precocious puberty). या बातमीची वैद्यकीय तसेच पत्रकारीय प्रांतात बरीच शहानिशा झालेली दिसते. त्यानंतर ही बातमी खरी असल्याचे दिसते आहे. अर्थात मातृत्वाचे इतके लहान वय हे अपवादात्मक मानावे लागेल. या दुःखद विषयाचे गांभीर्य लक्षात घेता संबंधित देशांतील सामाजिक आणि आरोग्य यंत्रणांनी या संदर्भात योग्य ती पावले प्राधान्याने उचलणे महत्त्वाचे आहे. ******************************************************************************

वाचन 4041 प्रतिक्रिया 0