कवितेच्या काही ओळी
जरी सहज सुचल्या
दोन चुकल्या मात्रेत
दोन वृत्तात गंडल्या
यतिभंग एकीमध्ये
एकीमध्ये रसभंग
दोष दूर करण्यास
पछाडिले जंग जंग
मात्रा, वृत्तांची बंधने
पाळताना दमछाक
झाली-आली कुठूनशी
मुक्तछंदाची झुळूक
मुक्तछंदाच्या स्पर्शाने
ओळ ओळ थरारली
कोष कोंदट फोडून
फुलपाखरे उडाली
खळखळा तुटताना
बेड्या आनंदे म्हणती
लघु, गुरू, मात्रा यांची
मुक्तछंदी ना गणती
वेध लागला मुक्तीचा
बंधी कोंडल्या ओळींना
सुंभ जळला-पण का
पीळ जळता जळेना ? :)
प्रतिक्रिया
15 Jan 2024 - 11:53 am | कर्नलतपस्वी
मस्त कल्पना भरारी आहे. आवडली.
15 Jan 2024 - 10:44 pm | ज्ञानोबाचे पैजार
भारी लिहीले आहे, सोडा तो पिळ अन मारा एक शिळ
पैजारबुवा,
17 Jan 2024 - 6:20 pm | चौथा कोनाडा
व्वा ... मस्तच !
खुप छान !
मुक्तछंदावरची गेय कविता आवडली ...
उत्तम कविता जुळवण्याची अवस्था ते मुक्तछंदाची झूळुक हा प्रवास चित्रदर्शी आहे !
पु.क,शु.
20 Jan 2024 - 10:35 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
लिहिते राहा.
-दिलीप बिरुटे