फोटो सौजन्य - livemint.com
ब्रिटीश राज्यानंतर स्वतंत्र भारताकडे प्रमुख जबाबदारी होती प्रचंड वेगाने वाढणारी लोकसंख्येला पोसायची.ब्रिटीश धोरणांमुळे शेतीमध्ये क्रांती ऐवजी शेतकरी शोषण आणि दुष्काळ यांसारख्या समस्या सतत आजूबाजूला असता.अजूनही ‘जहाजाच्या अन्नावर ‘अवलंबून असणाऱ्या भारताचे प्रतिमा बदलण्यासाठी प्रथम पंतप्रधान नेहरू यांनी शेतीमध्ये संरचनात्मक ,संस्थात्मक सुधारणा करण्यासाठी वैज्ञानिकांना उपाययोजना करण्यास सांगितले.१९४७-१९६१ पर्यंत अनेक पायाभूत सुविधनाचा समावेश शेतीत होत गेला.परंतु तंत्रज्ञानातील मागासलेपणामुळे अजुनही हवी तशी उत्पादकता मिळत नव्हती.याचा परिणाम असा की अजुनही पीएल-४८० सारख्या करारानुसार अमेरिकेकडून निकृष्ठ गव्हाची आयात भारताला सहन करावी लागत असे.१९६१ चीन युद्धानन्तर त्यात आणखीनच भर पडून दरही खूप वाढवले गेले.पण Begging Bowl to Bread Basket असा प्रवास लवकरच होणार होता.
१९६१ साली डॉ.ए.बी जोशी यांच्या नेतृत्वात एक टीम जगातील विविध शेती संशोधन संस्था यांना भेट देत होती.तेव्हा मेक्सिकोतील बोरलॉग यांच्या संशोधनाने भारावलेल्या टीमने त्यांना भारतात पाचारण करण्याचे ठरवले.फोर्ड फोंडेशान यांनी याबाबत आर्थिक मदत देण्याचे ठरवले.यासाठी काही टन गहू बियाणे तात्काळ आयात करण्याची परवानगी पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांनी दिली.
बोरलॉग यांची टीम आणि डॉ.स्वामिनाथन यांनी दुसऱ्या पंचवार्षिक योजने अंतर्गत ही योजना राबविण्याचे ठरविले.
डॉ .स्वामिनाथन आणि सहकाऱ्यांनी राबविलेले काही मुद्दे-
१.HYV high yeilding variety अधिक उत्पादन देणारे बियाणे शेतकऱ्यांना पुरवणे.यासाठी बोरलॉग यांनी बनविलेलेया चार ३.सोनोरा ६४ ४. सोनोरा ६३ ५.लर्मारोजा ६४ आणि मियो ६१४ या प्रजातींबरोबर segregrating lines(F2-F5) याही भारतात आणल्या गेल्या.
(या बुटक्या गव्हामुळे जनावरांना चार कमी पडेल अस म्हणत काही वैज्ञानिकानी याला विरोधही केला.पण या योजनेचा प्रमुख हेतू जनावरांपेक्षा माणसाच्या मुखात अन्न पडावे हा स्पष्टच होता त्यामुळे याला विरोध मावळला.
२.प्रदेश निवड- प्राथमिक चरणासाठी पाण्याची व जमिनीची उपलब्धता अधिक असणारे राज्ये म्हणजे पंजाब,हरियाणा,पश्चिम उत्तर प्रदेश यांची निवड करण्यात आली.
३.सिंचन-सिंचन सुविधेसाठी अनेक विहिरीई,ट्युबवेल बनविण्यात आल्या.
४.रासायनिक खते-भारतात सैन्द्रीय खतांचा वापराच होत असे.तेव्हा पिकांमध्ये रोग पडू नये,त्यांची रोगप्रतिकार क्षमता सुधारावी यासाठी नायट्रोजन,पोटाशियm,सल्फर युक्त रासायनिक खत पुरविण्यात आले.
५. आधुनिक उपकरणे-ट्रक्टर,नांगर ,मुबलक वीज पुरविली गेली.मोठमोठी आधुनिक धान्य कोठारे बांधण्यात आली.
६. कृषी सहायत्ता दुप्पट करण्यात आली.
७.कृषी मूल्य आयोग बनवून हमीभाव देण्याचे मान्य केले.
८.कृषी विज्ञान केंद्राची स्थापना करून माहिती सहज मिळावी याची उपाय योजना केली.
या सर्व गोष्टींवर योग्य कार्यवाही करण्यात आली.अनेक शेतकर्यांनी याचा स्वीकार केला आणि १९६६-१९६८ या काळात गहू धान्याच्या उत्पादनात तिपटीने वाढ झाली.
याच बरोबर तांदूळाच्या विकसित प्रजाती जया,रत्ना या तैवान जैपोनिक सुधारित जातीतून IRRI,Philippins यांनी विकसित करून भारतात पाठवल्या.इतर तीन पिके बाजरी,मका,ज्वारी या पिकांच्याही उत्पादनात वाढ झाली.
जून १९६८ साली पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी भारतात हरितक्रांती घडली आहे याची घोषणा केली.८ मार्च १९६८ ला विल्ययम एस गौड यांनी जगातल्या वाढत्या शेती उत्पादाकेहून ग्रीन रिव्होल्युशन हा शब्द पहिल्यांदा वापरला होता.
डॉ.बोरलॉग धान्य कोठाराची पाहणी करतांना
फोटो सौजन्य -ट्विटर
दुसऱ्या टप्प्यात म्हणजे ७३-८३ मध्ये आंध्र,तामिळनाडू,कर्नाटक,गुजरात,महाराष्ट्र,पूर्व उत्तर प्रदेश याठिकाणी गहू ,तांदूळ बरोबरीनेच धने या पिकांत विक्रमी वाढ दिसली.महाराष्ट्रातीलं हरित क्रांतीसाठी पंजाबराव देशमुख आणि वसंत नाईक यांचे योगदानही बहुमुल्य होते.
तिसऱ्या टप्प्यात पूर्वेकडील राज्ये बिहार,उडीसा,बंगाल येथे हरित क्रांती घडली.
काही शेतकरी या उत्पादनातील गहू लाल आहे आणि पोळ्या नीट होत नाही याची तक्रार करू लागले तेव्हा segrigrating lines वापरून प्रयागांतीसोनालिका,कल्याण रोजा या सुधारित प्रजाती बाजारात आणल्या.(सध्या लोकवन,शरबती,राजवाडी,खपली गहू इ.या बनवलेल्या प्रजाती लोकप्रिय आहेत).
*हरितक्रांतीचे सकारात्मक परिणाम-
१.अन्नधान्याच्या बाबतीत भारत आत्मनिर्भर झाला.
२.धान्याची निर्यात वाढून आयात थांबली
३.दुष्काळावर सहज मात करता येवू लागली.
४.अल्प भू धारक शेतकरी कमी उत्पादन,कर्जबाजारीपणा या समस्येतून सुटला.
५.उत्पादन वाढल्यामुळे आर्थिक सुबत्ता वाढली.एक संपन्न जीवनशैली शेतकरी जगू लागला.
६.गैर कृषी ग्रामीण समाज उदयाला आला.अनेक इतर शेतीपूरक व्यवसाय वाढले.
*हरीक्रांतीचे नकारात्मक परिणाम
१.विषमता-हरितक्रांतीचा पहिला टप्पा यशस्वी पणे पंजाब हरियाणा भागात झाला इतरत्र यांची यशस्विता त्याप्रमाणात थोडी कमीच होती.त्यामुळे शेतकरी वर्गात विषमता आढळली.
२.जमीनीच्या किंमती वाढल्या.
३.रासायनिक खतांच्या अमर्यादित वापरांमुळे अनेक रोगांचा शिरकाव माणसांत झाला.पोटाश,सल्फर पाण्यात मिसळून संपर्कात येत गेले.कर्करोगाचा विळखा कित्येक कुटुंबात झाली. प्राणी-जनावरही यामुळे अधिक रोगांना बळी पडून वंध्यत्वही दिसले.
एव्हरग्रीन रिव्होल्युशन(Evergreen Revolution)
रासायनिक खतांच्या अमर्यादित वापरामुळे ही ग्रीन रिव्होल्युशन Green Revolution -ग्रीड रिव्होल्युशन(Greed Revolution)मध्ये बदलली होती.ही बाब डॉ.स्वामिनाथन यांना आता अस्वस्थ करीत होती.याबाबत त्यांना हरितक्रांती अशास्त्रीय पद्धतीने राबवल्याचे अनेक आरोप कायम सहन करावे लागले. इस्का,वाराणसी १९६८ मध्ये याबाबत खंत बोलूनही दाखविली.गांधीजींचे अनुयायी असलेल्या डॉ.स्वामिनाथन यांनी यापुढे एव्हरग्रीन रिव्होल्युशन(Evergreen Revolution)वर काम करण्याचे ठरवले आणि ते आजन्म केलेही....
डॉ.स्वामिनाथन -२
इथे वाचता येईल.
-भक्ती
प्रतिक्रिया
17 Dec 2023 - 9:22 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
माहितीपूर्ण लेखन. लेखन करते राहा.
-दिलीप बिरुटे
17 Dec 2023 - 1:58 pm | सर टोबी
स्वातंत्र्योत्तर काळातील प्रत्येक पायाभूत सुविधेची निर्मिती हा एक भारावून टाकणारा अनुभव आहे.
काही वर्षांपूर्वी ओझरच्या गणपतीला गेलो असतांना लांब ओझरचा सहकारी साखर कारखान्याची चिमणी दिसली. मी मुलाला म्हणालो आज या नाशिक महामार्गावरील वर्दळ, पावलो पावली असणारी हॉटेल्स, घरं या सर्व गोष्टींमुळे ओसाड माळरानावर कारखान्याची निर्मिती म्हणजे काय आव्हान असेल याची कल्पना येणार नाही. पण चाळीस पन्नास वर्षांपूर्वी एक चाळीस फुटी रुंद डांबरी सडक, कुठे कुठे तुरळक वस्ती, सकाळी जे काही खायला मिळेल तेवढ्यावर संध्याकाळपर्यंत काम करणं अशा परिस्थितीत भारतातील प्रत्येक सुविधा निर्माण झाली आहे. आणि हे करणाऱ्या लोकांचा कुठला अभिनिवेश नव्हता ना उठसुठ नेत्यांचा जयजयकार नव्हता.
17 Dec 2023 - 6:42 pm | Bhakti
एकदम बरोबर!
नेते, सामान्य जन प्रत्येक गोष्टीचा केवळ शो ओफ , भोगवादी संस्कृती पाहिली की जीव घाबरतो.
18 Dec 2023 - 8:03 am | Trump
तो जमानाच वेगळा होता, देशासाठी, समाजासाठी करण्याची भावना होती. आता साधा सिमेंटचा बाक आणुन ठेवला तरी, लगेच फलक झळकतो.
17 Dec 2023 - 6:45 pm | Bhakti
पाहिला,लंबूळका आहे.पुरणपोळीसाठी चांगला आहे असं समजलं.
17 Dec 2023 - 8:28 pm | नठ्यारा
या हरितक्रांतीच्या रामरगाड्यातून काहीतरी ग्यानबाची मेख गायब आहे.
नॉर्मन बोरलॉग मेक्सिकोचे. आपले अस्सल भारतीय मराठी संशोधक व क्रांतिकारक असलेले पांडुरंग सदाशिव खानखोजे यांनी मेक्सिकोत मका, गहू, इत्यादींच्या वाणावर संशोधन केलं आहे. अशा प्रकारच्या अनेकांच्या अनेक संशोधनांवर मेक्सिकोत हरितक्रांती झाली. हीच हरितक्रांती नंतर प्राध्यापक नॉर्मन बोरलॉग यांनी भारतात रुजवली. मग खानखोजे यांना का पाचारण करण्यात आलं नाही? ते वारले १९६७ साली. ते जायची वाट बघंत होतं का भारत सरकार? खानखोज्यांच्या शेतकी अनुभवाचा भारताने अणुमात्र फायदा करवून घेतला नाही. ही खंत त्यांच्या थोरल्या लेकीने सावित्री साहनींने व्यक्त केली आहे. खानखोजे घदर पार्टीचे एक संस्थापक व क्रांतिकारक होते म्हणून तर त्यांना वाळीत टाकलं नाहीये?
बंगालातून भारतीय कापूस निर्यात होऊन म्यांचेस्टरास जात असे. तिथे त्याचं कापड बनवून परत भारतात आयात करून विकलं जाई. भारतासाठी ही धवलक्रांती नव्हे व औद्योगिक क्रांतीही नव्हे. हा आयातनिर्यात घपला आहे. दादाभाई नवरोजींनी यावर Poverty and un-British Rule नामे पुस्तक लिहिलं होतं. मग हरितक्रांतीसही आयातनिर्यात घपला म्हणावं का?
कृपया जाणकारांनी प्रकाश टाकावा. मला शेतीतलं शष्पही कळंत नाही. हरितक्रांतीचं पुनर्मूल्यमापन व्हावं इतकाच मी आग्रह धरू शकतो.
थोडी माहिती ( इंग्रजी दुवे ) :
१. https://www.civilsdaily.com/news/pandurang-khankhoje-ghadarite/
२. https://www.tandfonline.com/doi/abs/10.1080/07341512.2020.1862989
-नाठाळ नठ्या
17 Dec 2023 - 9:45 pm | सर टोबी
खानखोजे यांनी भारतात परतल्यानंतर राजकीय कारकीर्द सुरु केली असा त्रोटक उल्लेख आहे. शेतीविषयक ज्ञान आणि अनुभव याच्यासाठी सक्रिय योगदान द्यावयाचे होते पण तत्कालीन सरकारने ते नाकारले असा काहीसा आपला सूर आहे त्याची सत्यता स्थापित करणारी काही माहिती आहे का?
सभ्य भाषेत, आक्रमकता टाळून प्रतिसाद मिळावा अशी अपेक्षा आहे.
18 Dec 2023 - 12:50 am | नठ्यारा
सर टोबी,
अपेक्षा व्यक्त केल्याबद्दल आभार! :-)
मला वाटतं खानखोजे यांच्या मुलीने लिहिलेल्या पुस्तकांत I shall Never Ask for Pardon: A Memoir of Pandurang Khankhoje ही खंत व्यक्त केली आहे. मी पुस्तक वाचलं नाहीये.
हरितक्रांतीशी खानखोजे यांचा नेमका संबंध काय, यावर अधिक प्रकाश पडायला पाहिजे.
-नाठाळ नठ्या
18 Dec 2023 - 10:16 am | सौंदाळा
स्वामीनाथन, बोरलॉग यांच्यामुळे भारतात हरितक्रांती झाली इतकी त्रोटक माहितीच आतापर्यंत होती.
या लेखमालेबद्दल तुमचे खूप आभार. धवलक्रांतीबद्दलसुध्दा लिहा ही विनंती.
18 Dec 2023 - 11:57 am | Bhakti
धन्यवाद सौंदाळा,नाठाळ,ट्रम्प,बिरुटे सर.
धवल क्रांती हो वेळेप्रमाणे नक्की लिहिते.
18 Dec 2023 - 2:24 pm | कुमार१
माहितीपूर्ण लेखन
26 Dec 2023 - 8:26 pm | अमरेंद्र बाहुबली
मस्त लेख भक्तीताई. स्रीसुध्दा वैचारीक माहीतीपुर्ण लेख लिहू शकते?? :)
26 Dec 2023 - 11:12 pm | अथांग आकाश
माहितीपूर्ण लेखमाला!
27 Dec 2023 - 5:35 am | कंजूस
हरित क्रांतीचा फायदा हरयाणा आणि पंजाब या राज्यांना झाला. पण आता पंजाब सरकार आमचं राज्य गरीब आहे म्हणते. महाराष्ट्रातील लोक मध्य प्रदेशचा गहू पसंत करतात. त्यास चव असते, पोळ्या चांगल्या होतात. परदेशात जो गहू पिकतो त्याचा उपयोग पाव, बिस्किटे,पास्ता यासाठी होतो. त्यासाठी हलका निकृष्ट गहू वापरला तरी चालतो कारण त्या गव्हाचे पीठ,मैदा आंबवूनच वापरायचा असतो. कोंडा गुरांच्या खाद्यासाठी पाठवतात. पंजाबातील पराठे आणि कुलछे मैद्याचे करतात. त्यास फार चांगला गहू लागत नसेल. गव्हाची ताटं गुरं खात नाहीत असं एका शेतकऱ्याने मला सांगितले होते. शेतीसाठी ट्रॅक्टर आले आणि वाहतूकीसाठीही. त्यामुळे बैल निरुपयोगी झाले.देशी गायी दूध कमी देतात म्हणजे त्याही बाद झाल्या.
जर्सी गायी आल्या. म्हणजे या प्रकल्पात तीन गोष्टींचं मार्केट परदेशला मिळालं.
आता इथलं संशोधन यांचा विचार केला तर चांगल्या चवीचा गहू आणि थोडं अधिक उत्पादन देणाऱ्या जाती शोधण्यात वाया गेलं असेल. निकृष्ट गहू पण अधिक उत्पादन देणाऱ्या जाती शोधल्याच नसतील.
विज्ञानाचं तंत्र असं असतं की एक गोष्ट मिळवली की दुसरी बाद होते. ते यांत्रिक, शक्ती तसेच पीकपाणी झाडे यांनाही लागू आहे. उदाहरणार्थ नैसर्गिक वन्य जातीच्या गुलाबांना सुगंध असतो, फळं येतात. त्यातून सुधारित रंगीत टिकावू फुलांच्या जाती निघाल्या आणि सुगंध आणि फळं गायब झाले. कापसाचंही असंच आहे. बुटकी अधिक उत्पादनक्षम जाती निर्माण झाल्या पण बीज तयार होत नाही. कीटक येत नाहीत फुलांवर. कृत्रिम रित्या फलधारणा करावी लागते. खतं, रासायनिक फवारे वापरावे लागतात. किडरोधकपणा गुलाब आणि कापसाच्या नवीन जातींतून गायब झाला.
स्थानिक संशोधन डावलून परदेशी आणणे यात मोठं राजकारण अर्थकारण लपलेलं असतं. उदाहरणार्थ परळ मुंबईतील हाफकिन संस्था विषविरोधक लसी बनवत होती आणि अचानक कुत्र्याच्या चावण्याची लस परदेशांतून आणली. हाफकिनचा उपक्रम ठप्प झाला आणि केलेली लसही वाया गेली.
27 Dec 2023 - 8:45 am | सर टोबी
म्हणून देशी उद्योगांची हानी करण्याची कूट नीती होती अशा अर्थाचं प्रतिपादन आपण अभ्यासाअंती केला आहे? हाफकिन इन्स्टिटयूट आजही सर्प दंशावरील लस बनवणारी बहुदा एकमेक कंपनी आहे. त्यांची या कामी वापरली जाणारी उत्पादने भयंकर महाग आहेत. समाधानाची बाब म्हणजे ही उत्पादने सर्वांना मोफत अथवा अल्प किमतीत फक्त सरकारी इस्पितळातच मिळतात.
देशी वाणांची हानी केली हे अजून एक लाडकं पालुपद. चवीच्या बाबतीत देशी वाण चांगले होते. पण ते आपल्याला अपुरे पडत होते ही वस्तुस्थिती आहे. किटक, रोगराई, आणि नैसर्गिक अडचणी (जसे पाण्याची कमतरता) यांना तोंड देण्यात ती कमी पडत होती. तेव्हा जनुकीय बदल केलेले अथवा संकरीत वाण वापरणं हा शहाणपणाचा निर्णय होता. यात देखील भ्रष्टाचार आणि परदेशाबद्दलची आसक्ती असं काही तुम्हाला शोधायचं असेल तरची गोष्ट वेगळी. ”आम्ही जुनी खोडं आहोत. साजूक तुपावर पोसलोय” अशा फुशारकी मारणाऱ्यांनी त्यांच्या पिढीचे सर्वसाधारण आयुर्मान काय होतं तेही सांगावं.
27 Dec 2023 - 11:59 am | Bhakti
हो ती अजूनही सुरू आहे.
आम्हाला आपलं बीटी कोटनचे उदाहरण कायमच लिहावं लागायचं.दोन वर्ष बायोसेफ्टी शिकवतांना लक्षात यायचं की जेव्हा सुधारित, जनुकीय वाणं लावले जातात तेव्हा अनेक नियमही शेतकऱ्यांनी पाळले जावेत हे अपेक्षित असते म्हणजे पइकआतलं अंतर non gmo पिकं लावणे इत्यादी.तसेच हरित क्रांती मध्येपण किती रासायनिक खतं वापरावी यांचाही नियम केला असावा पण नियम पाळण्याची पद्धत आपल्याकडे कुठे आहे.त्यामुळे शेतीतही विज्ञान काही ठिकाणी शाप ठरला.
27 Dec 2023 - 3:22 pm | कंजूस
तसं काही नाही. कोणताही अजेंडा नाही.
वर लिहिलंय की कमी चवीचं पण अधिक उत्पादनाचं वाण इकडे दुर्लक्ष केलं असेल. शेणखताकडून आपण रासायनिक खताकडे वळलो. जमीन नापीक होत जाते. आम्लता वाढते.
सर्पाच्या विषाच्या लसीबद्दल नव्हे, राबिजची लस.
27 Dec 2023 - 5:39 am | कंजूस
'हरित क्रांती स्वामिनाथन यांच्यामुळे झाली.'
असा धडा पाठ्यपुस्तकात असेल तर तो शिकवावाच लागतो.
27 Dec 2023 - 5:20 pm | सर टोबी
पाश्चिमात्य देशांमध्ये पेटंट विषयक काही बदल मागच्या तीस वर्षांपूर्वी झाले. त्यात वस्तूच्या निर्मितीची संपूर्ण कल्पना स्वामित्व हक्काच्या कक्षेत आणली गेली. म्हणजे एखादं उत्पादन आपली स्वतःची प्रक्रिया वापरून करण्याची मुभा संपुष्टात आली.
हेक्स्ट ने रेबिजची दंडावर घेता येऊ शकेल अशी लस आणल्यानंतर हाफकिनने स्वस्त पर्याय देण्यावर अशा पेटंट कायद्याचा परिणाम असण्याची शक्यता असावी.
11 Feb 2024 - 10:56 am | टर्मीनेटर
डॉ .स्वामिनाथन ‘भारतरत्न‘ पुरस्काराने सन्मानीत!
चला, अखेर त्यंच्या कार्याचा योथोचीत सन्मान राखला गेल्याने आनंद झाला.
16 Feb 2024 - 7:50 pm | सुधीर कांदळकर
डॉ. स्वामिनाथन यांच्या कार्याचा योग्य, संयत भाषेत लेखात केलेला गौरव आवडला. ते गांधीवादी होते त्यामुळे त्यांच्या गौरवामुळे अनेक भृकुट्या उंचावतील. त्याला इलाज नाहीं.
सुरेख लेखाबद्दल धन्यवाद. वर एका प्रतिसादकाने केलेल्या विनंतीप्रमाणे धवलक्रांतीबद्दल जरूर लिहावे. पूर्वी गरीबांना दूध अप्राप्य होते. आज मात्र तसे राहिले नाही. त्यामुळे वर्गीज कूरियनही अशाच गौरवाला पात्र आहेत असे मनापासून वाटते.
खानखोजे यांच्यावर पूर्वी केव्हांतरी लिहिलेला लेख आतांच मिपावर दाखल केला आहे.