शाळा, टाईमपास, ती सध्या काय करते?,फॅन्ड्री असे लहानपणीच्या कोमल?;) प्रेमाचे सिनेमा मराठीत असताना परत आत्मपॅम्फ्लेट त्याच बालवयातील प्रेमाचा सिनेमा कशाला पाहायचा अस ठरवल होतं.पण दिवाळीच्या आदल्या दिवशी मस्त गोडधोड खाऊन बसले तर हा चित्रपट घरच्यांनी लावला होता.
'काय भावांनो' असं जबरदस्त चढाच लहान मुलांचा दंगा करणारा घोळका दिसतो.साधारण ८० च्या दशकातल्या काळात सिनेमा सुरू होतो.पणजी ,आजी , आजोबा इतर सगळे भरलेले घर दिसतं.शाळेत भेटलेले मित्र आणि त्यांचे समाजातील नियमांविषयीचे असंख्य प्रश्न आहेत.
मित्रा मित्रांची मैत्री घट्ट होत असतानाच 'जात' नावाचं लेबल सगळ्यांचं वेगळं असतं आणि ते घरच्यांनी आपल्याला दिलंय हे त्यांना लक्षात येतं.
पण तरीही हे तकलादू आहे हे वेळोवेळी अतिशय हलक्याफुलक्या नर्मविनोदी प्रसंगांनी हे मित्र लोक दाखवून देत असतात.त्यात सिनेमात प्रेमाचा अंकुर परजातीय हिरो- हिरोईन मध्ये फुलतोच.अशा या प्रेमात एकतर्फी प्रेमाकडून समोरच्या फुलपाखराचा होकार येईपर्यंतचा प्रवास आत्मपॅम्फ्लेट आहे.
अनेकदा व्हिलन जातीयवादच दाखवला आहे.पण परेश मोकाशी यांनी कथेतून काहीतरी वेगळ्याच भन्नाट प्रयोगाने ,मांडणीचे खुसखुशीतपणे या विखाराचा फोलपणा दाखवला आहे. अखेरीस नायकाच्या , नायिकेच्या पाल्यांच्या सूज्ञपणा पाहून थक्क होतो,पण शेवटी एलियन पाहून दिग्दर्शकाला काहीतरी सूचित करायचे आहे हे दिसत आहे.
सिनेमा पाहतांना मला शाळेचे नाही पण महाविद्यालयाचे दिवस आठवले, माझ्याही मनात समाजाविषयी असे असंख्य प्रश्न असायचे.मी माझ्या पुरता गुंता सोडवायला घेतला आणि सोडवला.
आत्मपॅम्फ्लेट हा एक वेगळ्याच धाटणीचा सिनेमा आहे.
-भक्ती
प्रतिक्रिया
18 Nov 2023 - 11:22 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
आत्मपॅम्फ्लेट सिनेमा चांगला आहे, सिनेमाची सुरुवात भन्नाट आणि खुसखुशीत वाटते. ऐंशी नव्वदच्या दशकातली ही सगळी कथा आपल्या अनेकांच्या जीवनात अशी कथा घडून गेलेली असते. त्यामुळे कथेतल्या घटनांशी आपली नाळ जुळते. शाळा आणि शाळेतलं एकतर्फी प्रेम. राजकीय सामाजिक कटुता. मनातला गोंधळ हे सगळं शाळेत घडतं आणि सिनेमात येतं. राजकीय सामाजिक घटनांवर बोट ठेवण्याचा तो एक प्रयत्न वाटतो. अर्थात, थोडा बटबटीतपणा जातीयदरी- घटना हे सत्य जरी असले तरी, सिनेमा रुळ सोडल्यासारखा उत्तरार्धात भटकतो असे वाटले. असे असले तरी,
हरिश्चंद्राची फॅक्टरी नंतर, आत्ताच प्रदर्शित झालेला वाळवी सारख्या चित्रपटाचे लेखन दिग्दर्शन करणा-या परेश मोकाशे यांनीच आत्मपॅम्फ्लेटचंही लेखन केलं आहे म्हणून आपण रसिक वेगळ्या सिनेमाची अपेक्षा करतो आणि तो ती पूर्णही करतो, त्यांच्या सिनेमाला प्रेक्षकांची दादही मिळते.
सिनेमाची ओळख आवडली. लिहिते राहावे. पुलेशु.
-दिलीप बिरुटे
18 Nov 2023 - 11:57 am | प्रचेतस
सिनेमा अद्याप बघितला नाहीये, पण तुम्ही आणि भक्ती यांनी दिलेल्या परीचयामुळे बघेन.
28 Nov 2023 - 11:08 pm | अनुस्वार
आत्मपॅम्फ्लेट पूर्वार्धात खळखळून हसवतो, मध्यांतराच्या जवळ दोन-तीन (किंवा सात-आठ पकडा) शहाणपणाचे डोस पाजतो. हसून झाले, शहाणे केले आता चित्रपट पुढे काय गंमत करणार या उत्कंठेत प्रेक्षक रमायच्या आत चित्रपट चक्क "आता यापेक्षा आणखी काय वेगळा अनुभव देणार तुम्हाला?" या थाटात प्रचंड वेगाने धावत मुक्कामी पोहोचतो.
तरीही सर्वसामान्य माणसाला आवडेल असाच चित्रपट आहे. मी बऱ्याचशा मित्रांना बळजबरीने चित्रपटगृहात नेऊन दाखवला होता. सगळ्यांनी नंतर आभारच मानले. परेश मोकाशे निराश करत नाही.
29 Nov 2023 - 9:07 am | धर्मराजमुटके
कुठे बघायला मिळतो हा चित्रपट ?
29 Nov 2023 - 9:51 am | अनुस्वार
https://www.zee5.com/movies/details/aatmapamphlet/0-0-1z5458674?utm_sour...
29 Nov 2023 - 2:47 pm | सिरुसेरि
आत्मपॅम्फ्लेट सिनेमाच्या पुढे मागे "३ अडकुन सीताराम " हा मराठी चित्रपट बघायला मिळाला .