मॉन्टी हॉल प्रॉब्लेम
Marilyn vos Savant.
1946 मध्ये सेंट लुईस, मिसूरी येथे जन्मलेल्या या तरुणीला गणित आणि विज्ञानाची जन्मजात आवड होती. वयाच्या 10 व्या वर्षी, तिला दोन बुद्धिमत्ता चाचण्या देण्यात आल्या - स्टॅनफोर्ड-बिनेट आणि मेगा टेस्ट - या दोन्ही चाचण्यांनुसार तिची मानसिक क्षमता 23 वर्षांच्या युवा तरुणी इतकी होती. "जगातील सर्वोच्च बुद्ध्यांक" असल्या बद्दल तिची गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डस्मध्ये नोंद झाली आणि परिणामी, तिला आंतरराष्ट्रीय कीर्ती मिळाली.
"जगातील सर्वात हुशार महिला" म्हणून तिचा दर्जा असूनही, वोस सावंत हिचा मात्र IQ चाचण्यावर विश्वास नाही. तिच्या मते अश्या चाचण्यांवरून काहीही सिद्ध होत नाही. 1980 च्या दशकाच्या मध्यात, करिअरचा बनवण्यासाठी ती न्यूयॉर्क शहरात आली. तिला लेखक व्हायचे होते.
“परेड” नावाच्या मॅगझिनने तिच्यावर एक लेख लिहिला, तेव्हा वाचकांचा त्याला प्रचंड प्रतिसाद मिळाला. मॅगझिनने तिला पूर्णवेळ नोकरीची ऑफर दिली. तिने त्या मासिकात "आस्क मर्लिन" नावाचे सदर लिहायला सुरुवात केली.(हे सदर मला वाटत अजूनही चालू आहे?) वाचक तिला निरनिराळे प्रश्न विचारत आणि ती त्यांच्या विविध शैक्षणिक प्रश्नांची आणि तर्कशास्त्रीय प्रश्नांची/कोड्यांची उत्तरे देऊ लागली. अशाच एका प्रश्नाला तिने दिलेल्या उत्तराने २०/२१ व्या शतकातील सांख्यिकीय वादास तोंड फुटले.
तो वादाचा मुद्दा होता “मॉन्टी हॉल प्रॉब्लेम.”
व्होस सावंतने मॉन्टी हॉल प्रॉब्लेमवर वाचकांच्या प्रश्नाला प्रतिसाद दिला आणि ह्या कोड्याचे बरोबर उत्तर दिले. तसे हे कोडे काही नवीन नव्हते. माझ्या माहिती प्रमाणे १९७५ साली(चू. भू, देणे घेणे) ह्याचे उत्तर दिले गेले होते. पण आता हे कोडे केवळ गणिताच्या विश्वात न राहता आम जनते पर्यंत पोहोचले. तिने दिलेले उत्तर बरोबर होते तरी, तिला 10,000 हून अधिक पत्रे आली, अनेक विद्वानांच्या मते ( ह्यात गणितात पीएच.डी केलेल्या लोकांचा समावेश होता बर का मंडळी.) तिने दिलेले उत्तर चूक होते. ह्या विदुषीला अनेक प्रकारच्या टीकेशी सामना करावा लागला.
मॉन्टी हॉल समस्येची पूर्वपीठिका.
मॉन्टी हॉल समस्या हा टेलिव्हिजन गेम शो होता. मॉन्टी हॉल हा त्या कार्यक्रमाचा होस्ट होता. म्हणून ह्या कोड्याचे नाव “मॉन्टी हॉल समस्या!” “तीन बंद दरवाज्यांचे कोडे” ह्या नावाने पण हे ओळखले जाते.
मॉन्टी हॉल स्पर्धकाला तीन बंद दरवाजे दाखवतो. त्यांच्यापैकी एकाच्या मागे, एक नव्वी कोरी मर्सिडीज कार आहे. आणि उरलेल्या दोन दारांच्या मागे, बकऱ्या आहेत. मॉन्टी हॉल तुम्हाला एक दरवाजा निवडायला सांगतो. आणि त्या दरवाज्या मागे जे काय असेल ते तुमचे बक्षिस!
कित्ती सोप आहेना.
क्षणभर समजा कि तुम्ही स्पर्धक आहात आणि तुम्ही दरवाजा क्र.1 निवडला. मग, मॉन्टी हॉल, (ह्याला कोणत्या दारामागे काय आहे याची चांगली जाणीव आहे,) दरवाजा क्र. 3 उघडतो आणि आत बकरी आहे ती दाखवतो. (साहजिकच आहे. कार थोडीच असणार आहे.)
"आता," मॉन्टी हॉल तुमच्याकडे वळत म्हणतो, "तुम्ही तुमच्या जुन्या निर्णयावर म्हणजे दरवाजा क्र.1 वर ठाम रहाणार आहात का? की तुम्हाला दरवाजा क्र.2 वर स्विच करायचं आहे?"
म्हणजे तुम्हाला तुमचा निर्णय बदलायचे स्वातंत्र्य आहे. बऱ्याच स्पर्धकांना असे वाटते कि मॉन्टी मुद्दामहून आपल्याला कात्रज दाखवतो आहे.
मित्रांनो आपल्या जीवनातही असे प्रसंग वारंवार येतात. उदाहरण द्यायचे झाले तर ही नोकरी सोडून ती घ्यावी कि नको?
तर प्रश्न असा आहे कि अशावेळी काय निर्णय घ्यावा.
एक लक्षात ठेवा कि हे कोडे काही शब्दच्छल नाही. तसेच ह्याचे असे ठाम उत्तर नाही कि ज्यामुळे तुम्हाला शंभर टक्के ती गाडी मिळेल. ही तुमच्या विचार करण्याच्या पद्धतीची कसोटी आहे.
90 मध्ये इंटरनेट नव्हते. आता आहे. आंतरजालावर आता तुम्हाला ह्या कोड्याचे विश्लेषण करणारे हजारो लेख मिळतील. वाचकांमध्ये अनेक जण ह्या कोड्याशी पूर्वपरिचित असतील. माहिती तंत्रज्ञान, संगणकशास्त्र, संख्याशास्त्र, कृत्रिम बुद्धिमत्ता इत्यादी विषयातील एक्सपर्ट इथे असणार. त्यांनाही ह्याचे उत्तर माहित असेल. खूप डोके हापटल्यावर मलाही उत्तर समजलं आहे. (असं आपलं मला वाटतं.)
मला काय पाहिजे आहे कि ह्याचे सरळ सोप्पं आकलन कोणी करू शकेल काय?
ओके. आता हे थोडे कठीण कोडे.
तुमच्या समोर टेबलावर दोन पाकीटं आहेत. एका पाकिटात जेव्हढे पैसे आहेत त्याच्या दुप्पट किंवा निमपट रक्कम दुसऱ्या पाकिटात आहे. तुम्ही कुठलेही पाकीट उचला, उघडा, रक्कम मोजा.
आता तुम्हाला दुसरं पाकीट घ्यायचे स्वातंत्र्य आहे पण अट अशी आहे कि त्यात जितके पैसे असतील तेव्हढे घेऊन त्यावर समाधान मानावे लागेल. नाहीतर मग नका ना उचलू दुसरे पाकीट. कोणी तुम्हाला बळजबरी थोडीच करतय? पहिल्या पाकिटात जेव्हढे पैसे आहेत ते घ्या. असा विचार करा कि आपल्या नशिबात हेच आहे. खुश व्हा आणि सुखाने आयुष्य व्यतीत करा.
म्हणजे समजा पहिल्या पाकिटात ५०.००० रुपये निघाले, तर दुसऱ्या पाकिटात एक लाख असतील किंवा पंचवीस हजार असतील. रिस्क घ्यावी का?
तर असे हे कोडे. विचार करायला लावणारे, फ्री विल, स्वातंत्र्य, नशीब, तुम्ही समाजातल्या कुठल्या थरातून आलात, तुमच्या आई बाबांनी तुम्हाला काय शिकवण दिली ह्या सर्वाची पोच पावती देणारे.
आयुष्यात कोठे थांबायचे ह्याचा विचार करायला लावणारे आहे हे कोडे.
प्रतिक्रिया
19 Oct 2023 - 9:00 am | कंजूस
पण व्होस सावंतने मॉन्टी हॉल प्रॉब्लेमवर वाचकांच्या प्रश्नाला प्रतिसाद दिला आणि ह्या कोड्याचे बरोबर उत्तर दिले. ते कोडे अवघड का होते? ते राहिलेच.
19 Oct 2023 - 9:16 am | गवि
उत्तर.
हे कसले पाकीट आहे नेमके? आणि कशासाठी दिले जाते आहे? ही माहिती अत्यावश्यक.
जर हे सर्व कोणा श्रीमंत शेठचे स्वतःच्या मनोरंजनासाठी लोकांना पाकीट उचलायला लावण्याचे गंमत म्हणून खेळ असतील तर मुळात हे असले फुकटचे डीलच नाकारेन.
जर ती रक्कम केलेल्या कामाचा, कष्टाचा मोबदला असेल तर तो आधी ठरवून घेतलेला असेल. सस्पेन्स नसेल. कोणीतरी मला नशीब आजमावण्यासाठी टेबलावर ठेवलेले फुकट पाकीट सोडाच पण एक रुपयाही नको.
जर हा एक जुगार असेल, ज्यात एक विशिष्ट एंट्री फी घेऊन मला ते पाकीट उचलता येणार असेल, तर यात मी भरलेली रक्कम ही त्या खेळातील किमान कमी रकमेच्या पाकिटाइतकी नक्की असणार. त्यामुळे अशा खेळात भाग घेण्याची हुक्की आलीच तर सरळ एक रँडम पाकीट उचलेन आणि जिंकल्यास आनंद आणि हरल्यास वाईट वाटून घेईन. पण हळहळ नसेल.
बाकी मुख्य म्हणजे उपरोक्त कठीण कोडे आणि माँटी हॉल प्रॉब्लेम यात बराच मूलभूत फरक आहे. साम्य नाही.
लेख रोचक आहे. याबद्दल मीही आगोदर लिहिले असल्याने अधिक रस घेऊन वाचला.
19 Oct 2023 - 9:29 am | भागो
गवि सर
हेच ते मी म्हणतो ते. तुमचा जीवनाकडे बघण्याचा दृष्टिकोन दाखवणारा.
दोनी कोड्यात साम्य आहे कि नाही? निर्णय कसे घेतले जातात ह्या पुरते.
याबद्दल मीही आगोदर लिहिले असल्याने अधिक रस घेऊन वाचला.>>>मला वाचायची इच्छा आहे. लिंक मिळेल का?
20 Oct 2023 - 12:00 pm | राजेंद्र मेहेंदळे
https://www.misalpav.com/node/43919
20 Oct 2023 - 2:03 pm | भागो
अनेक आभार. आता वाटायला लागले आहे मी उगीचच हा धागा काढला.
20 Oct 2023 - 1:11 pm | टर्मीनेटर
येस्स! मला हा लेख वाचताना तुमचा ह्याच शिर्षकाचा 'मॉन्टी हॉल प्रॉब्लेम' हा धागा आठवला. त्यावर प्रतिसादही दिलेला असल्याने धागा चांगला लक्षात राहिला होता 😀
19 Oct 2023 - 9:20 am | भागो
अवघड ह्यासाठी कि एकदा निर्णय घेतला कि तो बदलावा कि नाही. बरेच लोक हट्टी असतात. मी एकदा ठरवलं मग ती काळ्या दगडावरची रेघ. तस पाहिलं तर जगात अवघड काहीच नाही. परिणाम भोगण्याची मानसिक तयारी असली म्हणजे बस. सर तुमच्या जीवनात असे निर्णय घ्यायची वेळ कधी आली नाही का? नसेल आली तर तुम्ही लकी आहात.
मैने एक बार ठान ली तो मै मेरी भी नाही सुनता. अस सर सलमान ह्यांनी म्हटले आहेच.
19 Oct 2023 - 9:39 am | कर्नलतपस्वी
माणूस नावाचा प्राणी हे कोडे सोडवत असतो आणी जे मिळेल त्यावर समाधान मानावे लागते. कधी खुशी तर कधी गम हेच या कोड्याचे उत्तर असावे.
मुलगा की मुलगी,सायन्स का काॅमर्स, ही का ती,स्वर्गात नेतील का तेलात तळतील......
हायला, सगळा लोचा चं आहे.
पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा.
तीन दरवाजाचा टि व्ही शो बघीतला आहे.
मस्त.
19 Oct 2023 - 9:46 am | भागो
मुलगा की मुलगी >>> सर ह्यात आपण काय निर्णय घेणार. देवाला आपला पर्सनल मॅॅनेजर नेमायच आणि आपण बिंदास जगायला मोकळे. हे लई ब्येस!
19 Oct 2023 - 9:54 am | भागो
हे जे दुसरे कोडे आहे - दोन पाकिटाच - जे डेविड ब्लॅॅकवेल ह्या संख्याशास्त्रीने रचलेले. गेम थिअरी मध्ये ह्याने संशोधन केले. हा ब्लॅॅक अमेरिकनला केवळ त्याच्या रेस मुले अन्याय सहन करावे लागले.
हे लिहायचे राहून गेले होते.
19 Oct 2023 - 11:49 am | गवि
दिलेल्या दोन्ही उदाहरणात नुकसान उर्फ लॉस हा गमावलेल्या संधीचे नुकसान उर्फ अपोरचुनिटी लॉस या स्वरूपाचे आहे.
खिशातून काही जाणार नाहीये, पण काहीतरी एक नक्की मिळणारच आहे. त्यात डबल की निम्मे किंवा साधे की घबाड इतका प्रश्न आहे आणि हा विचार इथे ड्रायव्हर आहे.
आता थोडासा बदल करून, आपल्याकडे आत्ता असलेले काहीतरी (रक्कम) स्टेकवर लावून मग हा खेळ खेळण्याचे तिकीट मिळणार आहे असे समजल्यास निर्णय प्रक्रिया अनेक जणांच्या बाबतीत बदलू शकते.
उदा.
यात थोडा बदल
समजा पहिल्या पाकिटात ५०.००० रुपये निघाले, तर दुसऱ्या पाकिटात एक लाख असतील किंवा शून्य असतील.
या खेळात भाग घेण्यासाठी तुम्ही जास्तीत जास्त किती रकमेचे तिकीट मान्य कराल?
प्रश्न जनरल आहे.
19 Oct 2023 - 11:59 am | मुक्त विहारि
आजच्या भावात...
७ रुपये... सध्या, जागतिक केंद्र असलेल्या डोंबिवली येथे, हाच भाव आहे...
19 Oct 2023 - 1:31 pm | भागो
गवि
हे निव्वळ गणिती कोडे आहे. असा खेळ कोण ठेवेल?
माझ्या सारखा भुकेला, थकेला लुख्खा पहिले पाकीट उचलेल आणि पाकीट न उघडता खिशात घालून घरी निघून जाईल.
सिरीअसली ह्याच्या गणिती उत्तराचा ठाव घेण्याचा प्रयत्न करत आहे. त्यामानाने "तीन दरवाजे" खूप ईझी आहे. पण दोनी कोडयामागचे तत्व एकच आहे.
19 Oct 2023 - 3:43 pm | कंजूस
यावरून कौबक आठवले.
पंचवीस, पन्नास लाखांचा प्रश्न असतो. उत्तर बरोबर असले तर तेवढे मिळतात अथवा चुकल्यास तीन किंवा सहा लाख मिळतात. म्हणजे खेळ सोडल्यास अगोदर मिळालेले बारा किंवा पंचवीस लाख नेता येतात.
लाभाचा जुगार म्हणा. कोडे वगैरे काही नाही.
सिंदबादच्या सफरी.
19 Oct 2023 - 4:00 pm | भागो
"कौन बनेगा करोडपति" मध्ये पण पुढे खेळून अजून पैसे जिंका/किंवा मिळवलेले सगळे पैसे हरा वा मिळालेले पैसे घ्या खेळ सोडा नि सुखाने घरी जा. अशावेळी लोक कसा निर्णय घेत असतील?
"दोन पाकीटाच्या " खेळातील गवि यांनी केलेले वेरीएशन पण इंटरेस्टिंग आहे.
20 Oct 2023 - 11:19 am | श्वेता व्यास
जुगार असेल तर भागच घेणार नाही. पण सक्तीचा खेळ असेल तर पहिल्याच पाकिटावर समाधान.
जे मिळेल ते दानधर्मात देऊन टाकायचं.
स्वत:चे काहीही कष्ट नसताना केवळ नशीब आजमावून बघू वगैरे प्रकारावर विश्वास नाही.
जिथे कष्ट असतात तिथे नशीब साथ तरी देते किंवा शिकवण तरी देते.
20 Oct 2023 - 11:21 am | मुक्त विहारि
+1
प्रचंड सहमत...
20 Oct 2023 - 2:52 pm | टर्मीनेटर
+१०००
जुगार असेल तर भागच घेणार नाही. आणि सक्तीचा म्हणण्यापेक्षा 'कौन बनेगा करोडपती' सारखा, जिथे स्पर्धकाला (बुद्धी वगळता 😀) स्वतःचे असे काहीच पणाला लावायचे नसलेला रिअॅलीटी शो टाईप खेळ असेल तर भाग घ्यायला आवडेल. पाकिटवाल्या खेळात मी पण 'पहिल्याच पाकिटावर समाधान मानेन' आणि 'मॉन्टी हॉल प्रॉब्लेम' सारख्या खेळात "पहिल्या उत्तरावरच ठाम राहणे पसंत करीन !" ह्या गविंच्या धाग्यावर दिलेल्या प्रतिसादातील उत्तरात आजही काही बदल झालेला नाही, त्याच उत्तरावर ठाम आहे!
+२०००
'सौ बात कि एक बात'
अवांतरः हल्ली मिपावर आलो कि हे अस्सं काहीतरी होतं... आज जरा फावला वेळ मिळाला म्हणुन काहीतरी वेगळंच लिहायला आलो होतो पण झाले भलतेच! भागोंचा हा धागा आणि त्यावरील प्रतिसाद तसेच त्या निमित्ताने झालेली गविंच्या धाग्याची आणि त्यावरील प्रतिसादांच्या उजळणीतुन एक कथा विषय सुचला आहे, त्यामुळे जे लिहायला म्हणुन आलो होतो ते बाजुला ठेउन आता आधी ती कथा टंकणे आले... 😂
20 Oct 2023 - 7:17 pm | भागो
काही नाही तरी तुम्हा्ला कथेला विषय दिला. हेही नसे थोडके.
20 Oct 2023 - 11:31 am | प्रसाद गोडबोले
ह्या प्रन्शाचे अतिशय सोप्पे उत्तर २४ ह्या चित्रपटात व्यवस्थित पणे दिले आहे :
https://www.youtube.com/watch?v=CYyUuIXzGgI
१:१० पासुन पुढे व्यवस्थित स्पष्टीकरण दिलेले आहे.
बाकी तुमच्या लेखातील शेवटच्या परिच्छेदात जे मत मांडले आहे ते हास्यास्पद वाटले आहे. तुम्ही कोणत्याही स्तरातुन आला असाल अन तुम्हाला तुमच्या आई वडीलांनी काहीही का शिकवले असेना, वरील समस्येचे उत्तर हे सांखिकीय आणि गणीतीय आहे. ते शुध्द सत्य आहे आणि सत्याला लोकांचा विचारांची पर्वा नसते.
20 Oct 2023 - 11:32 am | प्रसाद गोडबोले
टायपो झाला . २४ नाही २१ असे चित्रपटाचे नाव आहे.
20 Oct 2023 - 1:59 pm | भागो
बाकी तुमच्या लेखातील शेवटच्या परिच्छेदात जे मत मांडले आहे ते हास्यास्पद वाटले आहे...>.>> मी हे कोडे क्र २ बद्दल लिहिले आहे . हे जर क्लीअर नसेल तर आता क्लीअर करतो. एखाद्या कोट्या्धीशाला एक लाखाची जी किंमत असेल तशीच ती एखद्या गरिबाला असेल काय? तसेच ज्याच्यावर हरामाचा पैसा घ्यायचा नाही असे संस्कार असतील त्याप्रमाणे तो वागेल. बघा पटतात का?
दोन्ही कोडी संख्या शास्त्रावर आधारित आहेत हे सरळ आहे. पण कोडे क्र.२ बद्दल बरेच वाद विवाद आहेत.
20 Oct 2023 - 1:26 pm | अहिरावण
म्हणजे समजा पहिल्या पाकिटात ५०.००० रुपये निघाले, तर दुसऱ्या पाकिटात एक लाख असतील किंवा पंचवीस हजार असतील. रिस्क घ्यावी का?
तर असे हे कोडे. विचार करायला लावणारे, फ्री विल, स्वातंत्र्य, नशीब, तुम्ही समाजातल्या कुठल्या थरातून आलात, तुमच्या आई बाबांनी तुम्हाला काय शिकवण दिली ह्या सर्वाची पोच पावती देणारे.
आयुष्यात कोठे थांबायचे ह्याचा विचार करायला लावणारे आहे हे कोडे.
हे कोडे सोडवले तर नक्की कसे काय कळते की कुठे थांबायचे?.... काहीही...
हल्ली एक फॅड आले आहे सगळं आयुष्य म्हणजे अगदी सोप्प असतं हे किंवा ते
२१ अपेक्षित सारखे २१ /११/ ६१/१०१/ किंवा जे आवडेल तितका नंबर टाकून तितक्या गोष्टी आयुष्यात करा की झाले आयुष्य सोप्पे..
असं नसतं हो...
आयुष्य इतके सोपे नसते आणि त्याचबरोबर हताश होऊन मटकन खाली बसावे इतके अवघड पण नसते
असो
20 Oct 2023 - 2:38 pm | भागो
असं नसतं हो... >>> हो ह्यात दुमत असायचे कारण नाही.
20 Oct 2023 - 2:35 pm | भागो
कोडे क्र. १
ह्याचे मला समजलेले उत्तर.
स्पर्धकाने आपला निर्णय बदलावा.
ह्याचा अर्थ असा नाही कि निर्णय बदलला कि त्याला बक्षिस लागेल. पण बक्षिस मिळायची शक्यता मात्र दुप्पट होईल.
हेच उत्तर त्या विदुषीने दिले होते.
सुरवातीला स्पर्धालाला काहीही माहिती नाही. कुठल्याही दारामागे कार असायची शक्यता प्रत्येकी ०.३३...आहे. त्यामुळे तो कुठलाही दरवाजा निवडू शकतो. त्यानंतर मॉन्टी त्याला बोकड नसलेला एक दरवाजा उघडून दाखवतो. ह्याचा परिणाम असहोतो कि जो दरवाजा तुम्ही निवडलेला नाही आणि जो दरवाजा मॉन्टीने उघडलेला नाही त्या दरवाज्याची शक्यता जी पूर्वी ०.३३... होती ती आता ०.६६... झाली आहे. हे असे का होते? म्हणून स्पर्धकाने निर्णय बदलायला पाहिजे. हे मान्य करणे किंवा समजून घेणे हा कठीण भाग आहे. सामान्यतः लोक विचार करतात आता दोन दरवाजे आहेत. तेव्हा शक्यता ०.५:०.५ अश्या आहेत. तेव्हा कुठला दरवाजा निवडावा ह्याला तसा काही अर्थ नाही.
एका ठिकाणी ह्याचे एक साधे कोष्टक बनवून सिम्युलेशन केलेले जेव्हा मी बघितले तेव्हा माझा विश्वास बसला.
आपल्या माहितीत भर पडली तर हट्टीपणा न करता आधी घेतलेल्या निर्णयांचे पुनर्मुल्यमापन करणे केव्हाही इष्ट!
20 Oct 2023 - 5:32 pm | अमरेंद्र बाहुबली
ह्यात नेमकं कोडं काय नी त्याचं त्या हुशार पोट्टीने काय ऊत्तर दिलं?? काहीही कळालं नाही. :(
20 Oct 2023 - 6:50 pm | कंजूस
हेच म्हणतो.
काहीही कोडे नाही.
जेव्हा लोक जागा बदल करतात नशीब काढायला तेव्हा समोर दोन चार शहरांचे पर्याय असतात. कुठे कुणाचे फळफळेल सांगता येत नाही.
20 Oct 2023 - 7:13 pm | भागो
हायला धागा सपशेल तोंडावर हापाटला.
20 Oct 2023 - 7:17 pm | अमरेंद्र बाहुबली
नाय वो. मस्तय धागा. गुगलल्यावर कडालं की काय भानगड हाय- बाहुबली फ्राॅम धुडे.
20 Oct 2023 - 7:19 pm | अहिरावण
हॅ हॅ हॅ
याला म्हणतात बुवा तुम्ही सांगितले ते रामायण होते लै भारी... पण सीता रामाची कोण?