शपथ

मी-दिपाली's picture
मी-दिपाली in जे न देखे रवी...
15 Aug 2023 - 6:43 pm

धर्म, पंथ, वंश, जात भेदभाव मालवू
एक सूर, एक ताल, एक राग आळवू ॥ ध्रु ॥

सावळे कुणी जरी, कुणास रूप गोरटे
रक्त आमुच्या नसानसांत लाल वाहते
कुंचले जरी विभिन्न, एक चित्र रंगवू ॥१॥
एक सूर...

द्रौपदी, तुझी इथे युगेयुगे विटंबना
हात रोखणार मात्र यापुढे, नराधमा
बद्ध या पणात नित्य पौरुषास चेतवू ॥२॥
एक सूर...

स्पंदनांत ये उचंबळून आज आर्तता
विश्व या कुटुंब कल्पनेस देत मूर्तता
अंतरी असीम बंधुभाव खोल बिंबवू ॥३॥
एक सूर...

वासना विकार मीपणा समूळ तो गळो
माणसास माणसातलाच देव आकळो
देहमंदिरात हाच मंत्रघोष जागवू ॥४॥
एक सूर...

(वृत्त - देवराज)
१५.८.२०२३

कविता

प्रतिक्रिया

कर्नलतपस्वी's picture

15 Aug 2023 - 8:16 pm | कर्नलतपस्वी

रचना वाचली की विंदाची,

"माझी न घाई कांहिही, जाणून आहे अंतरी,
लागेल जन्मावें पुन्हा नेण्या तुला मझ्या घरी."

पण थोडे शब्द बदलून.

मला न गमले वृत्त,उपमालंकार कांहिही, जाणून आहे अंतरी,
लागेल जन्मावें पुन्हा समजण्या तुला मझ्या मनी.

कर्नलतपस्वी's picture

15 Aug 2023 - 8:17 pm | कर्नलतपस्वी

आठवते.

धर्म, पंथ, वंश, जात भेदभाव मालवू
एक सूर, एक ताल, एक राग आळवू

--- एक कविकल्पना म्हणून हे साजरे-गोजरे वाटत असले, तरी प्रत्यक्षात उतरवणे बहुविध, संपन्न मानवी संस्कृतीचा घात करणारेच ठरते.

एकच देव, एकच पवित्र ग्रंथ, एकच धर्म आणि हे मान्य नसणारांचा संहार ....
--- जिहादींचा हाच तर प्रयत्न शतकानुशतके चाललेला आहे. विविधता नष्ट केल्यावर काय होते ते काही देशांतील भयावह परिस्थिती बघून समजते.

भेद मालवू असे अपेक्षित वाटत नसून भेदभाव (उच्च नीच) घालवू असे असावे.

कविता निरागस आणि चांगली.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

16 Aug 2023 - 8:30 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

नितीमत्तेनं राहीलं पाहिजे. भेदाभेद अमंगल आहे आणि भवतालचं टीपणारी कविता.
स्वातंत्र्यदिनाचं औचित्य साधून एकात्मतेचा विचार सांगणारी कविता आवडली.

सावळे कुणी जरी, कुणास रूप गोरटे
रक्त आमुच्या नसानसांत लाल वाहते
कुंचले जरी विभिन्न, एक चित्र रंगवू ॥१॥
एक सूर...

वाह ! वरील ओळींना पैकीच्या पैकी गुण दिले आहेत.
लिहिते राहावे.

-दिलीप बिरुटे

रंगीला रतन's picture

18 Aug 2023 - 5:27 am | रंगीला रतन

सुंदर!