साक्षी

अनन्त्_यात्री's picture
अनन्त्_यात्री in जे न देखे रवी...
8 Jul 2023 - 6:47 pm

झुंजूमुंजूचे नभोनाट्य
क्षितिजावर रंगत जावे
सूर्यबिंब दवबिंदूंमधले
अलगद खुडून घ्यावे

त्या बिंदूंची रेष केशरी
लवलवती बनवावी
मावळतीची चांदणनक्षी
तिने हळू डहुळावी

स्पर्शाने अलवार विस्कटून
अवघी चांदणनक्षी-
-विरघळेल, त्या विरघळण्याला
एक विदेही साक्षी

विझणार्‍या सूर्यास्तबिंदूना
पश्चिम क्षितिजी टिपण्या
रिक्त ओंजळीत भरून घ्याव्या
मावळत्या चांदण्या

गतप्रभ नक्षत्रे अन् त्यातील
अगणित ह्या चांदण्या
तेज शिंपडित क्षितिजाखाली
जातील गात विराण्या

मुक्तक

प्रतिक्रिया

रंगीला रतन's picture

28 Jul 2023 - 12:00 am | रंगीला रतन

स्पर्शाने अलवार विस्कटून
अवघी चांदणनक्षी-
-विरघळेल, त्या विरघळण्याला
एक विदेही साक्षी

मस्त!

प्रारंभीच क्षितिजावर रंगत जाणारा नभोनाट्याचा विस्तृत पट क्षणार्धात दवबिंदूतल्या इवल्याश्या सूर्यबिंबात परिवर्तित होतो.. पुढे त्या बिंदूची 'लवलवती रेष केशरी' बनून 'चांदणनक्षी- विदेह साक्षी- पश्चिम क्षितिजी विझणारे सूर्यास्तबिंदू ... अशी वळणे घेत शेवटी क्षितिजाखाली विराण्या गात जाणार्‍या चांदण्याच्या रूपात ही अद्भुत कविता हुरहुर लावत संपते. अप्रतिम.

खणखणीत.. ब्रशचे कधी कणखर तर कधी कौशल्याने नाजूक स्ट्रोक अचूक जागी मारून अतिशय परफेक्ट पेंटिंग बनावे आणि ते आपण पहावे तसा भास झाला.

कवी म्हणून कल्पकता उत्कृष्ट आहेच पण शब्द देखील अतिशय चपखल. भाषेवर प्रभुत्व, रचनेत ताल कशात काही चूक काढायला जागाच नाही. :-)

चांदणे संदीप's picture

28 Jul 2023 - 1:59 pm | चांदणे संदीप

मस्त रचना. एका साध्या दिवस-रात्र प्रवासाला सुरेख, अलवार शब्दांनी अलंकारिक करून अजून सुंदर बनवून केलेले प्रस्तुतीकरण आवडले. :)

सं - दी - प

विवेकपटाईत's picture

28 Jul 2023 - 2:04 pm | विवेकपटाईत

मस्त कविता. आवडली.

अनन्त्_यात्री's picture

30 Jul 2023 - 1:20 pm | अनन्त्_यात्री

सर्व कवितारसिकांना धन्यवाद

चलत मुसाफिर's picture

30 Jul 2023 - 2:07 pm | चलत मुसाफिर

सुंदर प्रतिमासृष्टी. कविता आवडली