स्तनांचा कर्करोग : धोका कुणाला व किती ?

कुमार१'s picture
कुमार१ in जनातलं, मनातलं
4 Jul 2023 - 5:27 pm

जागतिक पातळीवर पाहता स्तनांचा कर्करोग हा स्त्रियांच्या कर्करोगांमध्ये सर्वाधिक आढळणारा कर्करोग आहे. हा आजार शहरी भागात आणि सामाजिक व आर्थिकदृष्ट्या उच्च गटातील स्त्रियांमध्ये अधिक प्रमाणात दिसून येतो. याचे प्रमाण कॉकेशिय गौरवर्णीयांमध्ये सर्वाधिक आहे. गेल्या काही वर्षांत भारतातील जेमतेम चाळीशीत असणाऱ्या स्त्रियांमध्ये या आजाराचे प्रमाण वाढते आहे. या कर्करोगाच्या उपप्रकारांपैकी सुमारे 80 % रोग शरीरभर पसरणारे व आक्रमक स्वरूपाचे असतात. सामाजिक व आर्थिकदृष्ट्या कनिष्ठ वर्गात या रोगाचे प्रमाण तुलनेने कमी असले तरी त्यांच्यातील कर्करोग्यांच्या मृत्यूचे प्रमाण मात्र जास्त आहे. या महत्त्वाच्या विषयाची व्याप्ती एखाद्या प्रबंधाएवढी मोठी आहे. त्याच्या रोगनिदानाच्या पद्धती आणि विविध प्रकारचे उपचार हा तर विशेष तज्ज्ञांचा प्रांत आहे. प्रस्तुत लेखात या आजाराच्या फक्त एका पैलूचे विवेचन करीत आहे, तो म्हणजे - हा आजार होण्याचा अधिक धोका कुणाकुणाला असतो ?

या संदर्भात आपण एखाद्या व्यक्तीचे वय, आनुवंशिकता, वंश, कौटुंबिक आरोग्य-इतिहास, जीवनशैली, कार्यशैली, व्यसने आणि पर्यावरणीय घटकांचा विचार करु. लेखावरील चर्चा फक्त या पैलूपुरतीच मर्यादित राहावी.

ok

(मुख्य विषयाला हात घालण्यापूर्वी एक छोटा पण विशेष मुद्दा. स्तन हे स्त्रीच्या शरीराचे निःसंशय महत्त्वाचे अवयव आहेत. परंतु हेही ध्यानात घ्यावे की पुरुषांच्या छातीवरील उंचवटे हेही स्तनच असतात; फक्त त्यात दूधनिर्मिती करणारी रचना (lobules) नसते. पुरुषांच्या स्तनांमध्येही कर्करोग होतो. परंतु तो दुर्मिळ असल्याने त्याला या लेखात स्थान दिलेले नाही).

धोका ठरवण्याच्या मापनपद्धती
एखादा कर्करोग समाजात कमीअधिक प्रमाणात आढळतो. त्याचा संख्याशास्त्रीय अंदाज सांगायचा झाल्यास, अमुक इतक्या लोकसंख्येमागे तमुक इतक्या लोकांना हा रोग होणे संभवते, असे सांगतात. अर्थात एखाद्या (कर्क)रोगाचा हा जो काही ठराविक आकडा (१०००० : १, इ.) असतो, तो वंश, देश आणि आर्थिक व सामाजिक परिस्थितीनुसार वेगवेगळा असतो. अनेक संशोधनांकडे जर नजर टाकली तर त्यांनी वर्तवलेले अंदाज भिन्न व गोंधळात टाकणारे असू शकतात. तसेच ते कालानुरूप बदलत राहतात. म्हणून या क्लिष्ट मुद्द्याकडे आपण जाणार नाही. परंतु, जीवनशैलीतील कोणत्या घटकांमुळे या कर्करोगाचा धोका किती वाढू शकतो याचा आपण विस्ताराने विचार करणार आहोत.

एखाद्या व्यक्तीच्या शरीरधर्म आणि जीवनशैलीशी निगडित अनेक घटक असतात. त्यापैकी काही घटक या कर्करोगाचा धोका वाढवू शकतात, तर अन्य काही घटक हा धोका कमी करतात.
हा धोका मोजण्याच्या काही संख्याशास्त्रीय पद्धती आहेत. यामध्ये एखादा घटक असणारे आणि नसणारे लोक यांची तुलना केली जाते. यातून जो तुलनात्मक धोका (relative risk) असतो त्याला गुण दिले जातात.

हे गुण दोन प्रकारचे आहेत :
1. तुलनात्मक धोका > १ असेल तर त्याचा अर्थ, संबंधित घटक ज्यांच्या जीवनशैलीशी निगडित आहेत, त्यांना ते लागू नसणाऱ्या लोकांपेक्षा धोका अधिक असतो.

2. पण जर तुलनात्मक धोका <१ असेल तर त्याचा अर्थ बरोबर विरुद्ध आहे. म्हणजेच हे घटक ज्यांच्याशी निगडित आहेत, त्यांना कर्करोग होण्याचा धोका कमी होतो किंवा ते घटक रोगसंरक्षक म्हणून काम करतात.

या प्रणालीनुसार स्तनांच्या कर्करोगाच्या तुलनात्मक धोक्यासाठी चार उतरत्या श्रेणीमध्ये गुण दिले जातात :
धोका :
> ४.०१ ( सर्वाधिक)
२.१- ४ ( मध्यम)
१.१- २ ( सौम्य /साधारण)

<१ (धोका नाही; उलट कर्करोग संरक्षण)

धोका वाढवणारे घटक
या घटकांची पुस्तकातील लांबलचक यादी जर वरपासून खालपर्यंत पाहिली तर डोळे विस्फारतात ! सर्वप्रथम या घटकांची वरील गुणांच्यानुसार मर्यादित जंत्री करतो. नंतर त्यातील काही महत्त्वाच्या घटकांचा स्वतंत्रपणे विचार करू.

यादी वाचण्यापूर्वी एक महत्त्वाची सूचना :
यादीतील एखादा घटक एखाद्याच्या जीवनशैलीत असला, तर निव्वळ एका घटकामुळे कर्करोग होतो असे समजण्याचे बिलकुल कारण नाही. अनेक घटकांच्या एकत्रित परिणामातून हा धोका वाढतो. लांबलचक यादीचा उद्देश वाचकांना घाबरविण्याचा नसून निव्वळ आरोग्यजागृती करणे हा आहे.

ok

सर्वाधिक धोकादायक
• 65 वर्षावरील वय
• शरीरातील आनुवंशिक जनुकीय बिघाड ( BRCA1, BRCA2, इ)
• वयाच्या पन्नाशीच्या आत बीजांडांच्या कर्करोगाचा कौटुंबिक इतिहास
• स्तनांचा कर्करोग झालेले प्रथम दर्जाचे एकाहून अधिक कुटुंबीय असणे.
• वयाच्या तिशीच्या आत विविध किरणोत्सर्गाचा शरीरावर बऱ्याच प्रमाणात झालेला मारा (धोक्याचे गुण 22 ते 40)
.

मध्यम धोकादायक
• ऋतूसमाप्तीनंतरच्या वयात शरीरातील इस्ट्रोजेन किंवा टेस्टस्टेरॉन या हार्मोन्सची पातळी बरीच जास्त असणे.
• पूर्ण दिवस भरलेले पहिले गरोदरपण वयाच्या 35 नंतर झालेले असणे.

• मॅमोग्राफी तपासणीनुसार स्तनांची 'घनता" खूप जास्त असणे.
• स्तनांचा कर्करोग झालेली एकच प्रथम दर्जाची कुटुंबीय असणे.

• पेशीवाढ करणारे स्तनांचे काही आजार.
• शरीरातील अन्य काही आनुवंशिक जनुकीय बिघाड
.

साधारण धोकादायक
• दीर्घकालीन मद्यपान व धूम्रपान
• पहिल्या पूर्ण दिवस भरलेल्या गरोदरपणातील वय 30 ते 35 च्या दरम्यान.
• आयुष्यात प्रथम मासिक पाळी चालू होण्याचे वय < १२
• ऋतूसमाप्तीचे वय > ५५ वर्षे

• स्वतःच्या अपत्याला कधीच स्तन्यपान केलेले नसणे
• स्वतः च्या गरोदरपणातून स्वतःला एकही मूल झालेले नसणे

• शरीराची उंची ५ फूट ३ इंचाहून अधिक.
• उच्च सामाजिक व आर्थिक गट आणि बैठी जीवनशैली
• दीर्घकालीन व्यावसायिक रात्रपाळीचे काम
• केसांना कृत्रिम रंग लावणे आणि अन्य रासायनिक सौंदर्यवर्धकांचा वापर

• स्तनांमध्ये काही प्रकारच्या गाठी होणे
• गर्भाशय, बीजांडे किंवा मोठ्या आतड्याचा कर्करोग झालेला असणे
• इस्ट्रोजन व प्रोजेस्टेरॉनचे उपचार आणि गर्भनिरोधक गोळ्यांचा वापर

• हृदय व रक्तवाहिन्याचे काही आजार
• हाडांची घनता प्रमाणाबाहेर जास्त असणे

हुश्श ! आता यादी थांबवतो…
आता वरीलपैकी काही महत्त्वाचे मुद्दे विस्ताराने पाहू.

वय : हा सर्वात महत्त्वाचा घटक आहे. वयाच्या 25 वर्षांच्या आत हा आजार दुर्मिळ आहे. त्यानंतर वाढत्या वयागणिक त्याचे प्रमाण वाढत जाते. 50 ते 69 या वयोगटात ते सर्वाधिक असते.

कौटुंबिक इतिहास व जनुकीय घटक :
१. ज्या स्त्रीच्या आई किंवा बहिणीला हाच आजार झालेला असतो त्या स्त्रीला भविष्यात हा आजार होण्याची शक्यता सुमारे दीडपट ते तिप्पट असते. जनुकीय बिघाडांमध्ये काही ज्ञात तर काही अजून अज्ञात आहेत. ज्ञातपैकी BRCA1 & BRCA2 -बिघाड हे दोन बऱ्यापैकी आढळतात. जगभरात या बिघाडांमध्ये वांशिक फरक आढळतात. काही स्त्रियांमध्ये जनुकीय बिघाड आणि पर्यावरणीय घटक यांच्या एकत्रित परिणामामुळे कर्करोग होतो.

२. कुटुंबातील अन्य स्त्रीला बीजांडांचा कर्करोग झालेला असणे.
३. काहींच्या बाबतीत प्रथम दर्जाच्या नात्यातील पुरुषाला देखील स्तनांचा कर्करोग झालेला असू शकतो.

हॉर्मोन्सचे उपचार आणि गर्भनिरोधक गोळ्या
१. पारंपरिक गर्भनिरोधक गोळ्यात इस्ट्रोजन व प्रोजेस्टेरॉन ही दोन्ही हॉर्मोन्स असायची. अशा गोळ्या सलग दहा वर्षे घेतल्यानंतर या रोगाचा धोका वाढतो. परंतु चालू असलेल्या गोळ्या बंद केल्यानंतर दहा वर्षांनी हा धोका नाहीसा होतो. अलीकडील नव्या गोळ्यांमध्ये फक्त प्रोजेस्टेरॉन असते आणि त्यामुळे संबंधित धोका उद्भवत नाही.

२. ऋतूसमाप्तीच्या दरम्यान व नंतरच्या काळात काही स्त्रियांना त्रास होतो. त्यावर स्त्री- हॉर्मोन्सचे विविधांगी उपचार दिले जातात. असे उपचार सलग पाच वर्षे चालू राहिले तर धोका वाढतो. परंतु उपचार बंद केल्यानंतर पाच वर्षांनी तो नाहीसा होतो.

मासिक पाळी व प्रसूतीचा इतिहास
स्त्रीच्या आयुष्यातील मासिक पाळीचा प्रारंभ ते कायमची समाप्ती हा कालावधी प्रजोत्पादनाचा असतो. या प्रदीर्घ कालावधीत मासिक ऋतुचक्रे (cycles) जेवढी जास्त होतात, तेवढा शरीरावरील इस्ट्रोजेनचा प्रभाव जास्त राहतो. हे हार्मोन पेशीवाढीला उत्तेजन देते. जितकी वाढ जास्त तितक्या डीएनएच्या प्रती जास्ती काढल्या जातात आणि त्या दरम्यान चुका होण्याचे प्रमाण वाढते. परिणामी जनुकीय बदल होतात. त्यातून धोका वाढतो.

यास अनुसरून खालील मुद्दे महत्त्वाचे ठरतात :
१. मासिक पाळीचा प्रारंभ वयाच्या बाराव्या वर्षाच्या आत (दुप्पट धोका)
२. एकाही जिवंत अपत्याला जन्म दिलेला नसणे ( या बाबतीत मासिक ऋतुचक्रे अधिक काळ चालू राहतात).
३. पहिले पूर्ण दिवसांचे गरोदरपण वयाच्या 30 वर्षांनंतर येणे
४. ऋतूसमाप्तीचे वय 50 वर्षांच्या पुढे असणे.

स्तनांची घनता
इथे एक मुद्दा महत्त्वाचा आहे. ही घनता स्तन हाताला किती भरीव लागतात याच्याशी संबंधित नाही. परंतु मॅमोग्राफी तपासणीत विशिष्ट प्रकारच्या टिशू तिथे किती प्रमाणात दिसतात यावर ती ठरते. त्यानुसार अधिक घनता असणाऱ्या स्त्रियांना या रोगाचा धोका वाढतो.

शारीरिक उंची ( ५ फूट ३ इंचाहून अधिक)
धोकादायक घटकांच्या यादीत अधिक उंचीचा मुद्दा पाहून वाचकांना आश्चर्य वाटेल. या संदर्भात काही लाख स्त्रियांवर अभ्यास झालेले आहे. त्याचा निष्कर्ष असा आहे की, दर १० सेंटिमीटर उंचीवाढीमागे या कर्करोगाचा धोका १७% वाढतो.

याची कारणे अद्याप अस्पष्ट आहेत. वाढीच्या वयामध्ये होत असलेली विविध हार्मोन्सची उलथापालथ तसेच जनुकीय घटकांचा वाटा असावा. अधिक उंच स्त्रियांमध्ये बीजांड आणि मोठ्या आतड्याचे कर्करोगही अधिक प्रमाणात आढळतात.

शारीरिक जाडी
हा महत्त्वाचा मुद्दा आहे. या संदर्भात स्त्रियांचे दोन गटांमध्ये वर्गीकरण करु :
१. ऋतूसमाप्तीनंतरच्या वयात अधिक जाड असलेल्या स्त्रियांना या कर्करोगाचा धोका दुप्पट असतो. शरीरातील मेदात इस्ट्रोजेन बऱ्यापैकी साठून राहते तसेच अशा स्त्रियांमध्ये रक्तातील इन्सुलिनची पातळी वाढलेली राहते.

२. मात्र ऋतूसमाप्तीपूर्वीच्या वयात जाड असलेल्या स्त्रियांना या रोगाचा धोका चक्क कमी असतो. याचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.

व्यसने
तंबाखू (धूम्रपान) : हा खूपच मोठा धोकादायक घटक आहे.
आयुष्यात धूम्रपान जेवढे लवकर चालू केले जाईल तेवढा धोका अधिकाधिक राहतो.
सातत्याने धूम्रपान चालू असल्यास धोका 24 टक्क्यांनी वाढतो आणि त्यातून होणारा हा रोग आक्रमक स्वरूपाचा (invasive) राहतो.
तसेच धूम्रपान सोडून दिल्यानंतरही धोका राहतोच.

मद्यपान : प्रौढ वयातील सातत्याने दीर्घकाळ केलेल्या मद्यपानातून शरीरातील इस्ट्रोजन पातळी वाढते आणि म्हणून धोका वाढतो.
अन्य महत्त्वाचे आजार
(मधुमेह प्रकार २ ) आणि हृदय व रक्तवाहिन्यांची दुर्बलता या दोन्ही आजारांमध्ये कर्करोगधोका वाढतो.

कार्यशैली
दीर्घकालीन रात्रपाळीच्या कामाचा या आजाराची निकटचा संबंध आहे. या संदर्भात रुग्णालयीन परिचारिका, विमानातील हवाई सुंदरी आणि अन्य कर्मचाऱ्यांवर बरेच अभ्यास झालेले आहेत. या समूहांमध्ये या कर्करोगाचे प्रमाण वाढलेले दिसते. रात्रभर काम केल्यामुळे शरीरातील मेलाटोनिन या हार्मोनच्या स्रवणात अडथळा येतो; या हार्मोनला ट्यूमर-प्रतिबंधक गुणधर्म आहेत.

केसांची सौंदर्यप्रसाधने
यांत प्रामुख्याने खालील गोष्टींचा वापर होतो :
1. गडद रंग
2. केस मोकळे किंवा सरळ करण्यासाठी वापरलेली प्रसाधने
हे सर्वच प्रकार या रोगाचा धोका वाढवतात. ज्या स्त्रिया या गोष्टींचा वापर सातत्याने आणि कायमस्वरूपी करतात त्यांच्यात धोका अर्थातच अधिक असतो. या उलट त्यांचा प्रासंगिक अल्प वापर केल्यास धोका फारसा नसतो.
.. ….
धोकादायक असलेल्या वरील सर्व घटकांना मूलतः दोन गटांमध्ये विभागता येईल :
1. निसर्गदत्त
2. सुधारणा करता येण्याजोगे (modifiable)

शरीरधर्मातले जे निसर्गदत्त घटक असतात त्यांचा मोठ्या प्रमाणावर अभ्यास झाल्यानंतर त्याचा उपयोग मानववंशशास्त्र व जनुकशास्त्र यांच्या संशोधनासाठी होतो. कालांतराने त्यांचे निष्कर्ष आरोग्य क्षेत्रासाठी फायदेशीर ठरतात.
प्रत्येक देशात सर्व नागरिकांच्या चाळणी चाचण्या करणे शक्य होत नाही. अशा वेळेस विशेषत अधिक धोका असलेला समाजगट जर निवडून घेतला तर त्याच्याकडे अधिक काळजीपूर्वक पाहता येते. एखाद्या स्त्रीच्या बाबतीत वरील सर्व घटकांचा विचार करून त्यानुसार संगणकीय पद्धतीने धोक्याचे गुणांकन करता येते.
...

वरील सविस्तर विवेचनानंतर आता रोगाची उलट बाजू पाहू.

ok

धोका कमी करणारे घटक
• याबाबतीत काही वंशभेद आहेत. आशियाई, मध्य व दक्षिण अमेरिकी खंडीय (Hispanic) आणि पॅसिफिक बेटवासीयांमध्ये या रोगाचे प्रमाण कमी आहे.

• पहिल्या गरोदरपणाचे वय 20 च्या आत
• स्वतःच्या अपत्यांना प्रत्येक खेपेस एक वर्षाहून अधिक काळ स्तन्यपान केलेले असणे

• या रोगाचा धोका कमी करणारी प्रतिबंधात्मक स्तन-शस्त्रक्रिया करून घेतलेली असणे. या प्रकारे दोन्ही स्तन काढून टाकल्यास भावी कर्करोगाचा धोका 90 टक्क्यांनी कमी होतो. अर्थात अशा शस्त्रक्रियांचा फायदा व मर्यादा व्यक्तीसापेक्ष असून तो निर्णय संबंधित तज्ञांच्या सल्ल्यानेच घ्यावा लागतो.
• गर्भाशयमुखाचा कर्करोग झालेला असणे ( हा रोग आणि स्तनरोग यांचे सामाजिक-आर्थिक स्तराशी नाते एकमेकांच्या विरुद्ध आहे).

• काही कारणास्तव शरीरातील बीजांडे (ovaries) काढून टाकलेली असणे.
• नियमित व्यायाम आणि हिंडतीफिरती जीवनशैली

• हाडांची घनता कमी असणे
• आहारातील विशिष्ट घटक व या रोगाचा धोका हा अजूनही संशोधनाचा विषय आहे. विविध अभ्यासांचे निष्कर्ष उलटसुलट असून ते जगातील सर्व वंशांना एकसमान लागू होत नाहीत.
……..

बहुचर्चित परंतु सिद्ध न झालेले घटक
काही घटकांचा या रोगाशी संबंध असल्याची गृहीतके एकेकाळी मांडली गेली होती. परंतु भविष्यात ती काही सिद्ध होऊ शकली नाहीत. तसेच काही घटकांसंबंधी आंतरजालीय अफवा देखील मोठ्या प्रमाणावर पसरल्यात. असे तीन महत्त्वाचे घटक पाहू :

ब्रेसीअर्सचा वापर : या सतत वापरल्यामुळे स्तन आणि काखेदरम्यानच्या lymph-प्रवाहात अडथळा येतो असा एक काल्पनिक मुद्दा पसरवला गेलाय. परंतु शास्त्रीय प्रयोगांती यात कोणतेही तथ्य आढळलेले नाही.

प्रत्यारोपित कृत्रिम स्तन
सौंदर्यवर्धन किंवा अन्य काही कारणांसाठी या प्रत्यारोपण शस्त्रक्रिया केल्या जातात. परंतु त्यांचा या रोगाशी संबंध नाही.

गर्भपात
नैसर्गिकरित्या झालेल्या किंवा कारणास्तव करवलेल्या गर्भपाताचा हा रोग होण्याशी काही संबंध नाही.
……….

वरील सर्व विवेचनानंतर एक मुद्दा स्पष्ट होईल. ज्या स्त्रियांच्या बाबतीत ही आनुवंशिकता आहे आणि धोका वाढवणारे कुठले ना कुठले घटक त्यांच्या जीवनशैलीत आहेत, त्यांनी अधिक जागरुक असले पाहिजे. वयाच्या 40 च्या दरम्यान कुठलाही त्रास होत नसला तरीही आपल्या डॉक्टरांच्या सल्ल्याने संबंधित चाळणी चाचण्या करून घ्याव्यात. त्या चाचण्यांचा आढावा पूर्वी इथे घेतलेला आहे.

तसेही प्रत्येक प्रौढ स्त्रीने घरच्या घरी स्तनांची स्व-तपासणी नियमित करावीच. सन 1990 नंतर हा आजार समाजात वाढत्या प्रमाणात 'दिसू' लागला याचे महत्त्वाचे कारण म्हणजे, चाळणी चाचण्यांचे वाढलेले प्रमाण आणि लवकर झालेले रोगनिदान.

तमाम स्त्री वाचकांनो,
गेल्या काही वर्षांपासून जालविश्वात या विषयासंबंधी अनुभवयुक्त चर्चा होताना दिसतात. या लेखातून आपला शरीरधर्म आणि जीवनशैलीशी निगडित असलेली या रोगाची कारणमीमांसा सादर केली. ती उपयुक्त वाटावी. आपल्यातील काही जण किंवा त्यांचे कुटुंबीय या आजाराचा धैर्याने सामना करीत असू शकतील. त्यांच्या जिद्दीला सलाम आणि तब्येतीस आराम पडण्यासाठी शुभेच्छा !

बाकी सर्वांना (कर्क)रोगमुक्त निरामय आयुष्य चिंतितो.

ok
*************************************************************************************
प्रमुख संदर्भ :
१. American cancer society : Facts & figures 2019-20

२. Breast cancer in India :Present scenario and the challenges ahead

३. Rural urban differences in breast cancer in India

( आणि इतर काही ).

जीवनमानआरोग्य

प्रतिक्रिया

राजेंद्र मेहेंदळे's picture

4 Jul 2023 - 6:19 pm | राजेंद्र मेहेंदळे

नेहमीप्रमाणेच वाचनीय आणि मननीय लेख आहे. नात्यात स्तन कर्करोगाशी सामना करुन आता सुरळीत जीवन जगणार्‍या २ स्त्रिया आहेत. त्यामुळे या विषयाबद्दल किंचित माहिती आहे. पण तुमचा लेख वाचुन बर्‍याच गोष्टी नव्याने समजल्या.

अवघड विषय सोपा करुन सांगतो तोच खरा शिक्षक आणि अवघड विषय सोपे करुन लिहितात ते कुमार सर _/\_ _/\_

एक प्रश्न-- हा अवयव शरीराबाहेर असल्याने तो सरळ काढुन रोगापासुन मुक्ती मिळवता येते त्यामुळे हा त्यातल्या त्यात कर्करोगाचा सौम्य प्रकार म्हणावा काय?

कुमार१'s picture

4 Jul 2023 - 7:44 pm | कुमार१

त्यामुळे हा त्यातल्या त्यात कर्करोगाचा सौम्य प्रकार म्हणावा काय?

>>> नाही. हा अवयव तशा अर्थाने ‘शरीरातच’ आहे. त्याच्या अगदी सुरवातीच्या स्टेज दरम्यान लक्षात आला तर शस्त्रक्रिया प्रभावी ठरते. पण लक्षात येतानाच तो थोडा जरी ‘पसरला’ असेल तर ‘मुक्ती’ मिळेलच असे नाही. तसेच उपचारानंतरही recurrence होतो की नाही यावर बारीक लक्ष द्यावे लागते.
..
विनंती :
उपचार हा विशेषतज्ज्ञांचा प्रांत असल्यामुळे त्यावर शक्यतो मी काही अधिक भाष्य करणार नाही.
कारणमीमांसा या पैलूवर हवी तितकी चर्चा व्हावी.

पूर्वी हा कर्करोग परदेशात जास्त असायचा,पण आता भारतातही अधिक दिसतो, यातून मुक्त झालेलेही अनेक आहेत.

केस मोकळे किंवा सरळ करण्यासाठी वापरलेली प्रसाधने

हे कसे काय?
काही एक्सटरनल फक्टरही इन्फेक्शन करून स्तनांना गाठी येतात.अर्थात अन्टीबायोटिक/औषधांनी बरी होते हे पण पाहिलेय.ते कदाचित स्तनाच्या काही पोरस भागामुळे?आणि इतर सिक्रीशनमुळे असेल का?

कुमार१'s picture

4 Jul 2023 - 7:48 pm | कुमार१

केस मोकळे किंवा सरळ करण्यासाठी वापरलेली प्रसाधने :
हे कसे काय?

>>>
केसांच्या विविध सौंदर्यवर्धकांमध्ये काही ना काही रसायने असतात. त्यातील काहींमुळे शरीरातील हार्मोन्सच्या कार्यावर परिणाम होतो. तसेच काहींमुळे डीएनएच्या पातळीवर इजा होऊन जनुकबदल होतात.

अर्थात यामुळे संभवणारा धोका "साधारण" गटात मोडतो हे लेखात दिले आहे.
रसायनांचा हॉर्मोनवरील परिणाम याचा आढावा यापूर्वी इथे घेतलेला आहे

सुबोध खरे's picture

4 Jul 2023 - 7:39 pm | सुबोध खरे

अतिशय सुंदर आणि माहितीने -परिपूर्ण लेख

धन्यवाद

गवि's picture

4 Jul 2023 - 8:21 pm | गवि

माहितीपूर्ण लेख.

रिस्क फॅक्टर्सची इतकी लांबलचक यादी असून देखील त्या मानाने बऱ्याच स्त्रिया अजून हयात आहेत हे पाहून हायसे वाटले. जवळपास प्रत्येक गोष्टीने या ना त्या कर्करोगाचा काही टक्के धोका आहेच असे असेल तर त्या मानाने प्रीव्हेलंस फारच कमी दिसतो. मग टॉप दोन तीन फॅक्टर वगळता बाकीचे ट्रिवियल मानावेत का?

कुमार१'s picture

4 Jul 2023 - 8:42 pm | कुमार१

टॉप दोन तीन फॅक्टर वगळता बाकीचे ट्रिवियल मानावेत का?

निव्वळ एखाद्या शरीरधर्मातील साधारण घटकामुळे कर्करोग होतो असे अजिबात नाही. धोका मापनाचे गुण काढताना सर्वाधिक धोकादायकनाच महत्व येते.
उदा : निव्वळ अंदाज म्हणून धोक्याचे गुण असे दिले जातील :

1. बालपणात काढले गेलेले छातीचे बरेच एक्स-रे : 22 ते 40
2. आनुवंशिकता आणि विशिष्ट जनुकीय बिघाड : १५
3. इथून पुढे उतरत्या क्रमाने त्या लेखातील उतरंडीनुसार गुण कमी कमी होत जातील हे उघड आहे.

या क्षेत्रातही मशीन लर्निंग येऊ घातलेले आहे.
त्या तंत्रज्ञानात शरीरधर्मासंबंधी आणि जीवन शैलीसंबंधी विविध गुण देऊन एकत्रित विचार करून धोका काढला जातो.

कर्नलतपस्वी's picture

4 Jul 2023 - 8:32 pm | कर्नलतपस्वी

कर्क रोग झाला. निदान आणी उपाय केल्यानंतर पुर्ण पणे ठिक झाला.

विस वर्ष इतर रोग्यांना समुपदेशन केले. पण शेवटी त्याच रोगाने तडकाफडकी वर्षभरात ज्योत मालवली.

कर्क रोग ठिक झाल्यानंतर काय उपाय करावे जेणेकरून रिलॅक्स होणार नाही.

बाकी लेख चांगला आहे हे वादातीत.

कुमार१'s picture

5 Jul 2023 - 7:53 am | कुमार१

उपचारानंतर लक्षणे नाहीशी झाली की वरकरणी कर्करोग 'बरा झाला" असे म्हटले जाते. अर्थात पेशींच्या सूक्ष्म पातळीवर काय दडून राहिलेले आहे हे वरून समजण्यास मार्ग नसतो.
उपचार पूर्ण झाल्यानंतर सर्वसाधारणपणे जीवनशैली खालील प्रमाणे असावी. परंतु हे लक्षात ठेवले पाहिजे की, कितीही आरोग्यदायी जीवनशैली ठेवली तरी पूर्वी झालेला कर्करोग पुन्हा उद्भवणारच नाही असे नसते; दोन्ही शक्यता राहतात.

उपाय:
१. डॉक्टरांनी सांगितल्याप्रमाणे नियमित अंतराने त्यांना तब्येत दाखवत राहणे. कुठल्याही प्रकारची रोगसदृश्य लक्षणे दिसल्यास डॉक्टरांच्या त्वरित कानावर घालणे. रोगाच्या प्रकारानुसार काही तपासण्या वार्षिक अथवा ठराविक अंतराने करण्यास सांगितल्या जातात.

२. आहारात भाज्या, पालेभाज्या आणि फळांचा वापर.

३. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार योग्य तो आणि पुरेसा व्यायाम.

४. मद्यपान जमल्यास पूर्ण बंद अन्यथा माफक प्रमाणात असावे.

सुबोध खरे's picture

5 Jul 2023 - 7:17 pm | सुबोध खरे

कर्क रोग ठिक झाल्यानंतर काय उपाय करावे जेणेकरून रिलॅक्स होणार नाही.

कर्करोगाच्या बाबतीत संपूर्ण बरा होणे( cure) आणि सध्या रोग दिसत नाही (remission) या दोन बाबतीत लोकांची गल्लत होते.

एखादी कर्करोगाची गाठ आपण शल्यक्रिया करून काढून टाकलेली असली तरी सूक्ष्म स्वरुपात तो पसरलेला असू शकतो यासाठी कर्करोगाच्या प्रकाराप्रमाणे दोन ते पाच वर्षे त्याचा पाठपुरावा केला जातो आणि जेथे जेथे तो पसरण्याची शक्यता असते त्या भागाची कसून तपासणी केली जाते.

साधारण पाच वर्षे असा पाठपुरावा केल्यानंतरच हा रुग्ण बरा झाला असे समजले जाते. या अगोदर जरी रुग्ण मध्ये कोणतीही लक्षणे दिसत नसली तरी रुग्ण बरा झाला असे समजले जात नाही.

पाच वर्षानंतर त्याच अवयवात कर्करोग झाला तर तो नवीन रोग आहे असे समजून उपाय केला जातो.

या बाबतीत दोन फार महत्त्वाचे फरक आहेत. उदा गर्भाशयाचा कर्करोग. यात गर्भाशय काढूनच टाकले आणि पाच वर्षे रोग बाहेर पसरलेला नसेल तर रुग्ण पूर्ण बरा झाला याची खात्री देता येते. परंतु तोंडाचा किंवा फुफुसाचा कर्करोग आहे हे अवयव आपल्याला काढून टाकणे शक्य नसते. जेवढ्या भागाला हा रोग झाला आहे तेवढा भाग काढला जातो.

मुळात या अवयवाचा कर्करोग का झाला ते कारण आपल्याला बरेच वेळेस माहिती नसते मग ते कारण दूर करणे शक्य नसते. उदा हवेतील प्रदूषणामुळे फुफुसाचा कर्करोग झाला असेल तर गेली कित्येक वर्षे फुफुसाचा इतर भाग सुद्धा त्या प्रदूषित हवेची शिकार झालेलाच असतो. तेंव्हा तेथे दुसरा कर्करोग होणारच नाही याची खात्री देता येत नाही.

एक म्हणजे आहे त्याच रोगाचा पुनरुद्भव( relapse) आणि दुसरा म्हणजे नवीन कर्करोग जो काही काळानंतर दृगोच्चर झालेला ( metachronus)

स्तनाच्या कर्करोगाबाबत ज्या बाजूला कर्करोग झाला आहे तेथे शल्यक्रिया केली आणि तो स्तन काढून टाकला तरी दुसऱ्या बाजूच्या स्तनाचा कर्करोग होण्याची शक्यता आपल्याला गृहीत धरावीच लागते हा एखादे वेळेस पहिल्या पाच वर्षे पाठपुरावा चालू असतो त्याकाळात उद्भवू शकतो (synchronus) किंवा त्यानंतर सुद्धा( metachronus).

यामुळे आपण डॉक्टरांनी शिफारस केल्याप्रमाणे वेळेवर चाचण्या करून घेणे आवश्यक आहे.

डॉक्टर उगाचच सारखे सारखे (पैशासाठी) चाचण्या करून घ्यायला सांगतात हा सार्वत्रिक पसरलेला/ पसरवलेला गैरसमज आहे. यामुळे आवश्यक असलेल्या चाचण्या करून न घेणारे रुग्ण आमच्या रोजच्या पाहण्यात आहेत.

अशा रुग्णांना -- "मी आपल्याला कर्करोगाचा पुनरुद्भव होण्याची शक्यता फार तर ५ टक्के आहे म्हणजेच आपण या चाचण्या केल्या नाहीत तर ९५ टक्के आपल्याला काहीच होणार नाही परंतु आपण या ५ टक्क्यात आहात कि ९५ टक्क्यात हे सांगायला मी ज्योतिषी नाही. आपला विश्वास असेल तर आपण आपल्या ज्योतिषाला विचारून पहा कि आपल्या पत्रिकेत मृत्यू योग आहे का" ---असेच सांगतो

कुमार१'s picture

5 Jul 2023 - 8:12 pm | कुमार१

कर्करोग बरा होणे याची व्याख्या वाटते तितकी सोपी नाही. प्रत्येक कर्करोग मॉलेक्युलर पातळीवर नष्ट होईलच असे नाही.
आंतरराष्ट्रीय औपचारिक व्याख्या अशी गुंतागुंतीची आहे :

A cancer patient can be defined as “cured” only when his or her life expectancy is the same as that of a sex- and age-matched general population.

मुक्त विहारि's picture

4 Jul 2023 - 11:05 pm | मुक्त विहारि

धन्यवाद

'
स्तन कर्करोगाचा धोका वाढवणारे घटक यांची लांबलचक यादी वरपासून खालपर्यंत पाहिली आणि खरोखरच डोळे विस्फारले!

---

महत्वाच्या विषयावरील महत्वाचा लेख!

---

परिवारातील स्त्रियांना वाचायची शिफारस करतो आहे.
'

प्रचेतस's picture

5 Jul 2023 - 8:38 am | प्रचेतस

माहिती आणि प्रतिसाद उत्तम.

उत्तम माहितीपुर्ण आणि संग्रहणीय असा लेख! वाचनखूण साठवली आहे 🔖

नुकताच मिपावर ह्या रोगाशी आणि त्यावरील उपचार पद्धतीशी संबंधित एक लेख आला आहे. त्यावर काही उद्बोधक चर्चा होइल असे वाटले होते पण त्या धाग्यावरील प्रतिसादांना भलतेच वळण लागल्याने साफ निराशा झाली. विषय मांडण्यासाठी धागाकर्त्याने मांडलेल्या पार्श्वभुमीवर चर्चा केंद्रीत होउन मुळ विषय मागे पडला आणि "रोग्याला धर्म असु शकतो, रोगाला नाही!" इतक्या साध्या गोष्टीचे भान न ठेवता धर्म, रुढी, कायदे आणि अनेक अनावश्यक गोष्टींवर काथ्याकुट सुरु झाला. आणि आश्चर्याची गोष्ट म्हणजे धागालेखकही त्या अस्थानी चर्चेत अगदी हिरीरीने सहभागी झाला 😀

असो, आमच्या घरातच ह्या रोगाची (आता रोगमुक्त) केस असल्याने त्याचे निदान आणि उपचार ह्यांविषयी गेल्या चौदा वर्षांपासुन बऱ्यापैकी माहिती आणि अनुभव होताच पण गेल्या दोन वर्षात आणखीन चार केसेस जवळुन बघीतल्या असल्याने त्यात बरीच भर पडली आहे. त्याविषयी एक मेगाबाईटी प्रतिसाद वर उल्लेख केलेल्या धाग्यावर दिलेला असल्याने लिंक देउन त्याची पुनरावृत्ती टाळतो.

सदर प्रतिसादात उल्लेख केलेल्या माझ्या मामेबहीणीच्या उपचारांसाठी गेल्या वर्षभरात टाटा मेमोरीअल होस्पिटल मध्ये कित्येकवेळा जाणे-येणे झाले आणि ती तिथे अ‍ॅडमीट असताना अनेक रात्री तिथे वास्तव्यही झाले. ह्या कालावधीत त्या ठिकाणी बघीतलेले असंख्य रुग्ण, त्यांचे आणि त्यांच्या नातेवाईकांचे अनुभव मन विदीर्ण करणारे आहेत.
माझ्या निरिक्षणाप्रमाणे दिवसेंदिवस रुग्णसंख्या चिंताजनकरीत्या वाढत असुन आता ह्या रोगाचे आणि उपचार पद्धतींचे स्वरुप बऱ्यापैकी बदलले असले तरी एक गोष्ट मात्र कायम आहे ती म्हाणजे "लवकर निदान + योग्य उपचार = संपुर्ण रोगमुक्त होण्याची शक्यता". बाकी उपचारांदरम्यान होणारे औषधांचे / केमो थेरपीचे दुष्परिणाम आणि त्यातून होणारे रुग्णांचे प्रचंड हाल आणि खर्च ह्याबद्दल न बोललेलेच बरे!

असो... ह्या माहितीपुर्ण लेखासाठी मनःपूर्वक आभार! वरती वामन देशमुख साहेब म्हणाल्याप्रमाणे 'परिवारातील सर्व स्त्रियांना वाचायची शिफारस करतो आहे.' तुमचे ज्ञानदानाचे कार्य असेच चालु ठेवावे हि विनंती 🙏

सुबोध खरे's picture

5 Jul 2023 - 7:36 pm | सुबोध खरे

@ टर्मीनेटर

आश्चर्याची गोष्ट म्हणजे धागालेखकही त्या अस्थानी चर्चेत अगदी हिरीरीने सहभागी झाला

माझा लेख हा कर्करोगाबद्दल नव्हताच. तो स्वार्थी मानवी प्रवृत्तीबद्दल होता.

कर्करोगाऐवजी दुसरा एखादा दुर्धर जीवघेणा रोग असता तरी चालेल

त्या माणसाच्या वृत्तीबद्दल मी लिहिलेले आहे. त्यामुळे त्या धाग्यावर कर्करोगाबद्दल चर्चा केल्यास मूळ मानवी वृत्तीबद्दल मला लिहायचे होते त्यापासून विषयांतर झाले असते.

स्तनांच्या कर्करोगाबद्दल मी एक लेख १० वर्षांपूर्वी लिहिलेला होता https://www.misalpav.com/node/23924 त्यात अनेक प्रश्नांची उत्तरे सुद्धा दिलेली होती

त्याला १० वर्षे झालेली असल्याने आणि या १० वर्षात या विषयात प्रचंड प्रगती झालेली असल्याने मी या धाग्यावर त्याची जाहिरात केली नव्हती

कुमार१'s picture

5 Jul 2023 - 3:30 pm | कुमार१

या लेखावर पसंतीचा अभिप्राय देणाऱ्या तसेच पूरक माहितीची भर घालणाऱ्या सर्वांचे मनापासून आभार !

काहींना या लेखाची शिफारस परिवारातील स्त्रियांना करावीशी वाटली हे वाचून समाधान वाटले.

सुरेख माहितीपुर्ण लेख! धन्यवाद!!
.

आज माझे सतत मोबाईलवर प्रतिसाद उडत असल्याने सहनशक्ती संपून‌ खूप इच्छा असूनही प्रतिसाद देता येत‌नाहीत , क्षमसव व छान लेखाबद्दल धन्यवाद.

अनिंद्य's picture

17 Jul 2023 - 8:03 pm | अनिंद्य

माहितीपूर्ण लेख.

सध्या स्तनांचा कर्करोग होण्याचे एकूण प्रमाणच वाढलेय की जागरूकता वाढल्यामुळे जास्त केसेस उघडकीला येत आहेत ?

कुमार१'s picture

17 Jul 2023 - 9:20 pm | कुमार१

एकूण प्रमाणच वाढलेय की जागरूकता वाढल्यामुळे जास्त केसेस उघडकीला ?

>>
हे लेखात दिले आहे :

सन 1990 नंतर हा आजार समाजात वाढत्या प्रमाणात 'दिसू' लागला याचे महत्त्वाचे कारण म्हणजे, चाळणी चाचण्यांचे वाढलेले प्रमाण आणि लवकर झालेले रोगनिदान.

तसेच, प्रमाणवाढ पण आहे :
ok

कुमार१'s picture

22 Jul 2023 - 11:40 am | कुमार१

आनंदी मूडात असताना एखाद्या स्त्रीला अचानक तिच्या स्तनामध्ये गाठ झालेली पहिल्यांदाच जाणवणे… त्यातून मनात निर्माण झालेली भीती… घाईघाईने गुगलून वाचन करणे…. त्याने अजूनच घाबरायला होणे….. डॉक्टरांची पहिली भेट…..

.. त्यांनी सांगितलेले दोन्ही अंदाज आणि सुचवलेल्या तपासण्या……. विश्वास न बसल्याने दुसऱ्या डॉक्टरांचे मत घेणे…. मग बायोप्सी…. परंतु रिपोर्ट येईपर्यंत झालेली मनाची प्रचंड घालमेल…… केमोथेरपीमुळे केस गेल्यानंतर मी कशी दिसेन याची चिंता….. घरातील लोकांशी निर्वाणीचे बोलणे….. घरातल्यांनी भावनिक आधार देणे
आणि….
.. अखेर बायोप्सीचा रिपोर्ट आल्यानंतर ती गाठ कर्करोगाची नाही हे स्पष्ट होणे…… त्यानंतर झालेला कौटुंबिक आनंद अवर्णनीय असतो !!

असा प्रसंग काही जणींच्या वाट्याला येऊ शकतो. मी जो वर्णन केला आहे तो होम या हिंदी चित्रपटातील आहे. मुळात ती जालमालिका होती. त्याचा आता सलग चित्रपट युट्युबवर उपलब्ध आहे.

वरील प्रसंगातील जोडप्याच्या भूमिका सुप्रिया पिळगावकर आणि अन्नू कपूर यांनी केल्यात. तो प्रसंग सुरेख वठला आहे.

या बातमीचे शीर्षक अर्थातच दिशाभूल करणारे आहे. CAR-T cell therapy हा जो अत्याधुनिक कर्करोग उपचार आहे त्याच्या मर्यादा, दुष्परिणाम आणि प्रचंड खर्च हे मुद्दे लक्षात घेतले पाहिजेत :

1. सध्या या उपचारांना फक्त रक्तपेशींच्या काही कर्करोगांसाठीच (lymphomas, some forms of leukemia, and multiple myeloma) मान्यता आहे. मेंदू, स्तन किंवा मूत्रपिंडाचे सॉलिड ट्यूमर यासाठी हे उपचार अजून तरी उपयुक्त ठरलेले नाहीत

2. सदर उपचार घेतल्यानंतर 50% हून कमी रुग्णांना दीर्घायुष्य लाभलेले आहे

3. ते प्रचंड म्हणजे प्रचंड खर्चिक आहेत. भारतात ज्यांनी उपचार प्रथम घेतला आहे त्यांना 42 लाख रुपये खर्च आला आहे. परदेशातील हा खर्च सुमारे पावणेचार ते चार कोटी रुपयांच्या घरात आहे !

4. या उपचारांचे मेंदूवरील काही गंभीर दुष्परिणामही विचारात घ्यावे लागतील - जसे की, फीट्स आणि वाचाशक्तीवर परिणाम होणे.

कुमार१'s picture

10 Feb 2024 - 10:43 am | कुमार१
धर्मराजमुटके's picture

11 Feb 2024 - 9:01 am | धर्मराजमुटके

हो माहित आहे. मुळातच मराठी वृत्तपत्रांची लायकी ( की वकुब) जाणून आहे. ही बातमी खरोखरच एवढी विश्वसनीय असती तर तिची अफाट चर्चा झाली असती. एक नमुना म्हणून ती बातमी इथे डकवली आहे.

कुमार१'s picture

5 Mar 2024 - 8:21 am | कुमार१

कर्करोग उपचार घेताना बऱ्याच स्त्रियांचे भरपूर केस गळतात. या पार्श्वभूमीवर पुण्याच्या माहेर महिला प्रतिष्ठानने केस दान स्विकारण्याची मोहीम हाती घेतली आहे.

किमान 12 इंच लांबीचे केस 7 मार्च पर्यंत सोमवार पेठेतील कुमार सदन इथल्या प्रतिष्ठानच्या कार्यालयात द्यावेत असे आवाहन त्यांनी केलेले आहे

(बातमी : छापील मटा 5 मार्च 2024)

सुधीर कांदळकर's picture

10 Mar 2024 - 5:31 pm | सुधीर कांदळकर

हा धोका पुरुषांना असू शकतो का या प्रश्नाने माझ्या मनांत डोके वर काढले होते. त्याचे धक्कादायक उत्तर मिळाले. विविध गोष्टींच्या परिणामाची वा कारकतेची प्रतिशत शक्ती देखील दिलेली आहे. वा! सुरेख लेखाबद्दल धन्यवाद.