महान देशभक्त स्वातंत्र्यवीर सावरकर यांची आज जयंती. त्यांची स्वातंत्र्यापूर्वीही अवहेलना झाली, स्वातंत्र्यानंतरही झाली आणि आजही काही लायकी नसलेल्या लोकांकडून त्यांची अवहेलना होतच आहे. त्यांचा जन्म झाला तो नाशिकजवळील भगूर ह्या गावी. अगदी काही वर्षांपूर्वी त्यांचे जन्मस्थान असलेला भगूर येथील वाडाही भग्नावस्थेत होता मात्र काही वर्षांपूर्वीच सरकारने त्याची डागडुजी करायला सुरुवात केली आणि आज ह्या वाड्याला बर्यापैकी त्याचे पूर्वीचे स्वरुप प्राप्त झाले असून स्वातंत्र्यवीरांचे एक उचित स्मारकच त्या ठिकाणी उभे राहिलेले आहे. मागच्याच महिन्यात केलेल्या स्वातंत्र्यवीरांच्या ह्या जन्मस्थळाच्या सफरीचा हा वृत्तांत.
भगूरला मी खूप पूर्वी म्हणजे सुमारे वीसेक वर्षांपूर्वी नाशिकहून सायकलहून माझ्या मामेभावासमवेत गेलो होतो. तेव्हाच्या सायकली म्हणजे अगदी साध्याच. नाशिकवरुन भगूर सुमारे १६ किमी. तिथे जाताना सायकल तीन वेळा पंक्चर झाल्याची आठवणही अजून ताजीच आहे. मात्र तिन्ही वेळा सायकल पंक्चरचे दुकान जवळच असल्याने तेव्हा निभावले गेल्याची आठवण अजूनही ताजीच आहे. आता मात्र सायकल पंक्चरची दुकाने शोधूनही सापडत नाहीत, हल्लीचे आधुनिक सायकलस्वारही स्वतःच पंक्चर काढताना दिसतात. हा तर तेव्हा देवळाली बघून भगूरला पोहोचलो तर भग्न वाडा नेमका कुलुपबंद होता त्यामुळे हे स्मारक पाहता आले नाही. ती रुखरुख यावेळी मात्र दूर झाली. यंदा जवळपास दहा वर्षांनी नाशिकला गेलो. ह्यावेळी स्वतःची गाडी असल्याने मनाजोगे फिरता आले. नाशिकहून पाथर्डी फाट्याने देवळालीस पोहोचलो, तिथून भगूर जेमतेम ४ किमी अंतरावर. भगूर गावातच सावरकरांचा वाडा आहे. कुणालाही विचारताच कोणीही मार्ग दाखवू शकतो, गूगल नकाशाने तर थेट वाड्यापाशीच पोहोचता येते.
सावरकरांचा हा वाड्या मध्यंतरी पूर्वी कुणा दुसर्याच्या खाजगी मालकीचा होता, पुरातत्त्व खात्याने तो ताब्यात घेऊन त्याच्या जीर्णोद्धाराचे काम सुरु आले, पूर्वी वाड्यातली जमीन मातीची होती, आता तिथे फरश्या बसवल्या आहेत, छतावर नवी कौले टाकली आहेत. पूर्वी वाळवी लागलेले जिने भक्कम करुन त्यांना व्यवस्थित पॉलिश केलेले आहे. वाड्याची निगा आता उत्तम प्रकारे राखली जातेय.
स्वातंत्र्यवीरांच्या जन्मस्थानाचे प्रथमदर्शन
स्वातंत्र्यवीरांचे जन्मस्थान असलेला हा वाडा दुमजली आणि प्रशस्त आहे. व्हरांडा, आतील खोल्या, माजघर, देवघर, बळद, अंतर्गत जीने, पोटमाळा यांनी परिपूर्ण आहे. वाड्यात आता ठिकठिकाणी स्वातंत्र्यवीरांच्या जीवनातील विविध छायाचित्रे, त्यांचा जीवनपट व्यवस्थितरित्या मांडलेला आहे. वाडा बघता बघता सावरकरांच्या आयुष्याचे समग्र दर्शन होत असते.
वाड्याच्या प्रांगणात असलेला सावरकरांचा अर्धपुतळा
जतनापूर्वीचे व जतनानंतरचे जन्मस्थळाचे स्वरुप
सातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर म्हणजे १९०६ रोजी पुणे येथे परदेशी कापडाची जाहिररित्या होळी करुन स्वदेशीचा उद्घोष केलेला प्रथम भारतीय, पूर्ण स्वातंत्र्याची मागणी केलेला प्रथम भारतीय, बॅरिस्टरची परिक्षा उत्तीर्ण होऊनही राजकिय विचारांमुळे ब्रिटिश सरकारकडून पदवी नाकारण्यात आलेला प्रथम भारतीय, प्रखर राष्ट्रभक्तीमुळे मुंबई विद्यापीठाकडून पदवी हिरावून घेतलेला प्रथम भारतीय, (त्यानंतर त्यांना तब्बल ४९ वर्षांनंतर १९६० साली ह्याच विद्यापीठाकडून सन्मानतेने पदवीचे पुनःप्रदान करण्यात आले), १८५७ च्या उठावाची परदेशात जाहिरपणे सुवर्णजयंती साजरा करणारा पहिला भारतीय, प्रकाशनापूर्वीच दोन देशांनी बंदी घातलेल्या १८५७चे सातंत्र्यसमर ह्या ग्रंथाचा लेखक, भारतातील ब्रिटिश न्यायालयाचा अधिकार नाकारणारा पहिला भारतीय, हेग येथील आंतरराष्ट्रीय न्यायालयात केवळ एका व्यक्तीच्या अटकेचा खटला लढवला गेलेला पहिला राजकीय कैदी, राजकीय कारणासाठी दोन जन्मठेपींची कैद झालेला एकमेव देशभक्त, कारागृहात लेखणी आणि कागद उपलब्ध नसताना तुरुंगांच्या भिंतीवर लेखन करुन सुमारे दहाहजार काव्यपंक्ती रचणारा आणि त्या मुखोद्गत करवून आणि तुरुंगाबाहेर पाठवून काव्यनिर्मिती करणारा जगातला एकमेव कवी, अस्पृश्योद्धारासाठी समाजाचा विरोध पत्करुन रत्नागिरी येथे पतितपावन मंदिर उभारणारा पहिला समाजसुधारक, मराठी साहित्य परिषदेचे अध्यक्षपद भूषवलेली पहिली व्यक्ती, समाजकारणात रुळलेले फारसी, इंग्रजी शब्द काढून मंत्रालय, महापौर, नगरपालिका, क्रिडांगण, नगरसेवक असे विविध शब्द देऊन भाषा शुद्धिकरण करणारा महान भाषाज्ञानी.
त्यांच्या वाड्यातही त्यांचा अर्धपुतळा बसवण्यात आला आहे.
वाड्यात त्यांचा जीवनपट छायाचित्रांसोबत मांडलेला दिसतो. ह्या जीवनपटाचीच काही दृश्ये
वाड्याचा अंतर्भाग
पोटमाळा
वरचा मजला
स्वातंत्र्यवीरांचे पुस्तकांचे फडताळ
वाड्याचा मागील भाग
स्वातंत्र्यवीर सावरकरांनी १९५३ रोजी पुन्हा भगूरला भेट दिली, याखेपी समस्त भगूरवासीयांनी त्यांचा सत्कार करुन त्यांना मानपत्र अर्पण केले.
आज आपल्या जन्मस्थळीच आपल्या प्रत्यक्ष दर्शनाचा सुयोग प्राप्त झाला हे आम्ही आमचे महत् भाग्य समजतो. आपल्या महान् कर्तृत्वाचा प्रारंभ ह्याच भगूरच्या पवित्र भूमीवर झाला, याची जाणीव असल्याने आमची आंतरिक हृदये अभिमानाने आणि उत्कट भावनेने आपल्या प्रदीर्घ काळाच्या या आगमनप्रसंगी आनंदाने भरून येत आहेत म्हणून आपापसांतील सर्व प्रकारचे मतभेद विसरून भगूरची जनता एकमुखानें आपल्या स्वागतास उभी आहे.
जेथे त्यागाला मर्यादा नाही, वैयक्तिक सुखदुःखाची चिंता नाहीं, आणि मृत्यूचे भय नाहीं, अशा उज्वल देशभक्तांचें उग्रवीरवत आपण आयुष्यभर प्रत्यक्ष आचरून दाखविलें आहे. तसेच रुढींच्या आणि फसव्या दांभिकतेच्या बंधनांनी जखडलेल्या समाजाला आपले सामाजिक जीवन विशुद्ध आणि विकसित करण्यासाठी सुधारणेच्या मार्गाने आपण पुढे नेत आलांत हे सर्व करीत असतांना आत्यंतिक आणि कठोर अशी निष्काम कर्मयोगाची भूमिका आपण यशस्वितेनें लढवू शकलांत ह्याची सत्यता भगूरकरांनांच काय पण संपूर्ण भारताला पटली आणि म्हणूनच आपले शब्द व आपली कृती राष्ट्राच्या इतिहासांतील एक अमोल संपत्तीच झाली आहे.
पारतन्त्र्याच्या काळांत मातृभूमीच्या श्रृंखला तोडण्याची आपण पराकाष्ठा केली. जन्मठेपेची शिक्षा आपण फुलासारखी झेलली. अन्दमान येथील हालअपेष्टांनी भरलेल्या भयंकर अशा कारागृहाला प्रासादतुल्य मानून हंसत हंसत कालक्रमणा केली. परक्यांनी निर्माण केलेल्या सर्व संकटमय अवस्थांतून पार पडण्यासाठी नी त्यांतून भारतमातेची मुक्तता करण्यासाठी प्राण पणाला लावून जी कार्यकुशलता, अतुल चातुर्य, प्रखर ध्येयनिष्ठा नी ज्वलन्त राष्ट्रभक्ती इत्यादि गुणांचा एक महान आदर्श निर्माण केला आणि याचि देही याचि डोळा आपली ही भारतभूमी स्वतंत्र झाल्याचे पाहिले.
स्वातन्त्र्य प्राप्त झाल्यानंतरही आपल्या देखत सर्वत्र समृद्धि नी शांतता व्हावी, परक्यांच्या आक्रमणांना तोंड देण्यासाठी तसेच स्वराष्ट्र शक्तिशाली होण्यासाठी राष्ट्रांतील तरुणांनी अहमिकेने पुढे यावे आणि आपापसातील सर्व प्रकारचे क्षुद्र मतभेद नष्ट होऊन राष्ट्रपुरुष सर्वांग परिपुष्ट व्हावा म्हणून आपण ह्या आपल्या उतार वयांतही अविरतपणे कष्ट करीत आहात.
अशा प्रकारच्या आपल्या दिव्य आणि त्यागमय जीवन प्रणालीकडे पहात असतां आम्हां भगूर वासीयांना या खर्या देशभक्तीचा, समाजसेवेचा आणि नागरिकत्वाचा एक उत्कृष्ट आदर्श दिसत आहे.
तव अनुशासन जन संजीवन सिंहासन तुज नसे| सार्वभौम भूपाल परी तू जनादराचा असे |हे स्वातंत्र्यशाहीर कवी गोविंद यांचे शब्द आपणांस यथार्थत्वाने शोभतात. यास्तव आत्यंतिक आत्मियतेने, अभिमानाने आणि अत्यादराने नतमस्तक होऊन आमच्या मनातील भावनांचे आणि विचारांचे निदर्शक असे हे मानपत्र आपणास समर्पित आहोत.
परमेश्वराने आपणास उदंड आयुष्य देऊन आपला भारतवर्ष सुख, समृद्धी आणि शांतता यांनी परिपूर्ण असलेला पाहण्याची संधी आपणांस द्यावी अशी आम्ही भगूरकर नागरिक एकमुखाने प्रार्थना करतो.
भगूर
दिनांक १२ मे १९५३
आपलें स्नेहांकित
समस्त भगूरवासीय नागरीक
भारतभूमीच्या ह्या महान सुपुत्राला प्रणाम
प्रतिक्रिया
28 May 2023 - 5:29 pm | टर्मीनेटर
लेख आवडला 👍
भारतभूमीच्या ह्या महान सुपुत्राला प्रणाम 🙏
28 May 2023 - 5:43 pm | गवि
सुंदर लेख वल्ली. धन्यवाद. या शापित वीरपुरुषाला आता कुठे मान सन्मान मिळू लागला आहे. त्यांच्याविषयी जे काही गरळ ओकले जाते त्याबद्दल काय म्हणायचे? ते सर्व आरोप म्हणून केले जातात त्याबद्दल त्यांनीच स्वतःच लिहून ठेवलेले आहे. त्यातून जणू नवीन गुप्त माहिती मिळाली असावी अशा रीतीने संदर्भहीन मुद्दा उचलून सोयीस्कर वळण देऊन त्याचा गैरवापर केला जातो. हीन प्रकारे.
असो. लहानपणी रत्नागिरीत येता जाता पतित पावन मंदिर दिसत असे. त्या काळात म्हणजे १९८० दशक, सावरकरांचा सहवास लाभलेले देखील अनेक लोक हयात होते तिथे. अत्यंत आदरणीय व्यक्तिमत्त्व. पन्नास वर्षे तुरुंगात खितपत पडण्यापेक्षा बाहेर निघून त्यांनी त्याही परिस्थितीत जे शक्य होते ते समाजकार्य केले. जाती पाती मिटवण्यासाठी खूप केले. हिंदू कट्टरता हा विवादास्पद मुद्दा असेलही. पण हेतू प्रामाणिक होते. गांधी, नेहरू , सावरकर, बोस , पटेल या सर्वांचे ध्येय प्रामाणिक आणि पक्के होते. मार्ग, श्रद्धा विभिन्न असतील. कोणीच यापैकी कोणावरही विनाकारण चिखल उडवू नये. पुढचे भविष्य आणखी उत्तम करण्यासाठी काही करावे. _/\_
28 May 2023 - 5:57 pm | कर्नलतपस्वी
विनम्र अभिवादन.
आपल्या मताशी सहमत आहे.
आमचे गाव नाही ज्यांच्या नावामुळे देशभरात गाव ओळखले जाते त्या हुतात्मा राजगुरूंच्या घराचे सुद्धा इतक्या वर्षांनंतर पुनरूज्जीवन झाले आहे. या स्मारका बदल ची शासकीय उदासीनता आम्ही बघीतली आहे. स्वातंत्र्यानंतर पंचवीसाव्या वर्षात ,१९७२ महाराष्ट्र सरकारने सर्व हुतात्म्यांच्या गावात वेगळे,एकाच प्रकारचे ,डिझाईनचे स्मारक बांधले. तेच पैसे त्यांच्या जन्मस्थानी खर्च केले असते तर....
जालियनवाला बाग सन पंच्याहत्तर च्या आसपास बघीतली होती ती बाग आणी आजचे तीचे स्वरूप जमीन अस्मानाचा फरक आहे.
स्वातंत्र्या साठी जो लढला तो स्वातंत्र्य वीर. त्यांची पद्धत कुठलीही असो, राजकारण व व्यक्तीगत पातळीवरचे मत बाजुला ठेवून त्यांचा आदर झालाच पाहीजे.
हे सर्व खुप पुर्वीच व्हायला हवे होते.
28 May 2023 - 5:59 pm | प्रचेतस
हुतात्मा राजगुरुंच्या घराला नुकतीच भेट दिलेली असल्याने स्मारकाचा नीटनेटकेपणा नजरेस भरला. मात्र अजूनही काम करायला हवे आहे. काही वर्षांपूर्वी तर हे स्मारक पूर्णपणे पडक्या अवस्थेत होतं.
28 May 2023 - 5:59 pm | श्रीगुरुजी
महान क्रांतिकारक, महान समाजसुधारक, महान भाषासुधारक, महान देशभक्त स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यावर लिहिलैला अत्यंत सुंदर लेख!
२०१७ मध्ये अंदमानात सहलीसाठी गेलो होतो. पोर्ट ब्लेअरमध्ये पोहोचल्यानंतर लगेचच सेल्युलर तुरूंग पाहण्यास गेलो. स्वातंत्र्यवीर सावरकरांना ज्या खोलीत ११ वर्षे डांबून ठेवले होते त्या तीर्थस्थळाचे दर्शन घेतले. सर्वांनी सामूहिक जयोस्तुते काव्याचे स्तवन केले.
मणीशंकर अय्यर नावाच्या नराधमाने २००४ मध्ये मंत्रीपद मिळाल्याऩतर द्वेषाची उबळ असह्य झाल्याने स्वातंत्र्यवीर सावरकरांनी खोलीच्या भिंतीवर कोरलेल्या कमला नावाच्या काव्यावर चुना फासून एक महान ऐतिहासिक ठेवा नष्ट करून आपली द्वेषाची उबळ पूर्ण केल्याचे पाहून दु:ख झाले व संतापही आला.
सायंकाळी तुरूंगाच्या आवारात दृकश्राव्य कार्यक्रम पाहताना अचानक मनात विचार आला की बरोबर १०० वर्षांपूर्वी याच वेळी स्वातंत्र्यवीर सावरकर याच खोलीत बंद असतील व तेव्हा त्यांच्या मनात कोणते विचार घोळत असतील?
या महान स्वातंत्र्यवीरांना साष्टांग दंडवत!
28 May 2023 - 6:46 pm | कर्नलतपस्वी
मणीशंकर अय्यर नावाच्या नराधमाने २००४ मध्ये मंत्रीपद मिळाल्याऩतर द्वेषाची उबळ असह्य झाल्याने स्वातंत्र्यवीर सावरकरांनी खोलीच्या भिंतीवर कोरलेल्या कमला नावाच्या काव्यावर चुना फासून एक महान ऐतिहासिक ठेवा नष्ट करून आपली द्वेषाची उबळ पूर्ण केल्याचे पाहून दु:ख झाले व संतापही आला.
कोती मानसिकता,उच्च दर्जाचे लांगुलचालन व सत्तेच्या लोभाने आलेले बुद्धीमांद्य. बाकी काय.
28 May 2023 - 6:01 pm | Bhakti
उत्तम लेख!
"ने मजसी ने"या गीताने देशभक्ती,भाषेचा आनंद, शांती अजून भरपूर काही दिले आहे.
स्वा.सावरकर यांचे अनेक तेजस्वी पैलू समजले.
29 May 2023 - 7:06 am | चौकस२१२
,सावरकर देशभक्त / क्रांतिवीर तर ते होतेच पण त्याबरोबर समाज सुधारक , आणि स्वतःचं धर्मात सुद्धा वैन्यायिक दृशीतकोन ठेवून बदल केले पाहिजेत या विचारांचे होते .
"हे नृसिंह प्रभू शिवाजी जी राजा" हे गीत लिहणाऱ्याला.. या आणि त्याकाळच्या कर्मठ समाजात पतित पावन मंदिराचं द्वारे दलितांना मंदिर प्रवेश हा विषय उचलून धरणाऱ्याला आज जी हलकट वृत्तीची मंडळी केवळ त्याच्या जातीवरून झोडपत आहेत हे महाराष्ट्राच्या भूमीला शोभत नाही ...
पण बोलणार कोण आणि ऐकणार कोण?
विठ्ठलाची पूजा करण्यापासून माजी मुख्यमंतऱ्यानं केवळ त्यांचं जातीमुळे थांबवण्रा हा समाज !
आज कदाचित सावरकरांना जेवढा मान उत्तर भारतात आहे त्याच्या पेक्षा कमीच महाराष्ट्रात आहे ...
एकीकडे निधर्मवाद जोपासा म्हणत स्वतःच जातीयवाद पसरवणाऱ्या आणि हिंदू विरोधी सतत भूमिका घेणाऱ्या बारामतीचं काकांना कि त्यांच्या सोडलेलया पिल्लावळीला ... !
जानवं घातलेलया "महान आत्मा गांधींना" पहिलय भेटीत "झिंगे खाने कसे चांगले " हे "समजावून" सांगणाऱ्या सावरकरांना नमसकार ( या बाबत कोणी विदा कि काय ते मागितलं तर फोडून काढीन अर्थात शाब्दिक स्वरूपात !)
29 May 2023 - 10:58 am | सर्वसाक्षी
सशस्त्र क्रांती पर्वात सर्वात अधिक सहभाग होता तो महाराष्ट्र, बंगाल, पंजाब आणि उत्तर प्रदेश या राज्यांचा
बंगालमधील मुलं चेंडू ऐवजी बॉम्बशी खेळत मोठी झाली असे म्हटले जाते आणि ते खरे आहे. मात्र या वीरांना बॉम्ब मिळाले कसे आणि कुठून? पूर्वेतील अग्निप्रलयाचा उगम हा पश्चिमेतील वडवानलात आहे.
१९०६ साली हेमचंद्र दास हा बंगाली तरूण मेकॅनिक्सचे उच्च शिक्षण घेण्यासाठी आपले घरदार विकून विलायतेला गेला. इंग्लंड मध्ये पोचताच त्यांनी स्वातंत्र्यवीर सावरकरांची भेट घेतली आणि तिथे येण्यामागील आपला खरा हेतू हा बॉम्ब बनवण्याचे शिक्षण हाच असल्याचे सांगितले.
स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी त्या कालखंडात पॅरिस येथे वावरत असलेल्या सफ्रान्स्की या रशियन क्रांतीकारकाशी गाठ घालून देण्यासाठी हेमचंद्र दास यांना सेनापती बापट आणि अब्बास बेग यांच्यासोबत पॅरिसला पाठवले. सफ्रान्स्की कडून बॉम्ब निर्मिती साठी मिळाली पण ती सर्व कागदपत्रे आणि नोंदी रशियन भाषेत होत्या. सेनापती बापट यांनी त्यांच्या जर्मनी येथे शिकत असलेल्या ॲना या मैत्रिणीकडून त्या सर्व कागदपत्रांचे इंग्रजी भाषांतर करून घेतले. सेनापती बापट यांनी भाषांतराच्या २० प्रती करून घेतल्या होत्या, पैकी एक प्रत अब्बास बेग यांच्यासोबत स्वातंत्र्यवीर सावरकर यांना पोचवली गेली.
६ डिसेंबर १९०७ रोजी बंगालच्या लेफ्टनंट गव्हर्नर च्या गाडीखाली बॉम्ब स्फोट झाल्याचे वाचून फ्रेंच पोलिसांनी इंग्रजी पोलीसांना काही हिंदुस्थानी तरूण इथे रशियन क्रांतीकारकाच्या संपर्कात असल्याची माहिती दिली. मात्र तोपर्यंत हेमचंद्र दास हिंदुस्थानात पोचले होते आणि अर्थातच बॉम्बस्फोट करण्यात त्यांचा हात होता. २६ मार्च १९०८ रोजी सेनापती बापट मुंबईत परतले आणि लगोलग ७ एप्रिल रोजी ते कलकत्त्याला पोचले व त्यांनी ३४ मुरारीपुकुर येथील बॉम्ब निर्माणीला भेट दिली.
पुढे त्यांनी बाळ व दत्तोपंत केळकर यांना लिहिलेल्या पत्रात " लंडन येथील वास्तव्यात पार पाडावयाचे माझे कर्तव्य चांगल्या तऱ्हेने पार पाडले आहे" असे लिहिले होते.
पुढे याच प्रयत्नात जन्माला आलेल्या बॉम्ब चा वापर ३० एप्रिल १९०८ रोजी हुतात्मा खुदीराम बोस आणि हुतात्मा प्रफुल्ल चाकी यांनी किंग्जफोर्डवर केला. इंग्रज सरकार मुळापासून हादरलं आणि सरकारनं बॉम्ब बनवण्याचे ठिकाण शोधण्यासाठी जीवाचा आकांत केला व अखेर माणीकतल्ल्यातील बॉम्ब निर्माणीचा छडा लागला. तिथली सामग्री पाहून सरकारचे डोळे पांढरे झाले
१ मे १९०८ रोजी हुतात्मा प्रफुल्ल चाकी यांनी आपण पोलिसांकडून घेरले गेलो आहोत हे लक्षात येताच स्वतः वर गोळ्या झाडल्या आणि हौतात्म्य पत्करलं. एक विलक्षण आश्चर्य म्हणजे हुतात्मा प्रफुल्ल चाकी यांनी वापरलेले पिस्तूल हे ब्राऊनिंग बनावटीचे होते आणि तरीही इंग्रज सरकारने त्या प्रकरणात स्वातंत्र्यवीर सावरकर यांना अडकवले नाही. पुढे हुतात्मा अनंत कान्हेरे प्रभृतींनी जॅक्सनचा वध केला तेव्हा याच ब्राऊनिंग पिस्तुलाच्या आधारे स्वातंत्र्यवीर सावरकर यांना त्या वधात गोवायचा प्रयत्न केला होता
2 Jun 2023 - 9:01 am | प्रचेतस
धन्यवाद या माहितीबद्द्ल. ह्यातील बरीचशी माहिती पहिल्यांदाच समजली.
29 May 2023 - 11:03 am | सौंदाळा
उत्तम समायोचित लेख
सर्व फोटो आणि माहिती आवडली. वाडा जतन केल्याबद्दल शासन आणि सर्व भगूरवासीयांचे आभार.
स्वातंत्र्यवीर सावरकरांना विनम्र अभिवादन
29 May 2023 - 11:12 am | रंगीला रतन
उत्तम लेख!
29 May 2023 - 11:26 am | आंद्रे वडापाव
युरोपात असते तसे ... जुने बांधकाम रिस्टोर करून ... वेग वेगळे पुस्तके , जुने फोटो, त्यांनी वापरलेले कपडे चष्मा पेन आदी वस्तू ,
ऑडिओ व्हिडीओ गाईडेड टुर ... ३ डी क्लिप्स ... सेल्फी पॉईंट्स ,
पर्यटकांसाठी विश्रंती गृह , मेमॉर सुविनीयर किचेन ती शर्ट वैगरे विक्री ... अश्या सुधारणा करून
तिकीट लावून पर्यटन स्थळ म्हणून डेव्हेलप केले पाहिजे ..
सरकारला उत्पनाचा सोर्स हि होईल स्थानिक रोजगार पण होईल , ज्यांना भेट द्यायचीये त्यांना सुविधा पण होईल ... विन विन
30 May 2023 - 1:31 pm | चौकस२१२
...तिकीट लावून पर्यटन स्थळ म्हणून डेव्हेलप केले पाहिजे ..
ते हि व्हायला पाहिजे पण मग रागा रागावतील ना !
29 May 2023 - 1:13 pm | कपिलमुनी
स्मारक छान मेंटेन केले आहे .
स्वातंत्र्यवीर सावरकरांना शतशः नमन _/\_
29 May 2023 - 8:09 pm | कुमार१
मराठी भाषेला ४५ शब्द देणाऱ्या स्वातंत्र्यवीर सावरकरांना त्रिवार अभिवादन !
या शब्दांपैकी दिनांक हा सर्वोत्तम मानला जातो.
या व्यतिरिक्त,
हुतात्मा, गणसंख्या, क्रमांक आणि दिग्दर्शक
हे शब्द मी आग्रहाने वापरतो.
30 May 2023 - 1:19 pm | साहना
फक्त ४५ ? मला वाटते आणखीन सुद्धा शब्द असावेत. मी सावरकर ह्यांचे "समग्र" साहित्य वाचले आहे (भाषणे आणि ललित साहित्य सोडून). भाषा ह्या एकाच विषयावर जरी सावरकर ह्यांनी काम केले असते तरी सुद्धा ते महान ठरले असते. इंग्रजी भाषेतील काही चांगल्या गोष्टी भारतीय भाषांत याव्यात असे त्यांना वाटायचे. एक मुद्दा होता कि मुद्रणसौकर्य, इंग्रजी भाषेंत फक्त साधी सोपी २६ अक्षरे आहेत पण देवनागरीत जोडाक्षरे वगैरे धरून असंख्य आहेत. त्यांच्या मते ए इ सारखी अक्षरे मोडीत काढून अ ह्याच मूळ अक्षरावर काना मात्रा इत्यादी लावल्या तर मुद्रण सोपे होईल. मला ह्याचे नेहमीच अप्रूप वाटले आहे. खरोखर दूर दृष्टी होती. दुसरी त्यांची सुधारणा जी आम्ही विसरून गेलो ती म्हणजे इंग्रजी भाषे प्रमाणे सामान्य नाम चे क्रियापदात रूपांतरण करणे. water चे I will water the plant ह्यांत क्रियापद झाले आहे. त्यांच्या मते "मी झाडांना पाणेन" अश्या पद्धतीने सामान्य नामाचे क्रियापद केल्यास कमी अक्षरांत जास्त सांगता येईल. (येथील उदाहरणे माझी स्वतःची आहेत).
त्यांचे सर्वांत आवडते लेखन म्हणजे आपल्या वर्तमानपत्रातून ते जे गांधीजी ना ट्रॉल करायचे ते. गांधींनी यंग इंडिया मध्ये काही लिहिले कि दुसऱ्याच दिवशी सावरकर त्यांची खिल्ली उडवायचे. एके ठिकाणी गांधींनी लोकांना कन्याकुमारीहून पेशावर पर्यंत पदयात्रा काढण्याचा सल्ला दिला होता. एके ठिकाणी ब्रिटिश अधिकाऱ्याचा पुतळ्यावर चिखल फेकणे म्हणजे त्या पुतळ्यावर हिंसा करणे असे गांधी ह्यांनी लिहिले होते. त्याची सावरकर ह्यांनी जी पराकोटीची खिल्ली उडवली होती ते वाचून पोट दुखले.
30 May 2023 - 2:02 pm | कानडाऊ योगेशु
मलाही तसेच वाटते. विधानसभा विधानपरिषद वगैरे शब्द सुध्दा सावरकरांची देणगी आहे. हिंदी भाषेमध्ये सुध्दा हे व तत्सम शब्द वापरात आहेत.
मेयर ह्यासाठी महापौर ह्या शब्द सुचण्याचा किस्सा ही रोचक आहे.
30 May 2023 - 2:06 pm | कुमार१
https://blogs.maharashtratimes.indiatimes.com/karanki/savarkar/#:~:text=....
....
अर्थात याहून अधिक अधिकृत संदर्भाची गरज आहे.
एक मुद्दा असा:
त्यांनी निर्माण केलेले शब्द आणि (पूर्वी अस्तित्वात असलेले) प्रचारात आणलेले शब्द यात गल्लत होता कामा नये.
30 May 2023 - 1:33 pm | चौकस२१२
सावरकरांनी मराठी भाषेवर काम केले हे माहित होते पण "हुतात्मा, क्रमांक आणि दिग्दर्शक" हे तीन शब्द त्यांनी शोधले हे माहित नव्हते !
29 May 2023 - 8:58 pm | यश राज
स्वातंत्र्यवीर सावरकरांना विनम्र अभिवादन _/\_
30 May 2023 - 1:52 pm | श्रीगुरुजी
ग्रंथालय, पर्यवेक्षक, मुख्याध्यापक, प्राचार्य, महपौर हे शब्द सावरकरांनीच निर्मिले आहेत.
30 May 2023 - 3:09 pm | खेडूत
छान लेख, आवडला.
स्वातंत्र्यवीर सावरकरांना विनम्र अभिवादन!!
31 May 2023 - 9:52 am | अथांग आकाश
छान लेख! स्वातंत्र्यवीर सावरकरांना कोटी कोटी प्रणाम_/\_
31 May 2023 - 11:44 am | Trump
श्री सावरकर यांनी सदा व्यवहारीक आणि विज्ञानाधारीत हिंदु धर्माचा पुरस्कार केला त्यामुळे ते दांभिक पुरोगाम्यांना आणि सनातन्यांना तितके पचले नाहीत. भारताला आणि हिंदु धर्माला श्री सावरकर यांच्या विचारांची गरज आहे. खरे म्हटले तर त्यांच्या विचाराचा प्रचार कमी झाला, पण अपप्रचारच जास्त झाला.
ज्या अनेक लोकांनी मला स्फुर्ती दिले त्यापैकी श्री सावरकर हे एक आहे. बहुदा लोक श्री सावरकर यांच्याबद्दल बोलताना त्यांच्या पत्नी, बंधु आणि इतर कुटुंंबिय यांच्याबद्दल विसरतात. त्यांनी केलेला त्याग आणि दिलेली सोबत तितकीच प्रंशसनीय आहे.
लेखातील माहितीबद्दल धन्यवाद.
31 May 2023 - 1:18 pm | गोरगावलेकर
स्वातंत्र्यवीर सावरकरांना विनम्र अभिवादन !
1 Jun 2023 - 5:31 am | चौकस२१२
ते दांभिक पुरोगाम्यांना आणि सनातन्यांना तितके पचले नाहीत.
अगदी बरोबर .. दोन्ही बाजूंचा त्यांनी "सुपडा साफ" केला
त्यांच्या काळातील समाजातील कर्मठ पणा विचारात घेता त्यांचे काम किती अवघड होते हे विचारात घेतला पाहिजे
दुर्दैवाने आज त्यांना "अति उजवे" अशी जी पदवी दिली राजकीय आणि जातीय फुरोगाम्यांकडून
1 Jun 2023 - 5:42 am | चौकस२१२
Savarkar’s position was rather complicated on the issue of cow protection as he was of the opinion that if one deliberately killed cows to spite Hindus then it was a problem. “However, he believed that if it was just for the sake of eating because you like it, then it is okay,”
https://www.newindianexpress.com/lifestyle/books/2019/nov/11/veer-savark...
अर्थात दिग्विजय सारख्या काँग्रेसींनी याचा आप्ल्याला हवा तेवढाच भाग घेतला ( चापलुसी)
1 Jun 2023 - 12:28 pm | राजेंद्र मेहेंदळे
वाड्याची देखभाल चांगली ठेवलेली दिसत आहे. काळाच्या पुढचे बघणारा एक द्र्ष्टा असेच सावरकरांबद्दल म्हणावे लागेल. गोहत्येसारख्या अनेक विषयांवरचे त्यांचे विचार आजही अनेकांच्या पचनी पडणार नाहीत. नुकतीच अंदमानला भेट दिली आणि त्यांच्या स्मृतीला अभिवादन केले. प्रत्येकाने एकदा तरी भेट द्यावीच आशी जागा.
1 Jun 2023 - 4:49 pm | गोरगावलेकर
नुकतीच अंदमानला भेट दिली
अंदमान आमच्या भटकंती यादीत आहे. या वर्षी नाही पण पुढे केव्हातरी निश्चितच. सविस्तर लेख वाचायला आवडेल.
2 Jun 2023 - 9:14 am | प्रचेतस
धन्यवाद.
तुमच्या अंदमान भेटीबद्द्ल येथे एक सविस्तर लेख अवश्य येऊ द्यात.
2 Jun 2023 - 12:27 pm | राजेंद्र मेहेंदळे
जरा जरा वेळ झाला की टायपुन ठेवतो आहे. स्टे ट्युन्ड!!
2 Jun 2023 - 9:15 am | आनन्दा
खरं तर काडी टाकायची इच्छा नाहीये, पण आपलं विचारतो.
काही मान्यवर या धाग्यावर अजिबात फिरकले नाहीयेत..
इतरत्र नोटाबंदी वगैरेवर ज्ञान झाडत आहेत मात्र.
असे का बरे असेल? मान्यवर सदस्यांकडून दोन शब्द ऐकले तरी बरे वाटेल आम्हाला.
प्रचेतस भाऊ, अवांतर केल्याबद्दल क्षमस्व
4 Jun 2023 - 9:41 am | आंद्रे वडापाव
हे तुम्हाला कसे कळले ? त्यांनी वाचला ही असेल धागा.
तुम्हाला सर्वर च्या वेब लॉग ला अक्सेस आहे का ??
का तुम्हाला "ज्या धाग्यावर वाटतं त्या धाग्यावर, मान्यवरांनी येवून, प्रतिक्रिया दिली पाहिजे" असा दंडक तुम्ही जर योजला असेल.. तर तो सर्व मीपा सदस्यांना बंधनकारक आहे ??