काळेसावळे ढग, दरीतल्या सावल्या
पावसाचा साज, बुजलेली पाऊलवाट,
वाऱ्याचे बहाणे, सोनकीचे डोलणे
मुरवत चाललोय....
हिरवीगारं कुरणं, दगडी शेवाळ
विहीरीतला खोपा, कुत्र्याच्या छत्र्या
चंद्रमौळी विसावा, खापरी कौलं
निरखत चाललोय....
देवळाची पायरी, चाफ्याचा दरवळ
सोनसळी पावलं, पैंजणांचा गुंजारव
नजरेतला नखरा, माळलेला गजरा
आठवत चाललोय....
क्षण तुझ्या दरवळत्या अस्तित्वाचे
कण तुझ्या विरघळत्या भासांचे
दशकं सरली, चालण्याचा मोह सुटेना
जगणं कसलं ??? फरफट नुसती.....
तरीही....जगत चाललोय.......
आयुष्य उधळत चाललोय.......
प्रतिक्रिया
10 May 2023 - 6:17 pm | विवेकपटाईत
कविता आवडली
10 May 2023 - 8:45 pm | श्रीगणेशा
छान लिहिलंय!
12 May 2023 - 11:06 am | कुमार१
कविता आवडली!
12 May 2023 - 1:00 pm | चौथा कोनाडा
+१ व्वा, सुंदर .... आवडली रचना !
किती चित्रदर्शी आहे !
वाह, क्या बात !
💖
12 May 2023 - 2:45 pm | कर्नलतपस्वी
दशकं सरली, चालण्याचा मोह सुटेना
जगणं कसलं ??? फरफट नुसती.....
तरीही....जगत चाललोय.......
ओझं वेळच्या वेळी झटकले की फरपट होत नाही.
कवीता आवडली.
14 May 2023 - 12:08 pm | प्राची अश्विनी
आवडली कविता.
25 May 2023 - 5:49 pm | चक्कर_बंडा
प्रतिसादाबद्दल सर्वांचे मनापासून आभार.
26 May 2023 - 2:49 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
आवडली कविता. लिहिते राहा.
-दिलीप बिरुटे
1 Jun 2023 - 1:13 am | खिलजि
एकदा वाचून पोट नाही भरलय
दोनदा वाचली,
तिसऱ्या खेपला मंचावर आलोय
तऱ्ही वाचत चाललोय, वाचत चाललोय
कविता कसली, थेट काळजात घुसली
तरी वाचत चाललोय वाचत चाललोय
1 Jun 2023 - 1:13 am | खिलजि
3 Jun 2023 - 8:25 am | चित्रगुप्त
व्वा. सुंदर कविता.