बऱ्याच दिवसांनी तिला मोकळा वेळ मिळाला होता. नाही म्हटले तरी काही वर्षे लोटली होती. पूलाखालुन बरेच पाणी वाहून गेले होते.
इतकं पाणी कि महापूर. त्या पाणलोटात पूल वाहून गेला होता.
किती वर्षं झाली असतील? तिनं कधी पूल ओलांडला नव्हता. पूल ओलांडायची गरज नव्हती. तिची जिवाभावाची मैत्रीण! ती कायम तिच्याबरोबर असायची. शाळेत कॉलेजात. मनसोक्त गप्पा. लोक म्हणायचे, “हिला वेड लागलेय. स्वतःशी बडबडत असते.”
गप्पांचा विषय एकच. कविता. क़्वचित कथा. तिनच तिला ती डायरी वाढदिवसाची भेट म्हणून दिली होती.
“आता लिही कविता. या डायरीत. अगदी मनसोक्त लिही. तुझ्यामधील लेखकरुपी पक्ष्याला, घेऊ दे साहित्यगगनामध्ये भरारी. मुक्त कर त्याला पिंजऱ्यातून.”
अशी ती वेड्यासारखी लिहित सुटली. मैत्रिणीला कथा ऐकवत राहिली.
“ए, तू ह्या कवितांचा संग्रह प्रसिध्द कर ना.”
“नाही ग बाई. ह्या फक्त तुझ्यामाझ्यासाठी.”
आणि मग तो भेटला. ती हरखून गेली. त्याच्या सहवासात तिने स्वतःला झोकून दिले. अनोख्या परीकथेत.
स्वतःला हरवून बसली.
तिची मैत्रीण कधी सोडून गेली समजलच नाही. पुलाच्या पल्याड.
मग लग्न झाले. त्याच्याशीच. त्याच्या शिवाय जगणे अशक्य होते. तेव्हा.
मुलगा झाला.
अशी ती गुरफटत गेली. गुरफटण्याचे दिवसही सरले.
मुलगा नोकरीला लागला.
नवरा मोठा ऑफिसर झाला होता.
आता ती निखळ एकटी झाली होती.
काहीतरी हरवले होते. काय हरवले होते ते समजल्या शिवाय शोधणार कसं? कुठल्या कप्प्यात दडून बसलं होतं?
आणि आता तिची मैत्रीण परत आली होती.
अस्तित्वात नसलेला पूल ओलांडून.
“ओळखलस का मला? ही तुझी डायरी बघ. हीच शोधात होतीस ना? आठवलं काही?”
आधी ओळखलं नाही पण त्या कवितांच्या वहीनं आठवण करून दिली.
हरवले होते ते गवसले.
प्रतिक्रिया
11 Feb 2023 - 9:42 am | कर्नलतपस्वी
सर्व जबाबदारीतून मुक्त झाल्यावर माणूस अंतर्मुख होतो. रिकामे मन काहीतरी शोधू लागते. कविवर्य ग्रेस आणी सुधीर मोघ्यांच्या कवितांच्या काही ओळी आठवल्या.
मन कशात लागत नाही,
अदमास कुणाचा घ्यावा ।
अज्ञात झऱ्यावर रात्री,
मज् ऐकू येतो पावा ॥
-कविवर्य ग्रेस
मन मनास उमगत नाही, आधार कसा शोधावा ?
स्वप्नातील पदर धुक्याचा, हातास कसा लागावा ?
-कविवर्य सुधीर मोघे
13 Feb 2023 - 7:17 am | भागो
आभार.
आपला प्रतिसाद वाचून
काव्य शास्त्र विनोदेन कालो गच्छति ...
अस वाटायला लागले.
13 Feb 2023 - 11:22 am | चांदणे संदीप
काय सुरेख लिहिलंय. भागो, आपली कधी भेट झाली तर तुम्हाला माझ्याकडून एक मस्तानी लागू.
हरवलेले ते सापडले
सापडले हरवल्यानंतर
हरवले सापडण्याआधी
कळाले सापडल्यानंतर!
असं काहीबाही लिहीलेलं खूप आधी. :)
सं - दी - प
13 Feb 2023 - 11:54 am | भागो
सं - दी - प सर
आपले प्रतिसाद हेच माझे मस्तानी!
धन्यवाद.